पोचलो का आपण?

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
30 Jun 2008 - 10:13 pm

मिरजेला मध्यरात्र झाली,
पाच तास लेट निघाली
गोमंतक एक्स्प्रेस -
आई मला झोपवलेस
"उद्या सकाळी असू घरी..."
उजाडले होते थोडेच तरी
पहाटे डोळे किलकिले
करून मी उघडले -

"आई, पोचलो का आपण?"
"बेळगावच आहे, बघ पण...
गारवा मस्त पडला आहे.
बाबांनी कुंदा आणला आहे
आताच इथला ताजा ताजा
जा, पटकन तोंड धू, जा..."

सकाळची उन्हे झाली जून
प्रवास संपत नाही अजून
बाबा म्हणाले, "लोंडा जंक्शन!
इथे उलटे फिरणार इंजिन..."
"बाबा तुम्ही दोघे जा
बघाच इंजिनाची मजा"
खळ्ळकन इथून डबे सोडून
तिकडे जाऊन घेतलेन जोडून.

भर दुपारी घाटात गाडी
थांबत सरके थोडीथोडी
बोगद्यात होता अंधार दाट
किती बघू पोचायची वाट?

"बाबा गाडी नाहीच का पोचणार?"
"बाळ, घर येणार तेव्हा येणार,
गाडी मात्र जोवर हलतेय
सारखी कुठेतरी पोचतेय!
बोगद्यापलीकडे दबा
धरून बसलाय धबधबा
दारामध्ये उभे राहू
मनसोक्त भिजून घेऊ!"

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Jun 2008 - 11:59 pm | विसोबा खेचर

एक मस्त अन् वेगळीच कविता..!

धन्याशेठ, तुझी प्रतिभा कधी काय प्रसवेल ते सांगता यायचं नाही! :)

असो...

तात्या.

चतुरंग's picture

1 Jul 2008 - 12:00 am | चतुरंग

चाल लावून छान म्हणता येतंय! :)
(मोठ्यांसाठी लिहिण्याइतकंच, किंबहुना बर्‍याचवेळा, लहानांसाठी लिहिणं जास्तच अवघड असतं!)

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

1 Jul 2008 - 12:07 am | मुक्तसुनीत

सोपे शब्द , खोल आशय. अकृत्रिम शैली.

धनंजय , यावर खरे सांगायचे तर दिवाकरसदृष नाट्यछटा जास्त उत्तम वठेल , नाही का ? आणि ती सुद्धा खास तुमच्या भाषेत ! कशी वाटते कल्पना ?

चित्रा's picture

1 Jul 2008 - 5:47 am | चित्रा

"गाडी मात्र जोवर हलतेय
सारखी कुठेतरी पोचतेय!
बोगद्यापलीकडे दबा
धरून बसलाय धबधबा
दारामध्ये उभे राहू
मनसोक्त भिजून घेऊ!"

चांगला विचार.. सहज पटण्यासारखा.

आमच्या मुंबईच्या मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकावरील बोगद्यानंतर असेच दृश्य दिसते पावसात. आठवण करून दिली तुमच्या कवितेने..

उन्हाळ्याचा शेवट-पावसाळ्याची सुरुवात अशा काहीशा कुंद वातावरणात अनेकदा केलेल्या या मनोहारी प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या.
(स्मरणशील)बेसनलाडू

सहज's picture

1 Jul 2008 - 6:31 am | सहज

धनंजय यांची कविता कितिही सोपे रुप घेउन आली तरी काहीना काही गहन आशय असतोच. :-) "तुका म्हणे बरवे जाण...!" वाचल्याचा परिणाम असेल पण त्या सोप्या शब्दांच्या मागचे विचार पकडत गेलो.
कुठेना कुठे पोहचायचा ध्यास लागल्याने बर्‍याचदा नेमका प्रवासाचा आनंद उपभोगायला विसरतो किंवा उपभोगुनही जाण नसते. असे लिहल्यासारखे वाटले. व खालील काही ओळी सुचल्या. एक प्रयत्न केलाय कवितेत लिहायचा.

आर वुई देअर यट?
आर वुई देअर यट?

वेळेआधी पोहोचायच्या घाईत
प्रवासाच्या आनंदाला चाट

थांबुन पाहीलेत तर होइल माहीत
वाटतेय सुख पहा ही वाट

थोडे सुख गेलात पेरीत
मांगल्याची होते पहाट

आयुष्याचे कळण्या गुपित
आयुष्य जगायचे मिळालेय तिकीट

कविता समजत नाही, आवडत नाही म्हणणारा मी. शेवटी डुबकी मारलीच. "कविता केली नाहीस हाय कंबख्त तुने लेखन कियाही नही!!" ज्यांना बदला घ्यायचाय त्यांना सुवर्णसंधी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2008 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला ( आणि धनंजयलाही ) कविता करतांना पाहुन आनंद वाटला.

थोडे सुख गेलात पेरीत
मांगल्याची होते पहाट

आयुष्याचे कळण्या गुपित
आयुष्य जगायचे मिळालेय तिकीट

या चार ओळी खूप सुरेख आहेत पण शेवटच्या ओळीतील 'तिकीट' या शब्दाने माझा जरा रसभंग झाला इतकेच. आपल्याही कवितेच्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा !!!

-दिलीप बिरुटे
(सहजाचा सहज दोस्त )

ज्यांना बदला घ्यायचाय त्यांना सुवर्णसंधी
संधी दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत ;)

मनिष's picture

1 Jul 2008 - 12:24 pm | मनिष

धनंजय यांची कविता कितिही सोपे रुप घेउन आली तरी काहीना काही गहन आशय असतोच.

खूप आवडली. धनंजय तुस्सी ग्रेट हो! :)

सहज, तुझी कविताही छान जमली आहे. स्लो-डान्स ह्या प्रसिद्ध कवितेच्या ह्या ओळी आठवल्या -

When you run so fast to get
somewhere
You miss half the fun of getting there.
When you worry and hurry through your day,
It is like an unopened gift thrown away...
Life is not a race...
Do take it slower
Hear the music
Before the song is over.

- (कविताप्रेमी) मनिष

अमोल केळकर's picture

1 Jul 2008 - 9:24 am | अमोल केळकर

'झुकझुक झुकझुक आगीनगाडी ' ची मस्त आठवण
तसेच बेळगावचा कुंदा आSSSSहा

प्रमोद देव's picture

1 Jul 2008 - 9:34 am | प्रमोद देव

वरवर सोपी वाटणारी आशयगर्भ कविता. धनंजयांची प्रतिभा कधी काय निर्मिती करेल सांगता येत नाही.
जियो. धनंजय जियो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2008 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'झुकझुक झुकझुक आगीनगाडी ' ची मस्त आठवण

आम्हालाही आगीनगाडीची आठवण झाली. पण वर सहजराव म्हणतात तसे धनंजयला काही इतका सहज अर्थ अपेक्षीत नसेल, त्यांची कविता दुसराच खोलवर रुजलेले एखादा अनुभव पकडत असेल असे वाटते....!!! कविता छान आहे.

संवेदना !!!

आनंदयात्री's picture

1 Jul 2008 - 12:28 pm | आनंदयात्री

लहानपणाची एखादी आठवण आली अन मग हा कविताविष्कार झाला असे वाटतेय, आई वडिलांबरोबरच्या प्रवासाची छान आठवण. गाव कधी येणार म्हणुन सारखे सारखे विचारणे, कधीतरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करणे, तो कंटाळा मग आई बाबांशी गप्पा, हे स्टेशन ते स्तेशन, सुरेख उतरलिये आठवण.

नंदन's picture

1 Jul 2008 - 12:41 pm | नंदन

धनंजयांची कविता आणि सहज यांचा प्रतिसाद - दोन्ही आवडले. दूधसागर धबधब्यावरून किंवा त्या लेखावर झालेल्या चर्चेवरून ही कविता स्फुरली का?

बाकी -
गाडी मात्र जोवर हलतेय
सारखी कुठेतरी पोचतेय!

या ओळी 'मुक्कामापेक्षा प्रवास अधिक श्रेयस्कर' या वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्यातला भाव सहज सांगून जातं, असं वाटलं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आज पुन्हा वाचली, सगळ्या प्रतिक्रियाही आजमावल्या.

आपल्या समोर एखादी गोष्ट साध्य म्हणून आली की साधनांचा विसर पडतो. प्रवासातले अंतिम ठिकाण हे ह्यातले साध्य म्हटले तरी ज्या गाडीने, ज्या ठिकाणातून, जे प्रसंग अनुभवत प्रवास होणार आहे ते त्या साध्याइतकेच, किंबहुना जास्त, महत्त्वाचे असतात. साध्य हे केवळ 'तिथे' पोचणे नसून ह्या मधल्या सगळ्या अनुभवासहित तिथे पोचणे असते, ते एक पॅकेज डील असते, एकेक अनुभव वेगळा असा काढता येत नाही. काढायचा नसतोच नाहीतर आयुष्यातली गम्मत निघून जाईल. सतत गोड खात राहिलात तर काहि वेळाने चव लागेनाशी होते. तिखट, खारट, तुरट, आंबट सगळ्या चवी अधूनमधून येत राहिल्या तर चव असण्याला अर्थ आहे.
आपल्या जगण्याचेही असेच नसते का? आपण धावत रहातो, अधिक मोठी पोस्ट, अधिक पैसा, अधिक काम, अधिक मानमरातब, मोठं घर, मोठी गाडी; कुठं जायचंय? का जायचंय? कसं जायचंय? मधे काय काय आहे? आपल्या मुलांबरोबर आपण खेळतो का? त्यांचं लहानपण अनुभवतो का? कधीतरी एखादी मीटिंग कॅन्सल करुन, 'वर्किंग डे'ला दुपारीच मुलाबरोबर सायकल चालवण्याचा किंवा पोहोण्याचा आनंद घेतो का? त्याच्याबरोबर उगीचच पावसात भिजतो का? बायको बरोबर जेवायला अचानक बाहेर जायचा बेत करतो का? जगण्यातले हे क्षणच आपला 'अंतिम' ठिकाणी पोचण्यातला खरा आनंद ठरवत असतात.

दोन झेन साधूंची एक कथा आहे. दोघे साधू बसलेले असतात, आयुष्याचे रहस्य समजावून घेणे हा त्यांचा उद्देश असतो. एक साधू निवांत बसलेला असतो आणि जे जे घडतंय ते ते पहात असतो. दुसरा अस्वस्थ असतो. कशानेतरी त्याची उलघाल होत असते. पहिला विचारतो, "काय रे अस्वस्थ आहेस?", दुसरा "हो, 'काहीतरी' होईल ह्याची वाट बघतोय. काहीच घडत नाहीये. काहीच घडलं नाही तर रहस्य कशाचं जाणून घ्यायचं? असं कसं?"
पहिला "अरे मित्रा, जे चालू आहे तेच आयुष्य! समोर जे घडतं आहे तोच 'अनुभव'. त्या घटनेकडेच बघायला शीक तेच तुला मुक्कामाला नेणार आहे, एवढेच नव्हे तेच तुझ्या प्रवासाचा भाग आहे! ह्याहून वेगळे काही घडत नसते."

(धनंजयचे ह्या कवितेमागचे विचार वाचायला आवडतील.)

(स्वगत - एखादा माणूस हा विद्वान आहे असे समजल्यावर तो नेहेमीच विद्वत्ताप्रचुर लिहिणार, त्याच्या प्रत्येक लिहिण्यात काही गहन, खोल अर्थ असणारच ह्याची आपल्याला इतकी खात्री का असते? ती व्यक्ती साधं, सोपं, सरळ काही लिहू शकणारच नाही का? की ते साधं, सोपं, सरळ आहे हे आपल्याला मान्य करायचं नसतं?)

चतुरंग

धनंजय's picture

1 Jul 2008 - 8:18 pm | धनंजय

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

चतुरंग यांनी कविता दोन्ही स्तरांवर वाचली, यात तिचे चीज झाले. कवितेच्या कच्च्या मसुद्यात नैतिक बोधाच्या ओळी (गाडी मात्र जोवर हलतेय \ सारखी कुठेतरी पोचतेय!) कवितेच्या शेवटी होत्या - पण तो शेवट खूपच प्रवचनवजा, आणि थोडा रटाळ वाटत होता. लहान मुलाचा अनुभव म्हणून मग कविता पटली नसती, आणि ती तशी पटली तरच ते रूपक "बोधकथा" होण्यापासून वाचते. निरागस होऊन धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजणे हे जीवन-हाच-प्रवास-हेच-जीवन या रूपकापेक्षा महत्त्वाचे आहे, म्हणून तीच बॉटमलाईन, शेवटची ओळ. (नंदनना बरोबर लक्षात आला - दूधसागरच होता माझ्या मनात... बेसनलाडू यांच्यासारखा तो दक्षिण-मध्य रेल्वेचा प्रवास लहानपणच्या सुट्ट्यांशी घट्ट जोडलेला आहे. अमोल केळकर यांनी मिपावरच दूधसागराची सुंदर चित्रे दिली आहेत. या कवितेसाठी त्या चित्रांनी जागलेल्या आठवणीही स्फूर्ती होत्या.)

मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे ही एक नाट्यछटा बनू शकते. कवितेत मात्र कल्पनांची खूप काटकसर करता येते. आई-मुलगा, आणि बाबा-मुलगा संवादातले सगळे तपशील वाचक आपल्या अनुभवातून पुरवतो. अगदी "थियरी" वाटू नये, खरी घटना वाटावी, इतपत त्रोटक तपशील दिलेले पुरतात. (भडकमकर मास्तरांच्या वर्गासाठी गृहपाठ म्हणून अशी नाट्यछटा लिहायला घेतली पाहिजे :-))

सहज यांनी आणखी कविता लिहाव्यात अशी माझी फर्माईश आहे. बिरुटेसरांनी "तिकीट" यमकाबद्दल सांगितले ते ठीकच आहे, पण सहज यांची rhyme scheme: aa ba ba ba bb फारच कल्पक आणि सृजनशील आहे.

मनिष, चित्रा, देवकाका, आनंदयात्री, तात्या - आस्वादाबद्दल खूप धन्यू!

लिखाळ's picture

1 Jul 2008 - 8:44 pm | लिखाळ

वा कविता फारच मस्त आहे ! धनंजयराव आपण कमाल आहात.

कवीतेमध्ये काही बोधपर संदेश आहे हे वाचून मात्र कवीतेचा आनंद थोडासा कमी झाला.
पण तो कवीता वाचताना झाला नाही... नंतर झाला. कुणी राग मानू नका. जे खरंच वाटले ते लिहिले. सगळीकडे बोध आणि धडे घ्यायला मला विशेष आवडत नाही. अनेकदा नुसता अस्वाद घ्यावा असेच वाटते.

मी धरु जाता येई न हाता
पुढे पुढे उडते
फुलपाखरु..
या ओळीत सुद्धा जीवनाचे तत्वज्ञान शोधता येईलच की.. पण गरज असेल तर.. तसेच कवीने कोणत्या उद्देशाने त्या ओळी लिहिल्या हे सर्वात महत्त्वाचे. त्यानेच जर तत्त्विक अर्थाने त्या लिहिल्या असल्या तर आमची बोलतीच बंद.

-- (तत्वबोधापासून दूर) लिखाळ.

ईश्वरी's picture

1 Jul 2008 - 8:54 pm | ईश्वरी

सुंदर कविता...वेगळा विषय आणि सोपे तरीही अर्थपूर्ण शब्द .

ईश्वरी

ऋषिकेश's picture

1 Jul 2008 - 9:48 pm | ऋषिकेश

अतिशय सुंदर बालगीत! फार फार आवडलं.. अजून लिहा :)
माहितीप्रदलेखना बरोबरच किंबहुना पेक्षा बालमित्रांसाठी ललितलेखन - काव्यलेखन होणे अधिक गरजेचे आहे. तसेच ते अतिशय कठीण आनि जबाबदारीचे आहे. तुमची ही कविता हल्लीच्या लहान मुलांसाठी फरफेक्ट वाटली... जियो!!!

-ऋषिकेश

सर्किट's picture

1 Jul 2008 - 10:14 pm | सर्किट (not verified)

असेच म्हणतो.

- सर्किट

शितल's picture

1 Jul 2008 - 10:57 pm | शितल

मस्त वाटले आणि लहान पणीचा रेल्वेचा प्रवास आठवला.

सुवर्णमयी's picture

3 Jul 2008 - 4:37 pm | सुवर्णमयी

वेगळे सादरीकरण, कविता आवडली.

विसुनाना's picture

3 Jul 2008 - 4:46 pm | विसुनाना

कविता!
घर येणार तेव्हा येणार,
गाडी मात्र जोवर हलतेय
सारखी कुठेतरी पोचतेय!

सखोल आणि तरीही मनोरंजक कविता.