तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी
माझ्यासारखी माणसे
हात पसरतात पंखा सारखे
मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा
तुझ्या सारखी माणसे
फाटक्या दु:खाला
घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने
उध्वस्थ मनात
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने
माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे
तुझ्यासारखी माणसे भेटल्यावर
माझ्यासारखी माणसे
पळत सुटतात जीवाच्या आकांताने
क्लॉस्ट्रोफोबिक होते तुझ्या आकाशात
मायेच्या तिक्ष्णतेत दिसते औषधी इंजेक्शन
आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके बळ नसते
माझ्यासारख्या माणसांच्या मनगटात
-------------------------
ईतर कविता ईथे वाचू शकाल
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 6:51 am | शुचि
>> मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा >>
कल्पना आवडली
30 Jan 2011 - 10:28 am | कच्ची कैरी
तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी
हे कडव खूपच आवडल!
12 Apr 2011 - 6:56 am | राजेश घासकडवी
उमजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.