गेले काही दिवस धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य असलेल्या स्थळी बराच काळ वास घडत आहें; तेथून ही 'जातक कथा' जशीच्या तशी उचलून येथें ठेविली आहे; कां की याबद्दल माहिती नसलेल्या आमच्या वाचकांना धर्मानंद कोसंबींच्या या स्थळाची माहिती व्हावी व जुन्या मराठी भाषेच्या उत्तम शैलीत जिज्ञासूंना धर्मानंद कोसंबी व बौद्ध वाङमय वाचावयास सापडावें.
--------------------------------------------------------------------------------
एका जन्मीं आमचा बोधिसत्त्व तक्षशिला नगरींत प्रसिद्ध आचार्य होऊन पांचशें शिष्यांना वेद पढवीत असे. त्यांतील एकाचें नांव पापक असें होतें. ''कायरे पाप्या, इकडे येरे पाप्या'' असें लोक त्याला म्हणत असत. त्यामुळें कंटाळून जाऊन तो आपल्या गुरूला म्हणजे बोधिसत्त्वाला म्हणाला, ''गुरुजी, माझें नांव मला अमंगल वाटतें. दुसरें एखादें मला चांगलेसें नांव द्या.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''येथल्या येथेंच चांगलें नांव घेण्यापेक्षां देशपर्यटन करून एखादें चांगलें नांव पाहून ये, व मला सांग, म्हणजे आम्ही सर्वजण त्याच नांवानें तुला हांक मारीत जाऊं.''
दुसर्या दिवशीं पापकानें शिदोरी सज्ज करून दुसर्या गांवचा रस्ता धरला. व ज्याच्या त्याच्या नांवाचा अर्थ पहात जाऊं लागला. वाटेंत एका शहराजवह आला असतां कांहीं लोक प्रेत घेऊन स्मशानयात्रेला चालले होते. तेव्हां पापक म्हणाला, ''कायहो इतकी मंडळी कोणीकडे चालली ?''
ते लोक म्हणाले, ''जीवक नांवाचा आमचा एक दोस्त नुकताच मरण पावला. त्याच्या अंत्यविधीला आम्हीं जात आहों.'' ''पण कायहो ! जीवक मरतो हें कसे ?''
''जीवक असो अथवा अजीवक असो, मनुष्य म्हटला कीं तो मरावयाचाच. नांवानें मरण चुकतें असें नाहीं. व्यवहारापुरताच काय तो नांवाचा उपयोग. तूं अगदींच खुळा दिसतोस !'' असें त्यांनीं उत्तर दिलें.
बिचारा पापक चांगल्या नांवाचा हा विपर्यास पाहून विस्मित होऊन गेला, व तसाच पुढें जातो तों एका दासीला वेळेवर काम करीत नाहीं, म्हणून तिचे मालक रस्त्यावर चाबकानें मारीत होते. तो त्याला म्हणाला, ''या बाईचें नांव काय, व हिला तुम्ही कां मारितां ?''
ते म्हणाले, ''इचें नांव धनपाली व वेळेवर काम करीत नसल्यामुळें हिला आम्हीं दंड करीत आहों.''
''अहो पण धनपालीवर दुसर्याचें काम करण्याचा प्रसंग यावा कसा ?''
''अहो तुम्ही हें मूर्खासारखें काय विचारितां ? ही जन्माचीच दासी आहे. धनपाली असें नांव ठेविलें म्हणून काय झालें ? धनपाली असूं द्या किंवा अधनपाली असूं द्या. दारिद्रय यावयाचें असलें तर तें आल्यावांचून रहात नाहीं. नांवानें कोणताच कार्यभाग व्हावयाचा नाहीं, तें केवळ व्यवहारापुरतें आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी, हें मोठें आश्चर्य आहे.''
बिचारा पापक चांगल्या नांवाच्या मंगलत्वाविषयीं जवळ जवळ निराश होऊन तसाच पुढें चालला. शहराच्या बाहेर गेल्यावर कांहीं अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक गृहस्थ त्याच्या पाहण्यांत आला. पापकानें त्याला त्याचें नांव विचारिलें, तेव्हां तो म्हणाला, ''माझें नांव पंथक (वाटाड्या).''
''तर मग तुम्ही या निर्जन प्रदेशांत काय करितां ?'' मी वाट चुकल्यामुळें इतस्ततः भटकत आहें. मला अद्यापि माझा मार्ग सांपडला नाहीं.''
''पण पंथक (वाटाड्या) वाट चुकतो हें कसे ? आहो हें केवळ नांव आहे. वाट चुकण्याचा आणि याचा कांहींच संबंध नाहीं. तुम्हीं नांवावर भरंवसा ठेवणारे वेडगळ मनुष्य दिसतां !''
पापक चांगल्या नांवाच्या गुणांविषयीं पूर्ण निराश झाला व आपलें नांव बदलण्याचा बेत त्यानें रहित केला. तेथून आपल्या गुरूजवळ जाऊन घडलेलें सर्व वर्तमान त्यानें त्याला निवेदन केलें. त्याच्या सोबत्यांनीं पापकानें कोणतें नांव शोधून आणलें आहे असा बोधिसत्त्वाला प्रश्न केला. तेव्हां तो त्याला म्हणाला ''जीवक मरतो, धनपालीला दारिद्र्य येतें, व पंथक वाट चुकतो, हें पाहून आमचा पापक चांगल्या नांवाचा थांग लागल्यावाचून परत आला.*'' पापकाचें तेंच नांव कायम राहिलें हें निराळें सांगावयास नकोच.
प्रतिक्रिया
7 Apr 2012 - 11:09 pm | पैसा
ही गोष्ट वेगळ्ता स्वरूपात ऐकली आहे.
लिंकसाठी धन्यवाद रे!
11 Apr 2012 - 9:19 pm | विकास
हेच आठवले... थोड्या अधिक फरकाने:
लक्ष्मी वेचते गोवरी, भिक मागतो धनपाल
अमरसिंह तो मर गया, सबसे अच्छा ठणठणपाळ!
लिंकसाठी धन्यवाद रे!
असेच म्हणतो.
7 Apr 2012 - 11:14 pm | जाई.
नावात काय आहे
7 Apr 2012 - 11:30 pm | निनाद मुक्काम प...
ह्या कथेच्या मर्माशी साधर्म्य असणारी मराठी म्हण
नाव सोनुबाई ,हाती कथलाचा वाळा
8 Apr 2012 - 3:27 am | बॅटमॅन
यक्कुशेठ, लिंकसाठी लै लै म्हंजे लैच धन्यवाद बरं का!!!!! थोबाडपुस्तकावर आत्ताच एक थोडं शेअर केलो बगा ;)
8 Apr 2012 - 9:27 am | प्रचेतस
लिंकबद्दल धन्यवाद रे येशा.
8 Apr 2012 - 1:06 pm | सोत्रि
छान!
आता आपले सदस्य नाव पुन्हा बदलणार नाही अशी आशा करतो ;)
- ( नावात खुप काही आहे असे वाटणारा ) सोकाजी
8 Apr 2012 - 2:30 pm | यकु
उद्याच मला सोकाजी १.२ असे नाव देण्याची विनंती करतो ;-)
8 Apr 2012 - 8:19 pm | रमताराम
अरे तुला किती धन्यवाद देऊ बाबा. दुव्याबद्दल दुवा घे बघू आमचा. शिंच्या या जातककथांच्या बरेच दिवस शोधात होतो, एका मित्राचे पुस्तक ढापण्याचा अविचार देखील क्षणभर येऊन गेला मनात (इथे दोन्ही कान पकडले आहेत). मूळ पुस्तक म. रा. सा. सं. मं. ने छापलेले असल्याने जन्मात कधी पुन्हा छापले जाण्याचा संभव नव्हता. इथे तीनही भाग आहेत. आता आमची चैन झाली की.
9 Apr 2012 - 9:39 am | कपिल काळे
नावात काय आहे? असे शेक्सपियर म्हणून गेला आहे.
नाव मोठे लक्षण खोटे अशी एक म्हण आहे मराठीत.
ह्याचाच प्रत्यय देणारी कथा.
कोसंबीच्या संस्थळाची लिंक देण्यासाठी ध्न्यवाद!
9 Apr 2012 - 9:54 am | स्वानन्द
साईटच्या दुव्याबद्दल खूप धन्यवाद यकु,
'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' या पुस्तकात धर्मानंद कोसंबींबद्द्लचा उल्लेख वाचला होता. पण त्याबद्दल फार काही शोधत बसलो नव्हतो. पण आता जालावरच एवढी माहिती आहे तर वाचायला नक्की आवडेल.
10 Apr 2012 - 5:27 am | स्पंदना
आवडल. अन दुवा ही खुप छान , आता मुलांना नविन गोष्टी साण्गता येतील.
11 Apr 2012 - 5:30 pm | कपिलमुनी
दुव्याबद्दल धन्स !!
11 Apr 2012 - 9:09 pm | स्मिता.
कथा आणि दुवा येथे दिल्याबद्दल धन्यवाद! कथा आवडली हे वे सां न.