एका क्षणावरी या

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जे न देखे रवी...
24 May 2012 - 11:46 am

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा... १

फकिरीवरी फिदा तू मज ओढ चांदण्याची
कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २

नव्हते जरी दिलासे सोडून हात गेले
मी बांधला निवारा छायेमध्ये स्वतःच्या... ३

लाजून शांतता ऐके स्वच्छंद गीत ऐसी
अंतरी ध्यास तिलाही असा व्यक्त होण्याचा... ४

एकांत कधीचा जागा तृप्तीने रात जरी निजली
बहाणा अवेळी मग झाला फिरूनी उजाडण्याचा... ५

हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा... ६

शीतल सहवासाला कलाहाचे गोंदण कैसे
स्पर्शाने करूया उत्सव अंतरीच्या अद्वैताचा... ७

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 May 2012 - 12:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा

क्या बात!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2012 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा

मलाही या दोन ओळी खासच वाटल्या.

-दिलीप बिरुटे

हारुन शेख's picture

28 May 2012 - 8:17 pm | हारुन शेख

"हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा"

मिकाशी सहमत ! inspired वाटल्या या ओळी .

-------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र's picture

27 May 2012 - 12:05 pm | शैलेन्द्र

"एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा... १"

कालचा तुमचा मास्तरांवरचा लेख, आणी या दोन ओळी, पर्फेक्ट कॉम्बो..

चौकटराजा's picture

27 May 2012 - 2:08 pm | चौकटराजा

आपण या काव्याच्या सुरूवातीलाच कविता असे म्हटले आहे. पण आपल्याला ही गझल म्हणून
अभिप्रेत असेल तर मी तरी याला गझल म्हणणार नाही. गझल चा बाज म्हणजे ते रदीफ काफिया का काय ते असते ना ते यात दिसत नाही.

फकिरीवरी फिदा तू मज ओढ चांदण्याची
कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २
ही मला आवडलेली खास ओळ ....... यात फकिरीवर फिदा कोण आहे तो की ती .....
असे आपण एखाद्या मित्रासही म्हणू शकतो ना ?

सहज गंमत म्हणून - माळण्याचा, ढाळण्याचा, टाळण्याचा, पाळच्याचा , चाळण्याचा, गाळण्याचा, वाळण्याचा, असे रॉ मटेरिअल घ्यावे, मग वेळेस पाळ्ण्याचा, अश्रूस ढाळण्याचा,
गजर्‍यास माळण्याचा, या सेमी फिनिश मिळते . मग पुढे आपली थीम त्यात मिसळली की
गझल तयार होते.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2012 - 7:34 pm | संजय क्षीरसागर

म्हणजे एक मूड आहे तो तुम्हाला काव्यात्मक पद्धतीनं व्यक्त करायचा आहे तर तुम्हाला फक्त दोनच गोष्टींच भान ठेवावं लागतं; लय (किंवा टाइमिंग) आणि सम (किंवा यमक)

या दोन गोष्टींच भान असेल तर तुमची कविता एखाद्या रागाप्रमाणे एका मूडची एकसंध अभिव्यक्ती होऊ शकते.

`या क्षणात' जगणार्‍या मानसिकतेवरची ही कविता तो ख़याल वेगवेगळ्या अंगानी मांडते. उदाहरणार्थ, या ओळी पाहा:

नव्हते जरी दिलासे सोडून हात गेले
मी बांधला निवारा छायेमध्ये स्वतःच्या... ३

कधी तुम्ही इतके उत्कट, इतके क्षणस्थ जगू लागलात तर तुम्ही प्रवाहाच्या विरूद्ध जाल कारण सगळं जग उद्याच्या विवंचनेत जगतय मग अशा वेळी तुम्हाला कुणाचा दिलासा नसेल की कुणी तुमच्या बरोबर नसेल तुम्हाला एकमेव सहारा असेल तो तुमच्या या कनविक्शनचा की फक्त `हा एकच क्षण तोलायचाय!' ....मग सगळ्या जिंदगीचा हिशेब चुकता होईल!

मी कवितेतून एक थीम मांडतो, तुम्ही त्या मूडमधे गेलात तर तुम्हाला अर्थ उलगडत जातो.

अशा फकिरी जगणार्‍यावर प्रकृती फिदा असते कारण सारं अस्तित्व `या क्षणात' जगतय, मग त्या रियलायजेशननं तुमचा मूड लाइट होतो आणि दुनिया पैशाच्या मागे असते तेव्हा तुम्ही `कवितेत चंद्रमाळण्याचा छंद' करता म्हणून :

फकिरीवरी फिदा तू मज ओढ चांदण्याची
कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २

प्रचेतस's picture

27 May 2012 - 2:09 pm | प्रचेतस

छान कविता.
आवडली.

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा... १

मला या ओळी खास वाटल्या. मी या ओळींशी स्वत:ला जोडू शकते.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2012 - 7:36 pm | संजय क्षीरसागर

इतकच हवं, धन्यवाद!

पैसा's picture

27 May 2012 - 7:41 pm | पैसा

कवितेत भाव महत्त्वाचा. यमक वृत्त वगैरे वापरणे न वापरणे ही कवीची मर्जी.

वृत्त व्याकरणासारखं आहे, मला वृत्ताच बंधन वाटतं पण लय आवश्यक आहे नाही तर काव्यात्मकता हरवेल आणि यमक गाण्याच्या समेसारखा आहे, तुम्हाला प्रत्येक आवर्तनाच्या शेवटी सहजपणे लँडीगला यायला हवं

चौकटराजा's picture

28 May 2012 - 6:22 pm | चौकटराजा

कवीची मर्जी नव्हे कवि जो आकृतीबंध स्वीकारतो त्याची ती आवश्यकता असते. दुसर्‍याच क्षेत्रातील उदाहरण द्यायचे झाल्यास देशावरील तमाशात गण गवळण वेगळी , दशावतारी नाटकात गणपती आला नि नाचुन गेला हे वेगळे. तसे गझल वेगळी, कविता वेगळी, चारोळी वेगळी, मुक्तछंद वेगळा. ( हे सारे काव्य प्रकार त्या त्या काव्यप्रकारांचा मान ठेवून पाडगावकारानी यशस्वी पणे वापरले आहेत. यात तरी दुमत नसावे).

पैसा's picture

28 May 2012 - 6:38 pm | पैसा

पण ही गझल नाही म्हणून स्वतः कवीच सांगतायत ना? मग झालं तर!

चौकटराजा's picture

28 May 2012 - 6:58 pm | चौकटराजा

मुक्त छंद हा प्रकार सोडला तर जवळ जवळ सर्व काव्यप्रकाराना काही बंधने असतातच. कारण
" लय" "मोजकेपणा" हे खास काव्याचे विशेष गद्यापासून काव्याला वेगळे करतात. गजलेत तर
बंधने जास्तच असतात. म्हणून गजलेला बरेच वेळा कारागिरी म्हणतात.

हारुन शेख's picture

28 May 2012 - 8:29 pm | हारुन शेख

पैसा तै शी सहमत !

-------------------------------------------------------------------------------------------------------

अर्धवटराव's picture

28 May 2012 - 8:25 am | अर्धवटराव

कविता अजीबात कळली नाहि :(

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

28 May 2012 - 10:36 am | संजय क्षीरसागर

ही कविता काय आहे हे सांगण्याच्या संधी बद्दल धन्यवाद

आपल्याला जगायला, भोगायला किंवा विचार करायला नेहमी फक्त एकच क्षण आहे, तो म्हणजे `हा क्षण'. जवळजवळ प्रत्येकजण या क्षणाचा उपयोग जगण्याऐवजी विचार करण्यात घालवतो.

तुम्ही हा क्षण जगायला वापरलात तर तुमच्या लक्षात येतं की असं क्षणोक्षणी जगत आपल्याला सारं आयुष्य मजेत घालवता येतं, तुमच्या सार्‍या जिंदगीचा हिशेब या क्षणात चुकता होतो.

अशा क्षणस्थ वृतीनं जगणार्‍याचा मूड नेहमी लाइट राहतो कारण त्याला भविष्याची चिंता किंवा (गतकालात उत्कटतेनं न जगल्यानं वाटणारं) भूतकालाचं वैषम्य रहात नाही. ही कविता अशा जगण्याच्या मूडची अभिव्यक्ती प्रत्येक कडव्यातून करते, उदाहरणार्थ:

एकांत कधीचा जागा तृप्तीने रात जरी निजली
बहाणा अवेळी मग झाला फिरूनी उजाडण्याचा... ५

अशा व्यक्तीच जीवन कालरहित होतं, भूतकाल तर निरर्थक असतोच पण `उद्या' व्यर्थ होतो आणि त्यामुळे प्रणयाला सारी रात्र उपलब्ध होते. अशा निवांत प्रणयानं सखी तृप्त होऊन निजली तरी साजणाचा उत्साह जागाच असतो; अशा वेळी अचानक उजाडतं आणि वाटतं रात्रीनंच उजाडण्याचा बहाणा केलाय, तरी देखील तो इतक्या लवकर कसा झाला? म्हणून

`बहाणा अवेळी मग झाला फिरूनी उजाडण्याचा'

असा साजण सखीचा देह सजवायला त्याचा सारा निवांतपणा घेऊन आलेला असतो, निवांतपणाचं शीतल चांदण घेऊन आलेला असतो पण सखी तितकी उन्मुक्त होईलच असं नाही, ती तिची सारी कस्तुरी उधळून क्षणस्थ आयुष्य जगण्याचा सोहळा साजरा करेलच असं नाही म्हणून:

हा साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा

तुम्ही सर्वस्वी या क्षणात राहून कवितेचा आनंद घ्या तुम्हाला सर्व अर्थ उलगडतील

चौकटराजा's picture

28 May 2012 - 6:14 pm | चौकटराजा

काही गायकाना ख्याल " हा असा " उलगडून दाखवायची कला प्राप्त झालेली असते. मी आपला
गातो तुमचं तुम्ही बघून घ्या अशी त्यांची धारणा नसते .हा तुमचा छोटा ख्याल असाच रंगतो
आहे , या तुमच्या स्वच्छ अप्रोच बद्दल मनस्वी आभार !

शैलेन्द्र's picture

28 May 2012 - 8:10 pm | शैलेन्द्र

:) व्वा काका.. याला म्हणतात प्रतिसाद..

अर्धवटराव's picture

28 May 2012 - 7:04 pm | अर्धवटराव

एका साध्या लहानश्या वेष्टनात कमालीचं स्वादीष्ट पक्वान निघावं असं काहिसं वाटलं हे रसग्रहण वाचुन.
धन्यवाद.

अर्धवटराव

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2012 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार

विचारजंताचा विजय असो...

चांगल्या अन्नात माती कशी कालवावी ते ह्यांच्याकडून शिकावे.

असो..

पद्य आपल्याला आवडले बॉ.

प्रत्येक लेखनाची द्रौपदी करुन तिच्या वस्त्रांना हात घालणार्‍यांना आता चटका कधी बसतोय ते बघायचे.

नाना चेंगट's picture

28 May 2012 - 6:56 pm | नाना चेंगट

हा हा हा

स्साला आमचा परा कधी कधी एकदम मस्त लिहून जातो.

प्रतिसादातील भावनांशी सहमत आहे.

शैलेन्द्र's picture

28 May 2012 - 8:07 pm | शैलेन्द्र

+१

मदनबाण's picture

28 May 2012 - 8:17 pm | मदनबाण

सुरेख... :)

संजय क्षीरसागर's picture

29 May 2012 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

कवितेचा अर्थ सांगण मला आवडतं, त्यातनं मूड शेअरींग तर होतच आणि रसिकांनाही अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो.

`मी कविता लिहीली, अर्थ तुम्ही शोधा' अशी वृती नाही त्यामुळे कोणत्याही कडव्याचा अर्थ कुणीही विचारला तर सांगायची तयारी असते; कुणाचाच प्रतिसाद मला तिरकस वाटला नाही.

कवितेकडे पाहण्याचा अप्रोच मी वरती लिहीलाय, उर्दू शायरीचा आभ्यास असला तरी गजलपेक्षा खयाल या फॉर्ममधे लिहीतो त्यामुळे सर्व कविता एकाच मूडची एकसंध अभिव्यक्ती होते. संगीताची आवड असल्यानं शब्दांची नादमयता मला मोहवते. ही परिमाणं लक्षात घेऊन तुमच्यापैकी कुणीही या फॉर्ममधे सहज लिहू शकेल, या फॉर्मला नांव काय द्यायंच हा प्रश्न नाही

सूफियाना अंदाज असावा तसं प्रत्येक कवितेला अध्यात्मिक परिमाण देखील असतं, उदाहरणार्थः

शांतता हा प्रत्येक अभिव्यक्तीचा मूळ स्त्रोत आहे त्यामुळे क्षणस्थ जगणार्‍याचं स्वच्छंद गाणं ती ऐकत असते, ते गाणं म्हणजे तिच्या अंतरी असलेला `व्यक्त होण्याचा ध्यासच' असतो, म्हणूनः

लाजून शांतता ऐके स्वच्छंद गीत ऐसी
अंतरी ध्यास तिलाही असा व्यक्त होण्याचा...४

आणि सखीशी कितीही कलह झाला तरी `स्पर्शाचा उत्सव' दोघांची आंतरिक एकरुपता पुन्हा घडवून आणतो म्हणूनः

शीतल सहवासाला कलाहाचे गोंदण कैसे
स्पर्शाने करूया उत्सव अंतरीच्या अद्वैताचा...७

रघु सावंत's picture

4 Jun 2012 - 12:11 am | रघु सावंत

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा... १

फार सुरेख
वरिल दोन ओळितच तुमच्या जगण्याची उमेद स्पट्श होत आहे.

रघू

आगाऊ म्हादया......'s picture

6 Jun 2012 - 10:05 am | आगाऊ म्हादया......

च्याय्ला!!!!!

कस काय सुचत ना तुम्हाला!!!

आयुष्यात एक छान कविता जमली तर घर डोक्यावर घेऊन नाचेन मी!!!!!!!!!!

मोदक's picture

18 May 2013 - 2:30 am | मोदक

संक्षी....

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा...

__/\__

असले काहीतरी लिहीत जावा राव..

(शब्दांच्या चिखलात उगवलेली कमळे आवडणारा) मोदक

अधिराज's picture

18 May 2013 - 11:57 am | अधिराज

एक नंबर....मस्त!

प्यारे१'s picture

18 May 2013 - 4:12 pm | प्यारे१

फक्त कविता वाचली.
खूप छान उतरली आहे असे वाटले, नंतरचे कवित्व नेहमीचेच.

आजचा सुविचारः माणसाला बोलायला दोन वर्षे लागतात, नंतर काय बोलायचं ते ठरवायला आयुष्य घालवावं लागतं.

मोदक's picture

18 May 2013 - 4:19 pm | मोदक

एक सुधारणा.

आजचा सुविचारः माणसाला बोलायला दोन वर्षे लागतात, नंतर काय बोलायचं, किती बोलायचं आणि कुठे थांबायचं ते ठरवायला आयुष्य घालवावं लागतं.

प्यारे - आमच्या आजच्या दिवसाला एन्लाईटन्ड केल्याबद्दल, आम्ही तुमचे जल्मो जल्मी ऋणी राहू.

प्यारे१'s picture

18 May 2013 - 4:23 pm | प्यारे१

:)
ते ऋणी वगैरे ठीके हो, आमच्या अकाऊंट मध्ये भर टाकत चला. अकौंट नंबर व्यनिद्वारे देतो.
बाकी टॅक्स ची काही भानगड निघाली तर कुणी सी ए आहेत का ओळखीचे? ;)

प्यारे काका, तुम्ही स्वत: अंतीम सत्य आहात. पैसा मिथ्या आहे. काय राव तुम्ही इतके एनलाईटन्ड लोक आणि हे आम्ही तुम्हाला सांगावे..?

सी ए आहेत आपल्याकडे.. पण ते सध्या कुठल्यातरी धाग्याचे ओढून ताणून विडंबन करण्यामध्ये व्यस्त असावेत.

प्यारे१'s picture

18 May 2013 - 5:13 pm | प्यारे१

हम्म्म.
गल्लत करत आहेस एवढेच सांगू इच्छितो.
मिथ्या म्हणजे काल नव्हतं, आज आहे, उद्या असेल किंवा नसेल. मिथ्याचा अर्थ नाहीच असा नाही.
म्हणून तूच त्या मिथ्या संपत्तीचा त्याग करुन ती मजप्रत अर्पण करावीस हे उत्तम. ती ह्या मिथ्या संसारासाठी खरी उपयोगी आहे. ;)
मिथ्या संसार+ मिथ्या पैसा = खरा व्यवहार.

अभ्या..'s picture

18 May 2013 - 4:21 pm | अभ्या..

वा वा. संजयजी. सुरेख एकदम.
मनापासून आवडली आहे कविता.

आजानुकर्ण's picture

19 May 2013 - 6:09 pm | आजानुकर्ण

एका क्षणावरी आयुष्य तोलुनी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंनी केलेल्या कृत्याचे हिशेब बीसीसीआय आणि दिल्ली पोलीस करत आहे असे दिसते.

एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला सार्‍याच जिंदगीचा... १

Bhagwanta Wayal's picture

19 May 2013 - 7:28 pm | Bhagwanta Wayal

फकिरीवरी फिदा तू मज ओढ चांदण्याची
कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २
वा..!! सुरेख.