सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो. सरधोपटपणे "ग्रेसची कविता कळतच नाही" असे म्हणणारे रसिकही आहेत. अनेक प्रयत्नांती ते या निष्कर्षाप्रत येऊन पोचतात किंवा ग्रेसच्या कविता अनाकलनीय असल्याचा पूर्वसमज पूर्वग्रहात रुपांतरीत करून ग्रेसच्या कवितांच्या वाटेला जाण्याचे टाळतात.
अनाकलनीय लेखनाच्या बाबतीत बरेचदा ग्रेसची गुलजारशीही तुलना केली जाते. परंतु एक सामान्य रसिक म्हणून मला गुलजारच्या कवितांमध्ये जी टोकाची प्रतिभा आणि आविष्कार दिसतात, तशी टोके गाठलेली ग्रेसच्या कवितेत पहायला मिळत नाहीत. म्हणजे "इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते" लिहिणाराही गुलजार आणि "आँखे भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती हैं" किंवा "आजा आजा दिल निचोडे" लिहिणाराही गुलजारच. आणि त्यातही "पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकों के नशेमन तक इस मोड से जाते हैं" हे वाचून "म्हणजे काय?!" अशी तात्कालिक प्रतिक्रिया हे नवल नाहीच. ग्रेसच्या बाबतीतही असे "म्हणजे काय" स्वरूपाचे प्रश्न बरेचदा पडत असतातच. जसे - "झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया" यातून काय सांगायचे असेल बरे?
इतके असूनही व्यक्तिशः मला ग्रेसच्या कविता वाचणे, अर्थ लावण्याचा नि समजावून घेण्याचा प्रयत्न करणे (पक्षी झगडणे) आवडते. तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे?
ग्रेसच्या कवितांशी रसिकांचे असे झगडणे, कविता कळण्यातील आव्हान, यांतील खुमारी तुम्ही अनुभवली आहे का? असल्यास या काथ्याकुटाच्या निमित्ताने तुम्हांला आवडलेली ग्रेसची कविता, तिचा थोडक्यात अर्थ किंवा तुम्हांला सर्वाधिक आवडलेल्या तिच्यातील एखाद्या कडव्याचा भावार्थ येथे सांगावा. तुम्हांला त्यांच्या कविता वाचण्याची संधी मिळाली आहे का? नसल्यास सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून तुम्ही ग्रेसच्या कविता वाचाल का?
प्रतिक्रिया
22 May 2010 - 3:04 am | बिपिन कार्यकर्ते
ग्रेस यांचे मनापासून अभिनंदन...
मला मूळात कविता फारशा कळत नाहीत. ग्रेस यांच्या कवितांचे अर्थ लावण्याच्या भानगडीतही मी पडत नाही... पण तरीही त्यांच्या कविता ऐकताना / वाचताना काही तरी वेगळेच / विलक्षण वाचतो आहे असे जाणवत राहते. गवसता गवसता निसटणारे... हूरहूर लावणारे.
बिपिन कार्यकर्ते
22 May 2010 - 6:39 am | मिसळभोक्ता
चार तासात फक्त एक प्रतिसाद.
विदर्भाचा आणि नागपूरचा अपमान करून राह्यलेत तुम्ही !
ता. क. शरदिनीला मिपाभूषण पुरस्कार द्यावा का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
22 May 2010 - 6:42 am | मिसळभोक्ता
तिचा थोडक्यात अर्थ किंवा तुम्हांला सर्वाधिक आवडलेल्या तिच्यातील एखाद्या कडव्याचा भावार्थ येथे सांगावा.
सखी निघाली आभाळातुन, ह्या कवितेचा अर्थ आम्ही लहानपणी लावला, तेव्हा दोन झापडा खाल्ल्या होत्या बॉस. आता नको.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
22 May 2010 - 8:03 am | प्रकाश घाटपांडे
एकदा पुण्यात टिळक स्मारक ला ग्रेस यांचा कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे का अध्यक्ष हे सदा डुंबरे होते. काहीच लोक भाषणाच्या वेळी चुळबुळ आपापसाअ गप्पा मारत होते. त्यांच्या देहबोली वरुन ते स्वतःला हुच्चब्रु समजत असावे असे वाटले. ग्रेस यांनी त्यांच्या या वर्तनाचा व एकुण पुणेरी वर्तनाचा जाहीर व थेट समाचार आपल्या पहाडी आवाजात घेतला. सभागृह चिडिचुप बसले होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 May 2010 - 11:09 am | प्राजु
ती गेली तेवा रिमझिम पाऊस निनादत होता..
मला ही आवडते.
ग्रेस यांचे अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
22 May 2010 - 1:10 pm | डॉ.श्रीराम दिवटे
मेघात अडकली किरणे..
तो सूर्य सोडवित होता.
या ओळीचा अर्थ काही केल्या संदर्भाशी लागेना तेव्हा आईनेच त्याचं स्पष्टीकरण करावं, ही आठवण न विसरण्याजोगी.
सलाम त्या काव्यप्रतिभेला.
22 May 2010 - 1:22 pm | मनिष
ग्रेसच्या कविता मलाही खूप आवडतात. खूप अपेक्षेने त्यांच्या आणि हृद्यनाथ ह्यांचा पुण्यातला कार्यक्रम "ती नव्हती संध्यामधुरा" पहायला गेलो, पण तिथली त्यांची तोंडाची गटार ऐकून/पाहून वैतागलो होतो. रंगमंचावर जाऊन चार खडे बोल सुनवावे अशी इच्छा होती, पण ती आवरली. तेंव्हापासून ते मनातून उतरले ते कायमचेच. :(
त्यांच्या कविता मात्र अजून्ही आवडतात..आणि एखाद्या कॅलिडोस्कोपसारख्या वेगवेगळ्या तुकड्यातुन निरनिराळ्या शब्दप्रतिमा दिसतात...त्या निश्चितच आनंद देतात!
गुलजार आणि ग्रेसची तुलना मात्र पटली नाही, गुलजार इतके दुर्बोध लिहित नाही. त्यांच्या कित्येक गैर-फिल्मी कविता, त्रिवेण्या नितळ साध्या आणि सुंदर आहेत.
22 May 2010 - 10:54 pm | पांथस्थ
म्हणजे नेमके काय झाले?
सहमत आहे. गुलझार विवीध रुपकं वापरतात त्यातली अनेक अतर्क्य असतात पण दुर्बोध मात्र नसतात. त्यांचा त्रिवेणी हा काव्यप्रकार तर समजण्यास अतिशय साधा सोपा पण अर्थपुर्णतेच्या दृष्टिने परिपुर्ण आणि सखोल आहे. (शांता शेळके यांनी केलेला मराठी अनुवादही छानच आहे).
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
22 May 2010 - 11:27 pm | मनिष
कार्यक्रमाला बरेच महिने, खरं तर वर्षे झालीत आता, त्यामुळे सगळेच तपशील आठवत नाही, पण एकूणच त्यांचा टोन अतिशय गुर्मीचा होता. (प्रेक्षकांना) तुमची लायकी आहे का? आरती प्रभूंच्या "समईच्या शुभ्र कळ्या" नाही दिसणार किंवा समजणार तुम्हाला, तुमच्यासाठी नाही करत हा कार्यक्रम आम्ही, आमची वाचा बंद होईपर्यंत करू, किंवा "संभोग" शब्दाचा जरा जास्तच अस्थानी वापर (आणी मी आईबरोबर)...एकूणातच मी किती "भारी" आणि तुम्ही किती सामान्य/मुर्ख असा संवाद तिकिट काढून आलेल्या प्रेक्षकांशी चालला होता....माझ्या तरी मनातून उतरले ते माणूस म्हणून.
त्याच कार्यक्रमात हृद्यनाथांचे सार्वजनिक वर्तन अतिशय साधे आणि सुसंस्कृत वाटले.
नंतर त्यांचे मित्र असलेल्या एका जेष्ठ साहित्यिकाशी ह्याबद्द्ल बोलणे झाले, ते म्हणत होते "तो पिऊन बोलतो बर्याचवेळा", नंतर विचार केल्यावर त्यांचे बोलणे खरे असेल असे वाटले.
इथल्या कोणी पाहिला नाही का हा कार्यक्रम? १-२ वर्षापुर्वी झाला होता पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात...मी ३-४ मित्रमैत्रिणींना ह्याबद्द्ल सांगितले तेंव्हा कळले की त्यांनीही दुसर्यांकडून ह्याची दुष्किर्ती ऐकली होती.
22 May 2010 - 11:50 pm | टारझन
साला.. हे ग्रेस बाबा मराठी आहेत .. हे आज कळलं =))
मी आपला ग्रेस म्हणजे कोणी इंग्रजी कवी असेल असं समजत होतो =))
किती अगाध आहे माझी काव्य प्रतिभा ? =))
- ये-जा
22 May 2010 - 11:52 pm | मनिष
ग्रेस = माणिक गोडघाटे.
नागपूरला एका कॉलेजात मराठीचे प्राध्यापक आहेत.
23 May 2010 - 1:20 pm | सहज
पण एकूणच त्यांचा टोन अतिशय गुर्मीचा होता. (प्रेक्षकांना) तुमची लायकी आहे का? आरती प्रभूंच्या "समईच्या शुभ्र कळ्या" नाही दिसणार किंवा समजणार तुम्हाला, तुमच्यासाठी नाही करत हा कार्यक्रम आम्ही, आमची वाचा बंद होईपर्यंत करू, किंवा "संभोग" शब्दाचा जरा जास्तच अस्थानी वापर (आणी मी आईबरोबर)...एकूणातच मी किती "भारी" आणि तुम्ही किती सामान्य/मुर्ख असा संवाद तिकिट काढून आलेल्या प्रेक्षकांशी चालला होता....माझ्या तरी मनातून उतरले ते माणूस म्हणून.
भारीच दिसतायत ते ग्रेस रावसाहेब.
22 May 2010 - 1:58 pm | वाहीदा
मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीपकाजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
रात्र सूर पेरुनी
अशी ह्ळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधूनी असे
क्षितिज झाकिले कुणी
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनीत हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहू दे..
- ग्रेस
मी निराशेने ग्रस्त होता तू उषा होऊन ये
कोरशी प्राजक्त वेणी कुंतली खोवून ये
या जगाच्या यातनांनी दृष्टी माझी कुंठता
तू उद्याची स्वप्नसृष्टी लोचनी घेऊन ये
जायबंदी आर्ष मुल्ये पाहूनी मी खंगता
दीपसा आरक्त त्यांचा तू टिळा लावून ये
संशयाच्या पायसांनी टोचिता माझी ध्ऱुती
क्षेम द्याया शाश्वताच्या चंदनी न्हाऊन ये
सूर माझा क्षीण होता शब्द होता पारखे
पैंजणे श्रद्धा श्रुतींची तू पदी लेवून ये
- ग्रेस
त्यांची आषाढबन ही कविता कुणाकडे आहे का ??
कवि ग्रेस यांचे मनापासून अभिनंदन... !! =D>
~ वाहीदा
22 May 2010 - 2:44 pm | बेसनलाडू
ही घ्या आषाढबन कविता.
इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये -
तुट्ला चुडा.
इथलीच कमळण,
इथलीच टिंबे
पाण्यामध्ये -
फुटली बिंबे.
इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी -
वितळे पाप.
इथलीच उल्का,
आषाढबनात,
मावळतीची -
राधा उन्हांत.
(दुवादार)बेसनलाडू
22 May 2010 - 8:08 pm | धनंजय
दोघांना धन्यवाद.
मी ग्रेस यांच्या कविता प्रथमच वाचतो आहे. वरील सर्व उदाहरणे आवडली.
22 May 2010 - 2:20 pm | मृगनयनी
'कवी ग्रेस' यान्चे हार्दिक अभिनन्दन!
_______________________
एक शंका : "नागभूषण" म्हणजे नक्की काय ? याचा फणा-वाल्या इच्छाधारी नागाशी काही संबंध आहे का? आणि हा पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रातल्या मान्यवरांना दिला जतो ?
कृपया ज्यांना माहित असेल, त्यांनी विस्ताराने सांगावे..
- अज्ञानी मृगनयनी.
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
22 May 2010 - 2:36 pm | बेसनलाडू
वृत्ताच्या सुरुवातीस म्हटल्यानुसार -
विविध क्षेत्रात विदर्भाचा नावलौकिक वाढवणाऱ्या नामवंतांना नागभूषण फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘नागभूषण पुरस्कार’
यावरून मला असे वाटले की हे नागभूषण म्हणजे नाग(पूरकर)भूषण किंवा नाग(पुरी)भूषण किंवा नाग(पूरचे)भूषण असे काहीसे असावे. नागपूर म्हणजे विदर्भ नाही, हा भाग अलाहिदा. मात्र नंतर असेही वाटले की नागभूषण आडनावाचे कोणी प्रसिद्ध वैदर्भीय व्यक्तिमत्त्व असावे, जिच्या नावाने प्रस्तुत फाउन्डेशनची स्थापना झाली आहे. मिसळपाववरील मूळचे वैदर्भीय सदस्य (मिभोकाका?) अधिक प्रकाश टाकू शकतील, असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
22 May 2010 - 2:51 pm | मृगनयनी
अच्छा अच्छा !.... नागापूरशी संबंधित आहे तर हा पुरस्कार!
म्हणजे आमच्या पुण्यामध्ये जसा "पुण्यभूषण" पुरस्कार दिला जातो! :) ओके ओके!...
______
बेसनलाडू'जी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभारी आहे! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
22 May 2010 - 9:39 pm | टारझन
कवितेचं काही फ्याड नाही :) (कारण कळत नाहीत)
बाकी ,
:) आयला मला तर हे ही माहिती नव्हतं :)
-(पिंपभुषण) पंजा
हे "पिंपभुषण" पिंपरीतल्या "अगाध प्रतिभा" असलेल्यांना प्रतिक्रीया छापुन आल्याबद्दल दिले जाते.
23 May 2010 - 6:32 am | मिसळभोक्ता
यावरून मला असे वाटले की हे नागभूषण म्हणजे नाग(पूरकर)भूषण किंवा नाग(पुरी)भूषण किंवा नाग(पूरचे)भूषण असे काहीसे असावे.
नागभूषण = नाग(पूर)भूषण, असे जरी असले, तरी सर्व वैदर्भीय ह्या पुरस्कारासाठी एलिजिबल आहेत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
22 May 2010 - 2:37 pm | बेसनलाडू
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे - या माझ्या आवडत्या ओळी
(ग्रेसचाहता)बेसनलाडू
22 May 2010 - 2:43 pm | मनिष
हे आमच्या यमनात बांधले आहे म्हटले. ;)
आहा...काय तो मंगेशकरांचा यमन, लताचा आवाज आणि काय ती ग्रेस ची कविता. साला, दिल खूष होऊन जातो एकदम.
22 May 2010 - 2:46 pm | बेसनलाडू
आहा...काय तो मंगेशकरांचा यमन, लताचा आवाज आणि काय ती ग्रेस ची कविता. साला, दिल खूष होऊन जातो एकदम.
(सहमत)बेसनलाडू
22 May 2010 - 3:28 pm | ऋषिकेश
ग्रेस यांच्या कविता वाचून पाहिल्याचे स्मरते.. ज्या बर्याचशा कळल्याच नाहित त्या आवडणे दूरच.. मात्र ज्या कळल्या त्या आवडल्याच नाहित तर मनात घर करून राहिल्या.
निवडूंग चित्रपटात गायली गेलेली हि (गझलसदृश) रचना माझ्या आवडत्या कवितांपैकी एक:
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
22 May 2010 - 9:30 pm | मस्त कलंदर
मलाही हे गाणे खूप आवडते.. तसेच भय इथलेही क्लासच!!!
भय
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
22 May 2010 - 3:39 pm | वाहीदा
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
सुंदर पण चटका लावणार्या ओळी ..
अप्रतिम !!
~ वाहीदा
22 May 2010 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते
हा धागा मेजवानी ठरतो आहे.
बिपिन कार्यकर्ते
22 May 2010 - 4:12 pm | इन्द्र्राज पवार
"....ग्रेसच्या कविता अनाकलनीय असल्याचा पूर्वसमज पूर्वग्रहात रुपांतरीत करून ग्रेसच्या कवितांच्या वाटेला जाण्याचे टाळतात....."
ही धारणा, ग्रेस यांच्या आणि "सत्यकथा" परंपरेतील कित्येक कविंना लागू होते; असे असुनही ग्रेस याना मराठी साहित्याच्या दरबारात जो मानमरातब मिळाला आहे (किंवा आज जो "नागभूषण" सारखा...), मिळत आहे, ते भाग्य क्वचितच अन्य दुसर्या (त्या पठडीतील....) कवीच्या वाट्याला आले असेल. ही ग्रेस यांची गेल्या तीस चाळील वर्षातील कवितेच्या प्रांगणातील अथक तपश्चर्याचे फल होय. ग्रेससारख्या कविला "मासेस"ना समजेल उमजेल अशी कविता लिही असे सांगणे म्हणजे पाऊस घेऊन आलेल्या मेघाला "तू असा बरस, इथे बरस, थोडा वेळ आता थांब..." असा सल्ला देण्यासारखे आहे ज्याला ना तो प्रतिसाद देईल, ना मागुन येणार्याला चार गोष्टी सुनावेल. त्यामुळे वेळीअवेळी येणार्या पावसाला, इच्छा असो वा नसो, आपण जसे सामोरे जातो, तद्वतच ग्रेस यांच्या कवितेच्या वर्षावात चिंब व्हावे.... पडतील ते दोनचार थेंब सहन करावेत, न समजलेले झटकून द्यावेत. त्यांच्यासारख्या कवीला आपल्या कृतीविषयी एक प्रकारच निर्विकार आत्मविश्वास आहे... म्हणजे असे कवी इतरांची मते जरूर ऐकतील, पण अशा सल्ल्यांना ते मान देतीलच याची शाश्वती नसते. ग्रेस एका व्याख्यानात म्हणाले होते, "कवीने मार्ग आक्रमावा तो त्याने आखलेल्या स्वतःच्या बुध्दीने.... त्यालाच ऐकू येत असलेल्या साद आवाजाच्या दिशेने.. हे जर त्याने स्विकारले तरच तो आपले प्रकट्न स्वच्छ आणि मोकळेपणाने करू शकेल..."
"एकल्याने गावे, एकट्याचे गाणे.... परक्याचे नाणे, खरे खोटे..." हेच सूत्र मनी धरून हा कवी आपले आयुष्य जगला आहे, जगत आहे. स्वतःची भावस्थिती इतरांमध्ये निर्माण करण्याचा त्याचा कसलाच प्रयत्न नाही. "मी हे अमुकतमुक लिहीले आहे... बा वाचका ... ते वाच....आणि हर्षभरीत होऊन जा..." हे त्यांच्या स्वीकृत जीवनशैलीत कुठेच बसत नाही.
मला व्यक्तीशा भावलेली त्यांची ही कविता :
घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते
पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी
मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई
शब्दांच्या रंगनाद्स्थळसमय विषयकांच्या संवेदना अत्यंत हळुवारपणे मांडून ग्रेस (किंवा कवी...) स्वतःच स्वतःभोवती गुंफून घेतलेल्या कोशात परततो हे रूपक विलक्षणरित्या प्रतिबिंबित होते.
"नागभूषण" पुरस्काराबद्दल "ग्रेस" यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 May 2010 - 10:47 pm | मनिष
हे सत्यकथा काय आहे हो? 'साधना' पेक्षा भारी आहे का? कधी साधनात प्रसिध्द झाला होता का ग्रेस यांचा लेख? नाही म्हणता? मग कसली त्यांची प्रतिभा....छे!
22 May 2010 - 6:25 pm | भडकमकर मास्तर
हम्म्म्म...
ग्रेस यांच अभिनंदन...
त्यांची दोन तास मुलाखत ("संध्यासूक्ताचा यात्रिक "या नावाने)"उपलब्ध आहे , असे कळाले...
मित्राकडे आहे असे तो म्हणाला, त्याला मागितली...हौसेने ती कॉपी मारून ठेवली आहे....
ग्रेस स्वतः आपल्या काही कवितांचे रसग्रहण करताना त्यात आढळतात...... खूप प्रयत्न करून करून एक सीडी पाहू ऐकू शकलो...
अवांतर : यातले काही म्हणजे काही कळायला तयार नाही.... कविता कळत नाहीच , रसग्रहणही कळत नाही ;) असा एक दिव्य मनोज्ञ विचक्षण अनुभव येतो
कोणी फार उत्साही असेल तर यूट्यूबवर अपलोड करता येते का ते पाहतो
22 May 2010 - 6:27 pm | मनिष
बघायला आवडेल सीडी.
22 May 2010 - 11:58 pm | पांथस्थ
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
23 May 2010 - 12:05 am | मनिष
:( १ तासाची मुलाखात यू-ट्युब वर बघण्याइतके चांगले इंटरनेट कनेक्शन आणि बँडविड्थ नाही हो. मास्तरांकडून सीडी घेईन.
22 May 2010 - 7:28 pm | प्रमोद देव
शरदिनीतैंना ग्रेस ह्यांची कविता झेपत नसेल....तर आम्हा पामरांची काय कथा? ;)
22 May 2010 - 9:43 pm | टारझन
शरदिनी तैंना "चिंचभुषण" पुरस्काराणे सण्माणित करावं असं मी जाहिर प्रतिपादन करतो !!
जियो :)
- (पिंपभुषण) गंजा
हा "पिंपभुषण" पुरस्कार पिंपरीतल्या 'अगाध प्रतिभा" असलेल्यांना प्रतिक्रीया छापुन आल्याबद्दल दिल्या जातो.
23 May 2010 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते
मास्तर त्यांची ती मुलाखत इथे आहे बघा...
मी पण अशीच त्यांची अजून एक मुलाखत 'आई' या विषयावरची अगदी हौसेने बघायला बसलो. काहीच कळले नाही...
बिपिन कार्यकर्ते
22 May 2010 - 10:31 pm | क्रान्ति
आणि त्या काव्याचं सुरेखसं विश्लेषण/रसग्रहण इथं [या चित्रफितीत सुरेश भट यांच्याही काही गझल आहेत.]
मला आवडणार्या ग्रेस यांच्या कवितांत वरील सगळ्याच कवितांचा समावेश आहे, तशीच ही पण कविता अगदी मनापासून आवडणारी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे
तुझी पाउले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारी
न माझी मला अन् तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू? तुझे दु:ख झरते,
जसे संचिताचे ऋतू कोवळे!
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या मनी केवढा
तमातूनही मंद तार्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
क्रान्ति
अग्निसखा
22 May 2010 - 11:09 pm | पांथस्थ
ह्या माझ्या काही आवडत्या ओळी
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
22 May 2010 - 11:16 pm | आनंदयात्री
ग्रेस ...
मनात रुतलेल्या काही ओळी ..
पाउस कधीचा पडतो,
झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली,
दु:खाच्या मंद सुरांने ..
....!!
........!!
...........!!
23 May 2010 - 5:51 am | sur_nair
ते थवे चंद्र सजणांचे , ती भगवी वेडी माया
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया
याचा अर्थ मी लावला तो असा. रात्री झाडाखाली चांदणप्रकाशात बसून तिथेच निजलो आणि पहाटे उठून आकाशातले भगवे, तांबडे रंग अनुभवले.
ग्रेस च्या कवितेचं खूप वाचन नाही पण जे ऐकलय ते आवडलं. thanks everybody for the nice posts. सवडीने वाचीन/ पाहीन.
23 May 2010 - 7:22 am | मुक्तसुनीत
कवी ग्रेस यांच्याशी एक वाचक म्हणून नाते प्रस्थापित करताना संभ्रमाचे ठाणे पुन्हापुन्हा लागत राहाते खरे.
ग्रेसची ओळख मंगेशकरांच्या गाण्यांमुळे झाली. माझ्या पिढीतल्या , माझ्या नंतरच्या अनेक व्यक्तींबद्दल हे म्हणता येईल. ग्रेस च्या कविता भटकळांनी पहिल्यांदा संग्रहित स्वरूपात आणल्या तेव्हा अस्मादिक पाच वर्षांचेही नव्हते. त्यामुळे , ग्रेस हे वाचनालयाच्या आधी गाण्याच्या कॅसेट्स मधून भेटले. त्यानंतर या गाण्यांचे बोट धरून त्यांचे तीन काव्यसंग्रह आणि दोन लेखसंग्रह , काही मुलाखती अणि काही समीक्षा यांच्यातून ग्रेस क्रमाक्रमाने पुढे येत गेले. त्यांच्यावर पुष्कळ लिहिले गेलेले आहे. मला जाणवलेले काही गुणधर्म :
१. ग्रेसचे साहित्य पुढे-मागे जाऊन वाचल्यावर एकच एक मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो : आत्ममग्नता. या माणसाकरता काळ थांबला आहे. सामाजिक संदर्भ जवळजवळ नसल्यासारखे. माणसांच्या वैयक्तिक/सामूहिक सुखदु:खांशी , इतर कुणाच्या कसल्याही गोष्टीशी कसला म्हणून संबंधच नाही. त्यांच्या आईची महाप्रतिमा, त्यांच्या प्रिय व्यक्ती/व्यक्तींची महाप्रतिमा यांच्याबद्दलचे विचार/भावना/विकार या सर्वांना एकमेव अधिष्ठान आहे : ते स्वतः. बस्स.
२. अभिव्यक्तीची शैली : प्रतिमांची बहुलता, शब्दांची निवड, रचना, भाषेचे भरजरीपणै. इ.इ. इ. या बाबत असंख्य लोकांनी असंख्य प्रकारे लिहिले आहे - सर्वात जास्त खुद्द ग्रेसनीच. भलेभले त्यांच्या प्रेमात आहेत. भल्याभल्यानी ग्रेसना समजावण्याचे शिवधनुष्य पेललेले आहे.
हे सारे समजून झाल्यावर हाताशी जे उरते त्याला माझ्यापुरते संभ्रम इतकेच म्हणता येईल. कवीच्या दु:खाची जातकुळी काय आहे ? दु:ख नक्की कशाचे आहे ? ते मांडण्याची जी धारदार पद्धती आहे, त्याच्या जखमा होतात परंतु त्यामागची कारणीमीमांसा कळत नाही.
एक आखरी कन्फेशन : काही कविता वाचतो, लेखांची काही पाने वाचतो आणि वाटते : इतके घुटके सध्या पुरेत. नशा देणार्या असंख्य गोष्टी जगात मिळतात. त्यातल्या अल्कोहोलयुक्त काही गोष्टी घरात आहेतसुद्धा. अधूनमधून आपण त्यांचा आनंद घेतोच. परंतु हे (द्रव)पदार्थ म्हणजे पौष्टिक अन्न नव्हे ही खूण मला (सुदैवाने ? दुर्दैवाने ?) खूप आधीच पटलेली आहे. थोडक्यात ग्रेस हा घुटक्याघुटक्याने घ्यायचा एक पदार्थ आहे. त्याची चव छान आहे. नशा येते. हे सर्व खरे आहे. कलेचा हेतू इतकाच असावा असे मान्य केले तर ग्रेस या प्रकाराची परमावधी गाठतात खरे. पण हे घुटके घेऊन मी अन्य पदार्थांकडे फार चटकन वळतो :-)
23 May 2010 - 11:12 am | मनिष
मुसुचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच सुंदर आणि समंजस. आत्ममग्नतेबद्द्ल १०१% सहमत. मुसु ज्याला घुटके घेणे म्हणतात तसेच मला ह्यातुन (तुकडे आणि कॅलिडोस्कोप) म्हणायचे होते -
23 May 2010 - 11:24 am | बिपिन कार्यकर्ते
याच प्रतिसादाची वाट बघत होतो. उत्तम प्रतिसाद.
बिपिन कार्यकर्ते
23 May 2010 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवी ग्रेस यांच्या कविता खूप सुंदर असतात. ग्रेट कवी. कवितेतून एक वेगळाच कवी डोकावतो. प्रतिभा असावी तर अशी, अशा विविध सांगोवांगीच्या प्रभावाने त्यांची कविता वाचत गेलो. पण त्यांच्या कविता काही मला प्रिय झाल्या नाहीत. पण त्यांच्या कवितेविषयी, काही लेख वगैरे छापून आल्यावर आवर्जून वाचतो. 'संध्या़काळच्या कवितांमधील' आता त्यांच्या कविता काही आठवत नाही. पण त्यांच्या कवितेवरुन मला असे वाटले की, तुकडे तुकडे एकत्र करुन चिटकवलेली ती कविता आहे. प्रतिके-प्रतिमांचा क्लिष्ट किलबिलाट जाणवतो. त्यांच्या कवितेत दु:ख व्यक्त होत आहे असे वाटते पण त्या दु:खाची जाणीव वाचक म्हणून माझ्यापर्यंत का पोहचत नाही, त्याचे कारण सापडत नाही. कवीची कविता एकाकीपण-दुबळेपण व्यक्त करते असते असे वाटत राहते. वर प्रतिसादात उल्लेख आलाच आहे,त्यांच्या त्या 'आत्ममग्नतेचा' आपल्यातच रमणे हा कवीचा स्थायी भाव वाटत राहतो. सूर्य,चंद्र,तारे,शिल्प, अशा प्रतिमांचा बहर सतत जाणवतो. पण अर्थाच्या बाबतीत त्यांची कविता आनंद देत नाही. असे का व्हावे,याचेही उत्तर मात्र कळत नाही. वाचकांनी त्यांच्या कवितेतील शब्द, प्रतिमा-प्रतिभा यांच्या माध्यमातून एक अद्भूत अशा आशयाचा शोध लावावा असा एक अर्थ ध्वनीत होतो. कवितेत मधेच कुठेतरी काही पौराणिक संदर्भ, तर कधी परदेशातील काही प्रतिमा अशा बर्याच गोष्टींची सरमिसळ जाणवते. कधी तर निरर्थक शब्दांचे मनोरे रचणारी कविता त्यांची वाटते. पण काहीही म्हणा, त्यांची कविता कोणत्या तरी पातळीवर आपला आशय अतिशय दर्जेदारपणे व्यक्तच करीत असावी. त्याशिवायच का त्यांच्या कवितेवर साहित्यविश्वात इतकी चर्चा होत असते.
दुर्बोधतेवरुन आठवण झाली. ते मागे आजारी होते. दवाखान्यात उपचार घेत असतांना की,उपचार झाल्यानंतर त्यांनी मंगेशकर कुंटुंबिंयाबद्दल ऋण व्यक्त करणारे पत्र दै.सकाळ की दै. लोकमतमधे लिहिले होते. आता पत्र म्हटले की ते साधे असावे ना ! पण, अंहं, एका वाक्यात एक तर दुस-या वाक्यात दुसरेच काही तरी संदर्भ...पण पत्र शेवटपर्यंत वाचत गेलो. शेवटी, सारांशाने जाणवले ते इतकेच की, पत्रातील जाणीव अतिशय हळवी आणि मंगेशकर कुंटुंबाविषयी किती बोलू आणि किती बोलू नको असा भाव आणि प्रेम व्यक्त करणारी आहे.
असो, तेव्हापासून ठरवले हा कवी आपल्याला कळो की न कळो, त्यांच्यावर वाचायला जे-जे मिळेल त्याची संधी मात्र सोडायची नाही.
-दिलीप बिरुटे
23 May 2010 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते
हा कवी आपल्याला कळो की न कळो, त्यांच्यावर वाचायला जे-जे मिळेल त्याची संधी मात्र सोडायची नाही.
अगदी हेच म्हणतो.
बिपिन कार्यकर्ते
23 May 2010 - 12:27 pm | दत्ता काळे
एप्रिल २००९ मध्ये मला कवी ग्रेस, पं. ह्रदनाथ मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय ह्याच्या एका खाजगी मैफील आणि गप्पागोष्टींच्या कार्यक्रमाचा योग आला. इचलकरंजीला श्री. दिलिप शेंडे ह्या पं. ह्रदनाथ मंगेशकर ह्यांच्या चाहत्याच्या घरी हा कार्यक्रम होता. कार्यक्रम खूपच चांगला झाला. कवी महाशय अतिशय खुलून बोलत होते. त्यांनी स्वत :च्या कवितांचा अर्थ सांगितला तसेच 'मृगजळाचे बांधकाम' आणि 'मितवा' ह्या पुस्तकांतल्या कविता /लेखांचा भावार्थ ( कारण त्याचे लेखनसुध्दा पटकन कळंत नाही ) त्यांनी कार्यक्रमात सांगितला होता. '
'माहेराहून गलबत आले' ह्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेखाचीसुद्धा मिमांसा केली.
दु:खाची सल उलगडून दाखविणार्या गूढमनाच्या ह्या कवीला सलाम.
23 Oct 2010 - 2:04 am | बेसनलाडू
नागभूषण पुरस्कार स्वीकारताना कवी ग्रेस यांनी विचारलेला प्रश्न! सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
(वार्ताहर)बेसनलाडू