तिचा नवरा -१

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जे न देखे रवी...
15 Nov 2011 - 11:56 am

काही ओळख वगैरे नव्हती आमची.
भेटला तसा अपघातानंच.
'बायको माझी...' म्हणाला
'हुषार आहे अगदी'
हसलो मी.
'बायका असतातच हुषार'
म्हणालो
'नाही, पण ही..' तो म्हणाला
'अ‍ॅक्टिव्ह हो अगदी
सकाळी जिम. न चुकता
घरी तर लक्ष इतकं
सगळ्यांच्या तब्येती, मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, फळंबिळं..
माझ्याकडं बघताय ना? वाटतो का पन्नाशीचा?
मुलांचं होमवर्क अगदी रोजच्या रोज
रेग्युलर आहे तशी ती सगळ्यातच
आणि पर्टिक्युलरही
एखादी सिग्रेट ओढायचो लग्नाआधी
पण आता तीही सोडायला लावली तिनं मला
तशी स्कॉचबिच असते घरी
येणार्‍या जाणार्‍यांसाठी
मी नाही घेत कधी -सवय लागेल म्हणते ती
बीअर घेतो कधीतरी हळूच एखादी
शुक्रवारी संध्याकाळी
पण हिला वास नाही हो आवडत बीअरचा
वाचनबिचन जबरदस्त आहे हं हिचं
आणि माहितीही किती
नेटवर तर कायकाय वाचत असते ही
लिहितेही म्हणे
कुठलीशी कम्युनिटी आहे तिची...
शिवाय जॉब आहेच
सोशल नेटवर्किंगही जबरदस्तंय तिचं
तिच्या मैत्रिणींची गेट-टुगेदर्स होतात ना आमच्याकडेच
माझे? हो, हो, आहेत ना मित्र
बिझी असतात हो पण सगळेच,
आणि त्यांच्या बायकांशी विशेष जमत नाही हिचं
कधी बोलवावं म्हटलं त्यांना की मग त्या गप्पा, जाग्रणं..
सकाळी लवकर उठायचं असतं ना हिला जिमसाठी
रविवारीही
मग जाग्रणं नको म्हणते ही
म्हणून तर हल्ली...... नाहीच
मग तसं नाहीच होत भेटणं कुणाला
इच्छा असूनही...'
सांगत राहिला असता अजूनही काही
पण फोन वाजला अचानक त्याचा..
'हो, अगं निघालोच आहे, पोचतो, पोचतोच...
सॉरी, व्हेरी सॉरी हं...
अं? काय? विवेक? अगं विवेक कुठला भेटणार? आणि सांगितलंय ना तुला एकदा
त्याला नाही भेटणार म्हणून... मग? हो, हो, आलो, आलोच.. बाय ..'
हातातल्या फाईलमधून घाईघाईत
कागद घसरला एक
उचलून देताना लक्ष गेलं माझं
प्रिस्क्रिप्सन होतं कुठल्याशा
नवीन अँटीडिप्रेसंटचं...
तो अवघडला
'अहो, चालायचंच..' मी म्हणालो
'त्यात काय?
इतक्या ब्रिलियंट लोकांना.. होतात असे काही त्रास..
काळजी घ्या मिसेसची'
म्हणालो.
'होतील बर्‍या'.
'ते .... औषध...' तो चाचरला
'माझं आहे ते औषध...'
म्हणाला.

करुणविनोद

प्रतिक्रिया

करूण विनोदी किंवा विनोदी करूण मुक्तक आवडले.

सोपा फुलटॉस?
'त्याची बायको -१... आणि एकच' लिहायचा मोह अनावर होत आहे. ;)
पण ते असो. कुणीतरी 'मेल शोव्निस्ट पिग' असे काहीसे पुटपुटल्याचे ऐकू आल्याने गप्प बसतो...

प्रभाकर पेठकर's picture

15 Nov 2011 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

मुक्तक सुंदर आहे. पण त्याने इतके डिप्रेस का व्हावे?? विचार करायला लावणारे आहे.

मन१'s picture

15 Nov 2011 - 2:17 pm | मन१

वाइट वाटले काकांबद्द्ल

नगरीनिरंजन's picture

15 Nov 2011 - 2:22 pm | नगरीनिरंजन

मेष किंवा वृश्चिक राशीची असावी बायको आणि तिचा नवरा कन्या, कर्क किंवा मकर. :)
'तिचा' नवरा हे फार गंभीरपणे घेणार्‍या बायकोच्या नवर्‍याची कविता छान आहे.

शुचि's picture

15 Nov 2011 - 10:06 pm | शुचि

हाहा!!

राशीरंजन कार्यक्रमात वृश्चिक राशीची कोळीण आणि तिच्या शेजारी येऊन बसलेला कर्क राशीचा पुरुष यांच्याबद्दल उपाध्ये गंमत सांगतात. ही कोळीण होती जाडजूड, ऐस्पैस बसलेली एका बसमध्ये. तिच्या शेजारी हा पुरुष येऊन बसला तर साहजिकच धक्का लागला जरासा. तेव्हा ती त्याला अद्वातद्वा बोलू लागली. आता कर्क राशीचे लोक लगेच रडवे होतात ..... तो म्हणाला "असं काय करता? तुम्ही मला आईसारख्या."
ही कोळीण वृश्चिक राशीची, फटकळ, त्याला म्हणाली - "आँ!! तुझा बाप केव्हा आला होता माझ्याकडे?" =))

परिकथेतील राजकुमार's picture

15 Nov 2011 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार

वेगळीच कथा मांडणारे पद्य.

पैसा's picture

15 Nov 2011 - 2:49 pm | पैसा

ती, आणि तिचा नवरा दोघांसाठी :( . वरून सगळं ठीक दिसलं तरी आतली विसंगती विनोदाच्या आवरणात छान पकडली आहे. आणि हे दोन्ही बाजूनी होऊ शकतं. तसंच अति कर्तबगार माणसांची मुलं बरेचदा अतिसामान्य निघतात, त्यामागे हेच कारण असतं बरेचदा.

शीर्षकातला '१' आकडा आणखी असंच काही वाचायला मिळणार आहे याची हमी देतो आहे! लवकर लिहा!

ऋषिकेश's picture

15 Nov 2011 - 2:54 pm | ऋषिकेश

!

तिचा नवरा-२ च्या प्रतिक्षेत

छोटा डॉन's picture

15 Nov 2011 - 3:43 pm | छोटा डॉन

>>तिचा नवरा-२ च्या प्रतिक्षेत

हेच म्हणतो.
पुढचा भाग लवकर यावा ह्या प्रतिक्षेत आहे.

- छोटा डॉन

मदनबाण's picture

15 Nov 2011 - 3:37 pm | मदनबाण

भाग २ ची वाट पाहतो.

स्मिता.'s picture

15 Nov 2011 - 3:43 pm | स्मिता.

ही अशी विसंगती बर्‍याचवेळा बघायला मिळते.
पुढचा भागही लवकार येवू द्या.

येवुद्या आनखिन... वाचतो आहे

विजुभाऊ's picture

15 Nov 2011 - 8:17 pm | विजुभाऊ

वाचनबिचन जबरदस्त आहे हं हिचं
आणि माहितीही किती
नेटवर तर कायकाय वाचत असते ही
लिहितेही म्हणे
कुठलीशी कम्युनिटी आहे तिची...

हम्म.....

धनंजय's picture

15 Nov 2011 - 10:26 pm | धनंजय

त्याच्या व्यथेचे त्याच्या बाजूने केलेले वर्णन वाचून वाईट वाटले.

"जोडीदारी सफल आहे का?" याचे उत्तर व्हीटो-शैलीचे असते. सर्व जोडीदारांनी "सफल" असा कौल दिल्यास जोडीदारी सफल. फक्त एका जोडीदाराने "असफल" असे ठरवल्यास जोडीदारी असफल.

त्यामुळे बायकोची बाजू ऐकून न घेतासुद्धा ही जोडीदारी असफलच मानावी लागते.

लेखनाची शैली गमतीदार आहे.

शेवटाच्या ओळी "कलाटणी" असावी अशा शैलीत लिहिलेल्या वाटतात.

'ते .... औषध...' तो चाचरला
'माझं आहे ते औषध...'
म्हणाला.

पण प्रत्यक्षात या ओळीशीच ते स्पष्ट होते.

प्रिस्क्रिप्सन होतं कुठल्याशा
नवीन अँटीडिप्रेसंटचं...

त्यामुळे पुढच्या ओळींचे मला आश्चर्य वाटले. हा दु:खीकष्टी माणूस समोर असताना आख्यान सांगणार्‍याला असे का वाटले की बायकोचे प्रेस्क्रिप्शन आहे?

सन्जोप राव's picture

16 Nov 2011 - 4:26 am | सन्जोप राव

हा दु:खीकष्टी माणूस समोर असताना आख्यान सांगणार्‍याला असे का वाटले की बायकोचे प्रेस्क्रिप्शन आहे?
हा माणूस आतून कसाही असला तरी सकृतदर्शनी त्याचा संसार सुखी, यशस्वी वगैरे आहे. त्याच्या बोलण्यातली खंतही 'अंडरकरंट' या स्वरुपाची आहे.अ‍ॅन्टीडिप्रेसंटची त्याला गरज आहे, त्याच्या बायकोला नाही, हे कसे सुचवावे हे मला कळाले नाही. म्हणून तो शेवट 'ऑब्व्हियस' स्वरुपाचा झाला आहे.

प्रदीप's picture

16 Nov 2011 - 3:17 pm | प्रदीप

हे अगदी बटबटीत झाले आहे. असले बटबटीत लिहावयास सन्जोप राव कशाला हवेत?

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 4:48 am | आत्मशून्य

जन्मोजन्मी आपल्या शत्रूना अशाच स्मार्ट बायका मिळोत.

अवांतरः- आणी कसला नवरा/बॉयफ्रेंड मिळो याबद्दल काही नाही बोलता येणार, नाही हो, हा जेंडर बियास नाही पण स्त्रियांशी शत्रूत्व कधी घेताच आलं नाही, त्यांच्यापायी पूरूषांशी जे शत्रूत्व आलं त्यातच जन्म गेला व जीवही जाइल ;)