कातरवेळ

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
10 Jun 2010 - 5:54 pm

पडवीत सांजअंधारी
कवडसा मनाचा श्वास
तुळशीच्या पणतीभवती
मिणमिणतो मंद प्रकाश

तु काय अवेळी येशी
भासांत पैंजणी घुमती
विटलेल्या उबेसाठी
भरजरी शाल एकांती ?

डोळ्यांच्या काठावरती
तरळते तुझे बघ नांव
पण हाय, नदीच्या काठी
डोंबांचा अवघा गांव

लसलसत्या काळोखात
क्षीण जीव एकटा बसला
विझणार्‍या टेंभ्यावरती
वाघुळ करीतसे हल्ला

करुणकविता

प्रतिक्रिया

राघव's picture

11 Jun 2010 - 12:44 am | राघव

थोडे संदर्भ दिलेत तर कवितेतला भाव समजण्यास सोपे जाईल.
कारण या काही ओळींचा अर्थ मजणे मला जरा कठीण झालेय..

कवडसा मनाचा श्वास

विटलेल्या उबेसाठी

डोंबांचा अवघा गांव

विझणार्‍या टेंभ्यावरती
वाघुळ करीतसे हल्ला

(गोंधळलेला) राघव

राजेश घासकडवी's picture

11 Jun 2010 - 1:50 am | राजेश घासकडवी

डोळ्यांच्या काठावरती
तरळते तुझे बघ नांव
पण हाय, नदीच्या काठी
डोंबांचा अवघा गांव

काठ, नाव, व नदी बेमालूम एकमेकांत मिसळतात. तरळते चं तरते शी शब्दसाधर्म्य साधणं लाजवाब.

शुचि's picture

11 Jun 2010 - 1:53 am | शुचि

सुंदर गमली.
काहीसं गूढ मनाला स्पर्शून गेलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दत्ता काळे's picture

11 Jun 2010 - 9:25 am | दत्ता काळे

राघव,

कवितेतल्या शब्दांचे अर्थ, आशयापेक्षा भाव महत्वाचा ठरेल असे मला वाटते. तो असा- मृत्युच्या दारात वाट पहाणारा एक जीव आहे. थोडी धुगधुगी राहीली आहे. ( पहिले कडवे वाचा ) त्यातले ओळी / शब्द त्या अवस्थेशी साधर्म्य दाखवतात. दुसरे, तिसरे - कडवे आठवणी दाटून आल्या आहेत, आसक्ती सुटत नाही, पण नियतीपुढे नाईलाज. चौथे कडवे शेवटच्या क्षणाचे अवलोकन.

राघव's picture

11 Jun 2010 - 9:57 am | राघव

अस्सं आहे होय! मी वेगळ्याच दृष्टीकोनातून या कवितेकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे पार गोधळलो. आता नीट कळले. छान लिहिलेत! :)

राघव

नाना बेरके's picture

11 Jun 2010 - 1:13 pm | नाना बेरके

डोंबांचा अवघा गांव .. म्हणजे काय ?

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

पाषाणभेद's picture

12 Jun 2010 - 4:04 am | पाषाणभेद

वेगळ्याच अर्थाची गुढ कविता. छानच आहे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही