चाळीशीत शिरलं की आपल्या आयुष्याचा डाव परत मांडावासा वाटतो (अर्थात, काही सोंगट्या न हलवता.) मग आपल्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींचा आपण शोध घ्यायला लागतो. माझे पण असेच झाले. आणि शोध घेता घेता अचानक एके दिवशी मला माझा आवडणारा पण राहून गेलेला एक छंद अगदी कडकडून भेटला. क्रोशे.
शाळेत निर्माण झालेली माझी लोकरीचे विणकाम करण्याची आवड बरीच टिकून राहिली, पण क्रोशे मात्र कुठल्यातरी वळणावर माझे बोट सोडून निघून गेले. शाळेत असताना मी क्रोशे शिकले होते पण नंतर का कुणास ठाऊक, मी परत त्या वाटेला गेले नही. आता इतक्या वर्षानंतर मला क्रोशेकाम अजिबात आठवत नव्हते. खांब ... मुका खांब...सगळे काही विसरायला झाले होते. क्रोशामध्ये गोल अथवा चौकोनी आकार देणे मला तेव्हासुद्धा येत नव्हते.
आणि अचानक एक दिवस् हे सगळे पुन्हा एकदा नव्याने शिकायची इच्छा झाली. मग मी क्रोशाचे पुस्तक विकत आणले. पण पुस्तक होते इंग्लिश मधून. सुरवातीला फारच अवघड गेले. प्रत्येक इंग्रजी शब्दाला “काय बरं म्हणत होतो याला?” असा विचार करकरून शाळेत शिकवलेले मराठी शब्द आठवताना डोक्याचा अगदी भूगा झाला. शेवटी आठवणींचा तो भाग प्रयत्नपूर्वक विसरून, परत पहिल्यापासून इंग्रजीमधून क्रोशे शिकायला सुरुवात केली.
सुरवातीला चुकण्या बाबतीत मी अगदी सातत्य राखून होते. एक गोष्ट सरळ झाली असेल तर शप्पत. एखादा टाका वाढल्याने चौकोन आपली भूमितीची व्याख्या विसरायचा. बाहुली केली तर ती बाहुली सोडून इतर सगळे काही वाटत होती पण काही केल्या बाहुली वाटत नव्हती (माझा मुलगा त्याला रॉकेट म्हणाला होता. त्याकरता मिळालेला गुद्दा अजूनही तो विसरला नही आहे). हत्ती केला तर सोंड आणि शेपूट सारख्याच जाडीची दिसू लागली. दोन दोन तास खपून केलेला pattern जेव्हा चुकलाय असे जाणवायचे आणि तो दोन मिनिटात उसवला जायचा, तेव्हा माझा नवरा आणि मुलं कमीत कमी तासभर तरी माझ्या वाऱ्याला फिरकायचे नाहीत. पण एवढे होऊनही माझा उत्साह काही कमी झाला नही.
मग हळू हळू, चुकत माकत का होईना, वस्तूंना आकार येत गेले. इंग्लिश मधून लिहिलेले patterns समजू लागले. गोलाकार, चौकोनी, आयताकृती असे अनेक आकार देता येवू लागले. आणि अखेर जमलं. मी बनवलेल्या वस्तूंना योग्य वळण येऊ लागले. त्यात सफाइतदारपणा दिसू लागला. ज्या दिवशी बेडूक बेडकासारखा आणि बदक बदकासारखे (अगदी पिवळ्या चोचीसकट) दिसू लागले त्या दिवशी एकदम उत्साहात येऊन मी परत दुकानात गेले आणि अनेक प्रकारची लोकर, बऱ्याचश्या सुया, मार्कर्स आणि अजून एक क्रोशावारचे नवे पुस्तक घेवून आले. खूप काही वस्तू बनवाव्यात असे वाटू लागले. एका पाठोपाठ मी पुस्तकातल्या सगळ्या वस्तू करून पहिल्या.
पण पुस्तक संपल्यावर काय? आता माझा अगदी परीकथेमधला सतत काम मागणारा राक्षस झाला होता. मग अगदी स्वाभाविकपणे मी गुगल कडे वळले. तिकडे तर क्रोशाविषयी प्रचंड मोठा खजिनाच मिळाला. मी इकडे आधी कशी वळले नही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. अगदी अथ पासून इति पर्यंत सगळे काही तर इंटरनेट वर होते. प्राथमिक धडे गिरवण्या पासून ते प्रोफेशनल होण्याकरता लागणारी सगळी माहिती, फोटो, व्हिडीओ. राक्षसाला उसंत घ्याला वेळ मिळे ना. अनेक छोट्या मोठ्या वस्तू बनव्याला मी सुरुवात केली.फुले, पाने, चांदण्या, पर्सेस, स्कार्फ.....एका पाठोपाठ एक ...... रोज गुगलून काढून नवीन कल्पना मिळवत होते. अनेक नवीन गोष्टी मला खुणावत होत्या. मला काय करू अन काय नको असे होवून गेले.
आणि माझा प्रवास चालूच राहिला. गेले वर्षभर क्रोशाने मला खूप आनंद दिला. आता या छंदाचा हात मी अगदी घट्ट पकडला आहे. यात मी अगदी हरवून जाते. एखाद्या दिवशी क्रोशे नही केले तर चुकल्यासारखे वाटते. आणि एखादी नवीन वस्तू करायला घेतली की इतर काही सुचत नही. मला छोट्या वस्तू बनवायला जास्त आवडते. काही काही गोष्टी मस्त बनवल्या आहेत – वेगवेगळ्या भाज्या, चॉकलेट, कप बशी ,परी...... सध्या तरी इंटरनेटवर मिळणारे patterns पाहून मी त्याप्रमाणे वस्तू बनवते. पण मला स्वतःचे patterns बनवायचे आहेत.
या सगळ्या प्रवासात मला सगळ्या जास्त आनंद याचा झाला की मी हे सगळे स्वतःचे स्वतः बरेच प्रयत्न करून शिकले. धडपडत, चुकत माकत, कधी कधी अगदी जोरात नाकाडावर आपटून पडत शिकले. ही शिकण्याची process मला परत एकदा आत्मविश्वास देउन गेली की मी अजून काहीतरी नवीन शिकू शकते आणि त्यात प्राविण्य मिळू शकते.
ऋणनिर्देश
http://www.crochetspot.com/free-crochet-pattern-box/
प्रतिक्रिया
27 Feb 2012 - 9:31 am | पियुशा
आयला भारिच की ,अजुनही फोटो असतील ना तुमच्या कलाकुसरीचे
ते पण द्या की इथे जास्ती मजा येइल :)
( हम्म ..मी पण क्रोशे शिकेन म्हणते ) ;)
27 Feb 2012 - 12:46 pm | जयवी
फारच सुरेख झालाय डबा :)
लिखाणही खूप आवडेश :)
27 Feb 2012 - 1:44 pm | कवितानागेश
हा बॉक्स बघून शिकायची इच्छा होतेय...
पण चाळिशीपर्यंत वाट बघेन! ;)
27 Feb 2012 - 1:45 pm | पिंगू
आता मात्र कलाकुसरीची साथ जोरात पसरायला लागलेली आहे.. यात तिळमात्र शंका नाही.
स्पर्धा वाढवा.. ;)
- पिंगू
27 Feb 2012 - 8:38 pm | रेवती
पारूबाई,
लेखन अगदी मस्त झालय.
आणखी क्रोशेकामासाठी शुभेच्छा.
मला क्रोशे कधीही जमले नाही.
शाळेत शिवणाच्या तासाला बाईंनी लेस तयार करून आणायला सांगितली होती ती आईनं करून दिली.
क्रोशे, टॅटिंगसारख्या कलाकुसरीच्या वस्तू म्हटले की जयवीताईची आठवण येते तशी आता तुमचीही येईल.
28 Feb 2012 - 12:49 am | पैसा
मस्त खुसखुशीत लेख! तुमच्या कलाकृतींचे फोटो आणखी द्या की! करायचा प्रयत्न करू की नाही माहीत नाही, पण बघून तुमचं कौतुक नक्कीच करू!! :)
28 Feb 2012 - 2:43 am | प्राजु
वाहवा!!
लेख सुंदर झाला आहे.
माझ्या शाळेतल्या हिंदीच्या शिक्षिका म्हणायच्या.. "अपनी ऑंख खुली.. तब सुबह...!!" म्हणजे.. जेव्हा आपल्याला समजते की हे करायचे आहे शिकायचे आहे तेव्हा ती सुरुवात असते..
लेख आणि डब्बा आवडला.
28 Feb 2012 - 10:27 am | पारुबाई
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
आता अजूनच उत्साह वाढला आहे क्रोशे करण्याचा.
@पियुशा....लवकरच इतर कलाकृतीचे फोटो टाकणार आहे.क्रोशे खूप सोपे आहे शिकायला आणि इंटरनेट वर,you tube वर खूप मदत पण मिळेल.धन्यवाद.
@जयवी....धन्यवाद ग !
@लीमाउजेट ...शुभस्य शीघ्रम ! आणि धन्यवाद देखिल.
@पिंगू... धन्यवाद
@रेवती ....अहो, निश्चित जमेल.एकदा करून बघा .धन्यवाद.
@पैसा ...धन्यवाद हं !
@प्राजु...धन्यवाद २ वेळा. पहिला म्हणजे प्रोत्साहन दिल्या बद्दल आणि दुसरा
खूप दिवसांनी एक चांगले वाक्य सुभाषितांच्या वहीत लिहायला मिळाल्याबद्दल.
अपनी ऑंख खुली.. तब सुबह..
28 Feb 2012 - 6:25 pm | कुंदन
फारच छान प्रकार दिसतोय हा "क्रोशे "
धाग्याच्या नावात "नवा छंद" वाचल्यावर , शिल्पा ब तैंना हा नवा छंद लागला की काय असे अंमळ वाटुन गेले.
29 Feb 2012 - 9:09 am | शिल्पा ब
हॅ हॅ हॅ!! अहो आम्हालाही हा छंद लागलाय अन तो पण या पारुबाईंनी केलेल्या वस्तु पाहुनच.
हा त्यांनी केलेला डबा तर फारच छान आहे. मी आत्ता कुठे फुलं वगैरे करतेय. नाही म्हणायला एक पर्स केलीये. :)
म्हणुनच व्हीडीओ हवे असतात. कळ्ळे का? ;)
29 Feb 2012 - 7:26 am | इन्दुसुता
पारूबाई लेख उत्तम उतरलाय.
क्रोशे बॉक्स आवडला.
परीकथेमधला सतत काम मागणारा राक्षस
ही ही ही.
वाचून अत्यानंद झाला. ( माझ्याप्रमाणेच कुणीतरी आहे हे ऐकून.... )
मला दोन मिनिटे ही स्वस्थ बसायला सांगितले तर ती शिक्षा वाटते. :) :)