तत्व माझे सोडणार नाही

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
27 Jun 2008 - 6:01 am

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दारु न पिता झिंगणार नाही
झोप न येता पेंगणार नाही
कसल्या आल्या भावना
शिस्ती शिवाय रहावेना

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दुःखाची नाही कसली खंत
परिणामाची नाही मुळीच भ्रांत
पुरूषगीरी सोडणार नाही
स्त्रीचा अवमान टाळणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
करून करून भागले
देवपूजेला लागले
नैवेद्दया शिवाय पूजा नाही
प्रसाद मागल्यावर देणार नाही

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
वय झाले तरी आढ्य रहाणार
आपले तेच खरे म्हणणार
लाकडे स्मशानात गेली तरी
वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 8:46 am | विसोबा खेचर

मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
वय झाले तरी आढ्य रहाणार
आपले तेच खरे म्हणणार
लाकडे स्मशानात गेली तरी
वाद घातल्या शिवाय रहाणार नाही.

क्या बात है! लै भारी कविता....!

तात्या.

अरुण मनोहर's picture

28 Jun 2008 - 9:49 am | अरुण मनोहर

करून करून भागले
देवपूजेला लागले
नैवेद्दया शिवाय पूजा नाही
प्रसाद मागल्यावर देणार नाही

प्रसाद मागल्यावर देणार का नाही? हे कोणते तत्व?

ददारु न पिता झिंगणार नाही
झोप न येता पेंगणार नाही
कसल्या आल्या भावना
शिस्ती शिवाय रहावेना
वरील ओळीत कल्पना अस्ताव्यस्त भरकटल्या आहेत असे वाट्ले.
कदाचित मी कवीच्या फ्रीक्वेन्सीत विचार केला नसेल. कृपया उलगडा होईल का?

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Jun 2008 - 10:06 pm | श्रीकृष्ण सामंत

अरूण मनोहरजी नमस्कार,
आपण योग्य तोच निष्कर्श काढला आहे.कवीची फ्रिक्वेन्सी जूळणं हे काही कवितेत कवीच्या मनातला अर्थ कळण्यासाठी आवश्यक होवून बसतं.
काही आढ्य- चमत्कारीक व्यक्ति कवीला त्याच्या जीवनात पाहून कवीच्या मनाला असं लिहावं असं वाटलं.

"करून करून भागले
देवपूजेला लागले"
याचा अर्थ असा की हे सदगृहस्थ आयुष्यभर इतरावर अन्याय करून आता त्यांना प्रचिती आली म्हणून सरळ वागायला लागले
"करून करून भागले
देवपूजेला लागले"
हा वाकप्रचार असल्या वृत्तिच्या माणसाला उद्देशून म्हणतात.

"सुंभ जळलं तरी पीळ जळत नाही"
असल्या वृत्तिचे लोक
"करून करून भागले
देवपूजेला लागले"
असं जरी वागण्याचा प्रयात्न करू लागले तरी एखाद्दा लहान मुलाने पुजे पुर्वी प्रसाद मागण्याचा हट्ट धरला तरी
"नैवेद्दया शिवाय पूजा नाही
प्रसाद मागल्यावर देणार नाही"
असा ह्यांचा त्या बालकाकडे "हट्ट" असतो.

दारु न पिता झिंगणार नाही
झोप न येता पेंगणार नाही
कसल्या आल्या भावना
शिस्ती शिवाय रहावेना
याचा अर्थ असा की हे गृहस्थ स्वतःला जणू मिलीटरीतून नुकतेच रिटायर्ड होवून आल्या सारखे आयुष्यभर शिस्तित वागत आले आहेत एखादा थकून भागून झिंगल्या सारखा चालत असला किंवा पेंगत असला तर तो दारूच प्यालेला असणार म्हणून तो असा वागतो असा तर्क करून टिका करतात.कारण यांना कसल्या भावना वगैरे काही नाही यांना शिस्त प्रिय असल्याने खरं सागून सुद्धा त्यांना पटत नाही.आणि आपलं तेच खरं असं मानतात.तेव्हा
झिंगणं हे फक्त दारू पिवूनच होतं आणि झोप यायला लागली तरच माणूस पेंगतो असा ह्यांचा (गैर) समज असतो.
मला वाटतं अरूण मनोहरजी,आपल्याला बराचसा उलगडा झाला असावा.
आपण केलेल्या उहापोहा बद्दल आभार.
कवितेमधून आपल्या भावना आणि मनातले विचार सांगता येत असल्याने कविते सारखं उत्तम
माध्यम नाही असं मला वाटतं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर's picture

29 Jun 2008 - 5:08 am | अरुण मनोहर

मला कधी कधी कविता लिहील्यावर ती प्रकाशीत करतांना असे वाटते की आपण जर काही प्रास्ताविक दोन शब्द लिहीले नाही तर ती वाचतांना लोकांना मजा येणार नाही. अशा वेळी थोडे प्रास्ताविक लिहीणेच त्या कवितेच्या हेल्थ साठी चांगले.

ह्याची दुसरी बाजू पण मला माहीत आहे. थोड्या शब्दात, जास्त काही न बोलता कल्पना मांडून, अर्थ, (अनर्थ) प्रास्ताविक न करता कविता लिहावी आणि बाकी सर्व वाचकांवर सोडावे.

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jun 2008 - 6:10 am | श्रीकृष्ण सामंत

अरूण मनोहरजी,
मी सहमत आहे.पुढल्या वेळेस मी मझ्या कवितेत जरूरी भासल्यास तसं प्रास्ताविक देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.
आपल्या सुचने बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com