पहिला भाग येथे वाचू शकता.
http://www.misalpav.com/node/22190
दरड कोसळणे आणी थोडा निवांतपणा म्हणुन जोशीमठला जवळपास संध्याकाळी ४ ला पोहोचलो. चालकाने आम्हाला ऑफर दिली कि थोडे जादा पैसे दिलेतर तो दुसर्यादिवशी आम्हाला बद्रीनाथ अन माणा इथे घेवुन जाईल. १५०० ज्यादा एका दिवसाचे मागत होता. आम्ही पण तयार झालो. त्या दिवशी सायंकाळी आम्ही जोशीमठमध्ये फिरत होतो.
जोशीमठ (जोर्तीमठ) 9000 ft
शंकरार्चायांनी वसवलेल्या मठापैकी एक, पण औली, बद्रीनाथ किंवा हेमकुंडाच्या रस्त्यावरील मुक्कामाचे ठिकाण जसे महाबळेश्वर शेजारी वाई. निवास अन वाहतूक मुख्य उद्योग. छोटेसे पण टुमदार गाव... तसेच डोंगराच्या उतारावर असल्यामुळे गावात फिरताना सुद्धा तीव्र उतार आहेत. रूममध्ये सामान ठेवुन आम्ही शंकराचार्यांनी वसवलेला मठ पहायला गेलो. आता मठाबददल तितकेसे आठवत पण नाही पण तिथे छोटीसी गुहा होती अन त्यात ध्यानस्थ बसण्यासाठी जागा होती. दोन मिनटे ध्यानस्थ बसल्यावर बरच शांत वाटल होते. बहुतेक फोटो काढायला परवानगी नव्हती म्हणुन माझ्याजवळ मठाचे फोटो नाहीत.
सकाळी उठल्यानंतर औलीला निघालो. सगळीकडे दाट धुके पसरले होते अन माइकल शुमाकर अल्टो चालवीत होते. सावकाश जाता येइल असं सांगितल्यावर गेट लागेल अस उत्तर मिळाले.
बाकी औली हे भारतातील स्कीइंग साठी प्रसिदध जागा आहे. औलीमध्ये असलेल्या उतारामुळे अन त्या वर पडणार्या बर्फामुळे भारतातले स्कीइंग प्रेमी तिथे डिसेंबर मध्ये जातात. पण आम्ही गेलो तेव्हा बर्फ नव्हता. आम्हाला रस्त्यात एक सफरचंदाचे झाड दिसले. गाडीतून उतरून बरेच फोटो अन २-४ सफरचंद सुदधा काढले. तिथुन परत आम्ही जोशीमठला आलो.
सफरचंदाचे झाड.
जोशीमठला बद्रीनाथच्या रस्त्यावर बरीच मोठी रांग दिसत होती मग गेट लग जायेगा चा अर्थ कळाला. ह्या भागातील रस्ते बरेच अरूंद असल्याने गेट पदधत वापरतात. ठरविक रस्ते फक्त एका बाजूच्या वाहतुकीसाठी वापरला जातो. ठरावीक वेळाने एका बाजूची वहाने आली की दुसर्या बाजूचा दरवाजा उघडा करतात. भारतीय सेना ह्या गोष्टीचे नियंत्रण करते. वहातुकीच्या नियत्रंणाबरोबर ह्यामुळे समोरून येणार्या वहानामुळे अपघात होत नाहीत अन समोरून वहाने नसल्याने ओलांडून जाण्याचे प्रमाण कमी होते. ह्या गेटमुळे स्थानिक रोजगाराला सुद्धा मदत होते, २-३ तास लोक शाल, जाजंम पहात होते अन खरेदी करत होते.
आता आम्ही गेट उघडण्याची वाट पहात होतो, अन चालकाने नरसिंह मंदिराबद्दल सांगितले. बसून रहाण्याऎवजी चला मंदीर पाहुन येऊ म्हणुन निघालो. मंदीर बरेच जुने पण सुंदर होते. येथील मंदीरे रंगवताना लाल, सोनेरी, निळा पिवळ्या रंगाचा सुरेख वापर करतात.
नरसिंह मंदिर
जवळपास एका तासाने गेट उघडले अन वहातूक चालू झाली. प्रवासात आम्ही लम्हा (संजय दत्त अन बिपशा बसु) सिनेमातील गाणी ऎकायचो. परत परत तीच गाणी ऎकायचो अन आजुबाजूला हिरवेगार पर्वत, खळखळ वहणाया नद्या, काय माहीती काय तरी जादू झाली. आज ही जेव्हा लम्हा मधील गाणी ऎकतो. डोळ्यासमोर तेच पर्वत, नदी, रस्ते हिरवळ दिसू लागते.
परत रस्ते, नदी अन..
एका गेटजवळ..
जवळपास दोन तासांनी आम्ही गोविंदघाटजवळ पोहोचलो. इथे आणी ऐक गेट लागते जिथे जवळपास तासभार वाट पहावी लागते. इथुन जवळूनच फूलदरील रस्ता जातो. जिथे आम्ही सायंकाळी परत येणार होतो. इथुन जवळच पांडवपठार आहे. असं म्हणतात कि पांडवांचा जन्म इथेच झाला पण आम्ही तेथे जाणार नव्हतो. आम्ही बद्रीनाथला जाणार्या गेट उघडण्याची वाट पहात होतो. तेवढ्यात मराठी आवाज ऐकू आले. चार पाच माणसे रिटायरमेंट साजरी करण्यासाठी चारधाम यात्रेसाठी बद्रीनाथला चालली होती. मग तुम्ही कुठले आम्ही कुठले पासून ज्या चर्चा चालू झाल्या त्या उत्तराखंडचे चालक अन महाराष्ट्रातले चालक इथपर्यंत आल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापूरातुन निघालेला चालक स्टेरींगवरचा हाथ फक्त १० अंश दोन्ही बाजूला वळवतो अन वेग वाढवत कमी करत रहातो,अन मुंबईला पोहोचतो. जोडीला चालकाचा अभिनय करून दाखवित होते अन त्यांना दाद देण्यात अन हसण्यात आमचा तास कसा गेला कळालाच नाही. त्यानंतर गेट उघडल्यानंतर आमचा प्रवास बद्रीनाथकडे चालू झाला. आता मी मागे बसलो होतो अन प्रत्येक वळणाला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकत होता. गाडीचे चाक दरीत आहे की रस्त्यावर आहे कळत नव्हते. थोडया अंतरावर चालकाने रस्त्याशेजारी गिधाडे दाखविली, जवळपास २ ते ३ फूट उंच गिधाडे होती. जरा त्यांनी मान वर केली असती तर अल्टोच्या खिडकीतुन आत आली असती. भीती वाटली पण फोटो काढले. चारधामची यात्रा पायी करणारे बरेच साधु भाविक रस्त्यात दिसत होते.
गिधाडे...
साधु, पायी यात्रा करणारे भाविक..
माणा
दूरवर आता बद्रिनाथ दिसू लागले होते. ढगांनी बद्रीनाथवर मस्त चादर पांघरली होती. दुपारी मंदीर बंद असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा माणा ह्या गावाकडे वळविला. माणामधुन भारतीय सेनेसाठी सीमेवर जाण्यासाठी खास रस्ता आहे. माणा भारत अन चीन सीमेवरील शेवटचे गाव आहे त्याहून सुद्धा हे गाव पौरणीक महत्वाचे आहे. असं म्हणतात की पांडव त्यांच्यी शेवटची स्वर्गारोहण यात्रा येथुनच चालू केली. ज्यावेळी नदी ओलांडताना प्रवाहाच्या वेगामुळे पार करता येत नव्हती तेव्हा भीमाने एक शिळा उचलून ठेवली अन सर्वांनी नदी पार केली. तीच शिळा आज ही तेथे दाखवतात. तसेच व्यासांनी अन गणपतीने महाभारत ह्याच गावात लिहले हे दाखविणारी व्यास गुहा अन गणपती मंदीर पण आहे.
आता वर्तमान काळ, स्वर्गारोहण म्हणुन जी वाट आहे तो एक सुंदर ट्रेक आहे. ह्याच्या शेवटी नदी पर्वतावरून विखरून पडते ती जागा सहस्त्रधारा म्हणुन प्रसिदध आहे. मध्ये रस्त्यात एक सुंदर तलाव आहे. वेळेअभावी आम्हाला हा ट्रेक करता आला नाही. तसेच बद्रिनाथ, माणा हे काय प्लान मध्ये नव्हतेच. पण परत कधी बद्रीनाथला गेलो तर सहस्त्रधाराला नक्की जाईन. मध्यंतरी आज तक का आनी कोणीतरी पांडवाच्या स्वर्गाची वाट शोधली होती. त्यांच्या पदधतीने, जस की पांडवाना यमाने कुत्रा बनून साथ दिली होती तसेच ह्यांच्या बरोबर पण एक कुत्रा रस्ता संपेपर्यंत होता म्हणे. कमेर्याचे फोकस अन पांडवांच्या झालेल्या हालाचे वर्णन इतके भयानक होते की मी स्वर्गाला जाणार्या पायर्या पाहुच शकलो नाही ज्यांची जाहिरात सबंध कार्यक्रमभर चालु होती.
माणा गांव
भीमाची शिळा
स्वर्गारोहण वाट
माणातील आजी
व्यास गुहा...महाभारत लिहलेली जागा...
पण ह्या गावतील दुकाने त्यांची जाहिरात भारतातील शेवटचे दुकान म्हणुन करतात. बरेच प्रवासी भारताच्या शेवटच्या दुकानतील वस्तु आठवण म्हणुन घेतात. असाच एकजण वस्तु घ्या म्हणुन मागे लागल्यावर सागर म्हणाला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडीयावरून घेऊ कारण ते सुद्धा भारतातील शेवटची ठिकाण आहे. पण माणा मधील दुकानांच्या आगळ्या जहिरातीला दाद देत आम्ही बद्रीनाथला निघालो. एव्हाना मंदीर उघडलेले होते.
भारतातील शेवटची दुकान...
बद्रिनाथ 10248 ft
चारधाम मधील हे एकच असे मंदीर आहे ज्यात भगवान कृष्णाची मुर्ती आहे बाकी इतर तीन ठिकाणी भगवान शंकरांची. आख्यायिका अशी आहे की हे सुद्धा शंकरचे मंदीर होते. शंकर अन पार्वती एकदा ह्या मंदीरात बसले असताना पार्वतीला बर्फामध्ये खेळणारे लहान मूल दिसते. ते मूल घेऊन या म्हणुन ती शंकराजवळ हट्ट धरते. स्त्रीहट्टच तो, देव सुदधा बळी पडला (राम सुद्धा). लहान मुलाला घेण्यासाठी जसे शंकर अन पार्वती मंदीराबाहेर आले तसा विष्णुंनी मंदीरात प्रवेश केला अन दार लावले. मग भगवान शंकरानी ते मंदीर सोडून हिमालयात निघून गेले.
अशाप्रकारे आता तेथे भगवान कृष्णाची पूजा होते. हिवाळ्यातील काही महिने ती मुर्ती जोशीमठला आणतात अन बर्फ वितळू लागला की ती परत बद्रीनाथला नेतात. मंदीराजवळ गरम पाण्याचे कुंड आहेत. दुपारी सुदधा जिथे थंडी वाजत होती तेव्हा गरम पाण्याच्या कुंडातून वाफा येत होत्या. त्या पाण्यात पाय शेकून घेताना छान वाटत होते. दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी होती. मंदीराच्या दरवाज्याच्या थोडया ऊंचीवर एक घंटा आहे. पण ऊंच असल्यामुळे कोणाला ती वाजविता येत नव्हती. बरेच जण उडया मारत होते. सागरला मी म्हणालो आपण घंटा वाजवु. मी बाजुच्या खांबावर निम्म्यापर्यंत चढलो अन तेथून घंटेकडे उडी मारली अन जोरात घंटा वाजविली. ती ऎकून एकाने आरोळी दिली बोलो बद्रीबाबा की जय.
बद्रीनाथ..
गोविंदघाट 6000ft
आल्या मार्गाने परत आम्ही गोविंदघाटला आलो जेथुन आमचा फूलदरीकडे प्रवास दुसर्या दिवशी चालू होणार होता. गोविंदघाट हे एकाद्या बेस़कॅम्प सारखे आहे. जिथे एक गुरुद्वारा आहे. बरेच शीख भाविक, विदेशी प्रवासी, पर्वतारोहक अन आमच्या सारखे (हौशी, गवशी, नवशी) तेथे जमले होते. गोविंदघाट ते फूलदरी अन हेमकुंडच्या पायथ्याशी असणारे घांघरिया येथुन १५ किमी वर आहे. होटेलमध्ये सामान ठेऊन आम्ही फिरायला निघालो. शीख धर्मातील वस्तू विकणारी बरीच दुकाने होती तसेच रेनकोट काटया विकणारी दुकाने पण आहेत.
गोविंदघाट
नदीकाठी आम्ही आमच्या जागा पकडून बसलो. गुरुद्वाराजवळ येणार्या जाणार्या लोकांची गडबड होती. बाजूने घुं घुं असा आवाज करीत नदी वहात होती. हेमकुंड पायी येणार्या नातेवाईकाचे स्वागत करायला घोडयावरून पुढे आलेल्यांची गडबड चालू होती. घोडेवाले घोडयांना चारापाणी करून उद्याची भाडी ठरवत होते. आम्ही तिघे मात्र ज्यासाठी तीन महिने तयारी करून इथपर्यंत पोहोचलो होतो त्यासाठी एक रात्र वाट पहाणार होतो.
प्रतिक्रिया
8 Aug 2012 - 12:36 am | दशानन
खूपच सुंदर प्रवास वर्णन, माणाचा प्रवास जर गृहीत धरून गेला असता तर अजून काही सुंदर फोटो सर्वांना पहावायस मिळाले असते.
'फुलों की घाटी' च्या फोटोची आतुरतेने वाट पाहत आहे.
8 Aug 2012 - 8:59 am | प्रचेतस
सुरेख वर्णन आणि अतिशय सुंदर फोटो.
नरसिंह मंदिराजवळचे ते छोटे मंदिर तर थेट हेमाडपंथी शैलीचेच दिसते आहे.
8 Aug 2012 - 8:04 pm | चौकटराजा
हेमाडपंती शैलीची देवळे हिमाचल प्रदेशात सुदधा आहेत. मला वाटते जागेश्वर देवालय समूह त्यातील एक.
8 Aug 2012 - 9:24 pm | प्रचेतस
हेमाडपंथी मंदिर शैली तिकडे कशी काय गेली? की पेशव्यांच्या उत्तरेकडच्या स्वार्यांमध्ये ही मंदिरे बांधली गेली असावीत काय?
8 Aug 2012 - 7:57 pm | मेघवेडा
झकास. आवडले. पुभाप्र.
8 Aug 2012 - 8:14 pm | यशोधरा
माणामधे सुरेख धुर्या विणतात स्थानिक लोक. ते पाहिले की नाही? पाहता पाहता डिझाईन्स बनवतात.
सरस्वतीच्या उगमाच्या आसपास एक प्रकारची लालसर करवंदासारखी छोटी फळे येणारी झाडे असतात, त्यांची फळे चाखली की नाही?
सरस्वती, गंगामाई, पुष्पावती, अलकनंदा, मंदाकिनीचा अखंड नाद ऐकला की नाही? गरुडगंगेच्या पाण्यात हात घातला की नाही? हेमकुंडाला भेट दिली का?
नृसिंह मंदिरामागे आदिश्रीशंकराचार्यांचे जिथे वास्तव्य होते, ती जागा आहे. त्यांचे एक वस्त्र आहे (हे कितपत खरे ते ठाऊक नाही मात्र) ते पाहिले के नाही? तिथल्या भिंतींवरचा धर्मपीठांबद्दलचा इतिहास वाचला की नाही?
आणि इतक्या दूर तिथे ज्ञानोबामाऊलींचे पसायदानही पूजेमध्ये विराजमान आहे, त्या कागदाचे दर्शन घेऊन धन्य धन्य वाटले की नाही?
स्वर्गारोहिणी शिखर सरस्वती उगमापासून किती सुरेख दिसते ना?
गंगेचा अफाटपणा अनुभवला की नाही?
मी केलेल्या ह्या ट्रेकच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या, धन्यवाद ह्या धाग्यासाठी :)
8 Aug 2012 - 8:51 pm | मराठे
नरसिंह मंदिराच्या तिसर्या फोटोमधे त्याचं प्रवेशद्वार थोडं तिरकं दिसतंय..बहुधा भूकंप आणि वरच्या टेकडीच्या भारामुळे थोडं कललं असावं का?
8 Aug 2012 - 10:52 pm | सुनील
छान वर्णन आणि फोटो.
17 Aug 2012 - 1:53 pm | कृष्णकळी
लिखाणात बरीच सहजता आली आहे.... छान .. लिहित राहा.
17 Aug 2012 - 3:20 pm | bhaktipargaonkar
अतिशय सुन्दर लिहिले आहे ..छान वर्णन
असे आईकले आहे की या बद्रिनाथ मंदिरात एक दिवा लावलेला आहे आणि तो दिवा मंदिर जेव्हा बंद असते तेव्हा पण अहोरात्रा जळत असतो त्या दिव्यात कोणी तेल पण टाकंत नाही..कारण मंदिरात जायची परवानगी कोणालाच नसते..कोणास माहिती आहे का या बद्दल ?
17 Aug 2012 - 8:22 pm | पैसा
छान प्रवासवर्णन आणि फोटो. पांडवांचं स्वर्गारोहण खरं की खोटं देवजाणे, पण स्वर्गारोहणाची वाट असलेला फोटो पाहताना काही वेगळंच वाटलं.