खच्चीकरणाची पंचवीस वर्षं.. म.टा.तील लेख.

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
25 Jan 2008 - 2:48 am

महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख मनाला भिडला. ७९ साली जन्मलेल्या मला यातील काहीच कल्पना नव्हती. फक्त दत्ता सामंत यांच नाव कधितरी कानावर पडलं होतं. पण या लेखाने मन हेलावून गेलं.

डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला यावर्षीच्या १८ जानेवारीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता , त्या काळातल्या घडामोडी , त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा लेख.

क ट्रॅजेडीतला नायक नियतीच्या संकेतांनुसार स्वत:च्या पावलांनी आत्मनाशाकडे चालत जातो. ८२ सालात निर्माण झालेल्या परिस्थितीला नियती म्हणायचं असेल तर गिरणी कामगार हा धीरोदात्त नायकाप्रमाणे आपली शोकांतिका रचत गेला असं म्हणावं लागेल.

डॉ. दत्ता सामंतांचा संप म्हणून जो जगाच्या इतिहासात नोंदला गेला तो ६५ गिरण्यांमधल्या अडीच लाख कामगारांचा अभूतपूर्व संप १८ जानेवारीपासून सुरू झाला तरी त्याची बीजं त्याआधी तीन महिने दिवाळी बोनसच्या निमित्तानेच पडली होती. गिरणी कामगारांची अधिकृत युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणजेच आरएमएमएसने कामगारांना २० टक्के बोनस द्यायला लावू असं आश्वासन देऊन आयत्यावेळेला ८.३३ ते १७.३३ टक्के बोनसवर मालकांशी तडजोड केल्याने कामगारांत विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. निषेध म्हणून १५ गिरण्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. दुसऱ्या दिवशी त्यातल्या सात गिरण्यांचे कामगार कामावर परतले तरी हिंदुस्थान मिलच्या ४ गिरण्या , स्टॅण्डर्ड , श्ाीनिवास , प्रकाश कॉटन आणि मधुसूदन मिलमध्ये संप सुरूच राहिला. २२ ऑक्टोबर रोजी स्टॅण्डर्डचे कामगार अरविंद साळसकरांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपरच्या ऑफिसवर मोर्चाने गेले. त्यांनी सामंतांना नेतृत्व स्वीकारायची गळ घातली आणि डॉक्टरांनी त्यांना तेव्हा चक्क नकार दिला होता. डॉक्टर म्हणत होते , ' संपाच्या भानगडीत पडू नका. वेळवखत बरोबर नाही , गोदामात कापडाचे तागे पडून आहेत , मालकांना कामगार कपात हवी आहे , तशात लढायला कामगारांची तयारीही झालेली नाही. ' पण कामगार पेटलेले होते. म्हणाले , आम्हाला लढायचं आहे , तुम्ही नेतृत्व करा , बास! सामंत समजावू लागले तेव्हा त्यांनी सामंतांचीच निर्र्भत्सना केली. तुम्ही ' हो ' म्हणत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही , आम्ही घेराव घालू , असं म्हणाले. त्यांचा निर्धार पाहून अखेरीस डॉक्टर तयार झाले. तिथून हा मोर्चा ' डॉ. दत्ता सामंत की जय ' असं ओरडत मध्यरात्री गिरणगावात शिरला तेव्हा सगळा परिसर जागा होता. वाऱ्याने वणवा पेटत जावा तशी ही ठिणगी सगळ्या गिरण्यांमध्ये पसरत गेली आणि सगळीकडे मेसेज गेला , डॉक्टर गिरणीच्या लढ्यात उतरतायत आणि एकदम वीज संचारल्यासारखं झालं सर्वांना.

तरीही एक मोठा गट शिवसेनेकडे आशेने बघत होता. कारण कामगार विभागात सेनेचं वर्चस्व मोठं. एक नोव्हेंबरला बाळासाहेबांनी एक दिवसाच्या बंदचा कॉल दिला होता तो प्रचंड यशस्वी ठरला होता. बाळासाहेब म्हणाले , कामगारांना २०० रुपये पगारवाढ दिली नाही तर १५ नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील. पण काय कांडी फिरली कुणास ठाऊक , कामगार मैदानावरच्या कामगार सेनेच्या भव्य मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बंदचा कॉल देणार म्हणून मोठ्या आशेने कामगार जमले असता खुद्द बाळासाहेबांचा पत्ता नव्हता. वामनराव महाडिक , नवलकर आदी नेते भाषणातून वेळ काढत होते. कामगार बाळासाहेबांची वाट बघत होते. मुख्यमंत्री अंतुलेंची भेट घेऊन ठाकरे आले आणि म्हणाले , आपण संप करत नाही आहोत. बघता बघता कामगार उठून उभे राहिले आणि जथ्याजथ्याने बाहेर पडले. मैदान रिकामं झालं. कामगार उठले ते सरळ सामंतांकडे गेले. त्याआधी सामंतांनी एम्पायर डाइंग मिलच्या कामगारांना २०० रुपये पगारवाढ त्यांच्या युनियनला मान्यता नसताना मिळवून दिली होती. कामगारांना खात्री पटली , आता आपला तारणहार एकच. डॉ. दत्ता सामंत!

***

१८ जानेवारीच्या आदल्या रात्री संपूर्ण गिरणगावात उत्साह सळसळत होता. चाळींच्या पटांगणांत दिवे पेटले होते पण त्याहून हजारो व्होल्टचे दिवे तिथे जमलेल्या कामगारांच्या तनामनात पेटलेले होते. मुलंबाळं रस्त्यावर उतरून मोठ्यांच्या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होती. बायका हिरीरीने आपली मतं मांडत होत्या. मध्येच कुठल्यातरी गल्लीतून ' डॉ. दत्ता सामंत झिंदाबाद! ' ' कोण म्हणतो देणार नाय , घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाय ' अशा घोषणा देत मोर्चा निघून जाई आणि वातावरण पुन्हा तापे. दुसऱ्या दिवशी कामावर जायचंच नाही , या कल्पनेने कामगार त्या रात्री झोपलेच नाहीत.

गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. ६५ गिरण्यांमध्ये एकदम शुकशुकाट पसरला. भोंगे थांबले. लूम्स , स्पिंडल्स थंड झाले. आणि तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री अंतुले यांच्या राजीनाम्याची बातमी आली. अंतुलेंनी तोडगा काढण्यासाठी त्रिपक्ष समिती नेमली होती. तिने १५०० रुपये पगारवाढ सुचवली होती. समितीचे एक सदस्य श्ाीकांत जिचकार यांनी म्हणे मिल मालकांची बनावट खाती , गैरव्यवस्थापन यांचे पुरावे गोळा केले होते. पण सुगावा लागताच मिल मालक दिल्लीला जाऊन अर्थमंत्री प्रणब मुखजीर् यांना भेटले. मग सगळी चक्रं उलटी फिरली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदी आले. संपापूवीर् केंदातून वाणिज्यमंत्री बुटासिंगही येऊन गेले होते. त्यांना कामगारांची बाजू पूर्ण पटली. ते म्हणाले , ' १५० ते २०० रु. वाढ देणारच. लगेच फैसला होईल. दिल्लीला जातो. बाईंशी बोलतो आणि फोन करतो. ' बुटासिंग गेले पण त्यांचा फोन काही आला नाही. पुढे बाबासाहेब भोसलेंनी कामगारांना ३० रु. अंतरिम वाढ आणि ६५० रु. अॅडव्हान्स देऊ केला , पण सामंतांशी बोलणी न करताच. कामगारांनी ही ऑफर धुडकावली. त्याआधी व्ही. पी. सिंग येऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांना म्हणाले , सामंतांना बोलवून घ्या. कामगारांत आनंदाची लहर पसरली. आपण जिंकणार! त्यांनी गुलालाची पोती आणली. पण याखेपेस आरएमएमसचे वसंतराव होशिंग , भाई भोसले दिल्लीला इंदिरा गांधींना भेटले. बोलणी व्हायची असतील तर आमच्याशीच झाली पाहिजेत , म्हणाले. पुन्हा सूत्रं फिरली आणि दिल्लीला गेलेले व्ही. पी. परतलेच नाहीत.

डॉक्टर सामंतांची मागणी होती १५० ते २०० रुपये पगार वाढीची , अन्य सुविधांची. मान्यताप्राप्त युनियनशीच वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा ही प्रमुख मागणी होती पण त्यांच्या संपाचा कणा ठरली ती बदली कामगारांच्या प्रश्ानची मागणी. गिरण्यांत ४० टक्के बदली कामगार होते आणि त्यांना महिन्याचे केवळ ४ ते १५ दिवस काम मिळायचं. वर्षानुवर्षं ते परमनंट होत नव्हते. तशात त्यांना रजा आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी २४० दिवस भरण्याची सक्ती होती. आठ-आठ वर्षं बदलीत घालवलेले हजारो तरूण तडफडत होते. ते सगळे रस्त्यावर उतरले. गिरण्यागिरण्यांमधून कमिट्या स्थापन झाल्या. त्यांच्या गेटवर मिटिंगा होऊ लागल्या. गेटवर कामगार पहाऱ्याला बसले. सहा गिरण्यांचा एक झोन करून त्याची एक कमिटी करण्यात आली. या कमिट्या सामंतांच्या संपर्कात राहात आणि पुढची दिशा ठरवत. घाटकोपरचं कार्यालय रात्रंदिन गजबजलेलं असे. पुढे पुढे काहीच तोडगा निघण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कामगारांना डॉक्टर म्हणायचे , बघा , हे असं आहे. काय करायचं ? कामगार म्हणायचे , तुम्ही जे ठरवाल ते आम्ही मानू. आणि निघून जायचे.

ही रग कुठून आली ? ४९ साली अमलात आलेलं पगाराचं स्टॅण्डर्ड ८२ सालातही बदललेलं नव्हतं. इतर उद्योगधंद्यातले कामगार कितीतरी पुढे गेले , पण गिरण कामगार वर्षाला चार रुपये पगार वाढ घेत खुरडत राहिला. ७४चा डांगेंचा ४२ दिवसांचा संप ४ रुपये पगारवाढीवर मागे घेण्याची नामुष्की ओढवली. जनता पाटीर्च्या काळात पुलोद सरकार आल्यावर आशा पालवल्या. पण शरद पवार-जॉर्ज फर्नांडिस यांनी अवघी ४२ रुपये पगारवाढ केली. आरएमएमएसने तर कायम मालकधाजिर्णे निर्णय घेतले. कामगारांना कोणीच वाली उरला नव्हता. ज्याच्या घामातून हे शहर उभं राहिलं तो इथला मूळ कामगार सतत अपयशाचा धनी होत धुमसत राहिला होता आणि त्यामुळेच निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला होता.

संप फुटण्याची चिन्हं दिसत नव्हती. अशावेळी इंदिरा गांधींनी मिसाखाली अटक केलेल्या बाबू रेशीम , बाब्या खोपडे आदी गँगस्टर्सना सोडलं. मिलमध्ये माणसं घुसवायची कामगिरी त्यांच्यावर होती. कमिटीच्या माणसांवर केसेस घालण्यात आल्या. अनेक कार्यकतेर् भूमिगत झाले. जे होते त्यांना पोलीस अपरात्री उचलू लागले. आरएमएमएसच्या कार्यर्कत्यांनीही याद्या बनवायला सुरुवात केली. मिलमध्ये जाण्यासाठी आमिषं दाखवली जाऊ लागली. संघाचं प्राबल्य असलेल्या गिरण्या आधी निवडल्या गेल्या. टेक्निकल स्टाफ आणि ऑफिसर्स यांच्यावर मिलमध्ये जाण्याची सक्ती करण्यात आली. एनटीसीच्या मिल्समधल्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देऊन आत घुसवण्यात आलं. बाहेर कामगार अन्नाला मोताद झाले होते आणि आत घुसणाऱ्यांसाठी श्ाीखंड-पुरी , मटण सागुतीच्या जेवणावळी झडत होत्या. अधिकारी मग साचे साफ करू लागले. संघाचे कामगार येऊ लागले. घरी बसलेल्या कामगारांत चलबिचल सुरू झाली.

तरीही अनेकांची गिरणीत घुसण्याची छाती होत नव्हती. अनेकजण आशाळभूतपणे गेटवर जाऊन उभे राहात. पण सामंतांचे कार्यकतेर् तिथे असत. एका भागातला कामगार दुसऱ्या टोकाच्या मिलमध्ये कामासाठी नेण्याची स्ट्रॅटेजी होती. कमिटीचे लोक त्यांना ओळखत नसत. मग पिकेटिंग सुरू झालं. संपाच्या बाजूने असलेले संप फोडणाऱ्यांना ट्रेनमध्ये गाठत आणि धुलाई करत. अनेकांचा पाठलाग होई. प्रभादेवीच्या क्राऊन मिलमध्ये कामासाठी वडिलांबरोबर जाणारा सतरा वर्षांचा अनिल साखळकर हा तरूण असाच जिवे मारला गेला. तो काही कोणाचा कार्यकर्ता नव्हता. पोट भरण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या हौतात्म्याची आज संप फोडू पाहणाऱ्यांना याद नाही.

वातावरण चोवीस तास पेटलेलं असे. मोचेर् तर रोजच निघत. आज सेंच्युरी आणि मातुल्य , उद्या रुबी आणि इंदू , परवा मोरारजी आणि मफतलाल अशा गिरण्या ठरवून संपकरी निदर्शनं करीत , अटक करवून घेत. ८ हजार महिलांनी ८ जुलैला संघाच्या कचेरीवर मोर्चा नेला. कायदा मंत्री भगवंतराव गायकवाड म्हणाले , कामगारांना आधी कामावर जायला सांगा , मग बोलतो. १६ तारखेला १८०० कामगारांच्या मुलांनी ' आमच्या बाबांचा पगार द्या. आम्हाला शिकू द्या ' म्हणत मंत्रालयावर मोर्चा काढला. कामाठीपुऱ्यात ७०० कामगारांनी घंटानाद केला. टी. एस. बोराडेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी इंदिरा कॉंग्रेसच्या आमदारांच्या घरांवर निदर्शनं केली. महापौर प्रभाकर पै यांनी ७५ नगरसेवकांचा मंत्रालयावर मोर्चा नेला. संघाचे भाई भोसले , होशिंग यांच्या घरांवर हल्ले झाले. जेलभरो आंदोलनं झाली. तुरुंग अपुरे पडू लागले. १६ सप्टेंबरला सामंतांनी विधान भवनावर दीडलाख कामगारांचा प्रचंड मोठा मोर्चा नेला. त्यादिवशी धरण फुटून सर्वत्र पाणी व्हावं तसा जिकडे तिकडे कामगार दिसत होता.

पण या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. या लढ्यापेक्षा जुलै महिन्यात अमिताभ बच्चन अपघातात जखमी होऊन ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला , ही बातमी मोठी झाली होती. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अमिताभला पाहायला मुंबईला आले पण ते कामगारांना भेटले नाहीत. रामराव आदिकांनी संपात तोडगा काढला होता पण त्यांना केंद सरकारने गप्प बसवलं. काहीही करून सामंतांशी बोलायचंच नाही , हा केंदाचा एक कलमी अजेंडा होता. यात भरडला तो निरपराध गिरणी कामगार.

अनेक उत्तरप्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिनेच विकले नाहीत तर स्वत:च्या राहत्या जागा विकल्या. अनेक घरांत फुटके टोप आणि स्टोव्हही राहिले नाहीत. बायकांच्या गळ्यात खोट्या मण्यांची मंगळसूत्रं आली. बाबा मिटिंगवरून येताना काय बातमी आणतात याकडे मुलं आशेने भिरभिरी बघत जागत बसायची आणि उपाशी झोपायची. वह्या-पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम अनेक झाले , कामगारांना कपडे आणि धान्य वाटप झालं. पण आभाळच फाटलं होतं , तिथे ठिगळ कुठवर लावणार ? कामगार मिळेल ती कामं करू लागले. भाजी विकू लागले , बिगारी कामाची भीक मागू लागले. या संपाने एक झालं , लोकांना भीक मागायचीही लाज वाटेनाशी झाली. त्यांचा ताठ कणा पुरता मोडून गेला. स्वाभिमान ठेचला गेला. ते खुरडत , लाचार होत मिलच्या दारात काम मागायला आले. मालकांनी आणि संघवाल्यांनी त्यांच्याकडून शरणपत्रं लिहून घेतली , त्यात भविष्यात कधीही संप न करण्याची , मिळेल ते काम निमूट करण्याची हमी घेतली होती. ज्यादा काम लादलं होतं. अडीच लाख होते , परतले तेव्हा लाखच होते. दीड लाख कुठे कुठे गेले.

आजच्या पिढीला हा इतिहास पुन: पुन्हा सांगावा लागेल. इतिहासात जितांचं नाव राहात नाही. कदाचित गिरणी कामगारही मुंबईच्या नकाशावरून साफ पुसला जाईल. कदाचित नवं नगर उभं करताना त्याचा नरबळी अपरिहार्य असेल. पण त्याची जिगर , त्याचा लढाऊ बाणा , त्याचे श्ाम आणि त्याने उभी केलेली संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. राज्यर्कत्यांच्या क्रूर उदासीनतेमुळे , कामगार संघटनांच्या मतलबी राजकारणामुळे आणि कामगारांच्या मुळावर येणाऱ्या तत्कालीन औद्योगिक परिस्थितीमुळे आज त्याची कबर खणली जाते आहे. हे अख्खच्या अख्खं ' मोहनजो दारो ' काळाच्या उदरात गडप होत असताना त्या १८ जानेवारीची पुन्हा याद येते आहे. आज त्या खच्चीकरणाच्या प्रक्रियेला पंचवीस वर्षं होताहेत म्हणे!

- जयंत पवार.
या लेखाचा दुवा इथे वाचा..

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्राजु,

तू आज सार्‍या जुन्या आठवणी जाग्या केल्यास.
त्या संपाने गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबे पुरती उध्वस्त झाली.

जेमेतेम पगारावर काम करणारा, सतत कर्जबाजारी असणारा गिरणी कामगार किती असहाय्य होता हे आम्ही पहात असू, ते शब्दात सांगणे कठिण. त्या संपाने गिरणिकामगारांच्या दोन पिढ्या उध्वस्त झाल्या.

माझे काका व त्यांचा मुलगा असे घरातले दोन्हीहि कमावते पुरुष घरात कित्येक महिने बसुन होते.
काकांची तुटपुंजी भिक्षुकी आणी कोकणस्थांची चिवट बचत करायची प्रव्रुत्ती या वरच ते कुटुंब तरले.

आज त्या विषयावर बोलणे नको वाटते. केवळ विचारही अस्वस्थ करतो.

संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर's picture

25 Jan 2008 - 6:57 am | संजय अभ्यंकर

त्या गिरणी संपाचा नविन संदर्भात विचार करणे आज आवश्यक आहे. गिरणी कामगार संकटात येण्याचे एक कारण म्हणजे, त्यातल्या बहुसंख्यांना गिरणीत चालणार्‍या कामाशिवाय इतर काम येत नसे.

विशेषतः आज सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारे लोकांच्या बाबतित हा संदर्भ विचार करण्याजोगा आहे.

आज प्रत्येक व्यक्तिने बहुविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. अन्यथा एक काम बंद पडल्यावर कठिण प्रसंग उद्भवतो. सॉफ्टवेअर तज्ञाला आज भरमसाठ पगार मिळतो, परंतु सॉफ्टवेअर कं. ल्या नोकर्‍या ह्या कधी कमी होतील ह्याची शाश्वती नाही.

बहुविध कौशल्ये नसतिल तर सॉफ्टवेअर इं. कसे संकटात येतात हे मी पाहिलेले आहे. अमेरिकेतून परत येणारे तंत्रज्ञ जर औद्योगीक क्षेत्रात अनुभवि नसतील तर योग्य पगाराच्या नोकर्‍या मिळणे, केवळ दुरापास्त होऊन बसते.

आमच्या कं. तील एक. वरिष्ठ व्यवस्थापक, अमेरिकेतिल नोकरी गेल्यावर, केवळ औद्योगीक अनुभवावर तरला.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील उदाहरण केवळ प्रातिनीधिक आहे. ते देण्याचे कारण म्हणजे, ह्या क्षेत्रातले लोक चंगळवादाच्या आहारी लवकर जातात आणि तेथुन मागे फिरणे कठिण होऊन बसते. कोणाला दुखावणे हा इथे हेतु नाही.

आपण स्वतःला आजच्या काळा पलिकडे पहाण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

संजय अभ्यंकर

विसोबा खेचर's picture

25 Jan 2008 - 7:06 am | विसोबा खेचर

अभ्यंकरांच्या मताशी सहमत.

या संपामुळे कित्येक कुटुंबं देशोधडीला लागल्याचे माझ्या पाहण्यात आहे. सगळा गिरणगाव विभाग हा प्रामुख्याने कोकणातला. गिरणगाव म्हणजे प्रामुख्याने भोईवाडा, परळ, लालबाग, काळाचौकी, खेतवाडी हा विभाग. अनेक कोकणी इथे आले आणि मुंबईतील गिरण्यात चाकरमानी झाले व गिरणगावात त्यांनी आपापले संसार थाटले. कधी काळी हा सगळा विभाग खूप सुखी होता, समाधानी होता. पण हळूहळू गिरणीसंपाचे ग्रहण लागले आणी इथली सुखशांती नष्ट होऊ लागली. लालबागचा राजा रुसला!

गिरणीसंपामुळे लालबाग, काळाचौकी येथील वाताहात झालेली काही कुटुंबांशी माझा चांगला परिचय आहे. त्यांची हालाखी, त्यांचे मनस्ताप, त्यांची उपासमार आठवली की आजही अंगावर काटा येतो!

तात्या.

ऋषिकेश's picture

25 Jan 2008 - 7:26 am | ऋषिकेश

माझ्या आईचे वडिल आणि काका म्हणजे घरातील एक अख्खी कमावती पिढी एका दिवसात घरी बसले! आणि जे बसले ते बसले पुन्हा काहि करु शकलेच नाहित! घरातल्या मुलांवर शिक्षण सांभाळून पैसे कमावण्याच वेळ आली.
आईचे अथवा मामाचे अनूभव ऐकून अंगवर काटा येतो. रोजच्या स्वतःच्या जेवणापुरते पैसे तरी दररोज प्रत्येकाला कमवावे लागत :(

हा संप म्हणजे अनेक मुंबईतील कुटुंबांसाठी कर्दन काळ होता. आणि त्याहूनही मोठा तोटा म्हणजे यामुळे झालेले मराठी समाजाच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण :(.. इथे मुंबईतून जो मराठी माणूस उठला तो आजतागायत मुंबईत मान वर करून चालू शकलेला नाहि. (याच संपामुळे बिहारी कामगारांचीहि आयात झाली आणि त्यांना ह्या शहराची चटक लागली. याआधी केवळ युपीचे भय्ये होते )

प्राजू,
या लेखाबद्दल आभार! पण वाचून मन अस्वस्थ झालंय :((

-ऋषिकेश

प्राजु's picture

25 Jan 2008 - 8:41 am | प्राजु

हा संप जरी अधिकृतरित्या बंद झाला नाही तर मग पुढे दत्ता सामंत यांनी त्या संपाचं काय केलं? म्हणजे शासनाने त्यांच्याशी कधी बोलणी केलीच नाहीत का? की पर राज्यातील कामगार आणून गिरण्या सुरू केल्या? आणि मग दत्ता सामंत यांची हत्या झाली याच संपाच्या वादातून का? कोणी सांगू शकेल का?

संजय अभ्यंकर's picture

25 Jan 2008 - 8:10 pm | संजय अभ्यंकर

हा संप अधिकृतरीत्या बंद झाल नाही.
बहुसंख्य गिरण्या जेमतेम चालु झाल्या व बंदही पडल्या.
बहुसंख्य मालकांनी दरम्यानच्या काळात गुजरातेतला आपला पसार वाढवला. तेथे त्यांना उ.प्र., बिहारचा स्वस्त मजुर मिळाला.

मुंबईतल्या आपापल्या जमिनिंवर काहीनी व्यापारि संकुले उभी केली. काहीनी आपल्या जमिनि बिल्डरना विकल्या. आज ह्या भागात सर्वत्र मोठ्मोठाली कार्यालये उभी आहेत.

आज गिरणगावाचे रुप परत पालटत आहे. जे गिरणी कामगार तग धरुन तेथे टिकले, त्यांच्या मुलांनी तेथे वडा पाव, सँडविच, ताकाच्या टपर्‍या टाकल्या. माझ्या माहितीतले एक वृध्ध दांपत्य, ज्यांनी हयातभर बद्ली कामगार म्हणुन काम केले, ते आज एक चहाची टपरि चालवत आहेत.
आज अनेक मराठी कुटुंबे, ह्या व्यवसायांतुन बर्‍यापैकी पैसे मिळवत आहेत, हेच समाधान.

संजय अभ्यंकर

मुक्तसुनीत's picture

25 Jan 2008 - 8:52 am | मुक्तसुनीत

सुन्न करणारा लेख. जुन्या आठवणी जाग्या करणारा.

८० च्या दशकात मुंबईमधे वाढणारी अशी एकही मराठी व्यक्ति सापडणे कठीण, जिच्या ओळखीच्यात, रक्ता-नात्याच्या नातेवाईकात कुणी संपातून देशोधडीला लागलेले कुणी नसेल. या विषयावर जयंत पवार यांचे (मला वाटते , "अधांतरी" नावाचे) एक नाटक आले होते. नव्वदीच्या दशकातील महत्त्वाच्या नाटकात आज त्याची गणना होते. पवारानी इतके प्रत्ययकारी नाटक , आणि असे , मर्मस्थानावर प्रहार करणारे, काळीज चरत जाईल असे लिखाण करावे हे नैसर्गिक आहे : ते स्वतः गिरणीकामगाराच्या कुटुंबात वाढले होते.

साठीच्या दशकापूर्वीची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि ऐंशीच्या दशकातील हा संप या, महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या आंदोलनांचे पर्यवसान इतके वेगळेवेगळे का यावे , हा एक अभ्यसनीय विषय ठरू शकेल. थोडी कारणीमीमांसा , थोडी तुलना मी माझ्या वकूबाप्रमाणे करू पाहतो.

१. संयुक्त महाराष्ट्र - पर्यायाने मुंबईचा ताबा - हा मुद्दा राजकीय दृष्टीने कळीचा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील , सहकारी क्षेत्रातील महत्त्वाच्या पुढार्‍यानी यात आपले वजन खर्च केले असणार. यामुळे मुळात नागरी असणार्‍या या चळवळीचे लोण अन्य भागात पोचले असावे.

२. पन्नासचे दशक आणि ऐंशीचे दशक यातील दिल्लीच्या राजकारणात प्रचंड फरक पडलेला असणार. चीनी युद्धाच्या आधीचे जवाहरलाल आणि आणीबाणी-जनता नंतरच्या "बाई". तळागाळातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे काही झाले तरी एका मानवतावादी दृष्टीने पाहणारे उमदे नेतृत्व आणि चमच्यांच्या गराड्यातले भ्रष्ट, सत्तापिपासू दिल्लीसरकार आणि त्याना चाटणारे अंतुले-भोसले आदिंचे महाराष्ट्र "शासन".

अजूनही कित्येक गुंतागुंतीची कारणे असतील.

.......हा संप म्हणजे अनेक मुंबईतील कुटुंबांसाठी कर्दन काळ होता. आणि त्याहूनही मोठा तोटा म्हणजे यामुळे झालेले मराठी समाजाच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण :(.. इथे मुंबईतून जो मराठी माणूस उठला तो आजतागायत मुंबईत मान वर करून चालू शकलेला नाहि. .....

हे मात्र अगदी खरे, आणि जिव्हारी झोंबणारे..

इनोबा म्हणे's picture

25 Jan 2008 - 11:13 am | इनोबा म्हणे

हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
माझे आजोबा यापैकी एका गिरणीत त्यावेळी कामाला होते. नुकतंच ऐकण्यात आले की, गिरण कामगारांना काही रकमेचं वाटप करण्यात आलंय.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेस सरकारचा म्हणजेच गुजरात्यांचा कामगारांवर राग होता कारण ह्या गिरण कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाची भुमिका बजावली होती,म्हणूनच महाराष्ट्र सरकारने १ मे म्हणजेच कामगार दिनी महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा केली होती. या कामगारांपैकी १०५ जण त्यावेळी काँग्रेस सरकारच्या जुलमी राजवटीमुळे हुतात्मा झाले होते,नंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईत संयुक्त महाराष्ट्र स्मारक उभारण्यात आले. हे स्मारक म्हणजे कामगार पुतळाच आहे.

कामगार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी अधिक माहितीकरिता या संस्थळाला भेट द्या.
संयुक्त महाराष्ट्र डॉट ऑर्ग

(संतप्त) -इनोबा

झकासराव's picture

25 Jan 2008 - 12:19 pm | झकासराव

इथे लिन्क दिल्याबद्दल.
मला ह्यातील काहीच माहिती नव्हते. बर झाल माहिती झाल ते.
लेख वाचुन मन सुन्न झाल खरं. त्यातच काल "गंगुबाई नॉनमेट्रिक" मध्ये ह्याच विषयावर एपिसोड होता.
दत्ता सामंतांची हत्या का झाली?? ह्याचे काही माहिती मिळेल का खरच??

स्वाती राजेश's picture

25 Jan 2008 - 8:27 pm | स्वाती राजेश

याविषयी माहिती मला नव्हती या लेखामुळे आणि आपल्या प्रतिक्रिया वाचल्यामुळे खूप माहिती मिळाली.
वाचून डोळ्यात पाणी येते तर जे यातून गेलेत त्यांच्या वर काय परिस्थिती ओढावली असेल?

सुनील's picture

25 Jan 2008 - 9:07 pm | सुनील

लेख वाचून लगेच काही विचार मनात गर्दी करू लागले. तेच खाली मांडत आहे. कदाचित थोडे विस्कळीत वाटतील कारण जसे मनात आले तसे लिहित आहे.

१) संपाचे टायमिंग - हे पार गंडले. जुनाट यंत्रसामग्रीवरील खर्च केव्हाच भरून निघाला होता आणि मालकवर्गाला आधुनिक यंत्रसामग्रीसह मुंबईत कारखाने अजिबातच चालवायचे नव्ह्ते. मुंबईबाहेर (आणि परराज्यात) अधिक स्वत जमीन आणि मजूरवर्ग उपलब्ध होता. डॉ. सामतांनी संप करून मालकवर्गाच्या हाती कोलीतच दिले, असे मला वाटते.

२) पासष्ट गिरण्या एकाचवेळी बंद पडूनदेखील कोठेही कापडाचा तुडवडा भासला नाही की त्याच्या किमती अव्वाच्यासव्वा वाढल्या नाहीत. म्हणजेच, मुंबईत तयार होणार्‍या कापडाला लगेचच पर्याय उबलब्ध झाले (उदा. भिवंडी-मालेगावातील लूम्स). अशा परिस्थितीत गिरण्या पुन्हा सुरू होतील अशी आशा बाळगणे आणि त्याच्या अपेक्षेत वर्षानुवर्षे संप करणे व्यर्थच होते.

३) मुंबईतील जागांचे वाढते भाव लक्षात घेता, उद्योगनगरी म्हणून या शहराची ओळख पुसली जाऊन सेवादाती नगरी म्हणून आज ना उद्या होणारच होती. १९९५ नंतर, विक्रोळी ते मुलुंड आणि ठाण्यातील (वागळे, बाळकूम, बेलापूर रोड इ.) परिसरातील एकेक कारखाने बंद पडून तेथे कार्यालये, वसाहती टॉवर्स, मॉल्स आले. संप जरी झाला नसता तरी याच लाटेत कापड गिरण्यादेखील बंद पडल्याच असत्या. संपामुळे पुढचे मरण आधी आले इतकेच.

४) कामगार चळवळीचे नुकसान - या संपामुळे सर्वाधिक नुकसान कामगार चळवळीचे झाले. नवीन आस्थापनात कामगारांची युनियन उभी राहणारच नाही याची काळजी मालकवर्ग घेऊ लागला. त्यातून उभी राहिलीच तरी ती फारशी प्रबळ होणार नाही किंबहुना ती मालकवर्गाला धर्जिणीच राहील याचीही व्यवस्था होऊ लागली.

टीप : डॉ दत्ता सामंत यांची हत्या ही प्रिमियर ऑटोमोबाईल मधील संपाच्या वादातून झाली, गिरणी संपावरून नव्हे.

अवांतर : त्यांची हत्या पवईला झाली आणि त्यावेळी (सकाळी सुमारे ११ वाजता) मी विक्रोळी परिसरात होतो. सगळे व्यवहार धडाधड बंद झाले आणि मी ठाण्याला कसाबसा पोहोचू शकलो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संगीता's picture

25 Jan 2008 - 9:22 pm | संगीता

ही माहिती इथे दिल्याबद्दल.
वाचून अस्वस्थ झाले. या संपाची झळ पोह्चलेल्या कुटुंबातील एकाची ओळख झाली होती. त्यांच्याकडून थोडेफार कळाले होते.
पण लेख वाचून त्यांच्या वर काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पना आली.

धनंजय's picture

26 Jan 2008 - 1:59 am | धनंजय

या बातम्या ताज्या होत्या तेव्हा माझे वय लहान होते. वर्तमानपत्र कळू लागेपर्यंत ही बातमी चर्चेतून गळून गेली होती.

तरी या इतिहासाबद्दल आणखी वाचलेच पाहिजे, अशी मला जाणीव होत आहे. या वादाच्या काळात शिवसेनेला प्रथम मुंबईत बळ मिळू लागले, त्यामुळे पुढील राजकारणासाठी, आणि समाजाच्या जडणघडणीसाठी ही घटना महत्त्वाची आहे.

प्राजु, लेख इथे दिल्याबाबत धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

26 Jan 2008 - 4:00 am | पिवळा डांबिस

गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी आम्ही शाळकरी होतो. जुन्या खूप आठवणी जाग्या झाल्या. वरील लेखात त्या वेळच्या परिस्थितीचे सुंदर विश्लेषण केले आहे.
प्रेषक "सुनिल" यांनीही छान मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे.
माझ्या मते या संपाच्या पराभवाचे आणिक एक कारण आहे आणि ते आर्थिक नसून सामाजिक आहे. ते म्हणजे या संपाला पांढरपेशा मराठी समाजाचा मनापासून पाठिंबा मिळाला नाही (संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मिळाला तसा). माझ्या मते याची कारणे अशी:
१. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक तात्विक अधिष्ठान होते. ज्याला इंग्रजीमध्ये "लार्जर दॅन लाईफ" म्हणतात तसे. मराठी माणसाला मराठी राज्य नाकारल्याच्या अन्यायाचा संताप होता. त्या वेळी सगळा मराठी माणूस, मग तो साहित्यिक असो, कामगार असो, सचिवालयातील कर्मचारी असो वा रामा गड्याचे काम करणारा बाल्या असो, पेटून उठला होता. गिरणी संपाच्या वेळी मात्र अशी भावना नव्हती. हा संप फक्त गिरणी कामगारांच्या आर्थिक कारणांसाठी होता. अर्थात, उर्वरित मराठी समाजाची तरी तशी भावना होती. आणि हा उर्वरित मराठी समाजही कसेतरी जेमतेम भागवणाराच होता. तेंव्हा आर्थिक ओढगस्त या समाजाला नवीन नव्हती. त्याविरुध्द संप करायला पाहिजे अशी भावना नव्हती. "अंथरूण पाहून पाय पसरावेत" ही व्रूत्ती व शिकवण होती.
२. वर वर्णन केल्याप्रमाणे कामावर जाणारया कामगाराचा पाठलाग करून लोकलमध्ये मारणे हे प्रकार नवीन होते. पूर्वी संप होत (गोदी कामगारांचा वगैरे), भाषणबाजी होई, मारयामारया वा डोकेफोडी ही होई, पण ती मिलच्या/ कारखान्याच्या गेटवर! पाठलाग करून एकट्यादुकट्या कामगाराला मारणे, त्याच्या कुटुम्बियांना धमक्या देणे हे प्रकार नवीन होते. या गुंडगिरीची एक दहशत निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून "नकोरे बाबा यांच्या भानगडीत पडायला, त्यांचे ते बघून घेतील"ही भावना उर्वरित मराठी समाजात निर्माण झाली. संपकर्र्यांबद्दलची सहानुभूती नाहिशी झाली.
३. जसाजसा संप चिघळायला लागला आणि संपकर्यांची आर्थिक परिस्थिती खालावली, तसतशी घर चालवण्यासाठी पैसे उसने मागायचे प्रमाण वाढू लागले. आता मराठी गिरणी कामगार काय टाटा/ बिर्ला कडे उसने मागणार? ते इतर मराठी लोकांकडेच जाऊ लागले. तेंव्हा इतरांची स्थिती "माझं मला थोडं, आणि व्याह्याने धाडलं घोडं" अशी झाली. त्यातून मग, तिकडे गेटवर जाउन रग दाखवता आणि इकडे आमच्याकडे येवून भीड घालता, त्यापेक्षा चुपचाप कामावर का जात नाही? अशी मानसिकता निर्माण झाली.

वरील सर्व कारणांचा परिणाम म्हणून इतर मराठी जनांच्या मनातून संप हळुहळु उतरत गेला. आता वरील विचारसरणी योग्य होती की अयोग्य हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण त्या वेळीतरी अशीच परिस्थिती होती. कुठ्ल्याही चळवळीचे यश हे ती लोकांच्या मनांत किती ताजी आणि जिवंत आहे यावर अवलंबून असते. गिरणी संपाच्या बाबतीत दुर्दैवाने याच्या उलट परिणाम साधला.

डिस्क्लेमरः वरील लिखाणात गिरणी कामगार, त्यांचे नेते, कुटुंबिय वा अन्य कोणाबद्दलही अवमान करण्याचा हेतू नाही. आमचे अनेक नातेवाईक व स्नेही या संपामुळे देशोधडीला लागले होते. त्यामुळे त्यांच्या हालअपेष्टांबद्दल आम्ही पूर्ण परिचय आणि सहानुभूती बाळगतो. इतकी वर्षे झाल्यानंतर केवळ एका विचक्षण नजरेने त्या घटनेचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. तेंव्हा, चू. भू. द्या. घ्या.

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 5:34 pm | सुधीर कांदळकर

समाजवादी आहे. हे सर्व घडत असतांना मी ३१वर्षांचा होतो. माझ्या ओळखीचे कुणी संपात नव्हते. पण एक संस्कृती नष्ट होत असतांना पाहिल्याचे आठवले आणि ती अस्वस्थता पुन्हा अनुभवली.

अमर's picture

28 Jan 2008 - 2:57 pm | अमर

ह्य फक्त आथ्वनि आइक्ल्या आहेत माझ्य वदिलन कदुन ते देखिल एक उनिओन चे कर्य्कर्ते होते ह लेख त्यन्च्य सथि प्रिन्त करुन घेवुन जातआहे

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jan 2008 - 3:44 pm | प्रकाश घाटपांडे

पुण्यातल्या बजाज ऑटोचे पण तेच होणार आहे. तिथे सॉफ्टवेअर पार्क होणार. कामगारांची (विल्हे)वाट लावणार.
पिवळा डांबिस व सुनिल यांनी केलेले विश्लेषण अधिक भावते. समाजतील आर्थिक स्तरातील ही जीवघेणी दरी गुन्हेगारीकडे , अराजकतेकडे नेणारी आहेत. शिका. संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र पुन्हा एकदा नव्याने जपावा लागणार आहे. सामाजिक जाणीव असणारे श्रीमंत उद्योगपती ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करु शकतात.
प्रकाश घाटपांडे

आशु जोग's picture

6 Apr 2013 - 10:29 pm | आशु जोग

विलक्षण आहे
एका संपूर्ण पिढी बरबाद झाली.

'लालबाग परळ' पहायला हवा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 2:57 am | निनाद मुक्काम प...

सिनेमा एवढा प्रभावी नाहीं ,आपण हा सिनेमा ज्या नाटकावरून बेतला आहे ते अंधातर नाटक आंजा वर आहे ,ते जरूर पहा.
गिरणीत नोकरी ही आपली पिढ्यानपिढ्या ची मक्तेदारी आहे , किंबहुना गिरणी ही आपली रोजी रोटी चालविण्यासाठी सेठिया लोक चालवतात अशी काहीशी मते ह्या कामगारांची असावी.
गिरणी मुंबईत चालविण्यापेक्षा ती गुजरात धंदा स्वस्त होता. आजच्या काळात ऑउत सोर्स जसा लोकमान्य शब्द आहे तसा त्या काळात नव्हता , कामगारांना समाजवादी त्यांना बहिर्वक भिंगातून त्यांची शक्ती दाखवत होते.
दुर्दैवाने गिरणी चालवणे जर मालकांना शक्य नसेल तर त्यावेळी आपण पर्यायी उपाय योजना केल्या पाहिजे , शिकले पाहिजे वेगवेगळ्या शेत्रात उतरले पाहिजे. असा विचार केला नाहीं ,
ज्या काळात संप होऊन खंगून हे कामगार मारत होते तेव्हा परप्रांतीय नेसत्या वस्त्रानिशी ह्या शहरात येउन आपले बस्तान बसवत होते. फळ विकणारा पुढे ह्या शहरात मंत्री झाला. कारण त्याला त्याच्या लोकांचा पाठिंबा होता.
माझे वडील चुनाभट्टी च्या प्रभागात होते. तेव्हा तेथील तलावात आठवड्याला एक आत्महत्या पाहून कळवळून त्या कामगारांना सांगायचे ,तुमच्या घरातील घरटी एक माणूस गिरणी बाहेर नोकरी करू दे म्हणजे सारे घर गिरणीवर अवलंबून नको.
गिरणी म्हणजे सरकारी नोकरी नव्हे, ज्या काळात अनेक घरातून महिला नोकरी करायला लागल्या तेथे त्यांच्या कुटुंबाला एकाच पगार पुरणार नाहीं हे ध्यानात यायची बुद्धी होती. मात्र बायकांनी नोकरी करणे ह्या कामगारांच्या घरात चालत नव्हते.
त्यामुळे एक कमवता माणूस संपामुळे घरी बसला तेव्हा सर्व कुटुंब उपाशी पडले.
त्यांना मार्गदर्शन करणारा योग्य नेता नव्हता हे त्यांचे दुर्दैव
ज्या काळात सुशिक्षित माणसे पदवीधर असून बेरोजगार होती. त्या काळात कसेबसे दहावी पर्यंत शिकून पुढे गिरणीत रुजू होणे एवढेच माहित असलेल्या ह्या कामगारांना योग्य मार्गदर्शन करणारे भेटला नाहीं ,आहे
धीरु भाईला समस्त गुजराती समाज मानतो कारण त्यांच्यातील उद्योजक अंबानी ह्यांनी स्वतःच्या उदाहरणाने जागवला.
असा एक धीरु भाई मराठी माणसात निर्माण व्हायला पाहिजे होता.

आदूबाळ's picture

7 Apr 2013 - 12:03 am | आदूबाळ

जोगसाहेब, हा धागा वर काढल्याबद्दल तुमचे अनेक आभार.

सुनील आणि पिडांकाका यांच्या प्रतिक्रिया म्हणजे एखाद्या घटनेचा अनुक्रमे स्थूलार्थशास्त्रीय (macro economics) आणि समाजशास्त्रीय पद्धतीने कसा आढावा घ्यावा याचा वस्तुपाठ आहेत.

काही दिवसांपूर्वी "गिरणगावाचा मौखिक इतिहास" नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. या इतिहासाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे.

मैत्र's picture

7 Apr 2013 - 12:20 pm | मैत्र

अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा धागा.. वर आणल्याबद्दल धन्यवाद.
या तपशीलांची काहीच माहिती नव्हती आणि परिचयात कोणीही या ताणातून आणि अनुभवातून गेलं नाही त्यामुळे जाणीवही नव्हती..
तांत्रिक आणि औद्योगिक बदल, मोठ्या परिमाणातले बाह्य पुनर्र्चनात्मक बदल समाजाच्या रचनेवर खूप दूरगामी परिणाम करतात.. त्याचं मोठं उदाहरण. विशेषत: अनुभवी लोकांनी लिहिल्याप्रमाणे कौशल्याचा अभाव, इतर पर्यायांचा अभाव..
कदाचित हे पुढे मागे आपो आप घडलंही असतं पण हे असं तुंबलेल्या, मारहाणीमुळे एकट्या पडलेल्या असहाय्य संपातून घडलं त्यामुळे मानसिक खच्चीकरण जास्त झालं असावं..

अवांतरः भय्या बिहारींना नावं ठेवून काही उपयोग नाही. ते या परिस्थितीत येऊन राहिले आणि सर्व हाल सोसून कमी पैशात कामे आनंदाने करत अजून भाईबंद आणत राहिले कारण त्यांच्यासाठी हे आयुष्य त्यांच्या राज्यात / गावात असलेल्या उपासमारी आणि गुंडगिरीपेक्षा सुसह्य होतं.. आणि आजही आहे.

आशु जोग's picture

7 Apr 2013 - 1:47 pm | आशु जोग

आमच्या अंदाजाप्रमाणे
सरकारने गिरणीमालकांना नाममात्र भाड्याने या जागा दिल्या होत्या ९९ वर्षाच्या कराराने
जेणेकरून हे लोक रोजगार निर्मिती करतील.

आज गिरणी बंद करून टॉवर उभे करत आहेत, पण ही जागा त्यांच्या बापाची नाही.
हे सरकारने त्यांना सांगायला हवे होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 7:31 pm | निनाद मुक्काम प...

ह्याच.भव्य मिल मध्ये वरळीच्या श्रीराम मिल मध्ये एस कुमार चे मालकांनी भली मोठी जागा तीही मोक्याची विनायसे हातात आल्याने एका मोठा डिस्को ठेक कम
स्टुडीयो उभारला.
मिलचा प्रचंड मोठा परिसर त्यांच्या आता गंजलेली मोठी यंत्र सामग्री व त्याच्या पार्श्वभूमीवर एका मोठा बंदिस्त नाईट क्लब ज्यात शनिवारी रात्री मुंबई मधील किमान २००० लोक आपली रात्र साजरी करत. व सकाळी ह्या मोठ्या जागेत बॉलीवूड च्या अनेक गाण्याची शूटींग होत.
परदेशात शिकायला जाण्याच्या काही महिने अवधी असतांना दोन महिने मी तेथे कार्यरत होतो. काटे मधील इशा कोपीकर च्या गाण्याचे व अश्या अनेक गाण्यांची शूटींग तेथे मी दोन महिन्यात पहिली.
सांगायला एक किस्सा म्हणजे काटे मधील गाण्याच्या शूटींग च्या वेळी शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रोडक्शन मधील माणूस माझ्या मित्राकडे आला व गाण्याच्या शेवटच्या काही सेकंदात नाईट क्लब चा फील यावा म्हणून मला बाटल्यांचे फ्लेअरिंग करायला सांगितले ,त्याच्याबद्दल रोख काही पैसे दिले. व ,त्याचा चांगला क्लोजअप येईल असे सुध्धा आमिष दाखवले.
पुढे हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला तेव्हा त्यांची डीवीडी विकत घेऊन युके मध्ये मोठ्या कौतुकाने मला पाहणासाठी त्या गाण्याची वाट पाहत होतो.
पण त्यात त्याचा क्लोज आप अजिबात दिसला नाही.
ह्या दोन महिन्यात तेथे क्लब मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून बी टी टि चाळी मधील मराठी मुलांना नोकरी , तसेस , महिलांना व इतर अनेकांना त्या निमित्ताने रोजगार मिळाला.
ह्यातील ती जण व्यावसायिक बॉडी बिल्डर होते. त्यांच्या सोबत नेहमीच चाळीत जायचो.त्यातला एका म्हणाला होता
माझा बाप येथे काम करायचा ,आता मी करतो
फरक एवढाच की तो घाम गाळायचा ,मला तो गाळावा लागत नाही.
कारण वातानुकुलीत क्लब मध्ये बाउन्सर्स असल्याने त्यांच्या खुराकापासून सगळी काळजी येथे घेतली जात. येथे अति शहाणपणा करणाऱ्याला त्याची सामाजिक पत विचारात न घेता बकोटीला धरून बाहेरचा रस्ता दाखवणे एवढे त्याला काम होते.
त्यातल्या त्यात इंग्रजी बर्‍यापैकी येत असल्याने त्याला आठवड्याला कितीतरी फोन नंबर दिले जायचे, त्यापैकी किती ठिकाणी तो घाम गाळून यायचा ह्याबद्दल सुरस कथा ऐकायला मिळायच्या. अश्या कामगाराचा मुलगा तो , शारिरीक श्रम त्याला चुकले थोडेच होते.
त्यांच्या घरी अनेकदा जाणे व्हायचे.
गतकाळाच्या जखमा भरून आल्याच होत्या असे नाही , मात्र मुंबापुरीत नव्याने अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या हो त्या. चाळीत मुलांना मुलांना कामे मिळाल्याने
भाईगिरी थंडावली होती.
कासलीवाल हे एस कुमार चे मालक त्यांची बायको म्हणजे सुरज बडजात्या ची बहिण
म्हणून बॉलीवूड वाले येथे शुटींग साठी येत.
ह्या लोकांनी सरकारला हाताशी धरून जमिनी जवळ जवळ गिळंकृत केल्या.
आता निदान गिरणी कामगाराला ह्याच जमिनींच्या वर कायम स्वरूपी घरे मिळाली पाहिजे अशी आशा करतो.
फुकटात जमिनी सरकारशी संगनमत करून लाटल्या. सरकारला ह्या कामगारांना आता फुकटात घरे द्यायला काहीच हरकत नसावी.
दुर्दैवाने मराठी माणसाची अस्मिता जागवणारे नेत्यांना गिरणगाव व गिरगाव भगव्या खाली आणता आला पण गिरणगावात व गिरगाव मध्ये मनोमिलन घडवून आणणे शक्य झाले नाही ,
गिरगाव हळूहळू ठाणे ,पार्ला, डोंबिवली , बोरेवली मध्ये अंतर्धान पावला.
त्याला गिरणगावाची दशा दृष्टी आड सृष्टी झाली.

यशोधरा's picture

7 Apr 2013 - 1:53 pm | यशोधरा

अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा धागा.. वर आणल्याबद्दल धन्यवाद.
या तपशीलांची काहीच माहिती नव्हती आणि परिचयात कोणीही या ताणातून आणि अनुभवातून गेलं नाही त्यामुळे जाणीवही नव्हती..

असेच म्हणते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Apr 2013 - 3:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

याच विषयावर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती "Tale of two cities" नावाची.
भय्ंकर अस्वस्थ करणारा अनुभव आहे.
नेमकी अत्ता त्याची लिंक सापडत नाही.

त्यात शेवटी एक गाणे होते
बदली बदलीसी सुरत है भाई, ये बंबई की सुरत है भाई
मील तोडके बनाये टॉवर, टॉवर बनेहै सुपर पॉवर,
सुपर पॉवर के सुप्रीमो भाई,
इंटर नेट पे बैठे है भाई, जंबो जेट पे बैठे है भाई,
जंबो जेट पे बैठे है भाई, खाली पेट हम बैठे है भाई,
फॅक्टरी गेट पे बैठे है भाई,

असे बरेच काही त्या गाण्यात होते.

कोणाला सापले तर प्लीज लिंकवा,

आदूबाळ's picture

7 Apr 2013 - 6:49 pm | आदूबाळ

पैजारबुवा, ही का ती?

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Apr 2013 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार

प्रयत्न केल्या बद्दल धन्यवाद आदुबाळ,
पण मी म्हणत असलेली डॉक्युमेंट्री ही नाही.

नितिन थत्ते's picture

7 Apr 2013 - 6:16 pm | नितिन थत्ते

धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.

दत्ता सामंत यांच्या दहशतीशिवाय इतर कारखान्यांतील संपांमध्ये त्यांना मिळालेले नेत्रदीपक यश हे या संपात गिरणीकामगार त्यांच्या पाठीशी जाण्याचे मुख्य कारण होते. "सामंत संप करून भरघोस फायदा करून देतात" अशी प्रसिद्धी होती.

काय घडत आहे/घडले आहे याचा गिरणगावातल्या लोकांना खूप काळपर्यंत पत्ता लागला नव्हता. १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिराहत्येमुळे आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत ४८ पैकी केवळ पाच जागा काँग्रेसने गमावल्या होत्या त्यातली एक गिरणगावातली जागा होती. दत्ता सामंत तेथे निवडून आले होते. म्हणजे १९८२ ला सूरुवातीस चालू झालेला संप फसला आहे हे गिरणगावातल्या कामगारांना १९८४ च्या अखेरीसही कळले नव्हते.

आंदोलक आणि भविष्य मी लिहिले तेव्हा हा धागा वाचलेला नव्हता.

अवांतर : वर्किंग कंडिशनची भरपाई पैशाने करण्याची सुरुवात सामंत यांच्याकडून झाली असे वाटते. आमच्या कारखान्यात काही हॅझार्डस काम करणार्‍या कामगारांना दिवसातून दोन वेळा दूध प्यायला दिले जाई. त्या कामाच्या हॅझार्डवर (Exposure to some chemical fumes) दूध पिणे हा उपाय असावा. सामंतांच्या काळात "दूध देऊ नका... त्या ऐवजी अमूक रुपये जास्त पगार द्या" अशी मागणी कराराच्यावेळी केली गेली असे आठवते.

युनियनने वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी न भांडता केवळ पैशासाठी भांडणे ही संकल्पना सामंतांनी आणली.

नाना चेंगट's picture

7 Apr 2013 - 11:00 pm | नाना चेंगट

>>युनियनने वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी न भांडता केवळ पैशासाठी भांडणे ही संकल्पना सामंतांनी आणली.

माझ्या मते ७०च्या दशकातच सर्व गोष्टी पैशात तोलणे आणि पैसा हेच सर्वस्व मानणे सुरु झाले होते. त्यामुळे अमुक साधने उपलब्ध करुन देण्याच्या मागणीपेक्षा दोन पैसे जास्त मिळवून आपली घरातील चणचण दूर करावी असा विचार सामान्य माणसे आणि पैसे फे़कून काम करुन घेऊ असा श्रीमंत माणसे विचार करायला लागली असावीत. ९० च्या दशकातील उदारीकरणाने ही भुमिका अजून स्पष्ट आणि रौद्र रुप धारण करती झाली असावी.

वेताळ's picture

7 Apr 2013 - 6:50 pm | वेताळ

धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद

अतिशय अस्वस्थ करणारा धागा. उत्खननाबद्दल अभिनंदन.

आशु जोग's picture

7 Apr 2013 - 11:37 pm | आशु जोग

> माझ्या मते ७०च्या दशकातच सर्व गोष्टी पैशात तोलणे आणि पैसा हेच सर्वस्व मानणे सुरु झाले होते.

अमिताभच्या पिच्चरममुळे झालं हे ७० च्या काळात

नाना चेंगट's picture

7 Apr 2013 - 11:56 pm | नाना चेंगट

असहमत. चित्रपटांपासून आर्थिक सामाजिक परिणाम एवढे होत नाहीत. ७० च्या दशकात अमेरीकेने गोल्ड स्टँडर्ड रद्द केले त्यामुळे महागाईचा डोंब उसळला. जगभर जास्तीत जास्त पैसा मिळवणे हे जगण्यासाठी आवश्यक झालं.लोकसंख्या बेसुमार वाढत चालल्याने अन्न महाग झालं. दुष्काळ वगैरे इतर पैलू सुद्धा त्यात येतात. असा बहुआयामी प्रभाव या कालखंडावर आहे. केवळ बच्चनचा काही प्रभाव नाही. असेल तर त्याने फक्त जे आहे ते पडद्यावर दाखवले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2013 - 12:10 am | निनाद मुक्काम प...

१९७१ नंतर अमेरिकेने आपली आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली. ह्यामुळे भारतात हळू हळू बेरोजगारी वाढू लागली.
समाजातील तरुणाई मध्ये असलेला हा रोष ,खदखद सलीम जावेद ने हेरला.
व पडद्यावर अँग्री यंग मेन सादर केला
अमिताभ च्या यशात ५० टक्के त्यांची मेहेनेत , व २५ टक्के तत्कालीन परिस्थिती व २५ टक्के त्या परिस्थिती नुसार कथा लिहिणारे सलीम जावेद ला जाते.
९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतातील आर्थिक स्थिती बदलली व ९० च्या दशकात चोप्राने अनिवासी प्रेम कथांची चक्की उघडली त्यात जोहर , कुणाल कोहली ह्यांनी आपापले पीठ दळून घेतले.

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 8:56 am | नाना चेंगट

>>९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतातील आर्थिक स्थिती बदलली

हे वाक्य

९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतातील काही जणांची आर्थिक स्थिती बदलली

असे केल्यास जास्त योग्य होईल. सरकारी सरासरीने जरी गरीबांची संख्या कमी झाली असली तरी त्यामधे दारिद्रयरेशा काय स्तरावर मानली जावी हा भाग मोठा रंजक आहे. चलनवाढ आणि महागाई निर्देषांकाला अनुसरुन ती काढली जात नाही. तसेच एकंदर कर्जबाजारी असण्याचा आणि त्यामुळे आत्महत्यांचा वाढता आकडा उदारीकरणाची फळे आहेत का असा विचार मनात नक्कीच येतो.

नितिन थत्ते's picture

8 Apr 2013 - 9:17 pm | नितिन थत्ते

>>दारिद्रयरेशा काय स्तरावर मानली जावी हा भाग मोठा रंजक आहे. चलनवाढ आणि महागाई निर्देषांकाला अनुसरुन ती काढली जात नाही.

दारिद्र्य रेषा कशी ठरते तिचे निकष काय असतात याबद्दल काही ठोस माहिती मिळाली तर हवी आहे. वाटल्यास वेगळा लेख लिहावा अशी विनंती.

(दारिद्र्य हे रंजक नसले तरी रंजक माहितीच्या अपेक्षेत)नितिन थत्ते

नाना चेंगट's picture

9 Apr 2013 - 9:05 am | नाना चेंगट

आता उरलो पिंकांपूरता !

पिंपातला उंदीर's picture

8 Apr 2013 - 9:24 pm | पिंपातला उंदीर

नाना चेंगट यानी पिंका टाकायचा आपला प्रन फारच गंभीरपणे घेतलेला दिसतोय. आता बष्काळ विधान केलेच आहे तर स्पष्टीकरण दिले तर उपकार होतील

नितिन थत्ते's picture

8 Apr 2013 - 10:11 pm | नितिन थत्ते

दारिद्र्यरेषा काढण्याची पद्धत विषद करण्याची विनंती फक्त नाना चेंगट यांच्यासाठी नाही. जे कोणी 'सरकारी दारिद्र्य रेषा ही योग्य प्रकारे ठरवलेली नसते' असे मानतात त्या सर्वांसाठी ती विनंती आहे.

नाना चेंगट's picture

9 Apr 2013 - 9:06 am | नाना चेंगट

तुम्ही जर ' 'सरकारी दारिद्र्य रेषा ही योग्य प्रकारे ठरवलेली असते' असे मानत असाल तर तुम्हीच तसा लेख लिहावा. :)

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 10:57 pm | नाना चेंगट

माझे विधान बाष्कळ आहे हे ज्या गृहितकांच्या आधारे आपण म्हणत आहात त्याचाच आधार घेउन माझे विधान आधी खोडून काढले तर उपकार होतील.

राही's picture

8 Apr 2013 - 12:42 pm | राही

आता जाणवते की या संपाचे काही फायदेही झाले. 'चार आळशी भाऊ आणि परोपकारी शेजारी' या कथेतल्या शेजार्‍याने जसे त्या भावंडांना आळशीपणाने जगू देणारे शेवग्याचे झाड कठोरपणाने तोडून टाकून त्या मुलांना हातपाय हलवण्यास भाग पाडले तसे या संपाने चाकरमान्यांचे झाले. जगण्याचे अन्य पर्याय त्यांना सक्तीने शोधावे लागले. काही जणांनी कोंकणात परतून पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या.काहीनी मुंबईतच कूरिअरसेवेत नोकर्‍या धरल्या. (तेव्हा ही सेवा काही एका छोट्या वर्गापुरतीच मर्यादित होती. अंगडियाप्रमाणे.)काही शेअरबाजारात हरकामे म्हणून लागले. ही कामे श्रमाची आणि तोकड्या कमाईची होती हे खरे पण त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व विस्तृत झाले.गिरणगावाबाहेरच्या संधी त्यांना दिसू लागल्या. प्रेमाताई पुरवांसारख्यांनी कम्यूनिटी किचन संकल्पनेद्वारे अनेक गृहौद्योगांना चालना दिली. स्त्रीशक्तीचा अर्थार्जनासाठी वापर वाढला. एक पिढी बरबाद झाली खरी पण पुढच्या पिढीचा फायदा झाला. कोंकणाकडे जाणारा मनीऑर्डरींचा ओघ आटला पण स्वयंरोजगाराचा नवीन स्रोत मिळाला. त्याच सुमारास फलोद्यान योजनाही आली. तिच्या सहायाने आंबा, काजू, नारळ, मसाल्याची झाडे यांच्या नवीन लागवडी झाल्या.त्यांची फळे वीस वर्षांनंतर पुरेपूर मिळू लागली. आज कोंकणाचा कायापालट होऊ घातला आहे त्याचे एक कारण हा संप आहे.वर मुक्तसुनीतांनी आणि सुनील यांनी म्हटल्याप्रमाणे या संपाला पांढरपेशांचा पाठिंबा आणि सहानुभूती नव्हती. तो हळू हळू बारगळत गेला तेव्हा कोणी फारसे अश्रू ढाळले नाहीत. तेव्हाच्या बातमी-दुष्काळाच्या काळातही त्याची बातमी झाली नाही. याच सुमारास आणखी एक महत्त्वाची गोष्ट मुंबईत इतरत्र घडत होती. मुंबईतला औषधनिर्मिती उद्योगही या काळात बंद तरी पडत होता किंवा स्थलांतरित तरी होत होता. ग्लॅक्सो, जर्मन रेमिडीस, बरोज वेल्कम अशा अनेक कंपन्यांनी मुंबईतले उत्पादन थांबवले,स्थावर विकून टाकले.पण या क्षेत्रात पगार भरपूर होते त्यामुळे शोषणाचा मुद्दा लावून धरण्याजोगी परिस्थिती नव्हती. कडवी डावी सर्वंकष युनिअन सुधा नव्हती. नोकरलोकांना घसघशीत सानुग्रह रक्कम मिळाली आणि ते गप्प बसले. काहींनी छोट्या सदनिकांमध्ये गुंतवणूक केली आणि त्यांचे भाडे खात राहिले. हा पांढरपेशे आणि कष्टकरी या मधला फरक होता. असो.

मन१'s picture

8 Apr 2013 - 1:05 pm | मन१

अवघड आहे

सुमीत भातखंडे's picture

8 Apr 2013 - 1:11 pm | सुमीत भातखंडे

डोकं सुन्नं करणारा धागा.
वर आणल्याबद्दल धन्यवाद

लहानपणी ह्या संपाविषयी भरपूर उलटसुलट वाचनात यायचं. पद्धतशीर पणे संप आणि कामगार दोन्ही मोडून काढण्याचं हे उदाहरण ठरावं, झालं ते वाईटचं पण वरती अनेकांनी म्हटल्याप्रमाणे 'तुटेपर्यंत ताणल्याने' गिरणीकामगारांनि सहानुभूती गमावली, दोष नेतृत्वाकडेच जाणारच अशावेळी. मिल बंद पडल्यामुळे जी मध्य आणि दक्शिणमध्य मुंबईतली कुटुंब देशोधडीला लागली, त्यातून गुन्हेगारी विश्वालाही बरीच तरुण मुलं मिळाली. पैसा काय चीज आहे, उपासमार काय असते हे मुंबईतल्या ह्या वर्गाने अगदी जवळून अनुभवलं.

लेख वाचताना गिरगावतलं लहानपण, गिरणगावातले मित्र सगळं झर्रकन डोळ्यासमोर आलं.
अत्ता सुद्धा गिरणीकामगारांना जागा द्याव्यात की कसे अशा चर्चा रंगतात तेव्हा खरं काय ते कळत नाही. कामगारांनी जिथे काम केलं तेथील जागेवर मालकी हक्क सांगावा हे पटत नाही. त्या धनदांडग्यांना (ह्या शब्दाच्या अनुचित आणि उठसूठ वापरामुळे मराठी समाजाचं फार नुकसान झालं असं माझ वैयक्तिक मत आहे) मिळू नयेत हे जितकं खरं आहे तितकच त्या सरकारकडे राहाव्यात असं वाटतं.

धागाकार्त्यांना व संपादक मंडळाला एक विनंती होती कि हा लेख मी माझ्या मेल मधून इतरांना पाठवला तर चालणार आहे का ? ( अर्थात लेखकाच्या नावासकट )
या मागचा हेतू इतकाच कि या सर्वांची वेदना इतरांपर्यंत निदान फोचावण्याचे काम केल्याचे निदान समाधान तरी लाभेल. :(

प्रमोद देर्देकर's picture

26 Nov 2013 - 11:45 am | प्रमोद देर्देकर

वरिल संजय अभ्यंकर , सुनिल लेखाचे प्रतिसाद पट्तात.

माझे वडिल सुद्धा तेव्हा कळव्यातील मफतलाल गिरणीत कामाला होते. तिथे संप १९८६ ला झाला. तेव्हा आम्ही भावंडे ९,१० वी त शिकत होतो. बेकारीचे चटके अनुभवले. रोज केळ्यचे शिकरण आणि चपाती. १९८६ एप्रिल महिन्याच्या पगार सुद्धा कंपनिने अजुन दिलेला नाही.वडील रोज गेट वर जावून काय झाले हे पाहत होते. खूप मारामारी झाल्या.
पुढे ही केस मुंम्बै कोर्टात २ वेळा तर सुप्रिम कोर्टात सुद्धा कामगारांच्या बाजूने निकाल लगला. पण काहीच उपयोग झाला नाही. आमची आइ मोठ्या धीराची तिने लगेच लहान मुलांना सांभाळायला सुरुवात केली. वडील सुद्धा काही न काही कामे बेलापूर पट्यात शोधू लागले. माझा भावू पेपर टाकू लगला.(आत्त पर्यंत २२/२३ नोकर्या झाल्यात त्याच्या) पुढे इलेक्ट्रिशियन झाला. मी पुढे १२ वी नंतर office Asst. ची मुंबई त नोकरी शोधली. पुढे आमच्या समोर राहणारे शेजारी यांच्या मदतीने त्यांच्या कंपनीत Rs.३५०/- पगारावर Apprenticeship केली. पण पक्की नोकरी कुठेच नाही. कारण शिक्षण अर्धवट राहिले. आता त्या मफतलाल कंपनीच्या आतील मशिनी मात्र गंजल्या आणि बाहेरच्या जागेत सगळे बाहेरगावाचे १८ पगड जातीचे लोक येवून जागा बळकावून राहिले आहेत. अनाधिक्रुत झोपड्पट्टी आणि नुसती दादागिरी चाललिये. कधी म्हणतात कि हि जागा विकून कामगारांचे पगार देणार आहेत तर कधी म्हणतात कामगारांसाठी इथेच घरे बांधणार आहेत. कसचे काय.
आम्ही आशा सोडुन दिली आहे. सध्या जे चाललंय ते बरे म्हणायचे अणि दिवस ढकलायचे. वर राही यांनी सांगितल्या प्रमाणे जगण्याचे अन्य पर्याय सक्तीने शोधावे लागले हेच खरे.