प्रत्येक जण कुटुंबासाठी कष्ट करत असतो, त्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत म्हणून आटापिटा करतो पण हे स्वप्न जर आर्थिक ताकदीच्या पलिकडलं असेल तर? या आठवड्यात रीलीज होणार्या " तार्यांचे बेट" नावाच्या सिनेमाची ही साधी सरळ गोष्ट. राज्यशासन पुरस्कार विजेत्या लेखक किरण यज्ञोपवीत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून निर्मिती नीरज पांडे ( वेन्स्डे सिनेमचे दिग्दर्शक) आणि बालाजी फ़िल्म्सची आहे.मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी एका बापाने केलेले प्रयत्न पाहताना मजा येतेच आणि त्याच वेळी भौतिक सुखसोयींसाठी नीतिमत्तेला बाजूला सारायचे का हे बापाच्या मनातले द्वंद्व भावून जाते.
ही गोष्ट आहे श्रीधर सुर्वे ( सचिन खेडेकर ) नावाच्या कोकणातल्या एका खेड्यात ग्रामपंचायतीत नोकरी करणार्या एक करकुनाची.बायको आणि दोन मुलांना घेऊन तो मुंबई फ़िरवायला जातो तेव्हा त्याचा मुलगा ( इशान तांबे) फ़ाईव्ह स्टार हॉटेलात राहायचा हट्ट करतो. श्रीधरला हे शक्य नसल्याने तो साहजिकच त्याला नकार देतो पण जर पुढच्या परीक्षेत पहिला आलास तर मात्र तुला मी फ़ाईव्ह स्टार हॉटॆलात राहायला घेऊन जाईन अशी पैज लावतो. मग मुलगा ही पैज अत्यंत सीरियसली घेतो आणि त्याची चिंता वाढायला लागते.पुढे परीक्षेचा निकाल काय लागतो आणि श्रीधर आर्थिक गणित बसवायला काय काय अडचणींना सामोरा जातो हे स्क्रीनवर पाहण्यासारखे आहे...
मूळ कथा आहे सौरभ भावे यांची आणि त्यांनीच शैलेश दुपारे आणि किरण यज्ञोपवीत यांच्याबरोबर पटकथा लिहिलेली आहे. या पटकथेला पुणे फ़ेस्टिवलमध्ये सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. हा सिनेमा इमोशनल असला तरी कुठेही बटबटीत भडक होत नाही ... मुलांच्या शाळेतली दृश्ये मस्त जमून आलेली आहेत. बाप आणि मुलाने मंदिरात जाऊन देवाशी बोलण्याचा प्रसंग उत्तम झाला आहे. सायकलवरून येताना फ़ाईव्ह स्टार वाढदिवसाचे प्लॅनिन्ग करायचा प्रसंग झकास. शेवटाकडे मात्र सिनेमा पटकन संपल्यासारखा वाटतो...अनेक मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन करणार्या किरण यज्ञोपवीत यांनी गेल्या काही वर्षांत चित्रपटलेखनही केले आहे... त्यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न चांगला झाला आहे.
या गोष्टीत मस्त व्यक्तिरेखा आहेत.....इन्शुरन्स एजंट कांबळी ( किशोर कदम), पोलीस ( जयवन्त वाडकर) , शेअर ब्रोकर ( विनय आपटे) यांची छोटीशीच दृश्ये मजा आणतात.श्रीधरने त्याची जुनी बोट विकावी म्हणून त्याच्या सतत मागे असलेला महादेव( शशांक शेंडे) झकास...किशोर कदम आणि सचिन खेडेकर दोघेही उत्तम लिहिलेल्या त्यांच्या दृश्याला त्यांच्या अभिनयाने अधिकाधिक उंचीवर नेतात.
sudir Palsane यांचे छायाचित्रण मस्त झाले आहे. विशेषत: कोकणातल्या खेड्यातले आणि समुद्रकिनार्यावरचे संध्याकाळचे दृश्य अप्रतिम.सचिन खेडेकर यांनी प्रेमळ बापाची तगमग मस्त दाखवलेली आहे. त्यासाठी त्यांना पुणे फ़ेस्टिवलमध्ये उत्क्रुष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. आई ( अश्विनी गिरी) उत्तम. इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी सहज आणि नैसर्गिक काम केले आहे.
नन्दकुमार घाणेकर यांचे संगीत आहे. मुग्धा वैशंपायनने गायलेले एक गाणे मस्त आहे... नरेन्द्र भिड्यांचे पार्श्वसंगीत सिनेमाच्या मूडला साजेसे.
दर आठवड्याला पाडल्या जाणार्या बटबटीत कॉमेडीजच्या मार्यामध्ये हा सिनेमा म्हणजे एक सुखावह बदल आहे.
सिनेमाची ट्रीटमेन्ट, स्टाईल , बजेट, तांत्रिक बाबी, अभिनय हे सारे महत्त्वाचे असले तरी उत्तम कथा असली तरच मनाला भावते आणि हा सिनेमा नक्कीच त्यापैकी आहे. जुन्या जमान्यातल्या कथाप्रधान सिनेमांची आठवण करून देणारा हा सिनेमा अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहिला तर असे सिनेमे अजून बनतील, अशी आशा करतो....
प्रतिक्रिया
13 Apr 2011 - 7:37 am | नरेशकुमार
छान ओळख, पहायला नक्की आवडेल.
----------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : बायकोला दिलेले वचन पाळन्यासाठि काय काय भानगडी कराव्या लागतात, असा विशय घेउन जर एखादा हॉलीवुड-पट बनवायचा असेल तर इछुकांनी संपर्क साधावा.
श्टोरी रेडी आहे.
13 Apr 2011 - 10:33 am | टारझन
जाणकार रंगकर्मी रेकमेंड करतात म्हणजे नक्कीच पाहायला हवा :)
13 Apr 2011 - 8:56 am | नगरीनिरंजन
नक्कीच पाहणार.
13 Apr 2011 - 9:08 am | सहज
परिक्षण वाचून सिनेमा बघीतलाच पाहीजे असे वाटत आहे.
धन्यु मास्तर.
13 Apr 2011 - 9:30 am | यशोधरा
ह्या सिनेमाबद्दल खूप ऐकले आहे. पहायचाही आहे. प्रदर्शित झाला का?
13 Apr 2011 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपटाची छान ओळख करुन दिली आहे. तार्यांचे बेट नक्कीच पाहणार.
सायकलवर चिल्या-पिल्यांना बसवून फिरवणारा लंबर दोनचा फोटो लैच बोलका.
-दिलीप बिरुटे
13 Apr 2011 - 9:55 am | भडकमकर मास्तर
या गुरुवारी १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे...
13 Apr 2011 - 1:12 pm | मनिष
रिलीज च्या आधीच कसा काय पाहिला? परिक्षण वाचून बघावसा वाटतोय.
(अवांतर - मला एक चित्रपट म्हणून "मुंबई मेरी जान" हा "वेन्स्डे" च्या तुलनेत उजवा वाटतो. वेन्स्डे ठीक आहे पण...असो. इथे मेलोड्रामॅटीक नाही केला हे वाचून बर वाटलं)
13 Apr 2011 - 1:15 pm | गणपा
मास्तर बहुतेक क्रिटिक पॅनलमध्ये असावेत. ;)
13 Apr 2011 - 1:42 pm | भडकमकर मास्तर
रिलीज च्या आधीच कसा काय पाहिला?
फिल्म अर्काईव्ज पुणे येथे निमन्त्रितांसाठी शो होता , तो पाहिला गेल्या गुरुवारी...
( बघा आम्ही निमन्त्रितांत होतो असे सांगायचा प्रयत्न वगैरे ") :)
14 Apr 2011 - 1:07 pm | मी ऋचा
नोंद घेतल्या गेली आहे ;)
13 Apr 2011 - 9:35 am | शिल्पा ब
छान ओळख. नक्की पाहणार हा सिनेमा. आजकाल मराठी सिनेमा पुन्हा प्रगल्भ होतोय असं दिसतंय. अनेक शुभेच्छा!!
13 Apr 2011 - 9:59 am | अमोल केळकर
मस्त परिक्षण. सिनेमा नक्की पाहू
अमोल केळकर
13 Apr 2011 - 9:59 am | मृत्युन्जय
चला बर्याच दिवसांनी चित्रपटाला जायचा योग येणार म्हणायचा. उत्कृष्ट परीक्षण.
13 Apr 2011 - 10:05 am | गवि
स्टोरीची थीम फारच छान दिसतेय. आणि आता परीक्षण वाचून तर चित्रपट "मस्ट सी" झालाय.
13 Apr 2011 - 10:16 am | प्यारे१
छानच वाटतोय चित्रपट.
सचिन खेडेकर मराठी मध्यमवयीन मध्यमवर्गीय छान रंगवतात.
13 Apr 2011 - 12:58 pm | गणपा
बघावासा वाटतोय. येई पर्यंत सिनेमागृहातुन उतरला नसला म्हणजे मिळवली.
13 Apr 2011 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार
चित्रपटाची ओळख आवडली.
परवा लाईफ सायकल आयोजीत सायकल फेरीत सहभागी होण्यासाठी आलेले असताना सचिन खेडेकर ह्या चित्रपटाबद्दल खुपच उत्साहाने बोलले. चित्रपट पाहायलाच हवा.
अवांतर :- सायकलवाला फोटू एकदम 'चिल्ड्रन ऑफ हेवन'ची आठवण करुन देणारा.
13 Apr 2011 - 2:16 pm | गणेशा
तार्यांचे बेट नक्कीच पाहणार.
13 Apr 2011 - 2:24 pm | स्मिता.
मास्तर, 'तार्यांचे बेट' ची ओळख आवडली. एकंदरीत वर्णनावरून चित्रपट बघावासाच वाटतोय.
आर्थिक ऐपतीबाहेरचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना भावना बटबटीत करून दाखवलं नाहीये हे फार बरं वाटलं.
14 Apr 2011 - 3:01 pm | प्राजक्ता पवार
छान ओळख .
नक्कीच पाहणार ...
18 Apr 2011 - 9:55 am | किसन शिंदे
मास्तरांनी केलेले उत्तम परीक्षण आणि चित्रपटाबद्दल असलेल्या अपेक्षा घेऊन कालच्या रविवारी हा चित्रपट पहिला.
या चित्रपटाने मुळीच अपेक्षाभंग केला नाही .
18 Apr 2011 - 7:32 pm | सविता
शनिवारी पाहिला.... चित्रपट आवडला ....चांगला होता........
20 Apr 2011 - 2:57 pm | स्पंदना
खुप छान वाटतो विषय अन तुमक्च परिक्षण ही आवडल.
20 Apr 2011 - 4:53 pm | स्वाती दिनेश
चित्रपटाची ओळख वाचून पहावासा वाटू लागला आहे, पाहू कसे जमते ते..
स्वाती
22 Apr 2011 - 1:22 pm | चिंतामणी
पहायला हवा.
29 Apr 2011 - 7:33 am | मेघना भुस्कुटे
वेगळा, देखणा वगैरे आहे, सगळ्यांची कामं सुरेख आहेत (सचिन खेडेकर, किशोर कदम, शशांक शेंडे भारीच आहेत) आणि त्याबद्दल पुरेसं कौतुक झालंय. पण मला शेवट अजिबात नाही आवडला.
(ज्यांना सिनेमा पाहायचाय त्यांनी पुढे वाचू नका.)
समुद्रकिनार्यावरच्या दृश्यातले संवाद जSSरा बदलले असते, तर डीडीएलजेची इतकी आठवण नसती आली, असंही प्रामाणिकपणे वाटलं. इतकं शब्दश: भाषांतर केल्यासारखे काय संवाद लिहायचे? एक चांगला रस्ता - कठीण, एक वाईट रस्ता - सोपा, वगैरे...
आणि मान्य आहे, पोरगं हट्ट करतंय. पण केला हट्ट - पुरव, कारण काय म्हणे मन राखण्यासाठी. हे काही मला पटलं नाही. निव्वळ सिनेमाच्या सोयीसाठी केलेली क्लृप्ती वाटली. उद्या पोरगं अमेरिकेला जायचा किंवा अजून कसलातरी महाखर्चीक हट्ट करेल. मग काय तितक्या पैशाची चोरी / लांडी लबाडी करणार का? की त्याला समजावून सांगणार - बाबा रे, मेहनत कर. मग आपल्याला काहीही - अक्षरश: काहीही - करणं शक्य असतं. त्यासाठी वेडेवाकडे रस्ते वापरावेच लागतात असं नाही. आणि म्हणून स्वप्नं पाहणं सोडूनच द्यावं लागतं असंही नाही.
शेअर बाजार म्हणजे धोकाच, हा आणखी एक टिपिकल मराठी सल्ला.
आणि 'मध्यमवर्गीय' या शब्दाच्या मागे दर वेळेला 'मराठी' लावायलाच हवं का? मध्यमवर्गीयांना काय फक्त मराठी भाषा असते? की मध्यमवर्गाची निदर्शक वृत्ती असते? हे किरण यज्ञोपवीत यांच्याकडून तरी अपेक्षित नव्हतं.
29 Apr 2011 - 11:36 pm | लिखाळ
छान ओळख.. जमले तर पाहू !
30 Apr 2011 - 2:17 pm | ऋषिकेश
चित्रपट दोन आठवड्यापुर्वीच बघितला
आवडला