"चवीने खाणार त्याला देव देणार" हे जेवढं खरं तेवढ्च मला असंही म्हणावं वाटेल "आवडीनं बनवणार त्याला देव सांगणार". मला ह्याची प्रचीती आली. परवाच भाजी बाजारात गेलो होतो, भली मोठी मंडईच ती. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, मला जाम अवडतं तिथे :)... अश्याच नेहमी प्रमाणे भाज्या बघत असतांना एक नवीन प्रकार दिसला, कधि न पाहिलेला. उत्सुकता म्हणुन गेलो त्या भाजीवाल्या मावशींकडे, विचारु कि नको त्या भाजी बद्द्ल असं चालु होतं (घाबरत होतो म्हणुन नाहि, पण उगिच मागे लागतील घेण्यासाठी वा अपल्याला कहिच माहित नाही म्हणुन कहितरी अव्वाच्या सव्वा भाव सांगतिल म्हणून मी "confuse"). पण तेवढ्यात एक काकु आल्या आणि त्यांनी त्या भाजिचा भाव विचारुन भाजि घेतलिहि. आणि त्या भाजीवाल्या मावशी त्या कांकुना बोलल्या " अरवी करणं सुगरणीचंच काम". मग तर काय मी विचारलंच त्या मावशींना त्या भाजि बद्द्ल (खरा भाव माहित झाला होता एव्हाना :P काकुंमुळे ). मावशींनीही उत्साहाने सांगीतलं "हयाला अरवी म्हणतात, हे मस्त पाण्यात उकडवुन, सालं काढुन चकत्या करुन तळायचे, आणि तिखट मीठ टाकुन खायचे, लई भारी लागतात :)" मग काय मी हि काय थांबतोय का... घेतलेच आणि सांगितल्या प्रमाणे बनवले.
साहित्य :
अरवी : ३ ते ४
मीठ/तिखट्/पीठीसाखर/आमचुर वा लेमन पावडर : हे सर्व चवीनुसार.
तळणासाठी तेल
कृती :अता कृती अॅलरेडी सांगीतलीच आहे वरती, तरी अजुन थोडी विस्तृत - फोटोसहीत (आणि माझं व्हर्जन)
१. प्रथम अरवी स्वच्छं धुवून घ्यावी आणि एका पातेल्यात ह्या सगळ्या आरवी पुर्ण बुड्तील एवढं पाणी घ्यावे आणि त्यात मीठ टाकावे व वाफवुन घ्यावे(साधारण १० मिनीटांसाठी, हाय फ्लेम वर)
२. वाफवुन घेतल्यावर ह्या आरवीचे वरचे सालं काढुन टाकावे.
३. अता त्यच्या बारीक चकत्या कराव्यात.
४. कढईत तेल घेउन ते कडकडीत गरम झाले की मध्यम आचेवर ह्या चकत्या खरपुस तळुन घ्याव्यात.
५. अरवीच्या चकत्या /चिप्स तयार :) अता ह्या गरम असतात तेव्हाच ह्यावर मीठ,पीठीसाखर, आमचुर/लेमन पावडर आणि तिखट भुरभुरावे. मग "एक नंबर" चव लागते :)
(आमचुर आणि पीठीसाखरेमुळे आरवीचा खाजरे पणा जातो. ज्या कारणासाठी आपण आळुच्या भाजीत्/फदफद्यामधे चिंच गुळ टकतो तसंच :) )
असं वाटलं ह्या चिप्स त्या मावशींकडे घेउन जाव्यात ह्या अश्या आणि विचारावं "मी पण सुगरण आहे का?" :)
अवांतर - जालावर अरवी बद्द्ल शोधतांना माझ्या हे निदर्शनास आलं, अरवी हे एक कंदमुळ आहे. अहो हे अरवी म्हणजे आपल्या आळुच्या पानाचेच मुळं/कंद. ह्यालाच "टॅरो रुट/टॅरो पोटॅटो" असंही म्हणतात (भारता-बाहेर राहाण्यार्यांना बाजारातुन आणावयाचे असल्यास ह्या नावाने विचारु शकता. सहजासहजी मिळेल वाटत नाहि, पण "फार्मर्स मार्केट" मधे जरुर मिळेल).
:)
टंकलेखनात कुठे चुक आढळल्यास माफि असावी. चुक निदर्शनास आणावी, सुधारली जाईल.
प्रतिक्रिया
9 Nov 2011 - 2:28 pm | धनुअमिता
छान आहेत चिप्स.
उपवावाला चालतील का ?
9 Nov 2011 - 3:15 pm | उदय के'सागर
उपवासाला चालतील कि नाहि शंकाच आहे बुवा! खरंच काहि कल्पना नाहि. जाणकार व अनुभवी मिपाकर ह्यावर जास्त प्रकाश टाकु शकतील.
9 Nov 2011 - 2:46 pm | पियुशा
हा प्रकार पहिल्यानादाच पाहिला अन एकला आहे
असो छान आहेत चिप्स :)
9 Nov 2011 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार
पियुशाशी सहमत (काय वेळी आलीये ! आयुष्यात वाईट दिवस सुरु झाले असे समजावे काय ? )
पहिल्यांदाच ऐकतो आहे ह्याबद्दल.
उदयशेठ एकदा बनवा बरे भरपूर चिप्स आणि फोन करा आम्हाला. आम्ही बाटली घेऊन येतो ;)
9 Nov 2011 - 3:07 pm | पिंगू
परा माझ्याकडे कारिंदे पडून आहेत. नेतोस का उकडायला?
- पिंगू
9 Nov 2011 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार
नुसते करिंदे काय कामाचे ? ;)
9 Nov 2011 - 3:21 pm | उदय के'सागर
:D जरुर पराशेठ, नक्की !
9 Nov 2011 - 2:49 pm | जागु
मस्तच प्रकार.
9 Nov 2011 - 3:46 pm | गवि
मस्त आयडिया.. पूर्वी ऐकले नव्हते.. झकास...
आरवीचे बारबेक्यू बार्बेक्यूनेशनमधे खाल्ले होते आणि आवडले.
पण हे वेगळंच आहे. करुन पाहतो.. एखाद्या घरगुती "बैठकी"ला.
उपासाला चालावेत..
9 Nov 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणजे इतरांनी फुकटच्या आमंत्रणाची अपेक्षा ठेवू नये ;)
9 Nov 2011 - 3:59 pm | गवि
म्हणजे इतरांनी फुकटच्या आमंत्रणाची अपेक्षा ठेवू नये
बघा बघा, केलात ना निगेटिव्ह विचार.. ??
त्यापेक्षा तुम्ही आमच्या घरचेच आहात आणि त्यामुळे घरगुती बैठकीत तुमचा समावेश आहेच असा विचार का नाही केलात..
( बादवे अहो हाटेलातल्या बैठकीत आरवीचे काप कुठे करणार? भटारखान्यात जाऊन?
... आणि तुम्ही इथे आमच्या गावी येऊन आम्हाला फोनवतही नाही मग कशी जमवावी घरगुती किंवा अदरवाईज बैठक? )
9 Nov 2011 - 4:24 pm | गणपा
आजवर अरवी हा पदार्थ उकडून वा चुलीत भाजून आणि मग वरुन मीठ भुरभुरुनच खाल्ला आहे.
ह्यातल्या पीठीसाखरेला आम्ही फाटा देऊ.
बाकी पराशेट तुमची 'सोय' झाली की कळवा, गविंच्या 'घरगुती बैठकीला' आम्ही पण हजेरी लावावी म्हणतो.
9 Nov 2011 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार
यस्स सायर !
@ गवि
हेच तुमचे आम्हाला आवडत नाही बघा. बघावे तेव्हा घरी बोलावत असता :( अहो आम्हाला तुमच्या हापिसात यायची घाई झाली आहे, हे कधी लक्षात येणार तुमच्या ? टंचनिकेची ओळख करून घ्यायची आहे ना ;)
9 Nov 2011 - 8:03 pm | प्राजु
अहो हे अरवी म्हणजे आपल्या आळुच्या पानाचेच मुळं/कंद.
अय्या!!! खरं की नाही!! मला तर बुवा माहितीच नव्हतं!! ;) :P
असो.. पाकृ छान आहे.
9 Nov 2011 - 8:07 pm | रेवती
हे कंद अळूचे असतात आणि उकडून खातात.
उपासाला चालतात एवढीच माहिती होती.
चिप्सकृती नवीन समजली.
10 Nov 2011 - 11:14 am | राही
अळवाचे कांदे किंवा अळकुड्या या मुंबईत सररास मिळतात.तेर्याच्या किंवा पांढर्या (फिकट पोपटी) अळवाच्या कुड्या लहानसर असतात तर माडाळू (पाच फूट उंच वाढणारे अळू) चे चांगले वीतभर लांब कांदे असतात. कारवारकडे अळकुड्यांना मुंडल्या म्हणतात. त्यांच्या मिसळभाजीत म्हणजे खतखत्यात ह्या मुंडल्या पाहिजेतच. नुसत्या उकडूनही खातात पण फारश्या चांगल्या लागत नाहीत. कणगर अथवा कणग्या, कोनफळाप्रमाणेच पिठूळ चव असते शिवाय बुळबुळीतही लागतात. अरवी हा हिंदी शब्द आहे. उत्तरेकडे अरवीचे कंद उकडून सोलून अक्खे तळतात आणि पनीरच्या जोडीने रश्श्यात घालतात. आपण दम आलू करताना करतो तसे.
10 Nov 2011 - 12:00 pm | शिल्पा ब
खुप वेळेस हे फळ, मुळ जे काय असेल ते पाहीलंय पण याचं काय करायचं हेच माहीती नव्हतं अन शोधायचं म्हंटलं तरी नावापासुन सुरुवात..
पाकृ छान. करुन बघेन कधीतरी.
11 Nov 2011 - 12:05 am | ज्योति प्रकाश
या अरवीची भाजीपण चांगली होते.तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.जरा लालसर झाला की आलं-लसूण
पेस्ट घालावी.मग बारिइक चिरलेला टॉमेटो घालावा.चांगला शिजला की हळद,लाल तिखट,गरम मसाला घालावा. तेल
सुटू लागलं की अरवीच्या चकत्या घालाव्या.मिठ घालून परतून झाकण ठेवून वाफ येवू द्यावी.कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
11 Nov 2011 - 2:35 pm | पिंगू
ज्योतीताई, जरा सेपरेट पाककृती दे ना..
- पिंगू
12 Nov 2011 - 11:47 am | सूड
ह्या चकत्या उकडून तळून घेतल्या की कढईत उरलेल्या तेलात कांदा उभा चिरून तो पण गुलाबी का काय म्हणतात त्या रंगावर तळून घ्या. आता तुम्ही तो अरवीचे काप ठेवलेला बाऊल आहे तेवढा पाऊण बाऊल दही घेऊन त्यात हे अरवीचे काप, तळलेला कांदा, थोडं मीठ (अरवी उकडताना किती घातलं होतं ते लक्षात ठेवून), चमचाभर लाल तिखट घालून चांगलं मिसळून घ्या. कांदा तळून जे तेल शिल्लक राह्यलं असेल त्यात जिरं-मोहरीची फोडणी करा. हिंग, कढीपत्ता पण आवडीनुसार फोडणीत टाकायला हरकत नाही. ही फोडणी आता काप आणि दह्याच्या मिश्रणावर घालून झाकण मारा. पोळी-भाकरी कशासोबतही छान लागतं. काप तळलेले असतातच पण दही (किंवा काहीही आंबट ) घातलं की अरवी खवखवत नाही. अर्थात या रेसिपीसाठी काप तळताना ते रंग येईल इतकेच तळावे, आधीच उकडलेलं असल्यामुळे फार तळायची गरज नाही.
ही रेसिपी माझी नाही, एका कार्यक्रमात पाह्यलेली आहे. घाबरु नका मी करुनही पाह्यलं आहे, छान होतं.
12 Nov 2011 - 2:02 pm | गवि
झक्कास रे.... करायलाच पाहिजे..
12 Nov 2011 - 9:23 pm | निवेदिता-ताई
मस्तच ह ....
12 Nov 2011 - 9:27 pm | पैसा
मी त्या गरम वाफ येणार्या आणि मीठ घालून शिजवलेल्या अळकुड्या पटापट खाते. त्याचे चिप्स करायला कोण थांबणार?
13 Nov 2011 - 11:51 am | rupali.gaikwad11
मस्तच आहे एकदम
14 Nov 2011 - 7:46 pm | कच्ची कैरी
अरवी हा प्रकार नेहमीच बाजारात पहात होते पण कधी घरी आणण्याची हिंम्मत नाही केली आता त्याबद्दल बरीच माहिती मिळाली.