गेल्या आठवड्यात भाउबीजेच्या मागे-पुढे जेंव्हा बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल शेवटची काळजी वाटणे चालू झाले तेंव्हा (केवळ माध्यमात वाचल्यावरूनच, जास्त कल्पना नाही) थोडेफार बंदसदृश प्रकाराचे केलेले समर्थन आणि काल-परवा पालघरला घडलेला प्रसंग सोडल्यास जे काही शिस्तीत पार पडले ती काही सामान्य बाब नव्हती. आता हे सर्वशृत झाले आहे की मुंबईच्या इतिहासात लोकमान्य टिळकांच्या नंतर सार्वजनिक ठिकाणि अंत्यसंस्कार झालेले बाळासाहेब हे दुसरे व्यक्तीमत्व ठरले. अर्थातच दोन्हींच्या संदर्भात तसे होण्याचे कारण एकच होते, प्रचंड जनस्मुदाय असलेली ही अंत्ययात्रा.
कालच्या रविवारी मुंबईत केवळ या अंत्ययात्रेत भाग घेण्यास वीस लाखांचा समुदाय सामील झाला. या संदर्भात अमिताभचे ट्वीटरवरील खालील वक्तव्य वाचण्यासारखे होते:
Mumbai was never, ever, in my 45 years here, been as quiet, disciplined and peaceful, as today !!
The silence from the 2 million gathered at Shivaji Park during the last rites, demonstrated two things - the respect for Bala Saheb Thackeray and secondly the deep ingrained culture of the Maharashtrian ... 'sanskaar' !!!
गेले दोन-चार दिवस बरेव काही माध्यमांमधून वाचले, पण एक भाईंदरची दुर्दैवी आणि अयोग्य घटना आणि त्यावर पोलीस कसे चुकले हे छापल्याचे सोडल्यास एकाही माध्यमाला पोलीसांची, राज्यकर्त्यांची, शिवसेनेच्या नेतृत्वाची आणि २० लाखाच्या घरात जमलेल्या तमाम जनते बद्दल काहीच (किमान ठळकपणे) लिहावेसे वाटले नाही याचा खेद वाटला. अमिताभने पोलीसांचे आणि जनतेचे/शिवसैनिकांचे कौतुक केले आहेच. पण ते वाचताना येथे देखील त्याचा पुनरुच्चार करावासा वाटला. त्याच संदर्भात मला वाटले, यातील प्रत्येक जबबदारी असलेल्या व्यक्तीकडून सर्व बरोबर/परफेक्ट अथवा प्रोफेशनली झाले असेल असे माझे म्हणणे अथवा दावा नाही. किंबहूना प्रकृती गंभीर असताना शिवसेनेच्या जबाब्दार व्यक्तींकडून जनतेशी सातत्याने योग्य संवाद साधायला हवा होता असे वाटते खरे, पण... आज लक्षात रहाताना काय राहीले?
- निधनसमयी ठाकरे कुटूंबिय आणि शिवसेना नेतृत्वाने दाखवलेला संयम... (उद्धव यांच्यावर पण गेल्या १-२ आठवड्यातच कधीतरी अँजिओप्लास्टी झाल्याचे ऐकले होते)
- जे काही वाचले, निरीक्षले त्यावरून दिसले ते वैचारीक दृष्ट्या विरोधी सरकारशी आणि त्या सरकारने या विरोधकांशी केलेले संयामाने प्लॅनिंग
- दिवाळीच्या वेळचा आलेला भावनेचा पूर ओसरल्यावर शिवसैनिकांनी दाखवलेला संयम
- तमाम राजकीय पक्षांच्या नेत्यांनी (दिग्विजय सिंग यांनी आधी घातलेला गोंधळ सोडल्यास) केलेले संयमीत शोकसंदेश
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस आणि आपत्काल स्थितीत लागणार्या यंत्रणांनी हा विशेष ताण ज्या पद्धतीने सहन करत सर्व सुखरूप पाडले त्या या कायदा-सुव्यवस्थेचा संयम!
हे काही सोपे काम नव्हते. बाळासाहेबांबद्दल ज्यांना आत्मियता वाटत होती त्यांचे सोडून द्या, पण ते न आवडणार्यांना पण, एका युगाचा अंत झाला आहे हे मान्य करावे लागत होते. यात भावना, संवेदना, वेदना, राजकीय आणि वैचारीक या सर्व संबधातील सर्वच परस्परविरोधाने भरलेले ठासून भरलेले होते. म्हणून याचे अधिक महत्व. पण तरी देखील सर्वच बाजूने संयम पाळला गेला. त्याबद्दल समाजाच्या सर्वच घटकांना सलाम आणि हा संयम ही नवीन युगाची नांदी ठरोत ही शुभेच्छा!
प्रतिक्रिया
20 Nov 2012 - 8:21 pm | रेवती
मते वेगळी असल्याने गप्प बसते.
20 Nov 2012 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मतं वेगळी असल्याने गप्प बसतो.
-दिलीप बिरुटे
21 Nov 2012 - 9:54 am | ऋषिकेश
मते वेगळी आहेत.. व ती आता देणे औचित्याचे नाही तेव्हा गप्प!
20 Nov 2012 - 8:46 pm | आजानुकर्ण
पोलीसांचे कौतुक आहेच. अनेकांना दिवाळी वगैरे सोडून परत रस्त्यावर यावे लागले होते. एका अधिकाऱ्याला त्याच्या मुलीचा विवाह पुढे ढकलावा लागल्याचेही कुठेतरी वाचले.
पण हा संयम प्रकार मला कळला नाही. हा लेख वाचून तोडफोड करणे हा मोठ्या समूहाचा जन्मसिद्ध हक्क किंवा मूळ स्वभाव असून जर संयम न ठेवता हिंसाचार झाला असता तर तो अपेक्षितच आहे मात्र या मूळ स्वभावावर समूहातील मोठ्या प्रयत्नाने मात केल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत असे काही अपेक्षित आहे का?
आणि असे खरेच आहे का? माझ्या एका नातेवाईकांचे पुण्यातील दुकान 'उस्फूर्त' बंदनिमित्त उघडे न ठेवण्याचा सल्ला एका टोळक्याने त्यांना दिला. माझे आईबाबा काही घरगुती कामानिमित्त उरुळीकांचनला जाणार होते, तिथेही रेलवे स्थानकावर दुकाने बंद न केल्याने तोडफोड झाली. त्यामुळे ऐनवेळी प्लॅन बदलावा लागला. या अगदी माझ्याशी संबंधित असलेल्या घटना. प्रत्येकालाच असा अनुभव आला असणार.
20 Nov 2012 - 9:04 pm | विकास
मला अनुभव जरी येण्याचा प्रश्न नसला तरी याच्याशी सहमतच आहे. "उस्फुर्त बंद" प्रकार मी इतर वेळेस तेथे असताना देखील पाहीले / अनुभवले आहेत. मात्र ते इतर पक्षियांच्या संदर्भात असल्याने येथे लिहीणे टाळत आहे कारण विषय भरकटेल... त्यात (त्यावेळेस आणि आत्ता देखील) स्थानिक गुंडगिरी होती. ज्याचे समर्थन करायचा प्रश्नच नाही. पण या वेळेस पक्षाने म्हणून कुठला बंद केला नाही, उलट शांततेचे आवाहन केले.
एकंदरीत, मोठा जमाव झाला की तोडफोड करणे हे काही केवळ एकाच पक्षाच्या/विचाराच्या गटाकडून होत आलेले नाही. मुंबईत तर ते अनेकदा पहायला मिळाले आहे, मिळते. तेच इतर ठिकाणी इतर राज्यांमधे देखील असेल... थोडक्यात ती का कुणास ठाऊक आपल्या समाजाची मानसिकता आहे. त्याचा फायदा देखील सर्वच घेताना दिसतात - राज्यकर्ते, स्थानिक गुंड, सत्तेबाहेरील राजकारणी वगैरे वगैरे... पण या वेळेस जर २० लाख लोकं... मी कुतुहलाने त्याचा अमेरीकन भाषेत विचार केला तर ऑलमोस्ट चार बॉस्टन शहरे अथवा वॉशिंग्टन डीसी होतील इतकी लोकसंख्या एकदम एका अत्यंत सेन्सेटीव्ह अंत्ययात्रेत सामील होऊन देखील सर्व शांततेत पार पडते, केवळ हिंसेचा उद्रेकच नाही तर चेंगराचेंगरीत कोणी मरत नाही की जखमी होत नाही... हे त्यातील सर्वच घटकांसाठी कौतुकास्पद आहे. हा नक्कीच फरक वाटला. आणि आशादायक अशी positive development देखील वाटली.
म्हणून वाटले की माध्यमांना हे दिसलेच नाही का?
20 Nov 2012 - 9:15 pm | आजानुकर्ण
मला वाटते बहुतेक माध्यमांमध्ये अंतयात्रेची वीस लाखाची गर्दी वगैरे ठळकपणे छापून आले होते. या व्यतिरिक्त माध्यमांनी काय छापणे अपेक्षित होते हे मला समजले नाही. किमान तुम्हास अपेक्षित असलेल्या बातमीचा कच्चा मसुदा वाचायला मिळाल्यास आनंद वाटेल.
20 Nov 2012 - 9:22 pm | विकास
मला वाटते आपण केवळ गर्दी आणि माध्यम इतकेच बोलत आहात. गर्दी एक भाग आहे. महत्वाचा पण तितकाच नाही... माझे म्हणणे त्याहून अधिक असल्याचे मी वर स्पष्ट केले आहेच. समजत नसेल तर असहमतीशी सहमत.
20 Nov 2012 - 9:26 pm | आजानुकर्ण
एक तर अशा स्वरुपाच्या घटनेनंतर शोकसंदेश आणि संयमाचा सल्ला देण्याव्यतिरिक्त कोणाच्याच हातात काही नसते. संयमाशिवाय कोणता वेगळा संदेश इथे देण्यासारखा होता की जो उपलब्ध पर्याय सोडूनही संयमाचा पर्याय इथे सर्वांनी निवडला? मला तरी वाटते कोणताच नाही.
20 Nov 2012 - 9:23 pm | आजानुकर्ण
पक्षाने म्हणून कुठला बंद केला नाही याचे कारण त्यासाठी काही कारण नाही.
बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत या वेळेपर्यंत सर्वांना अंदाज आलाच होता. त्यांचे निधन नैसर्गिक आणि वृद्धापकाळामुळे झाले. आवश्यक ते उपचार त्यांना कदाचित मिळाले असावेत असे बातम्यांवरुन वाटते. सर्वांना या घटनेबाबत वाईट वाटले. मात्र यासाठी शिवसेनेने बंद पुकारला नाही हे अभिनंदनास पात्र कसे? इथे बंद कशाच्या विरोधात हे कळले नाही. आणि अनऑफिशिअली पार्टी केडरने बंद घडवून आणलाच आहे.
20 Nov 2012 - 10:10 pm | नितिन थत्ते
बाळासाहेबांवरील उपचार हॉस्पिटलमध्ये न होता घरी केले गेले याचे कारण काय असावे?
20 Nov 2012 - 10:14 pm | आजानुकर्ण
बाळासाहेबांवर काही काळ हॉस्पिटलमध्ये उपचार करुन मग घरी उपचार करण्यात आले काय? कदाचित सर्व उपाय खुंटल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर, पोलिसांची जमवाजमव वगैरे होईपर्यंत त्यांना घरी ठेवले असल्याचे शक्य आहे. त्यानंतरच बातमी जाहीर केली असावी. हॉस्पिटल ' काही स्थानिक अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे ' उस्फूर्तपणे बंद करावे लागू नये यासाठी उपचार घरी केले गेल असावे.
21 Nov 2012 - 12:50 am | मैत्र
आता हीच थिअरी ते लीलावती मध्येच का होते / त्यांचे डॉक्टर्स - जलील परकार आणि अजित मेमन हेच का होते इ. सर्व गोष्टींना लावता येईल..
मी सेना समर्थक नव्हतो आणि कदाचित नसेनही किंवा त्यांच्या अनेक गोष्टींमध्ये दांभिकपणा वाटायचा म्हणून असेल.
यासाठी लोकांचा प्रतिसाद, त्यांची अफाट लोकप्रियता आणि खरोखर लाखो लोक अंत्ययात्रेला येऊन जे भान ठेवलं होतं ते लक्षणीय नव्हतं म्हणण्यात केवळ मूलभूत तिरस्कारच असू शकतो.
तिसर्या दिवसाच्या बंदची कदाचित आवश्यकताही नव्हती. कोणत्याही मार्गाने असेल, पण तिन्ही दिवस, अंत्ययात्रा आणि शिवाजी पार्कवरील काही लाखांचा समुदाय हे ज्या जबाबदारीने वागले त्यात नाकारण्यासारखे काही नाही.
एक त्रयस्थ म्हणून जर मला त्या दोन मुलींना अटक झालेलं योग्य वाटत नाही (त्यांचं विधान आक्षेपार्ह असेल/ होतं. धरून), तर एक त्रयस्थ म्हणून पाहताना मी डोळ्यांवर शिवसेना बद्दलच्या मतांचा चष्मा लावून त्यांच्या संयमाचे मोल करणार नाही..
21 Nov 2012 - 9:23 am | श्री गावसेना प्रमुख
पुण्यातील दुकान 'उस्फूर्त' बंदनिमित्त उघडे न ठेवण्याचा
म्हणजे तुम्हाला वैयक्तीक त्रास झाला होय.
20 Nov 2012 - 9:23 pm | मैत्र
विकास - सहमत आहे. आजानुकर्णांनी मांडलेला मुद्दा जरी खरा असला तरी एक सुधारणा म्हणून आणि व्यवस्थितपणे हाताळलेली एक खूप मोठी आणि संवेदनशील घटना म्हणून याची माध्यमांनी नोंद घ्यायला हवी होती.
मला तर वाटते की या मनोवृत्तीवर मात केल्याबद्दल ते खरोखर अभिनंदनास पात्र आहेत. या पद्धतीच्या वागणूकीचं कौतुक झालं नाही तर त्याचं महत्त्वही पटणार नाही. शिवसेना भविष्यात अशा जबाबदारीने वागली तर समर्थक आणि विरोधक दोघांनाही आनंदच व्हावा..
20 Nov 2012 - 9:58 pm | अप्पा जोगळेकर
संजय राउत वगैरेंच्या बाबतीत जाउंदे. पण उद्धव ठाकरे संयमाने वागत आहेत. विशेषतः स्मारकाबद्दल त्यांनी आज दिलेली प्रतिक्रिया तर नक्कीच संयमी.
20 Nov 2012 - 10:02 pm | सर्वसाक्षी
विकास,
आपल्या या मुद्याशी मी सहमत आहे. एकदा सेनेचा द्वेषच करायचा म्हणताना आपल्या विधानाला अनेक जण आक्षेप घेणार. मुळात संयम म्हणजे मी इथे असे समजतो की जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने अत्यंत जबाबदारीने वागणे. तोडफोड न केल्याने तो संयम दिसला असे नाही. अनेकदा बेशिस्त गर्दी वा अनावर भावना चेंगराचेंगरी वा बाचाबाचीला कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ जत्रा, देवदर्शन, सिनेमाचे चित्रण, शाळेच्या प्रवेशाच्या रांगा बगैरे. इथे जमाव केवळ अंत्यसंस्कारस्थळीच शांत नव्हता तर जाताना - येताना देखिल शांत व शोकमग्न होता. कुणीही भेसूर घोषणा देताना वा अरडाओरडा करताना दिसत नव्हता. शहरात खाजगी वाहने राजरोस फिरत होती आणि कुठेही कुणाला त्रास झाला नाही.
अनेकदा जबरदस्तीने बंद केले जातात, या प्रसंगी काही ठिकाणी अतिउत्साहाच्या वा स्थनिक नेत्यांनी आपली ताकद दाखवायच्या भरात दुकाने बंद केली असतीलही पण यावेळचा बंद हा निश्चितच उस्फुर्त होता. शनिवारी आणि रविवारी इथे म्हणजे ठाणे शहरात बहुतेक करुन सर्व घरावरचे कंदिल व दिव्यांच्या माळा संध्याकाळी अंधारातच होत्या. आता यावर कुणाला 'शिवसैनिकांनी घराघरात घुसुन दमदाटी केली' असे म्हणायचे असेलही, असो.
20 Nov 2012 - 10:05 pm | मदनबाण
सहमत !
20 Nov 2012 - 10:21 pm | आजानुकर्ण
एखाद्याला घरावरचा कंदिल किंवा दिव्यांच्या माळा सुरु ठेवण्याची इच्छा जरी असली तरी आनंद दिघे यांची परंपरा सांगणाऱ्या ठाण्यासारख्या ठिकाणी ते शक्य आहे का? प्रामाणिकपणे उत्तर दिल्यास आवडेल.
21 Nov 2012 - 9:29 am | श्री गावसेना प्रमुख
होय दिघेंचा म्रुत्यु हा होस्पिटल च्या बेर्वपाई मुळे झाला असे त्यावेळी शिवसैनीकांना वाटने स्वाभावीक होते,
तेव्हा तसे केले म्हणुन आता माळाही त्यांनीच उतरवल्या का?
22 Nov 2012 - 10:22 pm | शैलेन्द्र
आनंद दिघेंचा मृत्यु हा संशयास्पद होता, असा बर्यापैकी संशय अगदी सर्वसामन्यांनाही त्यावेळी आल होता...
20 Nov 2012 - 11:11 pm | पैसा
एवढ्या मोठ्या समुहामधे कोणत्याही नियंत्रणाशिवाय शिस्त ठेवणे कठीण असते, इथे बहुतांशी स्वयंस्फूर्तीने शिस्त पाळली गेली असे दिसते. भारतात अशी शिस्त पाळलेली पहायला मिळणे ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण जत्रांमधेही चेंगराचेंगरी वगैरे झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच पहातो.
बाळासाहेबांच्या निधनाची बातमी आल्यावर भिवंडीत काही भागात फटाके लावल्याचे प्रत्यक्ष पाहणार्याने सांगितले. तरी त्याची प्रतिक्रिया कुठेही उमटली नाही. मिडियामध्ये या फटाक्यांबद्दल बातम्या आल्या असल्या तर मला माहिती नाही. तसे असेल तर मिडियानेही बराच संयंम दाखवला असे म्हणायला हरकत नाही.
21 Nov 2012 - 12:08 am | आजानुकर्ण
कदाचित दिवाळीनिमित्त फटाके लावले असतील, सामान्यपणे तुळसीविवाहापर्यंत फटाके वाजवण्याची प्रथा अनेक भागांत आहे.
21 Nov 2012 - 12:37 am | विश्वनाथ मेहेंदळे
होय तर, भिवंडीत दिवाळी जोरदार साजरी करतात असे ऐकले आहे. बघण्यासारखी असते म्हणे तिथली दिवाळी. ठाण्याच्या तलावपाळी आणि डोम्बीवलीच्या फडके रोडची ईद कशी प्रसिद्ध आहे, त्याच प्रमाणे ना ?
21 Nov 2012 - 12:42 am | आजानुकर्ण
मीदेखील भिवंडीत फटाके लावतात असे ऐकले आहे.
21 Nov 2012 - 11:34 am | सुहास..
फटाके नाही पण बर्याच ठिकाणी " बयान " चा कार्यक्रम चाललेला मी स्वता पहिला आहे शनीवारी ! :(
अर्थात पाकिस्तानचे सामने मालेगाव ला ( छोटा पाकिस्तान ) भर चौकात टिव्ही लावुन सार्वजनीक रित्या पाहताना ही पाहिले आहेत.
हे वास्तव सांगायच्रे म्हणुन, आक्षेपार्ह असल्यास सपांदित करावे ही विनंती.
21 Nov 2012 - 4:46 pm | आजानुकर्ण
पुण्यातही काही लोक क्रिकेट सामने भर चौकात टीव्ही लावून पाहतात. त्यामुळे सार्वजनिक स्वरुपाची वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषण होते हा माझाही अनुभव आहे.
21 Nov 2012 - 12:25 am | आजानुकर्ण
फेसबुकवरील कमेंट सांप्रदायिकदृष्टीने कितपत स्फोटक होती हे सांगता येत नसले तरी भिवंडीबाबतची वरील ऐकीव स्वरुपाची बातमी निश्चितच दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारी वाटते. कदाचित ती अफवा म्हणूनही खपून जावी. संपादित केल्यास उत्तम.
21 Nov 2012 - 2:10 pm | पैसा
मला सांगणारी व्यक्ती उच्चपदस्थ आणि जबाबदार आहे. तसेच रविवारी ते भिवंडी इथे प्रत्यक्ष उपस्थित होते. अफवा पसरवायच्या असत्या तर मी इथे चर्चेत भाग घेतला नसता, त्यासाठी दुसरे बरेच मार्ग उपलब्ध असतात.
मृत्यूबरोबर वैर संपवावे असे सांगणारे लोक कधीच गेले. आपल्याला न आवडणार्या माणसाच्या मृत्यूच्या बातम्यांबद्दल आजकाल ज्या प्रतिक्रिया येतात त्याला भिवंडीचा अपवाद नाही. अशा प्रतिक्रियांवर मग प्रति प्रतिक्रिया येतात, आणि मिडिया गोंधळात भर घालतात. पण माझा प्रतिसाद नीट वाचलात तर हे लक्षात येईल की माझा भर या प्रतिक्रियेवर नाही तर जनतेने आणि मिडियाने जो संयम आणि शिस्त दाखवली त्याचे कौतुक करणारा आहे. हे कृपा करून लक्षात घ्या. धन्यवाद!
21 Nov 2012 - 4:44 pm | आजानुकर्ण
तुमचा प्रतिसाद नीट वाचला. तुम्हास ही बातमी सांगणारी व नेमक्या त्या वेळी भिवंडीस उपस्थित असणारी व्यक्ती आणि इथे ही बातमी देणाऱ्या तुम्ही या उच्चपदस्थ, समंजस आणि जबाबदार असल्या तरी एकदा पब्लिक फोरमवर अशा स्वरुपाची बातमी दिली की त्याचा अर्थ कोण कसा काढील हे सांगणे कठीण असते. त्यामुळे संपादित केल्यास उत्तम हे सांगावेसे वाटले. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या जातीय दंगली आणि काही महिन्यांपूर्वी आझाद मैदानावरील गोंधळामुळे उठलेले वादळ या पार्श्वभूमीवर वरील प्रतिसादात अभिप्रेत असलेल्या समुदायाने बाळासाहेबांच्या निधनाइतक्या कदाचित सर्वाधिक संवेदनशील विषयावर ह्या प्रकारची प्रतिक्रिया ही प्रातिनिधिक स्वरुपाची दिली नसावी इतपत माझा अंदाज आहे. कारण अशा स्वरुपाच्या प्रतिक्रियेची प्रतिप्रतिक्रिया फार जोरदार येऊ शकते व त्यात फार हानी होऊ शकते इतपत कल्पना त्यांना असावी.
न आवडणाऱ्या माणसाच्या मृत्यूच्या बातम्यांबाबत येणारी ही प्रतिक्रिया काही lumpen elements ची आततायी कृती इतपत मानून सोडून द्यावी. गांधीहत्येनंतरही काही लोकांनी साखर वाटल्याचे मी पुस्तकांमध्ये वाचले होते. ती कृती एखाद्या समाजाची प्रातिनिधिक कृती होती असे मी मानत नाही.
21 Nov 2012 - 5:56 pm | पैसा
एखाद्या लहान गटाकडून घडणारी कृती सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मीही समजत नाही. उडदामाजी काळे-गोरे तर सगळीकडे असतेच. एवढंच की बहुतेक वेळा असे लहान गट बहुतेक वेळा चिथावणी देण्यात यशस्वी होतात किंवा सर्वांचेच प्रचंड नुकसान घडवून आणू शकतात.
21 Nov 2012 - 9:30 am | श्री गावसेना प्रमुख
ते तर पाकीस्तान जिंकल्यावरही फटाके फोडायचे.
21 Nov 2012 - 12:30 am | निनाद मुक्काम प...
नुकतेच उत्तर भारतात एका पूजेनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर येथे घडलेला संयमित प्रकार स्तंभित करण्यासारखा आहे, विरोधी पक्षाने सुद्धा ह्याबद्दल कौतुक केले आहे.
आणि दुकाने बंद करण्याचे म्हटले तर ते कोणत्याही राजकीय पक्ष जेथे त्यांची ताकत
आहे तेथे असे प्रकार करतात.
पूर्वी तर दूरदर्शन बंद करून रडके चेहरे रड्या आवाजात एक आठवडा दाखवायचे.
म्हणजे नेत्याच्या मारण्याचे दुख नसले तरी हा प्रकार पाहून दूरदर्शन चाहत्याला रडू कोसळेल,
21 Nov 2012 - 12:32 am | निनाद मुक्काम प...
माफ करा दंगली ऐवजी चेंगराचेंगरी वाचा
21 Nov 2012 - 4:09 am | रेवती
मी मत व्यक्त केले नाही याबद्दल आपण खरड केलीत म्हणून ;) प्रतिसाद देत आहे (म्हणजे माझे २ प्रतिसाद धरून चाला.). मला बाळासाहेब ठाकरे आणी एकंदरीतच राजकारणाबद्दल फारच कमी माहिती आहे. मत व्यक्त करताना भावना दुखावण्याचा हेतू नाही पण भावनाच त्या, दुखावल्या जाणारच इ. ;)
बाळासाहेब (किंवा कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती यांनी आपापले पक्ष, कंपन्या इ.) यांनी शिवसेना स्थापन केली, यशस्वी केली, भेदभाव नव्हता , अनेकांना मोटीव्हेट केले. मोठे काम आहे ते. मान्य पण वय ८६ वर्षे, यश, किर्ती (आणि पैसा म्हणायचे का?), अगणित लोकांचा सपोर्ट इ. मिळाले. आणखी आयुष्यात माणसाला काय हवे असते? कृतज्ञता व्यक्त करायला भारतासारख्या (सुरक्षा व्यवस्थेवर ताण आलेल्या) देशात किती लोकांनी एकत्र जमायचे? यात दंगलच व्हायला हवी असे नाही पण चेंगराचेंगरीतही अघटीत घडू शकते. इतके लोक दुकाने बंद करून, कामधाम सोडून, मुंबईसारख्या शहरात जमतात यात मला तरी काहीही ग्रेट वाटले नाही. याउलट दुकाने, व्यवसाय शांततेत चालू ठेवून मोजक्या लोकांनी तिथे हजेरी लावली असती तर खरी श्रद्धांजली ठरली असती असे वाटते. यात बाळासाहेबांपेक्षा मला लोकांबद्दल बोलायचे आहे. कित्येक कोटी रूपयांचे नुकसान, अनेक आजारी व्यक्ती, लहान मुले, प्रवासी यांची गैरसोय करून काय मिळाले? फारतर दुकानाबाहेर दु:खद संदेश लावून कामे करावीत. शहराच्या एकूणच व्यवस्थेवर किती ताण आणायचा? जालीय वर्तमानपत्रातही "तुमच्या शिवाय कसे जगणार?, परत या....इ. संदेश वाचून भावनेच्या भरात किती ते वाहून जायचे? असे वाटले. एखाद्या व्यक्तिमत्वाचा इतका प्रभाव आहे तर त्यांच्याकडून बाणेदारपणा, संघटन कौशल्य, सडेतोडपणा इ. गुणही शिकण्यासारखे होते. जरा आपले आपणच धीर धरून समाजोपयोगी कामे प्रत्येकी वर्षातून एक दिवस तरी करण्याचा ध्यास किती जणांनी घेतला असेल ते एक देवच जाणे. परगावहून आलेल्या हजारो लोकांपैकी सरळ (आपल्याच) घरी कितीजण गेले असतील याबद्दल मला शंका आहे. परगावहून स्वत:चे किंवा शाखेचे किती पैसे खर्च करून मंडळी तिथे आली कारण या पै न् पैचा हिशोब देण्याचे बंधन नसण्याची शक्यता जास्त आहे.
अमिताभ बच्चन किंवा आणखी कोणी जाहीर दु:ख व्यक्त का केले याबद्दल मी वेगळे बोलायला नको. मातोश्रीवर असंख्य लोकांची भेटण्यासाठी रिघ लागली असे वाचनात येत होते. किती सामान्य कार्यकर्त्यांना प्रवेश मिळाला आणि किती बच्चन, खन्ना टाईप लोकांना प्रवेश मिळाला असेल (सुरक्षा व्यवस्थेची कल्पना आहे)? जाउ दे! मी हे फॉलो करण्याचे कारण म्हणजे दंगल, वाहतुक बंद असले काही आहे की काय हे तपासायला, कारण माझे आईवडील व सासूसासरे नेमके त्याच दिवशी प्रवासात असणार होते म्हणून. बाकी काही नाही.
(आता मला पोलीसमामा पकडून नेतील की काय अशी भीती वाटत असताना हा प्रतिसाद देतीये, विकासदादा, आता माझ्या धाग्यावर तुमचे दोन प्रतिसाद लागू झाले.)
21 Nov 2012 - 9:33 am | स्पा
आज्जे
प्रचंड अनुमोदन ग
खूपच संयत प्रतिसाद
21 Nov 2012 - 11:26 am | सर्वसाक्षी
रेवतीताई,
कुणाच्या दर्शनाला जाउन वेळ, श्रम व पैसा यांचा अपव्यय करण्यापेक्षा आणि सामाजिक व्यवस्थेवर ताण देण्यापेक्षा आहेत तिथुन हात जोडणे व आपले काम चोख बजावुन आदर वा भक्ति व्यक्त करणे अधिक योग्य या आपल्या विचाराशी मी तत्वतः पूर्ण सहमत आहे. मात्र प्रत्यक्षात असे होते का?
लाखो लोक तिरुपती, शिर्डी, मक्का - मदिना वगैरे ठिकाणी का जातात?
लाखो लोक दरवर्षी ६ डिसेंबरला कष्ट सोसुनही चैत्यभूमीवर का येतात?
ऐपत नसतानाही असंख्य लोक गणपतीच्या सणाला खर्च करतात, भान विसरुन मिरवणुकीत नाचतात, ते का?
कुणाला भेटायला जाताना आपण रिकाम्या हाताने न जाता पुष्पगुच्छ का नेतो? घेणारा तो बाजुला ठेवतो आणि धन होते फुलविक्रेत्याचे! मग आपण असे का करतो?
घरापासून दूर राहणारी मुले आई वडीलांना पैसे पाठवतात, उत्तम जागा घेऊन देतात, स्काईपवर भेटतातही, मग प्रत्यक्ष घरी जाण्यात वेळ व पैसा का वाया घालवितात?
या सर्वांचे उत्तर म्हणजे भावनिक गरज! सदासर्वदा केवळ व्यावहारिक वर्तन करणे शक्य नसते. दर्शन, सहभाग, भेटवस्तू, प्रत्यक्ष भेट ही माणसाची भावनिक गरज आहे. मानसशास्त्रिय दृष्टिकोनातुन भावनिक गरज महत्त्वाची आहे. वेळ, पैसा, कष्ट या भौतिक गोष्टींपेक्षा पेक्षा माणसाला मानसिक समाधान अधिक महत्त्वाचे असते. एखादा गरीब माणुस जेव्हा गणपतीच्या मिरवणुकीत बेभान होऊन गुला उधळत नाचतो तेव्हा त्याने त्याची दु:खे संपणार नसतात मात्र त्या क्षणी तो अत्यंतिक समाधानी असतो आणि आपली चिंता विसरलेला असतो. जन्माला येणारा प्रत्येक जण कधी ना कधी जाणारच असतो आणि पोचवायला ४+१ = ५ पुरेसे असतात, मग लोक कुणी गेल्यावर सर्व आप्तेष्टांना, स्नेहींना का कळवतात? दूरचे नातेवाईक येइपर्यंत सर्वांचा खोळंबा करुनही अंत्यसंस्कारासाठी का थांबतात? जाणारा गेला आहे, तो कधी ना कधी जाणार होता हे दूर असलेल्या नातेवाईकांना ठाउक असते, ते आल्याने मेलेला जिवंत होणार नाही हे ही ठाउक असते, गेलेल्या माणसाचे फोटो वा व्हिडीओ उपलब्ध असतातच, मग लोक अंत्यदर्शनाला का येतात? कुणीतरी गेले आणि आपल्याला शेवटची भेट झाली नाही याची खंत माणुस जन्मभर का वागवतो? मतिमंद मुल आई का वाढवते? त्याला मरु देणे अधिक व्यावहारीक असते ना! माणुस सोडा, जुनी झालेली पण वडीलांनी घेउन दिलेली स्कूटर माणुस डब्बा झाल्यावरही भंगारात न देता त्यावर खर्च करुन चालवायचा अट्टाहास का करतो?
रेवतीताई, सगळीकडे केवळ व्यवहार पाहुन चालत नाही, भावनाही विचारात घ्याव्या लागतात.
21 Nov 2012 - 11:40 am | श्रीरंग_जोशी
या प्रति-प्रतिसादातला संदेश मनापासून पटला...
21 Nov 2012 - 11:45 am | आनन्दा
+१
21 Nov 2012 - 11:56 am | मी_आहे_ना
+१
21 Nov 2012 - 11:58 am | खबो जाप
+१
अगदी मनातलं बोललात भाऊ
21 Nov 2012 - 1:41 pm | गणपा
छ्या या आज्जीनं आणि साक्षीदेवानं पार बेंबट्या करुन टाकलाय आमचा. :(
21 Nov 2012 - 3:04 pm | अमृत
मनातलं बोललात काका...
21 Nov 2012 - 3:36 pm | सोत्रि
अगदी सहमत...
- (भावनिक) सोकाजी
21 Nov 2012 - 8:35 pm | रेवती
साक्षीदेवा, मी सांगितलेले आणि तुमचे म्हणणे दोन्ही बरोबर कसे आहे याचे पुरावे आपण दोघेही देऊ शकू. कारण दोन्ही बरोबर आहे पण वेळ, काळ, स्थान हेही पहायला हवे. देवदर्शन, आईने व्यंग असलेल्या मुलांना वाढवणे, नातेवाईकांचे अंत्यदर्शन, या प्रत्येकावर वेगळा धागा होऊ शकेल आणि त्यावर दोन्ही बाजूने जे म्हणणे असेल ते तेवढेच बरोबर असेल. मग यातली पुसट रेषा कुठेतरी असायला हवी. ओळखायला हवी ती कोणती? भावनेला यावेळी महत्व दिले ते बरोबरच वाटते. लखो लोकांचा पिता असल्याची भावना असेल तर ते बरोबरच आहे पण यात चुकून जरी काही झाले तर आधीच भावनेला महापूर आलेला असताना हे कितपत परवडायचे? एकदोन ठिकाणी लोक रडताना दाखवले यात कोण आपल्या कोणत्या भावनांना कुठे वाट करून देतो. कोण क्षणभर विश्रांतीसाठी हे निमित्त साधतो, कोण घराबाहेर पडायला निमित्त बघतो असे आणि आपल्याला माहित नसलेले अनेक निमित्तांचे प्रकार असतील. कायम संवेदनशील समाज कितीसा चांगला? ठाकरे कुटुंबियांनाही किती ताण असेल असगळे नीट पार पडेपर्यंत!असो. यानिमित्ताने कसाबला एके ठिकाणहून दुसरीकडे हलवताना पथ्यावरच पडले म्हणावयाचे. असे निमित्त साधले का नाही हेही बरेचदा गुप्त राखले जाईल. बोलणे बरेही दिसणार नाही.
23 Nov 2012 - 2:32 pm | पप्पुपेजर
आवडला.
21 Nov 2012 - 1:59 pm | मानस्
+१
21 Nov 2012 - 3:53 pm | ५० फक्त
नक्की कुणाच्या बाजुनं उभं रहावं हेच समजत नाहीये, वर गणपा म्हणतात तसं बेंबट्या झालाय पार.
अवांतर - कुणीतरी काहीतरी हलकं फुलकं विनोदी लिहा रे, आज बेंबट्या झालाय, गोष्टी अशाच घडत राहिल्या तर आमचा सखाराम गटणे होईल एखाद दिवस.
21 Nov 2012 - 5:55 pm | बाळ सप्रे
दोन्ही मते पटली. दोन्ही प्रकारची माणसे असतात. फक्त भावनिक होउन जगताना भावनेचा अतिरेक होउ न देण्याइतपत आणि इतरांनाही भावना असतात हे जाणण्याइतपत व्यवहारी नक्की असावे.
21 Nov 2012 - 6:55 pm | तिमा
21 Nov 2012 - 7:14 pm | तिमा
असे धागे काढण्याची ही वेळ नव्हे हेही पुन्हा उद्धव ने सांगायला पाहिजे का ? संयम ठेवायला शिका.
22 Nov 2012 - 4:15 pm | श्री गावसेना प्रमुख
संयम ठेवा हो (हे सुद्धा तिरशिंगरावांनी सांगावे का)
22 Nov 2012 - 4:00 pm | नाखु
तुम्ही त्यांचा द्वेष करु शकता किंवा प्रेम (आदर) करु शकता पण त्यांना टाळू (वगळू ) शकत नाही ईतके मान्य केले हिच माफक अपेक्शा...
23 Nov 2012 - 1:13 am | अभिज्ञ
लेखातील सर्वच मतांशी पुर्णत: सहमत आहे. सर्वसाक्षी ह्यांनी दिलेला प्रतिसाद सुध्दा आवडला.
एखादी प्रसिध्द व लोकप्रिय व्यक्ती निधन पावल्यानंतर तिच्या प्रशंसकांनी व समर्थकांनी गोंधळ घालणे हि घटना भारताला नवी नाहीच. अशा घटना घडल्यानंतर शोकाकुल जमावाची प्रतिक्रिया काय असु शकते ह्याबद्दल काहिहि अंदाज बांधणे कठीण असते.
जालावर फ़ेरफ़टका मारताना हा धागा वाचनात आला.
http://m.firstpost.com/bollywood/indiaterrible-place-for-celebrities-to-...
प्रसिध्द कन्नड अभिनेते व सर्व कन्नडिगांना आपले तारणहार वाटणारे श्री.डो.राजकुमार ह्यांच्या निधनाने बंगळुरात काय परिस्थिती निर्माण झाली होती? जाळपोळ, दंगली, लाठीमार, २३ जणांचा बळी ..वगैरे वगैरे हे सर्व अंत्यसंस्काराच्या दरम्यान घडले होते. डो.राजकुमार हे तर फ़क्त अभिनेते होते व राजकारणाशी संबधित नव्हते. तरी देखील ही अवस्था.
ह्या उपर विख्यात तमिळ अभिनेते/ नेते MGR ह्यांचे निधन झाल्यावर चेन्नईत अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली होती,
ह्या लेखात ह्याचे वर्णन असे आहे..
But nothing could match the 'grief' when Tamil Nadu's filmstar-turned-politician MG Ramachandran died --- of natural causes. Says Puratchithalaivar.org "His death sparked off an inexplicable frenzy of looting and rioting all over the state of Tamil Nadu. Shops, movie theaters, buses and other public and private property became the target of wanton violence let loose all over the state. The situation became so hopeless that the police had to resort issuing shoot-at-sight orders, something seldom seen or heard of in democratic India.
सर्व पार्श्वभुमीवर मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान महाराष्टियन जनतेने दाखवलेला संयम, पोलिसांनी हाताळलेली परिस्थिती, निश्चितच कौतुकास पात्र आहेत.
महत्वाचे म्हणजे इतर वेळा बाळासाहेबांवर सतत भुंकत राहणा-या हिंदी मिडियाने बाळगलेला संयम जास्त महत्वाचा.
हिंदी माध्यमांच्या बालिश व भडकावू विधानाने २० लक्ष लोकांच्या उपस्थितीत मुंबैत देखील अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असती. सुदैवाने तसे काहि घडले नाही हिच समाधानाची बाब म्हणावी लागेल.