'स्वाती राजेश' ह्यांनी आज सुरू केलेला 'शाळेतील गमती जमती' हा धागा पाहिला आणि शाळकरी जीवनातल्या आठवणींबद्दल मी लिहिलेली एक कविता इथे द्यावं असं वाटलं :)
----------------------------------
काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे....
सकाळ, दुपार, संध्याकाळ..वेगवेगळ्या तासांचे
आनंद, कंटाळा, मस्ती अशा भाव आणि भावनांचे
गणिताच्या पायाचे, कवितेच्या झुल्यांचे
जीव-भौतिक-रसायनच्या इति-भूगोल-नाशाचे... १
टोपणनावांनी हाक मारून सगळ्यांना बोलवायचे
दंगा-मस्ती करताना तहान-भूक विसरायचे
तसे निरागस होते दिवस पण बिलंदरही बनायचे
गृहपाठ नाही केला तर, "वही विसरलो" सांगायचे...२
पाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे
'लहानपण देगा देवा', अग्गदी खोटं वाटायचे
चांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे
तीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे...३
मधल्या सुट्टीचे खेळ, आधीच्या तासांना ठरवायचे
रडीचा डाव खेळला तर कडकडून भांडायचे
सुट्टी संपण्याआधी मात्र सगळं विसरून जायचे
आपल्या डब्यांची बिनधास्त वाटावाटी करायचे... ४
आवडीच्या तासाला अगदी मनापासून रमायचे
नाटकाच्या तालमींना सगळ्यांआधी पोचायचे
मुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे..पण
अर्ध्या कळत्या वयातले स्वप्नं रेशमी गुंफायचे... ५
किती धन गोळा करतोय, तेव्हा नाही समजायचे
अजून काय घेऊ शकू, तेही नाही उमगायचे
पण खरंच....काय दिवस होते ना शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे...
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे... ६
----------------------------------
माझा ब्लॉगः www.atakmatak.blogspot.com
----------------------------------
प्रतिक्रिया
20 May 2010 - 10:56 pm | बेसनलाडू
बालपण सदैव नटवायचं असतं ही माझी कविता आणि मिलिंद बोकील यांच्या अजरामर शाळेची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू
21 May 2010 - 12:22 am | फटू
मुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे..पण
अर्ध्या कळत्या वयातले स्वप्नं रेशमी गुंफायचे...
हे मस्तच.
मिलिंद बोकिल यांची शाळा खरंच अजरामर आहे. पौंगडावस्थेतील मुलांचं भावविश्व उलगडणारी ईतकी सुरेख कलाकृती जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नसेल !
- फटू
20 May 2010 - 10:58 pm | शुचि
तसे निरागस होते दिवस पण बिलंदरही बनायचे
गृहपाठ नाही केला तर, "वही विसरलो" सांगायचे...२
=)) =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
21 May 2010 - 12:03 am | निखिल देशपांडे
थोड्या वेळापुर्वीच त्या धाग्याव्र प्रतिसाद टाकला आणि नंतर तुमची आणि बेला ची कविता वाचली..
लै भारी..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
21 May 2010 - 8:23 am | चित्रा
लहानपणात घेऊन गेली.
21 May 2010 - 8:32 am | विकास
खूपच मस्त कविता आहे. कागज की कश्ती या गझलची आठवण झाली.
मुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे.
हे एकीकडे जितके खरे होते तितकेच एकमेकांशी भांडणे देखील आमच्या वर्गाच्या बाबतीत खरे होते :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 May 2010 - 10:19 am | स्पंदना
पाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे
'लहानपण देगा देवा', अग्गदी खोटं वाटायचे
चांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे
तीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे...३
सही सही!!
हे एकीकडे जितके खरे होते तितकेच एकमेकांशी भांडणे देखील आमच्या वर्गाच्या बाबतीत खरे होते
:))
तुमच्या वर्गाच अस होत तस माझ्या लेकिच्या वर्गात पण हाय बघा!
सार् या पोरी धरुन पोरस्नी पिटतात.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.