जय नावाचा इतिहास जो
घडले तसेच सांगत आहे?
पराजित सारे मरून गेले
जेत्यांचा भाटगण गात आहे
नसे भाट ना मी द्वेष्टा
केवळ भक्त व्यासमुनींचा
ज्याने लिहिली समग्रगाथा
स्वजन्मरहस्य नोंदले आहे
( नकोत चर्चा व्यास कोण तो
तोच का ज्याने संपादले वेद
की कुणी अन्यकृत लेखन
व्यासशिरी खोविले आहे)
मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी
वचन गीतेत महान आहे?
पौरुषहीन जो संन्यस्त झाला
कामलालसा घेते प्राण आहे
वेदवचने वा उपनिषदे असो
मार्गदर्शक सदैव आहे
कुणी उल्लंघता स्वैरपणे
दोष कसा त्या ग्रंथास लागे?
पांडवास हरवण्या दान करुनी
सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे?
धर्म रक्षणासाठी कवचाचे
अधर्म्यांकडूनच दान आहे
पहावया पंचभोक्त शय्या ती
दरबारी कुत्सित चौकडी असे
त्या चमुस करी जो प्रवृत्त
सूर्यपुत्र कर्ण त्याचे नाव आहे
मित्रद्रोह केवळ पातकासमान
यास्तव रक्षि म्हणे हस्तिनापुर
फसवुन द्विजास मिळवी अस्त्र
वर्तन ह्याचे जाहिर आहे
शटं प्रति शाट्यम हीच नीती
अथवा पेरावे ते उगवे दिसे
अशा मनुष्यास करण्या शासन
स्वये इंद्र भुतली येत आहे
'पांडव' तो जरी इंद्रपुत्र
गादीवर हक्क सांगत आहे
पान्हा तोडून टाकले जिने
पाचांचे जीवदान मागत आहे
सत्यवचन कथसि त्वां
हाच दैवाचा खेळ आहे
कुंतीच्या भाळी लिहिले
अक्षय दु:खाचे वरदान आहे
(का हा खेळ केवळ मनाचा
केल्या कृत्यास फल वांच्छे
कृतप्रणाशाकृताभ्यागम
हा तर इथला नियम आहे)
रजस्वलेची फेडुनी वस्त्रे
अंकी बसण्या बोलवत आहे?
जी राज्य स्वतःचे मिळाले असता
फजिती करून हसत आहे
दॄष्टीदोषे घसरुनी पडता
जन हसती रित आहे
परंतु केवळ याचकरिता
वस्त्रे फेडणे पातक आहे
(नकोच चर्चा त्या कृतींची
लोककथा वर्णत आहे
जाणकार म्हणती श्लोक प्रक्षिप्त
त्यांना मान देत आहे)
नरो वा कुंजरो वा
'धर्मराजाचा' प्रताप आहे
नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला
सूड पुत्राचा पाप आहे?
फेअर इन लव्ह अॅन्ड वॉर
ही आजची रीत नोहे
अभिमन्यु ही असाच मेला
रात्री घटोत्कच विक्राळ आहे
नसे धर्मवान सर्वदा कोणी
लोभ कोणाला चुकला आहे?
'जया'ची बाजी ज्याने मारली
तो ईश्वरपदाला पोचला आहे.
लोभाने अन लालसेने
मनुष्य मनुष्या मारत आहे
सांगण्या मनुष्य वर्तन
व्यासास गणेश सहाय्य आहे
मी ना भाट पांडवाचा
वा नसे मी कौरवद्वेष्टा
व्यासरचित महाभारत
ग्रंथ मज आवडीचा आहे
जय नावाचा इतिहास जो
घडले तसेच सांगत आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 12:17 pm | sneharani
आता मात्र शब्दच संपले?
अगदी मस्त जुगलबंदी रंगली.
13 Nov 2010 - 1:12 pm | धमाल मुलगा
मस्त मस्त मस्त रे नानूस.
च्यायला, दिवाळीच्या वेळी सगळी मंडळी चकल्या चिवडा लाडू खाण्यात गर्क होती त्यामुळं तेव्हा निवांत चालू होतं, आता मात्र खरंच दिवाळी आल्यासारखं वाटायला लागलंय. मस्त मस्त दिवाळीच्या भेटींसारखे धागे येतायत...छान चर्चा रंगल्यात, आणि त्यावर कडी म्हणजे नाना आणि निरंजनच्या निशाणांची जुगलबंदी!
सुंदर अनुभव..
नानबा,
कवितेचा गाभा आणि मर्म अत्यंत सुंदर! फारच छान.
बा निरंजना,
तुझेही उत्तर येऊ दे आता. आम्ही मेजवानीची वाट पाहतो आहो.
-(भोजराजाच्या दरबारी पांडित्यवाद ऐकत असलेला भालदार) ध.
13 Nov 2010 - 3:24 pm | प्रीत-मोहर
नाना मस्तच रे
धम्स अप +१००००००००००००००००००००००
(नाना व ननिच्या निशाण ची फ्यान )प्रीमो
13 Nov 2010 - 3:50 pm | रन्गराव
कविता म्हणून ही एक उच्च दर्जाची काव्यशैली आहे ह्यात वाद नाही नाना. आणि भाषा तर अप्रतिम आहे.
पण काही न आवडलेल्या गोष्टी आहेत. तुमच्या सारख किंवा निरंजन सारखा प्रभावी पणे लिहायची औकाद नाही तरीही जमेल तस विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. काही चुकल तर माफ करा.
१. काही विचार/ वाद कमकुवत वाटले. उदा. व्यासांनी सांगितल म्हणून त्यावर वाद नको. तुमची मागची कविता तुम्ही स्वतःच्या बुद्धीमतेच्या जोरावर लढवली होती ( अस किमान मला तरी वाटल) म्हणून त्याला वजन होत. ह्यावेळी वैचारीक लढाई व्यासांकडे आउट सोअर्स केल्यासारखी वाटली
२. अभिमन्यूचा वध तसेच घटत्कोचा वध ह्या हीन घटना होत्या. पण कौरवांनी कधीही धर्मपालक आणि धर्मरक्षक असा दावा केला नव्हता आणि तसा त्यांचा लौकीकही नव्हता. पण पांडवांना आदर्श मानल जात होतं. त्यांनी "एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर' अस म्हणून धर्मबाह्य वर्तन जर केलं तर त्यांना धर्मरक्षक म्हणन बरोबर नाही. कदाचित फक्त महान योध्दे अस म्हणता येइल.
13 Nov 2010 - 8:19 pm | राघव
मला वाटतं धर्मरक्षक, धर्मानुसार वर्तन हे पांडवांच्या माथी सतत थोपवून त्याचा फायदा कौरवांनी, टु बी प्रिसाईज - दुर्योधनानं करून घेतलाय. उदा. कृष्णशिष्टाईच्या आधी संजय शिष्टाई करण्यास जातो तेव्हा तो केवळ धर्मानुसार वर्तन करा याच गोष्टीवर जोर देतांना दिसतो. का?
अन् तसेही गटार साफ करण्यासाठी गटारात उतरले तर पाय घाण होणारच, आता साफ करायचे की त्यातलेच होऊन जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. :)
13 Nov 2010 - 9:00 pm | रन्गराव
म्हणजे युद्ध धर्म आणि राजकारण ह्यांच्या सीमेवर लढल गेल तर! म्हणून सीमांतर हे मुत्सदीपणाला धरून होत. हमम, थोड पटतय आता. अजून विचार करायला पाहीजे.
13 Nov 2010 - 6:50 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं रे नानूस.
16 Nov 2010 - 1:47 pm | गणेशा
कविता जबरदस्त
16 Nov 2010 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__
सह्ही रे नानबा.
17 Nov 2010 - 9:03 pm | प्रकाश१११
जय नावाचा इतिहास जो
घडले तसेच सांगत आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
एकदम जबरदस्त. आवडले मनापासून !!
17 Nov 2010 - 10:08 pm | प्राजु
नाना.. तुमची प्रतिभा... !! अशक्य आहे!
18 Nov 2010 - 7:27 am | नगरीनिरंजन
अवलिया यांचे उत्तर योग्यच आहे आणि त्यांच्या प्रतिभेबद्दल कौतुक वाटते.
मूळ निशाण लिहीण्याबाबतचा खुलासा करणे आवश्यक समजतो कारण काहींच्या भावना दुखावल्या असण्याची शक्यता आहे. मूळ निशाणात केवळ महाभारतातल्या सूड प्रवासाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहून आणि ते रूपक वापरून आजकालचे सत्य मांडण्याचा तो एक प्रयत्न होता. श्रीकृष्णाबद्दल किंवा व्यासांबद्दल किंचितही अनादर नाही हे वेगळं सांगायची गरज भासत नाही. व्यासांनी कोणतेही पात्र पांढर्या किंवा काळ्या रंगात रंगवले नाही.
नुकतीच एस्.एल.भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी वाचण्यात आली आणि त्यात त्यांनी महाभारतातली पात्रे आणि त्यांच्या भाव भावना अगदी मानवी पातळीवर उलगडून दाखवली आहेत आणि त्यासाठी भरपूर संशोधनही केले आहे. त्याने प्रभावित होऊन महाभारतातल्या काही ग्रे शेड्स थोड्या ठळक करून हे रुपक लिहीले. असं करण्याचे स्वातंत्र्य आपली संस्कृती मला देते याचा मला अभिमान आहे.