देव किती ? अगदी बोटांवर मोजण्या एवढेच

शरद's picture
शरद in काथ्याकूट
9 Jun 2011 - 7:18 am
गाभा: 

वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.

(१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही.

(२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या.

(३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्‍या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा. सातेरी, भुमका, पिडारी, मरीआई, तसेच भैरोबा, रवळनाथ, वेताळ, अय्यनार इत्यादी. प्रत्येक कुलाच्या विशिष्ट उपास्य देवता, उदा. खंडोबा, ज्योतिबा, भवानी, योगेश्वरी, शांतादुर्गा, व्याघ्रेश्वर, इत्यादी. खरे म्हणजे या देवताच आदीमदेवता म्हणावयास पाहिजेत. पण उच्चवर्गीयांनी यांतील बर्‍याच जणांना शंकर, पार्वती, विष्णु यांचे अवतार वा सेवक असे रूप देऊन त्यांचा समावेश (२) मध्ये केला.

(४) क्षुद्र देवता : क्षुद्र व शूद्र यांचा घोळ घालू नका. क्षुद्र म्हणजे दुय्यम. हा शब्दप्रयोग पूर्वीपासून चालू आहे. यात कोणाला हिणवावयाचे असे नसून (२) मधील देवतांपासून वेगळे दाखवयाचे असते. गावाच्या सीमेवर, पडक्या भिंतीवर, एखाद्या शीळेवर शेंदूराने त्रिशूळ काढून त्या देवतेचे स्थान दाखवले असते. सामान्यत : या देवता उग्र-भयंकर असतात व त्या मांस-मद्याच्या नेवैद्याचा आग्रह धरतात.खेडोपाडी यांचा प्रभाव दांडगा असतो व संतांनी प्रयत्न करूनही त्यांचे ग्रामजीवनावरील अधिराज्य आजही लक्षणीय आहे.

आता देव किती या प्रश्नाचे उत्तर शोधावयास एक दंडक असा लावू की ज्यांची मोठ्या प्रमाणात देवळे आहेत व ज्यांची पूजा करणारे भक्त संख्येने जास्त आहेत त्यांचीच गणना करणे उचित ठरेल. तेव्हा (१) मधील देव बाद करू. (३) व (४) मधील देव मोजणे अशक्य आहे; तेही सोडून देऊ. शनी, सूर्य,नरसिंह इत्यादींची ५-१० देवळे सापडतील पण त्यांचाही विचार करण्याची गरज नाही. त्रिमूर्तीतील ब्रह्मदेव ज्येष्ट खरा पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची देवळे नगण्य आहेत. उरले किती ?

विष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला, हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रांतांतच लोकप्रिय आहे) इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे " वैष्णव ". सर्व हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व उपपंथ लक्षणीय आहेत.

शंकर यांनी अवतार घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ऊपासकांना " शैव " म्हणतात. शैवांत अनेक पंथ आहेत. आसेतुहिमाचल देवळे आहेत.( पसंती डोंगर-दर्‍यांची)र. विष्णूपेक्षा थोडा "कडक " देव. शांभवी चालते.

देवी (पार्वती व तिची रुपे) शक्ती ही एक प्राचिन व लोकमान्य देवता आहे, उपासकांना " शाक्त " म्हणतात. दानवमर्दिनी हे रूप जास्त आवडते असल्याने शंकरापेक्षाही जास्त उग्र रुप आढळून येते. तांत्रिक उपासनेत देवी व शिव यांना प्राधान्य दिले गेले आहे.

गणपती हा जरा सौम्यच देव आहे. थोडे दैत्य मारले हे खरे पण देवाने असे काही करावे अशी अपेक्षा असते म्हणून. बाकी कार्यारंभी वंदन करावयाचा मान असल्याने सर्वत्र संचार. उपासकांना "गाणपत्य " म्हणतात.

कार्तिकेय शंकर परिवारातला शेवटचा देव. दक्षिणेत जास्त उपासना केली जाते. सुब्रह्मण्य व मुरुग ही दुसरी नावे.

हनुमान रामाचा दास (दास हनुमान ) म्हणून प्रसिद्ध असला तरी यक्ष पूजेतून आलेल्या या देवाची " वीर हनुमान " ही ओळख ग्रामीण भागात आढळून येते.याची देवळे व भक्तगण मोठ्या संख्येने आढळतात.

जर वर सांगितलेली व्याख्या मानली तर विष्णु, राम कृष्ण, (विठ्ठल), शंकर, देवी, गणपती, कार्तिकेय व हनुमान एवढेच देव उरतात.एखादा राहिला असला तर तो धरूनही बोटांवर मोजता येतील एवढेच " देव " खरे.

शरद

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

9 Jun 2011 - 9:20 am | रणजित चितळे

आपले लेख मला नेहमी आवडतात. चांगला लेख. भुज मध्ये एक गायत्रीचे (गायत्री मंत्राचे) मंदीर आहे. आपला एक देव दत्त (त्रिमुर्ती) पण त्याची देवळे फार कमी. मला वाटते जसे प्रत्येक माणसाचे एक नशिब असते तसे देवांचे पण असावे. सध्या तिरुपती ह्या देवाची चलती आहे.

मला नेहमी प्रश्न पडतो सोम देवते बद्दल. बाकी वैदीक देवतांचे समजू शकतो - storm and dawn theory मुळे उत्पन्न झालेल्या ह्या देवता आता मागे पडल्या आहेत. सोमरसाचे काय गुपित आहे. हल्ली सोमरस म्हणजे दारू असे साधारण समजले जाते. माझ्या मते सोमरस म्हणजे अजून काहीतरी चांगली वनस्पती असणार त्या काळी - काही प्रकाश टाकू शकाल का ह्या वर.

मृत्युन्जय's picture

9 Jun 2011 - 12:56 pm | मृत्युन्जय

सोमरसाचे काय गुपित आहे

सोमरस म्हणजे दारु नव्हे, मात्र हे उत्तेजक पेय नक्की आहे. सोमरस काही मुळ्यांपासुन आणि औषधी वनस्पतींपासुन बनवला जातो खासकरुन सोम नावाच्या वनस्पतीचा हा रस / अर्क असतो असे म्हणतात. त्याच्या उत्तेजक गुणामुळे त्याची तुलना दारु शी केली जाते. पुर्वी तो यज्ञात ज्वलनशील व आरोग्यदायी पदार्थ म्हणून वापरला जाई व पिण्यासाठीही वापरला जाई. सोमरसाचे नियमित प्राशन केल्यास शरीर सुदृढ होते आणि कांती सतेज होते तसेच चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात असे वाचले आहे. अशी गुणवैशिष्ट्ये असणारी वनस्पती अफ्रिकेच्या जंगलात मिळते असे ऐकिवात आहे.

देव दारु पीत नव्हते असाही एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात रामायण महाभारतात मदिरा / मैरेयकाचे उल्लेख आहेत. तिथे सोमरस हा शब्द वापरलेला नाही आहे. अर्थात असाही एक मतप्रवाह आहे की राम कृष्ण इत्यादी मानव रुपधारी देव मदिरा / मैरेयकाचे प्राशन करायचे तर स्वर्गाधिष्ठीत देव आणि त्रिमुर्ती सोमरस प्राशन करायची.

शरद's picture

9 Jun 2011 - 6:35 pm | शरद

वैदिक आणि पुराणिक काळ

वेदांचे निर्मिती साधारणत: इ.स.पूर्व ५००० ते इ.स.पूर्व २००० पर्यंत चालू होती. वाद नकोत म्हणून थोडी लहान मर्यादा घेत आहे. या काळात देवता मानवसदृश होत्या. इंद्र माणसांच्या लढाईत भाग घेत असे. हळुहळु या देवता विचारवंतांना अपूर्ण वाटू लागल्या. बुद्धानंतर (इ.स.पूर्व ५०० ते इ.स.पूर्व १००)देवतांची माणसाला भासणारी "गरज" निराळी होती. त्यामुळे पुराणांनी शंकर, विष्णु असे देव पुढे आणले.हे देव माणसांसारखे नव्हेत. या अमानवी देवांची तुम्ही भक्ती करू शकता, बरोबरी नाही. हा एक फार मोठा फरक आहे.

सोम रस म्हणजे दारू मव्हे. सोमवल्ली म्हणजे तंबाखू, अफू जशी तरतरी आणतो तशी उल्हसित करणारी वनस्पती. काही दिवसांपूर्वी अशी वल्ली अफगणिस्थान भागात सापडली असा दावा केला गेला होता.सोम या देवाचा व सोमरसाचा संबंध नाही. सोमरस यज्ञाच्या वेळी तयार करून पित व देवांनाही देत. अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य, पूर्ण देव नव्हेत. त्यांना सोमप्राशनाचा अधिकार नव्हता. त्यांनी च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून दिले तेव्हा च्यवनांनी त्यांना सोमरस देण्याचे कबूल केले. यज्ञात त्यांना सोमरस मिळणार म्हटल्यावर इंद्र रागावला व च्यवनांवर वज्र घेऊन धावला. ऋषीनी त्याला खिळखिळे करून टाकल्यावर इंद्राने गुपचुप अश्विनीकुमारांचा हक्क मान्य केला.

मानव, असूर व देव ही भावंडेच. त्यात असूरांना ज्येष्ट मानले आहे. पण अशा बाबतीत पुराणांचे एकमत नसते.

(पुराणांवर एक लेख लिहीन म्हणतो. पण एक पुरणार नाही व या पुराणांतील वांग्यात किती जणांना इंटरेस्ट असणार ? असो.)

शरद

धमाल मुलगा's picture

9 Jun 2011 - 6:51 pm | धमाल मुलगा

शरदराव,
लिहाच हो तुम्ही. आहेत बरेच जण पुराणातल्या वांग्यांचे चाहते.

आणि एक शंका:
साधारणपणे ८००-९०० वर्षांपुर्वीपर्यंत गणपती ह्या देवतेची गणना देवता म्हणून नव्हे तर असूर किंवा विघ्नकर्ता म्हणून केली जायची असे ऐकिवात आहे. तर, ह्यामध्ये बदल कधी आणि कसा झाला, गणपती विघ्नकर्त्यापासून विघ्नहर्ता कसा झाला ह्याबद्दलही थोडं सांगा ना. :)

शिवाय, जशी शिवमंदीरं प्राचिन काळचीही आढळून येतात (अगदी हूण, मुस्लिम वगैरे आक्रमण काळातील किंवा त्याही आधीची) तशी गणपतीची किंवा विष्णूची जुनी मंदिरं आहेत का? त्याबद्दलही वाचायला आवडेल.

वैदिक देवता म्हणजे थोडक्यात पंचमहाभूते असेच दिसते. ह्याचा अर्थ वैदिक काळातील उपासना ही जास्त वास्तवाच्या आणि उपयोग्यतेच्या जवळ जाणारी असावी काय असा प्रश्न पडला.

अवांतरः ह्या आणि अशा विषयांमुळे धाग्यावर अवांतर घडत असल्यास आपण व्यनितून गप्पा मारुया. मला तरी चालेल. :)

वैदिक काळातील उपासना ही जास्त वास्तवाच्या आणि उपयोग्यतेच्या जवळ जाणारी असावी काय असा प्रश्न पडला.

मलाही हा प्रश्न पडला होता आणि माझे उत्तर तरी होय असेच आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2011 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

साधारणपणे ८००-९०० वर्षांपुर्वीपर्यंत गणपती ह्या देवतेची गणना देवता म्हणून नव्हे तर असूर किंवा विघ्नकर्ता म्हणून केली जायची असे ऐकिवात आहे. तर, ह्यामध्ये बदल कधी आणि कसा झाला, गणपती विघ्नकर्त्यापासून विघ्नहर्ता कसा झाला ह्याबद्दलही थोडं सांगा ना.

ह्यावर नानानी लिहिलेल्या गणरायावरील लेखनाची आठवण झाली. त्यात नानानी अतिशय सुंदर शब्दात ह्या सर्व प्रश्नांची माहिती दिलेली होती. पण सध्या त्याचे लिखाण इथे दिसत नसल्याने दुवा देणे शक्य होत नाहीये.

सुंदर लेखन शरद काका.

स्पा's picture

9 Jun 2011 - 9:47 am | स्पा

आपले लेख मला नेहमी आवडतात

असेच म्हणतो...

हा ही लेख छान

शिल्पा ब's picture

9 Jun 2011 - 9:59 am | शिल्पा ब

विंटरेष्टींग लेख.
एक शंका...वैदिक अन पौराणिक काळ यात नेमका काय फरक आहे? पौराणिक काळातही वेद शिक्षण होते का अजून काही?

मृत्युन्जय's picture

9 Jun 2011 - 12:32 pm | मृत्युन्जय

वैदिक आणि पौराणिक काळातला एक प्रमुख फरक म्हणजे वैदिक काळात देवादिकांना भेटणार्‍या मानवांची संख्या खुप जास्त होती. तैतिरीय ब्राह्मण संहितेत असे लिहिले आहे की देव लोक आणि मनुष्य प्राणी दोघेही आधी पृथ्वीवर रहायचे मात्र देवांनी यज्ञ करुन आणि वेदांचे अध्ययन करुन स्वर्ग लोक प्राप्त करुन घेतला तर ती विद्या मानवजातीत केवळ काही ऋषीमुनींपर्यंत मर्यादित राहिली आणि नंतर लुप्त झाली.

कदाचित चुकीचे असेल पण माझ्यामाहितीप्रमाणे सध्या वैश्ववत मन्वंतर चालु आहे आणि त्यातले हे २२ वे चक्र आहे (प्रत्येक चक्रात एक सत्य, त्रेता, द्वापार आणि कलीयुग असते). बहुधा या चक्राच्या आधीचा काळ वेदिक काळा तर त्यानंतरचा पौराणिक काळ म्हणुन ओळखला जातो.

पुराणांचे संकलन वेद व्यासांनी केले. त्यामुळे साधारण ५००० वर्षांपुर्वापासुन इसवीसनापर्यंत पौराणिक काळ अस्तित्वात होता असे मानायला हरकत नसावी.

प्रचेतस's picture

9 Jun 2011 - 10:09 am | प्रचेतस

उत्तम लेख.
सातवाहनकालात वैदिक देवतांचीच पूजा चालत होती. पूजा म्हणजेच हविस - यज्ञसंस्कृती वगैरे. नाणेघाटातल्या त्यांच्या शिलालेखात सातवाहनांनी दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केल्याचे म्हटले आहे. पण त्याचबरोबर बौद्धधर्माच्या वाढत्या प्रसारामुळे ही प्रथा लयाला गेली व सातवाहनांच्या अस्तानंतर गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य राजवटीत परत मूर्तीपूजा वाढू लागली, बौद्धधर्माच्या वाढत्या प्रसाराला तोंड देण्यासाठी विष्णू, शंकर, देवी इ. निम्न देवतांना महत्व देउन त्यांची मूर्तीरूपात उपासना सुरु झाली. हा प्रसार वाढून पर्यायाने भारतातील बुद्ध धर्म हळूहळू लुप्त होत गेला.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2011 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll

विष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला, हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रांतांतच लोकप्रिय आहे) इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे " वैष्णव ". सर्व हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व उपपंथ लक्षणीय आहेत.
यातल्या बोल्ड केलेल्या भागाशी असहमत. तामिळनाडूमधेही पांडुरंगाचे भक्त मोठ्याप्रमाणावर आहेत. यूट्यूबवर शोध घेतल्यास त्या पंथाचे तामिळी भक्त देखील बरेच आहेत हे दिसून येईल. सदर माहीती माझ्या एका तामिळ मित्रानेच पुरवली होती. "हैय्यो" जर इथे येत असतील तर ते अधिक प्रकाश टाकू शकतील.

अमोल केळकर's picture

9 Jun 2011 - 10:50 am | अमोल केळकर

छान माहिती. धन्यवाद

अमोल केळकर

वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच.
कोटी हा शब्द प्रत ( दर्जा ,प्रकार) या साठे वापरलेला आहे उदा: उच्चकोटीचे , पराकोटीचे वगैरे.
यात मुख्य तीन देव ब्रम्हा विष्णू महेश (इन्क्लुडिंग त्यांची कुटुंबे) ,पंच महभूते ( पॄथ्वी आप तेज वायू, काल ) ,नवग्रह ( सूर्य ,चंद्र, शनी वगैरे) अष्टदिशा , अष्टवसु , येतात
ग्रामदेवता वगैरे वैदीक काळात नसाव्यात. त्या नंतर गरजेनुसार निर्माण झाल्या. किंवा त्या आर्यांच्या पूर्वीच्या संस्कृतीचा भाग असाव्यात.
अवतार ही संकल्पना देखील तशी नवीनच ( उदा रामायणात परशुरामाला देव मानलेले नाही)
ही संकल्पना इसवीसन १२०० च्या नंतर आली असावी.

नित्य उपासना करणार्या सच्च्या उपासकाला, निस्सीम भक्ताला त्याचे इष्टदैवत (एकच दैवत/ काही देवदेवता) पुरे होते. देवाचा दर्जा, प्रत वगैरे काहीही मधे येत नाही असे थोडेफार वाचन केल्याने दिसून आले. उदा. ज्ञानोबा आणि तुकोबारायाना विठ्ठल, मोरया गोसाव्याना गजानान, वासुदेवानन्द सरस्वतीना दत्त इ.

काळानुसार प्रतिकात्मकता बदलली तरी प्रचितीचे बोल बोलणारे एकदाचेच आणि कायमचेच आजतागायत नाहीसे झालेले नाहीत. याचे दोन अर्थ निघू शकतात. प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसेल तरीही खरोखरच आत्मप्रचिती, ईश्वरी साक्षात्कार वगैरे काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता - भ्रमिष्ट लोक पैदा होण्याची भलीमोठी परम्परा अजूनही खण्डित झालेली नाही.

माणसाला देवान्ची उपासना, भक्ती वगैरे करणे सोडून त्यान्ची खानेसुमारी करण्याची कल्पना इसवीसन पूर्व/ नन्तर कधी सुचली असावी असा एक मजेशीर प्रश्न मलाही पडला. बाकी चालू द्या.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2011 - 12:11 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा वाहव्वा...ग्रेट सिक्सर...लगे रहो...अतीशय मार्मिक प्रतिक्रीया

छान माहिती. आजचा हिंदु धर्म वैदिक आणि अशा अवैदिक धर्मांचे मिश्रण आहे.

शंकराचार्यानी शिव पंचायतनाची सुरुवात केली ( म्हणे) त्यात शिव, शक्ती, गणपती, विष्णू आणि सूर्य या देवता येतात. ( कृपया कन्फर्म करावे.)

मूकवाचक's picture

9 Jun 2011 - 8:48 pm | मूकवाचक

लेख आवडला.

डावखुरा's picture

9 Jun 2011 - 11:24 pm | डावखुरा

मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय. आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो. ३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो.

आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देवता नेमके कोणत्या?

तर त्यांची नावे देतो. धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६) धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८) हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२) आणि याखेरीज २ अश्विनीकुमार! असे सारे मिळून ३३ प्रकारच्या देवता होतात.(विक्रम श्रीराम एडके)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2011 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा

आज हयातीत जगातील एकही धर्म विज्ञान-निष्ठ नाही...किंबहुना अ-विज्ञाननिष्ठा हीच प्रत्येक धर्माची खरीखुरी मर्यादा आहे...जेंव्हा जेंव्हा अशी भाषा वापरणाय्रांना या विषयातली आव्हानं अंधःश्रद्धा निर्मुलन वाद्यांकडुन टाकली जातात...(जुन्या काळातल्या चार्वाकांपासुन ते आजच्या काळातल्या सर्व समाजसुधारक /अंधःश्रद्धा निर्मुलकां पर्यंत सर्व)...तेंव्हा कोणीही समोर येत नाहीत,आले तर नंतर कांगावा करुन पळुन जातात,काही जण हिंसक मार्गांचाही आश्रय घेतात.हाच आजपर्यंतचा ईतिहास आहे...धर्म विज्ञाननिष्ठ आहे असं म्हणणं,आपल्याच धर्माला कमीपणा आणणारं आहे,आपणही हिंदु आहात.मी ही हिंदु आहे..आपल्याला १ विनंती ....सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध एकदा काळजी पुर्वक वाचावेत...मला वाटते,आपला भ्रम दुर होईल....

वरील प्रतिक्रीयेत जे काही आपण सांगुन दिलं, त्यात विज्ञाननिष्ठ अस काय आहे? कुणी ३३हजाराची मांडणी करावी,कुणी ३३कोटी,कुणी ३३, कुणी ये सब झुठ...एकच ब्रम्ह आहे म्हणावं...धर्माचे १७शे६० आचार्य...आणी अजुन त्यांची खंडिभर मत आणी मतांतरंही...अहो पण याला सगळ्याला पुरावा काय?...ह्याला असं वाटतं,तर त्याला तसं वाटतं,या ''वाटण्याला'' विज्ञानात काही अर्थ(तोही प्राथमिक पातळीवरचा)असतो...पण पुढच्या चिकित्सेत हे सगळच ओमफस होतं,तरीही हिंदु धर्मातलं जे जे काही विज्ञाननिष्ठ आहे असं वाटत,त्याची १ यादी करा...आपण आणी आपले सर्व समर्थक हे आव्हान घेऊन महाराष्ट्र अंनिस कडे चला... त्यांच्यासमोर हे सर्व मांडा,,,,सांगा केंव्हा करताय हे सर्व?...ईथे वाद-प्रतीवाद करत बसण्यापेक्षा,खरा आखाडा तो आहे...येणार का?

अजातशत्रु's picture

11 Jun 2011 - 2:29 pm | अजातशत्रु

वरील प्रतिक्रीयेत जे काही आपण सांगुन दिलं, त्यात विज्ञाननिष्ठ अस काय आहे? कुणी ३३हजाराची मांडणी करावी,कुणी ३३कोटी,कुणी ३३, कुणी ये सब झुठ...एकच ब्रम्ह आहे म्हणावं...धर्माचे १७शे६० आचार्य...आणी अजुन त्यांची खंडिभर मत आणी मतांतरंही...अहो पण याला सगळ्याला पुरावा काय?...ह्याला असं वाटतं,तर त्याला तसं वाटतं,या ''वाटण्याला'' विज्ञानात काही अर्थ(तोही प्राथमिक पातळीवरचा)असतो...पण पुढच्या चिकित्सेत हे सगळच ओमफस होतं,तरीही हिंदु धर्मातलं जे जे काही विज्ञाननिष्ठ आहे असं वाटत,त्याची १ यादी करा...आपण आणी आपले सर्व समर्थक हे आव्हान घेऊन महाराष्ट्र अंनिस कडे चला... त्यांच्यासमोर हे सर्व मांडा,,,,सांगा केंव्हा करताय हे सर्व?...ईथे वाद-प्रतीवाद करत बसण्यापेक्षा,खरा आखाडा तो आहे...येणार का?

श्री. दिवेकर साहेब दोन्हि प्रतिसाद अतिशय आवडले..

एक वाक्यता कशातच नसते...त्यामुळे

बाकी चालू द्या..............

गोगोल's picture

10 Jun 2011 - 5:27 am | गोगोल

>> मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
असेच म्हणतो.
मी येथे आपल्या वेदग्रंथांचा खूप गम्भिर्याने अभ्यास करण्याची गरज आहे हे सांगितलेच होते. कुणी सांगाव कदाचित अशा अभ्यासातून प्रकाश वेगाने जाणारी याने कशी बांधावी हे ही सापडेल (हा कदाचित "सापडेल" याला आहे. अशी माहीती ऑलरेडी वेदात आहे यात तिळमात्र शंका नाही). भारत सुपर पॉवर होणार नुसतच म्हणत राह्तात. पण असा जर अभ्यास केला नाही तर कसा होणार भारत सुपर पॉवर?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2011 - 12:06 pm | अत्रुप्त आत्मा

हे सगळ आधिच आपल्या धर्मवेत्यांना माहित होत...हा नेहमीच केला जाणारा खोडसाळ अपप्रचार आहे.(आणी अधीच शोध लागलेले आहेत,तर या पुढचे पुर्ण/अपुर्ण अवस्थेत असलेले सगळे शोध तुम्हीच लाऊन दाखवा ना..विज्ञान वाद्यांना कशाला चान्स शिल्लक ठेवता?) तुमच्या सारख्या लोकांना आत्मवंचनेचं अजिबात भय नसत,म्हणुन तर तुम्ही कायम अश्या वावड्या उडवीत असता.म्हणुन गेली ५ हजार वर्ष नुसता अभ्यासच करत बसला आहात,एकही शोध लागला नाही,आणी असा शोध लागण शक्य नाही याचा तुमच्या सारख्यांना बोध झाला नाही...विज्ञान जगातल्या सगळ्या धर्मांपासुन बाजुला निघाल,वेगळ झालं,ते काही उगाच नव्हे.मग आमच्या सारख्यांनी कीतीही नम्रपणानी आवाहन केली,किंवा कठोर पणानं निर्विष हेतुनी आव्हानं दीली,तरी तुम्ही लोक जुमानत नाही.कारण तुम्हाला तुमचा अंधळा अहंकार जपायचा असतो...तुम्ही वेदग्रंथांचा अभ्यास गांभीर्यानं करायचा सल्ला देता...तरीही तुम्हाला१सांगतो.हे असले समलाक्षणिक भ्रम दुर करायची किंवा तपासुन पाहण्याची ईच्छा असेल,म्हणजे प्रकाश वेगान जाणारी विमानांची सुत्र/अणुचा सिद्धांत वगैरे..,तर लेखक वि.शं.ठकार यांचे ''विज्ञान आणी आध्यात्मःमुळा पासुन द्रुष्टीक्षेप''...मऊज(mauj) प्रकाशन...हे पुस्तक नम्रपणे गांभीर्यानी वाचुन पहा...म्हणजे आपल्या धर्माची मर्यादा काय,हे तरी कळेल...तुमच्या सारख्यांशी माझं काही वैर नाही.फक्त मी ज्या अंधारातुन बाहेर आलो,त्यातुन तुम्हीही यावं ही १ आपली भाबडी ईच्छा...

ता क---ज्याला आपण हिंदु आहोत अस मनापासुन वाटतं,त्यानी प्रथम हिंदुत्ववादी असलेल्या सावरकरांचं तर सगळं लेखन वाचायला हव... सावरकरांचे ''विज्ञाननिष्ठ निबंध'' हे हिंदुंचं एंटिव्हायरस आहे...ते टाकलं नाही,तर धर्मवादाचे विषाणु आपली हयात असलेली समाज व्यवस्था बिघडवणार हे नक्की...

गोगोल's picture

10 Jun 2011 - 5:22 pm | गोगोल

श्री ठे. वि. लेनंते यांचे "हिंदू धर्मः काल, आज आणि उद्या" या मालिकेतील दूसरा खंड "मनू ते सावरकर" वाचून बघा. त्यात आपण दिलेल्या बर्याच मुद्दांचा समाचार घेतला आहे.
केवळ येव्हढेच सांगतो की अशा विचारांमुळेच भारत महासत्ता होत नाही.

सुरुवातीलाच हे कबूल आहे की या बाबतीत आमचे ज्ञान निश्चितच कमी पडतेय.
त्यामुळे मला एक प्रश्न पडलाय तो असा की,

वट पोर्णीमेला वडाच्या (काहि पिंपळालाहि पुजतात) झाडाला दोरा गुंडाळून ७ प्रदक्षिणा,फेर्‍या घालतात..
(जन्मो जन्मी ह्योच नवरा,दादला मिळू दे म्हणून)

मग दावा केल्याप्रमाणे हे "उगीचच" होत नसावे...पण यात काय विज्ञान आहे ???

अवांतरः हा प्रश्न यासाठी कि एकच दिवस सोडून आता वटपोर्णीमा आहे,
त्यामुळे ती (व्रत) करणार्‍या माता-भगिनींनाहि यातले नेमके विज्ञान कळेल.

सुरुवातीलाच हे कबूल आहे की या बाबतीत आमचे ज्ञान निश्चितच कमी पडतेय.
त्यामुळे मला एक प्रश्न पडलाय तो असा की,

वट पोर्णीमेला वडाच्या (काहि पिंपळालाहि पुजतात) झाडाला दोरा गुंडाळून ७ प्रदक्षिणा,फेर्‍या घालतात..
(जन्मो जन्मी ह्योच नवरा,दादला मिळू दे म्हणून)

मग दावा केल्याप्रमाणे हे "उगीचच" होत नसावे...पण यात काय विज्ञान आहे ???

अवांतरः हा प्रश्न यासाठी कि एकच दिवस सोडून आता वटपोर्णीमा आहे,
त्यामुळे ती (व्रत) करणार्‍या माता-भगिनींनाहि यातले नेमके विज्ञान कळेल.

आत्मशून्य's picture

10 Jun 2011 - 1:34 am | आत्मशून्य

३३ कोटी देव नसावेतच, तेव्हां तेव्हडी लोकसंख्या तरी होती का या विषयीच (विनाभ्यास ) शंका आहे.

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 10:45 am | पिवळा डांबिस

तुम्हाला किती देवांना प्रसन्न करायचंय?
एकालाच ना?
मग निवडा की कोणता ते आणि करा त्याची भक्ती सुरू...
उगाच ही देवांची शिरगणती कशासाठी?
नसते अजागळ उपद्व्याप कशाला करायचे हो?
:)

शिल्पा ब's picture

10 Jun 2011 - 10:57 am | शिल्पा ब

असतो एखाद्याला वेळ!!! रीटायर झाल्यावर वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न म्हणा हवं तर!! तुम्ही लगेच अजागळ म्हणुन मोकळे!! ;)

पिवळा डांबिस's picture

10 Jun 2011 - 11:04 am | पिवळा डांबिस

रिटायरपणा हाच आयुष्याचा अजागळपणा नव्हे काय?
आईशप्पत खरं खरं उत्तर द्या.....
;)

शिल्पा ब's picture

10 Jun 2011 - 11:12 am | शिल्पा ब

इश्श!! म्हणुन काय चारचौघात बोलायचं का ?

आणि काही का होईना देव देव करणाऱ्या देशात असे किती देव आहेत याचाच अभ्यास करताहेत ते...तुम्हाला एक कशाचं कौतुक नाही!!

पाषाणभेद's picture

10 Jun 2011 - 11:52 am | पाषाणभेद

लेख आवडला पण केवळ जास्त लोक ज्या देवांना भजतात तेच खरे देव हा निकष योग्य नाही असे वाटते.
उद्या एखाद्या समाजाची लोकसंख्या वाढली अन त्या त्या परीने देवूळे वाढली आणि मग तेच खरे देव हा न्याय असेल तर ते योग्यच असेल असे नाही.

हे म्हणजे ज्या पार्टीचे खासदार जास्त त्यांचेच विधेयक मंजूर करण्यासारखे झाले.

मला स्पिलबर्गचा ए आय सिनेमा आठवला.. यंत्रमानव मुलगा यंत्रमानवासारखी दिसणारी देवी तयार करतो.. त्यातच आहे ना हा सीन?

लेख ठिक ... विचारांप्रमाणे लिहिलेला आहे त्यामुळे आवडला.

--------
वरती मृत्यंजय म्हणतात त्याप्रमाणे काही काळापुर्वी देव आणि मानव पृथ्वीवर राहत होते.
मग मला प्रश्न पडतो देवांना काय फक्त भारतच दिसत होता काय ?

याचे एकच उत्तर मला सापडले आहे.
आपल्याकडे होणारे राजे/मोठे लोक/लोककल्यान कारी व्यक्ती/ विशिष्ट गोश्टीतील नेते यांनाच जनता नंतर देवता मानत असतील.
कदाचीत इंद्र हा सुद्धा कधीकाळी पृथ्वीवरील माणुस असेल .. त्याने सगळीकडे राज्य केले असेन म्हणुन तो देवांचा देव.
--------------

गवि's picture

10 Jun 2011 - 2:03 pm | गवि

हेच म्हणतो..

नंतर मग देवांच्या वैशिष्ट्यांबद्दल अतिशयोक्तिपूर्ण प्रतिमा तयार होत जायला पुरेसा हजारो वर्षांचा काळ मधे गेला आहे.

तेव्हा काहीसे वेगळे रूप्/चेहरा असलेल्या सदाचरणी न्यायप्रिय लाडक्या मनुष्याला गणपती,
महान, काहीशा तापट पण शक्तिमान आणि भोळ्या व्यक्तीला शंकर

अशा रितीने देवत्व मिळाले असावे. सर्व माहिती माउथ टू माऊथ पुढच्या काळात पोचल्याने कानगोष्टी लक्षावधींनी झाल्या असतील आणि चमत्कारपूर्ण शक्ती असलेले गूढ कोणीतरी अशी या देवांची प्रतिमा बनली असणार.

Nile's picture

10 Jun 2011 - 2:10 pm | Nile

ज्ञात जग म्हणजेच संपूर्ण जग. काही देव थोर मानव असावेत तर उरलेले हुशार किंवा भ्रमिष्ट मानवांच्या कल्पना.

मृत्युन्जय's picture

10 Jun 2011 - 3:26 pm | मृत्युन्जय

वरती मृत्यंजय म्हणतात त्याप्रमाणे काही काळापुर्वी देव आणि मानव पृथ्वीवर राहत होते.
मग मला प्रश्न पडतो देवांना काय फक्त भारतच दिसत होता काय ?

नाही. देव ही संकल्पना जगाच्या पाठीवर सगळीकडेच सापडते. ग्रीकांमध्ये सुद्धा आपल्यासारखे देवी देवतांचे भारी प्रस्थ होते. फक्त आपल्याकडे देव हा दायाळु, करुणानिधी, सज्जन तारणहार आहे तर ग्रीक देवी देवता प्रचंड शक्तिशाली परंतु मानवासारखे स्वार्थापोटी राग लोभ धरणारे आहेत. भारतात देवतांना राग येतो तोही अयोग्य कृत्य केल्याबद्दल. तर ग्रीक देवता या बर्‍यापैकी इन्द्राशी साधर्म्य साधणार्‍या आहेत की ज्या कधीकधी स्वार्थासाठीही चिडतात.

इंद्र आणि झ्युस (ग्रीक देवांचा राजा) यांत बर्‍यापैकी साम्य आहे. दोघेही पर्जन्य नियंत्रित करतात. दोघेही अस्त्र म्हणुन वज्र वापरतात. (वज्राचा आकार वीजेसारखाच दाखवला जातो बर्‍याचवेळा आणि महाभारताच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये तर त्याला थंडरबोल्टच म्हणले आहे. झ्युस देखील थंडरबोल्ट वापरतो.

ट्रॉयच्या कथेत आणि महाभारतातदेखील अनेक साम्ये सापडतील:

१. अचिलीस आणि कृष्णात साधर्म्य आहे की दोघेही पायाच्या खालच्या बाजुला बाण लागुनच मेले.
२. कृष्णाचे शरीर सांदिपनी ऋषींनी दिलेल्या लेपामुळे इतर अस्त्रांपासुन सुरक्षित होते तर अचिलीसला त्याच्या आईने थेटीसने मंतरलेल्या पाण्यात बुडवल्यामुळे त्याचे शरीर इतर अस्त्रांपासुन सुरक्षित होते. कृष्णाला दिलेला लेप फक्त उजव्या पायाच्या अंगठ्याला लावता आला नाही तर थेटीसने अचिलीसला पाण्यात बुडवताना त्याच्या टाचेला धरुन बुडवले त्यामुळे त्या भागाला मंतरलेले पाणी लागले नाही अशी कथा आहे.
३. ट्रॉय मध्ये अचिलीसला देवांच्या राजाचा (झ्युस) आशिर्वाद होता तर महाभारतात अर्जुनाच्या पाठीशी इंद्र होता.
४. ट्रॉय मध्ये हेक्टरच्या पाठीशी सुर्य देवता होती तर महाभारतात कर्णाच्या पाठीशी देखील सुर्यच होता.
५. दोन्ही युद्धात देवांच्या राजाने पाठिंबा दिलेल्या योद्धाने सुर्याने पाठिंबा दिलेल्या योद्ध्याला हरवले.
६. झ्युसच्या वडिलांना असे कळाले होते की त्याचा मुलगाच त्याला मारेल. त्यामु़ळे त्याने त्याची सर्व मुले खाउन टाकली एकता झ्युस वाचला (त्याच्या वाचण्यात नदीच्या पाण्याचा हात होता). कंसाची कथाही अशीच आहे.

अजुन छिद्रान्वेषी अवलोकन केल्यास अशी बरीच साम्ये दिसतील.

देवांच्या खाणाखुणा जगभर पसरलेल्या आहेत. कॉकेसियन पर्वतरांगांमध्ये भलामोठा त्रिशूळ कोरलेला आहे. नाझ्का लाइन्स बद्दल सर्वांना माहिती आहेच. देव ही संकल्पना इजिप्शियन, ग्रीक, रोमन, मायन, सिंधु अश्या सर्व संस्कृतींमधुन दिसते. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात एकेश्वरवाद आहे. पण वरील सर्व संस्कृतीत एकापेक्षा आधिक देव होते.

गोगोल's picture

10 Jun 2011 - 5:16 pm | गोगोल

+१
असेच म्हणतो. पण छिद्रान्वेषी अवलोकन नका करू. त्याने बाहुल्या बनतात असे गविंची स्वाक्षरी स्पष्ट्पणे सांगतीये.

आत्मशून्य's picture

10 Jun 2011 - 10:34 pm | आत्मशून्य

आणी सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व पांडव व कर्ण अकिलीस वा हर्क्यूलीस प्रमाणे देव-मानवही होते. म्हणजे बाप देव आन माय मानव ..... किंवा वाइस वर्सा.....

शिल्पा ब's picture

10 Jun 2011 - 7:49 pm | शिल्पा ब

<<<मग मला प्रश्न पडतो देवांना काय फक्त भारतच दिसत होता काय ?
आता हॉलीवूडवाल्या पिच्चर मध्ये नाही का सगळ्या एलिअन लोकांना फक्त अमेरिकाच दिसत? तसाच काहीसं समजायचं.

अजातशत्रु's picture

11 Jun 2011 - 2:35 pm | अजातशत्रु

आता हॉलीवूडवाल्या पिच्चर मध्ये नाही का सगळ्या एलिअन लोकांना फक्त अमेरिकाच दिसत? तसाच काहीसं समजायचं.

नाहि हो जरा अभ्यास केला तर तेहि पुराणात कुठे ना कुठे सापडतीलच...!

तुम्हाला ब्राह्मण, पुराण, वेद वगैरे वगैरेची भारीच चीड हो!!! राजकारणात गेलात तर उपयोग तरी होईल असं मला आपलं वाटतं इतकंच.

अजातशत्रु's picture

13 Jun 2011 - 5:43 pm | अजातशत्रु

तुम्हाला ब्राह्मण, पुराण, वेद वगैरे वगैरेची भारीच चीड हो!!! राजकारणात गेलात तर उपयोग तरी होईल असं मला आपलं वाटतं इतकंच.

विचार/मुद्दे न पटणं याला चीड म्हणावे काय?
असो राजकारणात जाण्याचा सल्ला दिल्या बद्दल धन्यवाद.
तिथेहि हात पाय मारुन बघायला हरकत नाहि...

अवांतरः ब्राह्मण, पुराण, वेद वगैरे वगैरे वर प्रबोधनकार- श्री.केशव सिताराम ठाकरे यांचे साहित्य खुपच वैचारिक अन् वाचनीय आहे. !!