मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?
नव्हतीस कधी तू माझी पण मी तुझाच होतो ना ?
"चल विसरुन जाऊ झाले-गेले, जगू नवे आता"
म्हटलेस तरीही गुरफटून मी उगाच होतो ना ?
तुज बरेच काही दिले सुखी करण्याला नशिबाने
पण मनात गुपचुप जपलेली मी व्यथाच होतो ना ?
मज वेडा मानुन सोडुन जा, हरकत नाही माझी
'तो' प्रेम तुझ्यावर करणारा मी खुळाच होतो ना?
माझ्या पायाशी हरून ही दुनिया लोळण घेवो
तू समोर माझ्या आल्यावर मी खुजाच होतो ना ?
तुला नेहमी तुझ्या घराची चौकट प्यारी होती
केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ?
....रसप....
११ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_12.html
प्रतिक्रिया
12 Jun 2012 - 12:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
नाही आवडली.
नुसताच शब्दखेळ वाटतोय.
12 Jun 2012 - 2:34 pm | अन्तर्यामी
मोठी हवी होती कविता.. :):)
14 Jun 2012 - 3:38 pm | चौकटराजा
अशी विरोधा भासी ... रचना ही गझ्ल या काव्य प्रकारात असावी लागते असे फार मागे कुठेतरी वाचले होते.
उदा ..
केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ?
त्या लेखातही या गर्दीत मी एकटा एकटा असे काहीतरी वाचल्यासारखे
आठवते.
मला आवडली बुवा ! ( सकारण) .कट पेस्ट प्रतिसाद नाहीये !