बक-यांना मारण्यापूर्वी स्टन करतात. म्हणजे करायला हवं. तसा अमेरिकन कायदाच आहे मुळी.
बकरेच नहीं, इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत असा नियम आहे. एथिकल ट्रीटमेंट द्यायची असते प्राण्यांना.
स्टन म्हणजे तात्पुरता बेशुद्ध.. रादर लाथा मारू न शकण्याइतका गलितगात्र.. . त्यासाठी त्याच्या डोक्यात कॅप्टिव बोल्ट गन या हत्यारानं खाडकन प्रहार करायचा.
हातोड्यासारखा बोल्ट गन पावडरनं दणकवलेला असतो. दोन डोळ्याच्या मध्यभागी टेकवून उडवतात. यात दोन प्रकार आहेत. एक पेनीट्रेटिंग बोल्ट. हा डोक्यात घुसून मेंदूचा बराच भाग नष्ट करतो. याच्यावर बंदी आली आहे. कारण मेंदू फुटल्यामुळे त्याचे टिश्यूज रक्तप्रवाहात मिसळून ते मांस खाणा-या माणसांत मॅड काउ डिसीज फैलावू शकतो. म्हणून आता आत न घुसणारा बाहेरून ठोका मारणारा बोल्ट वापरतात.
इलेक्ट्रिक शॉक आणि कार्बन मोनॉक्साईडमध्ये गुदमरवणं हे स्टन करण्याचे इतर काही मार्ग. एका चेंबरमध्ये प्राण्याला ठेवून अचानक चेंबरमध्ये व्हॅकयूम करायचा आणि ऑक्सिजन अभावी प्राणी स्टन करायचा असाही नवीन शोध आहे.
या सर्वाचा उद्देश प्राण्याला मारताना वेदना होऊ नयेत असा आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी त्याहून महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे मान चिरल्यावर सर्व रक्त वाहून जाईपर्यंत प्राण्याचं हृदय चालू राहिलं पाहिजे. प्राणी आधीच मरून चालणार नाही. रक्त आतच राहिलं तर प्राणी खराब होईल आणि विकण्यायोग्य राहणार नाही.
आणि दुसरं म्हणजे गळा चिरल्यावर होणा-या त्याच्या तडफडीमुळे मारणा-या खाटकाला इजा होऊ नये. म्हणून प्राण्यांना गलितगात्र करायला लागतं.
हे झाल्यावर प्राण्याला मागच्या पायांनी उलटं टांगून मग गळा चिरायचा. उरल्या सुरल्या हृदयाच्या धडधडीनं आणि गुरुत्वाकर्षणानं जास्तीत जास्त रक्त बाहेर सांडून जातं.
आता हे सर्व इतक्या तपशीलवार सांगून मी काय करू पाहतोय ? मी व्हेज क्लबचा कार्यकर्ता आहे का ? नाही..
मटण रस्सा, सुकं मटण हे माझा जीव की प्राण आहेत. ते ओरिजिनल मिळावं म्हणून मी पाय ओढत दूर दूर फिरतो. कोल्हापूरला गेलो की हावरटासारखा खातो.
परवा मी मटण आणायला गेलो असताना ताजं मटण मिळालं. म्हणजे बकरा कापला जातच होता. पण स्टन वगैरे काही करण्याची पद्धत दिसली नाही. डायरेक्ट धर गळा की चीर. पुन्हा बाकीच्या शेळ्या आणि बकरे पाच बाय सहाच्या जागेत तिथेच दाबलेले. ते सर्व बघत होते. आणि टरकून ओरडत होते. तेव्हा खाटिकदादा "अब्बे मार डाल उस मादार्चोद को.. " असे त्या बक-यांवर उखडून त्यांना गप्प करण्यासाठी बडवत होते.
रक्तानं जमीन लथपथून निसरडी झाली होती. जनावरं त्यात पाय सटपटून पडत होती.
अधिक माहिती काढली असता कळलं की भारतात मोठ्या कत्तलखान्यांत स्टन बिन करत बसायला वेळच नसतो. त्यात वेळ जातो आणि दर ताशी कमी प्राणी मारले जातात. उत्पादन घटतं. उत्पन्न घटतं.
लहान कत्तलखाने आणि दुकानांत जास्तीत जास्त हलाल पद्धतच चालते. हलाल मधे गळ्याला चीर देऊन सर्व रक्त वाहून जाईपर्यंत प्राणी जिवंतच ठेवावा लागतो.
लहानपणापासून मटण खातो..म्हणून खातो.
मटण खायचं नाही असं खूप जणांनी ठरवलं तर अन्नधान्य सगळ्यांना पुरणार नाही.
जीवो जीवस्य जीवनम हे मनात ठेवायलाच पाहिजे. ठार मारायचं म्हणजे प्राण्याला वेदना होणारच. सगळं कबूल.
हा आहे नुकत्याच खाल्लेल्या उत्कृष्ट मटनाचा नमुना..कोल्हापूरला..
हे पाहून जबरदस्त डायलेमा होतो हे खरंच..जबरदस्त डायलेमा..
नॉर्मली अशा वेळी आपण खाटिकदादांना म्हणतो "मांडीचा पीस द्या मला..". आणि थोडं थांबून त्यांनी दिलेली काळी पिशवी घेऊन निघतो.
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 4:57 pm | मृत्युन्जय
आयला त्या वाटीतला लालसर रंग बघुन रक्तच सांडते आहे असे वाटले मला. कशाला असलं काहीतरी लिवता राव. तरास होतो ना.
13 Nov 2010 - 5:19 pm | पुण्याचे वटवाघूळ
का हो तुमी सॅडिस्तिक आहात का हो?विमान अपघातावर काय लिहिता, प्राण्यांना तडफडून कसे मारतात आनी त्यांचे रक्त कसे वहते ते लिहिता म्हंजे अस काहितरी बघून तुम्हाला आनंद होतो असा अर्थ आमी घ्यायचा का?
13 Nov 2010 - 5:32 pm | गवि
विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सॅडिस्टिक आहे का या बाबतीत तुमचं परसेप्शन काय आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. हे बघून आनंद होत नाही पण नेहमीचं खाणं चालूच राहातं ही इनसेन्सिटिव्हिटी झाली.ती पुष्कळ आहे.
कॉमेंटबद्दल आभार.
सॅडिस्टिक
-गवि
13 Nov 2010 - 5:34 pm | kalyani B
Non-veg बंद कराव लागल अस वाटतय. तस कोंबडी चिरताना पाहीली आहे.त्या बाईंनी कोंबडी अशी चिरली की बरोबरच्या मुलाला मळ्मळायला लागल.
13 Nov 2010 - 5:40 pm | गवि
प्रिय संपादक मंडळ,
माझ्या लिखाणात विकृत अंश आढळत असल्यास ते तात्काळ काढून टाकावे. मीही लिहिणे बंद करीन. वाचकांच्या गळी अप्रिय मजकूर उतरवून मला वाईटच वाटेल..
13 Nov 2010 - 8:16 pm | नगरीनिरंजन
गगनविहारी,
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका अजिबात. यात अजिबात सॅडिस्टिकपणा नाही आहे. राजरोस जिथे हजारो गुरे अशी मारली जात आहेत तिथे तुम्ही फक्त लिहील्याने सॅडिस्टिक कसे ठरता हे मला कळाले नाही.
आपण जी जीवनशैली आणि नागरीकरण (civilization) स्वीकारलं आहे त्याला सुसंगत अशीच ही करणी आहे. या बद्दल नाकं मुरडणे म्हणजे दुटप्पीपणा आहे कारण आपण इतर वेळी याच नागरीकरणाची इतर फळं प्रगती म्हणून मिटक्या मारत खात असतो. हे असं आहे म्हणून आवडत असूनही मांसाहाराचा त्याग करणे म्हणजे तर दुटप्पीपणाचा कळस आहे.
असो. ताट लई जबराट दिसतंय! उद्या रविवार आहे हे कित्ती छान आहे. सकाळी सकाळी खाटिकखान्यात जावं लागणार.
13 Nov 2010 - 8:24 pm | मृत्युन्जय
उद्या रविवार आहे हे कित्ती छान आहे. सकाळी सकाळी खाटिकखान्यात जावं लागणार
एकुण तुम्ही उद्या एका अजापुत्राचा बळी देणार म्हणा की
अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकः ;)
13 Nov 2010 - 8:27 pm | नगरीनिरंजन
मी नाही गेलो तरी बळी जाणारच हो. देव त्याचा बळी घेणार मी आपला फक्त देवाचा प्रसाद समजून खाणार. मी बळी घेत असतो तर मीच देव नसतो का झालो? ;-)
13 Nov 2010 - 8:38 pm | मृत्युन्जय
_/\_ जय हो निरंजन देवा.
13 Nov 2010 - 11:00 pm | आळश्यांचा राजा
.
मनात गिल्ट आहे हे दिसतंय. गिल्ट कमी करण्यासाठी लिहिलंत की आपल्यासारखेच आणखी आहेत हे पाहण्यासाठी? अन्नधान्य पुरणे/ न पुरणे हा मुद्दा इन फॅक्ट उलटा देखील आर्ग्यू केला जाऊ शकतो, केला जातो. जीवो जीवस्य जीवनम हा आणखी एक स्वतःच्या मनाला सांत्वना देणारा मुद्दा. जिभेचे चोचले पुरवायला केल्या गेलेल्या हत्येला जीवो जीवस्य जीवनम म्हणणे बरोबर नाही. मांसाहार नाही केला तर आपला जीव जाईल अशी परिस्थिती असेल तर जीवो जीवस्य जीवनम म्हणणे ठीक आहे. एरवी नाही. एरवी त्याला शोषण म्हणावे लागेल. दुर्बल घटकांचे.
ठार मारायचं म्हणजे प्राण्याला वेदना होणारच, हे कबूल करुन काय सांगायचंय? तरीही मारणारच, हे सांगायचंय?
हे ठीक आहे. यात कॉन्शस चॉइस नाही. चॉइस करायचा म्हटलं तर गिल्ट मनात येतेय असं एकंदरीत लिखाणावरुन वाटलं.
14 Nov 2010 - 12:24 am | गवि
alshyancha raja.
Thanks for comment. You got it right..
Guilt, weak convincing attempt, insensitivity due to exposure, double standards..all true.
Not that each article must be written to make a valid point, or defend self..not atleast my articles.
I do eat..and I try to convince..thats all I wrote.
I am perfectly imperfect, aren't we all?
Thanks again.
14 Nov 2010 - 1:01 am | आळश्यांचा राजा
हं.
(परफेक्टली इम्परफेक्ट)
16 Nov 2010 - 1:30 am | कापूसकोन्ड्या
स्वतः ला सॅडिस्ट समजू नका.
लोक काहीही समजतात तुम्ही लेख ख्ररंच सुरेख लिहीला आहे. मनाची अशी जीवघेणी अवस्था होउ शकते. प्रत्येक वेळी डीलेमा होतोच. तुम्ही मनाची अवस्था खुपच सुंदर लिहीली आहे.
I am perfectly imperfect, aren't we all? वाक्य आवड्ले. विषेशतः प्रश्नातील गर्भित उत्तर आवडले.
--अवांतर आमच्या कडे Precisely Ambiguous अशी टर्म वापरतात विषेशतः एखादा मॅनेजमेंट रिपोर्ट देताना.
16 Nov 2010 - 1:36 am | लॉरी टांगटूंगकर
१२ वि नंतर कोल्हापूर सोडून पुण्यात गेलो तेवा पासून या गोष्टी ला मि तरस्तोय आता आठवडाभर कोल्हापूरला येणार आणि मस्त हाणणार !!!
फोटू बघुनच भूक लागली