डावा स्टँड....मॅच सुरु आहे ..तेवढ्यात "ए ***" अशी शिव्यांची लाखोली ऐकु आली की समजायचे .. पी टी एम ची मॅच सुरु आहे ..आणि रणवीर ने किंवा कार्लोस ने एखादा साधा पास सोडलेला आहे ...शिव्या देणारा पण अगदी स्टँड कडेला येऊन शिव्या देणार.. आणि तो ६ वर्षाचा पोरगा असो वा ८५ वर्षाचा म्हातारा ..त्याला तो खेळाडु सॉरी म्हणुन मगच पुढे जाणार .......
वरचा स्टँड ,मध्यभाग... हा भाग फुल्ल असला की समजायचे आजची मॅच दिलबहारची ..जीव तोडुन खेळावे तर त्यांच्यासारखे .. न खेळुन सांगतो कोणाला .. तालमीत रहायचे आहे ना .. मग कधी त्यासाठी तिथेच कोंबड्याचा नवैद्य दाखवावा लागला तरी बेहत्तर,पण मॅच जिंकलीच पाहिजे ...
व्ही . आय पी . स्टँड मधुन 'कमॉन रीची सर' अशी आरोळी आली की समजायचे ,जयभवानीची मॅच सुरु आहे आणि रीची फर्नांडिस एकटाच बॉल घेऊन गोल पोस्ट कडे येत आहे .. अशा वेळी गोलीने फक्त बघत बसायचे असते.. कारण गोल होणार हे फिक्स असते .. आणि अर्थातच स्टँड मधुन आवाज देणारी व्यक्ती ही राजघराण्यातली असते .. कारण जयभवानी हा त्यांचा संघ ..
कैलास पाटील ..पांढर्या काळ्या जर्सीला लोक घाबरायचे ते याच्या मुळे .. साल्याकडे बॉल गेला की विषय संपला ..हा असा काही पळतो की बाकीचे डीफेंडर पोहोचेपर्यंत हा गोलपोस्ट पशी गेलेला असतो ..आणि सामना वन टु वन असा असतो ..प्रॅक्टीस क्लबचा चेला कैलास ..कैलास म्हणजे क्लब आणि क्लब म्हणजे कैलास ...
शिवाजी तरुण मंडळ अर्थात फक्त "मंडळ" .अख्या शिवाजी पेठेचा प्रतिनिधी .. तुम्ही काहीही करा .. यांच्या टीम मध्ये एक पण परदेशी खेळाडु दिसणार नाही .. बाकीचे संघ कितीही खेळाडु आणु दे .यांच्या टीम मध्ये सगळे पेठेतलेच .त्यामुळे अर्थातच मुर्तिमंत जिद्द .. टीम मधले टॉपचे हिरे पुण्याला गेल्यावर यांचे होणार कसे असे प्रत्येकाला वाटत होते .पण नाही ,ते लढतात ,आजही ..तिरंगा अंगावर घेऊन ...आणि तेव्हा अखिल अबाल वृद्धांच्या तोंडातुन घुमत असतो एकच आवाज ....मंडळ ,मंडळ ..
जरा कुठे बाहेर फिरायला गेलो आणि प्रचंड मोठ्या आवाजात डॉल्बी ऐकु आला की समजायचे आजची मॅच खंडोबाची ..प्युअर प्रोफेशनल्स .. गेम कसा असतो हे शिकावे तर यांच्याकडुनच ..कागदावरच यानी निम्मी लढाई जिंकलेली असती ....
कितीही स्पर्धा होऊ देत .. बेस्ट गोलकीपर हा किताब राखीव .. कारण विन्यादा( विनायक चव्हाण ) ला तो मिळणार हे २०० % फिक्स .. कारण तो समोर दिसला की फॉर्वर्ड निम्मा घाबरलाच म्हणुन समजायचं .. हल्ली पी टी एम बी ला साथ मिळावी म्हणुन अशा दुय्यम संघातुन खेळतो . पण गोली असावा तर असा .
हेच इथले कान ,मेस्सी ,रोनाल्डो , क्लोज .. आणि या टीम ह्याच इथल्या ब्राझील , जर्मनी ,अर्जेंटिना आणि स्पेन .. सगळे जशाच तसे ..
मॅच सुरु झाल्यावर अवघ्या दहाव्या मिनिटाला माईक वरुन आवाज येतो - *** या टीम कडुन पहिला गोल मारणार्याला XYZ यांच्या कडुन १००० रु चे बक्षीस .. तेवढ्यात दुसरा कोणी उठतो ...प्रतिस्पर्धी टीम कडुन गोल मारणार्याला ५००० रु... जागेवरुन शिव्या देणारा , पण खिशात असतील ,नसतील तेवढ्या रुपयाचे बक्षीस लावणारा इथला प्रेक्षक ......
फक्त ७० रु मिळत असताना अर्धी रजा टाकुन बरोब्बर ३ -३० ला हजर असणारा .. एखादा जरी डीसीजन चुकला तरी काही खरे नाही हे माहित असणारा आणि म्हणुन तर नेहमी गॅस वर असणारा आणि तरीही मोठ्या पगाराची नोकरी असुनही मैदानावर उतरणारा इथला रेफरी ..
३०, ००० लोक बसु शकतील ,आणि प्रत्येकाला मॅच नीट दिसेल आणि त्यांच्या शिव्यासुद्धा नीट पोहोचतील ,आणि मॅच सुरु असताना लावलेले फटाके तर उडतील पण त्यांचा त्रास खेळाडु व प्रेक्षकाना होणार नाही असे इथले स्टेडियम..
आणि ज्याला प्रत्यक्ष ई एस पी एन आणि स्टार स्पोर्टस स्पॉन्सर करते अशा इथल्या स्पर्धा .. अर्थात महासंग्राम .. द बिगेस्ट टुर्नामेंट इन महाराष्ट्र ...
अवघ्या फेसबुक ला वेड लावणार्या इथल्या जाहिराती ...
भल्या भल्या चीअर लीडर्स ना गारद करतील असे इथले चीअर लीडर्स ..
खुनस्स .हणामारी पर्यंत जाणारी .. दिलबहार - पी टी एम , दिलबहार - खंडोबा , मंडळ - दिलबहार ... पोरगा घरी धडधाकट पणे परत येतो ना याचीच घरातल्याना भिती ..
नसानसात असते ती फ्क्त जीद्द ,ईर्षा , जोष .. इथे एखादा नगरसेवक सुद्धा सहज पायात स्टड घालुन मॅच ला उतरतो .. आणि इथला प्रेक्षक त्यालाही शिव्या घालायला कमी करत नाही ..
बर्याचदा तर खेळाडुतसुद्धा हमरातुमरी होते ,भांडण तर नेहमीचेच .. कारण हा खेळ हा त्यांचा जीव की प्राण .. इ
ईथे एखादा ६ वर्षाचा पोरगा सहजपणे एखाद्या टीम बरोबर प्रॅक्टीस करत असतो .स्टड जड असले तरी घालत असतो आणि वयाच्या अवघ्या १३ -१४ व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी बालेवाडीला पोहोचलेला असतो......
जीवनाचे सगळी अंगे इथे दिसतात .. प्तेम ,जिद्द ,निष्टा ,कष्ट , दु:ख ,राग , मत्सर , जिगर .,सारे सारे , खरा खुरा माणुस दिसतो तो इथे ..मॅच हरली म्हणुन न जेवणारा आणि आपली टीम जिंकली म्हणुन फटफटीवर झेंडा घेऊन फिरणारा आणि मित्राना ओली पार्टी देणारा माणुस ..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथला जल्लोष .. उघड्या जीप मधुन निघणारी मिरवणुक ..आणि १२ -१२ तास डॉल्बीच्या तालावर आणि खास बनवलेल्या थीम साँगवर नाचणारे कार्यकर्ते ...
१२६ संघ ,५००० च्या वर खेळाडु आणि असंख्य पाठीराखे ..सगळेच वेगळे ..
कॉमन असतो तो खेळ , अख्ख्या जगाचा खेळ .. हा आहे फुट्बॉल ,कोल्हापुरचा फुटबॉल ..................
( एवढे एक चित्र बास आहे ,नाही का ?)
गोल................................
आपलाच ,
कोल्हापुरकर फुट्बॉलप्रेमी
विनायक पाचलग
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 6:17 pm | संजा
खल्लास !!!!! अतिसुंदर
मिपा वरच्या फुटबॉल विश्वचषक २०१० च्या विभागातील सर्वोत्क्रूष्ट लेख
जियो विनायक जियो.
संजा
8 Jul 2010 - 6:28 pm | छोटा डॉन
+१, असेच म्हणतो.
लेख क्लास आहे, असेच येऊद्यात अजुन.
मजा अली वाचायला ...
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 6:31 pm | विनायक पाचलग
या लेखासाठी खास तुमचे आभार ..
तुम्ही जस्ट लेख लिही म्हणुन खरडले काय ,आणि मी पण हो म्हणुन बसलो काय ..
शेवटी १५ दिवसानी हातातला प्रोजेक्ट संपल्यावर हे लिहिले गेले ..
मनापासुन आभार डॉन दादा
आणि टीम मिसळपाव फिफा २०१० विभाग
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
8 Jul 2010 - 6:26 pm | गणपा
हा हा हा जबरा आहे..
आता आम्ही कोल्हापुचा झेंडा नाचवणार.
(है क्या कोई माई का लाल बक्षीस देणारा ;) )
8 Jul 2010 - 6:26 pm | श्रावण मोडक
१९८७ ते १९९० या काळातील कोल्हापूरचे दिवस आठवले. पीटीएम असा शब्द पहिल्यांदा बातमीत वाचला तेव्हा चक्रावून गेलो होतो. मग खुलासा झाला की हा संघ याच नावाने तेथे ओळखला जातो. मग तिथलं फुटबॉलप्रेम*, कुस्तीप्रेम या गोष्टी समजत गेल्या.
हे असे लेखन करत जा नियमितपणे.
*आमचे एक बातमीदार मित्र फुटबॉलचे शौकीन. मिरजेत कुठल्या तरी सामन्याला ते गेले होते. जाताना त्यांनी हापिसात मात्र आजारपणाची रजा टाकली होती. सामन्यात त्यांचा संघ जिंकला. मग जल्लोष सुरू झाला. नाचणाऱ्यांच्या टोळक्यात हे सर्वांत पुढे. दुसऱ्या दिवशी महाराज ऑफिसला आले. संपादकांनी बोलावून घेतलं. "काल काय झालं होतं?" संपादकांचा प्रश्न. "ताप होता" किंवा असंच काही यांचं उत्तर. संपादकांनी शांतपणे आदल्या दिवशी रात्री मिरजेहून आलेला फोटो त्यांच्या समोर टाकला. नाचणाऱ्यांच्या टोळक्यात हे अग्रभागी दिसत होते. मान खाली घालून बसले. अर्थात, फुटबॉलचा शौक संपादकांनाही माहिती असल्याने रजा बिनपगारी होण्यापलीकडं काही झालं नाही. पण तो किस्सा आठवला की संपादकही किती तयार असतात आणि बातमीदारांना पकडू शकतात हे आजही लक्षात येतं आणि हसू उमटतंच.
8 Jul 2010 - 6:33 pm | सहज
गोलमाल सिनेमा आठवला हो श्रामो. रामप्रसाद व लक्ष्मणप्रसाद दशरथप्रसाद शर्मा!
लेख आवडला. अजुन येउ दे!
9 Jul 2010 - 4:42 pm | श्रावण मोडक
कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांना पूर्वी जुळे भाऊ म्हटलं जायचं. त्यात फुटबॉलचं प्रेम हे एक कारण असावं का, असा प्रश्न काल डोक्यात आला. बेळगावात पूर्वी, म्हणजे १९८५ पर्यंत, फुटबॉलची एक स्पर्धा टिळकवाडीतील लेले ग्राऊंडवर असायची. माझ्या आठवणीप्रमाणे ऑगस्ट, सप्टेबर या काळात दरवर्षी ती व्हायची. माहोब्ल्यू, झायनाक (नंतर युनायटेड गोवन्स), एअरफोर्स, कॉसमॅक्स, सीवायएम अशी काही संघांची नावं आजही आठवतात. त्यातली एअऱफोर्स आणि युनायटेड गोवन्स हे आघाडीचे संघ. युगोचा पाकू (पास्कल) हा गोलकीपर आठवतो. सीवायएम ही सर्वाधिक तरुणांची टीम असायची. बेळगाववरचा हा बहुदा गोव्याचाही परिणाम असावा. ही स्पर्धा पाहण्यासाठी लेले ग्राऊंडच्या चारी बाजू भरून जायच्या. स्पर्धेत रोज एक मॅच असायची. त्यामुळं साधारण तीन आठवडे वगैरे स्पर्धा होत असावी. रोजचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या शाळकरी मुलांना रोखायचे कसे हा पालकांपुढचे प्रश्न असायचा हेही आठवतं. ही स्पर्धा नंतर बंद पडली. बहुदा बेळगावचं मराठीपण हरपत गेलं तसं हीही परंपरा हरपत गेली असावी. तिथं आता हॉकीही तशी फारशी खेळली जात नाही म्हणतात. एरवी आरपीडीचं ग्राऊंड हॉकीसाठीच अधिक क्रिकेटपेक्षा. क्रिकेट गोगटेच्या ग्राऊंडवर. बंडू पाटीलही तिथं यायचे क्वचित आम्हा पोरांना शिकवण्यासाठी. त्या माणसाचं ते विलक्षण कौशल्य तिथंच पाहिलं - पायानं चेंडू पळवण्याचं पण अंपायरला न कळता आणि म्हणून फाऊल न होता.
उगा जुन्या आठवणी निघाल्या या...
9 Jul 2010 - 5:25 pm | विनायक पाचलग
मस्तच माहिती ...................................
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
8 Jul 2010 - 6:30 pm | प्रभो
मस्त रे विनायका.....
श्रामोंचा प्रतिसादही भारी...
8 Jul 2010 - 6:40 pm | विसुनाना
मस्त लेख.
आवडला.
*पीटीएम = पाटाकडील तालीम मंडळ
9 Jul 2010 - 12:19 pm | जे.पी.मॉर्गन
लई म्हंजे लईच भारी.... येऊद्या अजून!
जे पी
9 Jul 2010 - 12:28 pm | मी_ओंकार
लय भारी...
आजोबा खेळायचे फुटबॉल. कुठल्या टीमकडून ते नाही माहित. म्हणजे किमान ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांचे फोटो आणि शीन गार्ड एकदा एका ट्रंकेत मिळाले होते. आजोबा नव्हते तेंव्हा त्यामुळे त्यांचा फुटबॉल हे गुपितच राहिलं.
- ओंकार.
9 Jul 2010 - 12:34 pm | विनायक पाचलग
ओंकार व मॉर्गन यांचे मनापासुन आभार ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
9 Jul 2010 - 12:50 pm | रंगोजी
हाण तिच्या आयला...
-(पाटाकडील) रंगोजी
टीपः रणविर मेथे हा आमचा मेस्सी आहे.
9 Jul 2010 - 12:57 pm | कवटी
सुंदरच रे विनायका...
आजुन वाचतोय... पण राहवल नाही म्हणून मधेच प्रतिक्रीया देतोय... सगळे वाचून सवडीने प्रतिक्रीया देतोच.
अवांतर : आज हे विन्या शिवाजी पेठेत मार खातय वाटत....
त्यामुळे अर्थातच मुर्तिमंद जिद्द ..
कवटी
9 Jul 2010 - 1:13 pm | वेताळ
कोल्हापुरच फुटबोल प्रेम अगदी वादातीत आहे. वेताळ हे नाव देखिल कोल्हापुरातील एका तालमीचे आहे. त्याचे थिम सॉग वे$$ताळ वे$$ताळ हे तर सगळ्या डॉल्बी सिस्टम मध्ये फेमस आहे.
सगळ्यात आणखी एक विन्या राहिले म्हणजे आपल्या कोल्हापुर पोलीसाची फूटबॉल टीम... :D
त्याची शिव्या ,मारामारी व खुन्नस तर बघण्यासारखी असते.लेख एकदम मस्त लिहला आहेस्.वाचुन सगळे आठवत होते.
वेताळ
9 Jul 2010 - 1:21 pm | विनायक पाचलग
पोलिसांच्या टीम बद्दल राहिलेच ..
पण त्यांच्यात कोण कॉन्स्टंट नाही रे ..
बाकी काल के एस ए वर गेलो असताना पण माहिती काढायचा प्रयत्न केला ..पण मिळाली नाही ..
असो
वेताळ यांच्या प्रतिसादानिम्मित्त खास .........
वेताळ ...वेताळ ...
आणि हे ...
बोलो बोलो खंडोबा ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
9 Jul 2010 - 2:05 pm | ऋषिकेश
वा फारच सुरेख लेख! मजा आली वाचुन
फिफा विभाग एकदमच भारी झालाय
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
9 Jul 2010 - 2:42 pm | स्मिता चावरे
वे$$ताळ वे$$ताळ गाणे तर लैच भारी.....
9 Jul 2010 - 2:42 pm | स्मिता चावरे
वे$$ताळ वे$$ताळ गाणे तर लैच भारी.....
9 Jul 2010 - 3:53 pm | जिप्सी
वा वा विनायकराव मज्जा आणली राव तुम्ही ! अहो कोल्हापुरात पेठेत राहून फुटबाल न खेळणे हा अक्षम्य गुन्हा आहे. आणि कॉलेज पण गोखले असल्यामूळ शाहू stediuam वर आम्ही पडीकच. झालेल्या सगळ्या म्याच्या बघायच्याच. आणि बक्षीसपण भारी उदा. जिवंत बोकड,सोन्याची अंगठी,चेन,स्प्लेंडर इत्यादी इत्यादी.
आणि प्लेयर पण भारी असायचे अभ्या चोरगे,अभ्या शिंदे. कैलास पाटील तर शाळेतला मित्र.
कोल्हापुरात पाटाकडील म्हणजे ब्राझील आणि दिलबहार
(लेखी दिलबहार पण उच्चारताना दिलबार) म्हणजे argentia खुन्नस म्हणजे फुल्ल खुन्नस. समर्थकात मारामार्या नेहमीच्याच विरुद्ध टीमच्या गाड्या पण सोडायच्या नाहीत मारामारी झाल्यावर. आणि भांडणातल्या प्रत्येक वाक्याची सुरुवात किंवा शेवट रा** या शब्दानच.
पण कोल्हापुरच आणि एक वैशिष्ट म्हणजे इर्षा मैदानावर कितीही असुदे पण बाहेर कधीच नाही. मंडळाचा १ प्लेयर होता पाटील म्हणून त्याला cancer झाला तर त्याच्या मदतीसाठी म्याच ठेवली त्यात संभाजीराजे,मालोजीराजान सगट सगळे खेळले. मी तर अशोक कामटेना सुद्धा बघितलंय कोल्हापूर पोलीससाठी खेळताना.
(तळ्यात practise केलेला पण पायातले स्टड काढून फार वर्ष झालेला) मंडळाचा कट्टर समर्थक,
जिप्सी
9 Jul 2010 - 3:59 pm | विनायक पाचलग
कोणी तरी हे लिहिणार हे माहित होतेच .....
फायनली इट्स कोल्हापुर यार ..
काटा किर्र
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
9 Jul 2010 - 4:29 pm | जिप्सी
खरच कोल्हापूर म्हटलं कि काही काही गोष्टी by default येतातच. कोल्हापुरात महिन्यातन १दा तरी जाऊन कट्ट्यावर बसून मित्रांना रा*** ,फो**,झ** अश्या शिव्या दिल्याशिवाय पाणीसुद्धा घशातन उतरत नाही. हे कोल्हापुरच खर स्पिरीट आहे. कोल्हापूरचा माणूस बाहेर कितीही मोठा असुदे पण मित्रांच्यात त्याचा उल्लेख ते आल्त काय ??? असाच होतो.
(नाद खुळा)
जिप्सी
9 Jul 2010 - 4:35 pm | sneharani
मस्त लेख.
व्हिडीओ क्लिप्स पण छान आहेत.
9 Jul 2010 - 5:41 pm | सुमीत भातखंडे
क्या बात है!
अप्रतिम
9 Jul 2010 - 8:14 pm | अडगळ
बाकी लेखात मांडलेले चित्र सोडून अजुन एक दुसरी बाजू पण आहे.
या खेळाडूंचा स्थानिक राजकारणासाठी , मारामार्यांसाठी होणारा वापर , अनेक सामन्यांनंतर होणारी हुल्लड , तालमी तालमीतील सनातन वैर आणि ते हिशेब खेळातून चुकते करणे.
असाच एक हिशेब मागच्या गणपतीच्या मिरवणुकीत सोडवला गेला होता..आठवत असेलच.
कोल्हापूरात फुटबॉल खेळला जात नाही तर नेते तो 'खेळवतात' असंच चित्र आहे.
-अडीच महिन्याचा महापौर (अडगळ)
9 Jul 2010 - 8:29 pm | विनायक पाचलग
इट डिपेंडस मित्रा ..
हे सगळे आहे ,मान्य ..पना सगळेच त्यातले नाहीत रे....
फक्त काही जण हातातले बाहुले झाले ..
बाकी गणपतीत जे झाले ते मटक्यातुन जास्त होते असे समजते ....
हल्ली खेळवतात हे मान्य ..पण तो खेळतात असे बदलेल असा विश्वास आहे
कारण के पी एल सारख्या स्पर्धांमुळे डीपेंडन्स कमी होत जाईल ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
9 Jul 2010 - 8:30 pm | विनायक पाचलग
इट डिपेंडस मित्रा ..
हे सगळे आहे ,मान्य ..पण सगळेच त्यातले नाहीत रे....
फक्त काही जण हातातले बाहुले झाले ..
बाकी गणपतीत जे झाले ते मटक्यातुन जास्त होते असे समजते ....
हल्ली खेळवतात हे मान्य ..पण तो खेळतात असे बदलेल असा विश्वास आहे
कारण के पी एल सारख्या स्पर्धांमुळे डीपेंडन्स कमी होत जाईल ...
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
9 Jul 2010 - 9:03 pm | क्रेमर
लेख आणि काही प्रतिसाद आवडले. नवीनच माहिती.
10 Jul 2010 - 5:43 pm | भोचक
कोल्हापुरात फुटबॉलचे एवढे वेड आहे हे माहित नव्हतं. बा विनायका तुझ्या लेखाने ज्ञानात भर पडली. आमच्या कोलकत्याच्या मित्राकडून ऐकलंल्या फुटबॉल वेडाच्या गोष्टी आठवल्या.
(भोचक)
जाणे अज मी अजर
11 Jul 2010 - 5:41 pm | भडकमकर मास्तर
कोल्हपुरात फुटबॉलचे वेडे लोक आहेत , हे ऐकले होते .. या लेखावरून अजून माहिती मिळाली...
मजा आली...
मस्त लेख रे विनायका
11 Jul 2010 - 9:22 pm | विनायक प्रभू
लेख
परा लेका जाउ दे की. ल्हान हाये तो अजुन.
12 Jul 2010 - 4:23 pm | धमाल मुलगा
काय लिवलंय, काय लिवलंय येड्या! नाऽऽदखुळा एकदम!
मस्त रे विन्या! आत्ता कळलं आमचे एक बंधूराज (वय वर्षं ८) वेताळ तालमीच्या फुटबॉल टीमच्या एव्हढ्या गुर्मीत का असतात ते! :D
झकास लिहिलंयस भावा! मजा आली.
21 Sep 2010 - 5:12 pm | अमोघ केळकर
वेताळ तालमीची फुटबॉल टीम नाही.... पेठेतले बहुतेक खेळाडू "मंडळ" किंवा पेठेचा राजा ' खंडोबा' येथूनच खेळतात...
पूर्ण लहानपन शिवाजी पेठेत गेले..... त्यामुळे खंडोबा तालीम म्हणजे जीव कि प्राण......
मी लहान असताना एकदा खंडोबा आणि पी.टी.एम मध्ये खूप मोठ्ठी भांडणे झाली होती....
तेव्हाची खंडोबा तालमीने केलेली एक घोषणा मी अजूनही वसरलो नाहीये...
" आतवर घुसणार..... पिवळा निळा पुसणार"...
इतकी टोकाची भांडणे झाली होती............
पण त्यानंतरच्या गणपती उत्सवात दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यानी एकेमेकाच्या गणपतीची आरती करून हे भांडण मिटवले होते...
21 Sep 2010 - 5:14 pm | अमोघ केळकर
बाकी ह्या लेखाबद्दल लिहावे तितके कमीच आहे.....
एकदम नाद्या बाद ........
एक नंबर!!!!!!!!!!