साहित्य :
१ वाटी साधारण मध्यम आकारात चिरलेला कांदा / पात
१ वाटी तेल
१ वाटी तिखट (कोल्हापुरी मसाला वाले तिखट (कांदा लसुण मसाला तिखट) असेल तर उत्तम
१ वाटी डाळिचे पीठ
२ वाट्या गरम पाणी (कांदा चिरताना पाणी तापवायला ठेवावे..म्हणजे ऐन वेळी उकळते मिळेल)
कोथिंबीर १ वाटी
फोडणीचे साहित्य
मीठ : चवीपुरते (नाहीतर बाकी सगळं १ वाटी आहे म्हणुन.. हे पण वाटीभर नाही....एका काकुंनी मला फोन वर रेसिपी विचारली होती.त्यांना मी मोघमात सांगायला गेले..कि सगळ १ वाटी घ्या...त्यांनी हा प्रश्न विचारला होता म्हणुन सांगते आहे)
क्रूती :
तेल मस्त तापवा...त्यात मोहरी + जिरे तडतडवा.
थोडासा हिंग घाला...त्यानंतर कांदा घालुन थोडा वेळ परतत रहा..
कांदा थोडा गुलाबी झाला कि त्यामध्ये तिखट घाला.....खमंग वास सुटला कि गरम पाणी घाला.
पाण्याला मस्त उकळी आल्यावर चविपुरते मीठ घाला.
आणि उकळ्त्या पाण्याच्या उकळीवर ५ बोटानी पीठ भुरभुरायला सुरुवात करा..
मध्ये मधे पळीने किंवा उलथन्याने हलवा.
सगळे वाटी भर पीठ अशा रितीने संपले कि मग व्यवस्थित हलवुन झाकण ठेवा....१-२ दणदणित वाफा येउ द्या.
आचेवरून खाली उतरवा आणि मस्त १ वाटी कोथिंबीर घालुन हलवा..
हे रावण पिठले टम्म फुगलेली भाकरी / तव्यावरुन काढ्लेली चपाती + मस्त दाट सायीचे दही + आणि कांदा सोबत खा....... झणझणित्...खमंग्.....लागते
महत्वाची सुचना..: १) तिखटाचे प्रमाण जास्त आहे..स्वतःच्या रिस्क वर खाणे. सवयीचा भाग आहे..
२) आप्ल्या सोयी /तब्येती /चवीनुसार तिखटाचे प्रमाण हवे तितके कमी करु शकता.
३) पाणी सुद्धा आपल्याला पातळ आवडत असेल तर वाढ्वू शकता...पण असे घट्टसरच मस्त लागते.
३) शक्यतो वीकेंड ला करा. म्हणजे दुसरा दिवस हातात अस्तो.
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 5:52 pm | अवलिया
च्यायला त्या रावणाने काय घोडं मारलं होत काय कळत नाही... की रावणाचे आधी नाव घ्यावेच लागते ?
रावण डोसा... रावण इडली.. रावण वडे... रावण फदफदं... छ्या ! काय समजत नाही ब्वा !!
2 Aug 2010 - 5:57 pm | मदनबाण
रावणि भात राहिला की ? ;)
बाकी हे पिठल कधी खाल्ल नाही अजुन...कोल्हापुरी मसाला असल्याने नकीच्च झणझणीत असणार... :)
(कोल्हापुरी भंडग भेळेचा प्रेमी)
2 Aug 2010 - 6:03 pm | चित्रा
एक वाटी पिठाला एक वाटी तिखट आहे, तेव्हा झणझणीतपणा बघायलाच नको.
रावण पिठले मागे "रुचिरा" मध्ये वाचले होते, तेव्हापासून उत्सुकता होती, पण करण्याचे धाडस झाले नाही :)
2 Aug 2010 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो.
आणि फोटु कुठे ? (पाककृतीचा)
बाकी जाईबै आज काय चाललय काय ? एकच प्रतिसाद दोन-दोन वेळ, एकच धागा दोन्-दोन वेळा ;) मला वाटले रावणाचा धागा आहे म्हणुन आता १० वेळा टाकताय का काय.
महिरावण
2 Aug 2010 - 6:42 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
...... कालच केले होते पिठले...मुद्दाम जास्त्....कारण ते आज जास्त मॅचुअर होते.....आज सकाळी पण ताव मारला....
त्याच्या हँगओव्हर मधुन बाहेर नाही आले.. हिहाअहिआअ...(हे राक्षसी हास्य होते....रावण पिठले खाल्यावर अजुन कसले हास्य येणार म्हणा)
.... नेहमीची...मला नेहमी गोत्यात आणणारी घाई! कुठं सह्या कराय्ला जायचं असतं देव जाणे मला...
तर त्या घाई मुळे दोन दोन दा क्लिक केले जाते...
....पेशन्स नावाचा शब्द्...जन्मतः database मधुन उडवला गेला आहे..
अति घाई,संकटात जाई.. हे मी टॅटू करुन घ्याय्च्या विचारात आहे....
तुला काय वाटतं?
2 Aug 2010 - 9:05 pm | चतुरंग
करुन घ्या! ;)
(घाईत)चतुरंग
2 Aug 2010 - 6:09 pm | छोटा डॉन
आख्ख्या पाककृतीत अजिबात मिर्ची नाही आणि मग तिखट कसले हो ?
छ्या, मिर्चीशिवाय काय पिठले चांगले लागते होय ?
आता शेवटचा उपाय म्हणुन आम्हलाच ५-६ कच्च्या मिर्च्या तोंडी लावायला घ्याव्या लागतील :)
2 Aug 2010 - 6:33 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
.....तुमची इच्छा असेल तर .....ताकद असेल तर ५-६ काय १०-१२ ओल्या मिरच्या घ्या तोंडी लावायला..
पण कोल्हापुरी कांदा लसूण तिखटाचा रंग आणि चव्...अफलातून लागते...
...लाल चरचरीत जरा खाउन तर बघा...
2 Aug 2010 - 6:58 pm | छोटा डॉन
>>.....तुमची इच्छा असेल तर .....ताकद असेल तर ५-६ काय १०-१२ ओल्या मिरच्या घ्या तोंडी लावायला..
त्यात काय नवे आमच्यासाठी ?
ते तर आम्ही नेहमीच करतो, अगदी शब्दशः १०-१२ नसल्यातरी ३-४ ओल्या मिरच्या तरी खातोच खातो ...
>>पण कोल्हापुरी कांदा लसूण तिखटाचा रंग आणि चव्...अफलातून लागते...
होय, असु शकेल , अजुन तसा कधी चान्स नाही मिळाला चाखायचा.
>>...लाल चरचरीत जरा खाउन तर बघा...
नक्की, जसा चान्स मिळेल तसे नक्की खाऊन बघु ...
सध्या आम्ही आमच्या 'चेट्टीनाड पद्धतीच्या तिखट मसाल्यात' खुष आहोत ;)
2 Aug 2010 - 6:33 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
.....तुमची इच्छा असेल तर .....ताकद असेल तर ५-६ काय १०-१२ ओल्या मिरच्या घ्या तोंडी लावायला..
पण कोल्हापुरी कांदा लसूण तिखटाचा रंग आणि चव्...अफलातून लागते...
...लाल चरचरीत जरा खाउन तर बघा...
2 Aug 2010 - 6:40 pm | प्रभो
फोटू नसल्याने पाकृ गच्चीवर वाळत टाकली आहे.
2 Aug 2010 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार
सांभाळुन.. गच्चीला हँगओव्हर यायचा.
2 Aug 2010 - 6:55 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
फोटु इसरला...... आता फोटु पुढल्या इकेंड ला छापते.....
कारण फोटुसाठी आज परत रा.पि. केलं तर मला घराबाहेर काढतील...
....मला गच्ची वर वाळत पडाव लागेल ओ...
पुढच्या वीकेंड ला नक्की फोटो..
पिठ्ल्या शप्पथ...
2 Aug 2010 - 8:03 pm | रेवती
मस्त झणझणीत पाकृ दिसते आहे.
मला इतकं तिखट झेपणार नाही.
पण माझ्याकडच्या पुस्तकात ही पाकृ आहे.
बरेच दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने कोल्हापुरी मसाला दिलाय.
तो मी उसळींना चिमटी/ दोन चिमटी घालते.
2 Aug 2010 - 9:08 pm | चतुरंग
पण एक वाटी पिठाला एक वाटी तिखट?? नक्की??
(मूळव्याधीची रेसिपी व्हायची! ;) )
(व्याध)चतुरंग
2 Aug 2010 - 9:13 pm | प्रियाली
एक वाटी पिठाला एक वाटी तिखट.....
अगदी! हेच आलं डोक्यात. ;)
4 Aug 2010 - 5:04 pm | मेधा खेंगरे
अगदी RIGHT
2 Aug 2010 - 10:50 pm | चित्रा
अगदी बरोबर.. :)
लोणच्यासारखे (थोडेच) खातात काय हे पिठले?
2 Aug 2010 - 9:15 pm | विनायक प्रभू
ऐसी मारो ना पिचकारी व्हायचे की वो.
2 Aug 2010 - 9:33 pm | आशिष सुर्वे
डोके झणझणले!!
व्वा!! नावाला जागलात हो जाई मॅडम!! (अस्सल कोल्हापुरी)
काय हो, कांद्याशिवाय केले तर्र चवीत काय फरक पडेल?
2 Aug 2010 - 9:45 pm | शुचि
जाई अगं इतक्या तिखटानी क्षतं पडतील ना आतड्याला :( :( :(
3 Aug 2010 - 2:49 am | गमत्या
खाणारे हि रावण लागतात का?
म्हणजे भारतातील मनुष्य प्राण्यांनी खायचे धाडस करणे योग्य होईल का?
प्रतिक्रियेंच्या ऊदंड प्रतिसादा वरुन तरी हि पाककॄती अभिषेक आणि अॅश च्या फ्लॉप रावण च्या रांगेतली दिसत नाही........
3 Aug 2010 - 10:25 am | जाई अस्सल कोल्हापुरी
.ज्यांना रावण (अभिषेक्-ऐश) पचला,त्यांची पचनशक्ती असामान्य आहे असे म्हणायला हरकत नाही.
त्यांना तर नक्कीच पचेल्....पैजेवर सांगते.
बाकी चव उत्तम लागते.ही काय रोज खाण्याची गोष्ट नक्कीच नाही.पण कधीतरी जिभेला झटका देउन पहायला काय हरकत आहे? वाटलं तर कमी वापरुन पहा तिखट.ते झेपलं तर पुढ्ल्या वेळी वाढवून पहा.
3 Aug 2010 - 3:13 am | अश्विनीका
रावण पिठले मस्तच.
मी मध्यंतरी घटोत्कच धिरडे ( कि थालपिठे ) हा प्रकार ऐकला होता.
त्याची रेसिपी माहिती आहे का कोणाला?
एक मैत्रीण नेहमी करायची पण ती सध्या संपर्कात नाहिये. पण तिच्या तोंडून ऐकले होते की खूप चविष्ठ लागते हे धिरडे (थालपिठ).
3 Aug 2010 - 3:16 am | Nile
आपल्याला फक्त कुंभकर्ण झोप माहीत आहे ब्वॉ! बाकी इतकं तिखट खाल्लं तर कायमचाच झोपायचो!
3 Aug 2010 - 3:18 am | रेवती
घटोत्कच थालीपिठे अश्या प्रकारे करतात.
उरलेला भात, वरण, भाजी, आमटी एकत्र करा.
त्यात मावेल एवढे ज्वारीचे पीठ, चव अॅडज्स्ट करण्यापुरते मीठ, तिखट.
नेहमीप्रमाणे तव्यावर ठालिथीठ लावावे.
मी एकदाच केली होती.
बरी झाली होती. त्यात सगळे प्रकार आहेत या कल्पनेनेच वेगळे वाटत होते.
3 Aug 2010 - 10:34 am | जाई अस्सल कोल्हापुरी
मी याला ढकलथालिपीठ म्हणते.
अशी ढ्कल भाजी पण मस्त होते.एखादा कांदा,अर्धा टोमॅटो,ज्या काही भाज्या एक-दोन शिल्लक असतील त्या आणि सगळे मसाले थोडे-थोडे ढकलून जी मस्त भाजी होते ना ती ढकलभाजी.
मी तर मुद्दाम रोजची भाजी करताना एक (१ढबू मिरची,एखादं वांगं,एखादं गाजर, अर्धी वाटी मटार असं रोजच्या भाजीतलं) नग सेव्ह करते. एक झीपलॉक ठेवलीच आहे त्यासाठी.
ऐन वेळी मस्त मस्सालेदार ढकलभाजी तयार होते.
4 Aug 2010 - 7:07 am | अश्विनीका
धन्यवाद रेवती.
3 Aug 2010 - 10:35 am | ऋषिकेश
ब्बाबौ!!!!
१ वाटी तिखट!!!!तुम्ही ग्रेटच आहात! तुम्हाला नमस्कार :)
रावण पिठलं खाणार्यांना शुभेच्छा! (फायब्रिगेडचा नंबर१०१ आहे) :)
3 Aug 2010 - 12:08 pm | विनायक प्रभू
एकास एक?
रावण पॉट पण घ्यायला लागेल.
3 Aug 2010 - 12:13 pm | सहज
तिखट आपापल्या सोयीनुसार पण मी जेव्हा खाल्ले होते तेव्हा त्यात भाजलेले व बारीक खिसलेले खोबरे देखील होते असे वाटते.
फार मस्त होते लालबुंद पिठले.
9 Aug 2010 - 12:27 am | प्रभाकर पेठकर
माझ्या माहिती प्रमाणेही त्यात एक वाटी किसलेले सुके खोबरे घालतात.
रावण पिठले छानच लागते. प्रश्नच नाही. प्रत्येक तिखटाचा रंग आणि तिखट स्वभाव वेगवेगळ्या दर्जाचा असतो. सरसकट एक वाटी तिखट घेण्यापेक्षा १/२ वाटी ते १ वाटी ह्यातील आपल्याकडील तिखटाप्रमाणे प्रमाण ठरवावे.
रेशिमपत्ती तिखट १/२ वाटी पुरते, काश्मिरी + बेडगी मिरचीचे तिखट समप्रमाणात घेतल्यास १ वाटी लागते. त्याने रंग आणि चव दोन्हीचा समन्वय साधला जातो.
गुंटूर मिरची वापरल्यास अर्ध्या वाटी पेक्षाही कमी तिखट चालू शकेल.
तिखटाने तोंडाची आग झाल्यास पाणी, साखर ह्याचा वापर करण्या ऐवजी साय (क्रिम) किंवा दही, किंवा ताक किंवा आइस्क्रिम खावे.
लाल तिखटाने तोंडाची आग होते पण लगेच शमतेही. पोटाला विशेष हानी कारक नाही. पण हिरव्या मिरच्या तोंडाची आग करतात त्या पेक्षा पोटाला (जठराला) घातक असतात. अॅसिडीटी/अल्सरचा त्रास असणार्यांनी हिरव्या मिरच्या (कुठल्याही फॉर्म मध्ये) वापरू नये.
तसेच गरम मसाल्यातील काळी मिरी, लवंग हे पदार्थ तिखट पणा वाढवतात पण तेही प्रमाणाबाहेर खाल्यास जठरास घातक आहेत. हे तोंडास विशेष तिखट लागत नाहीत पण जठरास (अॅसिडीटी/अल्सर) आणि मुळव्याध असणार्यांना पश्चात तापास कारणीभूत होतात.
3 Aug 2010 - 3:35 pm | खादाड
मस्त लागतं पण थंडीच्या दिवसात एरवी घाम घाम होउन परिस्थिती बिकट होते !!
3 Aug 2010 - 6:05 pm | स्वछंदी-पाखरु
जाई बाई परवा तुमच्या कडे खाल्लेल्या रावण पिठल्याने जाम आग लागली आहे.... ती आज पण धुसमुसत आहे.....
धन्यवाद.....
3 Aug 2010 - 7:10 pm | धमाल मुलगा
किती वर्षांनी रावणपिठल्याची आठवण करुन दिली जाईताई :)
घर सोडुन पुण्यात आलो आणि त्यानंतर नोकरीसाठी इकडं तिकडं भटकत राहिलो त्या गडबडीत रावणपिठलं विसरुनच गेलो होतो राव.
च्यायला, काय दण्णका चीज लागते ही..सोबत मस्त ज्वारीची भाकरी, बुक्कीनं फोडलेला कांदा आणि मातीच्या मडक्यात लावलेलं दही... खल्ल्लास्स! हे असं पान वाढलं की बाकी दुनिया गेली तिच्यायला खड्ड्यात..
धन्यवाद जाई,
आता आज उद्या करतोच रावणपिठलं. :)
*पुर्वी जेजुरीच्या कडेपठारावर रावणपिठलं-भाकरी मिळायचे. हल्ली असते की नाही ठाऊक नाही. त्यांची पध्दत निराळी असावी जरा...चवीला थोडंसं वेगळंच लागतं. कसं ते सांगता नाही येत पण वेगळं लागतं हे नक्की.
10 Aug 2010 - 5:32 pm | दिनेश गोडे
शक्यतो वीकेंड ला करा. म्हणजे दुसरा दिवस हातात अस्तो.
पर्फेक्ट.
13 Aug 2010 - 5:32 pm | सूड
एक वाटी डाळीच्या पीठाला एक वाटी तिखट....म्हणजे खाल्ल्यानंतर वारी करावी लागणार दिवसभर !! खरंच विकांताचीच पाकृ आहे ही... :)