अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहूनच शांत, प्रसन्न वाटत. तस पाहील तर ह्या फुलांना गंध नसतो तरीपण न बोलता मनाच्या कोपर्यात ही फुले कुठेतरी घर करून बसतातच त्याला कारण आहे त्यांच गोंडस रुपड, सणासमारंभात असलेल ह्या फुलांच स्थान.
अबोलीचे बॉटनिकल नाव Crossandra infundibuliformis असुन ती Acanthaceae (Ruellia family) कुळातील आहे. अबोलीची झाड साधारण ३ ते ४ फुटा पर्यंत वाढतं.
अबोली मध्ये ३ ते ४ जाती आहेत.
ही लाल अबोली ह्याची देठे नाजूक असतात. ही फुले फिक्कट अबोली पेक्षा लवकर कोमेजतात. पाकळ्याही एकदम पातळ असतात.
शेंदरी अबोली. हिची फुले सहसा पुर्ण उमलत नाहीत. कळ्यांप्रमाणेच असतात.
अजुन पिवळी अबोली आणि छोटी गोलाकार अबोली रंगाची अबोली असते. आत्ता माझ्याकडे फोटो नाहीत.
ही पुर्वापार दिसत आलेली फिक्कट अबोली. पण हिच फुले गजर्यात ३ ते ४ दिवस चांगली राहतात. ह्याचे देठ कडक असते त्यामुळे वेणीही सुंदर होते ह्या अबोलीची.
माझ्या बालपणी आबोलीची लागवड पुढील पद्धतीने होत.
मे महिना आला की शेताची ठेपळ चांगली सुकून त्यांना भेगा पडतात. मग अशी ठेपळ पारईने पटापट निघतात. नविन अबोली लावायच्या जागी अशी ठेपळ एक एक करुन किंवा घमेलात २-३ आणून अबोलीच्या लागवडीच्या जागी ठेवावी लागत. मग ही ठेपळ फोडून त्याचा मोठा वाफा करून ठेवत. पावसाच्या सरींना सुरुवात झाली की ठेपळ सरींच्या पाण्याने नरम पडत. अबोलीच्या बियांची पेरणी पण मजेदार असते. वरील जाड देठाच्या अबोलीची बोंडे सुकली की त्यात बी तयार होते.
ही बोंडे तोडून कागदात बांधून ठेवायची. बी पेरायच्या दिवशी ही बोंडे एका पाणी भरलेल्या बालदीत टाकायची आणि पटकन बालदीवर झाकण द्यायचे आणि आवाज घ्यायचा हा मला पुर्वी छंद होता. झाकण लावताच बालदीतून राइला फोडणी दिल्याप्रमाणे तड तड आवाज येतो. ह्या बोंडांमध्ये भातकणांप्रमाणे थोडे आकाराने मोठे असे आवरण असते व त्या आवरणात अबोलीचे बी असते. पाण्यात टाकताच ते आवरण फुटते व त्यातून बी पाण्यात पडते. थोड्या वेळाने झाकण काढायचे मग बोंडे वर आणि बी खाली साचलेले दिसते. मग हे तळाचे बी पाण्यासकट नरम झालेल्या ठेपळांच्या वाफ्यावर एका कोपर्यात टाकुन त्यावर अलगद मातीचा हात फिरवायचा. ७-८ दिवसांत अबोलीची रोपे वर आलेली दिसतात. १०-१५ सेमिंची ही रोपे झाली की मग रोपांची एक एक करून पुर्ण वाफ्यावर लागवड करायची.
आमच्या घरीही अबोली खुप फुलत असे. पण आम्ही वरील बी पेरणीची प्रक्रिया करत नव्हतो. ठेपळ मात्र आणून ठेवावी लागत. आवड म्हणून आई अबोलीच्या जुन्या रोपांखाली पावसात उगवलेली रोपे त्या ठेपळांच्या वाफ्यावर लावत असे. लाल अबोलीची लागवड मात्र पावसाळ्यात फांद्या तोडूनच करावी लागे कारण लाल अबोलीच्या बोंडात बी धरत नाही.
कुठल्याही झाडाला कळ्या लागलेल्या पाहण्यासाठी मी अधीर असे. हिवाळा संपत आला की लग्नसराईच्या काळात अबोलीचा सिझन चालू होत असे. मग अशा वेळी माझी अबोलीच्या कोवळ्या कोंबावर नेहमी फिरत असे. अबोलीला पहिला कोंब पहाणेही फार सुखद असे. अजुनही माझा हा छंद आहे.
हळू हळू त्यातुन नजूक लालसर कळ्या बाहेर पडतात.
आणि त्या कळ्यांचे रुपांतर फुलात होते तेंव्हा आनंदी आनंद गडे.
फुले भरपुर येऊ लागली की मला त्याचे गजरे करायला खुप आवडत. जास्त असले की आई आजुबाजूलाही गजरे द्यायची. आई व मी कदंबा करत असू. . मग त्यात कधी जुईची तर कधी मोगर्याची, कागड्याची फुले घालून आम्ही दुरंगी कदंबे विणत. मी गुंफलेला गजराही शिकले पण मला कदंबाच सुटसुटीत आवडतो अजुनही
हा मी हल्ली केलेला अबोलीचा कदंबा (कदंबा म्हणजे हातावर गाठ मारून केलेला गजरा.)
हे बाजारातील गुंफलेले लाल अबोलीचे गजरे.
खास व्यवसाय करण्यासाठीही ही अबोली काही बागायतदारांकडे लावली जाते. माझ्या शालेय जीवनापर्यंत दारावर येणार्या गिर्हाइकांसाठी १ रु. ला १०० फुले मोजून देत असत बागायतदार. तसेच बाजारातही १०० फुलांचे वाटे ठेवलेले असत.
माझ्या मावस बहीण अबोलीची फुले विकत असे. तिच्याकडे गेल्यावर कधी कधी खेळता खेळता फुले मोजायचे काम मी करत असे. तेंव्हा मला नेहमी प्रश्न पडे बाजारात एवढ्या प्रमाणात फुले येतात ती फुलवाले कशी मोजून घेत असतील ? किती वेळ लागत असेल त्यांना ? पण ते घाऊक दरात विकतात हा व्यवहार समजण्याइतपत मी तेंव्हा सुज्ञ नव्हते.
लग्नसराईच्या काळात अबोलीला महत्वाचे स्थान असते. पुर्वी अबोलीची वेणी नवरीसाठी सक्तीचे असे ती पण खास करून माहेरची. त्यामुळे सुवाशिणींना अबोली पाहताच माहेरची आठवण ओली होत असणार तसेच प्रत्येक नववधूच्या नणंदेच्या तोंडावर हे गाण येतच असणार. "चंपा,चमेली, जाई, अबोली पहा माझी वहीनी अशी ही."
तसे अबोली हे फुल इतर पांढर्या फुलांपेक्षा सगळ्यात स्वस्त. पण लग्नसराईच्या काळात अबोलीच्या वेणीचा भाव उच्चांक गाठतो. गजर्याच्या तिप्पट भाव वेणीचा लावतात. अबोलीची वेणीही कलाकुसर करुन विविधप्रकारे फुलवाले करतात. पेचक, हिरवा पाला, रिबिण, हल्ली तर कापडी छोटी गुलाबाची फुलेही मध्ये मध्ये घालतात.
सासरी मी अबोली आणून लावली आहे. जुना आनंद अजुनही थोड्या-फार प्रमाणात घेते. भरपूर फुलते पण क्वचीतच कधीतरी मी फुले काढते कोणी आल तर गजरा करून देते तर क्वचीत कधी स्वतः माळते, जास्तकरून झाडावर तशीच ठेवते. कारण वेळेनुसार आणि वयानुसार ही अबोली झाडावर जास्त खुलून दिसते ह्याच आकलन होऊ लागल आहे. अबोली अगदी दारासमोरच आहे. ह्या झाडांना अजुनही तशीच न्याहाळते. पाणी घालते. बोंडे सुकलेली असतील तर हल्ली झाडावरच पाणी घालताना ती फुटतात आणि तड तड आवाज येतो. तो मुलीला ऐकवते. संध्याकाळी ऑफीसमधून घरी गेले की पहिला पायर्यांवर बसते. समोरची फुले न्याहाळते. तेवढाच ह्या अबोलीचा सहवास.
प्रतिक्रिया
15 May 2012 - 11:44 am | बॅटमॅन
अबोलीवरती एक बोलका लेख :) छान :)
15 May 2012 - 11:45 am | प्रास
जागुतै, मस्तच फोटोज् आणि लिखाणही एखाद्या मुक्तकासारखं झालेलं आहे. जणु काही अगदी स्वतःचा स्वतःशीच केलेला संवादच असावा....
अजून कुणाला अबोलीचा गजरा किंवा कदंबा किंवा वेणी द्यायचा प्रसंग आलेला नाही आणि पुढची शक्यताही नाही पण ते त्यांचे फोटो मात्र भन्नाट आलेले आहेत.
हे तर खरंच पण म्हंटलं तर सगळ्याच फुलंबाबत हेच म्हणावं लागतं ना.....
(फुलराणी जागुतैचा फुल्लस्पीड पंखा) प्रास
15 May 2012 - 11:48 am | अमृत
अबोली आवडली.... माझ्या घरीपण अबोलीचे आहे. अबोलीच्या बिया बादलीत न टाकता मी मुठीत ठेऊन त्यात थोडं पाणी टाकायचो त्या बिया फुटताना मजा ययची आणि तळहाताला गुदगुल्यापण होत. अजुनही घरी गेलो की आईनी झाडांना पाणी घतल्यावर अबोलिच्या बियांचा तडतडायचा आवाज ऐकत बसतो. लेख वाचून क्षणासाठी का होइइना पण मनाने घरी जाऊन आलो.
अमृत
15 May 2012 - 11:49 am | जागु
बॅटमॅन, प्रास धन्यवाद.
15 May 2012 - 12:18 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे.
15 May 2012 - 2:21 pm | धनुअमिता
सहमत
15 May 2012 - 12:32 pm | ५० फक्त
पुन्हा एकदा निसर्गसखी आहेस हे सिद्ध केलंस.
16 May 2012 - 9:46 am | प्यारे१
तंतोतंत...!
15 May 2012 - 12:48 pm | यकु
पता नै क्यों ही फुलं पाहून या फुलांचा गजरा नेहमी लहान मुलींनीच घातलेला आठवत आहे..
15 May 2012 - 1:59 pm | उदय के'सागर
अबोली प्रमाणेच खुपच नाजुक आणि आकर्षक लेख...
अबोली पाहिली कि खुप शुध्द, स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं. त्या केशरी रंगा मुळे एखाद्या नाजुक साध्वी ला पाहतोय असे वाटते (जसं 'स्वदेस' मधे गायत्री जोशी दिसते "पल पल हैं भारी" हया गाण्यात.. अगदी तसंच) .
17 May 2012 - 2:27 pm | सुहास..
दिल गार्डन गार्डन हो गया !!
उगा आपण जागुताई चे फॅन नाय !
15 May 2012 - 2:28 pm | अक्षया
माहिती आणि फोटो दोन्ही सुंदर..:)
15 May 2012 - 2:59 pm | पियुशा
किती फ्रेश वाटल हे फोटो बघुन :)
ह्याला " काटे-कोरांटी" पण म्हणतात का ग तै ,का ती वेगळी फुल असत्तात ?
15 May 2012 - 3:07 pm | प्रीत-मोहर
:)
15 May 2012 - 3:37 pm | सविता००१
जागुतै, मस्त लेख आणि फोटो तर केवळ कातिल. अतिशय सुंदर. अप्रतिम. :)
15 May 2012 - 6:08 pm | चित्रा
जागु, या सर्वावर (अजून विचार केला नसल्यास) पुस्तक लिहीण्याचे मनावर घ्या.
बरेच दिवसांनी कलाबतू लावलेला गजरा पाहिला.
15 May 2012 - 6:13 pm | जागु
चित्रा नक्की. तुझी सुचना आवडली. मनात आहेच पण अजुन काही लेख लिहायचे आहेत.
पियुषा काटेकोरांटी वेगळी असते.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
15 May 2012 - 7:06 pm | शुचि
अ-बो-ली
:) नावच किती गोड आहे. तसच रुपडही.
15 May 2012 - 7:50 pm | स्मिता.
जागुताई, फारच सुंदर लेख गं! पहिलाच फोटो बघून इतकं फ्रेश वाटलं, बाकिचेही फोटो अपेक्षेमाणेच सुंदर :)
आमच्याकडे लग्नात नवरीला अबोलीची वेणी/गजरा सक्तीचा नाही तरीही अबोली बघून माहेराच्या, पर्यायाने लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
आमच्याकडे पूर्वापारच्या फिकट अबोलीची झाडं होती आणि एखादं सगळ्यात पहिल्या अबोलीचंही होतं. उन्हाळ्यात झाडांना पाणी देतांना मी ते अबोलीच्या वाळलेल्या कणसांवर टाकत असे आणि मग फटाफट बिया फुटण्याची मजा बघत बसे. कित्येक वेळा तर पूर्ण न वाळलेल्या कणसांवरही पाणी ओत-ओतून बिया फुटायची वाट बघत बसायचे :)
15 May 2012 - 7:58 pm | पैसा
अबोल्या बघून एकदम फ्रेश वाटलं. पूर्वी रतन अबोली म्हणून एक प्रकार पाहिलेला आठवतोय. ही फुलं जास्त गडद रंगाची आणि लहान असतात. पण एकूणच शेवतीच्या आणि अबोलीच्या "येन्या"एकदम गावाला घेऊन जातात! वेण्यांपैकी शेवंती जरा जड होते पण अबोली अगदी हलकी. त्रासदायक वास पण नाही. फक्त वेड्यासारखी फुलते आणि थोड्याशा पाण्यावर कुठेही अगदी आनंदात रहाते!
16 May 2012 - 11:40 am | प्रीत-मोहर
पैसा तै अग ती गडद केशरी नाजुक देठाची अबोली आहे ना तीच ती रतन अबोली. मला खुप आवडते तीची वेणी माळायला :)
15 May 2012 - 8:20 pm | सानिकास्वप्निल
फोटो तर अगदी जबरदस्त आहेतचं , तुझं लिखाण ही खूप आवडतं :)
अबोली म्हणजे बालपण आठवतं, आजोळच्या आठवणी ताज्या झाल्या :)
धन्यवाद जागुतै :)
15 May 2012 - 8:37 pm | सुहास झेले
जागुताई, नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख. एकदम प्रसन्न वाटलं हे फोटो बघून :) :)
15 May 2012 - 9:53 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख फोटो व लेख.
मीही लहानपणी बियांवर पाणी घालुन फटाका फुटायची वाट बघायचे.
आणी अबोली व शेवंती तत्सम फुलांच्या वेण्या बाहेर विकायल्या पाहिल्या कि आईकडे हट्ट करायचे की मला वेणी हवी.
आई एकदा गमतीने म्हणाली कि अग लग्न झाले कीच वेणी घालायची असते, तर त्या दिवशी आईकडे हट्ट केला की माझे आजच लग्न करुन दे. :)
लहानपण आठवले.
15 May 2012 - 11:52 pm | जागु
मराठे किस्सा छानच.
शुची, स्मिता, सानिकास्वप्निल, सुहास धन्यवाद.
पैसा रतन अबोली म्हणजे वरच्या फोटोत जरा मिटलेली अबोली आहे ती का ?
16 May 2012 - 8:38 am | पैसा
हो बहुतेक! ती फुलं जरा जास्त टिकत असावीत.
16 May 2012 - 4:08 pm | संजय क्षीरसागर
ही नजाकत कायम ठेव.
16 May 2012 - 8:11 am | लीलाधर
फोटो तर अप्रतिम आणि तुझे त्यावरील लिखाणही तेवढेच सुंदर... वा वा दिवसाची सुरुवात छानच झाली तै :) धन्यवाद
16 May 2012 - 10:22 am | मोदक
+१
लेख आणि फोटो शॉलिड आवडेश... :-)
16 May 2012 - 10:26 am | जागु
पैसा, संजय, चचा, मोदक धन्यवाद.
16 May 2012 - 11:32 am | श्रावण मोडक
सुरेखच. :-)
16 May 2012 - 11:42 am | बिपिन कार्यकर्ते
लेखन सुरेख! पण मला एकही फोटो दिसत नाहीये! फुलं तोडून नेली का काय कोणी? :(
16 May 2012 - 12:11 pm | श्रावण मोडक
पाप हो, पाप! ;-)
16 May 2012 - 11:47 am | शिल्पा ब
खुपच नाजुक फुलं असतात...फोटो अन लेख दोन्ही आवडले.
16 May 2012 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा
नेहमी प्रमाणेच सुंदर आणी माहितीपूर्ण लेख... तुमच्या निस्सिम निसर्गप्रेमाला मानाचा मुजरा...--^--
16 May 2012 - 12:44 pm | स्वातीविशु
अबोलीप्रमाणेच सुंदर आणि आकर्षक लेख. फोटो तर अप्रतिम आहेत. :)
मला फार आवडतात मोगरा आणि अबोलीचे गजरे ( अबोलीची वेणी आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली, छान वाटली :) ). माहितीपूर्ण लेख वाचून आणि फोटो पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. :) धन्यवाद जागुतै.
16 May 2012 - 1:12 pm | नरेश_
निसर्गकन्या हो आमची जागुताई...!!!
16 May 2012 - 10:05 pm | निवेदिता-ताई
खूप छान...प्रसन्न वाटले.!!!!!
17 May 2012 - 12:13 am | जागु
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
17 May 2012 - 2:11 am | प्रभाकर पेठकर
भरभरून मनापासून लिहिलेला लेख आणि मनमोहक छायाचित्रे अतिशय अप्रतिम आहेत. अभिनंदन.
माझ्या लहानपणी आम्ही अबोलीच्या बिया तोंडातच भिजवून बहिणींच्या डोक्यावर त्यांच्या नकळत हळूच ठेवयचो. त्या गप्पांमध्ये रंगलेल्या असायच्या आणि त्या बिया डोक्यावर फुटल्या की एकदम दचकायच्या. आम्ही खदखदून हसायचो. झाSSल. त्या हात धूवून मागे लागायच्या आणि आम्ही गल्लीभर पळायचो. कशाला त्यांच्या हाती लागतोय.
अशा जुन्या आठवणींना 'जागवणारा' हा लेख कोणाचा म्हणून पाहीले तर नांव होते 'जागु'.
17 May 2012 - 10:23 am | जागु
प्रभाकरजी तुमचा प्रतिसादही तसाच मनमोहक, भरभरून आहे. धन्स.
17 May 2012 - 2:23 pm | मानस्
जागुताई तुमचं मनापासून केलेलं लेखन आणि अबोलीचे फोटो खूप आवडले.
लहानणीच्या आठवणींत अगदी हरवून गेलो.
या मन प्रसन्न करणार्या लेखाबद्द्ल धन्यवाद.