अशी कधी वेळ आली आहे का? ५ वाजताची रेल्वे.. ४ तिकिटे.. रागात धुमसणारा एक मित्र... एकाचा फोन लागत नाहीये.. दोन जवळचे मित्र कलटी घेवुन मजा पहात बसलेत... तब्बल १० दिवसांची रजा टाकून आम्ही दोघे आता नक्की येतो म्हणनार्यांची वाट पहातोय. तेवढ्यात सागरचा फोन आला आणी शक्य तितके प्रेमांनी बोलून त्याला ऐरोलीला बोलवले. हा सागर फोन बंद करून प्रवासाची तयारी करत होता अन आमचा जीव टांगणीला लागला होता. शेवटी ३ वाजता मी, सागर अन सुजीतने ऐरोलीवरून गाडी पकडली आणी धावत पळत दिल्लीला जाणारा गरीब रथ पकडला. कारण काय तर फ़ूलो की घांटी अथवा Valley Of Flower म्हणुन ओळखल्या जाणाया उत्तराखंडमधील एका दरीत फिरायला जाणे. दोन महिन्याची तयारी, बर्याच भटकंती वाचून अन तिथे जाऊन आलेल्या दोघांशी बोलून ठरविले की फूलदरी मध्ये जायचे. वर्षातून ८ महिने बर्फाच्छादित अन फक्त ४ महिने फुलांनी बहरणारी उत्तराखंडातील फुलदरी म्हणजे राष्ट्रीय उद्यान तसेच UNESCO चे जागतीक वारसा स्थळ आहे. ह्याच फुलदरीजवळ शिखांचे पवित्र धर्मस्थान हेमकुंड साहीब आहे. त्यामुळे ह्या वेळेलाच बरेच शीख लोक ह्या पवित्र जागेला भेट देतात अन १७००० फूट ऊंचीवर असलेल्या पवित्र कुंडामध्ये स्नान करतात. ॠषीकेशहून बद्रीनाथला जाणार्या रस्त्यावरून जवळपास १५ किमी चालत जावे लागते.
गरीब रथातून दिल्लीकडे जाणारा प्रवास चालू झाला होता. गरीब रथामध्ये आमच्या बरोबर २ जागा असणारे नवीन लग्न झालेल जोडप होते. त्याना एकांत (न मागता) द्यावा म्हणुन आम्ही दोन डब्यांच्या मध्ये दरवाज्यात जाऊन बसलो. अन गप्पांना सुरूवात झाली. रेल्वेचा वेग किती असतो ही चर्चा चालू होती. सुजीत आणी सागर दरवाज्यातून पाय बाहेर सोडून बसले होते. मुबंई ते दिल्ली १४०७, गरीब रथ घेतो १६ तास... जवळपास ८० किमी प्रती तास... अन एका रेल्वे कर्मचार्याने आम्हाला पकडले. गरिब रथाचा वेग ताशी १५० किमी असे सांगीतले अन दरवाजा लावुन घेतला अन आम्हाला आमच्या जागेकडे हाकलले.
सकाळी हजरत निजामुद्दिनला पोहोचल्यावर शेजारच्या जोडप्याने व्यवस्थित रस्ता सांगितला. प्रवासाची तयारीची मी टिपणं काढली होती, ती मुंबई मध्ये विसरली होती. आता भरवसा सगळा मेंदूतील माहितीवर होता पण फुलदरीच्या इतक्या भटकंत्या वाचल्या होत्या की जणू सगळ काही पाठ होत. तेथुन टॅक्सी पकडून आम्ही बस स्थानकावर पोहोचलो. बसला वेळ होता म्हणुन थोडफार खाणं झाले. बस जवळपास दुपारी ऋषीकेशला (समुद्रसपाटीपसून उंची १२२० फूट) पोहोचली. हरीद्वारला परत जाताना थांबयचे असे ठरले होते. सायंकाळचा बेत होता लक्ष्मण झूला अन गंगानदीचा घाट. लक्ष्मण झूला गंगानदीवर असलेला झूलता पुल आहे. आम्ही पूलावरून गंगानदी पार केली. ह्यावेळेला बर्फ वितळून येणारे पाणी असल्यामुळे गंगानदीला बराच जोर असतो. मंदीरे पहाण्यात फारसा रस नव्हता. इकडे तिकडे भटकत राहीलो.
ऋषीकेश अन लक्ष्मण झूला...
संध्याकाळी जोशीमठला जाण्यसाठी गाडी ठरविण्यासाठी गेलो. तवेरा किंवा सुमोचा प्लान होता पण तिघेच असल्याने अन दुसर्यादिवशी गाडी हवी असल्याने त्याने अल्टो गाडी सुचविली. आम्ही १२२० फूटावरून १२००० फूटापर्यंत अल्टोने जाणार होतो. त्याला विचारले अल्टो जाऊ शकेल का तर गाडीवाला म्हणाला.. इधर तो यहीच चलता है.
रूमवर परत येऊन सागरला सांगितले की अल्टोने जायचे आहे तर त्याचा विश्वासच बसला नाही. सकाळी गाडी पहिल्यावर सुद्धा जराशी काळजी वाटली पण रस्ते पहिल्यावर नंतर वाटले बर झाले अन छोटी गाडी घेतली. साधारणतः ऋषीकेश ते जोशीमठ गाडीभाडे होते २५०० रू. पण बरेच तेथील खाजगी गाडया ( महिन्द्रा मॅक्स) ४०० रू प्रती व्यक्ती घेऊन जातात.
गंगानदीच्या काठाने आमचा प्रवास चालू झाला. ऋषीकेशहून बाहेर पडताच अर्ध्या तासातच आम्ही गाडी थांबविली आणी रस्त्याकडेला फोटो काढू लागलो. चालक लवकर निघण्याची घाई करत होता, पण आम्ही दुर्लक्ष करत होतो. त्याचा पहिला फटका आम्हाला तेथेच मिळाला. १० मिनीटांच्या प्रवासानंतर एका वहानाच्या रांगेजवळ गाडी थांबली. ५ मिनीटापुर्वी दरड कोसळल्यामुळे गाडया थांबल्या होत्या. आम्ही धावतच कोसळलेली दरड पहायला गेलो. जवळपास २०-३० मीटरचा रस्ता डोंगरावरून पडलेल्या दगड अन मातीच्या खाली बूजला होता. बर्याच ठिकाणी दगड आणी माती अजुन पडतच होते. आता सगळे BRO JCB ची वाट पहात होते. हिमालय हा मातीचा पर्वत आहे. त्यामुळे दरड कोसळने ही नेहमी घडणार्या घटना आहेत. बरेच शीख प्रवासी तिथे दिसत होते. तितक्यात शीख तरूणांचा एक जत्था मोटारसायकली वरून आला. त्यानी रस्ता पाहीला. गाडयाला लावलेली कुदळ अन फावडे घेऊन त्यांनी मोटारसायकली जातील इतकाच रस्ता बनविला अन निघून गेले. बरेच शीख तरुण मोटारसायकली घेऊन हेमकुंड या त्यांच्या पवित्र धर्मस्थळी जाताना दिसत होते.
कोसळलेली दरड
गंगेच्या किनारी बरेच आश्रम आहेत. तसाच एक आश्रम जवळच होता म्हणुन आम्ही तिकडे निघालो. राम मंदीर, त्यात पोथी वाचणारी बरेच लोक, बाजूला छोटी छोटी घर त्यात भगवी वस्त्र नेसलेले साधू, गर्द झाडी, बरीच माकडे असं आश्रमाचे स्वरूप होत. पोथी वाचणारे बहुतांश लोक राजस्थानी दिसत होते. एक रस्ता गंगेकिनारी जात होता. आयुष्यात प्रथमच गंगानदीच्या पाण्यात उतरणार होतो. मनात थोडासा अध्यात्मिक भाव कि काय दाटून आला होता. बहुतेक आश्रमाच्या वातावरणाचा आणि गंगेच्या किनायाचा प्रभाव असावा. बर्फ वितळून पाणी वहात असल्याने बरंच गढूळ होते. गंगेच्या पाण्याला जबरदस्त ओढ होती. किनारी बसलेल्याने सांभाळून असा सल्ला दिला. पाण्यातून बाहेर येताच किनारी बसलेल्या माणसाने आमची विचारपूस केली, मग आम्ही पण विचारपूस चालवली. हा राजस्थानी होता. या माणसाचा बराच मोठा उद्योग धंदा जयपूर जवळ होता. मुले उद्योग बघत असल्यामुळे वडिलमंडळीना १५ दिवसांसाठी पोथी वाचन करायला पाठीवले होते. आमच्या कामाबद्द्ल जाणून घेतल्यानंतर त्याने आम्हाला आम्ही काम करत असलेल्या उद्योगाला जर करखाना काढून हवा असेल तर राजस्थानात कारखाना काढून देण्याची तयारी दाखिवली. पण आम्ही संपुर्णपणे फिरण्याच्या मूड मध्ये होतो त्यामुळे हा हा ना ना करत तेथून निघालो. एव्हाना JCB ने आपले काम चालू केले होते अन रस्ता मोकळा केला जात होता. जोवर रस्ता साफ होत नव्हता सगळ्या गाडया शिस्तीने एकामागे एक उभ्या होत्या. नंतर सुद्धा घाई न करता एकच मार्ग पकडून निघून गेल्या. रस्ता साफ झाल्यानंतर आमचा प्रवास परत चालू झाला.
गंगानदी
जोशीमठ हे ऋषीकेश पासून २५०किमी आहे. सपुंर्ण रस्ता गंगा नदीच्या काठालगत जातो. प्रवासात पाण्याचा आवाज साथ देत असतो. कधी कधी आवाज एवढा मोठा असायचा की वाटायचे धबधबाच आहे. प्रवासात नदीचा आवाज कानात बसूनच गेला होता. गंगानदीला मध्ये रस्त्यात बयाच नद्या मिळतात. नद्याच्या संगमाला प्रयाग असे म्हणतात म्हणूनच बर्याच गावांची नावे प्रयागने शेवट असलेली आहेत. ऋषीकेश पासून रस्ता अश्याप्रकारे...
ऋषीकेश ते देवप्रयाग ७४ किमी
देवप्रयाग ते श्रीनगर ३४ किमी
श्रीनगर ते रूद्रप्रयाग ३३ किमी
रूद्रप्रयाग ते कर्णप्रयाग ३१ किमी
कर्णप्रयाग ते नंदप्रयाग २१ किमी
नंदप्रयाग ते चमोली १० किमी
चमोली ते जोशीमठ ४८ किमी.
श्रीनगर हे गाव अतिशय सुंदर आहे. मुख्य म्हणजे चार धाम यात्रेतील बरेच भाविक ह्याच रस्त्यावरुन बद्रिनाथ किंवा केदारनाथला जातात. येथील गावे पठारावर वसवलेली असतात अन बर्याचदा नदीपासून उंचीवर असतात. रस्त्यात बरेच शिख प्रवासी त्यांचा झेंडा दाखवून लोकांना थांबून जेवायला सांगत होते. बरेच शीख तरुण मोटारसायकली घेऊन हेमकुंड या त्यांच्या पवित्र धर्मस्थळी जाताना दिसत होते. ह्या मार्गातील बहुतेक मुख्य शहरामध्ये गुरूद्वारा आहे. तिथे शीख प्रवासी सेवा म्हणुन काम पण करतात अन रात्री मुक्काम पण करतात.तसेच बरेसचे साधू चालत जाताना दिसत होते. हे साधू पायी चारधामची यात्रा पूर्ण करत असतात.
प्रवासातील फोटो अन प्रयाग
कर्णप्रयाग मधील पूल कोसळ्याची बातमी परवाच वर्तमानपत्रात वाचली. दरड कोसळने, वाहनावरील ताबा जाणे अथवा समोरून येणाया वाहनाचे धडक चुकवण्याच्या वेळी ह्या रस्त्यावर बरेच अपघात होतात आणि वहाने दरीतील नदीतून वाहून जातात. चालक चांगला होता, अपघातविषयी अभावानेच बोलत होता. १- २ अपघताच्या जागा दाखविल्या इतकचं. नाहीतर बराच वेळ ऋषीकेश मधल्या जिल्ह्याबदद्ल, चार धाम रस्त्याबददल, बोलीभाषेबददल बोलत होता. रस्त्यामध्ये चालकाच्या पाहुण्याचे एक होटेल होते तेथे दुपारी खाण्यासाठी थांबलो. गेले दोन दिवस तंदूरी रोटी खावून कंटाळा आला होता मग तेथुन पुढे पराठा खाणं चालू केले.
ह्या भागातील नद्यांच्या पाण्याला चांगलाच वेग असतो. कोयनेसारखे पाणी अडवून विदयुत निर्मीतीला येथे मर्यादा असल्याने Run of the River तंत्रज्ञान वापरले आहे. ह्यामध्ये पाण्याच्या वेगाचा उपयोग जनित्र फिरवण्यासाठी केला जातो. ह्या मार्गामध्ये असे बरेचसे प्रकल्प आहेत.
मी अल्टोमध्ये चालकाशेजारी बसलो होतो. सुजीत अन सागर मागे बसले होते. दोघे थोडेसे घाबरलेले वाटले. का घाबरलेले ते मला बद्रिनाथच्या रस्त्याला समजले. जेव्हा जेव्हा गाडी U पिन वळणावरुन वळत होती तेव्हा तेव्हा त्यांना दरीचा तळ दिसायचा अन असं वाटायचे की एक चाक रस्त्यावरून खाली दरी जाते आहे. पण ह्या रस्त्यावरून प्रवास करणार्यांना हा अनुभव काही नवीन नाही.
BRO बोर्डर रोड ओर्गनाझेशन (भारतीय भूसेना अख्यारीत) ही संस्था इथल्या पूल आणि रस्त्याची बांधणी अन देखभाल करते. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तितक थोडं आहे. जबरदस्त उंचीवर, नैसर्गीक प्रतिकूल परस्थितीत रस्ते वाहतुकीयोग्य ठेवणे ही एक प्रकारचे युद्धच असावे जणु त्यांच्यासाठी.. बरेच रस्ते तर दगडातून कोरून काढलेले आहेत. रस्त्यातून प्रवास करताना त्यांच्या जिद्दीला अक्षरशः सलाम देत होतो.
रस्ते...ज्यांच्याबद्दल आजही आदरयुक्त भीती आहे...
नकाशा..आ.जां. साभार
भाग २- जोशीमठ, औली, बद्रिनाथ, मान.
भाग ३ - Valley of flower अन हेमकुंड साहिब... लिहित आहे..
मी कधीही हिमशिखर पाहिले नव्हते, चालकाला सांगितले होते की हिमशिखर दिसले कि गाडी थांबव म्हणुन... पहिल्यांदा हिमशिखर पाहिले तो क्षण अविस्मरणीय होता. माझ्या आयुष्यातील प्रथम हिमशिखर...
प्रतिक्रिया
7 Jul 2012 - 10:34 am | मृत्युन्जय
मस्तच. तिसर्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
पहिल्यांदा हिम्शिखरे दिसली तेव्हा मीही असाच उल्हासित झालो होतो. पहिल्यांदा समुद्र बघितला तेव्हा सुद्धा. :)
9 Jul 2012 - 11:43 am | हरिप्रिया_
+१
लवकर पुढचे भाग टाका.
फुलदरी बद्दल खूप लहानपणी वाचल होत. तेव्हापासूनच खूप आकर्षण आहे त्याच.
7 Jul 2012 - 10:37 am | कुंदन
आवडले प्रवास वर्णन अन सगळे फोटो.
7 Jul 2012 - 10:37 am | कुंदन
आवडले प्रवास वर्णन अन सगळे फोटो.
7 Jul 2012 - 11:28 am | ५० फक्त
बाकी फोटो उत्तम. लिखाण छान वगैरे सगळं समजुन घ्या,
पण ते रस्त्याचे फोटो का टाकता ओ, आता चार दिवस घरी झोपेत स्वप्नात असले रस्ते आणि त्यावरुन जाणारा मी हेच येत राहतं..
7 Jul 2012 - 11:47 am | मुक्त विहारि
छान प्रवास वर्णन
7 Jul 2012 - 3:51 pm | गोंधळी
छान.
बाकी ह्या भागांमधे गाडीतून फिरणे म्हणजे एक थरारक अनुभव अस्तो.
.
7 Jul 2012 - 6:03 pm | मन१
जायलाच हवं.
7 Jul 2012 - 6:49 pm | सुनील
फोटो.
10 Jul 2012 - 7:04 am | स्पंदना
भन्नाट फोटोज!
कसे काढले असतील देव जाणे. असाच एक मनिकरण घाट पण आहे ना? घरात्ले तिथे जाउन आले, ते पण रस्त्याबद्दलच बोलत होते.
अरे हो वर्णन्...छान.
10 Jul 2012 - 8:34 am | प्रचेतस
अतिशय सुंदर आहे हे सर्व.
एकदा तरी जायलाच हवे.
10 Jul 2012 - 8:56 am | सुकामेवा
छान प्रवास वर्णन मला पण माझ्या चारधाम सहलीची आठवण झाली.
11 Jul 2012 - 11:29 am | शिल्पा ब
एक्दम भारी!!
रस्ते तर खुप डेंजरस वाटताहेत. पुढचे भाग पण अशाच फोटोंबरोबर येउ दया.
20 Jul 2012 - 11:50 am | कृष्णकळी
छान लिहिलंय,,,
फोटो पाहताना आम्हालाही रस्त्यांनविषयी आदरयुक्त, भीती वाटली रे ..
हिमशिखरचा फोटो जबरदस्त सुंदर आहे !!!!!!!!
20 Jul 2012 - 12:14 pm | जागु
सुंदर.
20 Jul 2012 - 12:55 pm | बॅटमॅन
आईची जै!!!!!ते घाटाचे फोटो पाहून **ली एकदम.