आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/22135
" खिळ्या परी नाल गेली.
नालेपरी स्वार गेला
स्वारा परी राज्य गेले
एव्हढा अनर्थ "खिळ्याने" केला"
ही , म्हण किंवा कविता, जे काही असेल ते, वाचले असेलच. आपण जिथे काम करतो, तिथे पण वरचे अधिकारी , मनांत हे विचार घोळवतच निर्णय घेत असतात.मी मुलांच्या बाबतीत हे धोरण अवलंबले आणि फायदा पण झाला.
इथे मी, एक चौकट आखून घेतली. माझ्या मते, परंपरा आणि विधी वेगळे... संस्कार वेगळे... बारसे, लग्न हे विधी आहेत.तर मुलांना वाचनाची गोडी लावणे, कष्टाची सवय असणे, " अरे" ला , "का रे" असे उत्तर देणे,वेळेवरती सगळी कामे करणे, हे संस्कार आहेत.
लहानपणी, मुले ज्या चुका करतात, त्याच थोड्या प्रमाणांत माझ्या मुलांनी पण केल्या.दप्तर न आवरणे,उशीरा उठणे वगैरे घरोघरी असणार्या गोष्टी , माझ्या घरांत पण होत्या... पण आज नाही आहेत.
हे कसे शक्य झाले , ते थोडक्यात सांगतो. दोन्ही मुलांच्या वाढत्या वयात आम्ही घरडा कं.च्या कॉलनीत रहात होतो. (लोटे नावाचे एक खेडे गांव आहे तिथे)
========================================================
टि.व्ही. मालिका बघणे बंद केल्यामुळे, वेळ भरपूर मिळायला लागला , पण , टि.व्ही. बघायची सवय काही जात न्हवती.तिथे मग शोध लागला " डिस्कव्हरी आणि नॅशनल जियोग्राफिक" ह्या दोन चॅनल्सचा.ह्यात दाखवण्यात येणारे,
१. मेगा स्ट्रक्चर
२. सेकंड्स फ्रॉम डिझास्टर
३. एयर क्रॅश इनव्हेस्टिगेशन्स
४. हावू दे डू इट
हे भाग पाहून , मी कळत नकळत , ह्याचा आपल्या घरांत काही उपयोग करता येईल का, ह्याचा विचार करत होतोच आणि त्याच वेळी माझ्यातील "व्यवस्थापक" गूणालाही पैलू पाडत होतो. हे कार्यक्रम नसतील त्यावेळी वाचनालयात जावून पुस्तके आणत होतो."आज नाहीतर उद्या मला परदेशी जायचेच आहे" मग कशाला उद्याची बात असे पक्के ठरवून काही गोष्टी मनांत योजल्या.
माझ्या आई-वडीलांनी . माझ्यावर केलेल्या अनेक उत्तम संस्कारांपैकी एक संस्कार. त्यांनी कधीही हॉटेल मध्ये नेले नाही. संपूर्ण शालेय काळात , फक्त ३/४ वेळाच. पण दर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत , मुलांचे वाचनालय लावुन द्यायचे आणि खूप पुस्तके विकत घेवून द्यायचे. हॉटेलिंगचा खर्च ते पुस्तकांत परावर्तीत करायचे. वडील तर आज देखील, मालिका बघत नाहीत.वाचन मात्र अखंड चालू असते.रात्री जेवणे झाली. की , एकाच खोलीत, आम्ही सगळे वाचत बसलेले असायचो. अजून पण तेच करतो आणि पूढे पण तेच करत राहू.
त्यातच एक पुस्तक मिळाले "तुम्ही आणि तुमची मुले" (इथे मला जरा, माफ करा. "पुस्तक परीक्षण", हा माझा प्रांत नाही.)पण एकदा तरी हे पुस्तक चाळून बघा.पुस्तक विक्रेता, पुस्तक चाळायचे, पैसे घेत नाही.माझे उपाय हे कमी खर्चातले नाहीतर फूकट असतात.
लहान मुलाला , सभाधीट पणा , हा एक संस्कार शिकवायचा होता.एकदा आम्ही एका बाल-नाट्याला गेलो होतो. "काड्या-पेटीतला राक्षस" असे नांव होते.मोठ्या मुलाने, ते नाटक सुरू झाल्यावरच , सांगीतले, की त्याला हे नाटक आवडलेले नाही.
तर धाकटा , ते नाटक बघण्यांत रंगून गेला होता.त्याला त्यातील राक्षस आवडला.त्याला त्या राक्षसाला भेटायची इच्छा झाली.नाटक संपल्यावर , मी त्याला घेवून गेलो.त्या कलाकाराने, त्याला सगळा रंगमंच दाखवला.आपला मूखवटा , त्याला घालायला दिला.लहान मुलाचा "सभाधीट पणा" तिथून वाढायला लागला तर मोठ्या मुलाची आवड समजली.
जाहिरातींच्या अतिप्रमाणामुळे, टि.व्हि.वरील सिनेमा बघायचे प्रमाण बरेच कमी झाले होते.पण सिनेमा बघायची आवड होतीच.मोठ्या मुलाची आवड बघून, मग आम्ही त्यांना चांगले सिनेमे दाखवायला सूरुवात केली.इथे परत माझी अडचण झाली आहे.... मला सिनेमा परीक्षण येत नाही...
हनी आय श्रंक द किड्स
गॉड्स मस्ट बी क्रेझी (पार्ट १ आणि २) ... पार्ट २ जास्त भावला.. मला माझ्या मुलांसाठी काय केले पाहिजे, ते समजले..
वेट अंटील डार्क (वस्तू जागच्या जागी असतील , तर , एक आंधळी बाई पण लढा देवू शकते, हा गूण , मी त्यांना दाखवला)
श्रेक (ह्यावर चर्चा करतांना, कळत नकळत , रूप महत्वाचे नसते , तर गूण महत्वाचे, हा शोध त्यांचा त्यांनीच लावला)
सिनेमे बघितल्यावर त्यावर चर्चा करणे, विचार विनिमय करणे , इतरांच्या मताचा आदर करणे, आपले मत ठाम पणे मांडणे, हे पण संस्कार कळत नकळत झाले.ते पण हळूहळू मोकळे होत गेले.
इतर मुले करत असलेला हट्टी पणा बघून, नकाराची सवय लावली.आज मागीतलेली वस्तु २/३ दिवसांनी स्वतः होवून दिली. आपला "बाप" आज नाही तर उद्या तरी नक्की देइल , हा विश्वास पक्का झाल्या नंतर, हळूहळू नकार स्वीकारायची सवय लावली.
कूठल्याही धमक्या कधीच दिल्या नाहीत. हात तोडीन, पाय मोडीन, संडासात कोंडीन, वगैरे हिंसात्मक शब्द प्रयोग केले नाहीत.
खाण्या-पिण्याच्या वस्तू . भरपूर प्रमाणात आणल्या.उन्हाळ्यात फ्रीझ मध्ये आइस्क्रीम असेलच ह्याची खबरदारी घेत होतो.शहाळी १/२ कधी आणलीच नाही. १०-१२ अशीच आणली.अननस पण असेच ७/८ आणायचो.घरडा कं. असे पर्यंत एक पैसा कधी वाचवला नाही.मनसोक्त फटाके आणले.आंबे पण असेच भरपूर आणायचो.कधी ही मुलांनी इतर ठिकाणी हट्टी पणा केला नाही.इतर कुठल्या घरातील किंवा हॉटेल मधली डिश आवडली तर , आम्हाला सांगत होते.
जपानच्या प्रगतीवरचे एक पुस्तक वाचनांत आले.तिथे होत असलेला "वर्तमान पत्रांचा" खप बघून मी पण घरांत ५ पेपर चालू केले.सतत ३/४ वर्षे हा प्रयोग केला. आणि खूप फायदा झाला.वाचनालयांत जावून वाचायचा वेळ वाचला.मुलांना मी सतत दिसत होतो आणि ते पण सतत वाचत असतांना.
१. टाइम्स ऑफ इंडिया (माझे इंग्रजी ज्ञान वाढवायला आणि गल्फ मधील नौकरी साठी)
२. लोकसत्ता (वैचारीक खा खा)
३. नवाकाळ (आठवड्यात १/२ लेख बरे असायचे)
४. सकाळ (थोडे वैचारीक लेख)
५. म.टा. ( हा नंतर बंद करून टाकला... आज काल ह्याच्या कडे अजिबात बघत नाही.)
दर वर्षी काही पुस्तके खरेदी करत होतो.सेल लागला की, मुलांना घेवून जात होतो.ते पण त्यांची पुस्तके निवडत होते.त्यांना कशात गोडी आहे , हे त्यांच्या वागणूकीतून जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो.चिपळूणच्या नगरपालिकेच्या वाचनालयाचा शोध पण असाच लागला.ती पण लावली. एकाच वेळी घरात १०-१२ पुस्तके असायची.टेबला वर पेपरचा पसारा असायचा.मालिकांचे व्यसन कधी सूटले समजलेच नाही आणि माझ्यातील लहान मुल कधी बाहेर आले ते पण समजले नाही.पण मुलांना माझ्यातील हा बदल जाणवला असावा.ते माझ्या अधिक जवळ आले.
आपण पण तेच करत असतो हो.हजार माणसांच्या कं.त , दारू पिणार्यांचा ग्रूप वेगळा, तर पत्ते खेळणार्यांचा ग्रूप वेगळा.काल नविन आलेला मनूष्य पण आपल्या गुणाला साथ देणारे दूसर्या दिवशी शोधून काढतो.
जेवतांना शक्यतो टि.व्हि. लावयचा नाही. हा नियम मी आखला आणि तो पाळला पण... अगदी क्वचित हा नियम मोडला आणि तो पण मुलांच्या संमतीने.(फक्त "डिस्कव्हरी आणि नॅशनल जियोग्राफिक" साठीच हा नियम शिथिल केला होता) कं.त शिफ्ट ड्युटी असायची. मी जेवढ्या जमतील तेव्हढ्या नाईट शिफ्ट केल्या.दोन्ही जेवणे शक्यतो मुलांबरोबर केली.जेवण झाले की मनसोक्त गप्पा मारायचो.माझ्या चुका त्यांना सांगायचो.
असे बरेच प्रयोग केले.काही चूकले.काही चालू आहेत... पण हे शक्य झाले ते दोनच मूळ गोष्टींनी
१. वाचन
२. वेळेचे व्यवस्थापन
मुलांना वाढवतांना , एका बापाच्या , मुलांकडून काय अपेक्षा असतात , ते पण समजायला लागले. वडीलांबरोबरचे माझे वाद-विवाद, संवादाकडेच वळतील ह्याची खबरदारी घ्यायला लागलो.
प्रतिक्रिया
1 Jul 2012 - 8:35 pm | श्रीरंग_जोशी
हे सर्व वाचून खूप भारावल्यासारखे वाटत आहे.
माझ्या सुदैवाने मलाही लहानपणापासून वर्तमानपत्रे वाचण्याचा खूप छंद होता जो अजूनही तसाच आहे. काही कारणाने ठरवून चित्रपट बघणे हे महाविद्यालयीन आयुष्यातच होऊ शकले (कारण आमच्या वसतिगृहाचे लोकल एरिया नेटवर्क).
1 Jul 2012 - 10:04 pm | शुचि
खूप छान. हा भागदेखील आवडला.
2 Jul 2012 - 2:15 pm | प्रभाकर पेठकर
श्री. मुक्त विहारी साहेब,
आपल्या लेखातील सर्वच गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत.
'संस्कार' हा विषय गहन आहे. रुढी, परंपरांमधूनही संस्कार होत असतात. एखाद्या वस्तूमध्ये ज्या कुठल्याही प्रक्रियेने बदल घडून येतो त्या प्रक्रियेला संस्कार करणं म्हणतात. उदा. कच्च्या सोन्यावर संस्कार करून दागीने घडवितात. लोहार धातूंवर घणाचे घाव घालून त्याचा आकार (आपल्याला हवा तसा) बदलतो.
आई-वडिलांच्या (तसेच ज्येष्ठ नातेवाईकांच्या) उपदेशामृतातून, वाचनातून, शाळेत शिक्षणातून, शिक्षकांकडून, समाजाकडून, मित्र-मैत्रीणींकडून, टीव्ही-चित्रपटातून, निसर्गातून, पक्षी-प्राण्यांकडून कळत-नकळत आपल्यावर संस्कार होत असतात. त्यातूनच कच्च्या बुद्धीच्या बालकातून परीपक्व प्रौढ 'तयार' होत जातो. त्याला 'व्यक्तिमत्त्व' लाभतं.
आपण दिलेल्या खुपशा गोष्टी मीही माझ्या आयुष्यात माझ्या मुलाला घडविताना केल्या आहेत/अजूनही करीत आहे.
मुलांशी संवाद अत्यंत महत्त्वाचा. तो नेहमी उपदेशपर, तू लहान मी मोठा, तू मुलगा मी बाप असा नसावा. एक मित्र, सहृदय हितचिंतक, त्याला आवडणारा मार्गदर्शक अशा नात्याचा असावा.
आपली लेखमाला वाचतो आहे आणि ती आवडतेही आहे.
2 Jul 2012 - 4:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
मुवि,
आपले या विषयावरचे लिखाण मला वेगळा विचार करायला प्रवॄत्त करत आहे.
लेखमाला न कंटाळता पुर्ण करा ही विनंती.
2 Jul 2012 - 4:17 pm | ऋषिकेश
चारही भाग वाचले.
काही प्रश्न आहेतः (प्रश्न धागाकर्त्यांसाठी तर आहेतच पण इतर मिपाकरांनी त्यांची मते दिल्यास अधिक चांगले)
2 Jul 2012 - 7:13 pm | मुक्त विहारि
प्रथमतः हे प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद.. मला माझी भुमिका परत एकदा तपासून बघता आली.विशेषतः शेवटच्या प्रश्नामुळे.
१. घरात वागायचे नियम हे फक्त आई-वडील यांनीच चर्चा करून बनवावेत का? जसे तुम्हाला वाटले की मुलांनी टिव्ही बघु नये तर त्यांच्यावर अशी बंधने टाकण्यापूर्वी तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली होतीत का? अशी चर्चा करावी असे तुमचे मत आहे का?
हो... १९९८ ते २००० मी मालिका बघत होतो. २००० पासुन "डिस्कव्हरी आणि नॅ.जि." चालू केले. मुले ५ आणि ३ वयाची असल्याने , आम्ही जे दाखवू तेच बघत होती. सर्व लहान मुलांना, समुद्र, बोटी,विमाने आणि रणगाडे आवडतात. ह्याच गोष्टी बघून मला पण फायदा होत होताच. मग त्या विषयांवर चर्चा करत होतो. १/२ तास कार्टून बघू देत होतो. संध्याकाळी ६ वा. कॉलनीत खेळायला पण पाठवत होतो.६ ते ८ मुले खेळायची .८ ते ९ जेवण.९ ते १० हे दोन चॅनल आणि मग झोप.
२.आई वडील पुस्तके वाचत असतील तर मुलांनाही वाचनाची आवड लागते असे अनेकदा ऐकले आहे. मात्र माझ्यापरिचयातील खंद्या वाचकांच्या अपत्यांपैकी कोणालाही वाचनाची आवड नाही. तेव्हा आईवडील वाचत असतील तर मुलेही आपोआप वाचतात हे कितपत खरे असावे?
माझी मुले पुस्तके वाचत नाहीत. पण ते गूगल वर शोधून , माहिती काढून वाचतात.
इथे माझी भूमिका, ते ज्ञान मिळवत आहेत ना? मग झाले.अहो आता रिझल्ट पण ऑन-लाइन मिळतात.माध्यम बदलत आहे.कागदी पुस्तके जावून पी.डी.एफ. मध्ये येत आहेत.ज्ञान लालसा जाग्रुत करणे हे ध्येय होते.
३. मुलांना अभ्यासाची आवडच नसेल मात्र इतर कलागुणांत मुल हुशार असेल तरी अभ्यासाची सक्ती करावी का?
अजिबात करू नये.आता खूप वेगळे वेगळे मार्ग उपलब्ध झाले आहेत. ह्या मिपा वर तर एकापेक्षा एक अतिरथी-महारथी आहेत.तुमच्या मुलाला काय व्ह्यायची इछ्छा आहे, ते ठरवा आणि इथे टाका. मदत नक्की मिळेल.ही मला खात्री आहे.
४. मुल यशस्वी झालं हे कसं ठरवावं? म्हणजे नक्की कशात यशस्वी झालं की मुल यशस्वी झालं असं म्हणता येईल?
माझी भुमिका... तो जे काही करत आहे त्यात त्याला समाधान मिळत आहे ना? त्याला समाज मान्यता आहे ना? आपला मुलगा हे काम करत आहे, असे सांगतांना आम्हाला अभिमान वाटत आहे का? जर उत्तर हो असेल, तर त्याने समजोपयोगी कूठलेही काम करावे.
आमच्या डोंबिवलीत अशी खूप उदाहरणे आहेत... अमेरिकेत जाणारी पण आणि शिक्षण तसे असून पण , डॉ,अभय बंग, डॉ, प्रकाश आमटे, ह्यांच्या बरोबर समाज सेवी करणारी पण आहेत.
शेवटी समाधान कशात मानायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न.