प्रॉन्स ग्रीन पुलाव

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
6 May 2008 - 9:56 pm

साहित्यः
मध्यम आकाराची कोलंबी - ५०० ग्रॅम्स (थोडी मोठी चालेल पण फार लहान नको.)
नारळ - अर्धा
पुदीना -अर्धी मूठ
कोथिंबीर - एक मुठ
हिरव्या मिरच्या - ३ किंवा ४
लसूण - ८-१० पाकळ्या
आलं १"
लिंबू - १
मीठ चवीनुसार.
मोहरी - २ टेबलस्पून.
केळीची कोवळी पाने ४ (शक्यतो कर्दळीच्या पानाच्या आकारा एवढी)
सुवासिक बासमती तांदूळ - २ वाट्या (अंदाजे ४०० ग्रॅम)
वनस्पती तूप - ४-५ टेबलस्पून
काळी मिरी - १०- १२ नग
तेल फोडणीसाठी. (दोन चमचे)
तयारी:
कोलंबी सोलून साफ करून घ्यावी.
नारळ खवून घ्यावा.
पुदीना पाने निवडून, धूवून घ्यावीत.
हिरव्या मिरच्या, कोथिंबीर धूवून, चिरुन घ्यावी.
लसूण सोलून आणि आलं धूवून चिरुन घ्यावे.
बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात ठेवून, निथळवून घ्यावा.

कृती:

नारळ, पुदीना, कोथिंबीर, मिरच्या, आलं - लसूण, लिंबू , मीठ आणि मोहरी मिक्सरमध्ये वाटून (कमीत कमी पाण्यात) मुलायम चटणी बनवावी.
ह्या चटणीत प्रॉन्स अर्धा तास मुरण्यास ठेवावे.
किंचीत तेलावर काळीमिरी फोडणीस टाकून फुटू द्यावी. त्यावर तांदूळ परतून, मापाने जेवढ्यास तेवढे पाणी घालून, घट्ट झाकण लावून, मंद आंचेवर भात मोकळा शिजवून घ्यावा.
दुसर्‍या एखाद्या पसरट पातेल्यात केळीची पाने अशी लावावीत की अर्धे पान पातेल्याच्या तळाला अंथरले जाईल आणि पानाचा बाकी अर्धा भाग पातेल्या बाहेर येईल. नंतर त्या पानांवर तळाला चार ठीकाणी आणि मध्यभागी असे ५ चमचे वनस्पती तूप सोडावे. त्यावर नारळाच्या चटणीत मुरवलेली कोलंबी नीट पसरून ठेवावी. कोलंबीवर मोकळा शिजवलेला भात पसरावा. आता, पातेल्याच्य बाहेर आलेला केळीच्या पानाचा भाग भातावर झाकणासारखा पसरवून वरून पातेल्याचे झाकण घट्ट लावावे आणि हा पुलावर मंद आंचेवर अर्धा तास शिजवावा.
अर्ध्या तासाने गॅस बंद करून १० मिनीटे पुलावर मुरू द्यावा.
जेवताना झाकण उघडून (पाहा काय मस्त वास आला नं!) केळीची पाने अलगद काढून टाकावी. हलक्या हाताने प्रॉन्स आणि भात वरखाली करून घ्यावा. आणि गरम गरम वाढावा. खाताना त्यावर शुद्ध साजूक तुपाची मस्त धार सोडावी आणि तुडुंब जेवावे.

खास सुचना: कोलंबी आणि मोहरी दोन्ही उष्ण असल्यामुळे दोन दिवस लागोपाठ खाऊ नये. त्रास होऊ शकतो.

शुभेच्छा....!

पाकक्रिया

प्रतिक्रिया

ईश्वरी's picture

6 May 2008 - 10:14 pm | ईश्वरी

व्वा, पुलाव छान दिसतोय (फोटो). रेसिपी पण मस्तच. करून बघायला हवा.
ईश्वरी

गणपा's picture

6 May 2008 - 11:09 pm | गणपा

काका एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटल... =P~

फोटो पण छान, त्या काकडी खाली २ मोठ्या लाल-लाल कोलंब्या ठेवल्या असत्या तर एकदम ससुल्या दिसला असता ;).

-गणपा

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 12:11 am | विसोबा खेचर

पाकृ केवळ सुरेख..!

नक्की करून बघणार. अहो पण पेठकरशेठ, सोबतच्या फोटूत कोलंब्या कुठेच दिसत नाहियेत! त्याही जर दिसल्या असत्या तर अधिक मजा आली असती!

आपला,
(कोलंबीप्रेमी) तात्या.

चित्रा's picture

7 May 2008 - 4:00 am | चित्रा

कोलंब्या भाताखाली आहेत! - मीही अशाच शोधल्या - दिसेनात तेव्हा लक्षात आले की पाककॄतीप्रमाणे त्या भाताच्या खाली घालायच्या आहेत.

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

मीही अशाच शोधल्या - दिसेनात तेव्हा लक्षात आले की पाककॄतीप्रमाणे त्या भाताच्या खाली घालायच्या आहेत.

नाही, हा मुद्दा माझ्याही ध्यानात आला हो चित्राताई, परंतु कोलंबीभाताच्या फोटूत कोलंब्या दिसल्या नाहीत तर काय मजा नाय हो! :)

समजा, पेठकरांनी कोलंब्या घातल्याच नसतील आणि तसाच फोटू देऊन आपल्याला फशिवलं असेल तर?? :)

आपला,
(कोलंबीच्या दर्शनमात्रे मनकामनापूर्ती न झालेला!) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 8:35 am | प्रभाकर पेठकर

कोलंबी नारळाच्या चटणीत लपेटल्या गेल्या आहेत. त्या भातात मिसळल्या जातात. जिथे जिथे हिरवी चटणी दिसते आहे तिथे तिथे कोलंबी आहेत ह्याची खात्री बाळगावी.

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 8:40 am | विसोबा खेचर

धन्यवाद पेठकरशेठ! :)

संदीप चित्रे's picture

7 May 2008 - 1:38 am | संदीप चित्रे

पेठकरकाका...
का त्रास देता ?
अमेरिकेत कोलंबी मिळते हो, नाही असं नाही पण ते म्हणजे ....

शितल's picture

7 May 2008 - 3:00 am | शितल

सुरेख पाककृती, करून बघायलाच हवी. पण एक मुठ, अर्धी मुठ हे कसे ?

ईश्वरी's picture

7 May 2008 - 4:26 am | ईश्वरी

-- सुरेख पाककृती, करून बघायलाच हवी. पण एक मुठ, अर्धी मुठ हे कसे ?

मलाही हाच प्रश्न पडला. अर्धी मूठ हे प्रमाण कसे घ्यावे? मूठीत काही घेतले तर ते मूठभर च होते.
बहुतेक मूठभर घेउन मूठ अर्धी रिकामी करावी म्हणजे ते अर्धी मूठ होईल.
ईश्वरी

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 8:32 am | प्रभाकर पेठकर

प्रत्येकाच्या मुठीची साईजही लहान मोठी असते. मुठीचे प्रमाण अशा करता दिले आहे की नारळाची चटणी आपण खूप वेळा करतो. त्यामुळे अंदाज असतोच. नारळाच्या चटणीच्या रंग, रुप, चव ह्या नुसार कोथिंबीर-पुदीना ह्यांचे प्रमाण ठरवावे. (सहसा प्रमाण असे असावे की पुदीना, कोथिंबीरीच्या अर्धा असेल, अंदाजाने) मिरच्या ही त्यांच्या तिखटपणा नुसार आणि आपल्या तिखट खाण्याच्या क्षमतेनुसार कमी जास्त कराव्यात. मोहरी मात्र मी दिलेले प्रमाण वापरावे. तसेच लिंबूही एक आख्खे पिळावे.

स्वाती दिनेश's picture

7 May 2008 - 11:52 am | स्वाती दिनेश

कोलंबी पुलाव मस्तच दिसतो आहे {आणि हिरव्या चटणीत लपेटलेल्या कोलंबी ही} :)
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 5:14 pm | प्रभाकर पेठकर

ईश्वरी, गणपा, विसोबा खेचर, चित्रा, संदीप चित्रे, शितल आणि स्वाती दिनेश,

आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

कुंदन's picture

8 May 2008 - 5:23 pm | कुंदन

ओ काका
इकडे ईजिप्तात टाका ना एक होटेल. लई हाल होतात बा ईकडे खायचे .
संध्याकाळच्याला गल्ला सांभाळीन ना मी ,
--
--कुंदन

मनस्वी's picture

8 May 2008 - 5:33 pm | मनस्वी

कशाला दिलीये काकांनी..? ती वाच.. आणि बनव आणि खा आणि दुसर्‍यांना पण दे खायला.

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 5:36 pm | प्रभाकर पेठकर

अहो तिथे हम्मुस खा...फिलाहफेल खा...मुतब्बल (बाबा घनुष) खा...चिकन शवारमा खा...कब्से लहाम किंवा कब्से दिजाज खा...खुब्ज झतार खा... खूप सुंदर सुंदर पदार्थ आहेत.

रोजच्या जेवणासाठी एखादी गुज्जू खानावळ नाही का?

आपल्या ईजिप्त निमंत्रणाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

चतुरंग's picture

8 May 2008 - 9:40 pm | चतुरंग

हम्मुस खा...फिलाहफेल खा...मुतब्बल (बाबा घनुष) खा...चिकन शवारमा खा...कब्से लहाम किंवा कब्से दिजाज खा...खुब्ज झतार खा... खूप सुंदर सुंदर पदार्थ आहेत

ह्यातला फिलाहफेल मी इथल्या मेडिटरेनियन हाटेलात चाखलाय. मला तितकासा भावला नाही कदाचित आणखी एखाद्या ठिकाणी खाऊन बघायला हवा मग नक्की ठरवता येईल.

(अवांतर - क्या बात है! काय नावं आहेत पदार्थांची!
एकदम माझ्या डोळ्यांसमोर दृश्य आलं - पिरॅमिडच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या एका शानदार शामियान्यात लोडाला टेकून बसलोय. आत शमादानात छानशा मेणबत्त्या तेवताहेत. एकीकडे हुक्का ओढतोय. समोर चेहेरा अर्धा झाकलेली सुराबाला, तिच्या धारदार काळ्या डोळ्यांतून एकटक माझ्याकडे बघत सुरईतून लालचुटुक रंगाचे दुर्लभपेय माझ्या प्याल्यामधे भरते आहे. एकीकडे मी ह्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतो आहे! व्वा, क्या बात है!! B) )

चतुरंग

स्वाती राजेश's picture

9 May 2008 - 1:52 pm | स्वाती राजेश

पुलाव मस्त आहे. आवडला (आवडली रेसिपी).
फोटो सुद्धा छान....

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2008 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मनस्वी आणि स्वाती राजेश.....

सुमीत's picture

9 May 2008 - 2:59 pm | सुमीत

गेली दिड वर्षे आपण भेटायचे ठरवतोय, पुण्यात परत आला असलात तर येतो.
मटण रोगनजोश आणि हा प्रॉन्स ग्रीन पुलाव ची तयारी करून ठेवा :)