साम्य

चित्रा's picture
चित्रा in जे न देखे रवी...
28 Feb 2011 - 1:25 am

नॅशनल जिऑग्राफिकमधील (फेब्रुवारी २०११) 'अंडर पॅरिस' या लेखामुळे आणि त्यातील काही छायाचित्रांमुळे सुचलेले हे मुक्तक. जागतिक मराठी दिनानिमित्त माझे (काहीच्या काही) योगदान.
लेख इथे आणि छायाचित्रे इथे -
http://ngm.nationalgeographic.com/2011/02/paris-underground/alvarez-phot...

-----------
वरच्या कोलाहलाला कंटाळून जेव्हा
म्हटले जरा शांत अंधारात उतरून जाऊ
तेव्हा पाहिले - तिथेही
दंगलच माजली होती

उतरत्या दगडी वाटांमध्ये
लावलेले प्रखर दिवे
भिंतींचा ओलसरपणा झाकायला
लावलेला चुना आणि रंगीत डायनॉसॉर

भिंतींमध्ये असलेली
मेंदूरहित डोकी आणि
राबलेली हाडे, नीटस रचलेली,
अंगावर न येणारी

जुन्या अस्तित्वांमधून जन्मलेल्या
नवीन संततीवर
मारले जाणारे शिक्के बघणारे लोक
- सगळे काही तसेच होते

अद्भुतरसमुक्तक

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Feb 2011 - 6:06 am | सहज

आ.त.क.फा.क. ना.* पण छायाचित्रांवरुन प्रेरीत कविता भारी वाटली. पण नक्की आहे की नाही ते माहीत नाही. :-)

*आ.त.क.फा.क. ना. (आपल्याला तसे कवितेतील फारसे कळत नाही)

चित्रा's picture

28 Feb 2011 - 6:32 am | चित्रा

छायाचित्रांवरुन प्रेरीत कविता भारी वाटली. पण नक्की आहे की नाही ते माहीत नाही.

हे भारी वाटले :)

आ.त.क.फा.क. ना. हे माझ्याही बाबतीत खरे आहे. पण इतके लोक काहीबाही लिहीत असतात तेव्हा आपणही लिहीली तर काय फारसे बिघडते या विचाराने लिहीली आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2011 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भिंतींमध्ये असलेली
मेंदूरहित डोकी आणि
राबलेली हाडे, नीटस रचलेली,
अंगावर न येणारी

वरील ओळी मला लै भारी वाटल्या.......!

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

28 Feb 2011 - 8:53 am | पैसा

कविता, आणि त्यावरच्या चित्रा आणि सहज यांच्या प्रतिक्रिया दोन्ही भारी वाटल्या!
(स्वगतः शरदिनी बैना बरेच शिष्य मिळालेले दिसतायत!)

मनीषा's picture

28 Feb 2011 - 8:58 am | मनीषा

मुक्तक आवडले ..

सर्व काही तसेच होते .... आहे .

श्रावण मोडक's picture

28 Feb 2011 - 11:38 am | श्रावण मोडक

वा. कविता आवडली. नंतर ते चित्र पाहिले. तेव्हा वाटलं कविता कळतीये.
अवांतर - हे वाचताना उगाच अलीकडच्या काळात मराठी आंतरजालावर झालेल्या काही 'दंगलीं'ची आणि मग त्या संस्थळांची नावे नजरेसमोर नाचून गेली आणि कवितेतील एकेक रुपक तिथं कसं लागू पडतं हे कळत गेलं. त्या, चित्राताईना अभिप्रेत नसलेल्या, अर्थानं कविता नक्कीच कळली. उगाचच, मी प्रगल्भ आहे, असा क्षणभर (आ)भास होऊन गेला. ;)

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2011 - 12:37 pm | राजेश घासकडवी

कविता आवडली.

बाकीचं जाऊदे पण अंतरातला थंड अंधार तरी शांत असावा ही माफक अपेक्षा जेव्हा भंगायला लागते तेव्हा आपल्या हाती काय रहातं...

अवांतर - श्रामोंचे प्रतिसाद वाचायचे नाहीत असं मी ठरवलं आहे. भलते अर्थ (भले मग ते फिट्ट बसणारे का होईना...) काढतात. आणि मग ते डोक्यातनं जात नाहीत.

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 5:09 am | बेसनलाडू

बाकीचं जाऊदे पण अंतरातला थंड अंधार तरी शांत असावा ही माफक अपेक्षा जेव्हा भंगायला लागते तेव्हा आपल्या हाती काय रहातं...
असेच म्हणतो.
कविता आवडली.
(सहमत)बेसनलाडू

अवलिया's picture

28 Feb 2011 - 12:46 pm | अवलिया

प्रगल्भ आणि अभिजात आधुनिकोत्तर कविता

चित्रा's picture

1 Mar 2011 - 4:59 am | चित्रा

श्रामो, हे लिखाण त्या अर्थाने नक्कीच नाही. अर्थ कदाचित अजून लागू शकतात पण संकेतस्थळांवरील दंगलींचा संबंध नाही, हे तुम्ही जाणले आहे ते खरे आहे.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
प्रगल्भ ही बहुदा न आवडल्याची सूचना आहे, पण असे असले तरी तेही कळवल्याबद्दल धन्यवाद. नुसतेच प्रगल्भ म्हणून सोडण्यापेक्षा कवितेत सुधारणा सुचवल्या तर आवडेल.