ड्रायफ्रूट बर्फी

बहुगुणी's picture
बहुगुणी in पाककृती
23 Sep 2012 - 6:18 am

भारतात घरी महालक्ष्मी पूजेनिमित्त गोडाधोडाच्या जेवणाचा घाट घातलेला असतांना सासूबाईंना इथे मी आणि नातू परदेशात एकटे आहोत याचं वाईट वाटत होतं. "उद्या शनिवार आहे, निदान काहीतरी गोड कर, साधा शिरा केलास तरी चालेल, पण पोराच्या आणि तुझ्या पोटात काहीतरी गोड जाऊ देत!" म्हणाल्या.

'बरं' म्हंटलं, आणि शिरा सोडून आपल्याला झेपेल असं गोड काय करता येईल यासाठी घरात काय आहे ते शोधायला लागलो. खारीक, बदाम आणि कंडेन्स्ड मिल्कचा डबा सापडला.

मग, इथे 'मिसळपाव'वरच पूर्वी कधीतरी वाचलेली बर्फीची पाककृती आठवली, कुणाची होती ते नक्की आठवत नाही (बहुधा सानिकाताईंची असेल), त्यात वापरलेले बाकी घटक देखील नेमके आठवत नाहीत, पण साधारण कृती आठवत होती आणि सोपी होती असं लक्षात होतं, म्हणून मी हा 'उद्योग' केला आहे. तो पर-प्रकाशित आहे हे ऋण मान्य करतो.

साहित्यः

२०० ग्रॅम खोबर्‍याचा कीस (फ्लेक्स)
१०० ग्रॅम ब्रेड क्रम्ब्ज
१० ग्रॅम अनसॉल्टेड बटर
१०० ग्रॅम चारोळ्या
२०० ग्रॅम बिया काढलेली खारीक (बारीक तुकडे करून)
२०० ग्रॅम चॉकोलेट चिप्स
१०० ग्रॅम बदाम काप
८ औंस (~२४० ml) कंडेन्स्ड मिल्क

कृती:

आधी ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाईट तापमानाला तापवून घेतला. त्यात १३" X ९" काचेचा बेकिंग ट्रे ५ मिनिटे ठेवून बाहेर काढला आणि त्याला आतून अनसॉल्टेड बटर लावून घेतलं. त्यावर ब्रेड क्रंब्जचा थर देऊन घेतला. यानंतर क्रमाक्रमाने चारोळ्या, चॉकोलेट चिप्स आणि बदाम काप यांचे थर केले. यावर अर्धे कंडेन्स्ड मिल्क ओतून एक थर केला. त्यावर खोबर्‍याचा कीस, पुन्हा एकदा (उरलेलं) कंडेन्स्ड मिल्क घातलं, शेवटी खारकेचे बारीक तुकडे घालून एक थर केला. हे सर्व असलेला ट्रे ओव्हन मध्ये ३० मिनिटे ठेवला आणि बेक केला.

३० मिनिटांनी बाहेर काढून, पूर्ण गार झाल्यावर त्या बर्फीचे साधारण चौकोनी तुकडे केले (करण्याचा प्रयत्न केला :-). एकंदरीत 'बर्फीचा प्रयत्न चांगला जमला' असं मुलाने चव घेऊन सांगितलं. म्हंटलं करावी कृती इथे पेश, आणि त्या अनामिक मूळ कलाकाराला श्रेय आणि धन्यवाद द्यावेत!

प्रतिक्रिया

रेवती's picture

23 Sep 2012 - 7:36 am | रेवती

चांगला प्रयत्न आहे.
मला वाटतं स्वाती२ ताईने ग्रानोलाची पाकृ खूप पूर्वी दिली होती ती आठवत असेल तुम्हाला.
पाकृ पर - प्रकाशित असल्याच्या उल्लेखाने हसू आले.

पैसा's picture

23 Sep 2012 - 9:34 am | पैसा

बर्फी आहे का काय देव जाणे, पण घटक बघता चांगलं लागलं असणार हे नक्की!

सस्नेह's picture

23 Sep 2012 - 5:30 pm | सस्नेह

फोटोपेक्षा घटकांची नावे वाचूनच चव छान असणार असे वाटते.
बेळगाव साइडला कर्दंट मिळतं ते असं दिसतं.

बहुगुणी's picture

23 Sep 2012 - 10:47 am | बहुगुणी

नोंद घेतल्याबद्दल रेवतीताई आणि पैसाताईंचे आभार. मला आठवत असलेली पाककृती सानिकाताईंचीच होती (किंबहुना त्यांचं इथलं ते पहिलं लिखाण होतं असं दिसतं!) मी आठवणीतून केलेली असल्याने काही फरक आहेत (क्रॅकर्सच्या चुर्‍याऐवजी मी ब्रेड क्रम्ब्ज वापरले), पण ढोबळ मानाने माझी स्मरणशक्ती बरी होती म्हणायची! आणि त्यांनीही याला बर्फी किंवा बार म्हंटलं होतं. एकंदरीत consistency पाहता ते ग्रॅनोला बार सारखं लागतं. मी केलेल्या प्रमाणात एकूण २० वड्या झाल्या (निम्म्या संपल्याही!)

सानिकास्वप्निल's picture

23 Sep 2012 - 2:49 pm | सानिकास्वप्निल

बर्फी / बार छान दिसत आहे
तुम्ही म्हणतात त्या सानिका पटवर्धन आहे , त्यांनी ७ लेयर्स बार ची पाकृ दिली होती :)

न्यूट्रीबार म्हणा न्यूट्रीबार!
मस्तयत एकदम!
(बघायला) आवडले.

यशोधरा's picture

24 Sep 2012 - 8:27 am | यशोधरा

करदंटाची आठवण झाली. :)
कोणीतरी हे करुन खायला घाला रे!