'फेसबुक'वाल्याची गमतीशीर पण केविलवाणी गोष्टः 'द सोशल नेटवर्क'

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
23 Nov 2010 - 4:08 pm
गाभा: 

Film Poster

ज्यांच्या हुशारीची भीती वाटावी अशी प्रतिभावान माणसं अनेकदा जवळपास ऑटिस्टिक (स्वमग्न) असतात असं मानलं जातं. 'फेसबुक'च्या निर्मितीचं मिथक मांडणारा 'द सोशल नेटवर्क' हा चित्रपट मार्क झुकरबर्ग या फेसबुकच्या निर्मात्याचं असंच काहीसं चित्रण करतो. चित्रपटात सांगितलेली गोष्ट नाट्यमयतेसाठी वास्तवाशी वेगवेगळ्या प्रकारे फारकत घेते असे आरोप झालेले आहेत. पण निव्वळ गोष्ट म्हणून पाहिलं तर एका प्रतिभावान माणसाची गमतीशीर पण केविलवाणी कहाणी या चित्रपटात दाखवलेली आहे.

प्रतिभावानांचा कारखाना असणाऱ्या हार्वर्डसारख्या विद्यापीठात शिकत असलेला मार्क झुकरबर्ग एका मुलीबरोबर डेटला गेलेला सुरुवातीला दिसतो. तो आणि त्याची डेट यांच्यातला प्रचंड फरक या लहानशा दृश्यातसुध्दा जाणवतो. त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाला हसू येतं. पण हा निव्वळ ‘मेन आर फ्रॉम मार्स...’ पातळीचा विनोद नाही हेही लवकरच लक्षात येतं. समोरचा माणूस जे बोलतो आहे त्यातले अंतरार्थ मार्कला कळतच नाही आहेत. तसंच आपल्या बोलण्याचा समोरच्या माणसावर होणारा परिणामही त्याला कळत नाही आहे. तो स्वत: हसत नाही, पण त्याचं वास्तव आणि आपल्याला दिसणारं वास्तव यांतल्या फरकामुळे विनोद निर्माण होतो. मार्कच्या व्यक्तिमत्वातलं हेच स्वमग्न सूत्र चित्रपटात पुढे वेगवेगळया माणसांच्या बाबतीत दिसतं. त्यातूनही विनोदनिर्मिती होते पण त्याचबरोबर काही प्रश्नही पडतात.

चित्रपटाची रचना पाहता हे प्रश्न पडणं स्वाभाविक किंवा अपेक्षित असावं असंही वाटतं. मार्क झुकरबर्गवर चाललेल्या दोन खटल्यांची कहाणी हे चित्रपटाचं मुख्य कथासूत्र म्हणता येईल. या खटल्यांत प्रतिपक्षानं केलेले दावे, मांडलेली बाजू, विचारलेले प्रश्न आणि त्यावर मार्कची उत्तरं किंवा प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. त्यात ज्यांची चर्चा होत आहे ते प्रसंग नाट्यमय शैलीत घडताना दाखवलेले आहेत. त्यातून हळूहळू मार्कचं व्यक्तिमत्व आणि आयुष्य उभं राहतं. पण ते होतानाच हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की मार्कचं वर्तन, त्यानं घेतलेले निर्णय यांद्वारे त्याला समजून घ्यायचा प्रयत्न काही तथाकथित ‘नॉर्मल’ माणसं करत आहेत, अशी रचना करूनच दिग्दर्शकांनी एक गमतीशीर खेळी केलेली आहे. म्हणजे यात एक स्वमग्न व्यक्तिमत्व आणि त्या विरोधात उभं राहिलेलं सामान्य जग असा एक सामना आहे. पण एका पंगू व्यक्तीविषयी प्रेक्षकांना सहानुभूती वाटायला लावणाऱ्या ‘तारे जमीं पर’छाप तद्दन अश्रूदार सिनेमांपेक्षा त्यात एक-दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे इथं मार्क कुणी गरीब बिच्चारा वगैरे नाही तर तरुण वयात गडगंज पैसा कमावणारा ‘फेसबुक’चा हेकट, उध्दट, अतिहुशार मालक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक प्रसंगांत समोर चाललेलं पाहून हसू येतं. हे हसू कधी मार्कला असतं, तर कधी त्याच्या वागण्या-बोलण्यामुळे हतबुध्द झालेल्या समोरच्या ‘नॉर्मल’ माणसांना असतं. पण मार्कमुळेच ही विनोदनिर्मिती होत आहे हे उघड असतं. म्हणजे जगात वावरायला नालायक म्हणता येईल इतपत बावळट असा एक माणूस आणि एक ‘नॉर्मल’ माणूस यांना एकत्र करून ‘आता पहा यांची मजा’ असा ‘ऑड कपल’ फॉर्म्युला इथं वापरलेला आहे (अधिक माहिती साठी पहा ‘ऑड कपल’पासून आपल्या ‘शोले’तल्या जय-वीरूपर्यंतच्या अनेक ‘मिसफिट’ जोडगोळ्या). फक्त इथं ‘एक नॉर्मल माणूस’ नाही तर (काही अपवाद वगळता) आजूबाजूचे सगळेच आहेत.

पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा तथाकथित ‘बावळट’ माणूस नव्या पिढीला ज्यावाचून करमत नाही ते फेसबुक सहजगत्या प्रसवून मोकळा झालेला आहे. म्हणजे ‘नॉर्मल’ सामाजिक नातेसंबंध असणाऱ्या माणसांना न दिसणारं, न समजणारं असं काहीतरी त्याला जमलेलं आहे. म्हणजे ज्यांची सामाजिक जडण-घडण त्यांच्या पिढीत सर्वसामान्य, 'नॉर्मल' होती अशांना हे मान्य करावं लागतं आहे की, त्यांच्या सामाजिक चौकटीत ज्याला बसवता येतच नाही अशा ‘मिसफिट’ माणसाला नव्या पिढीच्या सामाजिक जाणीवांविषयी आपल्यापेक्षा काहीतरी जास्त कळतं आहे. आणि हे जे काहीतरी त्यांना अनाकलनीय वाटतं आहे तेच जणू काय ती 'नॉर्मल' माणसं समजून घेत आहेत असं सतत वाटत राहतं. पण म्हणजे असंही म्हणता येईल का की नवी पिढीच स्वमग्न (ऑटिस्टिक) होते आहे? आणि म्हणूनच स्वमग्न मार्कचं फेसबुक यशस्वी ठरलं आहे? आणि नव्या पिढीचं वर्तन जुन्या पिढीला कळत नाही म्हणून त्यांना ते दुर्वर्तन वाटतं आहे?

आपल्याला मार्कचा हेवा वाटावा अशी चित्रपटाची रचना नाही, हे खरंच आहे. उलट सुरुवातीला तो अँटि-हिरो वाटतो. त्याला बरे कपडे घालता येत नाहीत; बोलण्या-वागण्याचे सामान्य संकेत पाळता येत नाहीत. मुलींना त्याच्यात रस वाटावा असं काही त्याच्यापाशी नाही. त्याला फारसे मित्र नाहीत. तो कधीकधी वूडी अ‍ॅलनच्या बावळ्या पण हुशार ज्यूची आठवण व्हावी असा आहे. त्याउलट ‘आमच्यासाठी एक वेब-साईट बनव’ असं त्याला सांगणारे आणि नंतर ‘आमची कल्पना पळवली’ म्हणून कोर्टात खेचणारे जुळे भाऊ गर्भश्रीमंत कुटुंबातले आणि कमावलेल्या शरीरांचे खास ख्रिश्चन-अमेरिकन आहेत. हळूहळू फेसबुक मोठं होतं तसं ‘डेव्हिड-गोलिआथ’च्या गोष्टीतल्याप्रमाणे तो त्यांच्यावर आणि इतरांवर मात करतो आहे असं दिसतं. म्हणजेच तो खरा ‘हिरो’ आहे की काय, असं वाटू शकतं. पण मिळालेल्या गडगंज पैशाची त्याला काडीचीही किंमत नाही (फेसबुकच्या यशाचा माज मात्र आहे!) त्याला असलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीमुळेही दिग्दर्शक त्याला ‘हिरो’सारखा मुलामा लागू देत नाहीत. चित्रपट संपतो तेव्हा एखाद्या ग्रीक शोकांतिकेचा नायक शोभावा अशा मार्कची कहाणी उलगडत गेली असं लक्षात येतं. म्हणजे नक्की काय होतं ते सांगत नाही कारण मग चित्रपट पाहण्याची मजा निघून जाईल. पण शोकांतिकेतला नायक ज्या गुणांमुळे ‘नायक’ असतो त्याच गुणांमुळे त्याची शोकांतिका होते. किंबहुना त्याच्या नाशाची बीजंच त्याच्या या गुणांमध्ये असतात. तसंच काहीसं इथं सुचवलेलं आहे.

या सगळ्याला वास्तवाधार किती ते माहीत नाही. प्रत्यक्षातल्या मार्कला ते रुचणार नाही हे उघड आहे. त्याला सुखात्म नायकच व्हायचं आहे; शोकात्म नाही. शिवाय आपल्याला त्याचं हसू यावं आणि त्याच्याविषयी कणवही वाटावी असं त्याचं अजागळ, बावळट, विनोदी रूपही खऱ्या मार्कला आवडणार नाही. हलकटपणानं असंही म्हणता येईल की मार्कच्या बुद्धिमत्तेचा आणि व्यक्तिमत्वाचा विनोदासाठी वापर करून घेऊन, अंतिमत: त्याला पराजित दाखवून त्याला समाजवादी वाकुल्या दाखवल्या आहेत (कारण तो यशस्वी आहे; त्याला यशाचा माज आहे आणि सर्वसामान्यांविषयी कणव नाही; मग पहा इतका यशस्वी होऊन कसा तो बिच्चारा आहे!)

पण मला असं वाटलं नाही. मार्कच्या कहाणीतून हसू-आसूची नाट्यनिर्मिती होते. आपण मार्कला हसू; त्याच्या हुशारीला आणि उध्दटपणाला दादही देऊ. चटपटीत प्रसंगांची आणि फटकेबाज संवादांची जुगलबंदी त्याला पूरक आहे. पण अंतिमत: आपल्याला अशा व्यक्तीविषयी कणवही वाटावी अशी चित्रपटाची रचना आहे. म्हणजे अगदी ‘तारे जमीं पर’ छाप अश्रूढाळू कणव नाही, पण एका पंगू माणसानं पुष्कळ काही कर्तृत्व गाजवलं तरीही अंतिम श्रेयस त्याला प्राप्त होऊ शकलं नाही असं दाखवत आपल्या हृदयाला हात घालण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. त्यामुळे मार्क झुकरबर्गच्या आणि त्याच्या फेसबुकच्या मिथकावर स्वार होऊन त्याची गोष्ट रंजक पध्दतीनं सादर केली आहे असं म्हणता येईल. आयुष्याविषयी फार गहन काही कळून न घेता करमणूक करून घ्यायची असेल तर ती अपेक्षा ‘द सोशल नेटवर्क’ पूर्ण करेलच, पण स्वमग्न माणसाच्या दृष्टीकोनातून एक वेगळं जगही दाखवेल.

प्रतिक्रिया

सहज's picture

23 Nov 2010 - 4:31 pm | सहज

ओके तुम्ही म्हणताय तर हा सिनेमा बघायच्या यादीत नोंदवला आहे. :-)

छोटा डॉन's picture

23 Nov 2010 - 4:56 pm | छोटा डॉन

डन !!!
लगेचच उद्याची तिकिटे बुक करतो.

परिक्षणाबद्दल धन्यवाद, आता चित्रपट पहायचा कॉन्फीडन्स आला.

- छोटा डॉन

आनंदयात्री's picture

23 Nov 2010 - 4:54 pm | आनंदयात्री

अच्छा. भारतात प्रदर्शित झालाय का ?

हा एक मस्त सीनेमा आहे. Total time pass होतो जर drama आवडत असेल तर. चीत्रपटाची सूरूवात तर धमाल आहे.... आणी मूख्य म्हणाजे एक सत्यकथा आहे. अतिमत: त्याला पराजित दाखवलेले नाही, तर गाढवपणाची कीमत तो मोजतो अर्थात त्याला पैशाची फिकिर नाहीच.

ययाति's picture

23 Nov 2010 - 7:17 pm | ययाति

छान चित्रपट आहे हा

फेसबुकवाल्याची कथा पाहिली पाहिजे....
हा मुलगा वल्ड मधला यंगेस्ट मिलेनियर आहे म्हणे...
बाकी फेसबुकवर वेळ घालवण्या पेक्षा फेस टु फेस गप्पा हाणलेल्या केव्हाही चांगल्या... ;)

(चेपुवर खाते नसलेला)

आत्मशून्य's picture

24 Nov 2010 - 6:59 am | आत्मशून्य

बिलेनियर आहे.
$ २५ बिलीयन = फेसबूक त्यात ६०% मार्क झुकरबर्गचा वाटा

विकास's picture

23 Nov 2010 - 7:47 pm | विकास

चित्रपटाची ओळख आवडली. नाव अर्थातच माहीत होते पण अजून बघायचा आहे. आपली कल्पना चोरली अशी तक्रार करून त्याच्या विरुद्ध ६५ मिलियन्स डॉलर्सचा खटला जिंकणार्‍यांमधे जशी दोन अमेरिकन (अभारतीय वंशाची) जुळी भावंडे होती तसाच भारतीय वंशाचा दिव्या नरेन्द्र पण होता.

स्वानन्द's picture

23 Nov 2010 - 9:37 pm | स्वानन्द

छान परीक्षण. उत्सुकता ताणली आहे. पहायला हवा हा चित्रपट.

राजेश घासकडवी's picture

23 Nov 2010 - 10:26 pm | राजेश घासकडवी

मी हा सिनेमा पाहिलेला नाही.

पण म्हणजे असंही म्हणता येईल का की नवी पिढीच स्वमग्न (ऑटिस्टिक) होते आहे? आणि म्हणूनच स्वमग्न मार्कचं फेसबुक यशस्वी ठरलं आहे?

पण जर वरील प्रश्न उपस्थित करण्यात यशस्वी झाला असेल तर जरूर बघायला आवडेल.

निव्वळ घटनांची, कथासूत्राची व त्यातल्या कलाकारांची वर्णनं करण्यापेक्षा त्यात कुठची प्रतीकं वापरली आहेत व लेखक/दिग्दर्शक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत याचं विश्लेषण चिंजंच्या समीक्षेत येतं, ते आवडतं.

माजगावकर's picture

23 Nov 2010 - 11:59 pm | माजगावकर

सुंदर परिक्षण!!

आता मात्र बघेन.. जवळ जवळ आठवडा झाला, डाउन-लोड करून..

चिंतातुर जंतू's picture

24 Nov 2010 - 11:04 am | चिंतातुर जंतू

>>पण म्हणजे असंही म्हणता येईल का की नवी पिढीच स्वमग्न (ऑटिस्टिक) होते आहे? आणि म्हणूनच स्वमग्न मार्कचं फेसबुक यशस्वी ठरलं आहे?<<

पण जर वरील प्रश्न उपस्थित करण्यात यशस्वी झाला असेल तर जरूर बघायला आवडेल.

इथं हे मात्र स्पष्ट करायला हवं की माझ्या परीक्षणातल्या काही गोष्टी चित्रपटात नि:संदिग्ध आहेत, तर काही धूसर आहेत; आणि काही म्हणजे मला जाणवलेल्या विविध गोष्टींच्या विशिष्ट जोडणीतून मला पडलेले प्रश्न आहेत. उदा: चित्रपटातले वकील आणि विविध लोक मार्कला प्रश्न विचारतात, किंवा त्याच्या उत्तरांमुळे/वर्तनामुळे आश्चर्यचकित होतात; त्यातून विनोदनिर्मिती होते, हे स्पष्ट आहे. ती सर्व माणसं वयानं मार्कला खूप ज्येष्ठ आहेत, हेही सुस्पष्ट आहे. चित्रपटात मार्क आणि या ज्येष्ठांमधला विरोधाभास खटल्याच्या माध्यमातून ऐरणीवर येतो. हा चित्रपटाचा मुख्य, उघड, सुस्पष्ट भाग म्हणता येईल.

फेसबुक वापरणार्‍या तरुण पिढीचं मात्र चित्रपटात तितकं चित्रण नाही. कारण मुख्य कथाभागात त्याला दुय्यम स्थान आहे. सूचक संदर्भ मानावेत असे प्रसंग मात्र येत जातात. उदा: अगदी सुरुवातीला (फेसबुक बनवायच्या आधी) 'दोन मुलींचे चेहरे समोर ठेवून यातली तुम्हाला आवडते ती एक निवडा' असा एक खेळ मार्क बनवतो आणि तो हार्वर्डमध्ये खूप लोकप्रिय होतो असं दाखवलं आहे. किंवा 'रिलेशनशिप स्टेटस'ची माहिती मार्क फेसबुकमध्ये नव्यानं टाकतो आणि नंतर कधीतरी एक मुलगी त्याचा वापर करून आपल्या मित्राला छळते (अधिक तपशील मुद्दाम सांगत नाही).

अशा गोष्टींतून 'सोशल नेटवर्क'चा आणि नव्या पिढीचा खोल संबंध आपल्याला जाणवतो. त्यातून मार्कची विचारपध्दती आणि नव्या पिढीची नात्यांबद्दलची गरज यांच्यातलं घनिष्ट नातं दिसतं. याउलट जुन्या पिढीला मार्क अनाकलनीय (किंवा विचित्र) वाटतो हेही अनेकदा दिसलेलं असतं. म्हणून वरचा प्रश्न माझ्या मनात आला. ज्याला 'टाईमपास' म्हणून सिनेमा पाहायचा आहे असा माणूस 'काय फुकट पिळतोयस!' असं मला म्हणू शकतो. म्हणून वरचा प्रश्न चित्रपटात संदिग्ध आहे असं म्हणता येईल. त्यामुळे तो मांडण्यातलं चित्रपटाचं यशापयश सापेक्ष आहे. शिवाय अखेर चित्रपट 'हॉलिवूड'च्या तर्कशास्त्रानं जातो. त्यामुळे हे अपरिहार्यही आहे, कारण 'पिच्चर' यापेक्षा गंभीर केला तर पॉपकॉर्न खाणारं पब्लिक बोअर होईल!

स्वाती दिनेश's picture

24 Nov 2010 - 12:47 pm | स्वाती दिनेश

पहाण्याच्या यादीत नोंद केलेली आहे, परिक्षणाबद्दल धन्यवाद.
स्वाती

नंदन's picture

24 Nov 2010 - 3:08 pm | नंदन

>>> पहाण्याच्या यादीत नोंद केलेली आहे, परिक्षणाबद्दल धन्यवाद.
--- असेच म्हणतो. आधी वास्तवापासून बर्‍याच ठिकाणी फारकत घेतली आहे असं परीक्षणात वाचलं होतं, त्यामुळे हा सिनेमा मुद्दाम पाहीन असं वाटलं नव्हतं. आता तुमच्या परीक्षणातील निरीक्षणं (अपघाती अनुप्रास) वाचून त्याची पाहण्याच्या यादीत नोंद केली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2010 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फेसबुक अथवा मार्क झुकरबर्गबद्दल फार आकर्षण नसल्यामुळे पिक्चर बघण्याची फारशी इच्छा नव्हती. पण परीक्षण वाचून पिक्चर बघावा असं वाटत आहे.

चिंतातुर जंतू's picture

24 Nov 2010 - 6:50 pm | चिंतातुर जंतू

एक गोष्ट सांगायचीच राहिली. जगातल्या समस्त गीकांना हा चित्रपट रंजक आणि रोचक वाटावा. कारण मार्कशी सह-अनुभूती जाणवेल आणि त्यानं जगाला जो अंगठा दाखवला आहे तो म्हणजे अगदी माहेरचा आहेर वाटेल.

Nile's picture

25 Nov 2010 - 1:27 am | Nile

हा निष्कर्ष(?) आवडला. ;-)

शिनेमा 'फर्स्ट डे' पाहिला आणि आवडला. जरी सर्व कथानक वास्तव नसले तरी सिनेमा छान आहे. फेसबुकच्या जन्माची कहाणी म्हणुनही सिनेमा पहावा वाटला.