काचेतुन बाहेर लॉन वर एक कावळा दिसतोय. कावळाच असावा. तीच चालण्याची ऐट, तेच मान वाकडी करुन निरखुन पहाण, तोच अलर्टनेस . खरच कावळ्या सारख तरतरीत पाखरु नाही दुसर! पण मग हा पांढरा रंग? मला हसुच फुटल. कावळ्याची अन बगळ्याची गोष्ट आठवली. त्यात बगळ्या सारख गोर होण्यासाठी नदीवर जाउन साबू लावून, घासून घासून अंग पांढर करायच्या प्रयत्नात रक्तबंबाळ झालेला कावळा आठवला. याला माहित असेल का ही गोष्ट? नुसता साता समुद्रा पल्याडचा नव्हे तर दक्षिण गोलार्धातला कावळा हा! आपल्या भारतीय संस्कृतीच माप याला लावुन चालेल काय? च ... काय हे ? कुठून कुठ ? आज चित्त काही थारयावर नाही !!
पण साता समुद्रा पल्याड असला तरीही तरीही शेवटी रंगान काळं असण तस वाईटच नाही का? कितीही नाकी डोळी नीटस असलं , अन स्वभावान तरतरीत असलं , तरी रंगान डाव असण, तुम्हा आम्हाला नेहमीच खटकत आल नाही का? तेव्हढ्या वरून लहानपणा पासून कितीदा ऐकून घ्याव लागल. खरच मन कितीही काळ असलं तरी चालत , पण वरून वर्ण गोराच पाहिजे. एका त्या कृष्णालाच काय ते आपल्या संस्कृतीन त्याच्या वर्णा बद्दल माफ केलय. पण तो सुद्धा शेवटी गौरवर्णीय गोपिकांतच रमला. नाही का? अरे बापरे ! कावळ्या वरून कृष्ण? सुता वरून स्वर्गच झाला हा...च्च ! आज चित्त काही थारयावर नाही !!
हळूच मोबाईल ऑन केला . म्हंटल एक फोटो घ्यावा याचा. अगदी चोरट्या पावलान काचेच्या ब्लाइंडस च्या माग जाऊन उभारले. पण एव्हढ्या चोरट्या हालचाली ही त्यान लगोलग टिपल्या !! सावध होत त्यान कानोसा घेतला. इतर वेळी हे सार रान त्याला निर्धास्त पणे फिरायला मोकळ असायचं. मग अचानक ही हालचाल , अन ती ही चोरटी, त्यान मान आणखी वाकडी केली . तिरक्या डोळ्यान त्यान माझ्या कड पाहिलं, नजरेत अतोनात कुतुहूल ! मला ही हसू आल. अरे एव्हढे कष्ट घेऊन टिपायला हा काय नाचरा मोर आहे, की रुबाबदार गरुड? साधा कावळा तर! मग हा एव्हढा साधा कावळाच का चिऊ काऊ च्या घासातून लहानपणी भेटतो? भरभरून प्रेम करणारी , जमेल तेव्हढ सोन्या चांदीच्या ताटात घास भरवणारी ,बाळाला सर्व काही उत्तमोत्तम आकान्क्षणारी माता , या सर्व साधारण ही म्हणता येणार नाही अश्या पाखराच्या नावाचा घास का भरवत असावी? ठाऊक असेल का याला? बाळाचा उरलेला घास मिळावा म्हणून तासन तास कस बसाव लागत बाजूला , रोज तीच एक गोष्ट ऐकत? अन तो लडिवाळ छकुलाही , आपल्या उष्टावल्या हातान याला आपल्यातल्या घासाच पहिलं वहिल दान करतो ते? चाखला असेल का तो उन उनीत, मऊ मऊ घास यान कधी? लाभला असेल का असा आई मुलाचा विरुंगळ्याचा क्षण याला? छे ! याला कस माहित असेल ते? काहीतरीच !! चक ...आज चित्त काही थारयावर नाही !!
पण मग... असा चिऊ पेक्षा मोठ्ठा असूनही , याचंच घरट का शेणाच? चिऊ कोठून आणत असावी मेण ? तिच्या देखण्या रुपान , चिमुकल्या छबीन का दिला हा हक्क तिला? म्हणजे इथेही दिसण आलच ! साऱ्यांच गोष्टीत याच हस होत , अन आपल्याला हसू फुटत . योग्य आहे का हे? त्याच्या प्रत्येक विनवणीला एक नव कारण सांगून त्याला पावसात तिष्ठवणारी चिऊ , चांगली कशी काय? काय शिकवायचं असाव यातून ? जवळचा असला तरी परका तो परकाच हे? रोजच्या पहाण्यातला असला तरी सहजा सहजी विश्वास टाकू नये हे? चिऊन आपलं जपून रहाव हे? घरातच नव्हे तर मनातही कुणाला थारा देताना विचार करावा हे? आधी गुंतायचं अन मग रक्तबंबाळ होत सर्वस्व गमवायच , त्या पेक्षा परक्याला थारा ना दिलेलाच बरा नाही का? माझ्याच विचारांनी मलाच रक्तबंबाळ कराव इतकी मी आज भावना प्रधान? च्च ..आज चित्त काही थारयावर नाही !!
असा लहानपणी घासा, गोष्टीतून भेटणारा हा काऊ, मोठ्ठे पणी मात्र निषिद्ध होतो. त्यान शिवल की अंघोळी शिवाय आपण शुद्ध नाही होत."बघतो बघा कसा कावळ्या सारखा", वा, "कसा टपलाय बघ कावळ्या सारखा" असं वाईट वागणारया लोकां साठी आपण याच उदाहरण ही देतो. पण कोणतीशी सासुरवाशीण मात्र यान आपल्या दारी याव अन, काव ,काव बोलांनी येणारया पाहुण्याच आगमन वर्ताव म्हणून याची आतुरतेने वाट पहाते. आता पाहुणा येणार हे या कावळ्याला कस काय समजत? काय संबंध याचा ? पण नाही ," आज सकाळ पासून कावळा ओरडतोय ग अंगणात , जरा दुध जपून वापरा ! कोणी पाहुणा आला तर असू दे चहा पूरत तरी " असं घरातली सासू म्हणणार अन पाहुणा ही येणारच. मग तो दारात आला की त्याच स्वागत , "तरी म्हंटल , कोण यायचं आहे? का सकाळ पासून कावळा ओरडत होता," असं म्हणूनच केल जात. पोस्टमन सुद्धा या कावळ्याच हे स्थान हलवू नाही शकला, पण आज काल लक्ष कोण देत अश्या काव कावी कड ? नाही का?हा माझ्या दारचा कावळा मात्र अगदी शब्द ही ना बोलता आरामात फिरतो आहे. "बोलना रे थोडा! निदान तुझा आवाज तरी ऐकू दे या निरव शांततेत मला" अक्षरश: निरव असं हे ऑस्ट्रेलिया कुठ ही गाड्यांचा आवाज नाही, ना ही कुठे माणस दिसतात फारशी. निदान तुझ्या बोलान कुणी पाहुणा यायची वाट पाहू दे मला . निदान याचं ऑफिस सुटेल लवकर अन तोच येईल कदाचित . सांग मला . अरे ज्ञानोबा सुद्धा तुला तुझे बाहू सोन्यान मढवेन म्हणाला, आठवतात ना ओळी 'उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवेन बाहू ?????? च्च ...आज चित्त काही थारयावर नाही !!
तर असं पाहुणे वर्तवण्या पासून , या कावळ्याच स्थलांतर अगदी अलगद गूढ गोष्टींमध्ये होत. हाच छोट्या बाळाचा घास भरवून देणारा कावळा अचानक आयुष्याच्या अंतात गुरफटला जातो. गेलेल्या मनुष्याच्या आशा आकांक्षाचा दूत बनून हा आपल्याला भेटतो. स्मशानात मांडलेल्या नैवेद्याला याचा स्पर्श होईतो माणस घायकुतीला येतात. आता हे सार खोटं म्हणाव तर तेथेच पल्याड मांडलेला नैवेद्य अगदी तसाच पडून रहातो , अन इकडचा मात्र पटकन शिवला जातो. अश्या अनेक कहाण्यातली एक कहाणी एका उद्योगपतीची, आमच्या भागातल्या साखर कारखानदाराची. सारा पंचक्रोश लोटला होता त्यांच्या रक्षा विसर्जनाला . अन घाटावर एक कावळा नाही!! पण नैवेद्य मांडला मात्र अन एक कावळा अगदी अलगद खाली उतरला ! गर्दीच्या एका टोकाला ! तिथून अगदी सावकाश नेहमी सारख्या उड्या न मारता अगदी एकेक पाउला शिस्तीत टाकत , अन साऱ्यांकडे अगदी निर्धास्त बघत त्यान जाऊन फक्त स्पर्श केला त्या अन्नाला ! बाकीच्या कावळ्यान सारख तुटून नाही पडला तो ! बस उपचार संपला अन कावळा उडाला. माणस अशी नतमस्तक झाली त्या वर्तणुकीवर !
असाच एक कावळा माझ्या आईंच्या अंगावर दोन तीनदा झेपावला . त्याला झटकत त्या अंघोळीला धावल्या ! पण ठोका चुकला होताच. अन त्याच वेळी आमचा एक आत्ते भाऊ वारल्याच थोड्या वेळान समजल. हाच आतेभाऊ , जो देवाच खास बाळ होता, म्हणजे , थोडासा रीटार्ड, होता , त्या दिवशी जेवताना अचानक खीर मागून बसला. घरच्यांनी संध्याकाळी करू म्हंटल पण संध्याकाळी तोच नाही उरला. नैवेद्यात तर खीर शिवली गेलीच पण त्या नंतर रोज दुपारच्या जेवणा दरम्यान एक कावळा खिडकीवर येऊ लागला! तो ही मुंबई सारख्या ठिकाणी ! नेमक्या भावाच्या आवडीच्या गोष्टी फस्त करून निघून जाऊ लागला. माझी वहिनी मग रोज दुपारी त्याच्या आवडीच काही ना काही बनवू लागली. नको त्या आठवणी ....च्च ! आज चित्त काही थारयावर नाही !!
तर असं नुसत दिसण्या वरून जर कुणाला कमी लेखायच असेल तर थोडा विचार केलेलाच बरा नाही का?
अरे हो दिसण्या वरून आठवल , माझा धाकटा नुकताच इथल्या नवीन शाळेत जाऊ लागला. नवीन टीचर त्याला कशी सामावून घेईल या विचारान त्रस्त मी त्याच्या बरोबर रोज शाळेला जाते. काही नाही . त्या गोऱ्यापान टीचरन अगदी झटक्यात त्याला आपलास केल. काल दुपारी घरी येता येता आम्ही तिच्या बद्दल गप्पा मारत होतो. बोलता बोलता विषय तिच्या दिसण्या कडे वळला . चिरंजीव म्हणाले मला तिचे डोळे फार आवडले, निळे निळे , मी ही होकार भरला. आहेतच तसे डोळे तिचे . आकाशी निळ्या रंगाचे. मग पुत्र पुढे वदला, मला तिचा वर्ण ही फार आवडला . किती गोरी आहे ती. मी यालाही होकार भरला. अचानक धाकटा म्हणाला ' but that does not mean I don 't love you . You are beautiful too !! ' मी दचकलेच !! आता आई म्हणून ही माझ दिसण जोखल जात असेल याचा मी विचारही नाही केला कधी? अचानक कानात एक वाक्य घुमल, कुठूनस , आठवणीतून,
""अशीच अमुची आई असती सुन्दर रूपवती
अम्हिहि सुन्दर झालो असतो, वदले छत्रपती" !!"
च्च ! आता हे मात्र फारच झाल ! आवरलं पाहिजे मनाला ! एकूण आज चित्त काही ठिकाणावर नाही हेच खर !
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
15 Aug 2011 - 6:16 am | रेवती
लेखन आवडले.
15 Aug 2011 - 6:32 am | शुचि
खूप सुंदर लिहीलं आहेस अपर्णा. नेहेमीसारखच
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन् मला वेदना
माझिया मना, जरा बोलना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
या ओळींची आठवण झाली हा लेख वाचताना.
15 Aug 2011 - 6:39 am | प्रियाली
काळ्यावरचा पांढरा रंग आहे हा. काही माणसांच्या प्रजातीत अभद्र आणि अपशकुनी मानला गेलेला. पांढर्यावर काळं आलं की त्याला तीट म्हणतात. सुस्वरूप गोष्टीला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावली जाणारी ती तीट. गोर्यापान रंगावर एखादा काळाभोर तीळही कसा खुलून दिसतो, ब्युटीस्पॉटही म्हणतात त्याला पण हेच गणित जेव्हा बदलतं.. सावळ्या कातडीवर पांढुरका डाग दिसला की.... ते विद्रुप मानलं जातं....:( चित्त थार्यावर ठेवून सांगते, कावळ्याला माणसाप्रमाणे या रंगांची तमा नाही, काळजी नाही हे किती उत्तम आहे.
16 Aug 2011 - 8:17 am | स्पंदना
चला टी आर पी वाढवायची वेळ आली.
रेवती अन शुची लेख आवडल्या बद्दल धन्यवाद.
शुची अगदी बरोबर शब्द सापडले तुला. परत एकदा स्थलांतर केलय अन फार फार एकट वाटतय.
@ प्रियाली, थंडी मध्ये बंडी घालावी तसे हे कावळे थोडेफार गोरे होतात थंडीत, पण मग समर मध्ये पुन्हा काळे कुळकुळीत , होते तस्से!
बाकि या प्रतिसादान 'गुमनाम' मधला हेलन अन मेहमुद मधला धमाल डायलॉग आठवला, ' मेमसाब ये काला रंग अगर आपके गोरे रंग पे आ जाये तो तिल केहेलाता है। ब्युट्टी स्पॉट केहेलाता है। लेकिन अगर आपका गोरा रंग हमारे उपर आ जाये तो कोड केहेलाता है।
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
15 Aug 2011 - 11:17 am | सविता००१
छानच लिहिलं आहे. खूप आवडलं.
15 Aug 2011 - 11:59 am | प्रास
"___/\___"
सुंदर लिखाण. आवडलं.
मुंबईकर डोमकावळा ;-)
15 Aug 2011 - 12:43 pm | नगरीनिरंजन
काय लिहीलंय... काय लिहीलंय..वा वा वा...
अपर्णातै तुम्ही दक्षिणेकडे गेलात पण तुमची प्रतिभा उत्तर दिशेने चाललीये!
बाकी, अशा कावळ्याकडे बघुन एवढं काही आम्हाला सुचलं नसतं, आम्हाला फक्त एवढंच वाटलं असतं की हा नशीबवान कावळा कोणा गुलाबी हातांच्या हिमगौर सुंदरीचा पाळलेला तर नाही? त्या गौरांगनेच्या हातानेच हा रंग तर याला मिळाला नाही ना? :)
16 Aug 2011 - 8:08 am | स्पंदना
धन्यवाद सविता अन प्रास भौ!!
नगरी खर बोललात. माझी रुट्स राहिली उत्तरेत अथवा विषुव वृत्तावर अन मी इकडे. अस मुळातुन उपटलेल्या रोपट्याच दुखण शब्दात पकडन ...
काय सांगु? मिस यु ऑल!
15 Aug 2011 - 2:31 pm | प्रचेतस
सुंदर लिखाण.
मुक्तक फार आवडले.
15 Aug 2011 - 4:17 pm | Mrunalini
खुपच छान लिहले आहे.... एकदम मस्त... आवडले.. :)
15 Aug 2011 - 4:39 pm | स्वाती दिनेश
छान लिहिलं आहेस अपर्णा,
स्वाती
15 Aug 2011 - 4:41 pm | आत्मशून्य
.
16 Aug 2011 - 8:14 am | स्पंदना
धन्यवाद वल्ली मृणालिनी स्वाती दिनेश अन आत्मशुन्य.
15 Aug 2011 - 9:56 pm | पैसा
कावळा या साध्या विषयावर छान लिहिलंयस. पण का कोण जाणे हल्ली आमच्या शहरात हे चिऊ काऊ कुठे दिसतच नाहीत! :(
16 Aug 2011 - 8:10 am | स्पंदना
@ पैसा....मोबाईल फोनच्या अती वापरान हे पक्षी नष्ट होताहेत. उगीच मेसेज फॉरवर्ड करु नका, वेळ घालवायला म्हणुन फोन वापरु नका. मग बघ , बघता ब्घता अंगण पुन्हा भरुन जाइल.
16 Aug 2011 - 8:11 am | निनाद
तुमचे लेखन मस्तच!
16 Aug 2011 - 8:21 am | स्पंदना
ध न्य वा द !!
16 Aug 2011 - 8:39 am | प्राजु
धन्य आहेस बाई तू!
कुठून कुठे नेलंस गं??
मस्त जमला आहे लेख.
16 Aug 2011 - 10:24 am | ५० फक्त
मस्त लिहिलंय एकदम आवडलं,
@ पैसा - माझ्या घरी कावळे चिमण्यांना पाहायचा काय हातानं भरवायचा पण चान्स मिळेल तुम्हाला.
16 Aug 2011 - 11:44 am | किसन शिंदे
मस्तच लेखन केलयं अपर्णा तै.
__/\__
16 Aug 2011 - 6:17 pm | साती
मस्तच लिहिलंय अपर्णा ,खूप आवडलं
17 Aug 2011 - 8:24 am | पाषाणभेद
एकदम छान मुक्तक आहे.
17 Aug 2011 - 9:12 pm | पल्लवी
सैरभैर विचारांना शब्दांत पकडणे महाकठीण !
साधलं तुला. :) मानना पडेंगा !!!