प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे.
साहित्य
तांदळाचे पिठ
मिठ
१ ओला नारळ खरवडून
गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप
पाककृती
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला.
थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.
आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका.
पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या.
आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा.
वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा.
आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या.
मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे.
अधिक टिपा :
उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात.
वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते.
मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे.
साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात.
(नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)
प्रतिक्रिया
8 Aug 2011 - 1:13 am | अभिजीत राजवाडे
अहाहा!!! स्वर्ग.
8 Aug 2011 - 2:21 am | गणपा
कसले खत्तर्नाक दिसत आहेत मोदक.
काय त्या एका सारख्या एक कळ्या.. जणु साच्यातुनच काढले आहेत. हॅट्स ऑफ तुला. :)
8 Aug 2011 - 2:42 am | पंगा
खरेच सुंदर.
बाप्पा खुश हुआ| नागोबापण खुश हुआ|
8 Aug 2011 - 6:10 pm | चित्रा
+१.
फारच सुरेख.
खापट्यांना (चपट्या गोळ्यांना) निवगर्या असेही म्हणतात. त्या करणे जालीम सोपे आहे, असे मोदक जमणे महाकठीण :)
तेव्हा खरेच हॅटस ऑफ.
8 Aug 2011 - 3:24 am | निमिष ध.
वाह .. किती सुंदर फोटो आहेत. एकदम गणपतीत घरी असल्यासारखे वाटले.
पानात मोदक आणि तुपाची धार. खास मोदकांसाठी गणपतीची वाट पाहणे असायचे ...
सध्या नुसते फोटोंमध्ये दर्शन.
8 Aug 2011 - 3:26 am | प्राजु
सुंदर मोदक!
इतके एकसारखे!!! बापरे!! तू ग्रेट आहेस.
8 Aug 2011 - 4:14 am | अभिज्ञ
सुंदर मोदक!
इतके एकसारखे!!! बापरे!! तू ग्रेट आहेस.
अगदि अगदि. ह्या एकसारख्या मोदकांकरिता १००/१०० मार्कस.
अभिज्ञ.
8 Aug 2011 - 10:33 am | मुलूखावेगळी
+१००
8 Aug 2011 - 3:39 am | सानिकास्वप्निल
तोंपासू :)
8 Aug 2011 - 8:02 am | निवेदिता-ताई
आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत.
-------------------------------------------------------
हे बरे सांगितलेस...नाहीतर आम्ही उकड काढताना पाणी पुर्ण उकळून घेत होतो,आता असेच करुन पाहिन...
येउदेत अजुन बाप्पासाठी नेवैद्य....
8 Aug 2011 - 9:16 am | सूड
ही टीप खरोखरच चांगली आहे, मागच्या वेळी जागुतैची ही टीप वापरुन सकाळी १० वाजता केलेले मोदक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जसेच्या तसे मऊ होते.
आणि हो जागुतै, मुखर्या अगदी झकासच साधल्यात फोटोतल्या मोदकांच्या !!
8 Aug 2011 - 9:32 am | चिंतामणी
http://misalpav.com/node/14311#comment-234934
असो.
मोदक करण्यातली सफाई मस्तच.
8 Aug 2011 - 9:25 am | सविता००१
खतरनाक फोटो आहेत. मस्तच.
8 Aug 2011 - 9:27 am | सहज
वरील सर्वांशी सहमत!
8 Aug 2011 - 11:16 am | गवि
क्या बात है. इतके रेखीव आणि एकसारखे मोदक पहिल्यांदाच पाहिले.
जबरदस्त.. गणपतीपुळ्याला गुरुजींच्या पडवीत बसलोय असा भास झाला.
8 Aug 2011 - 11:30 am | इरसाल
असे मोदक मी फक्त आईने बनवलेले खाल्लेत.
सेम टू सेम जागुताई ने बनवलेत.जागुतैला त्रिवार सलाम.
मोदक खावून जवळपास दशक उलटले.
पांढरा शुभ्र भात (झिनी कोलम), बिरड्याची भाजी सोबत तोंडलीची भजी आणि मोदक (आणखी काय पाहिजे ?)
केव्हा येवू मोदक खायला ?
8 Aug 2011 - 11:30 am | नन्दादीप
जागुताई, मोदक मस्त झाले आहेत. .....तों.पा.सु.
मोदकाच्या कळ्या (पाकळ्या) अप्रतिम......
8 Aug 2011 - 1:37 pm | प्रचेतस
जागुतै, मोदक एकदम सुंदर.
अवांतरः त्याबरोबर त्या तिखटमिठाच्या निवरग्या का काय म्हणतात ना त्या कशा करायच्या हे पण सांगा ना.
9 Aug 2011 - 11:47 am | स्वाती दिनेश
जागु, मोदक एकदम सुबक आणि रेखीव दिसत आहेत ग, मस्तच!
वल्ली,निवरग्या नव्हे निवगर्या.
निवगर्या- निवगर्या करताना मोदकासाठीची उकड काढतो तशीच उकड काढायची, त्यात जिरे+मिरचीचे वाटण करुन घालायचे व मीठ घालायचे. किवा तिखट+मीठ+ जिरे घालायचे. आणि त्याचे वडे थापायचे व ते मोदकांसारखे उकडायचे.
घंटोळी/सिध्दलाडू- हीच उकड घेऊन वडे थापण्याऐवजी कडबोळ्यासाठी करतो तशी लांब सुरळी करायची आणि एक गाठ मारुन बो सारखा आकार द्यायचा. व ही घंटोळी किवा सिध्दलाडू उकडायचे.
गोड मोदकांबरोबर मध्येच एखादी तिखट निवगरी किवा घंटोळे मजा आणते.
(लाडूच्या आकाराशी काहीही साधर्म्य नसूनही सिध्दलाडू का म्हणतात ते मात्र माहित नाही.)
स्वाती
10 Aug 2011 - 3:42 am | चित्रा
आमच्या घरी निवगर्यांमध्ये कोथिंबीरही घालतात.
10 Aug 2011 - 8:51 am | प्रचेतस
धन्यवाद स्वाती.
8 Aug 2011 - 1:49 pm | पल्लवी
_/\_
8 Aug 2011 - 1:52 pm | नरेश_
अजून काय लिहू?
8 Aug 2011 - 2:04 pm | स्मिता.
आई शप्पथ! कसले सुरेख मोदक आहेत.
सर्व मोदक आणि त्यांच्या कळ्या किती एकसारख्या असाव्यात!
ते मोदक बघून त्यातला एक पटकन उचलून, त्याला फोडून वर साजूक तूप घालून खावासा वाटतोय.
8 Aug 2011 - 2:24 pm | Mrunalini
खुपच सुंदर.... त्या मोदकांच्या कळ्या किती सुरेख आल्यात.... मला तर अशा कळ्या पाडताच येत नाहीत.. त्यामुळे मी मोदक साच्यातुन करते...
एवढे सुरेख मोदक करतेस म्हणजे माणले पाहिजे तुला... :)
8 Aug 2011 - 2:49 pm | ज्योत्स्ना
एकदम सुरेख. :):bigsmile:
8 Aug 2011 - 2:53 pm | विशाखा राऊत
जागुताई तुला साष्टांग दंडवत..
8 Aug 2011 - 3:34 pm | कच्ची कैरी
वा जागुताई तुझ्या एकापेक्षा एक पाककृती वाचुन धन्य झाले मी !
आणि आता रेसेपीबद्दल काय बोलु मी ?सर्वांनीच इतकी तारिफ केलीय कि माझ्याकडे शब्दच नाहित तुझी स्तुती करायला .
8 Aug 2011 - 8:32 pm | मदनबाण
तै लयं ग्वाड ! :)
(मोदक प्रेमी) :)