आज माझ्या देशात देवा - सारं काही ठीक आहे ...
काही गरीब, कंगाल काही - काही मात्र श्रीमंत आहेत |
जगण्याच्या लढाई मधे , जनता सारी व्यस्त आहे
महागाई, भ्रष्टाचाराने , थोडी फार त्रस्त आहे |
रस्त्यांवर चारचाकी, रोज रोज वाढत आहेत
त्या खाली चिरडून सुद्धा , रोज काही मरत आहेत |
पावसाच्या काही सरी, नेतात रस्ते पाण्याखाली
नागरिकांचे सेवक मात्र, मागतात थोडी चिरीमिरी |
बॉम्बस्फोट आणि गँगवॉर - सारं काही सुरळीत आहे
चौका चौकात सिग्नलला - भिकारी देखील खूप आहेत |
अणू स्फोट करुन काही - भारत शक्तीशाली होतो
समुद्रातून येउन मृत्यु, रस्त्यांवर थैमान घालतो |
लोकांनाही त्याचे भय, आता फारसे वाटत नाही
मोठ्या मोठ्या शहरांसाठी, अशा घटना विशेष नाहीत |
धर्मांधतेची जीत सदा - सहिष्णुता पराजीत आहे
थोडे फार भांडण, तंटे ....
पण बाकी सगळं ठीक आहे |
आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...
कुठे पूर , कुठे दुष्काळ - शेतकर्याच्या गळा फास
भेगाळलेल्या जमिनी मधे - माय-लेकराची अश्रुधार |
धान्य कुठे सडते अन् - तळमळते कुठे उपाशी पोर
मिजासी मधे धनदांडगे अन् सामान्याच्या जीवा घोर |
चोरांचीच इथे शिरजोरी - सामान्याला मात्र काठी
बळी तोच कान पिळी - मग कायदे कानून कोणासाठी? |
औषध नाही, डॉक्टर नाहीत - साथीचे सारे रोग आहेत
संशोधन अन् प्रयोंगांसाठी - गिनीपिग्ज् इथे खूप आहेत |
रस्ते नाहीत, शाळा नाहीत - वीज आणि पाणि नाही
कोणाला तू साकडे घालतोस? - नशीब तुझे सरळ नाही |
उन, थंडी, वारा, पाऊस - लेकरा, नको रे जेवण मागूस |
लाल दिव्याच्या गाडीला - उगीच नको बोल लावूस |
विठ्ठलाच्या भेटी साठी - वारकरी आसूसलेला
चंद्रभागेचा पान्हा - पण एकदशीला आटलेला |
शिर्डीच्या फकीराला बघ , रेशमाची शाल आहे
सामान्याला वस्त्र नाही ...
पण बाकी सगळं ठीक आहे |
दारिद्र्याने गांजलेल्या , लोकांचा थोडा क्षोभ आहे
सुख थोडे , दु:ख फार ....
पण बाकी सगळं ठीक आहे |
आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 8:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वास्तव टीपणारी कविता.....!
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
26 Jul 2010 - 8:50 pm | यशोधरा
:(
26 Jul 2010 - 9:49 pm | स्वाती फडणीस
खूप आवडली..!
26 Jul 2010 - 10:36 pm | छोटा डॉन
कविता आवडली.
एकदम वास्तवदर्शी आणि रोखठोक वाटली.
असेच अजुन येऊद्यात :)
26 Jul 2010 - 11:18 pm | मराठमोळा
कविता आणी त्यात मांडलेली व्यथा म्हणजे आपणा सर्वांसाठी आरसाच आहे.
थोडक्यात बरंच काही सांगणारी कविता.
26 Jul 2010 - 11:56 pm | श्रावण मोडक
वास्तवच. त्यामुळं कडवट.
27 Jul 2010 - 1:59 am | मीनल
कविता खूपच वाईट परिस्थितीची आठवून देते आहे.
तरीही
आज माझ्या देशात देवा
सारं काही ठीक आहे ...
हे आपण म्हणतो, शोधतो
आणि माझा भारत महान आहे म्हणतो.
27 Jul 2010 - 8:02 am | स्पंदना
हम्म्म!
27 Jul 2010 - 10:47 pm | असुर
मस्त! आवडली कविता...
एक जुनं गाणं आहे.. पहा एकदा! साधारण याच लाईन वरून जातंय...
--असुर
28 Jul 2010 - 8:38 am | मनीषा
वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !