काळाच्या क्षितिजावरुनी संदेश कुणाचा येतो?
हा किरण कुणाचा डोळां, ती नजर आपुली देतो?
सृष्टीची तुटली नाळ हा कोण दवंडी पिटतो?
उगवता सूर्य विश्वाचा हा कोण भुपाळी गातो?
उपजला कधी, नसताना सदसद् वा अस्ती नास्ती?
जन्माची ज्याच्या वेळ, वेळाच्या जन्मापरती
आदीम क्षणांचा साक्षी, अदृष्ट पाहिले म्हणतो
सत्याच्या खटल्यामध्ये हा कोण पुरावा देतो?
सांकेतिक भाषा याची हो अर्थ गवसता त्रास
खटल्याची तेव्हा पडते ही नवीन तारिख खास
याला न तयाची खंत, हे गाव निरक्षर, झाले!
जाईल पुढिल मुक्कामा, वा त्यापुढल्याही, चाले
कालाच्या आदीपासुन, क्षितिजाच्या अंतापरती
संदेश पसरतो आहे, एक साक्षर शोधत जगती
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 11:38 pm | यशोधरा
वा! :)
1 Jul 2010 - 11:43 pm | दशानन
क्या बात है !
1 Jul 2010 - 11:48 pm | श्रावण मोडक
आधीच्याही रचना वाचल्या आहेत. कल्पनांमध्ये दमदार अर्थ आहे, पण रचनांमध्ये अवघडलेपणही आहे असं दिसतंय. या कवितेतील पहिल्या तीनही द्विपदी अशा अवघडलेल्या वाटतात. अर्थ आहेच. शेवटच्या चार द्विपदी सुलभ वाटतात. तिथं त्या सुलभतेमुळे अर्थ मार खातोय असे घडत नाही.
2 Jul 2010 - 1:45 am | मुक्तसुनीत
कविता ज्या आशयाला गवसणी घालू पाहाते त्याचा आवाका लक्षांत घेता, या कवितेला महत्त्वाकांक्षीच म्हणायला हवे. मात्र काव्य म्हणून मला ती आवडली नाही खरी. कविता वाचताना काहीतरी जादू घडायला पाह्यजे. शब्दांच्या पलिकडला आशय पकडताना जे शब्द निवडायचे , त्यांची जी गुंफण घालायची त्यामधे चिरेबंदी काम हवे. प्रस्तुत काव्यात असा साक्षात्कार मला झाला नाही.
आता कवितेच्या विषयाबद्दल : निश्चितच विचार करायला भाग पाडणारी. "सृष्टीके पहले सत् भी नही था असत् भी" या विचारामधे जे आहे त्याची आठवण आली. अनादि-अनंत असे ब्रह्माचे स्वरूप वर्णिले गेले आहे , "नेति नेति" असे परमेश्वराचे वर्णन केले गेले आहे त्या सर्वाची आठवण झाली. जीए कुलकर्णीच्या "दूत" , "ठिपका" सारख्या रूपक कथांमधून ज्या दिव्य संदेशाचे वर्णन आहे त्याचीही आठवण झाली. कवितेचा शेवटही जीए-कथेप्रमाणेच होतो : युगानुयुगे अवकाशामधे , चराचरामधे संदेश वाहातोय परंतु त्याचा ठाव लागत नाही , तो ऐकू येत नाही , ऐकायला आला तरी तो उमजणारे कुणीच नाही. बायोजेनेसिस, ए-बायोजेनेसिस , क्रिएशनिस्ट, इव्होल्युशनिस्ट अशा निरनिराळ्या थिअरीज येतात पण "मनामनाला आलेल्या पोताचे" स्पष्टीकरण हाती लागत नाही...
कविता आवडली. मात्र आणखी आवडावी अशी व्हायला हवी होती असेही वाटले.
2 Jul 2010 - 5:38 am | अडगळ
निळा पिरॅमीड दिसला का पण,
खूण तयाची एकच साधी ,
निळा पिरॅमीड दिसतो ज्याला,
तोच पिरॅमीड होतो आधी.
कविता आवडली.
2 Jul 2010 - 5:56 am | पाषाणभेद
कोणता संदेश मिळतो आहे याचा शोध घेतो आहे.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
2 Jul 2010 - 7:03 am | सहज
काही फारसे कळले नाही.
2 Jul 2010 - 10:17 am | भडकमकर मास्तर
पुन्हा पुन्हा म्हणून पहायला मजा आली..
अगदी...
आता परत वाचता वाचता अर्थ सापडवून पाहतोय...
हे सारे विश्व का आहे, कुठून आले? कोणी बनवले/ वगैरे प्रश्न पडले आहेत कोणालातरी असे कळाले... आणि त्याची उत्तरे सापडत नाहीयेत वगैरे वगैरे....
मुसुंचा प्रतिसाद वाचून अजून मज्जा आली...
2 Jul 2010 - 11:27 am | मनीषा
फारसं काही कळलं नाही ..
पण शब्द रचना चांगली आहे .
2 Jul 2010 - 5:02 pm | शरद
संदेश
"कळावयास अवघड आहे" "समजावून घेत आहे", "जीएंची आठवण येते",इत्यादि प्रतिसादावरून असे दिसून येते की , अशा प्रतिसादांचे पहिले कारण कवितेचा घाट. हा थोडासा विस्कळित किंवा संमिश्र आहे. ही कविता की गजल ? यात दोहोंची छाया आहे. गजलची एक खासियत, "शेर एकामेकांशी संबंधित असावयासच पाहिजेत असे नाही" याचा उपयोग केला आहे. वरवर पहाता शेर (किंवा कडवी) एकमेकांशी संबंधित दिसत नाहित. प्रत्येक कडव्याचा अर्थ वेगळावेगळा लावता येतो. मीटरही गजलेला साजेसा आहे. गुणगुणावयाला उत्तम. परत उर्दूचा अभ्यास नस णार्यांना अर्थ लावतांना जी अडचण भासते अगदी तशीच उर्दू शब्द वापरलेले नसतांनाही येथे भासते.कवीला काय म्हणावयाचे आहे याचा अंदाज येतो पण नक्की कळले आहे असेही म्हणता येत नाही. मग हीला गजल म्हणावी का ? उत्तर नाही. गजलेचे एक बंधन रदीफ, काफिया यांचा येथे पत्ता नाही. तसेच आणखी एक आवश्यक बाब म्हणजे दुसर्या ओळीतील शेवटच्या भागात एक सुखद, विस्मयकारक धक्का बसावयास पाहिजे तोही येथे नाही. म्हणजे या रचनेला गजल म्हणणे अवघड आहे, नाही, ही गजल नाही.
मग ही कविता आहे का? गजलशी घसट असणारी ? या प्रकारच्या कविता सुरवातीला मराठी काव्यात अनेकांनी रचल्या. श्री. माधव ज्युलिअन,
विंदा इत्यादींची नावे डोळ्यासमोर येतात. (उदा. विंदांची " साठीची गजल"). गजलची सर्व बंधने न पाळता केलेली कवीताही चांगली वाटते. पण
नेहमी तसे वाटेलच असेही नाही. थोडेसे सोपे करून सांगावयाचा प्रयत्न करतो. कविता म्हणजे एकत्र ओवलेल्या मण्यांची माळ. मणी निरनिराळे वाटले तरी एका सुत्रात गुंफलेले असतात.त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते.सुत्र तुटले तर मणी ओघळून जातील. सौंदर्य ते एकत्र असण्यात आहे. सुत्र कळलेच पाहिजे. गजल म्हणजे पुष्पगुच्छ गुलाब, जरबेरा, इत्यादि फुले एकत्र बांधलेला. प्रत्येक फुलाचा आस्वाद तुम्हाला निरनिराळा घेता येतो. रंग, पाकळ्यांची संख्या, आकार वेगळावेगळा असला तरी आस्वाद घेण्यास अडचण येत नाही. तसा हा सोपा प्रवास आहे.
श्री. राजेश यांची रचना या दोन प्रकारांहून थोडी निराळी आहे. वरील रुपकांचा वापर करावयाचा तर ती माळही नव्हे व पुष्पगुच्छही नव्हे.. ती आहे "इकेबाना". या जपानी पुष्परचनेत पुष्पगुच्छाचे घटक अशी निरनिराळी फुले असतात. तो फुलांचा हार आहे असेही दिसत नाही. सुत्र
डोळ्यासमोर आढळत नाही. पण अत्यंत काळजीपूर्वक, मोठ्या परिश्रमाने ते लपवलेले असते. सुत्र आहेच पण ते जाणवते, दिसत नाही. सुत्रच नसेल तर वा ते तुम्हाला सहज गवसले तर रचनेला इकेबाना म्हणता येणार नाही. वरवर सुंदर दिसणे हा इकेबानाचा उद्देश नव्हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे बाह्य सौंदर्याची भुरळ पडू न देता आतील भावगर्भ अर्थाची ओळख पटली पाहिजे. या संदर्भात काय दिसते या कवितेत?
सत्-असत्, अस्ती-नास्ती, सृष्टीची तुटलेली नाळ, आदीम क्षणाची साक्ष असे शब्दप्रयोग तुम्हाला उपनिषदकालीन ऋषींच्या चिरातन शोधयात्रेकडे
बोट दाखवतात. काय शोधावयाचे होते त्यांना ? त्यांना शोधावयाची होती अशा प्रश्नांची उत्तरे की जा प्रश्नांना उत्तरेच नव्हती. जग निर्माण होण्याआधी काय होते ? सत् पासून असत् निर्माण होवू शकत नाही व असत् पहिल्यांदी असेल तर सत् निर्माण तरी कसे होणार ? "काहीच नाही" पासून "अस्तित्व" कसे जन्म घेणार? शक्यच नाही. तुम्ही सृष्टीतून निर्माण झालात पण तुम्ही म्हणजे हे दिसणारे,प्रत्ययास येणारे जग नव्हे. म्हणजे ही सृष्टीची नाळ तुटली केव्हा ? या व अशा अनेक प्रश्नांनी व्याकूळ झालेल्या ऋषींनी जी जी उत्तरे शोधावयाचा प्रयत्न केला तो तो निरनिराळ्या
उपनिषदांमध्ये पहावयास मिळतो. हे विचार मुक्त स्वरूपात आढळतात व त्यांचा एकमेकाशी संबंध जोडणेही सोपे नाही. तसा काहीसा प्रवास /प्रयास या कवितेत दिसून येतो.
हा संदेश "काळाच्या क्षितिजावरून येतो" म्हणजे तो मोजमापाच्या अंतरात नव्हे. लंडन, न्यु यॉर्क, सिडने येथून येणारे संदेश हे तुमच्या मोजण्याच्या कक्षेतील आहेत. तसे क्षितिजाचे नव्हे. कितीही अंतर काटलेत तरी ते पहिल्या इतकेच दूर रहाते. त्याप्रमाणे दाता व आपण
दूरदूरच रहातो. सृष्टीची नाळ तुटली ही दवंडी पिटली म्हणजे तेवढे सर्वांना कळले पण जगाच्या उदयापासून हा संदेश देणारा अज्ञातच रहातो. त्याचा स्वत:चा निर्माण काळ आहे-नाही, सद-असद आदि सर्व द्वंदांच्या आधीपासूनचा आहे. "नासदीय सुक्तात" हा विचार मांडलेला
आपणास आढळतो. (हे एक तसे अनाकलनीय सुक्त, तरी श्री. धनंजय यांच्या भाषांतरात थोडासा मागोवा लागावा.) काळाचा (Time) जन्म
विश्वाच्या (Matter and space) जन्माबरोबरच झाला असावा अशीच काहीशी विचारधारणा. या क्षणी कोण होते ? कोणी होते तरी का? व
मग ते माहित नसतांना कोणी साक्ष नोंदवलीच तर तो पुरावा सत्याचा म्हणून ग्राह्य धरावा का ? आपण पाहतो की जसजसे भूतकालात मागेमागे जावे तसतसे भाषा समजण्यास अवघड होत जाते. ज्ञानेश्वरी कळण्यास अवघड, गाथा सप्तशती त्याहून अवघड. मग युगायुगांपूर्वीची ही भाषा कळणार तरी कोणाला ? आता साक्षीदार काय सांगत आहे हेच कळत नसेल तर प्रत्येक तत्ववेत्ता नवीन मुद्दा मांडणार व नवीन तारिख पडणारच. बरे, तुम्हाला कळत नाही याचीही कुणाला काळजी नाही. "अडाणी लेकाचे " म्हटले म्हणजे झाले.
या जन्मी नाही, पुढे बघू, तेव्हाही नाही, हरकत नाही; त्यापुढील आहेच की. संदेश देणार्याला दिक्कालाचे बंधन नाही. तो संदेशग्रहणास योग्य अशा व्यक्तीच्या शोधात अनंत काळ, सर्वत्र फिरावयास तयार आहे.
तर अशी ही कविता. वरवर वाचून सुंदर वाटणारी पण नकी सौंदर्य कशात आहे, का चांगली वाटते या बद्दल बुचकळ्यात पाडणारी.
( तो परमात्मा जिवात्म्याला "तत्त्वमसि" हा संदेश तर देत नाही ना?)
शरद
2 Jul 2010 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जी, आता पुन्हा एकदा तुम्हीच कविता समजावून सांगा.
अदिती
2 Jul 2010 - 6:35 pm | क्रेमर
मूळाच्या मूळापाशी शेंडेच शेंडे.
संदेश म्हणजे संवादास पूरक पार्श्वभुमी आहे. साक्षर-निरक्षर, संदेश, खटला, तारीख यापेक्षा वेगळे शब्द असते तर अजुन मजा आली असती.
2 Jul 2010 - 11:24 pm | लिखाळ
मुसु आणि शरद यांच्या प्रतिसादाची मदत झाली. क्रेमेर यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत आहे.
कवितेतील शब्दांचा ठेका आणि गूढता रॉय किणीकरांच्या रुबायांची आठवण देणारा.
--लिखाळ.
5 Jul 2010 - 4:18 pm | राजेश घासकडवी
सर्वप्रथम कवितेला प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे मनापासून आभार.
या कवितेवर काहीशी गूढ, कळली नाही अशा प्रतिक्रिया आल्यामुळे ही लिहिताना माझी प्रेरणा काय होती हे लिहिण्याचा हा प्रपंच.
शरद यांनी घाटाविषयी लिहिताना सूत्र आहे पण लपवून ठेवलेलं आहे असा उल्लेख केला. खरं तर सूत्र लपवलेलं नसून, ते विशेष ज्ञान फार थोड्यांना असतं. व ज्यांना असतं त्यांनाही असे विषय कवितेत अपेक्षित नसतात.
प्रेरणा आहे ती हबल टेलिस्कोपने घेतलेल्या अल्ट्रा डीप फिल्ड फोटोची. चंद्राच्या १/५० आकाराच्या आकाशाकडे ११ दिवस ध्यानस्थपणे बघत टिपलेलं हे चित्र.
यात १०००० आकाशगंगा दिसल्या. त्याहीपलिकडे, बिग बँगनंतर 'काहीच' काळात तयार झालेल्या आकाशगंगा दिसल्या. हे चित्र आणणारे किरण म्हणजे या कवितेतला संदेशवाहक.
सृष्टीची उत्पत्ती वगैरे म्हटलं की आपल्याला नासदीय सूक्त आठवतं. या किरणाने आणलेला संदेश त्याच ताकदीचा आहे असं मला वाटतं. सत्य काय याविषयीच्या खटल्यात हा साक्ष देतो. पण अजूनही बायबल, कुराण, वेद वाक्य प्रमाण मानणारं जग, सामान्य समाज हे सत्य कळून घेण्याच्या अवस्थेत नाही. विज्ञानाची सांकेतिक भाषा वाचता न येणारं हे निरक्षर गाव आहे. त्यामुळे 'अंधारातुन रेडाराचा किरण चालला सतत पुढे' तसा हा पुढच्या गावी जातो. आकाशगंगाच अब्जावधी म्हटल्यावर गावं किती असतील कोणी सांगावं?
शरद यांनी असाच अर्थ सांगितला आहे, थोडा जास्त व्यापक आणि थोड्या वेगळ्या संदर्भांसह. या संदर्भाने त्यांची टिप्पणी अधिक धारदार होईल असं वाटतं.
5 Jul 2010 - 4:35 pm | टारझन
आता ह्याचं सुबोध मराठी अनुवाद कोण करणार आहे ? कोण आहे इच्छुक ज्ञाणेश्वर ? ;)