पंढरीचा राया : अभंग

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
19 Jul 2013 - 2:54 pm

पंढरीचा राया : अभंग-१

पंढरीच्या राया । प्रभु दीननाथा ॥
टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥

बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥

कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥

त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा कारे पायी । बोलावतो ॥५॥

देव गरीबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥

आम्हां कारे असा । गरीबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥

- गंगाधर मुटे
................................................
.
शुभहस्ते पुजा : अभंग-२

प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥

त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥

लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥

पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥

म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥

- गंगाधर मुटे
.........................................................
(आषाढी एकादशीच्या निमित्ताने
पांडुरंगाला थोडेसे साकडे)
…………………………………………
.
बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!

कविता

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

19 Jul 2013 - 3:12 pm | आशु जोग

'शुभहस्ते पुजा'
आवडली

आशु जोग's picture

19 Jul 2013 - 3:14 pm | आशु जोग

सोन्या रूपानं मढला, मारवाड्याचा बालाजी।
शेतकऱ्यांचा विठोबा, पानफुलामधी राजी।।

- बहीणाबाई

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2013 - 6:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभंग आवडला.

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥

मस्तच.

-दिलीप बिरुटे

राघव's picture

23 Jul 2013 - 7:18 pm | राघव

आवडले. छान लिहिलेत. :)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2013 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

शुभहस्ते पुजा : अभंग-२ http://mimarathi.net/smile/congrats.gif

ओळि ओळितून बसलीया ओळी,
अता यांची पोळी कैशी भाजेल...

लावा अभंगाचे पान पंढरीला,
विठुराया गेला वैकुंठाला...

अविनाशकुलकर्णी's picture

23 Jul 2013 - 8:19 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त ............आवडेश दादा