[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल]
मज दोन आसवांना हुलकावता न आले
हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले
कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी
उपटून यातनांचे तण काढता न आले
निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती
परक्याच आपल्यांना समजावता न आले
मरणासवे कितीदा फसवे करार झाले
जगणे नकोच होते, पण टाळता न आले
अनुकूल सूचनांना वगळून चूक केली
प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे
कवटाळले उराशी, भिरकावता न आले
जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही,
गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
प्रतिक्रिया
12 Feb 2013 - 11:21 pm | शुचि
अप्रतिम आहे एकेक कडवं.
हे आणि
क्या बात है!
12 Feb 2013 - 11:41 pm | जेनी...
काय बोलु क्रांती !
मला आवडलं .....
12 Feb 2013 - 11:49 pm | अभ्या..
सुरेख जमलीय एकदम. आवडली. :)
13 Feb 2013 - 12:05 am | राघव
माय.. तुझ्या चरणांचे छायाचित्र पाठवून दे..
13 Feb 2013 - 12:07 am | सूड
अ प्र ति म !!
13 Feb 2013 - 12:16 am | इन्दुसुता
गझल अत्तिशय आवडली.
"निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती
परक्याच आपल्यांना समजावता न आले "
आतवर पोचले.
13 Feb 2013 - 12:21 am | संजय क्षीरसागर
हे लै भारी झालंय
13 Feb 2013 - 12:45 am | जयवी
जबरदस्त यार !
13 Feb 2013 - 5:06 am | स्पंदना
जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही,
गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
इथे साष्टांग स्विकारा क्रांतीताई!
13 Feb 2013 - 7:36 am | यशोधरा
वा, वा!
13 Feb 2013 - 7:51 am | किसन शिंदे
वाह!!
प्रत्येक कडवं सुंदर आहे.
14 Feb 2013 - 10:13 am | पैसा
क्रांतिकडून जसे अपेक्षित तसेच.
कोणीतरी मला हे तरही गझल काय आहे जरा उलगडून सांगा बघू. मायबोलीवर अशा खूप रचना मी नेहमी बघते.
14 Feb 2013 - 11:33 am | चाणक्य
तरही गझल म्हणजे काय?
14 Feb 2013 - 11:01 am | सुहास..
क्लास !!
14 Feb 2013 - 11:11 am | क्रान्ति
समस्त वाचक आणि प्रतिसादक मिपाकरांना शतशः धन्यवाद!
ज्योति, तरही गझल म्हणजे एखाद्या गझलमधल्या कोणत्याही ओळीला आपल्या खयालात गुंफून लिहिलेली गझल. ही तरहीची ओळ किंवा मिसरा नव्या गझलमध्ये कोणत्याही स्थानावर घेता येते/येतो.
इथे अधिक माहिती मिळेल.
14 Feb 2013 - 11:17 am | पैसा
धन्यवाद!
14 Feb 2013 - 11:13 am | श्रिया
केवळ अप्रतिम!!
14 Feb 2013 - 11:15 am | निशांत५
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही,
गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
14 Feb 2013 - 11:30 am | चाणक्य
आज आता काही दुसरं वाचायला नाही मिळालं तरी हरकत नाही. दिन बन गया. धन्यवाद.
14 Feb 2013 - 11:31 am | राही
'प्रतिकूल आर्जवांना' आणि 'जुळवून काफिये मी'... फार सुंदर!
14 Feb 2013 - 11:50 am | ऋषिकेश
वा! बर्याच दिवसांनी क्रान्तीतैंची गझल वाचली!
हे पाठोपाठचे शेर कमाल आहेत!!!
अतिशय आवडली
14 Feb 2013 - 12:12 pm | फिझा
अतिशय आवडली !!!
15 Feb 2013 - 2:19 pm | दत्ता काळे
अप्रतिम.. सर्व कडवी परत परत वाचली.
15 Feb 2013 - 2:53 pm | नानबा
मला गझल फारशी क्ळत नाही. पण तरीही,
या ओळी चर्रर्रर्रर्र करून गेल्या...
15 Feb 2013 - 4:19 pm | वेल्लाभट
खतरनाक !
जामच भारी !
वाह वाह वाह वाह ! क्या बात है !
एक अन एक शेर भारी.
15 Feb 2013 - 4:40 pm | प्यारे१
सुभानल्लाह!
15 Feb 2013 - 4:45 pm | ह भ प
हरवून गेलो..
15 Feb 2013 - 5:03 pm | ह भ प
खचून गेलो मीही अन उध्वस्तही झालो
दुवे जीवांचे तेव्हा सांधता न आले..
उलथून गेल्या भिंती, कलथून खांब गेले
छप्पर दोन घरांचे मज बांधता न आले..
अगायाया.. मेंदूच्या वळ्या सरळ झाल्या माझ्या यवढसं लिहिताना...
पण तुम्ही मात्र कमाल केलीत...
17 Feb 2013 - 10:53 am | कौस्तुभ आपटे
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
सुंदर!
17 Feb 2013 - 11:52 am | खटासि खट
छानच ! पण तुमच्या लौकिकास साजेशी नाही वाटली.