पानगळीचे वैभव
**********************************
*
मस्त सुस्त महिने ग्रीष्माचे । मंद रात्रिचे, दिन उष्म्याचे
दवबिंदूमात्रावर जगती । हिरव्या वल्ली हिरव्या जगतीं
*
उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी!
खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती
*
दमून दंगुन उन्हात गुंगुन । चराचर जणू निवांत बैसुन -
पेंगुळलेला निसर्ग करितो । पेंगुळलेल्या कुतूहला तो
*
अक्तूबरस्य प्रथमे दिवसे । शिरशिर वारे घेऊनि वळसे
झाडाझाडापाशी सांगीं । हेमंत-शिशिर तिष्ठतिं रांगीं
*
त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली
दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्ण करी कधि शीतळ श्वासा
*
पर्णधनाची क्षणभंगुरता । वनस्पतींच्या मनात येतां
लोलुपतेची तृप्ती होउन । दिलखुलास धन देती उधळुन
*
रंगुन तरुवर भरभरलेले । जर्द, लाल, अन निळे-जांभळे
नव बहरा जर डोळे बघती । नच गुंजारव भुंगे करती
*
स्पर्शुनि परीस का ही सृष्टी । स्वर्णिम झाली यष्टी यष्टी?
मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा?
*
का वणवा वन खांडव करतो । बहुरंगी तरुंवरि धगधगतो?
चेतवलेले मग हे भूतळ । उच्छ्वासा का करते शीतळ?
*
शाखांवरती सोने उगवुन । सहस्र हस्तें देती शिंपुन
तरु पानांचा करुनी पात । वर्खाने भू पांघरतात
*
शिशिरीं लेतिल दैगंबर्या । धरतिल आणिक तापस चर्या
हिमधवला जटजटिला गुंफुन । ऋतुचक्राचे करतिल चिंतन
*
या स्वर्णाची माती होइल । का केवळ विस्मरली जाइल?
छे! तो वसंत हिरवळ आणत । गतवर्षींची स्मरविल दानत!
*
**********************************
प्रतिक्रिया
29 Oct 2007 - 8:17 am | सहज
छान वाटली कविता. एकदम सोपी वाटली. गहन अर्थ बघायला परत वाचतो थोड्यावेळाने. :-)
एखादा पानगळीचा किंवा पानगळ सुरू व्हायच्या आधीचा फोटो टाकलात तर अजून मजा येईल का? मला ते वेगवेगळे रंगाची पाने असलेली वृक्षरांग (अमेरीकन) बघायला मजा येते.
29 Oct 2007 - 10:17 pm | चित्रा
का वणवा वन खांडव करतो । बहुरंगी तरुंवरि धगधगतो?
चेतवलेले मग हे भूतळ । उच्छ्वासा का करते शीतळ?
हे खासच.
तुमची कविता सुंदर आहे आणि ज्यांनी फॉल पाहिला नाहीय त्यांना पानगळीची "कल्पना" करता आली तर छानच (आपल्याकडेही या सुमारास थोडी पानगळ होतेच, रंग कदाचित तुमच्या "वणव्या"सारखे नसतील), पण त्यांना थोडीशी झलक मिळावी म्हणून - हे फोटो (मी काढलेले नव्हेत, जालावरचे). यावेळी फॉल कलर्स बघायला जायला झाले नाही अजून, नेहमी जातो आम्ही, पण बहुतेक यावेळी ती संधी हुकणार असे दिसते आहे - रस्त्यातून जाताना जे काही दिसतील तेवढेच.
आणि अजून एक.
29 Oct 2007 - 10:44 pm | धनंजय
अगदी हे असेच. मागच्या वर्षी पाहिले असले तरी दर वर्षी डोळे थक्क करतात हे रंग.
धन्यवाद, चित्रा...
30 Oct 2007 - 1:11 am | विसोबा खेचर
अतिशय सुंदर चित्रे!
यांचं flames in forest' हे नांव सार्थ आहे!
आपला,
(फॉरेस्टप्रेमी!) तात्या देवासकर.
29 Oct 2007 - 8:35 am | विसोबा खेचर
उनाड खारी, त्यांच्या कानीं । कुणी सांगिली, काय कहाणी!
खेळ टाकुनि अर्ध्यावरती । दाणा शोधित तुरुतुरु फिरती
या स्वर्णाची माती होइल । का केवळ विस्मरली जाइल?
छे! तो वसंत हिरवळ आणत । गतवर्षींची स्मरविल दानत!
वरील ओळी सर्वात जास्त आवडल्या..
अतिशय सुरेख निसर्गकविता..बालकवींनाही आवडावी अशी! :)
तात्या.
29 Oct 2007 - 9:02 am | नंदन
नुकतेच फॉल कलर्स पाहून आल्याने कविता अधिकच आवडली. मर्ढेकरांची शिशिरागम (शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावया...) आठवली.
[अवांतर - शिशिरीं लेतिल दैगंबर्या यात दैंगबर्या असे हवे का? विचित्र-वैचित्र्य सारखा दिगंबर - दैगंबर्य/दैंगबर्य शब्दप्रयोग तुम्ही योजला असावात असे वाटते. हा नवीन शब्द आवडला. व्याकरणदृष्ट्या माझे म्हणणे किती बरोबर आहे, माहीत नाही. केवळ उच्चार दैगंबर्य असावा असे वाटले. छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व.]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
29 Oct 2007 - 9:22 am | धनंजय
ते आधीचे चुकीचे टंकलेले होते - आता सुधारले. चर्याशी यमक जुळवले आहे. शिवाय आदल्या टंकनदोषाने एक मात्राही कमी पडत होती!
छिद्रान्वेषण मुळीच नव्हे - धन्यवाद!
29 Oct 2007 - 9:30 am | आजानुकर्ण
कविता आवडली. अक्तूबरस्य हा शब्द मस्त.
(आनंदित) आजानुकर्ण
स्वर्णिम झाली यष्टी यष्टी?
शिशिरीं लेतिल दैगंबर्या
ह्या दोन वाक्यांचे अर्थ फारसे झेपले नाहीत
(प्रश्नाळू) आजानुकर्ण
29 Oct 2007 - 9:39 am | धनंजय
यष्टी म्हणजे दांडी - क्रिकेटमधला "स्टंप आऊट" म्हणजे "यष्टीचित"!
स्वर्णिम झाली यष्टी यष्टी = प्रत्येक दांडी सोनेरी झाली
दिगंबर = (दिशा हेच वस्त्र असलेला) नग्न, दैगंबर्य = नग्नता, लेतील = वस्त्र घालतील
शिशिरात (तरू) नग्नतेचेच वस्त्र करून घालतील.
29 Oct 2007 - 9:52 am | आजानुकर्ण
वा!
शिशिरीं लेतिल दैगंबर्या चा अर्थ जसा अंदाज बांधला होता तसाच आहे.
पण यष्टीचा वापर कवितेत पाहून आऊट झालो.
(यष्टीचीत) आजानुकर्ण
29 Oct 2007 - 2:09 pm | बेसनलाडू
मस्त चित्रमय कविता. आवडली.
(वाचक)बेसनलाडू
29 Oct 2007 - 4:13 pm | स्वाती राजेश
कविता खुपच सुंदर आहे.
29 Oct 2007 - 10:33 pm | सर्किट (not verified)
वा धनंजयराव !
त्या वार्तेने गडबड झाली । नेणति अवघी सृष्टी झाली
दिनरजनीचा गोंधळ खासा । उष्ण करी कधि शीतळ श्वासा
ऑक्टोबर हीट (इंडियन समर, विश्वामित्री उन्हाळा) ला सृष्टीच्या नेणते होण्याच्या वेळी तिचा उडलेला गोंधळ हे रूपक देणार्या तुमच्या प्रतिभेला सलाम !!!!
- सर्किट
30 Oct 2007 - 12:42 am | प्राजु
सध्या फॉल चालू आहे... सगळीकडे खरंच स्वर्णिम आहे...
कविता अगदी खास आहे....
स्पर्शुनि परीस का ही सृष्टी । स्वर्णिम झाली यष्टी यष्टी?
मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा?
हे अगदी खासचं...
आणि
शाखांवरती सोने उगवुन । सहस्र हस्तें देती शिंपुन
तरु पानांचा करुनी पात । वर्खाने भू पांघरतात
अफाट कल्पना..........
प्राजु.
30 Oct 2007 - 11:17 pm | सुवर्णमयी
कविता आणि त्यातील कल्पना जोरदार आहेत!
27 Mar 2009 - 4:33 pm | लिखाळ
वा वा वा .. काय सुंदर ! फार सुंदर !
त्या वार्तेने गडबड झाली । --> हिमधवला जटजटिला गुंफुन । ऋतुचक्राचे करतिल चिंतन --- > या स्वर्णाची माती होइल । का केवळ विस्मरली जाइल?
या कडव्यांतले वर्णन आणि त्यांचा कवितेतला क्रम केवळ अप्रतिम.
कविता फार आवडली.
यष्टीच्या बाबतीत अजानुकरणासारखेच यष्टीचित :)
अक्तूबरस्य हा शब्द मजेदार.
नंदन प्रमाणेच शिशिरागमन ही कविता आठवली. त्याच कवितेत किंवा 'गळण्याआधी' या नावाच्या कवितेत राळांचा फाग घेऊनी असे काही शब्द होते. त्यांची आठवण झाली. चित्रा यांनी टाकलेली चित्रे छान आहेत.
मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा?
याचा अर्थ काय? मग सुवर्णा सौरभ कैसा? दंव भिजल्या पर्णाली जैसा ! असा अर्थ आहे का?
प्रमोद देवांनी त्यांच्या या लेखात दुवा दिल्याने ही कविता नजरेस पडली. देवबाप्पांचे आभार !
-- लिखाळ.
28 Mar 2009 - 1:00 am | धनंजय
त्या एकदोन कडव्यांमध्ये नेहमीच्या काही "त्याच त्या" उपमा आधी दिल्या आहेत. आणि मग त्यापेक्षा पानगळ औरच काही आहे, त्या उपमा कमी पडतात, असे सुचवले आहे.
प्रत्येक ठिकाणी डोळ्याला झालेल्या वेगवेगळ्या भासाचे खंडन कान/नाक/स्पर्शेंद्रिय करते. प्रत्येक ठिकाणी उपमेचा नकार प्रश्नाने केला आहे -
वणावा असेल तर हा शीतळ उच्छ्वास कसा?
बहार असेल तर भुंग्यांचा गुंजारव कसा नाही?
सोने असेल तर त्याला पर्णालीचा सुगंध कसा?
म्हणून वरीलप्रमाणे विरामचिह्ने ओळीत आहेत :
मग सुवर्णा सौरभ कैसा - । दंव भिजल्या पर्णाली जैसा?
बहुधा या 'उत्प्रेक्षा-अपह्नुती' जोड्या आहेत, आणि या अलंकाराला दुसरेही काही नाव आहे (पण कविता लिहिली तेव्हा मला हे माहीत नव्हते).
27 Mar 2009 - 4:47 pm | चतुरंग
केवळ अप्रतिम काव्य! अत्यंत नादमय काव्य!!
ओळन ओळ सुंदर. तुमच्या प्रतिभेला अनेक सलाम!
(मलातर जागोजागी शंकराचार्यांचे एखादे निसर्गस्तवन वाचतो आहे की काय असा भास होत होता!! :) )
(प्रमोदकाकांच्या लेखनातल्या दुव्यामुळे तुमचे काव्य वाचनात आले त्यांचे अनेक आभार!)
चतुरंग
27 Mar 2009 - 4:55 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!!
देवकाका, धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
27 Mar 2009 - 8:31 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
=D> =D> =D> =D> =D>
खराटा
(रंग माझा वेगळा)
27 Mar 2009 - 9:08 pm | यशोधरा
सुरेख आहे काव्य!
30 Mar 2009 - 11:13 am | सुमीत भातखंडे
खूपच छान काव्य आहे.
मी पण नव्हतं वाचलं आधी.
देव काकांमुळे दुवा मिळाला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.