बायको रोज रात्री साडेअकरापर्यंत बालिका वधू बघते या कारणाने कोर्टातून काडीमोड मिळू शकतो का ??
छळ हां फ़क्त शारिरीकच असायला हवा का? ..तीव्र मानसिक छ्ळाचं काय ?
मी रात्री साडेअकरा वाजता गोड गूळझोपेत शिरत असतो.. जिच्याखेरीज इतर कोणीही आपल्याला कुशीत घेत नाही ती निद्राराणी बोलवत असते.. आणि मधेच थाडे..माडे असं काहीतरी थाड्थाड़ ऐकू येतं.. मी आणि माझा लहान मुलगा..दोघेही लहान बाळासारखे दचकून अंग काढतो.. तो तर बिचारा लहान बाळच आहे..मीही माझं मोठ्ठं (लठ्ठ) अंग काढतो..
डोळे खाडकन उघडतात आणि समोर एक अत्यंत हडळ टाईप म्हातारी दिसते.. ती केवळ वाईट असायचं म्हणून वाईट असायचं अशा स्वांत सुखाय जीवनध्येयाने एका गरीब सुनेला आणि बाजूला रेशमी झब्बे घालून उभ्या असलेल्या साबणवडी टाईप पुरुषांना काहीतरी कचाकचा बोलत असते..ती सून (आणि मी..) हमसाहमशी रडेपर्यंत हडळ बोलतच राहते..
भयभीत अवस्था थोड़ी शांत झाल्यावर डोळा लागतो.. बायकोचा विसर पडतो.. मुलगा ही माझ्या कुशीत शिरून थोडा सावरतो.. पण लगेचच परत थारे थारे थारे..असं तीन चारदा ऐकू येतं..थरथरत्या डोळ्यानी परत पाहिलं तर दुसराच channel चालू असतो.. पण थारे मारे आहेच (च्या थारी मारी..!)
थोडावेळ जागेच राहू आणि मग सगळं सगळं संपल्यावर झोप येते का पाहू असं म्हणून काहीवेळेला मग मी जागाही राहतो.. त्यामधे साधारण खालचे प्रसंग पुन्हा पुन्हा घडतात:
१) कोणी एक नवी सून घरात येऊ घातलेली असते.. ती पदर डोक्यावर घेऊन उभी.. मग दोन तीन खूप छोट्या किंवा अतिरिक्त अवखळ टीन एजर मुली (या ही सुनाच तर नसतील ??) पळत पळत येऊन या नव्या सुनेला घेऊन गच्ची किंवा बाग़ दाखवायला जाणं..यात पंधरा मिनिटं..तिथे सीन संपतो..
काय दाखवतात गच्चीत ?? ते आम्हाला तरी दाखवा..
२) सर्वजण जरतारी कपड्यात नटून (झोपताना सुद्धा) एका कोणा "जिजू" ची (माझं) मन विटेपर्यंत थट्टा करतात..
सगळे खूप आनंदात आणि हसत असतात..
ते आनंदात अणि हसत असणं याचाच अर्थ समजून जा सज्जनहो की आता खडूस म्हातारी येऊन काहीतरी गलिच्छ बरळून सगळ्यांना दु:खी करणार.. मग ती वाईट व्यक्ती येतेच.. ती वाईट आहे हे कदाचित माझ्या लहान बाळाला कळणार नाही म्हणून तिच्या एंट्रीलाच गिधाडाच्या आवाजासारखा काहीतरी sound effect..
उपस्थित सर्वांवर तीनदा वरून..तीनदा खालून आणि एकेकदा "जमण्या अने डाब्या" बाजूने झिप झिप, झप झप आणि झुप झुप करून camera..
मग ती येऊन एखाद्या सुनेला हमसाहमशी रडवण्याची तिची duty इमाने इतबारे पार पाडून जाते..साबण वड्या नेहमीप्रमाने मान खाली घालून आईचं गरळ ऐकतात आणि गरम नि:श्वास सोडत राहतात..
४) एक अत्यंत अत्यंत इनोसंट (मर्फीचं बाळ जणू अशी) लहानशी मुलगी..(ही पण "बहू"च..) खूप खूप भोळेपणाने स्वत:हूनही जास्त इनोसंट स्वरात पण अत्यंत मार्मिक आणि मुद्द्याचे प्रश्न विचारत असते.. आणि आजुबाजूला रेशमी कापडांच्या ठाणांसारखे स्त्री-पुरुष मर्तिकाला आल्यासारखे चेहरे करून निरुत्तर बसलेले असतात..
३) एक सुंदर गोरी सून (पण हिरव्या मस्काय्रामुळे आणि डीप कट उघड्या गळ्यामुळे ती वाईट असल्याचं आम्ही ओळखलं आहे महाराजा...!!) ही स्वत:शीच तिचे खुनशी plans बोलून दाखवत असते.. ते plans एकदम टेरर टाईप असतात..लहान सहान काही नाहीच.. साधारण घराच्या चाव्यांवर कब्जा.. (चावीचं काय एव्ह्ढं? आम्ही कामवाल्या बाईसाठी रोज समोर नेन्यांकडे ठेवतो..!) ..विरानी, मनसुखानी किंवा आणि कोण्या "आनी" छाप घराण्याची पार काशी घालणं..त्यांचा सुपडा साफ़ करणं..निर्वंश करणं.. इतपत तरी किमान तिचा plan असतोच..
अरे बाप रे.. यापेक्षा सांगली-सोलापूरकडचं एखादं घरगुती मुलीचं "स्थळ" का बघत नाहीत ही लोकं..
मी अत्यंत सहनशील आहे.. उमेदीच्या काळात मी राजश्री छाप सिनेमे बघण्याइतका दम कमावला होता. ..मी देस में निकला होगा चाँद बघू शकायचो एकेकाळी .. पण किती दिवस ?? आता ताकद कमी होतेय.. काळ सोकावतोय..
सांगा ना.. बायको रोज बालिका वधू बघते या कारणाने कोर्टातून काडीमोड मिळू शकतो का ?? माझ्यासारखे आणखी कोणी यात पिळून निघताहेत का? कोण उभं राहील आपल्या बाजूनं?
मेधा पाटकर की "मनसे" ?
प्रतिक्रिया
14 Nov 2010 - 11:04 am | चिगो
मस्त खुमासदार लेख... गविकाका सर्वक्षेत्रात उड्डाण करताहेत.. लगे रहो !! :-)
मेधा पाटकर की "मनसे" ?
ह्यांच्यापैकी कुणीही कामी येणार नाहीत, असं वाटतं.. एक काम करा, ह्या मालिका बालविवाहाचं आणि Domestic Violence चं प्रदर्शन आणि प्रसारण करताहेत अशी PIL टाका सुप्रिम कोर्टात... च्यायला, ह्या "थारे-मारे" करत पुरुषांचे मानसिक प्रताडण करणार्या मालिकांवर आता कायद्यानेच बंदी आणली पाहीजे...
14 Nov 2010 - 3:03 pm | मी-सौरभ
तुम्हाला तुमचा केबल वाला किंवा मग कापसाचे बोळे मदत करु शकतात... :)
14 Nov 2010 - 11:32 am | कानडाऊ योगेशु
माझ्याघरीही हीच बोंब आहे.रोज कामावरुन यायची वेळ आणि "बैरी पिया" ह्या टुकार भिकार सिरियलची वेळ एकच.आणि बायको व्रत ठेवल्याप्रमाणे न चुकता ती सिरियल पाहायची.आणि त्यातील हिरोईनच्या आईचे पात्र त्याचवेळेला मयताला रडल्याप्रमाणे रडायचीच रडायची.उंबर्यांतुन आत पाऊल ठेवतोय न ठेवतोय तोच त्या बयेचे रूदन कानी पडायचे.बायकोला एकदा खडसावलेच की ही बया नेहेमी मी आल्या आल्याच का रडत असते गं?
बायकोचे उत्तर " तुम्ही येताच चुकिच्या वेळेला त्याला ती तरी काय करणार.."
सुदैवाने त्या मालिकेचा दर्जा भिकार होता किंवा बायकोचा त्या सिरियल मधला इंटरेस्ट संपला म्हणुन ते रूदन त्या वेळेला पुन्हा काही कानी पडले नाही.
14 Nov 2010 - 12:00 pm | रन्गराव
काडी मोड सोडाच. बायकोला तुमचा हा प्रताप कळला तर कंबरमोड मात्र मिळेल ;) एक आदी जोशी नावाचे महाराज आहेत. त्यांना व्यनी करून बघा ते मदत करू शकतील आपल्याला :)
14 Nov 2010 - 7:09 pm | रेवती
माझी आई अश्या रुमालाची गरज असलेल्या सिरिअल्स बघते. तिच्याकडे तेवढा वेळ आणि पेशन्स आहे बुवा!
मला मालिका बघायची वेळ फारशी आलेली नाही. एकदा बघायला गेले आणि एकाचा बुवाचा चेहेरा वेगवेगळ्या अँगल्समधून ढँटॅढँ.....असा दाखवत बसले होते. आधी जवळून, मग लांब, लांब असा .....टिव्ही बघण्याचा उत्साह तिथेच संपला.
गवि, याला उपाय असा काहीच नाही, कधितरी कंटाळून आपली पत्नी सिरिय्ल्स बघणे बंद करेल.;)
10 Aug 2011 - 3:43 pm | इरसाल
कधितरी कंटाळून आपली पत्नी सिरिय्ल्स बघणे बंद करेल.
-------------------------------------------------------------------------
ओ तुम्ही हे शक्य आहे काय ती केकता रोजच्याला नवीन नवीन भर घालतेय.
मराठी वाल्यांनी उच्छाद मांडलाय.
15 Nov 2010 - 11:03 pm | शुचि
हा लेख जबरी झाला आहे. करमणूक मूल्य सॉलीड आहे.
15 Nov 2010 - 11:10 pm | शिल्पा ब
छान लेख..
15 Nov 2010 - 11:24 pm | प्रशु
आमच्या कडे हिंदी वाहिन्या बिलकुल बघितल्या जात नाहीत पण आज काल मराठी वाहिन्यांवर पण असलचं काहितरी सुरु असतं...
16 Nov 2010 - 11:38 am | गवि
माझी पत्नी अमराठी आहे. म्हणून आमचे येथे "लाडो", "उतरन.."(सदैव दात एकमेकांवर दाबून घासत बोलणारी तपू ..बरी दिसते. ती आली की बघत बसतो काही वेळा.") इ.इ.
पण मराठी दळण माझ्या आईच्या खोलीत चालू असतं.
मी मोबाईलवर सर्फ करुन झोप येण्याची वाट बघत पडून राहतो.
10 Aug 2011 - 3:41 pm | इरसाल
म्हणजे इकडे कुआं तिकडे विहीर म्हणायचे काय तुम्हाला.
(ह.घ्या.)
10 Aug 2011 - 5:51 pm | विजुभाऊ
माझी पत्नी अमराठी आहे. म्हणून आमचे येथे "लाडो", "उतरन..
अरे मराठी काय अन अ मराठी काय.
आमच्या घरी देखील तीच परिस्थिती आहे.
मुलगा शाळेतून आल्याआल्या डोरेमो , नोबितो वगैरे कार्टून लावतो.
ते झाले की मुलगी सी आय डी लावून बसते.
ते संपले की बायको तेच ते लाडो , बालीका बधू , असले काही लावून बसते.
अधून मधून " तारक मेहता का उल्टा चश्मा" सुरु असतेच.( त्यातल्या दया बाई सारखे बोलायची एकदा प्रॅक्टीस केली . दोन दिवस जबडा दुखत होता)
"ये रीश्ता क्या कहलाता है "मधला हीरो इतक्या बुळ्या दाखवलेला आहे के त्याला प्रत्येक शॉट झाल्यावर किमान तीन तरी कानाखाली हाणाव्या असे वाटते.
आता ती कोणतीतरी सीरीयल सुरु झाली आहे उषा नाडकर्णी आहेत त्यात.
हे होईस्तोवर बायको मुलगा आणि मुलगी रीमोट हे त्यांच्या बोटाचे एक्स्टेन्शन असल्यासारखे वागवत असतात. नेमक्या जहीरातीच्या वेळेसच त्यांचे सर्फिंग स्किल्स एन्हान्सिम्ग चाललेले असतात. साधी लक्स साबणाच्या जहिरातीतली नवी बाईसुद्धा नीट बघु देत नाहीत
हे सगळे संपले की आमच्या हातात रीमोट येतो. पण त्या बरोबरच ईव्ही बंद करा असा आदेश देखील निघतो. सकाळी उठायचय उगाच जाग्रणे करू नका. लाईटचे बील गेल्या महिन्यात जास्त आलय फुकट जाळू नका. वगैरे वगैरे
सकाळी बातम्या लावाव्या म्हणालो की पुन्हा " किती टीव्ही बघताय"........ हे ऐकावे लागते.
असो.
मी मागचे तीन आठवडे टीव्ही सन्यास घेतलाय. पण त्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.
असो. शत्रू पक्षाला "गेट वेल सून" अशा आशयाची ग्रीटइंग्ज पाठवायचा विचार करतोय.
त्याने फरक पडेल अशी आशा करूया
11 Aug 2011 - 10:24 pm | प्रियाली
तिला पाहिलं की मला युयुत्सुंच्या अत्यंत घाणेरड्या पौर्णिमेची आठवण होते.
चंद्रसारखा गरगरीत वाट्टोळा चेहरा. त्यावर केंद्रभागी चेहर्याचे कान आणि केस सोडून बाकी सर्व अवयव एकवटलेले (या बाईचे गालगुच्चे घ्यायचे झाले तर गाल कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो हे कळणे कठीण आहे.) आणि अभिनयाअभावी मठ्ठ भाव.
16 Nov 2010 - 11:02 am | llपुण्याचे पेशवेll
या मालिकांच्या आयची ***.. यात तुमच्या घरी झी मराठी (नक्षत्रांचे देणे, सूरताल वगैरे उपकारक काम करणारा हा चॅनेल असे अपकार करून चांगुलपणाचा बॅलन्स ० करून जातो) असेल तर थूंकू, माझिया प्रियाचा जुलाब थांबेना वगैरे मालिका बघताना कॅप्टीव्ह बोल्ट गन वापरून मग कापलेल्या बकर्याप्रमाणे माझी अवस्था होते.
16 Nov 2010 - 11:34 am | गवि
मान्य..
:-)
17 Nov 2010 - 4:20 pm | धमाल मुलगा
धन्याशी लै वेळा सहमत.
च्यामायला....ते 'हां हां हां थूंकूऽ' करुन गायला लागले की मी घरात असेन तिथून सुपरफाष्टात बाहेर पडतो..हो कारण ती एक मालिकाच असते. ते थूंकू झालं की आणखी काही, मग त्यानंतर आणखी... आपण आपलं निवांत मधूबनला चहाचं उकळलेलं मचूळ पाणी पीत आणि बिड्यांचं अग्निहोत्र चालवत अशाच समदु:खी मित्रांसोबत गप्पांचा फड रंगवून बसतो. त्या मालिका संपल्या की आपसुक फोन येतोयच की, 'य आता...पाच मिनिटात वाढते, आयतं गिळायला या! ' (हा साला सगळा त्या मालिकांचा प्रताप..पुर्वी लग्नाआधी, प्रेमानं बोलणारी बायको अचानक मालिका पाहून त्यातल्या कोणत्याशा कजाग व्यक्तीरेखेत स्वतःला का शोधायला लागते कोण जाणे. बरं, त्यातल्यासारखी 'मायेची सावली' वगैरे टाईप होणं आपल्या आईला का जमत नाही हा ही एक प्रश्नच. दोन्हीकडून आपलीच ससेहोलपट)
अवांतरः मिष्टर धन्या, ते 'माझिया प्रियाचा जुलाब थांबेना' ह्याला आम्ही 'माझिया प्रियाला भीक मिळेना' असं म्हणतो.
ओ (गगन) विविधलहरी,
समस्त डेलीसोपपिडीत गरीब बिचार्या नवरेमंडळींतर्फे तुमचे आभार! आभार ह्यासाठी की ह्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडली ;)
17 Nov 2010 - 4:24 pm | llपुण्याचे पेशवेll
>>'माझिया प्रियाला भीक मिळेना'
ते गाणं जरा चांगली चाल बिल लावून म्हटलं तर एखाद्या भिकार्यांवर काढलेल्या लोक- चित्रपटात हीट होईल . सबब "माझिया प्रियाचा जुलाब थांबेना" हेच गाणं मळमळ काढण्यासाठी योग्यं वाटतं. कसे? ;)
17 Nov 2010 - 4:45 pm | धमाल मुलगा
वृत्तात मार खातंय. तुमचे ५ गुण वजा करण्यात येत आहेत. :D
>>सबब "माझिया प्रियाचा जुलाब थांबेना" हेच गाणं मळमळ काढण्यासाठी योग्यं वाटतं. कसे?
अँ? मळमळ काढायला जुलाब? गल्ली चुकलं काय वोऽऽ ?
10 Aug 2011 - 12:51 pm | चिर्कुट
उत्खननाबद्दल स्वारी..पण कुणाला ह्या समस्येवर काही उपाय सापडलाय काय?
बायको/आई किंवा तत्सम स्त्रीवर्गाची असल्या मालिकांबद्दलची आवड समजू शकतो हो, पण आमचा एक शहाणासुरता, शिकला सवरलेला, विंजिनेर मित्र-रुममेट पण आजकाल येड्यागत करायला लागलाय...
सकाळी ७ ते संध्याकाळी ५ हा मनुष्य जॉब करतो, तेथून ६ ते ९.३० कसला तरी क्लास करतो आणि त्यानंतर अक्षरशः रस्त्यावरून पळत पळत १० ची मालिका ('नव्या') बघायला रूम गाठतो. भले त्यावेळी कुणीही, कितीही इंटरेस्टन काही बघत असलं तरीही हा प्राणी चॅनेल बदलणारच..
ही खोड मोडायला त्या 'नव्या' ला सार्वजनिक शिव्या घालण्यात आल्या, चॅनल उडवून टाकण्याचा (अयशस्वी) प्रयत्न झाला, मित्राला शिव्या देऊन झाल्या, भांडणं झाली पण सुधरायचं नाव नाही.. पोरगं पार कामातून गेलंय आणि उरलेल्या सगळ्यांना पण घालवायला लागलंय..
खरोखर काय करावं काही सुचत नाही..काही जालीम उपाय असेल तर सांगा दादा लोकानू..
बादवे त्या "माझिया प्रियाचा जुलाब थांबेना" चं वृत्तात पर्फेक्ट बसणारं आमचं व्हर्जन आहे "माझिया प्रियाला *ट कळेना.."
- चिर्कुट
You should have an extemely COMPLICATED mind to think of the SIMPLE things!!
10 Aug 2011 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा
हा हा हा हा...... मेलो....:bigsmile:
16 Nov 2010 - 11:21 am | सुप्रिया
एकदम खुसखुशित लेख !
माझ्या सासूबाई कशा काय या मालिका बघतात याचं आश्चर्य वाटतं.
माझं तर पहिल्या पाच मिनिटांत डोकंच् दुखायला लागतं.
16 Nov 2010 - 11:33 am | गवि
सर्व बायका बघतात हो..
लहान, तरुण , वृद्ध्..सर्व..
काय करणार.
तुम्ही कशा नाही बघत? पहिल्याच भेटलात..
17 Nov 2010 - 3:43 pm | सविता
अशा प्रकारची "जनर्लाइड" वाक्ये टाकल्याबद्दल णिशेढ...णिशेढ...... त्रिवार णिशेढ!!!!
17 Nov 2010 - 11:06 pm | पैसा
हेच म्हणते!
17 Nov 2010 - 11:14 pm | गवि
-१
16 Nov 2010 - 2:17 pm | विकाल
भाउ अन सी आय डी ??
अग आय आय...!! आवरा रे..!
16 Nov 2010 - 2:25 pm | गवि
सोनी नावाचा एक चॅनेल पूर्वी होता.
आता तोच चॅनल "सी आय डी" असा झालाय ना?
16 Nov 2010 - 7:31 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!!!
कंस वाढवा. :)
17 Nov 2010 - 12:30 am | जाई अस्सल कोल्हापुरी
व्वा!
खुप दिवसानी मनापासुन हसु आलं ..धन्यवाद!
माझ्याही घरी हे असलेच प्रकार पण मराठीत चालु असतात्..मी नाही पहात!.
मला झेपतच नाहीत...!
पण सासुला काडीमोड कसा द्यावा( कारण सासु आणि सासरे दोघेहि न चुकता ...दिवस सासुचे पाहतात)
पण मजा आली!
17 Nov 2010 - 4:27 pm | पैसा
तिच्याबरोबर बसून थोडावेळ सिरियल बघितल्यासारखं करा. आणि अव्याहत असंबद्ध प्रश्न चालू ठेवा, "हिला आता काय झालं बॉ अचानक? आतापर्यंत बरी होती!" या छापाचे. ४ दिवसात परिणाम झालाच पाहिजे...
17 Nov 2010 - 4:31 pm | llपुण्याचे पेशवेll
नाही. या 'पाशवी' स्त्रिया अशा बाबतीत अगदी निगरगट्ट असतात. काही परिणाम होत नाही त्यांच्यावर. सरळ म्हणतात "आत्ता गप्प बसून बघ. मग नंतर (चामायला नंतर ष्टॉरी? ) ष्टोरी सांगते"
17 Nov 2010 - 4:31 pm | गवि
ग्रेट आयडिया..करुन पाहिलंय.पण प्रॉब्लेम असा की दर तीन मिनिटांनी चॅनेल बदलत असतो. मला ते समजत नाही पटकन. मग असे प्रश्न विचारले की ती म्हणते की ही सीरियल वेगळी आहे.
तीन चार सीरियल एकत्र कशा बघू शकतात आणि का बघतात ते कळत नाही.
इतरत्रही असा अनुभव आहे का?
10 Aug 2011 - 2:22 pm | तर्री
मी काही वर्षांपूर्वी " सास भी कभी बहू थी " ग्रस्त होतो.त्याकाळी ही माला असेच वाटत होते.
५/६ वर्षात ही सिरियल संपली आणि पण देव दयाळू आहे ह्या वर माझा विश्वास बसला.
" साडेसातीच " म्हणा की ती एक........
10 Aug 2011 - 3:28 pm | योगप्रभू
बहुतेक बायका जख्ख म्हातार्या होईपर्यंत 'बालिका वधू' असल्यासारख्याच वागतात (वैयक्तिक निरीक्षण)
गवि,
गरोघरी मातीच्या चुली. ही समस्या सुटणारी नाही. आमच्याकडे 'मांडला दोन घडीचा डाव' विरुद्ध काहीही ऐकून घेतले जात नाही.
या कारणावरुन काडीमोड मिळत नाही. विवाहित पुरुषांसाठी एकच मंत्र 'आपले दु:ख आपण सोसावे आणि झक मारत बसावे.' मुलाचा अभ्यास घेणे, त्याला गोष्टी सांगणे अशा सवयी लाऊन घ्या. स्वयंपाकघरात मन रमवा. मुलालाही स्वयंपाक शिकवा. लक्षात ठेवा तुम्हाला 'उद्याचा पुरुष' घडवायचा आहे.
दुष्ट बायका आपल्या या चर्चा वाचत असतात. सावध राहा. सर्व विवाहित पुरुषांनी धुणे धुण्याच्या निमित्ताने गावच्या पाणवठ्यावर भेटावे. तिथे परस्परांचे दु:ख शेअर करुया. :)
10 Aug 2011 - 5:27 pm | साबु
पवित्र रिश्ता आनि उतरन ने उत आणला आहे....
10 Aug 2011 - 6:17 pm | धमाल मुलगा
माननीय सदश्य परिकथेतील राजकुमार ह्यांचे 'य्ये धर्मकन्याऽऽ' ह्या विषयावरील मौलिक मत जानुन घेन्यास उस्सुक आहोत. तरी मंडळातर्फे मी माणनीय सदश्य श्री. परिकथेतील राजकुमार ह्यांणा विणंती कर्तो की त्यांनी मंचावर यावे आनि आपले भौमोल माग्लदर्शन करावे.
धन्यवाद.
11 Aug 2011 - 10:14 pm | राजेश घासकडवी
खुसखुशीत लेखन.
11 Aug 2011 - 10:18 pm | गणपा
हे वाचलच नव्हत. ज्याने खोदकाम करुन हा धागा वर आणला त्याचे हाभार्स.
17 Jan 2019 - 2:42 pm | विजुभाऊ
मी पण आत्ताच वाचतोय.
पण बाकी भावना निव्वळ टाईमलेस.
आत्ताही ते ईशा , सरंजामे , निमकर , मायरा, राधीका शनाया वगैरे अपग्रेड वर्शन वर पिळत असतात.
17 Jan 2019 - 4:05 pm | यशोधरा
वर तुमची कमेंट आहे बरं का 10 Aug 2011 - 5:51 pm वाजता!
17 Jan 2019 - 4:29 pm | विजुभाऊ
खरेच की. इसारलोच हुतो म्या.
17 Jan 2019 - 4:32 pm | गवि
चालायचंच.
वयाला कोणाचा काय इलाज..
17 Jan 2019 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत महालोल लिखाणशैली ! =)) =)) =))
आमचा मिपाजन्म होण्यापूर्वीचा लेख, म्हणून वाचनात आला नव्हता. धन्यवाद विजुभाऊ, त्याला वर काढल्याबद्दल ! कपडे, पात्रे आणि कथा बदलल्या असल्या तरी सिरियलमधल्या मूळ भावना कालातीत आहेत!
17 Jan 2019 - 11:17 pm | वीणा३
हा (आणि अनेक इकडे तिकडे सगळीकडे आलेले धागे बघून ) धागा बघून एक गोष्ट आठवली. चांदोबा मध्ये जवळपास २०-२५ वर्षांपूर्वी वाचलेली होती. लेखकाचं नाव आठवत नाहीये, पण आशय कालातीत आहे.
=====================================
एक आटपाट नगर असतं. त्यातला राजा खूपच चांगला असतो, न्यायी असतो, उदार असतो. लोकही आपापली काम करून सुखाने राहत असतात. अशात राजाकडे एकदा जवळच्या खेड्यातला एक माणूस येतो. तो म्हणतो कि मला गोष्ट सांगायची आवड आहे, पण माझ्या गोष्टी कोणीच ऐकत नाहीये. वर माझ्या गोष्टीमुळे त्यांनी मला गावातून हाकलून लावलाय. हा माझ्यावर अन्याय आहे. तुम्ही न्यायी आहात, म्हणून तुमच्याकडे आलोय.
राजाला त्याच वाईट वाटत. तो म्हणतो कि मी तुझ्या गावातल्या लोकांबरोबर बोलेपर्यंत सध्या इथेच राहा. २-४ दिवस जातात आणि एक दिवस तिथले काही लोक तक्रार घेऊन येतात कि या माणसाला हाकलून द्या. ते म्हणतात कि आम्ही सगळे याच्या गोष्टिंवर वैतागलोय, कामं होत नाहीत आणि जामच कंटाळा येतो.
राजा त्या माणसाला बोलवून घेतो. राजाला तो माणूस म्हणतो म्हणतो कि मी खरंच चांगल्या गोष्टी सांगतो पण कोणीच माझ्या गोष्टी ऐकायला तयार नाहीयेत. मला मदत करा. राजाला फारच आश्चर्य वाटतं, तो म्हणतो कि ठीके तू मला रोज गोष्टी सांग, बघू तर दे लोक का वैतागलेत तुला.
तो राजाला रोज गोष्टी सांगायला लागतो ३-४ दिवसात राजा पण वैतागून जातो. त्या माणसाला म्हणतो कि बस कर तुझ्या गोष्टी, माझं डोकं दुखायला लागलं त्या ऐकून. हे ऐकून तो माणूस फार निराश होऊन जातो. तो राजाला म्हणतो कि माझ्या गोष्टी कोणीच ऐकत नाही, सगळे मला हाकलून लावतात, मला जीव द्यावासा वाटतोय. राजाला त्याची दया येते. तो म्हणतो मी तुला एक मंदिर बांधून देतो, तू त्याची व्यवस्था बघ आणि रोज देवाला तुझ्या गोष्टी सांग.
तो माणूस खुश होतो. राजा त्याला मंदिर बांधून देतो. तो माणूस देवाला रोज गोष्टी सांगायला सुरवात करतो. २-४ दिवस बरे जातात, पण ५व्य दिवशी देव स्वतः मूर्तीतून बाहेर प्रकट होतो. तो माणूस खुश होतो, आणि देवाला म्हणतो, तुला गोष्टी सांगताना मला किती छान वाटतंय. मला माझा एक हक्काचा श्रोता मिळालाय असं वाटतंय.
तेवढ्यात देव त्याच्यापुढे हात जोडतो आणि त्याला म्हणतो, कृपा कर माझ्यावर पण तुझ्या गोष्टी बंद कर, नाहीतर मला तुला शाप द्यायला लागेल. तो माणूस रडू लागतो, म्हणतो, देवा तू पण जर माझ्या गोष्टी ऐकत नसशील तर कोण ऐकणार. माझ्या गोष्टींना कधीच कोणीच ऐकणार नाही का?
देवाला त्याची दया येते, तो म्हणतो ठीके, तू एरवी खूप चांगला माणूस आहेस, खूप पुण्य पण तुझ्या गाठीला आहे. मी तुला एक वर देतो, खूप खूप वर्षांनी कलियुगात एक दूरचित्रवाणी असलेला खोका येईल, त्यावर तुझ्या गोष्टी सगळे लोक वर्षानुवर्षे भक्तिभावाने पाहतील. काही लोक तक्रार करतील पण बरेच लोक तुझ्या पुण्याच्या प्रभावाखाली राहतील आणि तुझ्या गोष्टींना अजिबात कंटाळणार नाहीत.
अशा तह्रेने आपल्याला सध्या कलियुगात त्या पुण्यवान माणसाच्या रोज गोष्टी ऐकायला-पाहायला मिळतात.
18 Jan 2019 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =))