नसबंदी

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
16 May 2011 - 8:10 am

मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी
उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी

रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी
शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी

आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले
सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले

नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली
घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली

आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या
दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या

इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे
फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे

गोजिरवाणी स्वप्ने माझी घरंदाज पण बिना वारशी
वणवण फिरती अर्धनागडी खुरटी रोगट आणि उपाशी

रोध बरा सृजनाला अंध्या "दो ही बस" स्वप्नांची धुंदी
भाग्य नसे जर षंढत्वाचे करून घ्यावी हो नसबंदी

करुणकविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

16 May 2011 - 8:27 am | नरेशकुमार

छोटे कुटूंब सुखी कुटूंब. हम दो हमारे दो.

मनिष's picture

16 May 2011 - 11:06 am | मनिष

मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी
उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी

रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी
शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी

आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले
सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले

नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली
घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली

गुर्जी - हे नाही आवडले अजिबात! :(

धनंजय's picture

17 May 2011 - 4:39 am | धनंजय

हिडीस तर आहेच. पण समजूनसावरून बीभत्स आहे.

पण तुमच्या प्रतिसादामुळे एका बाबतीत विचार मनात सुस्पष्ट झाला. वर उद्धृत केलेल्या कडव्यांमधले बीभत्स आणि त्यापुढील कडव्यांमधले फार्स-व्यंग्य-कटुविनोद ; या दोघांमधली भेग (सफाईच्या दृष्टीने) मला त्रास देते आहे. दोन्ही भाग अर्धवट आहेत, म्हणून या दोन कविता आहेत, असेही म्हणवत नाही. पण हा सांधा खिळखिळा असल्यामुळे अनुभव एकसंधही नाही...

अभिज्ञ's picture

17 May 2011 - 7:04 am | अभिज्ञ

कवितेचे दोन भाग केले तरीदेखील दोन्हि भाग एकमेकाच्या कॅनव्हासवर ठिकसे उमटत नाहीत.
पहिला भाग फारच भडक अन दुसरा भाग त्यामानाने फारच ढोबळ वा फुसका...

अभिज्ञ.

म्हातारचळ लागल्यावर असे सपक काव्य स्पुरात असावे .
मिपावर सध्या आलेल्या सपक वादळात अजूण एकाची भर
असो...

नगरीनिरंजन's picture

16 May 2011 - 12:31 pm | नगरीनिरंजन

स्लमडॉग प्लेबॉय :-)
जनकल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.

मुक्तसुनीत's picture

17 May 2011 - 7:37 am | मुक्तसुनीत

एका विशिष्ट नैतिकतेचा - किंवा म्हण्टलं तर नैतिकतेच्या अभावाचा - दृष्टीकोन असलेल्या निवेदकाच्या भूमिकेतून लिहिलेलं काव्य. तडकलेल्या भिंगातून जे जग दिसतं ते नॉर्मल समजल्या जाणार्‍या दृष्यापेक्षा अर्थातच निराळं असतं आणि आजवर जशा रितीने दिसलं नाही तशा रीतीने दाखवण्याचा प्रयत्न त्यात असतो. तो प्रकार जाणवला.

ज्या वेव्हाराचे वर्णन कवितेत केलेले आहे त्याच्याकडे एकंदर रोकड्या मौजमजेच्या दृष्टीने पाहिलेले आहे. असा दृष्टीकोन खेळकर, कॅजुअल, असतो. "गुडी टू शूज" नैतिकतेच्या जळमटांपासून दूर असलेला निरामय दृष्टीकोन. मात्र, एकंदर मौजमजेची अवस्था संपल्यानंतर जी साधारण आयुष्ये निवेदक पाहातो त्याच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या कृतींचे परिणामस्वरूप "बिना वारशी वणवण फिरणास्या अर्धनागडी खुरट्या रोगट आणि उपाशी "जीवांची आठवण येते. मात्र, त्याबद्दल काढलेला निष्कर्ष - जो शेवटच्या चरणात सामावलेला आहे - तो असाच, जगाहून विपरितच आहे. की अशा स्वरूपाच्या रोकड्या वेव्व्हाराला हे सृजनाचे अनावश्यक अस्तर कशाला ? जिथे काहीनवे निर्मायचे नाही, तिथेही ही सृजनाची कटकट कशाला आणून ओवायची ? ही एक जैवशास्त्रीय अ‍ॅनोमालीच नव्हे काय ? तिथे "अवरोध"च आवश्यक.

अवांतर : मला मीटर प्रयत्नपूर्वक समजले. "शालिन नजरा..." या ओळीत ते हुकले आहे असे वाटले.

राजेश घासकडवी's picture

19 May 2011 - 11:13 pm | राजेश घासकडवी

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद.

काहींनी लैंगिक अर्थ हिडीस वाटल्याची तक्रार केलेली आहे. त्यावर मी इतकंच लिहू इच्छितो की ते एक रूपक आहे. सृजनशीलतेसाठी शारीर प्रतीक वापरलं आहे. तारुण्यात, जेव्हा जग हे मोकळं मैदान दिसत असताना काय पाहू, काय उपभोगू, कुठच्या क्षेत्रात अनुभव घेऊ... अन् कुठच्या नको... असं वाटत असतं. त्यावेळी स्वैर फिरण्यात आनंद असतो, पण या स्वैरपणाला दिशा मिळाली नाही तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती येते. ससा कासवाच्या गोष्टीत नेहेमी कासवाचं कौतुक होतं. पण ती सशाची शोकांतिका आहे.

विसूनाना यांनी या कवितेचं उत्तम विश्लेषण इथे केलेलं आहे.

नगरीनिरंजन's picture

20 May 2011 - 12:11 am | नगरीनिरंजन

विसूनानांनी केलेलं विश्लेषण अगदी बरोबर आहेच, पण तो तर अगदी सरळसरळ अर्थ झाला. मर्ढेकरांच्या कवितांप्रमाणेच या कवितेलाही एक वैश्विक परिमाण आहे ते बहुतेकांच्या लक्षात आलेलं दिसत नाहीय. यातली बारीक, खुरटलेली पोरं म्हणजे बहुसंख्य मानवजातच आहे आणि माणसाने प्रत्येक क्षेत्रात आपला फाळ घुसवून केलेल्या (अर्ध्या-मुर्ध्या) प्रगतीमुळे माणसाचं आयुष्यमान वगैरे वाढलं असलं तरी जगण्याचा ढासळलेला पोत हा त्या नवीन मिळवलेल्या अर्धवट ज्ञानामुळे ताठरलेल्या अहंकाराने घिसाडघाईत घेतलेल्या सृष्टीभोगाचाच परिणाम आहे. जगातले बहुसंख्य स्त्रोत मूठभर लोकांच्या हातात एकवटलेले असणे आणि त्यांच्या सकल जनांस अनुकरणीय अशा हायफ्लायिंग जीवनसरणीचेच रूपक म्हणून फॉरिन वारी आणि इंग्लिश मिडियम वगैरे कवितेत येतं.
शिवाय कवितेतली भेग हे एक कवितेचे बलस्थान आहे. नव्या ज्ञानाच्या उन्मादात सृष्टीचा मनमुराद भोग घेतानाची धुंदी पहिल्या भागात दिसते आणि कामतृप्तीप्रमाणे ती धुंदी उतरल्यावर तिचा परिणाम म्हणून समोर आलेले नीरस आणि कळाहीन वास्तव दुसर्‍या भागात समोर येते. या दोन अवस्था कवितेतल्या दोन वेगळ्या लयींनी छान ठसवल्या आहेत.

स्वानन्द's picture

20 May 2011 - 12:44 am | स्वानन्द

ह्या अर्थाने ही कविता लिहीली असेल तर बॉस मान गये!! जबरा कविता!!

चिंतातुर जंतू's picture

20 May 2011 - 2:48 am | चिंतातुर जंतू

जे शिस्तीत कोत्या रेषा चालत असतील आणि ज्यांना इंग्लिश मिडियम अन् बी कॉम्प्लेक्स वगैरेचे खुराक गरजेचे भासत असतील तेच खरं तर खुरटलेले, रोगट आणि उपाशी नव्हेत का?

मग 'आमचे पूर्वज षंढ नव्हते याची शिक्षा आम्ही का भोगायची?' असा काहीसा प्रश्न 'कोसला'मध्ये कुठेतरी येतो त्याची आठवण झाली.

त्यामुळे जे काहींना बीभत्स वाटलेलं दिसतंय तेच खरं तर निरोगी असण्याची शक्यता जाणवली आणि नसबंदीची गरज उलट चौरस, गोंडस कुटुंबांच्याच प्रमुखांना आहे की काय असं वाटून गेलं.

मग कवितेत उपरोध जाणवला.

मग सतीश तांब्यांच्या एका कथाशीर्षकाला उलट करून 'वरवर चूकच चूक आणि खोलवर अचूक' असं काहीसं वाटलं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2011 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ कविता अजिबात समजली नसती, पण विसूनाना आणि राजेशच्या प्रतिसादांमुळे समजली आणि आवडलीही.

भडकमकर मास्तर's picture

20 May 2011 - 5:06 pm | भडकमकर मास्तर

आयला लै भारी ...
आपल्याला कविता आवडली...
मस्त...

मीटरमध्ये शब्द घुसवाया भरतनाट्य, बिजे अशी थोडी ओढाताण झाली आहे तरीही कविता आवडली..

जालिंदरजी शरीरमनाच्या या अवस्थेला "झक्मार्लीअन्पोरंकाढ्ली सिन्ड्रोम" म्हणत असत...

चतुरंग's picture

20 May 2011 - 9:43 pm | चतुरंग

पहिल्या वाचनात सुरुवातीची कडवी बीभत्स वाटतात पण ते रुपक आहे हे कवितेच्या उरलेल्या अर्ध्यात प्रवेशताना ठळक होते. तारुण्याच्या उन्मादात अनुभवांच्या बेबंदपणापायी लागलेल्या ठेचा ह्या उत्तरायुष्यात एखाद्या भग्न स्वप्नाप्रमाणे सामोर्‍या येत जातात. विशेषतः तथाकथित चौकटबद्ध, चमचेभरवू पद्धतीने 'यशस्वी' झालेल्यांचे तोंडदेखले आयुष्य हे त्या भग्नतेची काळी बाजू आणखीन गडद करते. तसे जगलो असतो तर त्या प्रकारे 'यशस्वी' झालोही असतो परंतु मग घेतलेल्या अनुभवांचे काय? त्यांच्याशी प्रतारणा करता येत नाही.

शेवटाची ओळ
भाग्य नसे जर षंढत्वाचे करून घ्यावी हो नसबंदी
उपरोध एकदम ठसठशीत करणारी. खासच!

मीटरवरचा आक्षेप हा समजण्याजोगा आहे. दुसर्‍या ओळीत दोन मात्रा चढवून असे करता येऊ शकेल का?
रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी
शालिन नजरा झुकल्या,उठल्या घुसमटलेल्या होकारांनी

तिमा's picture

22 May 2011 - 10:27 am | तिमा

आशय आवडला, पण मीटरमधे वाचताना ठेचकाळायला झालं काही ठिकाणी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 May 2011 - 1:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

मागचा आठवडा रोज मी एकदा तरी ही कविता वाचतो आहे. प्रत्येक वेळी अस्वस्थ व्हायला होते तरी सुध्दा परत परत वाचायचा मोह आवरता येत नाही.

उन्माद, मग तो कोणत्याही प्रकारचा असो शेवटी निराशाच पदरी पाडतो. स्वतःला सम्राट, चक्रवर्ती वगेरे उपाध्या लावणार्‍यांचा शेवट पाहीली की हेच लक्षात येते. अशा लोकांचा हेवा वाटुन आपण स्वत:ला कधीकधी बुळचट, शंढ वगेरे समजु लागतो. पण ती क्षणिक निराशा अशा शेवटा पेक्षा बरी असते.

पण तरी सुध्दा "भाग्य नसे जर षंढत्वाचे करून घ्यावी हो नसबंदी" हा उपाय जरा जास्तीच अघोरी वाटतो.

निराशेच्या खोल खोल गर्तेत आशेचा एकही किरण पोचत नाही अशा जागेवरुन लिहील्या सारखी वाटते ही कविता.