तू मला काय दिलेस कसे सांगू ? हृदयाला आस, शरीराला श्वास, श्वासांना लय, डोळ्यांना ओल, ओठांना पाणी आणि माझ्यातला मी .. सगळे सगळे. माझ्या हसण्याला जशी कारणीभूत तू तशीच माझ्या असण्याला पण तूच कारणीभूत.
...............................................................
सुखाच्या राशींबरोबर नशिबाने मला दु:खही अपार दिले होते, माझं जगणं माझं प्राक्तन म्हणजे .. म्हणजे देवाच्या शिकवू पोराच्या हातातले खेळणे होते जणू !!
पिवळ्या तपकिरी लाल निळ्या काचांचा बोचरा कॅलिडिओस्कोप.
शक्य - अशक्य या सीमारेषा धूसर वाटाव्यात अशा जागेपर्यंत मी जाऊन आलेलो आहे, भावभावनांच्या उत्कट-सतत हिंदोळ्यांनी मी अकाली जराजर्जर झालेलो होतो, माझ्या शरीराला या अपंग मनाच्या कुबड्या आता फार काळ सहन होण्यासारख्या नाहीत अशा शंकांनी मी पोखरलेलो होतो .
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे ते एक माणूस, ते माणुस माझ्यावर नकळत सावली धरून होतं. त्याच्याशी होणारी ती भावनिक प्रतारणा. त्यानं सर्वस्व ओवाळून टाकले तरीही अजून मी गळ्यापर्यंत पुरलेलाच .. त्याला अनंत क्लेश देत राहणे, आणि उद्ध्वस्त होत राहणे हेच माझे प्राक्तन का ?
हा हा म्हणता माझाही अंत जवळ येईल आणि सगळेच प्रश्न सुटतील का ? नाही नाही .. माझं ते फुलपाखरू फार गोड आहे .. कोण जपणार त्याला ?
...............................................................
त्या उष्ण धुमसणार्या राखेच्या ढिगार्यात उगवलेला पोपटी नाजूक अंकुर मी जीवापाड जपला आहे, त्याला वाढवला आहे. त्याचे इवलेसे अस्तित्व हेच आता माझे सर्वस्व आहे.
खरंच तू मला काय दिलेस मी कसे सांगू ? या तर खर्या शब्दरंगात न चितारता येणार्या गोष्टी .. जशी श्वासांची असलेली श्वासांशी ओळख .. सवयीने अपेक्षित तर कधी अनपेक्षित धडधड .. अधरांची अतूट सलगी .. आणि रेशमी केसांची फिरणारी हळुवार मोरपिसे ..
तू दिले ते काय काय मोजू ?? दुसरे आयुष्य ?? विस्मृती ?? आनंद ??
छे छे .. याहूनही सुंदर असे काहीतरी .. ज्याचे असणे दुसर्या कशाच्याही नसण्यावर किंवा पुसण्यावर अवलंबून नाही !
ज्याचे असणे मला, माझ्या वावराला इन शॉर्ट माझ्या जगण्याला नवा आयाम देते, माझे मर्म जाणून मला स्वीकारते, मलाही जग स्वीकारायला लावते ..
हम्म .. खरे आहे, शब्दरंगात चितारता येण्यासारख्या सगळ्याच गोष्टी नसतात !!
...............................................................
प्राक्तनाची उमेद
शुभ्र चंदेरी सफेद
चूर चूर सजणी
गंधमय.
उमलणारा सहवास
गंफलेले श्वास
अलौकीक आस
अस्तित्वाची.
प्राक्तनच्या गुलबकावलीचा
कृष्णमंजिरी मोद .. अन
अनाहुतच लागलेला
गंधमय अस्तित्वाचा शोध.
प्रतिक्रिया
19 Feb 2011 - 7:43 am | अभिज्ञ
ललित लेखन आवडले.
अभिज्ञ.
19 Feb 2011 - 9:09 am | यशोधरा
सुरेख!
19 Feb 2011 - 10:21 am | पैसा
बरेच दिवसानी लिहिलंय, तर वाट बघावी असं.
19 Feb 2011 - 10:28 am | गणपा
आणि आंद्या लिहिता झाला.
सुरेख रे. हळुवार हुरहुर लावणार.....
आंतर मनीच्या बाता : नानची मालिका सत्कारणी लागली.
19 Feb 2011 - 11:28 am | टारझन
माझी कमेंट करण्याचीही लायकी नाही !!
-गुरुगुलाबखत्री
19 Feb 2011 - 12:45 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच!
19 Feb 2011 - 2:14 pm | प्राजक्ता पवार
सुरेख ...
19 Feb 2011 - 7:23 pm | अवलिया
मस्त लेखन. :)
21 Feb 2011 - 10:15 am | sneharani
अगदी सुरेख लेखन!
:)
21 Feb 2011 - 11:02 am | सहज
पण ग्लॅडिएटर मधील काही सिन्स आठवले. विशेषता त्या सळसळणार्या शेतातुन जात असताना, दरवाजा उघडून बागेतुन घराकडे बघताना...
21 Feb 2011 - 1:59 pm | सुहास..
क्लास !!
अवांतर : नान्यानी कळ मारली ते बरे झाले ;)
21 Feb 2011 - 2:04 pm | निखिल देशपांडे
काही कळले, काही नाही
21 Feb 2011 - 4:17 pm | धमाल मुलगा
आला..आत्ता कुठं गडी मैदानात आला!
ए नानुस...थ्यांकु रे! :)
साला, तुमी लिवाचा न आमी वाचाचा...
आपण साला फाटका माणुस, काय बोलणार ह्याच्या लेखनाविषयी?
>>तू दिले ते काय काय मोजू ?? दुसरे आयुष्य ?? विस्मृती ?? आनंद ??
खरंय! कोणती पट्टी वापरावी मोजायला?
आम्हाला एकच ठाऊक, आमचा आंद्या फोकलीचा...तो आम्हाला परत मिळवून दिला. त्याला तळहातावरच्या फोडासारखा जपला, हरवलेला आंद्या परत खेचून आणला...बस्स्स! एव्हढ्या एका उपकारासाठी त्या 'तू'ला आमचंही आयुष्य लाभो! ह्याउप्पर आणिक काय बोलू?
21 Feb 2011 - 5:28 pm | मितान
फार सुंदर ! :)
6 Mar 2011 - 5:42 pm | पद्मश्री चित्रे
कॅलिडिओस्कोप आवडला...