काळपट ओट्यावरून
पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर
रात्रीच्या अंधारात तिने पाहिले
खिडकीबाहेर ते स्वप्न
खुणावत अजून उभेच होते -
**
पलंगावर टाकून
आपले श्रांत क्लांत अंग
भिंतींवरून सरकणार्या
गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी
तिच्या लक्षात आले
स्वप्न आत येऊ पाहत होते
लगबगीने
**
उठून तिने स्वप्नांची
काढली गाळणी ठेवणीतली
लटकावून दिली
बेडरूममधील खिडकीवर.
कुशीवर मग वळून तिला
झोप कधी लागली कळलेच नाही.
प्रतिक्रिया
3 Aug 2011 - 9:22 am | सहज
स्वप्नात अडकताना (काही स्वप्न पूरी करता करता) झोप (मनस्वास्थ) खराब होते आणी शांत झोप हवी असेल तर काही स्वप्नांना आवर घालावा लागतो. अशी काहीशी संमीश्र भावना वाटली.
7 Aug 2011 - 12:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वप्नात अडकताना (काही स्वप्न पूरी करता करता) झोप (मनस्वास्थ) खराब होते आणी शांत झोप हवी असेल तर काही स्वप्नांना आवर घालावा लागतो. अशी काहीशी संमीश्र भावना वाटली.
असेच बोल्तो.
बाकी, स्वप्नांना गाळणीची कल्पना लैच भारी.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2011 - 11:07 am | अत्रुप्त आत्मा
छान छान...
3 Aug 2011 - 11:14 am | नगरीनिरंजन
कविता आवडली. फक्त, गाळणी ठेवणीतली नसून रोजच वापरली जाणारी असेल असे वाटले.
3 Aug 2011 - 11:44 am | राघव
छान कल्पना अन् छान व्यक्तता!!
स्वप्नांची गाळणी ही कल्पनाच खूप सुंदर आहे!
राघव
3 Aug 2011 - 1:21 pm | ऋषिकेश
क्या बात है!
कल्पना एकुणात आवडली आणि पोचली
3 Aug 2011 - 1:23 pm | जागु
कल्पना आवडली.
3 Aug 2011 - 1:36 pm | पल्लवी
कविता वाचुन नक्की काय वाट्लं सांगणं अवघड आहे. पण मनात लुकलुकलं काहीतरी.
"माझ्याकडे बघ..माझ्याकडे बघ.." म्हणणार्या ईच्छा-आकांक्षांना थोपवुन ठेवणंच कधी कधी योग्य ठरतं, ह्या न त्या कारणांसाठी.
कविता अप्रतिम झालिये !! खूप आवडली :)
शुभेच्छा !
3 Aug 2011 - 1:50 pm | पाषाणभेद
सही काव्य आहे
3 Aug 2011 - 3:03 pm | आत्मशून्य
स्टीफन किंगच्या ड्रीमकॅचर चित्रपट्/पूस्तकावर काही लीखाण केलय की काय म्हणून उत्सूकतेने धागा उगडला होता... पण कवीताही मस्तच आहे.
3 Aug 2011 - 4:07 pm | यकु
उत्स्फुर्त व सहज झालेली कविता आवडली.
9 Aug 2011 - 1:38 pm | वपाडाव
असेच बोल्तो....
3 Aug 2011 - 4:25 pm | गणपा
आवडली.
3 Aug 2011 - 5:02 pm | श्रावण मोडक
स्वप्न ही कल्पना इथे अनेकांगांनी जातेय. रचनाही छान.
तुम्ही हाही उपक्रम करता हे माहिती नव्हते.
3 Aug 2011 - 6:36 pm | चित्रा
प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
@ सहज, @पल्लवी, प्रत्येकाला अर्थ (किंचित किंवा अगदी) वेगळा लागतो हे तर गृहित धरायला हवे.
@ नगरीनिरंजन - खरे आहे. गाळणी ठेवणीतली असेल असे नाही. रोजच्याच वापरातली असू शकेल. ह्या ठिकाणी मी वेगळे शब्द योजले होते, ते एकेरी वाटल्याने बदलले.
@श्रामो - धन्यवाद.
मी हाही उपद्व्याप करते म्हणायचे असावे.
@ राघव - गाळणीची कल्पना माझी नाही. ही कविता एका अमेरिकन इंडियन (नेटिव अमेरिकन) मिथकावरून सुचली. http://en.wikipedia.org/wiki/Dreamcatcher त्रासदायक स्वप्ने दूर ठेवण्यासाठी अशी गाळणी वापरण्याची जुनी रीत होती. ही स्वप्ने बहुदा गाळणीत अडकण्याइतकी लहान असावीत. :)
3 Aug 2011 - 7:12 pm | रेवती
हम्म...
कविता आवडली.
काय वाटले ते सांगू शकणार नाही.
3 Aug 2011 - 9:13 pm | गणेशा
कविता छान..
स्वप्नांची गाळणी कल्पना आवडली.
अवांतर : खुप दिवसानी येने केले ..
3 Aug 2011 - 9:38 pm | प्राजु
मस्त! कल्पना छान आहे.. आवडली कविता.
3 Aug 2011 - 10:06 pm | पैसा
अशी स्वप्नं गाळणीतून पलीकडे आली की आणखी हवी हवीशी वाटत असतील!
3 Aug 2011 - 10:17 pm | धनंजय
स्वप्नांची गाळणी हे स्वयंपाकघरातून आलेले कल्पनाचित्र आवडले.
गाळणीत दु:स्वप्ने अडकावीत, आणि सुखस्वप्ने मात्र तिच्या साखरझोपेत झिरपावीत, अशी शुभेच्छा!
(चित्र : विकिपेडियावरून, मुक्त वापरास अनुमती)
3 Aug 2011 - 11:23 pm | मुक्तसुनीत
क्षणचित्रांची कविता आवडली.
3 Aug 2011 - 11:51 pm | नंदन
कविता आवडली. गाळणीचे नेटिव्ह अमेरिकन रूपकही चपखल,
अवांतर - अगदी वेगळ्या अर्थाने गाळणीचं रुपक रोमन संस्कृतीत वापरलं जात असे. पहिल्या एलिझाबेथ राणीचं 'हाती गाळणी असे धरिली' पोझमधलं पोर्ट्रेट प्रसिद्ध आहे.
4 Aug 2011 - 12:57 am | आनंदयात्री
छान कविता आणि त्याबरोबर प्रतिसादांत आलेली इतर माहितीही छान.
4 Aug 2011 - 4:32 am | चित्रा
सर्वांना धन्यवाद. नंदन यांच्या पोतडीतला खास प्रतिसाद नेहमीप्रमाणे वाचनीय आहे.
4 Aug 2011 - 9:32 am | मदनबाण
छान कविता... :)
कुंभकर्णा सारखे ६ महिने जमणार नसेल, तरी ६ दिवस "गाढ" झोपायची लयं इच्छा हाय बघा ! ;)
जाता जाता :--- झोप आणि "गाढ" झोप यात फार मोठा फरक आहे... २ तास जरी "गाढ" झोप मिळाली तरी त्या झोपेतुन उठल्यावर प्रचंड ताजेपणा जाणवतो... जरा विचार करुन पहा तर शेवटची "गाढ" झोप तुम्हाला कधी लागली होती ते ?
4 Aug 2011 - 3:56 pm | मेघवेडा
सुंदर कल्पना. गाळणीचे रूपक छानच. कविता आवडली.
6 Aug 2011 - 5:09 am | अभिजीत राजवाडे
एकदम नाविन्यपुर्ण आहे कविता. फ्रेश!!!
प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार!!!
7 Aug 2011 - 7:52 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता म्हणून इतके दिवस हा धागा उघडला नव्हता. पण आज वाचला. कविता आवडली.
9 Aug 2011 - 11:48 am | क्रान्ति
मिपावर यावं आणि इतकं छानसं काही वाचून ताजंतवानं व्हावं! फार फार आवडली कविता. [आणि अर्थातच प्रतिसाद.]
9 Aug 2011 - 1:11 pm | कवितानागेश
सुन्दर कविता.
10 Aug 2011 - 6:03 am | चित्रा
कविता उशीराने वाचूनही कशी वाटली ते आवर्जून कळवणार्या सर्वांचे मनापासून आभार.