कॉर्बेट, कौसानी, नैनिताल - भाग १

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in भटकंती
1 Mar 2012 - 5:24 pm

एडवर्ड जेम्स जिम कॉर्बेट अर्थात जिम कॉर्बेट शिकार्‍यांमधला सचिन तेंडुलकर होता. (तेंडुलकर क्रिकेटरांमधला जिम कॉर्बेट होता असे म्हणणे खरे म्हणजे जास्त सयुक्तिक आहे पण असे मिपावर लिहिणे फारसे शहाणपणाचे होणार नाही.). या माणसाने भारतीय वाघांवर फार मोठे उपकारही केले आहेत आणि अपकारही. आयुष्याच्या सुरुवातीस जिम कॉर्बेट शुद्ध शिकारी होता. त्याने ढीगाने वाघ मारले. त्यावर रसाळ भाषेत, उत्कंठावर्धक पुस्तकेही लिहिली. Leopard of Rudraprayag, Maneaters of Kumaon आणि देवळाचा वाघ (हे मी मराठीतुनच वाचले आहे फक्त) ही त्याची पुस्तके तर निव्वळ वाचन सुख. एक शिकारी, एक छायाचित्रकार एवढे छान, ओघवत्या शैलीत लिहु देखील शकतो आणि ते आज ६-७ दशकांनंतर देखील वाचनीय वाटते याचे खरोखर कौतुक वाटले होते.

सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज को असे काहितरी जिम कॉर्बेटच्या बाबतीत झाले असावे. नैनिताल मध्येच जन्मलेला तो. कुमाउ, गढवाढ, नैनिताल या भागांची त्याला सखोल माहिती. त्याला बेडर वृत्ती, साहसांची आवड आणि बंदुकीचा षौक यांची साथ मिळाली आणि एक अजरामर शिकारी जन्माला आला. पण नंतर जिम कॉर्बेटने केवळ नरभक्षक वाघांच्या शिकारी केला. वाघांना आणि इतर प्राण्यांना शूट करणे त्याने नंतरही चालुच ठेवले पण केवळ कॅमेरा हातात धरुन. आयुष्याचा उत्तरार्ध त्याने भारत आणि केनियात वनसंवर्धन आणि पशु संवर्धनासाठी खर्च केला. भारतातल्या वाघांची आणि केनियातल्या सिंहांची लक्षणीयरीत्या कमी होणारी संख्या त्याला अस्वस्थ करत गेली. त्यातुनच कॉर्बेट नॅशनल पार्कचा उदय झाला असे म्हणता येइल.

सुरुवातीला त्या अभयारण्याचे नावा हॅले नॅशनल पार्क होते मग त्याचे रामगंगा नॅशनल पार्क झाले आनी मग १९५७ सालापासुन जिम कॉर्बेटच्या नावाने ते ओळखले जाउ लागले. कॉर्बेट नेशनल पार्क खरोखर भव्य आहे. थोडेथोडके नाही ५२० स्क्वे. किमीवर हे पार्क वसलेले आहे. त्यातला ३२० स्क्वे कि चा परिसर १९७४ साली टायगर रिझर्व म्हणुन घोषित झाला. हे नॅशनल पार्क ३ राज्यांमध्ये विभागले गेलेले आहे आणि वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळी नावे लक्षात घेता त्याचा परिसर तब्बल १३०० स्क्वे मी पेक्षा जास्त आहे.

मी काही खर्‍या अर्थाने पर्यावरणप्रेमी नाही. म्हणजे पक्षी दिसला की अर्रे तो बघ ब्लॅक हॉर्नेट असे मी छातीठोकपणे सांगु शकत नाही. अंतर जास्त असेल तर कावळा आणि खंड्या पण मला एकसारखेच वाटतात. घार आणि गरुड यांची सरमिसळ करणे माझ्यासाठी अवघड नाही. गवती चहा आणि काँग्रेस गवत यातला फरकही मला नीटसा कळत नाही. तरीदेखील कॉर्बेटला जाण्याची, तो माहैल एंजॉय करण्याची मला मनापासुन उत्सुकता होती. त्या उत्सुकतेपोटीच असेल कदाचित पण चांगली कंपनी मिळाल्यावर मी कॉर्बेटला जायचा प्लॅन अगदी लगोलग पास करुन घेतला.

दिल्लीपासुन साधारण ७-८ तासांच्या रोड ड्राइव्ह नंतर कॉर्बेटला पोचता येते. राहण्याची व्यवस्था जंगलातील शासकीय विश्रामगृहात किंवा बाहेरील अनेको हाटेलांमध्ये होउ शकते. जंगलात रहायचे असेल तर बर्‍याच आधी व्यवस्था करणे बरे. आत राहण्याचा फायदा म्हणजे सकाळी लवकर फेरफटका मारायला बाहेर पडता येते त्यामुळे प्राणी जास्त दिसु शकतात आणि दुसरे म्हणजे निसर्गाचा पुरेपुर आनंद घेता येतो. जंगलाबाहेर राहणार्‍यांनाही सकाळी ६ ते १० या वेळात जंगल सफारी करता येतेच. चांगली गोष्ट अशी की त्यावेळेस नेशनल पार्कचा एक अतिशय प्रशिक्षित गाइडदेखील आपल्याबरोबर असतो. आम्हाला जो गाइड मिळाला होता त्याचे पशू पक्ष्यांचे, त्यांच्या आवाजाचे, पाउलखुणांचे ज्ञान थक्क करणारे होते.

सकाळी सकाळी ५ वाजता उठवुन ६ वाजता सफारीसाठी बाहेर पडायचा प्लॅन आम्ही आखलाच होता. त्याचे भान राखुन आम्ही ७ पर्यंत कडाक्याच्या थंडीत बाहेर पडलो. तरी प्राण्यांनी आमची फारशी निराशा नाही केली:

पार्कात सुरुवातीलाच याने आमचे स्वागत केले:

पार्कात फिरायचे तर कधी बाजुने वाहणार्‍या कोसी नदीच्या साथीने तर कधी तिच्या उदरातुन रस्ता काढतः

आमच्या आगमनाची वर्दी मिळताच आडुन आडुन सलामी ठोकण्यासाठी हजर झालेले गजराज. तुझे दात नाही पाडणार पण बाहेर ये असे भरघोस आश्वासन देउनही शेवटपर्यंत हा लाजत राहिला तो राहिलाच.

त्यामानाने ४०००० च्या संख्येने असलेल्या विविध जातीच्या हरणांनी मनसोक्त दर्शन दिले:

पक्षीराज गरुडदेखील मान वळवुन वळवुन आमच्याकडे बघत होते:

हे इतर काही पक्षी. कृपया नावे विचारु नका:

आम्ही येणार हे ऐकुन असल्याने व्याघ्रराजांनी बहुधा टेहळणीसाठी यांना पाठवले होते:

जंगल ट्रेल (ते फोटोत गाडीत उभे दिसतात ते अतिरेकी नव्हेत. थंडीने काकडणारे आमच्यासारखेच २ अभागी जीव होते)

पार्कात ठिकठिकाणी बांधलेल्या मचाणांपैकी एकातुन काढलेला हा लॅण्डस्केप फोटो:

जंगलच्या राजाच्या हेरांनी बहुधा बरोबर माहिती पुरवली होती. वाघ शेवटपर्यंत आमच्यासमोर यायला कचरत होता. शेवटी त्याचे पग मार्क्स बघुनच समाधान मानुन घेतले. वाघीण माझ्याबरोबरच होती त्यामुळे अजुन वेगळा वाघ अघण्यात असाही मला फारसा इंटरेस्ट नव्हता:

झाडांमधुन अल्लदपणे डोकावणारा आदित्यः

सकाळी ३-४ तास जीपमधुन फिरल्यावरही समाधान झाले नाही त्यामुळे संध्याकाळी परत हत्तीवर आम्ही आमची कृर दृष्टी वळवली (त्या एवढ्याश्या हत्त्तीवर माझ्यासारख्याने बसण्याचे पातक माझ्या हातुन घडेना. पण नाईलाज झाला. पापी पेट का सवाल था. हत्ती तयार झाला बिचारा. हत्तीवरुन सफारी हा एक आनंददायी अनुभव होता (आमच्यासाठी. हत्ती बिचारा काम के बोझ का मारा होता). कारण हत्ती ला जीपची लिमिटेशन्स नाहीत. तो बिचारा काट्याकुट्यांतुन, पाण्यातुन, बांबुच्या वनातुन, दाट झाडीतुन कुठुनही मुक्त संचार करु शकतो. तो मुळात स्वतःला जपतो त्यामुळे आपणही जपले जातोच. पिराब्लेम फक्त एकच. त्याचे मन मानेल तिथे तो मुक्तपणे थांबतो. आम्ही निघाल्यावर २च मिनिटात बाईसाहेब थांबल्या (हत्तीण होती, कलीना तिचे नाव). आम्हाला सुधरेना नक्की काय झाले. बर माहुताला विचाराबे तर तो देखील निवांत. शेवटी धीर करुन विचारल्यावर म्हणाला "हाथी पॉटी करेगा". मगापासुन भुकपाच्या आधी भुगर्भातुन जसे आवाज येतात तसल्या आवाजांचा उगम आत्ता कुठे आम्हाला कळाला. शेवटी ३-४ किलोने वजन कमी करुनच कलिनातै मार्गस्थ झाल्या.

हतीवरुन कोसी नदी (समोर नदीच्या पल्याड दिसणारे घोडे आहेत. हत्तीवर बसलेली गाढवे फोटोत येउ शकली नाहीत ;) )

कोसी नदीत मुबलक आढळणारे गोल्डन महासीर. एकेक मासा दहा दहा किलोचा आणि काही मासे तर चक्क २५ किलोचे. आमच्याबरोबर असणार्‍या काहींची संध्याकाळच्या जेवणात त्यांना पावन करायची खुप इच्छा होती पण हाटेलवाल्याने ठाम नकार दिल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले:

असेच काही फटु:

याहीखेपेला मुबलक दिसलेली हरणे / सांबर. चितळ. हत्तीला ती फारशी घाबरत नाहीत. जीपला घाबरतात. त्यामुळे यावेळेस जास्त जवळुन दर्शन दिले त्यांनी:

अनपेक्षितपणे दिसलेला अजगर. जिवंत होता की निजधामाला लागलेला होता हे कळण्यास काही मार्ग नाही. पण तो चांगला १५ फूटी आहे असे माहुताने सांगितले. त्याने ३० फूटी आहे म्हणुन सांगितले असते तरी आम्ही माना डोलावल्या असत्या:

आमची लाडकी कलिना :) :

वाटेत लागलेले एक छानसे रिसोर्टः

हे थोडे आमच्या रिसोर्टचे फटु (टायगर कॅम्प):

आमची कॉटेजः

रिसोर्टमधले निवांत ओपन रेस्तॉस्तॉ:

निवांत अंतर्गत रस्ते:

कॉर्बेट, कौसानी, नैनितालची सफर पुढे सुरु राहिल................. (दुर्दैव तुमचे) ;)

प्रतिक्रिया

मालोजीराव's picture

1 Mar 2012 - 5:48 pm | मालोजीराव

जिम कॉर्बेट म्हणजे शिकार या क्षेत्रातला अवलिया आणि वाघांसाठी कर्दनकाळच , मिलनासाठी उत्सुक असणाऱ्या वाघीणींचे आवाज काढून नरभक्षक वाघांना (बिचारे वाघ काय स्वप्ना रंगवून येत असतील ! ) बोलावून त्यांची विकेट टाकणारा शिकारी !
- मालोजीराव

५० फक्त's picture

1 Mar 2012 - 6:48 pm | ५० फक्त

मस्त रे म्रुत्युंजया, छान माहिती.

अवांतर -
मिलनासाठी उत्सुक असणाऱ्या वाघीणींचे आवाज काढून नरभक्षक वाघांना (बिचारे वाघ काय स्वप्ना रंगवून येत असतील ! ) बोलावून त्यांची विकेट टाकणारा शिकारी - हेच असंही लिहिता येईल ना,

सध्या आंजावर असे लेखक सुद्धा बरेच झालेत, वाचनासाठी उत्सुक असण्या-या वाचकांना हिट आणि हॉट शीर्षके टाकुन (बिचारे वाचक काय स्वप्ने रंगवुन येत असतील!), वाचायला लावुन त्यांची विकेट काढणारे लेखक. अर्थात इथं वाचकांना प्रतिसाद देता येतो हे नशीब आपलं.

अर्थात इथं वाचकांना प्रतिसाद देता येतो हे नशीब आपलं.

हॅ हॅ हॅ उलट इथल्या शिकारीच* अट्टल शिकार्‍याचा कधी कोथळा बाहेत काढतील त्याचा नेम नाही. ;)

हे घ्या शिकार्‍याचीच शिकार झाल्याचं ताजं ताजं उदाहरण.

* शिकारच अनेकवचन.
एक शिकार, अनेक शिकारी (एक तितली अनेक तितलीयाँ च्या चालीवर) ;)

गणपा's picture

1 Mar 2012 - 7:03 pm | गणपा

जंगल सफारी आवडली रे मृत्युंजया. प्रकाशचित्रांच्या जोडीला तुझी लेखणीची सोबत मिळाल्याने जरा जास्तच. :)
दिड-दोन वर्षामागे नैनितालला जाण्याचा योग आला तेव्हा जीम कॉर्बेट अभयारण्यालाही धावती भेट देण्यात आली. आत शिरल्यावर मात्र तिथे १-२ रात्री मुक्कामाला उतरायला हव होतं अस राहुन राहुन वाटत होतं. (जर कुणी भेट देणार असेल तर मी केलेली चुक करु नये येवढ्यासाठीच हे लिहिलं.)
अभयारण्यात फेरफटका मारताना वाघ दिसेलच अश्या अपेक्षेने जाऊ नये. तो दिसायला खरच भाग्य लागत. आम्ही त्याच्या केवळ डरकाळीवरच समाधान मानलं. हरणं आणि आपले पुर्वज मात्र कळपाच्या कळपाने हिंडताना दिसले.

नैनितालच्या भागाची वाट पहातोय रे.

प्रचेतस's picture

1 Mar 2012 - 7:22 pm | प्रचेतस

मस्त रे. फोटो आणि वर्णन लाजवाब.

अन्नू's picture

1 Mar 2012 - 7:39 pm | अन्नू

जिम कॉर्बेट म्हणजे आमचा आवडता शिकारी लेखक. :)
गेल्या वर्षी दिल्लीला गेलो होतो पण त्यावेळी या अभयारण्याची माहीतीच नव्हती.
पण आज आपण याची माहीती करुन दिली त्याबद्दल आपले आभार! Smiley

धन्या's picture

1 Mar 2012 - 7:54 pm | धन्या

मस्तच !!!

फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फीटले.

वर्णन भारी झाले आहे. फोटू मस्त.
वाघीण माझ्याबरोबरच होती त्यामुळे अजुन वेगळा वाघ अघण्यात असाही मला फारसा इंटरेस्ट नव्हता:
ही ही ही
शाळेला सुट्टी लागल्यावर जेवणखाण आवरून आख्खी दुपार कॉर्बेटची पुस्तके वाचण्यात घालवणे यासारखे सुख नाही. आणि आमच्या पिताश्रींनी मुलांची पुस्तके खरेदी करण्यात कधीच हात आखडता घेतला नाही. अजूनही माहेरी जाते तेंव्हा जेवण आटोपून देवळाचा वाघ आणि इतर नरभक्षक अशी पुस्तके घेऊन दुपार सत्कारणी लावते.काय आठ्वण जागी केलीस मृत्युंजया, देव तुझं भलं करो.

मेघवेडा's picture

1 Mar 2012 - 8:35 pm | मेघवेडा

वा... पुभाप्र..

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2012 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा...छान सफर घडलीये :-)

कॉमन मॅन's picture

2 Mar 2012 - 11:45 am | कॉमन मॅन

छान सचित्र लेख. सुरवातीचा मोराचा फोटो थोडा जवळून काढला असतात तर अधिक बरे झाले असते. इतर सारे फोटोही छान.

मृत्युन्जय's picture

2 Mar 2012 - 10:35 pm | मृत्युन्जय

आम्ही जीपमध्ये होतो. जीपचा आवाज ऐकुन मोर पळुन गेले. फोटो काढायला फारसा अवधीच नाही मिळाला. नंतरही मोर दिसले बरेच पण फोटो नाही काढता आले.

कॉमन मॅन's picture

3 Mar 2012 - 11:33 am | कॉमन मॅन

ओके..

काय झकास जागा आहे रे ही.. वर्णनही फक्कड जमून आलंय. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

जायचंय रे इथे.. टायगर कॅम्प रिसॉर्ट विषयी काय फीडबॅक आहे तुझा?

गरुडाचा फोटो काय खतरनाक आलाय रे... आणि मासे परतायला का नकार दिला हाटेलवाल्याने? फॉरेस्ट नियमानुसार संरक्षित / एन्डेन्जर्ड प्रजातीचे आहेत का हे मासे ?

मृत्युन्जय's picture

2 Mar 2012 - 10:33 pm | मृत्युन्जय

जागा झक्कासच आहे. अश्या जागांचे वैशिष्ट्य म्हणजे फोटो त्या वातावरणाला नीट दाद देउ शकत नाहीत. तो मुक्त सुगंध, मातीचा दरवळ. हवेतला गारवा, सकाळच्या धुक्याचा स्पर्ष हे सगळे कॅमेर्‍यात कैद नाही होउ शकत.

असो. टायगर कॅम्प अतिशय सुंदर रिसोर्ट आहे. इन्फिनिटी किंवा कॉर्बेट हाइड अवे त्याहुन चांगली आहेत. पण टायगर कॅम्प देखील खुप सुंदर आहे. सगळ्या कॉटेजेस हिरवाईने वेढलेल्या आहेत. आमच्या कॉटेजच्या वरांड्यातच झाड होते. बाजुला खुर्च्या टाकुन चा पिणे हा एक आनंददायी अनुभव होता. स्टाफ हसतमुख आणि कर्तव्यतत्पर होता. खोल्या स्वच्छ होत्या आणि नियमितपणे त्या तश्या केल्या जात होत्या. फूड खुप छान होते. स्प्रेड निवांत होता. सगळ्या जेवणांचा आणि आजुबाजुचा परिसर देखील सुंदर होता. माझ्यातर्फे १०/१०.

गोल्डन महासीर जरी नदीतले होते तरी पाळल्यासारखे होते. हॉटेलतर्फे त्यांना ठराविक वेळेस चिकन (हो हे मासे चिकन खायचे) आणि ब्रेड द्यायचे . त्यामुळे तिथे ते मोठ्या संख्येने गोळा व्हायचे. रिसोर्टची ती गेस्ट्स साठी एक ए़क्टिविटीच होती. त्यामुळे मासे मारुन खायला ते परवानगी देत नव्हते.

मिसळपाव's picture

4 Mar 2012 - 7:28 am | मिसळपाव

जिम कॉर्बेटची जवळ जवळ सगळी पुस्तकं वाचली आहेत. त्यावरून तरी "..सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज को असे काहितरी जिम कॉर्बेटच्या बाबतीत झाले असावे...." असं अजिबात वाटत नाहि. त्याचं 'My India' वाचलं आहेस का? नसल्यास जरूर वाच.

तुझ्या सफरीचं वर्णन मस्तच आहे. रिसॉर्ट काय झकास आहे रे! पुढिल भागाची वाट पहातोय.

फोलपट's picture

8 Mar 2012 - 1:03 pm | फोलपट

योगयोगाने इथे आले आणि अर्धे काम सोपे झाले. ह्या सुट्टित जायचा विचार करत आहोत. जीप सफारीचे आऱक्षण कुठे केले? २-३ दिवस पुरे होतिल का? ढिकाला च्या फॉरेस्ट रेस्ट हाऊस च्या बूकिन्ग बद्दल काही माहिती आहे का? धन्यवाद!

मृत्युन्जय's picture

9 Mar 2012 - 12:28 pm | मृत्युन्जय

कॉर्बेट पहायला तसे बघायला गेलात तर एक महिना पण कमी पडेल पण केवळ हौस आणि मजा म्हणुन प्रवास करणार्‍यांसाठी २-३ दिवस पुरे होतात. दिवस मोजताना आपण प्रवास कसा करणार आहात हे खुप महत्वाचे ठरते. उदा. दिल्लीहुन कॉर्बेट साधारण ७ - ८ तास साधारण. आमचा प्रवास असा होता:

१. सकाळी ५.५५ चे इंडिगो पुण्याहुन दिल्लीला. हे एक तास उशिरा पोचले.
२. त्यामुळे दिल्लीहुन निघायला १०.३० वाजले.
३. मध्ये नाष्टा करण्यात अर्धा पाऊण तास गेला. मग जेवणात तेवढाच वेळ गेला.
४. रस्त्यात एका गाडीला अपघात झाला होता. एक बाई निजधामास गेली. त्यामुळे संतप्त युपीकरांनी आख्खी बस पेटवली. असे तिथे बर्‍याच वेळा होते असे आमचा गाडीवान म्हणाला. त्यातही आमचा अर्धा एक तास गेला.
५. कॉर्बेटला ८ वाजता पोचलो.

एवढ्या उशिरा पोचल्यावर तिथे काहीही करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे जेवुन झोपलो. इटिनररी बघितल्यास आम्ही कॉर्बेटसाठी ३ दिवस ठेवले होते. प्रत्यक्षात १.५ दिवसच होतो. त्यामुळे कॉर्बेटला योग्य न्याय द्यायचा असल्यास चक्क आदल्या रात्री दिल्लीला पोहचा. सकाळी ६ ला निघा म्हणजे युपी रोड टॅक्स आणि परमिट मध्ये कमी वेळ जाइल. दुपारी जेवण्याच्या वेळेस पर्यंत तिथे पोचलात तर दुपारी ३ ची हत्तीची सफारी घेता येइल.

जीपची सफारी सकाळी ६ ते १० या वेळात होते. दुपारीदेखील करता येते. त्याचे बूकिंग आंतरजालावरुन १४ दिवस आधीपासुन शक्य आहे. मात्र आम्ही आमच्या रिसोर्टलाच ते करायला सांगितले होते.

जीप सफारी: रु. ३५००. पुर्ण जीपसाठी यात ४ ते ६ माणसे बसु शकतात. पण आयडीयली ४ पेक्षा जास्त माणसांनी बसु नये.

हत्ती सफारी: रु. ३०००. ४ लोकांसाठी.

आपण ४ /६ लोक नाही जमवु शकलो तर खर्चात अर्थात शेयरिंग होत नाही. लोक जमवण्याची जबाबदारी जंगल प्रशासनाची नसते. जमले तर उत्तम. नाही तर सगळा खर्च तुमच्यावर.

कॉर्बेट बरोबर एक दिवस मुक्तेश्वर जरुर करावे. फार सुंदर आहे असे ऐकुन आहे. आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता.

आधिक माहितीसाठी कृपया व्यनि अथवा खरड करणे

पैसा's picture

8 Mar 2012 - 5:36 pm | पैसा

आणि फोटो क्लासच!

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 5:55 pm | वपाडाव

अ हा हा !!!

पियुशा's picture

9 Mar 2012 - 11:33 am | पियुशा

मस्त मस्त सफारी ,"कलिना" विषेश आवड्ली ,क्युट दिसतेय अगदी ;)
आमच्या नशीबी असे योग आहेत की नाही ते माहित नै ;)
"पण तूर्तास फोटो पाहुनच समाधान जाहले " ;)

फोलपट's picture

2 Jul 2012 - 5:09 pm | फोलपट

पण ह्यावर्षी जमले नाही. दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा प्रयत्न करू. धन्यवाद!

चौकटराजा's picture

2 Jul 2012 - 5:22 pm | चौकटराजा

दिवाळीच्या सुटीत जाणार्‍यानी अगोदर हे पार्क उघडे असल्याची खात्री करावी. त्याची माहिती घरून निघण्यापूर्वीच घ्यावी. या बरोबरच असेहू सुचवावेसे वाटते की भूवनेश्वर जवळील " नंदन कानन" या ही ठिकाणास भेट द्यावी. पुण्याच्या पेशवे उद्यानातील पांढरा वाघ हा नंदनकाननचा नागरिक आहे. तिथे ही रस्त्यावरून येणारे जाणारे सिंह व वाघ पहावयास मिळतात.