मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं
हा आपलातुपला गंमतनाच!
नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?
जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.
'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून
आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!
स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!
-इतिश्री निर्जाबाई उवाच!!
प्रतिक्रिया
1 Sep 2010 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते
ओळखीचं वाटतंय!!! हे वाचून आमच्या मागे काही नतद्रष्ट लोक मातीचा पुढचा भाग लिही म्हणून मागे लागतात ते आठवलं.
1 Sep 2010 - 3:30 pm | श्रावण मोडक
गप्प रे! नीरजानं कुठला लेख अर्धवट ठेवलेला आठवत नाही. उगा तिच्या या लेखामागं लपू नकोस. :)
आणि आम्ही नतद्रष्ट काय? ठीके. पाहून घेईन.
1 Sep 2010 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे
येईल परत. कायमची थोडीच निघुन जाणार.गंमत शब्द 'गम्मत' असा लिहिला कि निरागस व खेळकर वाटतो. कधी खोडकर सुद्धा! वाचताना देखील आपण मनातल्या मनात लहान होतो.
1 Sep 2010 - 8:30 pm | राजेश घासकडवी
दोघांना एकत्र परत बोलवा. फक्त हे कष्टाचं लफडं मध्ये कुठून आलं कळलं नाही. त्या दोघांचा पाहुणचार करावा लागतो का?
1 Sep 2010 - 8:47 pm | नीधप
हो ना....
आमची कुवत सामान्य त्यामुळे लिहिण्याच्या पाहुणचाराला जाम कष्ट पडतात हो.
3 Sep 2010 - 3:41 am | पिवळा डांबिस
सुंदर लिहिलंयस!
5 Sep 2010 - 3:11 pm | प्रशांत उदय मनोहर
का गं? असं का वाटलं तुला अचानक?
12 Sep 2010 - 8:26 am | नीधप
सगळ्यांचे आभार..
प्रशांत,
अचानक नाही काही. सध्या गंमत पळूनच गेलेली आहे... :)