कोल्हापुरी चटणी (कांदा-लसूण-मसाला तिखट)

सस्नेह's picture
सस्नेह in पाककृती
16 May 2013 - 2:10 pm

( सदर धागा श्रेष्ठ अन ज्येष्ठ मिपाकर बल्लव मा. श्री. गणपाभौ याना अर्पण !! )
मागे स्मिताताई चौगुले यांनी कांदा-लसूण मसाला ही पाकृ दिली होती. आमच्या कोल्हापूर भागात ही कांदा-लसूण चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात म्हणून ही पाकृ . अभ्यासू मिपाकर बल्लव अन सुगरणी यांच्या माहितीप्रीत्यर्थ.
साधारणत: मे महिन्यात आमच्या कोल्हापूर सांगली भागात गल्लोगल्ली कांडप मशिनांचा ठणठणाट जोरात ऐकू येत असतो. घरोघरी बायकांची पावसाळ्याची बेगमी सुरु होते. पापड कुरडया, सांडगे यांच्याबरोबरच एक महत्वाचा विषय म्हणजे चटणी. एकदा पावसाला सुरु झाला की चटणी करायला मिळत नाही. कारण दमट हवेत केलेली चटणी टिकत नाही.
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच ती निगुतीने बनवून बंदोबस्तात ठेवावी लागते. एकदा चटणीची शिस्त झाली की मग पावसाळाभर भाज्या मिळाल्या काय अन नाही काय, पर्वा नै ! घाल चटणी.., कर अंडी, मटण, चिकन !
तर मग साहित्य जमवाजमव केली. हे अगदी कटाक्षाचं काम बरं ! एकही जिन्नस चुकून उपयोग नाही. कोल्हापूर भागात चटणीसाठी उपयुक्त मसाल्यांची छोटी छोटी पाकिटेच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये तयार मिळतात. त्यामुळे तोला-मापायचे काम वाचते.
बेसिक पदार्थ :
लाल मिरचीपूड १.५ किलो. (यात मी रंगासाठी अर्धी ब्याडगी व तिखटपणासाठी अर्धी देशी मिरची वापरली.)
खडे मीठ पाउण किलो. (इथे टाटा किवा इतर कुठले बारीक मीठ शक्यतो नको. चवीत फरक पडतो.)
तेल २ वाट्या (सुमारे २०० मिली)
a a
ओले मसाले :
कांदा पाउण किलो लांब लांब पातळ चिरलेला व सावलीत थोडा सुकवून घेतलेला.
लसूण ३०० ग्रॅम पाकळ्या सोलून
आले सुमारे ३ इंच ,जाडसर, साल काढून
कोथिंबीर १ मोठी जुडी निवडून बारीक चिरलेली.
a
कोरडे मसाले :
धणे २५० ग्रॅम
जिरे १०० ग्रॅम
तीळ १५० ग्रॅम
खसखस ५० ग्रॅम
खोबरेकीस ४०० ग्रॅम

गरम मसाले :
लवंगा ७-८
हळकुंडे ६-७ ठेचून लहान तुकडे केलेली.
मेथ्या १ मोठा चमचा (टेबलस्पून)
मोहरी १ मोठा चमचा
इतर सर्व प्रत्येकी १० – १० ग्रॅम
बदामफूल दगडफूल
दालचिन जायपत्री
रामपत्री तमालपत्री
शहाजिरे नाकेश्वर
त्रिफळ काळी मिरी
मसाला वेलची खडा हिंग
a
जमवाजमव झाली. ही आदल्या दिवशीच करून ठेवावी लागते. दुसऱ्या दिवशी जेवण बिवण आवरून चटणीच्या नादाला लागले.
प्रथम खलबत्त्यात हळकुंडे ठेचून घेतली. मग खडा हिंग जाडसर कुटून घेतला. नंतर . आले अन लसूण किंचित ठेचून घेतले.
हे करताना कढईत दीड वाटी तेल तापत ठेवले (जेमतेम कांदा भाजला जाण्याइतपतच घ्यावे) . ते तापल्यावर चिरून सुकवलेला कांदा त्यात घातला. तांबूस होईपर्यंत मंद गॅसवर परतला. आता परात तिरकी करून त्यात वरच्या कडेला कांद्याचा ढीग घातला अन त्यातले तेल पूर्ण निथळून बाजूला काढले. हेच तेल नंतर चटणीत घालायचे आहे.
आता सर्व कोरडे मसाले एक एक करून भाजून घेतले. खरपूस भाजले जावे पण डागलू नयेत, इतपत. (मी यासाठी मावेओ वापरला.) पेपरवर पसरून ते थंड होऊ दिले.
a a
आता पुढचे काम झटापटीचे.
सर्व गरम मसाले एक एक करून अर्धी वाटी तेलात परतले. तांबूस रंग येताच झटपट काढले पाहिजेत हे काम अतिशय तरल अवधान राखून करावे लागते. नाहीतर मसाले तोंड काळे करतात अन चटणीच्याही तोंडाला काळे फासतात. यात हिंग, हळकुंडे, दगडफूल अन शहाजिरे यांचा नंबर सर्वात शेवट ठेवावा म्हणजे तेलात जळके कण रहात नाहीत.
a
आता हे सर्व थंड व्हायला ठेवले अन जरा दम खाऊन मग एक कप कॉफी पोटात ढकलली.
मग सगळे समान डब्यांमध्ये भरले. म्हणजे कांदा वेगळा, आले-लसूण वेगळे, कोथिंबीर एका कॅरीबॅगेत , कोरडे मसाले एका डब्यात, गरम मसाले दुसऱ्या डब्यात अन इतर साहित्य म्हणजे मिरचीपूड, मीठ इ. वेगळे. अन हे बाचके घेऊन गेले डंकात !
डंकवालीने शिस्तीत एक एक सोपस्कार केले. प्रथम दोन वाट्या मिरचीपूड अन तळलेले गरम मसाले यांचा घास डंकाच्या मुखात भरवला अन ढांग ट्याक सुरु केले.
a
पहिला घास चावून होताच कोरडे मसाले मुसळाखाली ढकलले.
मसाले एकजीव झाल्यावर उरलेली मिरचीपूड अन मीठ घातले. आतापर्यंत मसाल्यांचा दरवळ घमघमू लागला होता.
मग आले लसूण, कोथिंबीर अन सर्वात शेवटी कांदा. पुन्हा सुमारे १० मिनिटे ढांग ट्याक ! की झाली खमग मरून कलर चटणी तयार !a
डब्यात भरून घरी आणली. त्यात कांदा अन मसाले तळून राहिलेले तेल मिसळले अन रात्रभर झाकणाला फट राखून ठेवून दिले. कारण चटणी ओली असताना खडे होतात. दुसऱ्या दिवशी जरा सुकल्यावर हे खडे हाताने चोळून चटणी एकसारखी करून घ्यावी लागते. आता चिनी मातीच्या बरणीत भरून झाकण कपड्याने बांधून ठेवायचे, की वर्षभर टिकण्याची निश्चिंती !

a
a

रोजच्या भाजीत हीच चटणी घाला एक-दीड चमचा अन साध्या भाजीलासुद्धा नॉनव्हेजसारखी लज्जत येते की नाही बघा !
मी तर नॉनव्हेज खात नाही . मग ताज्या ताज्या चटणीचा स्वाद घ्यायला केली बैगन मसाला करी !

a

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

16 May 2013 - 2:18 pm | अभ्या..

ब्येस्ट एकदम.
डंक म्हणजे कांडप मशीन हे सांग की लोकांना. ;)
(आणि ते ब्रेकींग न्यूज कशाला मध्येच. चटनीने ४०००० रुपये वाचतेत का गृहीणीचे?आता तर गॅलक्सी पण दिसतोय ;))

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 2:21 pm | प्रभाकर पेठकर

व्वा... मस्त आणि तपशिलवार पाककृती आहे कोल्हापुरी मसाल्याची. नक्कीच प्रयत्न करून पाहीन. फक्त एवढी मेहनत करायला कधी मुहूर्त मिळतो तेच पाहायचे.

जरा, वांग्याच्या भाजीची पाककृतीही टाका की.

प्रचेतस's picture

16 May 2013 - 2:28 pm | प्रचेतस

वा!!!!!!!!!

खल्लास मसाल्याची हीच कृती हवी होती.
गेल्या 'मे'मध्ये बाबा कोल्हापूरला गेले होते तेव्हा येताना हा असलाच मसाला घेउन आले होते.
पहिल्या चवीतच दिवाणा झालो होतो. अगदी अर्धा-पाऊण चमचा वापरला तरी रश्याला असला रंग आणि झणझणीत पणा योतो की यंव र यंव. साधं मॅगी करताना ही वापरुन वापरुन आता संपायच्या बेताला आलाय.

या पाककृती बद्दल धन्यवाद सेन्हांकिता.
प्रयोग म्हणुन घरच्या घरी लहान प्रमाणात करुन पहातो.

तर्री's picture

16 May 2013 - 2:37 pm | तर्री

पाकृ - लेखन आवडले. किती खटाटोप ? किती जिन्नस ? आणि काय ते करणे......सलाम.
ऑर्डर घ्या की ताई ....५ किलो द्या एकदम.

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 2:41 pm | दिपक.कुवेत

हा मसाला ज्या कशात जाईल ते सॉल्लिडच लागत असणार. नुसत्या वांग्याच्या तरीचा फोटो बघुनच अंदाज आला. पण ईथे कुथे कांडप मशीन? साध्या मिक्सरवर केलं तर चालेल का? म्हणजे बारिक वाटलं जाईल का? मसाले तेलात तळल्यामुळे हा मसाला ओला नाहि होणार/राहणार?

किलो दोन किलो चटणी असेल तर मिक्सरवर होऊ शकते. आधी सर्व कोरडे मसाले बारीक करून घ्या मग तळलेले मसाले घाला. पण कांडप मशीनमध्ये मीठमसाला जसा आतपर्यंत शिरतो, तशी टेस्ट मिक्सरने येत नाही.

सानिकास्वप्निल's picture

16 May 2013 - 2:45 pm | सानिकास्वप्निल

कृती दिल्याबद्दल धन्यवाद :)
मसाल्याचा रंगच सगळं काही सांगून जातोय...बेस्ट :)

अक्षया's picture

16 May 2013 - 2:55 pm | अक्षया

धन्यवाद. :)

धनुअमिता's picture

16 May 2013 - 3:08 pm | धनुअमिता

सुरेख दिसतोय मसाला.

चावटमेला's picture

16 May 2013 - 3:18 pm | चावटमेला

मस्तच..

मे महिन्यात आमच्या कोल्हापूर सांगली भागात गल्लोगल्ली कांडप मशिनांचा ठणठणाट जोरात ऐकू येत असतो. घरोघरी बायकांची पावसाळ्याची बेगमी सुरु होते. पापड कुरडया, सांडगे यांच्याबरोबरच एक महत्वाचा विषय म्हणजे चटणी

अगदी अगदी. लहानपणी आईबरोबर असा बर्‍याचदा गिरणीत जायचो. बाकी ते मिठाचं एकदम खरं हं. खडे मीठाची चव ब्रँडेड मिठाला येत नाही.

विसोबा खेचर's picture

16 May 2013 - 3:20 pm | विसोबा खेचर

लै मस्त...!

झकास लिखाण! कांदा उन्हात वाळवून नाही का चालणार? सावलीत किती वेळ सुकवायचा? वाचन खूणा साठवली आहे.
मिक्सरवर वाटून चालेल का?

सस्नेह's picture

16 May 2013 - 4:51 pm | सस्नेह

कांदा उन्हात वाळवल्यास त्यातला रस सुकतो, जो चटणीच्या स्वादाचा खमंगपणास कारणीभूत असतो. सावलीत साधारण तीन तास सुकवावा.

बरेच दिवसांपासून एक प्रश्न मनात आहे. कांदा थोडाच सुकवायला साम्गीतालाय्स, तसेच लसूण व ताजी कोथिंबीर घातले आहे (जराही न सुकवता). याचा ओलसरपणा राहून मसाला खराब होत नाही का? चित्रात कांदा अगदी ब्राऊन केलेला दाखवला नाहीये, गुलाबी केलाय.

माझ्या मते असं करण्यामागे मसाला टिकणे हा उद्देश असावा. सर्व साहित्यात थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नये.
कांद्यात पाण्याचा अंश जास्त असतो तितका लसूण अन कोथिंबीरीत नसतो. शिवाय लसूण अन कोथिंबीरीचा रस पूर्णपणे मिरचीपुडीमध्ये शोषला जातो अन चटणी ओली होत नाही
कच्च्या कांद्याचा रस ओला राहतो अन शोषला गेला तरी चटणीत पाण्याचा अंश राहून ती खराब होण्याची शक्यता असते.
कांदा ब्राऊन करू नये त्याने कांद्याचा स्वाद बदलतो. मंद आचेवर गुलाबी केल्यावर त्यातला पाण्याचा अंश तर निघून जातो. पण काहीसा उग्र खमंग वास नाही जात.

रेवती's picture

16 May 2013 - 9:35 pm | रेवती

ओक्के.

मोदक's picture

16 May 2013 - 4:57 pm | मोदक

निषेध!

निषेध!!

निषेध!!!

सस्नेह's picture

16 May 2013 - 5:05 pm | सस्नेह

आँ...???
कशाबद्दल बॉ ?

पैसा's picture

16 May 2013 - 5:02 pm | पैसा

मस्त आहे अगदी! मी अंबारी कंपनीचा विकतचा मसाला आणते पण हा घरी केलेला खासच असणार! आणि ही स्नेहांकिताची वांग्याची करी!

http://misalpav.com/node/22509

Mrunalini's picture

16 May 2013 - 5:14 pm | Mrunalini

सही................. काय मस्त रंग आलाय.. आणि ती वांगी बघुन मी मेले... मला कोणीतरी वांगी इकडे पार्सल पाठवा...

सुहास झेले's picture

16 May 2013 - 6:14 pm | सुहास झेले

जबरी... :) :)

इनिगोय's picture

16 May 2013 - 6:41 pm | इनिगोय

तोंपासु! कधी येऊ हा मसाला घालून केलेलं तुझ्या हातचं जेवायला??

आदूबाळ's picture

16 May 2013 - 7:00 pm | आदूबाळ

(आवंढा गिळल्या गेला आहे...)

ए बरं झालं बै पाक्रु दीलिस ती !

माझी आय कालच मला म्हन्ली " आता सगळं करायला शिक " :-/ :-/

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 7:29 pm | दिपक.कुवेत

हे म्हणजे वरातीमागुन घोडे....आता तु खरचं शिकणार कि सासुबै ना शिकवणार?

जेनी...'s picture

16 May 2013 - 8:16 pm | जेनी...

अय्या दीपूकाका .....
मी सासुबैंना पाक्रुची लिंक पाठवनार =))

प्यारे१'s picture

16 May 2013 - 7:35 pm | प्यारे१

काळं तिखट.

तो कांदा कुठं गेला तेलवाला ?
चार दिवस तो कांदा नि भाकरी खावी.... आहाहा!
नंतर हे ताजं काळं तिखट, तेल नि शिळी भाकरी =स्वर्ग.
(आपापल्या ऐपतीनुसार खाणे नाहीतर... :) )

कपिलमुनी's picture

16 May 2013 - 7:37 pm | कपिलमुनी

जबर्‍या अनुभव असतो ..
शेतात विहिरि कडेला बसून खाल्ला तर अमृतच !

सोबत कांदा हवा.. बुक्की मारून फोडलेला.

डायरेक गडव्याने पाणी प्यायचे, आणि शांत वार्‍यात.. डेरेदार झाडाच्या सावलीत एखादे पुस्तक वाचत निवांत पडी मारायची.

प्यारे१'s picture

17 May 2013 - 2:07 am | प्यारे१

'धनी.... ओ धनी, भाकर खावून घ्या वाईच.' आणि 'जरा कांदा खावा की'
असं म्हणणारी नको का रे कुणी? ;)

स्पंदना's picture

17 May 2013 - 4:44 am | स्पंदना

आर प्यारे दम धर! आत्त्ता कुठ खाउन पिउन पडी मारलीय, मग थोड्यावेळाने वरच्या झाडाच्या फांद्या अस्पष्ट होत जातील, अक्षरे पुस्तक सोडुन भरकटायला लागतील, अन अश्या दुपारच्या चांदणवेळी कुणीतरी अयाऽऽई ग! अस कळवळेल, अन मोदक राव झोपेतच उठुन मदतीला धावतील............

(कुणाला हवी तशी रंगवा. कथा आपणाला ओपन हाय)

श्रीरंग_जोशी's picture

16 May 2013 - 10:52 pm | श्रीरंग_जोशी

तपशीलवार वर्णन व फोटो, एक नंबरी.

स्पंदना's picture

17 May 2013 - 4:53 am | स्पंदना

काहीही होत नाही कांदा कोथिंबीरीच्या ओलाव्याने या चटणीला. मिठाचे प्रमाण योग्य असले की बस.
आम्ही कांदा, कोथिंबीर, लसुण, आल, यात थोडी मिरचीपुड मिठ मिसळुन तो गोळा एक दिवस आधी सुद्धा तयार करुन ठेवतो, अन त्याला काही होत नाही.
सगळ एकदम मिसळण्याऐवजी घरात हे कांद्याचे तिखट थोड आधी तयार व्हायच, अन मग ते भाकरीबरोबर सर्व्ह व्हायच. भाज्या गेल्या तेल लावत म्हणत नुसत हे भाकरीबरोबर खाण म्हणजे स्वर्ग!!
मी दर सहा महिन्याला बनवते अस तिखट, पण एव्हढा पसारा असतो की फोटो काढायला होत नाहीत, म्हणुन आजवर रेसिपी टाकली नव्हती. मी मिक्सरवर बनवते. स्नेहांकिता म्हणते तस मी कमी तिखट (स्वीट पॅपरिका), काश्मीरी चिली पावडर सम प्रमाणात, अन निम्म्याने तिखालाल सारखी अतिशय तिखट मिरची पावडर (निम्म्याने म्हणजे ४००ग्रॅम काश्मीरी, ४००ग्रॅम स्वीट पॅपरिका, अन २०० ग्रॅम तिखालाल) अस प्रमाण घेते. एक किलो तिखट बनवायला घेतल तर हळद्पावडर (बाबा म्हणुन मलेशियन कंपनीची मिळाली तर वापरुन पहा. हळदीचा घमघमाट) मिठ, अन धनाजीरा पावडर हे सगळ मिळुन सहज, दिड किलो तिखट तयार होते. रोजच्या स्वयंपाकाला हेच वापरल जात.

५० फक्त's picture

17 May 2013 - 8:09 am | ५० फक्त

मग एक कप कॉफी पोटात ढकलली. - या कॉफिची पाकृ राहिली.

असो, मसाला मस्त दिसतोय. चव तुम्ही करुन खाउ घातल्याशिवाय काय कळणार नाही.

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 8:02 pm | बॅटमॅन

कॉफी पोटात ढकलली होय, मला वाटलं कॉफी डेस्कवर सांडली.

कच्ची कैरी's picture

17 May 2013 - 8:41 am | कच्ची कैरी

धन्यवाद रेसेपीबद्दल :)

चौकटराजा's picture

17 May 2013 - 9:00 am | चौकटराजा

आरे रे आले !! वाजत गाजत आले स्नेहा मसालेवाले...आगामी आकर्षणे.. कामतांचा मसाला.... आगाशांचा मसाला..
जमल्यास इस्माईलचा मसाला.....कुटिन्हो चाही मसाला......तारखेकडे लक्ष ठेवा.......होशियार.....!!!!

ही काही पाकृ नव्हे. असलीच तर पाकृला पूरक म्हणता येईल.
खरं तर ही पारंपारिक रेसिपी पण अलिकडे हा चटणी प्रकार नामशेष होऊ लागलाय. कारण आम्हा जॉबवाल्या बायकांना सवड नसते. जालावर कुठेतरी पडून राहिला तर भविष्यात जिवंत राहील ही अपेक्षा.
जिज्ञासूंनी अवश्य करून पहावी.
a

जेनी...'s picture

17 May 2013 - 6:50 pm | जेनी...

जिज्ञासु क्रमांक १ :D

ऋषिकेश's picture

17 May 2013 - 2:41 pm | ऋषिकेश

बाजारात त्यातल्यात्यात बरा ब्रॅन्ड कुठला

नै म्हंजे कृती भारीये, याचटणीची एका परिचितांकडे चवही चाखली आहे.. प्रचंड^२कोटी आवडलीही आहे/होती, पण इतका पेशन्स नाही म्हणून विचारतोय एखादा अस्सल ब्रॅन्ड आहे का बाजारात?

तसा स्टँडर्ड ब्रँड कोणताच नाही, म्हणजे नॅशनल लेव्हलवर. पण लोकल मेड बरेच ब्रॅंड आहेत. इथे जो मिळतो तो तिकडे मिळेलच असे नाही. पैसा वापरते तो अंबारीही चांगला आहे.

अगं सासुबैना मीच आणुन दीला होता तो ' अंबारी कांदा लसुन मसाला '
पण पाहिलस ? क्रेडीट जरा तरी सुनेला दीलय का ??? :-/ :-/

पैसा's picture

17 May 2013 - 7:56 pm | पैसा

तुला मीठ आणि मसाला यातला फरक तरी कळतो का?

प्रचेतस's picture

17 May 2013 - 8:24 pm | प्रचेतस

aaa

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

वॉव ! सूनबाई शेर तर सासुबाई सव्वाशेर... नाही नाही... हे उत्तर गेलाबाजार दोन-तीन शेर तरी भरेल

आणि सासू-सून एक झाल्यावर....??

एका म्यानात दोन तलवारी नैच बसत :-/

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

तर मग १ आणि १ = ११ !

तुमच्यासाठीइस्पूकाठीइस्पूकठीइस्पूकसाठीइस्पूसाठीइस्पोयासाठीइस्पच्यासाठीइसमच्यासाठीइ :

भारी हुश्शारेत इस्पू ़काका =))

:P

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेनी...'s picture

17 May 2013 - 9:10 pm | जेनी...

:-/ :-/

प्यारे१'s picture

17 May 2013 - 10:44 pm | प्यारे१

टेस्टेड सर्टिफाईड ओक्के!
सासूगिरीसाठी आवश्यक सर्व गुणांनी युक्त. आप सासू बन सकते हो! :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 May 2013 - 10:29 am | अत्रुप्त आत्मा

@तुला मीठ आणि मसाला यातला फरक तरी कळतो का?>>> http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/19.gif ...अगागागागागागा... http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/19.gif

स्पंदना's picture

18 May 2013 - 12:07 pm | स्पंदना

देवा!!
:-)) :-)) :-))

बघूनच तोंडाला पाणी सुटले. या मसाल्यात घोळवून तळलेले वांग्याचे काप भाकरीसोबत खायला मजा येते.

प्रभाकर पेठकर's picture

20 May 2013 - 10:41 am | प्रभाकर पेठकर

कालच हे कोल्हापुरी तिखट घरच्याघरी मिसरवर बनविले आणि बनविली वांग्याची भाजी आणि जोंधळ्याची भाकरी.
मजा आली.

Bhaji-Bhakari

सस्नेह's picture

20 May 2013 - 9:41 pm | सस्नेह

टेस्ट कशी काय वाटली काका ?

प्रभाकर पेठकर's picture

21 May 2013 - 1:22 am | प्रभाकर पेठकर

वागी अतिशय चविष्ट झाली होती. मसाल्याची चव सुंदर आहेच. आता ह्या मसाल्याचे अनेक पदार्थ करून पाहण्यात येतील.

प्यारे१'s picture

20 May 2013 - 9:42 pm | प्यारे१

आईग्ग्गं !
अ‍ॅम्ब्युलन्स मागवा रे कुणीतरी.
काका, अहो काय हे?
टप्प्या टप्प्याने उघडेल असा तरी फोटो टाकायचा की.

रेवती's picture

20 May 2013 - 10:10 pm | रेवती

जखमेवर मसाला.

आदूबाळ's picture

20 May 2013 - 10:19 pm | आदूबाळ

तो पण जबर्‍या तिखट :|

ढालगज भवानी's picture

20 May 2013 - 11:12 pm | ढालगज भवानी

खाल्ला आहे हा मसाला. खूप चविष्ट असतो.

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2013 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

ज्या मिसळच्या करंटचे आंम्ही दिवाने,त्याची ही आग पेटवणारी दारू बनवायलाही तेव्हढेच कष्ट लागणं स्वाभाविक! या एका ठिणगीचा स्फोट अगदी अणुध्वमासमं!!! कुणाकडनं तरी हा मसाला बनवुन घेणारच... :)

हक्काची मसालावाली लवकर येवो...!!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2013 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा

:)

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2013 - 8:04 pm | प्रभाकर पेठकर

म्हणजे कळेल तुम्हाला 'आग-आग' म्हणजे काय.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2013 - 1:50 pm | अत्रुप्त आत्मा

@ 'आग-आग' म्हणजे काय.>>> =))

मदनबाण's picture

21 May 2013 - 10:58 pm | मदनबाण

वा... कोल्हापुरी मसाला ! :)
कोल्हापुरात मला वाटतं तेलाला येशेल असं काहीस म्हंटल जात असं आठवतय !
बाकी तो वडाकोंबडा प्रकार मिळतो त्यालाही हाच मसाला चोळला जातो काय ?

सस्नेह's picture

23 May 2013 - 9:41 pm | सस्नेह

येशेल तेल म्हणजे गोडं तेल .
आणि वडाकोंबडा हा मालवणी पदार्थ. कोल्हापुरी नव्हे. मध्ये एकदा कुणीतरी मालवणी मसाल्याची पाकृ दिली होती. (लिंक द्या कुणीतरी शोधून)

वडाकोंबडा हा मालवणी पदार्थ. कोल्हापुरी नव्हे
पण कोल्हापुरातच या वडा-कोंबड्याच्या पाट्या पाहिल्या आहेत मी,म्हणुन विचारले.

(कधी काळी अंबाई टँक मधे पोहणारा)

स्पंदना's picture

24 May 2013 - 6:46 am | स्पंदना

कोंबडी वडा कोल्हापुरातपण करतात हो.
अंबाई टॅक? आम्हीपण जायचो दुपारी.

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2013 - 3:42 am | प्रभाकर पेठकर

मालवणी मसाला माझी पाककृती.

नगरीनिरंजन's picture

31 Dec 2013 - 7:30 am | नगरीनिरंजन

जबरदस्त!
काय ती मेहनत! काय ती निष्ठा!
या फोटोंसह एक आपल्या चरणकमलांचा फोटोही लावायला हवा होता.
लहानपणी आईबरोबर कांडपात जायचो आणि त्या धडाक-थडाकच्या आवाजात मसाल्याचा वास घेत तंद्री लावून बसायचो ते आठवले.
हे प्रकर्ण अवघडच दिसतंय; पण एकदातरी करायचा प्रयत्न नक्कीच करीन.

लहानपणी आईबरोबर कांडपात जायचो आणि त्या धडाक-थडाकच्या आवाजात मसाल्याचा वास घेत तंद्री लावून बसायचो ते आठवले.

अतिशय सहमत. काय तो आवाज अन काय तो वास!!! सगळंच तंद्री लावणारं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Dec 2013 - 7:37 am | कैलासवासी सोन्याबापु

घरची अन म्हात्तारीची आट्टवन आली बगा!!!!

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 9:30 am | वेल्लाभट

तोंडाला पाणी.......
ऑर्डर घेता का?