भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
23 Apr 2008 - 2:07 pm

आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये... हे सारे तुम्ही घडवून आणणार आहात , अर्थात आमच्या म्हणजेच..भडकमकर क्लासेस च्या मार्गदर्शनाने..

इथे मात्र समीक्षकाच्या बरोबर उलटा ऎप्रोच घ्यावा लागतो त्यामुळे कोर्स निवडीचे काम काळजीपूर्वक केलेल्या कल चाचणीतूनच होते...काही विशिष्ट गुण लहानपणापासूनच असावे लागतात.
१. ही पोरे भरपूर मित्रपरिवार राखून असतात, अडीअडचणीला माज न करता मदत करतात.
२. कोणत्याही मास्तरांना नडत नाहीत, सारखे प्रत्येकासमोर you are the best teacher असे कौतुक करतात...
३. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगायची बोलबच्चनगिरी त्यांना चांगली जमते..
४.त्यांना कोणत्याही दर्जाहीन गोष्टीला प्रोत्साहन द्यायला आवडते.....

आता इव्हेंट मॆनेजर म्हणजे ....कोणत्याही कार्यक्रमात कार्यक्रम ठरवण्यापासून तो सुरळीत पार पाडेपर्यंत राबणारा व्यवस्थापक...( म्हणजे त्यात मांडववाले, ध्वनिव्यवस्था, वाहतूक व्यवस्था,लायटिंग, खुर्च्या, भारतीय बैठक,तिकीट छपाई आणि तिकीट विक्री,पूर्वप्रसिद्धीसाठी ब्रोशर्स, हॆंड्बिले, वर्तमानपत्रातली जहिरातवाले, व्हिडीओ शूटिन्ग वाले, स्टिल फोटोग्राफीवाले,, रंगमंच सजावटवाले , फ़ूल/हार/नारळ/बुकेवाले,तसबीर, फ़ीत , समई, पूजासाहित्यवाले, मध्यंतरातला चहा, कार्यक्रमानंतरचे जेवण वगैरेची व्यवस्थावाले या सर्व लोकांशी समन्वय साधून न चिडता कामे करवून घेणे म्हणजे उत्तम व्यवस्थापन )...योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो...

सुरुवात करणायांसाठी टिप्स....
१. सोसायटी / कॊलनीचा गणेशोत्सव , किंवा छोटी स्नेहसंमेलने यांच्या व्यवस्थापनाने सुरुवात करावी..शालेय वयात उमेदवारी व्हायला हवी..
२.. नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यात कोणीतरी गायक, कवि असतातच.. त्यांचे काव्यगायन न थकता ऐकावे..... विशेषत: लहान मुले, त्यांचे ते डान्स, अभिनयाच्या नावाखालची त्यांची ती दिव्य नक्कल यांचे अगदी विनम्रपणे साळसूद भाव चेहर्यावर आणून वारेमाप कौतुक करावेआणि त्याच वेळी यांनी स्वत:ची कला जनतेपुढे मोठ्या कार्यक्रमातून आणणे कसे आवश्यक आहे असे एक पिलू त्यांच्या बापांच्या डोक्यात अलगद सोडून द्यावे......

त्यासाठी काही वाक्यांचे संच...
" बबडू काय सुंदर नाचतो, त्याला तुम्ही खरंतर नीट ट्रेन केलं पाहिजे... त्याला तुम्ही एकापेक्षा एक ला पाठवाच...जिंकून येईल जिंकून...आहात कुठे? फ़क्त कार्यक्रमांचा, प्रेक्षकांचा सराव हवा हां "
" बेबी काय गाते हो, प्रतिलताच.... तिला निदान वाद्यवृंदात तरी गाऊन पहायची सन्धी दिलीच पहिजे... अहो प्रोग्राम्स केल्याशिवाय जनतेपुढे टॆलंट येणार कसं?"
" काका, तुम्ही मैफ़लींमध्ये काव्यवाचन करता का?.. काय सांगता? नाही?.... खरंच नाही? विश्वास बसत नाही हो...खरंच तुम्ही काव्यगायन करा...आजकाल अशी सशक्त कविता कुठे ऐकायला मिळते?"
मग हे लोक विचारतात, " अरे पण तो कार्यक्रम कसा करतात वगैरे आम्हाला... म्हणजे त्यातलं काही समजत नाही रे..."....
"काही घाबरू नका हो, मी कशालाय मग? आपणच तो कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फ़े करू , फ़क्त थोडा खर्च येईल...." अशी टोलेबाजी जिथे जाता तिथे करत राहिलात तर पोरासाठी खर्च करणारे असले दोन चार बाप सापडतील, मग संस्थेचं नाव ठरवायचं आणि बघता बघता तुमच्या संस्थेचा पहिला जाहीर कार्यक्रम होऊनही जाईल...

आता काहींना असे वाटते की इतक्या फ़ालतु कलाकाराचे कौतुक मी केले तर माझा दर्जा एक रसिक म्हणून घसरत तर नाही ना ? एक लक्षात घ्या, तुम्ही रसिक बनायला आलाय का इव्हेंट मॆनेजर व्हायला?? उगीच दोन गोष्टींची गल्लत करू नका...खर्‍या इव्हेंट मॆनेजर चा प्रोत्साहनाने अनेक कलाकार घडतात यावर विश्वास असतो..

३.सुरुवातीच्या काळात हौशी आणि श्रीमंत मंडळी हे आपले टार्गेट .... व्यावसायिक मंडळींचा माज आपल्याला सुरुवातीला परवडणारा नाही... आणि होतकरू, गुणी परंतु गरीब कलाकारांकडून काही फ़ायदा नाही त्यामुळे त्या वाटेला न गेलेलेच बरे..
४.जनसंपर्क उत्तम हवा.... स्थानिक वर्तमानपत्रातले सांस्कृतिक वार्तांकन करणारे वार्ताहर, जहिरातवाले, स्थानिक पुढारी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले लोक , नाट्यगृह व्यवस्थापक, मांडव आणि ध्वनिव्यवस्थावाले कंत्राटदार, ट्रान्स्पोर्ट वाले, स्थानिक पोलीस ओफ़िसर,स्थानिक बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष ..कोण कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही... यातल्या सर्वांना आपापल्या सर्व कार्यक्रमांना आमन्त्रित करावे आणि आलटून पालटून एकेकाला आपापल्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा / अध्यक्ष म्हणून बोलवावे.
५.. मग स्पर्धा भरवायच्या...गायनस्पर्धा, चित्रकलास्पर्धा, वाद्यवादन स्पर्धा, पोवाडास्पर्धा, अभिनयस्पर्धा, रांगोळीस्पर्धा,या असल्या फ़ुटकळ स्पर्धा तर शाळेच्या सुटीमध्ये वगैरे जाम हिट होतात ....गृहिणींसाठी पैठणीवाटपाच्या होम मिनिस्टर स्पर्धा घ्यायच्या...शिबिरं भरवायची.. अभिनय, नाट्यप्रशिक्षण, जन्गल भटकन्ती, प्रस्तरारोहण..सुगम सन्गीत गायन, कराटे प्रशिक्षण वर्ग, ताएक्वोन्दो वगैरे...
६. हे कवी आणि अभिनेते स्वत:ची ’एक कलाकार म्हणून ओळख घडवायच्या मागे असतात... या रेकग्निशन साठी काहीही करायला तयार होतात...एक उदाहरण देतो.
या कवि वगैरे मंडळींना मोठ्या कार्यक्रमात काव्यगायन करायची आणि पुरस्कार वगैरे मिळवायची फ़ार हौस असते...मग असल्या लोकांची यादी मिळवून त्यांना घरी पत्रे धाडायची,.." आपणास अमुक अमुक संस्थेचा कविमित्र / जनमित्र / कामगार मित्र / खरा कलाकार पुरस्कार मिळालेला आहे, तरी त्यासाठी कृपया रु.५००/- खालील पत्त्यावर पाठवा... ( हसू नका, बरेचसे लोक पाठवतात पैसे)...मग त्या पैशांमधून एक स्वस्त रंगमन्दिर किंवा शाळेचा हॊल दिवसभरासाठी मिळवायचा... कवी मंडळींना दिवसभर काव्य म्हणत बसवायचं आणि सन्ध्याकाळी एक कवी आणायचा आणि त्याच्याहस्ते ते कविमित्र पुरस्कार ( ३० रुपयंचे मेडल आणि १० रुपयांचे सर्टिफ़िकेट) वाटून टाकायचे..पुरस्कार मिळवून सर्व कवी खुश, त्यात रेकग्निशन आणि काव्यगायनाचे व्यासपीठ.....बोलायलाच नको... शिवाय आपला एक सक्सेसफ़ुल इव्हेंट सुद्धा झाला...
आता यात दूरदूरच्या कवींकडून प्रत्येकी ५०० रु घेऊन कार्यक्रम रद्द करणारे अत्यंत वाईट इव्हेंट मॆनेजर असतात , पण आपण तसले शिकवणारे क्लास चालवत नाही... तत्त्व म्हणजे तत्त्व.
७.आता अत्यंत महत्त्वाचे .... पॆकेजिंग...
कार्यक्रम साधारण तोच पण पॆकेजिंग बदललेले... हा प्रकार उदाहरणार्थ वाद्यवृंदांमध्ये फ़ार छान करता येतो ...मराठी वाद्यवृंदांमध्ये ठराविक तीच तीच गाणी परत परत वाजवली जातात.. पण दर वेळी त्या कार्यक्रमाला वेगळी नावे देऊन सादर करावेत... म्हणजे एकदा बाबूजींची गाणी, मग गदिमांची गाणी, एकदा गीतरामायण ........
किंवा आठवणीतली गाणी ( फ़ेमस लोकांचे स्म्रुतिदिन घेउन त्याप्रमाणे गाणी ),, ऋतूंप्रमाणे गाणी, श्रावणातली गाणी, थंडीची गाणी, तमाशाची गाणी,
चंद्राची / चांदण्याची गाणी कोजागिरीच्या दिवशी बरोबर दूध फ़ुकट असले टुकार उपक्रम राबवावेत... लोकांना मजा येते... आपण रसिक वगैरे झालो असे वाटते त्यांना..
गाण्याच्या कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये सिनेमा आणि नाटकातले विनोदी कलाकार आणून त्यांच्याकडून नाटुकली बसवून घ्यावीत .... हे असले विनोदी प्रकार लोकांना फ़ार आवडतात.... शिवाय त्या विनोदी नाटुकल्यांमध्ये कार्यक्रमाच्या प्रायोजकांची नावे घुसडावीत....
८. कोणत्याही प्रकारच्या निवडणुका जवळ आल्या की आपला सीझन सुरू होतो....आपापल्या वॊर्डातल्या / मतदारसंघातल्या ज्येष्ठ जाणत्या मतदारांना फ़ुकट कार्यक्रम दाखवून रिझवायला पुढार्यांना अनेक कार्यक्रमांची गरज असते.... नाटके, तमाशे, गाण्यांचे वाद्यवृंद, नकलांचे कार्यक्रम... शिवाय छोटे मोठे नटनट्या पैसे घेऊन प्रचारफ़ेर्यांमध्ये भाषणे करायला / अभिवादन करायला (हात हलवायला ) आणणे
९. जालावरच्या ऒर्कुट फ़ेसबुक आणि काय काय नवनवीन येणाया नेटवर्किंग कम्युनिटीज मध्ये घुसावे... हौशी ( आणि श्रीमंत ) कलाकार मंडळी शोधून काढून सम्पर्कात रहावे.... शिवाय अमुक कवीचा फ़ॆन क्लब, तमुक गवयाचा फ़ॆन क्लब असल्या कम्युनिटीज शोधून त्यांच्यातर्फ़े कार्यक्रम करावेत...सम्पर्कासाठी या जालाचा भयानक फ़ायदा आहे.
१०. हौशी नट लोकांना वाट्टेल ती बिले लावावीत..... उदा. प्लॅन पूजा २०० रु.; वाहतूक खर्च ५०० रु; सेटचा खर्च ४००० रु; पोलीस कमिशनरकडून मिळणार्‍या सार्वजनिक प्रयोगाच्या परवानगी साठी नक्की किती पैसे घ्यायचे असतात ते कोणालाच नीट ठाउक नसते, तिथे ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत काहीही आकडा टाकावा...व्यवस्थापन १००० रु. वगैरे वगैरे....हे हौशी ( आणि श्रीमंत ) लोक फारशी खळखळ न करता लगेच बिल चुकते करतात.

या गोष्टी करेपर्यन्त तुम्ही थोडे प्रस्थापित आणि अनुभवी इव्हेन्ट मॆनेजर होऊ लागला आहात .... मग तुमच्या संस्थेच्या नावाने पुरस्कार सन्ध्या आयोजित करायची .
सद्ध्याची नवीन फ़ॆशन म्हणजे एकाच वेळी अनेक पुरस्कार वाटायचे आणि त्यानिमित्ताने भरपूर फ़ेमस माणसे बोलवायची... किंचित नट गायकाला बालगन्धर्व पुरस्कार , आत्ता मिसरूड फ़ुटलेल्या टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्याला एकदम चिन्तामणराव कोल्हटकर पुरस्कार, आत्ता पदार्पण केलेल्या अभिनेत्रीला स्मिता पाटील पुरस्कार अशी वाट्टेल तशी फ़टकेबाजी झाली तरी चालते...लोक प्रेमाने सहन करतात..पण या आठ दहा पुरस्कारांच्या गर्दीमध्ये स्थानिक कलाकारांना पण बक्षीसे द्यायला विसरू नये...स्थानिक अभिनेते, लेखक वादक, गायक यांच्याबरोबरच काही हटके पुरस्कारही द्यावेत...उदा. तुमच्या गल्लीत श्वानप्रशिक्षण देणार्या माणसाला " विष्णुपंत छत्रे" पुरस्कार, किंवा सिनेमात बैलाला पळायला शिकवणार्याला "मनेका गांधी प्राणिमित्र " पुरस्कार....
सर्वांसाठी विन विन सिचुएशन म्हणजे काय , ते या पुरस्कार सन्ध्येच्या उदाहरणातून कळेल...
या पुरस्कारांचे एक बरे असते, सगळे सुखी होतात...या फ़ेमस मंडळींमुळे वर्तमानपत्रात ,स्थानिक केबलटीव्ही वर, मराठी न्यूज चॆनलवर आपल्या सन्स्थेची मजबूत प्रसिद्धी होते ... आता हे पुरस्कार घेताना येण्यासाठी सुद्धा तारे तारका वाजवून पैसे घेतात , ती गोष्ट वेगळी पण आपला स्पॊन्सर तगडा असतोच की... उदाहरणार्थ बिल्डर, स्थानिक नगरसेवक/ आमदार- त्यांचा काळा पैसा पांढरा होतो, त्यांना स्टेजवर बसवून त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यांच्या व्यवसायाला आवश्यक अशी प्रसिद्धी मिळते..प्रेक्षकांनाही इतके महान कलाकार आपापल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्या गावात आले याचा आनंद होतो..
दर वर्षी असल्या पुरस्कार सन्ध्या आयोजित कराव्यात.

व्यावसायिक इव्हेंट्स....
आपापल्या व्यवसायात अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना तुम्ही कौशल्याने बाहेर काढू शकता...
उदाहरणार्थ...१. एका शिम्प्याचा धंदा नीट चालत नाही...तर या फ़ॆशन डिझायनराच्या बुटीकच्या नावाने मोठा फ़ॆशन शो आयोजित करावा.... त्यात होतकरू मॊडेल म्हणून जवळच्या कॊलेजातील प्रेमात पडलेली युगुले घ्यावीत... ( स्थानिक मधु-मिलिंद, यांना वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत आणि सर्व कष्ट एकमेकांच्या सहवासासाठी ते आनंदाने करतात) कोरिओग्राफर स्वस्त शोधावा आणि उडवावा इव्हेंट्चा बार..... दोन वर्षांत या शिम्प्याची मुंबईत दोन सरकारमान्य फ़ॆशन डिझायनिन्ग ची कॊलेजे होतात की नाही बघा...
उदा. २... एखाद्या ट्रॆव्हल कम्पनीला आपला विस्तार वाढवायचा आहे, त्यासाठी पुरस्कार सन्ध्या आयोजित करा, त्याच वेळी कोणता अभिनेता किंवा खेळाडू तुमच्याबरोबर टिम्बकटू ला येणार, कोणते कोणते खेळ खेळणार ते वर्तमानपत्रात स्पॊन्सर्ड बातम्यांनी जाहीर करा... (अमुक अमुक भाउजी स्वत: येणार आणि बायकांबरोबर खेळणार, पैठण्या वाटणार...वगैरे)... किंवा कम्पनीच्या मालकीणबाईंना आठवड्याला सात आठ वर्तमानपत्रांमध्ये लेख पाडून द्यायला एखादा सेमिप्रोफ़ेशनल लेखक उपलब्ध करून द्या, त्याबदल्यात त्याला कन्सेशनमध्ये भीमाशंकर टूर द्यायचं आश्वासन द्या..
उदा .३ .. एखाद्या डॊक्टराचा जम बसत नाहीये.. मग काय करणार? करेक्ट... एका आमदाराच्या वाढदिवशी हॊस्पिटलाशी टाय-अप करून रक्तदान शिबिर घ्या किंवा फ़ुकट आरोग्य तपासणी शिबिर घ्या....
अशा प्रकारे कोणत्याही व्यवसायासाठी इव्हेंट घडवता येतो ...तुमच्याकडे कोणत्याही व्यवसायातील माणसे येवोत...... हिप्नॊटिझमवाले, मंत्रतंत्रवाले (गंडेदोरेवाले / ताईतवाले / जादूचे प्रयोगवाले), ज्योतिषवाले ( सनसाईनवाले / मूनसाईनवाले / जोक सांगणारे/ पत्रिकावाले), , मालिशवाले ( जपानी मसाजवाले / केरळीमसाजवाले / तेलवाले / बिनतेलवाले ), स्मरणशक्तीचे प्रयोगवाले,व्यायामशाळावाले ( वजन उतरवावाले / आहार नियमनवाले / देशी-तालीमवाले / ट्रेडमिलवाले ), योगावाले ( आसनवाले /ध्यानधारणावाले / कुंडलिनीवाले / निसर्गोपचारवाले / मनशक्तीवाले / आर्ट ऒफ़ लिव्हिंगवाले ) रेस्टॊरंटवाले ( उडपीवाले / टपरीवाले / वडापाववाले / अमृततुल्यवाले / बारवाले / भेळ- मिसळपाववाले / थ्रीस्टार-फ़ाईव्ह्स्टारवाले ) शाळा - कॊलेजवाले (बालक मंदिरवाले / कॊन्वेंटवाले / मेडिकल, इन्जिनियरिंगवाले / मॆनेजमेंटवाले ) , पर्यावरणवाले ( सर्पमैत्रीवाले / वुई लव्ह डॉग्जवाले /वृक्ष वाचवा वाले / पक्षीमित्रवाले ), समाजसेवावाले ( एड्स-जागृतीवाले / अनाथालयवाले / शस्त्रक्रिया मदत वाले) बँकवाले (पतपेढीवाले / सावकारीवाले / क्रेडिट-कार्डवाले ) इन्शुरंसवाले ( एल आय सी वाले / परदेशी कम्पनीवाले/जीवन बीमा वाले/ जनरल -घर्,हेल्थ्,पीक्,नैसर्गिक संकट वाले), ,क्लासवाले ( दहावी बारावी वाले / कम्प्यूटर क्लासवाले / मेडिकलवाले / आय आय टी वाले) डॊक्टर ( ऎलोपथीवाले / होमिओपथीवाले / यूनानीवाले / पंचकर्मवाले / बाराक्षारवाले / डेंटलवाले / मेंटलवाले / स्त्रीरोगवाले/ रक्त लघवीवाले / हाडवैदू / डोळावाले ) कामजीवनवाले ( तरुणांचे /चाळीशीनंतरचे / बालपणीचे / ब्रह्मचार्‍यांचे ) या सर्व व्यवसायांच्या पूर्वप्रसिद्धीसाठी इव्हेंटचे व्यवस्थापन शिकवू..

ऎडव्हान्स्ड कोर्ससाठी..
यात वेगळे काही करायचे नसते.. तत्त्वे तीच फ़क्त कॅनव्हास मोठा.... अमराठी, बहुभाषिक आणि हिंदी जनतेसाठी , जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी , टीव्ही हक्क, मोठ्या वर्तमानपत्रांना माध्यम प्रायोजक म्हणून निवडणे..
फ़ुटकळ नटनट्या गोळा करून त्यांना फ़ुटकळ प्रॉडक्ट्सचे ( उदा. घड्याळ, शांपू, मीठ, सॉफ़्ट ड्रिंक वगैरे )ब्रँड ऍम्बॆसिडर बनवणे
मोठ्या मोठ्या पत्रकारपरिषदा आयोजित करणे आणि त्यातल्या पत्रकारांना ( आयोजकाच्या खर्चाने ) मुबलक उंची दारू पाजणे....पेज थ्री पार्ट्यांचे आयोजन करणे...
उद्योगपतींच्या मुलामुलींची लग्ने आणि त्यांचे व्यवस्थापन घडवून आणणे ,, त्यात ’संगीत’साठी शाहरुख ला नाचायला बोलावणे, अक्षयकुमाराला दोर्‍यांवर लटकून स्टंट्स करायला बोलावणे ....
कोणत्याही धन्द्याच्या प्रमोशनल इव्हेंट्सचे व्यवस्थापन करून देणे..
( उदा. आठ दहा अर्धवस्रांकिता निवडून त्यांची बीचवेअरमधली छायाचित्रे असलेली दिनदर्शिका काढणे, आणि त्याचा इव्हेंट आयोजित करणे... )


एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच, जरा कल्पनाशक्तीला चालना द्या, इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच.. प्रश्नच नाही... तर मग लागा कामाला... लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा..

या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...
bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager

हे ठिकाण

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

23 Apr 2008 - 2:37 pm | अभिज्ञ

दादानु,ह्यो प्रकार बी लै भन्नाट लिवलाय तुमी.
अभिनंदन,
तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत.
तुमच्या बरोबर एकदा "बसुन"च आपले मार्गदर्शन घ्यावे म्हणतो.-)

अबब

मनस्वी's picture

23 Apr 2008 - 2:45 pm | मनस्वी

खरोखरीच अफाट समुद्रच दिसतोय हा.
चला कल चाचणीच्या तयारीला लागते!

आंबोळी's picture

23 Apr 2008 - 6:11 pm | आंबोळी

तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत.
खरे आहे. कशात करियर करायचे या विषयी एक गायडंस वर्ग काढा भौ....
तसेच कल चाचणी कशी पास करायची याचेही वर्ग काढलेत तर आमच्यासारख्यांना जरा बरे पडेल.

(संभ्रमी)आंबोळी

स्वाती दिनेश's picture

23 Apr 2008 - 7:36 pm | स्वाती दिनेश

इवेंट मॅनेजर चा गायडन्स भन्नाट आहे,:)
स्वाती

विसोबा खेचर's picture

26 Apr 2008 - 4:00 pm | विसोबा खेचर

म्हणतो..!

भडमकमकरशेठ, मस्तच लिहिलं आहे... :)

अजूनही येऊ द्या..

तात्या.

मदनबाण's picture

23 Apr 2008 - 8:40 pm | मदनबाण

योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो...
व्वा गुरुजी मानगया आपको......

अवांतरः--
एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच
मला याची १०० % खात्री आहे.....
जरा कल्पनाशक्तीला चालना द्या
दिली.....
इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच
ह्म्म.....
प्रश्नच नाही...
?
लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा..

या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...
bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager

व्वा संकेतस्थळ उघडायला अजिबात वेळ लागला नाही..... मस्तच !!!!

( इव्हेंट प्रेमी )
मदनबाण

एक's picture

23 Apr 2008 - 11:43 pm | एक

तुमचे हे गायडन्स वर्ग तरूणांना नवीन दिशा देत आहेत. तुमच्यामुळे किती बेकारी कमी होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही.

आम्ही तुमचा एक सत्कार करायच्या विचारात आहोत. तुम्हाला "तरूण्-मित्र" हा पुरस्कार देण्यात येईल. तसच समाजातील क्रियेटीव्ह तरूणांना तुमच्या हस्ते पारितोषिकं देण्यात येतील..
मग करायचा ना सत्कार या शनिवारी..आणि तो १००० चा चेक कलेक्ट करायला आमची माणसं येतील उगाच तुम्हाला कशाला त्या स्टॅम्प्-बिम्प चा त्रास ;-)

विसुनाना's picture

24 Apr 2008 - 2:27 pm | विसुनाना

स्_भडकमकरसाहेब, काय तुफान वक्रोक्ती लिहिताय तुम्ही!(ही वक्रोक्ती नव्हे.)

आमच्या 'जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक' तर्फे आपणास 'अखिल मराठी ई-विश्व वक्रलेखन पुरस्कार' देण्याचे आम्ही मेहेरबानांस जाहीर करतो. माकडवाडी खुर्द ते वाकडवाट बुद्रुक अशी आपली जंगी बैलगाडी मिरवणूक काढण्याची आमची मनिषा आहे.
या वृत्ताला योग्य ती प्रसिद्धी देता यावी आणि बैलगाडीच्या बैलांना चारापाणी व्हावे म्हणून आपण रुपये दहा हजार फक्त मनीऑर्डरने खालील पत्त्यावर पाठवावेतः
स.दा. खाणारे,
चिटणीस,
जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ,
वाकडवाट बुद्रुक,
जि. गडचिरोली.

ता.क. नक्षलवाद्यांना या कार्यक्रमाला हजर न राहण्याचे आमंत्रण देण्यासाठी कदाचित एखादा लाख रुपये लागतील. तेंव्हा कार्यक्रमास येताना त्याचीही तरतूद असावी ही नम्र विनंती.

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2008 - 4:36 pm | भडकमकर मास्तर

अबब, मनस्वी, आंबोळी,स्वाती दिनेश, मदनबाण, एक , विसुनाना आणि तात्या
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....