पुर्वसूत्र - भाग १
सकाळी उठल्यावर परत हॉटेलच्या तळमजल्यावर जाउन नाष्ट्यासाठी मॅनेजरकडे माधुकरी मागायला सुरुवात केली, आमच्या दोघांचा अगम्य भाषेत गोन्धळ घालुन झाल्यावर, तो मला हाताला धरून कीचन मधे घेउन गेला. त्या आचार्याने, मी आणि मॅनेजरने थोडावेळ ईंग्रजीशी झटापट केल्यावर मी परवलीचा शब्द उच्चारला - हिंन्दुस्थान, आमीताब बाछ्छान.. पुन्हा समोर बटाटे, टमाटे, लॅट्युस वगैरे.(चला दीवसातले एक महत्वाचे काम तर झाले.)पण गेल्या काही तासांच्या अनुभवावरुन या देशाविष्यी उत्सुकता तर निर्माण झाली होती. त्यानंतर दिवसभर ह्या देशाविषयी प्रवचनामध्ये भक्तगणांच्याकडून (मी मलाही न कळणार्या विषयातला कॉर्पोरेट ट्रेनर आहे.. उगाच समजूतीचा घोटाळा नको..) शक्य तितकी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. प्रत्येकाने त्या देशाची वेगवेगळी वैशीष्ठ्ये सांगितली पण एक सुर कायम होता - ईराणी सौंदर्यवती (बाकी याचा पुसटसा अंदाज वर्गातच आलाच होता.. माझ्याच वर्गात १२ पुरूष आणि ८ स्त्रिया.. चुकलो.. सुंदर स्त्रिया) पिस्ते आणि आमीताब बाछ्छान (काही ईराणी संस्कृतीचा अभिमान नसलेल्यांनी 'शॅहॅरूक खॅन' चं पण नाव घेतले, पण ते क्वचितच)
संध्याकाळी एका भक्ताबरोबर (अर्थातच आमीताभचा वशिला लाऊन ) तेहरान शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो, आणि समोर उलगडत गेला एक सुंदर अनुभव..
थोडेसे जुन्या पद्धतिचे तेहरान शहर, अगदीच गगनचुंबी ईमरतींचे जंगल नाही आणि अगदीच पूणेरी पेठा पण नाहीत, थोडी नजर उंचावल्यावर आश्चर्याचा सुखद धक्काच. शहराच्या शेजारी अवर्णनीय सुंदर बर्फाच्छादीत पर्वतमाला. (माझ्या मध्यमवर्गीय मना.. स्वेटर आणला नाही हे आत्ता आठवायलाच हवयं का?) पण ह्या सर्वाहूनही अधिक सुंदर म्हणजे पर्शियन सौंदर्यवती. (तिथेच ईराण म्हणजेच पर्शिया हे त्याने सांगीतल्यावर पुन्हा अत्यानंद..) रस्त्यावरुन जाणार्यायेणार्या पर्शियन ललना पाहणार्याच्या मानेचा नक्कीच करकोचा करतात, ८-१० जरी पर्शियन सौंदर्यवती आपल्या चित्रपटसृष्टीत आणुन सोडल्या तर सगळ्या हीरवीणींना .**लाच लावतील.. मला आधी कळेना 'पहावं की न पहावं' (चाल - टू बी.. ऑर नॉट टू बी ) पण माझ्या सर्व प्रवासात जवळ जवळ सगळ्या चालकांनी आणि स्थानीक सहकार्यांनी.. " पर्शियन विमेन, वेरी ब्युतीफूल.. सी सी.. " म्हणून मलाच प्रोत्साहन दिले (त्यातल्या काहिंच्या डोळ्यात ' सरड्याची धाव कुंपणापर्यन्त' असा भाव का दिसला बरें..).
ईस्लामी राजवट आणि शरीया कायदा असल्यामुळे स्त्रियांना सर्व शरीर झाकून घेण्याची सक्ती. सगळ्याजणी काळा गुढग्यापर्यंतचा कोट (खालची निळी तंग जीन्स कुठल्या शरीयात बसत असेल? ) आणि डोक्यावर काळा रुमाल केस झाकण्यासाठी वापरतात, फक्त चेहरा व हात दर्शनिय. पण हा पोशाखाचा निर्बंध वगळता बाकि काही निर्बंध मलातरी आढळले नाहीत. सर्व व्यवहारांत स्त्रियांचा बरोबरीने सहभाग दिसतो.(त्यातल्यात्यात ड्रायव्हिंग करणार्या स्त्रिया हॉर्न न वाजवता आडव्या येउन आपण शिव्या द्यायला तोंड उघड्ल्यावर गोड हसून सूसाट वेगाने निघूनही जातात)
ईस्लामी राजवटीच्या बाकि असहिष्णु खुणा मात्र सतत जाणवत राहातात,दूरचित्रवाणी वर फक्त तीनच वाहिन्या आणि प्रत्येक वाहिनीवर नखशिखांत झाकलेल्या स्त्री पुरुषांच्या मालीका. (तीकडची एकता कपूर काय विषय वापरत असेल बरं ? बाकी ती एकता कपूर असेल तर तिला विषय कशाला लागेल म्हणा..) दिवसातून ५ वेळा नमाजाच्या वेळेला तीनही वाहिन्यांवर कुठल्यातरी मुख्य अथवा ऊप मौलविंचे नमाज प्रक्षेपण कंपल्सरी..आपल्याकडे हॉटेल मधे टॉवेलसाबण ठेवतात तसे प्रत्येक खोलीत नमाजाची सतरंजी आणि कुराणातील आयते लीहिलेल्या मातिच्या प्रतिमा ठेवणे कंपल्सरी. संपूर्ण दारुबंदी.(काळ्याबाजारात मीळतेच..) लोकांना व्यक्त व्हायला साधने कमी म्हणूनच असेल कदाचीत पण ईराण हा जगातला चौथ्या क्रमांकाचा ब्लॉगर देश आहे.
देशाचा कायदा मुस्लिम, सरकार कट्टर मुस्लिम. लोक मात्र कमालीचे सहीष्णु आणि ह्या सगळ्या घोळाला कावलेले दीसले.(अर्थात आता बहुतेक देशांतील परीस्थिती पहाता सर्व सरकारे समुद्रात नेउन बुडविली तर लोक सगळेच चांगले.) मी त्यांचं सरकार, कायदे वगैरेंविषयी टोकरल्यावर (आगावपणा, दुसरं काय?) सर्वात जास्त ऐकलेले वाक्य म्हणजे " वुई आर फर्स्ट पर्शियन.. देन मुस्लिम्स" , त्यांच्याकडून कळालेला ईतिहास असा. अरबस्थानांतून जशी आक्रमणें पुर्वेला हींन्दुस्थान वर झाली तशी पश्चिमेला त्यांच्यावर झाली, त्यानंतर तेथील स्थानीक पारशी लोक परागंदा होउन, जीव वाचवून भारतात आले. (पर्शियन म्हणजेच आपल्याकडचे पारशी हे समजल्यावर पुन्हा एकदा अचंबा, आ वासणे वगैरे वगैरे..) मग मीपण टाटा, वाडिया वगैरे पारशांची नावे सांगून जवळीक वाढवली.
तसे अमेरीकाविरोधी बोलणारे माझ्या पाहण्यात कोणी आले नाहि. पण रस्त्यांवर मात्र अमेरीकाविरोधी फलक काय, अमेरिकेच्या झेंड्यावर क्षेपणास्त्रे काय. याही बाबतीत जरा टोकरल्यावर अमेरीका विरोध सापडलाच नाही उलट आमच्याच सरकार चे जरा अती होतय असा सूर आढळला.(एकाने खोमेनीच्या पोस्टरखालीच ऊभे राहून हे सांगीतल.)
भारताविषयी व मुख्यतः चित्रपट्सॄष्टीविषयी आतोनात उत्सुकता. (काय नशीब बघा मी स्वतः ईराणी चीत्रपटांचा भोक्ता आहे (माझीद़ माझिदी वगैरे.) पण कोणी त्यविषयी बोलेचना. ईराणी संगीत, चित्रपट ईतके अप्रतीम असताना त्यांना बॉलीवूड कसे सहन होते अल्ला जाणे.) सारखे हींदुस्थान, आमीताब बाछ्छान चालूच. मी कीतिही वेळा ईंडिया म्हणालो तरी त्यांच्या मुखी हींदुस्थानच. माझे प्रवचन ज्या रस्त्यावर होते त्याचे नावही गांधी स्ट्रीट. मी हींदुस्थानमधुन आलोय हे कळाल्यावर लोक जरा जास्त आपुलकीने आदरातिथ्य करत होते, अर्थात याला एक राजकीय पैलूही असु शकेल, एकाने मला ईराण-हींदुस्थान भाई भाई हेपण ऐकवले. ईराण-ईंडिया गॅस पाईपलाईन बद्दल म्हणाला " तो पाकीस्तान तेवढा मधे तडमडतोय ना.. नाहितर केव्हाच झाले असतं ते."
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Jun 2010 - 6:28 pm | अनिल हटेला
हा भाग देखील आवडला...:)
पूढील भाग सुद्धा ( फोटोज सहीत ;) ) लवकरच मिळेल अशी अपेक्षा...:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
12 Jun 2010 - 7:04 pm | रामदास
दुसरा भागही आवडला. आता थोडे फोटो टाका तिसर्या भागात.
12 Jun 2010 - 8:21 pm | अर्धवट
रामदास व अनील.. प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद.. तिकडे जाताना मला खुप घाबरवले होते मित्रांनी की फोटो, छायाचित्रक वगैरे काहे चालत नाही(शरिया कायद्यामुळे). त्या छायाचित्रकात आधी काढलेले फोटोसुधा तपासुन बघतात, बायकोचा असेल तर सिद्ध करावे लागते की बायकोच आहे म्हणुन. त्यामुळे घाबरून छायाचित्रक नेला नव्ह्ता.. खुप पस्तावलो.. पण तिकडे छायाचित्रक उधार उसनवार करुन काही छायाचित्रे घेतली आहेत, खास नाहीत पण पुढच्या भागात टाकतो.
12 Jun 2010 - 7:11 pm | शुचि
खूप माहीती मिळाली. मनोरंजक भाग होता. मस्तच.
>> लोकांना व्यक्त व्हायला साधने कमी म्हणूनच असेल कदाचीत पण ईराण हा जगातला चौथ्या क्रमांकाचा ब्लॉगर देश आहे.>>
अरेरे!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
13 Jun 2010 - 12:24 pm | वेताळ
पुढील भागाची व छायाचित्रांची वाट पहात आहे.
वेताळ