आयुष्य राजयोगी (तरही गझल)

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
12 Feb 2013 - 11:57 am

आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयवी - जयश्री अंबासकर

अभय-गझलगझल

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

12 Feb 2013 - 2:52 pm | चाणक्य

तरही गझल म्हणजे काय?

तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल.
ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Feb 2013 - 4:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख रचना:

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

व्वाह!

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

ही ओळ मस्तच वाटली.

मनीषा's picture

12 Feb 2013 - 8:59 pm | मनीषा

अरे वा !
मस्तं

जयवी's picture

13 Feb 2013 - 9:39 am | जयवी

मनापासून धन्यवाद :)

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

अप्रतिम !

क्रान्ति's picture

14 Feb 2013 - 9:25 pm | क्रान्ति

आवडली गझल. 'आयुष्य राजयोगी' खासच!

जयवी's picture

15 Feb 2013 - 3:38 pm | जयवी

मनापासून धन्यवाद :)

प्यारे१'s picture

15 Feb 2013 - 4:38 pm | प्यारे१

बहोत बढिया...!

प्रसाद१९७१'s picture

15 Feb 2013 - 5:40 pm | प्रसाद१९७१

लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू
अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले |

दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या
गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-)

ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या
बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)