तळ्याचं रुप फार सुरेख आहे.
अलगद वा-याच्या झुळकेबरोबर डोलत असतं. कधी खट्याळपणा करत किना-याला ढुशी देत देत उठणा-या लाटा किना-यावरुन मागे परततांना आता पुरे असे म्हणुन मागे हटणा-या मैत्रिणीची आठवण करुन देतात. कोणती आठवण कधी येईल याचा काही नेम नसतो. तळ्यातला मासा पकडणारा ससाणा कसा ऐनवेळी सूर मारुन मासा पकडतो हे आजवर मला कळले नाही. ते कळले तर कदाचित मनात अचानक येणारा विचार कुठुन पटकन येतो हे कोडे पण सुटेल. पण कोडे सुटणार नाही हे नक्की. का ते माहित नाही, पण आयुष्याची मजा कमी होउ नये असे वाटत असेल तर काही काही कोडी न सुटलेलीच चांगली असतात.
शांत डोळे मिटुन बसलेली सूसर हळूच हालचाल करत चालायला लागते. आताशा सरावाने मी उचंबळणा-या लाटांमधुन सुसरीमुळे तयार झालेली हालचाल ओळखायला लागलो आहे असे वाटते. पण कधी तरी घोळ होतोच. शिकार झाल्यावर कळते, सुसर जागी झाली होती. सुसर जागी झाले की मासे पळुन जातात. पण तळ्यात राहुन जाणार कोठे? कधीतरी सुसरीच्या तावडीत सापडतातच. पण कधीतरी मोठा मासाच धरतो. तळ्यातलं जीवन असंच आहे. एकमेकांशिवाय रहाता येत नाही. पण एकमेकांना मारल्याशिवाय जीवन पुढे सरकत नाही.
कधीतरी तळं निवांत होतं. शेवाळ्याचा दाट हिरवा थर पसरतो. बहुरंगी शेवाळं जसं गालिच्यासारखं दिसतं. एकच हिरवा रंग. पण त्याच्या किती छटा दिसतात. बघत रहाव्या अशा. कधीतरी सूर्याच्या कवडशात त्या मोरपंखी गालिच्याकडे पाहिलं आणि तिची आठवण आली. असाच शालु पांघरुन आयुष्यातुन निघुन गेली. भलती आठवण येते आणि डोळे धुसर होउन जातात. आठवणींना हाकलुन दिले तर आयुष्यात काय राहिल असा विचार मनात येतो आणि परत त्या गाभा-यात दडवुन ठेवतो.
पावसाची झिमझिम चालु झाल्यावर गालिचा कुठे जातो कळत नाही. अलगद पडणारे थेंब कधी तडतड करत कोसळायला लागतात ते कळत नाही. मुकाट्याने वर्षाव सोसत असणारं तळं आता बेभान होउन नाचायला लागतं. नाचता नाचता मखमली गालिच्याच्या उरलेल्या खुणा पुसल्या जातात पण काही काही अवशेष शिल्लक रहातातच, नंतर कधीतरी परत डोकं वर काढण्यासाठी. काल अशीच ती रस्त्यात दिसली. ओळख न दाखवता गेली पुढे, पण वळुन पाहिलंच असेल. खरं तर वळुन का पहावं? पण पाहिलं असेल असं म्हणुन समाधान करुन घेतो. यातना जरा कमी होतात. पण अशी न पहाणारी ती काय एकटीच आहे का? त्यावेळी तर तसंच वाटत होतं. तुझ्याशिवाय जगुच शकणार नाही. असं कधी घडतं का? मला नाही वाटत.
पावसाळा संपला की पिठुर चांदणं पसरतं. तळं भलतंच निखरुन जातं. मंद सुटलेला वारा सलगी करत केस भुरु भुरु उडवतो. असेच उडणारे केस हाताने सावरत तिने छातीवर डोके घुसळलं होतं. स्वर्गसुख का काय म्हणतात ते हेच असा विचार करत मी तिला हळुवार थापटत होतो. आज त्याच आठवणी वैराण आयुष्याला सुखावह करण्यास मदत करत आहेत.
त्याच तळ्यात एक डोह आहे. मध्यभागी. खोल. कधीतरी त्या डोहातला तो काळाकभिन्न साप हळुच वर येतो आणि वाकुल्या दाखवतो. पहिल्यांदा फार भिती वाटली होती त्याला पाहुन. अनामिक चेतना नको तेव्हा जागृत करायचा. डोलायला लागला की सगळं जग दिसेनासं व्हायचं. हळु हळु सवय झाली. येतो मधुनच केव्हातरी आणि तळं पार ढवळुन काढतो. कधीतरी शांत होतो तेव्हा फक्त आक्रोश उरतो. पुढे पुढे सवय झाली. आजकाल मित्रासारखा झाला आहे. मला पाहुन गप्प बसतो. पण तरी भिती वाटते मला तळ्यात घेवुन जाईल आणि डोलायला लावेल. आता फक्त त्याच गोष्टीचं भय आहे.
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 5:40 pm | अर्धवट
नाना,
अरे तु काय लिहितोयस तुला खरंच कळतय का?.. इतकं वेचक, इतकं तरल, इतकं टोकदार..
तुझी रुपकं वेगळी असतील.. पण काळडोह प्रत्येकाचाच असतो नाही का... रुपकं प्रत्येकाला वेगळी सापडणार.. संदर्भ वेगळे.. पण तळ्यातले तरंग कुणाला चुकले आहेत..
खुप शब्दातीत लिहीतोस तू.
चौथ्या परीच्छेदात प्रतिमा थोड्या स्पष्ट झाल्या आहेत त्यामुळे मुळ लहेजा अॅबस्ट्रॅक्ट राहात नाहिये. मला तरी ते थोडं अॅबस्ट्रॅक्टच राहिलेलं आवडलं असतं..
10 Aug 2010 - 9:16 am | शिल्पा ब
सहमत.
9 Aug 2010 - 5:45 pm | गणपा
तह चालुच आहे ना रे अजुन नानबा ;)
(स्वगतः आपल्याला जे सांगायचय ते छानश्या रंगीत गुळगुळीत कागदात गुंडाळुन कस सांगायच ते शिक जरा त्याच्या कडुन.)
9 Aug 2010 - 5:58 pm | मीनल
तळ्याची मनाशी तुलना करतेय. 'ती' ची आठवण मोजक्या आणि आवश्यक तेवढ्याच शब्दात मांडली आहे.
खूपदा वाचतेय.नवनविन पदर उलगडत आहेत. एकातून दुसरा .... मग त्यातून तिसरा... पुढचा....
अजूनही वाचणार आहे. खूपदा वाचणार आहे.
मागे तूमचा असाच 'तळ्या'चा एक लेख आवडला होता.
जमल्यास लिंक द्या.
9 Aug 2010 - 6:00 pm | विजुभाऊ
जरी काळरात्र होती ती
तुझ्या कुशीत होती ती
येई ना वेळ कुणाहाती ती
थकल्या गात्री ....उत्तर रात्री
श्वास अधीरे... गहिवरे धरित्री.
9 Aug 2010 - 6:27 pm | अरुण मनोहर
मस्त भट्टी जमलीय.
9 Aug 2010 - 6:30 pm | भारी समर्थ
नव्यांदा पाणी मारूनही परत जिवंत न होणार्या करड्या शेवाळाची आठवण झाली.
उत्तम लेख!
भारी समर्थ
9 Aug 2010 - 7:02 pm | मितान
तरल !
रुपकं खूप छान ! वाचनाने काव्यवाचनाचा आनंद दिला :)
9 Aug 2010 - 7:03 pm | टुकुल
नाना... नुकतीच गटारी झाली, त्याचा तर परिणाम नाही ना हा? :-)
बाकी तुझ्या लेखनाबद्दल म्या पामरान काय लिहायच?
--टुकुल
9 Aug 2010 - 7:28 pm | निखिल देशपांडे
ह्म्म
हा नाना असेच काहीतरी लिहुन जातो.........
9 Aug 2010 - 9:04 pm | Dhananjay Borgaonkar
नानु,
शेवटचा परीच्छेद सोडला तर बाकी सगळ काही कळालं.
उत्तम लेख!!!
9 Aug 2010 - 10:31 pm | मीनल
या बद्दल मला जे समजले ते लिहिते.
तळ म्हणजे नायकाचे मन. त्यातील खोल कप्पा म्हणजे डोह. डोहात अडकले की बाहेर पडणे मुश्किल.
' ती ' च्या आठवणी / `ती `च्या विरहाचे दु:ख म्हणजे तो काळाकभिन्न साप .
त्या आठवणी मनाच्या खोल कप्प्यात गाडून टाकल्या आहेत. तरी ही कधी कधी त्या उमाळून वर येतात. गाडण्याच्या अयशस्वी प्रयत्नांना वर हसतात, चिडवतात ,वाकुल्या दाखवतात. आणि पूर्ण मन व्यापून टाकतात. तळं पार ढवळुनटाकतात.
पहिल्यांदा त्या आठवणींची भिती वाटली. पण त्या आठवणी इतक्यादा आल्या की त्याची सवय झाली. त्या आठवणींची संगत मित्राच्या संगती सारखी आवडू लागली. आता मनात केवळ तिचेच विचार उरू लागले आहेत. सगळ्या जगाचा विसर पडत चालला आहे. साप जसा ध्वनी नादावर मंत्रमुघ्द होऊन डोलतो, त्याला दंश करायचे भान राहत नाही( इथे लेखनात नाट्यमय वर्णन आहे. खरे नाही हे लक्षात घ्यावे) तसेच आता तिच्या आठवणींमधे नायक रममाण/ मश्गुल होऊ लागला आहे. आपले वास्तव, कर्तव्य विसरून तिच्या आठवणीत पार वेड लागेल अशी नायकाला भिती वाटते आहे.
अवलिया, एम आय राइट????????
9 Aug 2010 - 10:37 pm | बिपिन कार्यकर्ते
!
10 Aug 2010 - 8:41 am | स्पंदना
छान लिहिता हो तुम्ही.
मग इतके दिवस का नाही कधी अस काही तुम्ही लिहिलेल कुठे आढळल?
कि आता एकटे विचार करायला लागलात?
हे तुम्ही मुळचे आहात अवलियाजी, हे स्वत्व आता हरवु नका.
सुन्दर रुपक, सुन्दर शब्द, अन सुन्दर तुम्ही!
10 Aug 2010 - 10:27 am | गांधीवादी
>> येतो मधुनच केव्हातरी आणि तळं पार ढवळुन काढतो. कधीतरी शांत होतो तेव्हा फक्त आक्रोश उरतो.
एकदम खतरनाक.
10 Aug 2010 - 10:35 am | मितभाषी
अरे नान्या नान्या लेका एवढा प्रचंड ऐवज तुझ्याजवळ असताना काय भिकारचोट लोकांच्या नादी लागत बसलाय.
अशीच तळपु दे तुझी लेखणी.
भावश्या.
10 Aug 2010 - 12:56 pm | sneharani
लिखाण नेहमीप्रमाणे उत्कृष्टच!
कुठला परिच्छेद अन् कुठल वाक्य अधोरेखित कराव? इतक चांगल लिहल आहेस!
असाच लिहीत रहा!
:)
10 Aug 2010 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधीतरी तळं निवांत होतं. शेवाळ्याचा दाट हिरवा थर पसरतो. बहुरंगी शेवाळं जसं गालिच्यासारखं दिसतं. एकच हिरवा रंग. पण त्याच्या किती छटा दिसतात. बघत रहाव्या अशा. कधीतरी सूर्याच्या कवडशात त्या मोरपंखी गालिच्याकडे पाहिलं आणि तिची आठवण आली. असाच शालु पांघरुन आयुष्यातुन निघुन गेली. भलती आठवण येते आणि डोळे धुसर होउन जातात. आठवणींना हाकलुन दिले तर आयुष्यात काय राहिल असा विचार मनात येतो आणि परत त्या गाभा-यात दडवुन ठेवतो.
अहाहा.......... क्या बात है नाना. जबरी लिहिलं राव.
नाना कै आठवणी नै काढायच्या आन कै नै डोळे धुसर होऊ द्यायचे.
च्यायला प्रेम काय आपण एकट्याने केले होते का ?
आणि त्याची आपण का म्हणून शिक्षा भोगायची....नै का !
[पण हे प्रेमाबद्दलच चालू आहे का दुसरं काही आहे]
-दिलीप बिरुटे
[कधीतरी आठवणीत रमणारा]
11 Aug 2010 - 1:30 pm | अवलिया
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
@गणपा, बिरुटे - ह्या रुपकाचा आणि तहाचा काहीही संबंध नाही.
@मीनल - तुम्ही ब-याच जवळ पोहोचल्या आहात. अधिक विश्लेषण करुन रुपकाची चिरफाड न करता तसेच राहु द्यावे असा विचार सध्या प्रबळ असल्याने अधिक बोलत नाही. तुम्हाला हवा असलेला लेख इथे आहे.
@ सर्व मान्यवर प्रतिसादक - मनापासुन धन्यवाद.
11 Aug 2010 - 6:52 pm | मीनल
तोच तो लेख.
मस्त आहे तो ही.