माXXXद . . .
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .
" अबे माXXXद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला माXXXद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . .
" कशाला आई घालायची रस्त्यात ? भिकारXट साला " . . माझ्या शेजारी कमनीय बांध्याच्या तरुणीसोबत फुकत थांबलेल्या कोण्या पोट्ट्याने आपली प्रतिक्रिया न मागता देऊन टाकली . हसायचे फिदी फिदी आवाज घुमत राहिले . तो माXXXद आता चेष्टेचा विषय झाला होता . काही वेळाने तो स्वतःच उठला . पिशवी हुडकू लागला . काळ्या रंगाची ती carry bag पुरती फाटली होती . आतील जिलेबी आणि बालुशाही रस्त्यावरच्या मातीत मिसळली होती . कोणासाठी घेतली असेल त्याने ? घरी दोन -चार डोळे त्याची वाट बघत असतील ? अनेक दिवस उरवून आणि पुरवून खाण्यासाठी बा काय आणतो याची वाट पहात असतील ? हो . . कदाचित . . तो बा मातीने माती पुसत होता . कळकट शर्टाच्या कोपऱ्याने जिलेबी -बालुशाही वर लागलेली माती पुसत होता . आपल्या नशिबाला दुषणे देत होता . कोपऱ्याला आणि गुढघ्याला झालेल्या जखमा विसरून मातकट अन्न गुंडाळायला नवा कोरा कागद हुडकत होता . एकटा … एकाकी … समाजाची नजर चुकवत पण हसण्याला कान देत ! कोण मदत करणार त्याला ? आपल्यावर संस्कार आहेत न ? ' रस्त्यावर पडलेले न उचलण्याचे ' ! कदाचित एखादा सुटातला साहेब किंवा लो वेस्ट मधली तरुणी पडली असती तर उचलायची इच्छा नक्कीच झाली असती . कारण त्यात मोह , स्टेट्स , संस्कार आणि कदाचित वासनाही असतात . याला उचलून काय साध्य होणार ? हा तर साला ' माXXXद ' आहे . . .
माXXXद . . कधीकाळी हा शब्द उच्चारला कि भांडणे व्हायची . . आपल्या आईचा भयंकर अपमान झाला आहे असे समजून दुध का कर्ज अदा व्हायचा पण आता तो काळ गेला . शब्द आणि अपशब्द यातील पडदा विकासाच्या आणि सुधारणेच्या नावाखाली आपणच फाडून काढला . आणि " बीप ' संस्कृतीचा उदय झाला . सध्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे दर ४ शब्दानंतर बीप असे समीकरणच झाले आहे . आपण बडी ,डूड ,स्टड आणि जे काय असेल ते सिद्ध करण्यासाठी आपल्या तीर्थारुपांपासून ते अनोळखी व्यक्तीच्या मातुश्रीपर्यंत सर्वाना शाब्दिक अलंकार देणे हा आजचा ' ट्रेंड ' आहे . अंतरवस्त्रा पासून ते डोक्याला लावायच्या जेल ( तेल आता हद्दपार झाले न ) पर्यंत ब्रांड बघणारे आपल्या शब्दांचे स्टेट्स मात्र बघत नाहीत . बघायची त्यांना गरज वाटत नाही . संस्कार आणी नितीमत्ता हे शब्द आजी आजोबांसोबत वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजत आहेत .. मिळवलेला पैसा -प्रतिष्ठा आणी बुडाखालची गाडी शिव्या द्यायचे शिकवत नाही पण शिव्या हासडायचा माज आणि अधिकार मात्र देते . आपल्या मनासारखा न वागणारा , कोणत्याही गोष्टीत आपल्यापेक्षा कमी असणारा प्रत्येक जण 'मा , बे " इत्यादी असतो . . शिकवणारा शिक्षक असो वा बौद्धिक घेणारा मित्र -मैत्रीण हे सगळे 'चू ' असतात . . आणी यात वावगे काहीच नसते ! २४ म्हणजे "आमच्या " वेळी म्हणायचं वय नाही पण खरच आमच्या वेळी 'शिंच्या ' म्हणल्या वरही गालावर ५ बोटांच्या टेटू उठायचा आणी तो बरेच दिवस टीकायचा सुद्धा . . पण आता तसे होत नाही आणी होणार सुद्धा नाही . . कारण आई -वडील मुले यात मैत्रीचे नाते असते म्हणे . . आणी मैत्रीत मा ,बे ,भो ,चू हे शब्द हॉट फेवरीट असतात . . खर न ? कोणी कोणते शब्द वापरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न पण कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . . छत्रपती शिवाजी महाराज , स्वातंत्र्यवीर सावरकर यानंतर भाषाशुद्धी ची मोहीम हाती घेतलीच पाहिजे . कारण आपली भाषा हा आपल्या संस्कारांचा ,संस्कृतीचा आणी स्वत्वाचा आरसा असतो असे माझे मत आहे . त्याची वेळीच शुद्धी झाली पाहिजे .
असे अनेक माXXXद आपल्या भोवती जगत ,वावरत असतात . प्रचंड विश्वात जग आणी जगात आपली जागा हुडकत असतात . त्यांना ती मिळालेली नसते म्हणून आपल्या तीर्थरूपाना किंवा आपल्याला मिळालेली असते . पण लक्षात कोण घेतो ? म्यानर्स हे केवळ पंचतारांकित हॉटेलात , मिटिंग टेबलावर किंवा हातात मद्याचे प्याले घेऊन हा हु करताना जपायचे असतात . . रस्त्यावर कोण पाहतो मला ? माझा खरा 'रंग ' या फडतूस लोकांना दाखवला तर काय बिघडणार आहे ? याच मनोवृत्तीने आपल्यासह अनेक रस्त्यावर उतरतात आणी शाब्दिक अत्याचार सुटतात आणी स्टेट्स च्या नावाखाली मिरवतात . मी त्या मादरचोद कडे पाहत होतो . . प्रतिष्ठीतव्यक्तीने आपल्यावर विनाकारण मारलेला शिक्का आपल्या अश्रुनी पुसत पुढे सरकत होता . . आपल्या घराकडे . . वाट पाहणाऱ्या पोरांना मळकट जिलेबी -बालुशाही घालण्यासाठी !! असे किती माXXXX तुम्हाला भेटले ?
-अंकुर रविकांत देशपांडे
http://spaandaan.blogspot.in/2013/04/blog-post_20.html
***PUBLISHED HERE WITH PRIOR PERMISSION OF THE AUTHOR.
प्रतिक्रिया
21 Apr 2013 - 9:33 am | श्री गावसेना प्रमुख
महाराष्ट्राच्या बोली भाषेला शिव्यां शिवाय चव येत नाही,फु**च्या,तु* आ** मा****
इकडे तर आमची मित्र मंडळी चालता बोलता भा*** चा जप करीत असते.
21 Apr 2013 - 9:36 am | अग्निकोल्हा
माणुस कसा आहे हे जोखायच असेल तर तो वेटरला कशी हाक मारतो हे बघावं...
मी स्वतः अपशब्द यथोचित जागीही टाळायचा यत्न करायचो. पण त्यामुळे समवयस्कांमधे मागासलेला ठरेल याची सार्थ भिती वाटल्याने माभे ची सवय प्रयत्नपुर्वक लावुन घेतली, कारण इथे कितीतरी कॅज्युअल वाक्यांची/संवादाची सुरुवात/शेवट याच शब्द प्रयोगातुन सर्रास होत असते. हे शब्द वापरले नाहीत तर भावना/मुद्दा/वाक्य नेमक्या तिव्रतेने व्यक्तच झाले नाही असा सर्वदुर समज/गंड असल्याने आताशा मलाही तेच सत्य आहे अस वाटतं.
21 Apr 2013 - 9:40 am | टवाळ कार्टा
आजकाल असे वागणे म्हणजे आपण "कूल" आहोत हे "दाखवण्या"साथी सुध्धा केले जाते
:(
21 Apr 2013 - 12:58 pm | आदूबाळ
मला हा थोडा "दवणीय*" गल्लत करायचा प्रकार वाटतो आहे.
बीएमडब्ल्यूवाल्याने त्या गरीब माणसाला शिवी हासडली नसती (आणि बाकी गोष्टी तशाच राहिल्या असत्या), तर तो सर्व प्रकार चालला असता का? अर्थातच नाही. प्रश्न मुजोर वृत्तीचा आहे, भाषेचा नाही.
अत्यंत भयानक भाषा पण आत सोन्यासारखा चोख माणूस : असं तुम्ही/लेखकाने बघितलं नाहीये का? उलट नमुने सुद्धा : सभ्य भाषा, पण आतला माणूस पाताळयंत्री : बघायला मिळतात. फक्त भाषेवरून एखाद्याबद्दल मत बनवणे हे बालिशपणाचं लक्षण आहे.
उदा. "गारंबीचा बापू" मधला बापू. "आमचं तोंड फाटकं म्हणून आमच्या चारित्र्यावरही संशय घेतला जातो" अशा अर्थाचं वाक्य आहे त्या कादंबरीत. पुलंचा रावसाहेब हे अजून एक उदाहरण.
*शब्द मिपावरूनच साभार
21 Apr 2013 - 1:00 pm | दादा कोंडके
हे फक्त (या शब्दावरून कोटी करण्याचा मोह आवरला आहे :) ) आपल्याकडेच आहे असं नाही. युयसमध्ये गर्दीच्या ठिकाणी 'आय एम मदर__र' असं लिहलेले टि-शर्ट्स घातलेले तरूण बघितले होते. पण युरोप-अशियामध्ये कमितकमी कार्यालयात जरा बरी भाषा वापरतात. अगदी युयस मध्ये एक-दिड वर्षे राहून आलेल्या लोकांच्या बोलण्यात देखिल हमखास 'फ_', अॅ_, बिच वगैरे शब्द येतात.
21 Apr 2013 - 1:53 pm | स्पंदना
एकुण लिखाण आवडल.
प्रसंग भिडला.
21 Apr 2013 - 2:28 pm | पैसा
पण असे शब्द वापरले तर आपण कूल आहोत असं काहीजणांना वाटतं त्याला काय करणार? अर्थात यातले किती जण घरात आई, बहीण नाहीतर वडिलांसमोर किंवा त्यांना उद्देशून असले शब्द वापरतील याची मला शंका आहे.
21 Apr 2013 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार
प्रतिसादावरुन असे शब्द फक्त पुरुषच वापरतात असे सरसकट अनुमान काढलेले दिसते.
आमच्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंगः-
स्थळ :- बाजीराव रस्ता, पुणे
सहभाग :- स्कूटीवरून निघालेल्या दोन नवयौवना एक सायकलवरून जाणारे संघवाले (खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि काळी टोपी) आजोबा आणि आम्ही बघे.
राँग साईडनी मैत्रीणीला घेऊन वेगात येणारी नवयौवना सायकवरून चाललेल्या आजोबांना धडकली.
'फक यू' तोल सावरता सावरता नवयौवनेने आजोबांकडे पाहात काढलेले उदगार.
'इथे ? भर रस्त्यात?' आजोबांचा प्रतिप्रश्न.
असो...
21 Apr 2013 - 2:52 pm | पैसा
किस्सा छान! ते आजोबा एकदम गंमते दिसताहेत! पण माझा मुद्दा तोच आहे, प्रतिसादात भाऊ शब्द लिहायचा राहिला, पण मुलगा असो की मुलगी, दोन्हींबद्दल मला तीच शंका आहे. किती लोक स्वत:च्या घरात असे शब्द वापरतात?
21 Apr 2013 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
पण मला ही मेंटेलिटी खरच कळत नाही, की एखादी गोष्ट माणूस जर घराबाहेर करत असेल, आणि तीच गोष्ट त्याने घरात पण करायला सुरुवात केली तर तिला काय समाजमान्यता मिळणार आहे का?
आज बर्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये, अर्धशिक्षीत घरांमध्ये कुटूंबच्या कुटूंब ह्या पेक्षा जालीम शब्द एकमेकांच्या उपस्थितीत वापरताना दिसतात. आता त्यांना काय समाजाचा भाग नाहीत असे म्हणून दुर्लक्षीत करायचे का? भले अशा लोकांची संख्या तुलनेत कमी असो, अथवा जास्ती असो.
फार पूर्वी लोक चोरुन, लपून किंवा सहसा कोणाच्या लक्षात येऊन नये अशा प्रकारे दारुचा आस्वाद घ्यायचे, शक्यतो त्याची चर्चा टाळायचे. पण आता मुलाला घेऊन बसणारे, आई / बायको इ. बरोबर मद्याचा आस्वाद घेणारे बर्याचदा आढळुन येतात. मगा आता, ते दारुपान ही गोष्ट बाहेर आणि घरात तेही आई / वडील / भाऊ / बहिण इ. च्या जोडीने करायला लागले आहेत म्हणून दारूला समाजमान्यता द्यायला हवी असे म्हणायचे का? (तशी आता ती मिळाली आहेच म्हणा. ;) )
आमचे एक पारशी सर बर्याचा 'क्या करत है साल भें*द' असे क्रिकेट शिकवताना म्हणायचे. ते कानाला इतके गोड लागायचे म्हणून सांगू. तो शब्द शिवी आहे असे कधी वाटलेच नाही. मिपावरती देखील 'भांचोत' ही प्रतिक्रिया कधी शिवी वाटलीच नाही, त्या शब्दाकडे, त्यामागील भावनेकडे कायम प्रतिक्रिया म्हणूनच लक्ष गेले.
अर्थात हा माझ्या दृष्टीकोन झाला. तो योग्य असेलच असे नाही. पण हे वाचून जे मनात आले ते लिहून मोकळा झालो.
21 Apr 2013 - 3:30 pm | पैसा
समाजमान्यता वगैरे नाही. अधिकृतपणे अशा शब्दांना समाजमान्यता कधाच मिळणार नाही. हे शब्द काही झाले तरी पार्लमेंटमधे सांसदीय म्हणून कधीच गणले जाणार नाहीत. माझा रोख स्वतःशी प्रामाणिक असण्याबद्दल आहे. झोपडपटीतील लोक अल्पशिक्षित, सांस्कृतिक दृष्ट्या जरा कमी असे आपण मध्यमवर्गीय समजतो. ही मध्यमवर्गीय मानसिकता आहे. मग त्यांना आपल्यासारखे करायचा प्रयत्न व्हावा की आपण त्यांच्यासारखे वागावे हा माझा प्रश्न आहे. झोपडपट्टीतले लोक नैसर्गिकरीत्या स्वतःच्या घरात ही भाषा वापरत असतील, आपण घरात असे शब्द आईच्या डोळ्याला डोळा देऊन वापरू शकू का हा प्रत्येकाने आपल्यापुरता विचार करावा आणि खरे उत्तर द्यावे.
21 Apr 2013 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार
मी तेच म्हणतोय की. माझे म्हणणे येवढेच आहे की प्रत्येकवेळी शब्दशः अर्थ घ्यायलाच हवा का ? शब्दामागची भावना कधीतरी समजून घ्यायला काय हरकत आहे? ;)
'विश्वासघातकी सुहॄदा हरिप्रसादा, काल संध्यासमयी तू येण्याचे कबूल करून देखील, का आला नाहीस बरे ? कुठे गुंतला होतास ?' असे बोलण्यापेक्षा, 'काय रे ए डान्या भा*, काल कुठे नि**ली होतीस?' हे कसे अंमळ मस्त वाटते का नाही? बोलणार्याला पण आणि ऐकणार्याला पण. ;)
21 Apr 2013 - 6:16 pm | पैसा
मुद्दा तो नाहीच. परिकथेतील राजकुमार आणि डॉन हे दोघेही आजच्या युगातले "कूल डूड" आणि एकाच वयोगटातले, एकाच विचाराचे आहेत. आता परिकथेतील राजकुमाराने डॉन्याला काय म्हणावे हा या लेखाचा विषय नाहीये. परिकथेतील राजकुमाराने एखाद्या रस्त्यावर चालणार्या अनोळखी आणि असहाय म्हातार्याला "काय रे, *** डोळे फुटले का बे!" असे म्हणावे का? असे लेखक विचारतो आहे. माझा प्रश्न त्याहून स्पष्ट आहे. परिकथेतील राजकुमार स्वतःच्या आईसमोर ***** अशा शिव्या बोलतो का?
(डिस्क्लेमरः कृपया वैयक्तिक घेऊ नये. मी ही सहज समजण्याजोगी उदाहरणे म्हणून दिली आहेत.)
22 Apr 2013 - 11:02 am | अनुप ढेरे
खेळीमेळी मध्ये मित्राला दिलेली शिवी आणि रस्त्यावर एका अनोळखी माणसाला दिलेली शिवी यात भावना नक्कीच वेगळ्या आहेत. दुसर्या शिवी मध्ये नक्कीच अनादराची भावना आहे.
22 Apr 2013 - 12:29 pm | छोटा डॉन
पर्याशी सहमत आहे.मला तर दुसरा पर्यायच मस्त वाटतो.
पैसाताईच्या भुमिकेशीही सहमत.
मात्र ह्यावर माझे मत असे आहे की काहे शब्द / शिव्या ह्या अति विचार केला तर अश्लिल आणि शिवराळ वाटु शकतात, पण तुम्ही त्याच्याकडे एकदम रुटिन नजरेने बघितले तर ते नसते ह्याचीही नोंद घ्यायला हवी.
जेव्हा मी एखाद्या मित्राला 'काय बे भाडखाव' असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ खरोखर तसा घ्यायचा नसतो, इथे भाडखाव हा शब्द 'माय डियर' ह्याच अर्थाने वापरला असतो. जास्त गुळमुळीत बोलण्यापेक्षा प्रसंगी माफक शिवराळपणा जास्त इंटरेस्टिंग वाटतो.
मात्र ह्या शिवराळपणाचा जास्तच विचार केला अथवा त्याच्या अर्थाचा किस काढला तर ते योग्य नाही, कारण ह्या शिवराळपणात ते ते शब्द त्याच अर्थाने वापरले आहेत असे नसते.
बाकी हे शब्द आपण घरच्यांसमोर वापरतो का ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे.
पण आपण अनेकदा घरच्यांसमोर करत नसलेल्या सर्व कृती इथे लक्षात घ्याव्यात आणि त्याच तागडीत ह्याला तोलावे असे सुचवतो, शिवराळपणा वाटतो तितका असभ्य नाही हे लक्षात घ्यावे.
बाकी ह्याचे फार जस्टिफिकेशन देणे शक्य नाही, शेवटी सर्व काही समोरच्याच्या समजुतदारपणावर अवलंबुन असते.
- छोटा डॉन
22 Apr 2013 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार
अरे =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
माझ्या प्रतिसादातले शब्द कोणीतरी सांपादित केले. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
ज्या कोणी सांपादित केलेत त्यांच्यशी ह्या विषयावार काही बोलायचे नाहीये, पण त्यांनी केलेल्या कार्याबद्दल वेगळ्याच अर्थाने धन्यवाद द्यायचे आहेत. सकाळपासून उगा बोंबलत हिंडत होतो वैतागून पण हे पाहून खदखदा हसलो राव. बन गया आज का दिन.
22 Apr 2013 - 9:29 pm | पैसा
प्रतिसाद आवडला.
21 Apr 2013 - 11:02 pm | सुबोध खरे
आजकाल शिवराळ भाषेला समाज मान्यता का मिळू लागली आहे? हे समजत नाही. बोलीभाषा आणि लेखी भाषा यातील फरक नष्ट होण्याने कुणाचा नक्की फायदा होणार आहे ते कळत नाही. काही गोष्टीना एक शिष्टाचारामुळे का होईना पावित्र्य असते. आपण कितीही म्हणालात तरी आपल्या स्वतःच्या आईवडिलांचे काम जीवन हे रस्त्यावर चर्चा करण्याची किती लोकांची हिम्मत होईल?
उगाचच कूल आहोत हे दाखविण्यासाठी शिवराळ भाषा वापरणे मला पटत नाही. काही मित्रांच्या संगतीने मला सुद्धा हि सवय लागली होती.पण म्हणून आयुष्यात एका टप्प्यावर मी प्रयत्नपूर्वक त्या सर्व शिव्या माझ्या बोलीभाषेतून काढून टाकल्या आणि माझे काहीही अडले नाही. मला त्यानंतर बोलताना आई, बायको किंवा मुलीसमोर बोलताना जीभ कधीही चावावी लागली नाही.
पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते
मग कर्कश ते बोलावे काय निमित्य ?
21 Apr 2013 - 3:37 pm | आदूबाळ
हे बाकी खरं आहे.
पारशांच्या शिव्या आजिबात टोचत नाहीत. माझा एक पारशी सहकारी 'अकाउंट्स पेयेबल'चं काम करायचा. दिवसातला अर्धा वेळ वेगवेगळ्या व्हेंडरांशी भांडत, त्यांच्या तक्रारी सोडवत घालवायचा. फोनवरच काय पण प्रत्यक्षसुद्धा त्यांना खास पारशी गुजरातीमध्ये मुक्ताफळं द्यायचा. पण कधी कोणी त्याच्या भाषेची तक्रार बॉसकडे केली नाही. त्याचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच्या रिटायरमेंटच्या दिवशी अनेक वर्षं त्याच्या रोजच्या संपर्कात असलेल्या व्हेंडरांनी त्याच्यासाठी निरोप समारंभ ठेवला होता!
21 Apr 2013 - 9:48 pm | मालोजीराव
बरोबर आहे मालक,
मुलींनी अत्यंत शालीन असाव अशी अपेक्षा नाहीच पण उगाच कूल होण्याच्या नादात प्रत्येक गोष्टीत मुलांच अनुकरण करू नये .
कॉलेज मध्ये हा किस्सा बर्याच जणांच्या ग्रुप मधे घडला असेल
फायनल इयर फस्ट सेम चा सिस प्रो चा पेपर संपला होता,नेहमी प्रमाणे पेपर बेक्कार घुसला होता. 'जाम फाटली यार' ,'माजी तर लय ** लागली रे' अश्या सुन्दर प्रतिक्रिया येत होत्याच त्यात एकाने जोड़ दिली 'कुटल्या चुत्त्या ने पेपर काढलेला राव माझ्या तर कपाळातच गेल्या' हे ऐकून ग्रुप मधल्या एका मुलीने त्याला तीव्र सहमती दर्शवली 'हो ना यार सॉलिड फाडू पेपर होता, माझ्या पण कपाळात गेल्या' ....... :))
21 Apr 2013 - 10:03 pm | धमाल मुलगा
आम्हीही असेल लईईई हसलो होतो विजय टाकीजच्या पायर्यांवर बसून गजाल्या करताना एका पोरीनं म्हणल्यावर. आमच्यासोबत एक काका होते, त्यांनी 'गोट्या कपाळात जाणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ नीट समजाऊन सांगितला. जेव्हा खूप भिती वाटते किंवा भयंकर श्रम होतात/ग्लानी वगैरे येते तेव्हा डोळे फिरतात, बुब्बुळं वरच्या बाजूला (कपाळाकडे) जातात, ह्याच गोष्टीची अंमळ अतिशयोक्ती करुन बुब्बुळं केवळ कपाळाच्या दिशेने नव्हे तर पार कपाळात जाऊन पोचली असा त्याचा अर्थ आहे.
थोडक्यात - डोळे पांढरे होणे = गोट्या कपाळात जाणे. :)
22 Apr 2013 - 9:15 am | योगी९००
' हे ऐकून ग्रुप मधल्या एका मुलीने त्याला तीव्र सहमती दर्शवली 'हो ना यार सॉलिड फाडू पेपर होता, माझ्या पण कपाळात गेल्या'
वालचंद सांगलीला होता काय हो? तेथे हा किस्सा ऐकला होता.
22 Apr 2013 - 10:45 am | मालोजीराव
एकदम जनरल आहे हे, कुठल्याही कॉलेज मध्ये रोज घडत असेल असं ! तसा हा पुण्यातला किस्सा आहे
मेंटोस,हॉल्स चा किस्सा पण असाच आहे जनरल ;)
22 Apr 2013 - 12:37 pm | योगी९००
मेंटोस,हॉल्स चा किस्सा पण असाच आहे जनरल
हे कोणते किस्से आहेत?
21 Apr 2013 - 3:22 pm | प्रभाकर पेठकर
ह्या एका वाक्याने इतर सर्व फुल्यांचा दांभिकपणा उघडा पडला. असो.
21 Apr 2013 - 5:27 pm | निनाद मुक्काम प...
दांभिकपणा पणा असा नाही हो काका
पण लेखक जरा रंगात आलेला दिसतो ,
एव्हाना वाचक आपल्या लिखाणाशी व लिहिण्यामागच्या भावनेशी पूर्णतः सहमत झाला असेल तेव्हा लेखाचा शेवट दमदार करावा म्हणजे कदाचित वाचक दिग्मुढ होऊन
सामाजिक विषमतेवर दणकून प्रतिसाद देतील अशी लेखकाची समजूत असावी , असे मला वाटते.
21 Apr 2013 - 6:40 pm | यशोधरा
मला वाटते की लेखक स्वतः हा शब्द उच्चारत नाहीये, तर गाडीतली व्यक्तीने जो शब्द उच्चारला ते उपहासात्मक वापरत आहे. चुभूद्याघ्या.
22 Apr 2013 - 7:36 am | चंबु गबाळे
दांभिकपणा.??? too much
21 Apr 2013 - 6:58 pm | टवाळ कार्टा
असे शब्द एका ठराविक ठिकाणी किंवा ठराविक ग्रुपमधे ठिक आहेत...पण आपणच त्यांना सगळीकडे वापरुन गुळगुळीत करुन टाकतो ज्यामुळे सगळेचजण सगळीकडे असे शब्द वापरतात
उ.दा.
ओह्ह फक
अर्रे आज तो यार् उसकी खोलके मारी
कह के लुंगा
आज क्या लग गयी यार
... बम्बु लगाया
...फट गयी
हाताची मुठ पुढे मागे करणे इ.
आपणच एम टिव्ही वरचे बीप बीप वाले प्रोग्राम बघुन असे बोलतो
असलेली लाज सोडण्यात मराठी माणुसही दुसर्या कोणाच्या मागे नाही...आणि वर शिश्टपणे चर्चा सुध्धा करणार कि काय ही लोकांची भाषा...
21 Apr 2013 - 8:19 pm | प्राध्यापक
असलेली लाज सोडण्यात मराठी माणुसही दुसर्या कोणाच्या मागे नाही.
प्रतिसाद वाचुन खरच वाटायला लागलय.....
21 Apr 2013 - 9:59 pm | धमाल मुलगा
खरं सांगायचं, तर आमच्यासारख्या यःकिंचित प्राण्यानं ह्या विषयावर बोलणंही पाप आहे. पण काय करणार, जित्याची खोड...
तर, एकुणच शिव्यांचा वापर आणि त्याबद्दलची एकुणच वाढलेली अतिसंवेदनशिलता खरंच माझ्यातरी आकलनाबाहेरची आहे. कदाचित...आमच्या जिभेवर 'रावसाहेब' ह्यांचे संस्कार झालेले असतील त्यामुळंही असेल, सांगता येणं कठीण आहे. 'तिच्यायला, हे आमचं जीभ म्हंजे कनाई व्हैनी, तुमाला सांगतो, नको म्हणलं तरी शिंदळीचं शिवी येतंयच बगा!' हे असलं आमचं वागणं-बोलणं. एकदा आमच्या विवेक मोडकांनी एक पुस्तक सुचवलं, वाचून काढलं तेव्हा उमगलं, ही शिव्यांची भानगड काही काल-आजचीही नाही, अन त्यावर कुण्या विशिष्ट वर्गाची/स्थानाची/परिस्थितीची मालकी नाही.
इच्छुकांनी एकदा तरी जरुर वाचावं हे पुस्तक - 'मराठीतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार' ले.अ.द.मराठे.
सदर पुस्तकाच्या अभ्यासासाठीची प्रेरणा दुर्गाबाईंची आहे असे लेखक्/अभ्यासक नमुद करतात. पुस्तकाबद्दल फार काही लिहित बसत नाही, तो एक अवाढव्य लेखच होऊन बसेल. :) लेखकाचे मनोगत/प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्या विचारांची दिशा वेगळी वाट पकडू लागते हे मात्र मला जाणवलं. त्याच पुस्तकाचे शेवटचे परिशिष्ट - 'परिशिष्ट क्र.४ - मातेचा अपमान नव्हे; केवलप्रयोगी शब्द/वाक्प्रचार ' हे देखील जरुर वाचावं असं.
रा.चिं.ढेरे ह्यांचं 'गधेगाळीच्या निमित्ताने' हेही सापडलं तर नक्की वाचावं. लोकसंस्कृतीचा एक घटक म्हणून शिव्यांचं स्थान ह्या दोन पुस्तकांमधून थोडंफार का होईना कळू शकतं. एकदा हे लक्षात आलं की आपल्या बिलोरी आयन्याच्या खोलीतली अतिसंवेदनशिलता कावरीबावरी होते...
21 Apr 2013 - 10:11 pm | प्यारे१
>>>यःकिंचित प्राण्यानं
यःकश्चित म्हणायचंय का रे गा_वामधल्या 'ढ' मुला?
बाकी शिव्या दिल्या गेल्या की व्हिज्युअलाईज होतात म्हणून कुणाला सहसा देण्याच्या भानगडीत पडत नाही.
एका मित्रानं 'कोंबडी*द्या' दिली. आम्ही ब्येक्कार हसलो. दुसर्यानं बदक*द्या दिली.आम्ही मेलो.
व्हिज्युअलाईजेशन फार वाईट. :)
21 Apr 2013 - 10:15 pm | धमाल मुलगा
>>यःकश्चित म्हणायचंय का रे गा_वामधल्या 'ढ' मुला?
बघा! म्हणजे इथून आमची सुरुवात आहे. :) एक जरा अभ्यास कर म्हणून म्हणलं तर नाही...नुसतं बुड वर करुन बिड्या फुंकायला पाहिजे XXXच्यांना!
>>व्हिज्युअलाईजेशन फार वाईट.
अक्षरशः! फार वाईट प्रकरण आहे हे. भर हापिसात वगैरे भयानक वाट लागते भो! जोरात हसताही येत नाही, अन हसू दाबताही येत नाही.
22 Apr 2013 - 10:25 am | कोमल
खरयं... :))
21 Apr 2013 - 10:40 pm | दादा कोंडके
सहमत. नेहमीच्या शिव्या असतील तर आपले कान आणि मेंदू सरावलेले असतात. आयला, च्यायला वैग्रेंचं असंच आहे. एखादी नविन शिवी ऐकली की आपण विज्युअलाएझेशन करतो. त्यामुळे शाळेतला एक मित्र तुलनात्मक सौम्य पण वेगळ्या वेगळ्या शिव्या द्यायच्या त्यामुळे समोरच्याला राग यायचा. उदाहरणांसाठी तरूण तुर्क म्हातारे अर्क या नाटकातला थत्तेचचा (मिपावरचे नव्हे) आणि प्यारे ( हे ही मिपावरचे नव्हे) यांच्यातली शिव्यांची जुगलबंदी बघावी(कारण ऐकू येणार नाही).
22 Apr 2013 - 8:46 am | अद्द्या
तेज्यैला . . .
व्हिज्युअलाईजेशन ने खरी वाट लागते . . ती कोणी खरोखरंच रागात येउन शिव्या देत असेल व्हा . .
मित्रांच्या घोळक्यात असताना . हिंदी मराठी इंग्रजी कन्नड . या सगळ्या भाषांचा मेल होऊन काही तरी विचित्र शिव्या तयार होतात .
नीन आउन पासून जो सुरु होतो तो . . अबे रुमाल चो. ला थांबतो . .
अर्थ आहे का याला काही . .
आणि मग एखादा कन्नड मराठी न येणारा येडा मित्र . " अदया . समझा ये मेरेको "
असं म्हणतो . मग त्याला सगळे पूर्ण प्रोसेस समजावून सांगतात . . च्यायला गणित पण एवढ चान कधी समजावून नसेल सांगितलं कोणी कधी
आता या वेळेला हसू थांबवणे मुश्किल . . =)) =))
22 Apr 2013 - 9:21 am | प्रकाश घाटपांडे
चांगला प्रतिसाद आहे. पुस्तक हे डॉक्युमेंटेशन असल्याने त्यात उहापोह हा चांगल्या प्रकारे केला असणार. पण एक प्रवाह असा आहे कि विद्रोहा व्यतिरिक्त अन्य प्रकारची भाषा म्हणजे वरणभात/ मिळमिळीत आमचीच शिवराळ भाषा कशी अस्सल 'आतुन' आलेली असते. विद्रोहाला पुर्वीच्या मानाने आता साहित्यिक प्रतिष्ठा मिळाल्याने सभ्य भाषेलाही आता न्युनगंड आला आहे
22 Apr 2013 - 7:22 am | वेल्लाभट
एक अरुंद गल्ली. त्यात दोन गाड्या समोरासमोर उभ्या ठाकल्या. दोघांनीही एकमेकांना दिव्यांचे इशारे केलेले होते. त्यापैकी एक गाडी दुस-या गाडीच्या इशा-याला मान देऊन एका अशा स्पॉटला थांबली की जिथे दुस-या गाडीला एका बाजूला थांबायला जागा मिळेल.
दुसरी गाडी पुढे येत, बाजूला न जाता, पहिल्या गाडीच्या समोर फ़ूटभर अंतर ठेवून थांबली. पहिल्या गाडीच्या चालकाने गाडी थोडी मागे घेतली. दुसरी गाडी तितकीच पुढे आली. पहिल्या गाडीच्या चालकाने २ वेळा हाताने खूण करून समोरच्या गाडीस बाजूला जायला सांगितले. तरीही ती गाडी ढिम्म. एकदा हा लाईट देई एकदा तो. शेवटी पहिल्या गाडीचा चालक गाडीच्या बाहेर उतरला. धो धो पाऊस आणि रात्री आठ ची वेळ. (सोयीसाठी चालक १, चालक २, गाडी १, गाडी २ अशा संज्ञा यापुढे वापरू)
(चालक १ समोरच्या गाडीपाशी जाऊन खिडकी उघडायला हाताने खूण करतो. त्यानुसार गाडी २ ची खिडकी खाली होते.)
चालक १: काय प्रॉब्लेम आहे?
चालक २: तुम्हे क्या प्रॉब्लेम है?
चालक १: मैने लाईट दिया आप साईड नही ले सकते?
चालक २: मैने पहले लाईट दिया है; शुरू से.
चालक १: लाईट मैने भी दिया था. और आपका लाईट देख के मैं यहां रुका हूं तो आप आगे आए चले जा रहे हो?
चालक २: तो तू पीछे ले ना.
चालक १: लेकिन आपको यहां सामने साईड मे लेने के लिये जगह थी; आप ले सकते थे साईड.
चालक २: मेरा गाडी दिख नही रहा कितना बडा है, कैसे जाएगा? आपका गाडी छोटा है..
चालक १: (मधेच तोडून) छोटा बडा गाडी बात नही करने का. किसका गाडी को छोटा बोलता है?
चालक २: हां तू पीछे ले (काच बंद करतो)
चालक १: (चिडून) काच नीचे कर. (२ वेळा) (काच खाली घेतली जाते)
चालक १: मैने एक तो कर्टसी दिखाया, यहां पे रुका हूं लाईट देखके; आगे तू आया बिना वजह.
चालक २: हां तो थोडा कर्टसी और दिखा कल दो रुपया दे दूंगा.
चालक १: (प्रचंड भडकून) क्या मतलब? पैसे का बात किससे करता है रे तू? क्या मतलब २ रुपया दे दूंगा समझता कौन है रे?
चालक २: इतना कर्टसी दिखाया तो थोडा उपकार और करदो बोला कल पैसा दे दूंगा.
चालक १: (२ सेकंद पॉज घेऊन; त्या व्यक्तीकडे, त्याच्या गप्प बसून त्याला साथ देणा-या बायको कडे बघून) ईंडिया का जो आज हालत हुआ है ना; वो आप जैसे लोगोंकी वजह से हुआ है.
चालक २: हां तो आप रह ही रहे हो ना फ़िर भी इंडिया में
चालक १ गाडीकडे तरातरा चालत गेला, चाकांचा चीत्कारसदृश आवाज करत गाडी सुरू करून बाजूच्या जागेतून मार्ग काढत पुढे निघून गेला.
थोडक्यात, चालक १ हा भारतातील मोजक्या सूज्ञ लोकांपैकी एक होता. समंजस पणे वागत होता. पण चालक २ तितकाच माजलेला, निर्लज्ज आणि फ़ुलीफ़ुली होता. अशा लोकांची पिलावळ आज भारतात फ़ार वाढलीय आणि त्यांचीच मेजॉरिटी झालीय. त्यामुळे चालक १ म्हणाल्याप्रमाणे जोपर्यंत ही अशी लोकं आहेत तोपर्यंत देशाची प्रगती होणं केवळ अशक्य. यांना सुधारणं त्याहून अशक्य.
फ़रहात शेहज़ाद यांच्या गज़ल मधला एक शेर फ़ार योग्य वाटतो मला.
जिसकी फ़ितरत ही डसना है
वो तो डसेगा; मत सोचा कर
...तर, त्यांना सुधारणं अशक्य आणि त्यांची पिलावळ वाढतंच राहणार; त्यामुळे भारताचं काही खरं नाही हेच खरं.
22 Apr 2013 - 7:34 am | चंबु गबाळे
कठीण आहे..
22 Apr 2013 - 10:20 am | चिन्गि
खुप छान विचार आहे, कि आपण आपली बोलीभाषा सुधारावी.....
आपण नेहमी हा विचार असावा की, शक्यतो आपण दूसर्या व्यक्तिला दु:खी करु नये....
22 Apr 2013 - 10:34 am | यशोधरा
शिव्या वापरुन बोलल्या जाणार्या भाषेची भलामण करणारे पाहून आश्चर्य वाटले. अशीच भाषा कोणी ह्या भलामण करणार्यांच्या घरातील लोकांना उद्देशून वा त्यांच्यासमोर, त्यांच्या संदर्भात वापरली तरी चालणार आहे का? दोन मित्र वा जवळच्या बरोबरीच्या नात्यामध्ये वापरला गेलेला शब्द आणि कोणा अनोळखी व्यक्तीसमोर, अशा व्यक्तीला उद्देशून वा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या व्यक्तीसमोर काय बोलावे ह्यात काहीच फरक नाही का?
23 Apr 2013 - 1:47 am | उपास
अपशब्द कुठे, कुणाशी बोलताना, कुणाबद्दल बोलताना आणि कसे वापरतो ह्यावर खूप काही अवलंबून आहे, हा संस्काराचाच भाग नव्हे काय!
22 Apr 2013 - 10:58 am | वेल्लाभट
वाणीवर न जाता विचारांना प्राधान्य दिलं तर शिव्या गैर वाटणार नाहीत.
तांदळात खडे आले म्हणून अख्खा तांदूळ टाकून द्यायचा का?
22 Apr 2013 - 11:04 am | यशोधरा
अख्खा तांदूळ टाकून द्त नाहीत हे मान्य, पण पण खड्यांसकट खाता का?
22 Apr 2013 - 11:08 am | वेल्लाभट
:ड :ड
अपेक्षित होतं ! लग्गेच टाकलेली माझी पुढची कमेंट बघावी.
22 Apr 2013 - 11:09 am | यशोधरा
मग उत्तर तुम्हीच दिलं आहे. असो.
22 Apr 2013 - 11:01 am | आतिवास
थोडं अवांतर: (किंवा बरंच अवांतर!!)
मर्यादित अनुभवाविश्वातलं निरीक्षण असं आहे की: दोन प्रकारचे लोक शिव्यांचा वापर बोलताना/ लिहिताना करतात.
काही लोक शिव्यांचा वापर सहज करत असणा-या कुटुंबात, परिसरात, समूहात जन्माला येतात, वावरतात आणि मोठे होतात. यांना शिव्यांचा नेमका अर्थ माहिती असतो आणि उगाच हौस म्हणून ते शिव्या वापरत नाहीत. त्यांच्या परिस्थितीचा संदर्भ समजला की त्यांचा शिव्यांचा वापर समजून घेता येतो; तो त्यांचा 'काही होण्याचा' भाग नसतो तर 'असण्याचा' भाग असतो.
त्याउलट काही लोक आपण किती 'कूल' आहोत किंवा 'डी-क्लास' होऊ शकतो हे दाखवायच्या मागे असतात. या लोकांना शिव्यांचे अर्थ माहिती नसतात पण वापरण्याची हौस मात्र जबर असतो. व्यक्तिगत जीवनात जे संवाद करायचे ते सार्वजनिकपणे करायचे अशी एक पद्धत आहे - त्याचे हे बळी असतात. या लोकांची गंमत वाटते ती अशासाठी की 'आपण घरात या शिव्या वापरत नाही' हे ते आवर्जून सांगत असतात.
पण मूळ लेखात म्हटले आहे तसे शिव्या देणे आणि माजोरी असणे यांचा प्रत्येक वेळी थेट संबंध असतोच असं नाही. म्हणजे वाक्यावाक्यात शिव्या असणारी माणसं अतिशय प्रेमळ,समंजस, सहनशील, सहिष्णू, उदार मनोवृतीची असतात असंही पाहिलं आहे; आणि अतिशय सभ्य भाषेचा वापर करणारी माणसं विकृत, स्वार्थी, दुस-याला त्रास देणारी असतात असंही पाहिलं आहे. त्यामुळे शिव्या देणारी व्यक्ती असभ्य आणि कधीही शिव्या न देणारी व्यक्ती सभ्य - असा कसलाही गोड गैरसमज नाही.
आर्थिक सत्तेतून येणारा माज जागतिकीकरणाची देणगी आहे असं मी मानत नाही. आपल्या समाजात प्राचीन काळी असा माज मिरवणारे अनेक लोक होते हे "ज्ञात" इतिहासातूनही लक्षात येते. माज फक्त पैशाचा नसतो, अनेक गोष्टींचा असतो हे वास्तव आहे.
"झोपडपट्टी भाषा वाईट" असा जो सूर मला जाणवला लेखाचा त्याच्याशी असहमत आहे. तसा सूर नसेल तर मुद्दा मागे :-)
वर्णन केलेली घटना दुर्दैवी आहे. पण ती टिपण्याइतकी संवेदना लेखकाकडे आहे हे वाचून बरे वाटले.
22 Apr 2013 - 11:53 am | बॅटमॅन
अतिशय संतुलित प्रतिसाद!!!!!! मान गये. :) हा नुअॅन्स्/नुआन्स अन्य स्त्रियांना कळ्ळा तर किती बरे होईल, पण साला ते होणे नाही. वर आम्ही-पक्षी पुरुषजात कशी म्यानरलेस आहे वगैरे जिलब्या पाडत बसतील झालं.
23 Apr 2013 - 1:41 am | शुचि
कंटाळा आला आहे खरच!!!! नॅगींग बास करा प्लीज.
23 Apr 2013 - 1:51 am | बॅटमॅन
खरंच आहे ते (राखाडी आयतातले वाक्य). बाकी नॅगिंग करणे ही कुणाची मक्तेदारी आहे ते सगळ्यांना माहिती असल्यामुळे आपला तर बॉ पास. आणि तुमच्यासारख्या संतुलित विचार करणार्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा नव्हती आणि नाही.
23 Apr 2013 - 2:01 am | शुचि
बरं आमची बायकांची मक्तेदारी आहे बास!!!! इट हॅज बीन पेनफुल टू विट्नेस मेन्-वीमेन डिफरन्सेस ऑफ ऑल द प्लेसेस हीअर, व्हेअर वी सीक सम सोलेस फ्रॉम रीअल वल्ड!!! जाऊ दे. पुरषांना बायका कळणार नाहीत आणि व्हाइसे व्हर्सा.
23 Apr 2013 - 2:04 am | बॅटमॅन
नाही म्हंजे चिडचीड करायचा हक्क प्रत्येकालाच आहे. पण हे दवणीय विचारमौक्तिक इथे टाकून कूल पॉइंट्स मिळणार नाहीत.
23 Apr 2013 - 2:14 am | शुचि
परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी.कॉम" वर. पुरुष हे शब्दांबद्दल जास्त संवेदनाशील असतात्.म्हणजे, स्त्री जर पुरषाला म्हणाली अरे काय बेजबाबदारसारखा मोजे इकटेतिकडे भिरकावतोस तर तो 'बेजबाबदार" हाच शब्द ऐकतो अन दुखावला जातो.
याउलट पुरुष मित्र असतील तर एक पुरुष दुसर्याला बेजबाबदार न म्हणता ताकीद देतो की "परत मोजा दिसला तर जाळून टाकेन" अन तो नंतर जाळून टाकतोही. अन पहील्या पुरषाला ते लागत नाही जितका "बेजबाबदार" हा शब्द लागतो.
माझ्या "मॅनरलेस" या शब्दाचे असेच काहीसे प्रत्यंतर आले. तो लेख आता सापडत नाहीये. अर्थात सर्व पुरषांना किंवा शिव्या देणार्यांनाही मला आऊट अँड आऊट "मॅनरलेस" म्हणायचे नव्हते. मेन हॅव्ह वे टू मेनी एन्डीयरींग क्वालीटीज. जाऊ दे. :(
23 Apr 2013 - 2:24 am | शुचि
सापडला. हा तो लेख
23 Apr 2013 - 3:07 am | बॅटमॅन
या धाग्यावर असे बोलताहात तर मग हपीसमैत्रीच्या धाग्यात सरसकटीकरण कसे केलेत याचे आश्चर्य अजूनही वाटते आहे. बाकी ते सायकॉलॉजी वैग्रे आपल्याला काही कळत नाही, पण शब्द कुणाला लागत नाहीत? बायका एखादा स्वतःला उद्देशून फाटकन बोललेला शब्द मनाला जास्त लावून घेतात हेही बर्याचदा पाहिले आहे. आणि तुम्हाला भलेही औट अँड औट म्यानरलेस म्हणायचे नसेल तरी ज्या पद्धतीने लिहिलेत त्यावरून तसे ते वाटणे साहजिक आहे. आणि या वाटण्यात स्त्री-पुरुष असा भेदही नाही.
पण आता असोच.
या वाक्यात मेनच्या आधी "वि" घातले तरी ते वाक्य तितकेच खरे आहे. जर स्त्रियांना पुरुष आणि पुरुषांना स्त्रिया आवडल्या नसत्या तर मानव वंशच पुढे गेला नसता. तस्मात तोही वादाचा मुद्दा नाहीच.
22 Apr 2013 - 12:43 pm | नगरीनिरंजन
प्रतिसाद आवडला आणि संपूर्ण सहमती!
घटनेशी शीर्षक विसंगत वाटले. भाषेपेक्षा इथे मानसिकतेचा संबंध जास्त आहे.
22 Apr 2013 - 12:49 pm | पैसा
अजिबात अवांतर नाही. प्रतिसाद आवडला.
22 Apr 2013 - 1:18 pm | निनाद मुक्काम प...
आर्थिक सत्तेतून येणारा माज जागतिकीकरणाची देणगी आहे असं मी मानत नाही. आपल्या समाजात प्राचीन काळी असा माज मिरवणारे अनेक लोक होते हे "ज्ञात" इतिहासातूनही लक्षात येते. माज फक्त पैशाचा नसतो, अनेक गोष्टींचा असतो हे वास्तव आहे.
"झोपडपट्टी भाषा वाईट" असा जो सूर मला जाणवला लेखाचा त्याच्याशी असहमत आहे
पूर्णतः सहमत
तुम्ही पार लेखाचा पंचनामा केला हो
अनिवासी माजोरडा
मुक्काम पोस्ट जर्मनी
22 Apr 2013 - 11:05 am | वेल्लाभट
आणि म्हणून खडेच खायचे असंही नाही. तसं प्रत्युत्तर अपेक्षित होतं म्हणून आधीच खुलासा केला.
22 Apr 2013 - 11:14 am | कवितानागेश
मला वाटते की आत्यंतिक राग, असमाधान आणि त्यातून उद्भवणारी असंवेदनशीलता यातून बोलण्यात शिव्या बाहेर पडायला लागतात. अश्या वेळेस येणार्या शिव्यांचा फोर्स असा काही असतो की त्या माईंड्सेट मध्ये नसलेल्यांनापण त्या फोर्सची भुरळ पडू शकते. त्यामुळे शिव्या देत बोलणे हे 'स्मार्ट'पणाचे लक्षण वाटू शकतं.
पण जवळच्या मित्रमैत्रिणींनी एकमेकांना शिव्या देत बोलणे यात विशेष काही नाही.
22 Apr 2013 - 11:23 am | ज्ञानोबाचे पैजार
मूर्ख, बावळट, हलकट, नालायक, डँबीस, विश्र्वासघातकी, पाताळयंत्री हे शब्द बोली भाषेत सहज वापरले जातात, ते समाजमान्यही आहेत. पण तरी देखील या शीव्याच आहेत. एखाद्याला मूर्ख म्हणणे आणि मादरचोत म्हणणे यात काहिही फरक नाही. कारण कोणतीही शीवी देण्याचा उद्देश दुसर्या व्यक्तीचा अपमान करणे हाच असतो. आणि या दोन्ही शब्दांमधे अपमान करण्याची समान ताकद आहे. एखाद्याला मूर्ख म्हटलेले जिव्हारी लागु शकत आणि एखादा मादरचोद चा स्वीकारही आनंदाने करतो. त्या मूळे शिव्यांची लेव्हल ठरवण्याचा प्रयत्न अस्थायी वाटतो.
या शिवाय मूर्ख बावळट हलकट नालायक इ. शब्दांचे अर्थ सुध्दा मादरचोत इ. शब्दांइतकेच जालीम आहेत.
मादरचोत म्हणणारा जर असभ्य असेल तर दुसर्या व्यक्तीला मूर्ख म्हणणारा तितकाच असभ्य असतो / असते.
22 Apr 2013 - 11:33 am | प्रकाश घाटपांडे
आपली घट्ट मैत्री आहे हे दाखवण्यासाठी कौतुकाने शेलक्या शिव्या देणारे महाभाग पण असतात. कृष्णाला माखन चोर म्हणुन कौतुकाने शिव्या देणार्या गौळणी होत्याच की! द्वाड लबाड नालायक हलकट अशा कौतुकाने शिव्या देणारे मध्यमवर्गात आहेतच ना!
उन्मादातुन, उद्धटपणातुन, उद्विग्नतेतुन, असहायतेतुन, आक्रस्तळेपणातुन संतापातुन ... दिलेल्या शिव्याचे एकाच मापाने मोजता येईल का?
22 Apr 2013 - 12:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
विठ्ठलाला विठ्या, काळ्या वगैरे संबोधनांनी संबोधणारी "आवली" उव्दीग्नतेमधुनच शीव्या द्यायची.
तरीही पांडुरंग तिच्यावर देखील प्रसन्न होता.सदेह स्वर्गात जायची ऑफर तीला देखील होती.
त्या मुळे शीव्या कोणत्या मनस्थीतीतुन दिल्या या पेक्षा त्या कोणी दिल्या यावर त्याचे कौतुक करणे अवलंबुन असावे.
लहान मुलांना सुध्दा आपण सरसकट मुर्ख बावळट म्हणतो. पण लहानपणा पासुन ते सतत ऐकल्या मुळे किंवा त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळे त्यांना ते कौतुकाने म्हटले असे वाटत असेल. तोच नियम कृष्णाला कथाकारांनी लावला असावा.
22 Apr 2013 - 12:11 pm | मृत्युन्जय
गोष्ट शिव्यांची चालु आहे तर हे २ लेख आठवले. एक माझाच आहे:
भाषिक संपत्ती : http://misalpav.com/node/15135
&%^$@# !!!
http://www.misalpav.com/node/11148 : बिका
22 Apr 2013 - 12:15 pm | वेल्लाभट
शिव्या न देता, वाईट न बोलता, ते सगळं मनात साठवून ठेवणारी माणसं नंतर भलभलत्या मार्गांनी ते बाहेर काढू शकतात; किंवा त्यांना त्यातून नाही नाही ते आजार जडू शकतात; जडतात. त्यापेक्षा ४ शिव्या हासडल्या की ताण नाहीसा होतो. सत्य आहे हे. अनुभवून बघावं. शिव्या स्ट्रेसबस्टर आहेत.
22 Apr 2013 - 12:35 pm | प्रसाद गोडबोले
मी बहुतांश वेळा शिव्या देतो त्या रागदर्शक कमी अन विनोदकारक जास्त असतात ... बरं पडतं ... शिव्या द्यायची आपली हौस कम खाज कम राग पुर्ण होते अन समोरचा न चिडता हसत सुटतो अन वातावरण निवळते =))
22 Apr 2013 - 12:45 pm | बॅटमॅन
शिव्यांचा उगीच निषेध करणार्यांच्या *&%%%^&$##@@))(**!!!!
तबियतदार लोकाण्णी आपापल्या मगदुराप्रमाणे रिकाम्या जागा भरा.
22 Apr 2013 - 12:50 pm | पैसा
*&%%%^&$##@@))(**!!!!
हे सांसदीय आहे. त्याबद्दल तुला जिलब्या बक्षीस!
22 Apr 2013 - 12:56 pm | बॅटमॅन
बाकी काही द्या, पण जिलब्या नको =)) =)) जिलबीपाडक असलो तरी जिलबी खात नाही मी ;)
22 Apr 2013 - 1:30 pm | प्रकाश घाटपांडे
म्हणजे हव तर शिव्या द्या पण जिलब्या नको असच ना!
22 Apr 2013 - 2:10 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!
22 Apr 2013 - 1:20 pm | आशु जोग
> 'इथे ? भर रस्त्यात?' आजोबांचा प्रतिप्रश्न.
परा यांनी रंगवलेला किस्सा छान आहे.
त्यावर रीअॅक्ट होण्यापूर्वी तो खरा आहे असं मानण्याची चूक करू नये.
शिवराळ भाषेचे कवतिक शहरी लोकांना
खेडवळ लोकांना नाही.
परा यांच्या काल्पनिक किस्सा कथनानंतर एक खरा किस्सा
फार वर्षापूर्वी महाराष्ट्रात निवडणूकीचा मोसम होता.
युतीचे सरकार होते.
बाळासाहेब ठाकरे अगदी रंगात आले होते. एके सभेत बोलताना त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली.
शरद पवार यांनी या भाषेचा समाचार आपल्या भाषणात घेतला.
यावर प्रति उत्तर देताना ठाकरे म्हणाले 'माझी भाषा अशीच आहे, मी ठाकरी भाषेतच बोलतो.'
शरद पवार म्हणाले, ' कुणाला सांगताय कौतुक ठाकरी भाषेचं, आमच्या गावकडची एखादी इरसाल शिवी दिली तर
आठवडाभर झोप येणार नाही'
यावर अर्थातच ठाकरे यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. कितीही म्हटलं तरी खेडवळ बॅकग्राऊंडची बरोबरी कशी करणार.
बा द वे
शिव्या सुद्धा नैसर्गिक वाटल्या पाहीजेत.
22 Apr 2013 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
काय डॉक्यावर पडलात का काय ? का उगाच माझ्याकडून चार शाब्दीक झेलून मिपावर्ती फेमस व्हायची इच्छा आहे ?
तिथे स्पष्ट लिहिले आहे, माझ्या समोर घडलेला किस्सा.
सदर आजोबांना ओळखत नाही, पण मुलगी त्यानंतर माझ्या कॅफेत बर्याचदा आल्याने तिला चांगली ओळखतो. सध्या मी गुजरातेत आहे, तेव्हा आल्यावरती तिची भेट घालून देतो किंवा तिने हॉस्टेल बसलले असल्यास तिची परवानगी घेऊन मोबाईल नंबर देतो, तुमचा नंबर व्यनी करून ठेवा.
पण खरेतर माझ्यामते तुम्ही प्रत्यक्ष भेटूनच खात्री करून घ्या, उद्या पुन्हा, 'फोनवर बोलणारी मुलगीच होती कशाव्रुन? असा प्रश्न तुम्हाला पडायला नको. :)
आणि इच्छा असल्यास तुम्ही भेटल्या भेटल्या 'प्रेमाने' तुमची चौकशी पण करायला सांगतो. घ्या च्यायला कान तृप्त करून.
आणि ह्या धाग्याची वाचनखूण साठवून ठेवा, कारण पुढे ह्या धाग्यावरती येऊन तुम्हाला घडलेल्या भेटीचा वृतांत द्यायचा आहे.
22 Apr 2013 - 3:23 pm | मालोजीराव
परा मी पण मी पण,
माझा पण आक्षेप आहे आता कि तू सांगितलेली गोष्ट काल्पनिकच हाय म्हणून, कृप्या माझा पण आक्षेप नोंदवून घ्यावा हि विनंती
- लेडीज होस्टेलसमोरून हॉर्न वाजवत जाणारा मालोजी
22 Apr 2013 - 3:33 pm | प्यारे१
पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे!
22 Apr 2013 - 7:31 pm | आशु जोग
>का उगाच माझ्याकडून चार शाब्दीक झेलून मिपावर्ती फेमस व्हायची इच्छा आहे ?
हरकत नाही
मांजरीचे दात पिलांना लागत नाहीत.
22 Apr 2013 - 2:31 pm | स्मिता.
संपूर्ण चर्चेत आतिवासताईच्या प्रतिक्रियेनंतर हे एक वाक्य वाचल्याबरोबर पटल्यासारखं वाटलं.
22 Apr 2013 - 2:43 pm | बाबा पाटील
शिव्या देखिल नैसर्गिक वाटतात याच सगळ्यात उत्तम उदा.माझा कॉलेज चा एक कोब्रा कम सदाशिवपेठी मित्र(पितृकुल कोब्रा आणी मातृकुल सदाशिवपेठी)शिवाय रहायला नारायणपेठेत.यासगळ्यांचा जो काही संकर झाला होता तो अक्षरशः अशक्य होता.हरामखोर ज्या पद्धतीने आणी शांत्,सोज्वळपणे शिव्या द्यायचा,पार समोरच्याचा अख्या खाणदानाचा उद्धार करायचा त्याला तोड नव्हती आणी वाईट गोष्ट आशी असायची की हा स्थुलकाय प्रशांत दामलेचा डूप्लिकेट प्राणी आपल्याला शिव्या घालतोय हे त्या खाणार्या गाढवाला कमीत कमी पाचएक मिनिट लक्षातच येत नसे..असा नमुना परत होणे नाही.....
22 Apr 2013 - 2:52 pm | आशु जोग
इथले एखादे काका
काना मात्रा वेलांटी सांभाळत सानुनासिक शिव्या देतात
तेव्हा खरंच हसायला येतं.
असं वाटतं यांना शिव्यासुद्धा कशा द्यायच्या हे कुणीतरी शिकवायला हवं !
- खेडवळ जोग
22 Apr 2013 - 4:56 pm | सुहास..
आमच्या ईथल्या भाषेबद्दल ईतर लोकांचे प्रेम पाहुन डोळे भरभरून आले ;)
झोपडपट्टीवाला
23 Apr 2013 - 1:17 am | खटपट्या
कोकणात सिन्धूदुर्ग जील्ह्यात "मायझव" हा शव्द सर्रास उच्चारला जातो. आणी कधी कधी वडील आपल्या मुलाला या शब्दाने सम्बोधताना पाहीले आहे.
23 Apr 2013 - 1:55 am | शुचि
Men socialize by insulting each other, but they don't really mean it. Women socialize by complimenting each other, and they don't really mean it either.
हे एक सुरेख वाक्य वाचनात आलेले होते.
23 Apr 2013 - 8:55 am | नगरीनिरंजन
भारी (आणि खरं) वाक्य आहे!
23 Apr 2013 - 11:34 am | साळसकर
लेखात फुल्ल्या फुल्ल्या का टाकल्या?
23 Apr 2013 - 1:25 pm | गणपा
बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर लेख आठवला.
दुर्दैवानं दुवा मिळाला नाही.
24 Apr 2013 - 4:09 am | शुचि
हाच तो लेख. परत वाचला. मजा आली.