सिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
14 May 2010 - 12:36 pm

"अबे पश्या! साल्या, १ तास झाला बसची वाट बघतोय" स्वानंद
"येईल रे... मी नेहमी इथूनच (राजाराम पुल) सिंहगडला जाणारी बस पकडतो"
"सकाळच्या ६ पासून उभे आहोत इथे... आता ७.१५ झाले... ७ च्या आत सिंहगड चढायला सुरुवात करायचा बेत होता आपला... आत कसले आपण तोरण्यावर पोचतोय एका दिवसात... शक्यच नाही..."
"पोचणार रे... समजा ८ ला सिंहगड चढायला सुरुवात केली, तर ९ ला वरती... मग साधारण संध्याकाळी ५ ला राजगडावर आणि मग रात्री १० पर्यंत तोरण्यावर... काळोख पडला तरी चालत राहायचं... ही बघ! बस पण आली..."

सिंहगड चढायचा, मग डोंगर रांगेवरुन विंजरहून राजगड आणि मग डोंगर रांगेवरुन तोरणा... हे सगळं एका दिवसात करायचं... असा आम्हा तिघांचा (मी, प्रसाद आणि स्वानंद) बेत होता...

सकाळी ८ वाजता सिंहगडाच्या पायथ्याला पोहचलो... जोरात भुक लागली होती... थोडा पोटोबा करुन चढायला सुरुवात करु म्हंटल तर स्वानंद म्हणे "काय मस्त वातावरण झालयं... आता खाण्यात वेळ नको घालवायला... वर खाऊत काहीतरी..."

मग उपाशी पोटीच सिंहगड चढायला सुरुवात केली... ९ वाजता देव टाक्याजवळ पोहचलो... न खाताच कल्याण दरवाज्यातुन बाहेर पडलो... वाटेत कल्याण गावतून दही-ताक विकायला गडावर येणार्‍या मावशी भेटल्या... दोन-दोन वाटी दही खाल्लं आणि डावीकडे कल्याणला उतरणारी वाट सोडून उजवी कडची वाट धरली... ढगाळ वातावरण असल्यामुळे तळातल्या गावांवर ढगांची सावली पडली होती... वारा आला की ढग हलायचे आणि उन्ह पडायचं... हा उन्ह-सावलीचा खेळ बघत आम्ही डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालत होतो... दूरवर राजगड-तोरणा दिसत होते...

वणव्यामुळे डोंगर उघडे-बोडके झाले होते आणि पायवाट अगदी स्पष्ट जाणवत होती... उन्ह जास्त नव्हतं... पटपट चालत बरचं अंतर कापलं... गुरांच्या वाटांच जाळंच होतं... सरळ डोंगररांगेच्या माथ्यावरुन जायच्या ऐवजी एका जागी डावीकडे वळलो... काय भन्नाट वाट होती!... उजवीकडे डोंगर आणि डावीकडे प्रचंड उतार... खरंतर वाट नव्हतीच... एक वीतभर जागा... भयंकर उतार आणि घसारा... तारेवरची कसरत करत पुढे सरकत होतो... मग ही वाट सोडली आणि उजव्या हाताला सरळ रेषेत वर चढून डोंगररांगेचा माथा गाठला... मागे वळून पाहिलं तर माथ्यावरुन फारच सोपी वाट दिसली... घोटभर पाण्याने घसा ओला केला आणि पुन्हा चालायला लागलो... उन्हामुळे डोंगर कोरडे पडले होते आणि त्यात वणवा, पण अश्या अवस्थेत सुध्दा सुंदर, नाजुक फुल आभाळाकडे बघून हसत होतं... सृष्टीतल्या चैतन्याची जाणीव करुन देत होतं...


आता शेवटचं टेपाड डावीकडे ठेवून घसारा असलेल्या वाटेने पलीकडे पोहचलो... तळात विंजर आणि समोर राजगड-तोरण्याची जोडी नजरेस पडली...

वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेळ लागत होता, म्हणून जास्त वेळ वाया न घालवता विंजरला उतरायला लागलो... साधारण दुपारी १२.३० ला खाली पोहचलो... आम्ही शेतावरच्या वाडीवर उतरलो होतो... विंजर गाव अजून अर्धा-पाऊण तासाच्या चालीवर होतं... वाटेत एक धनगरवाडी लागली... एका आजीनं आवाज दिला आणि जवळ बोलवून घेतलं... पाणी प्यायला दिलं...
म्हणाली "का रं फिरता येवढ्या उन्हाचं?... उन्ह लागून आजारी पडला म्हणजे?... "
आजीच्या ह्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हतं... आजीशी थोडावेळ गप्पा मारल्या आणि पुन्हा चालू लागलो... दुपारी १.३० वाजता विंजर गावात पोहचलो... नसरापुर-वेल्हे रस्ता पार करुन शेतातुनच साखरच्या दिशेने निघलो... साखरच्या आधी कानंदी नदी लागली... तोरण्याच्या मागे बांधलेल्या धरणामुळे नदीला भरपुर पाणी असतं... भर उन्हात, पाणी भरुन वाहणारी नदी दिसली तर काय करणार दुसर?... मस्तपैकी पोहलो...

(स्वानंद आणि मी)

पुन्हा चालायला सुरुवात केली... साखर, चिरमोडी आणि मग गुंजवणे... दुपारी ३.३० ला गुंजवण्यात पोहचलो... सकाळ पासून दोन वाटी दही आणि एक सफरचंद येवढच खाल्लं होतं... मग गुंजवण्यात पोहे खाल्ले आणि चोरवाटच्या दिशेने निघालो... चढत असताना आभाळ भरुन आलं... जोरात गडगडु लागलं आणि संध्याकाळच्या चंदेरी-सोनेरी उन्हात पाऊस पडला... गडावर जाणारी भिजलेली वाट चंदेरी प्रकाशात मस्त चमकत होती...

दमलेल्या शरीरात ओल्या मातीच्या सुवासाने आणि गार वार्‍याने नवा जोश भरला... थोड्याच वेळात चोर-दरवाज्यातुन गडावर प्रवेश केला तेव्हा ५.३० वाजले होते... गडावर कोणीच नव्हतं... फार निवांत एकांत होता... अजून तोरणा गाठायचा होता... स्वानंदची वाट बघत पद्मावती तलावाच्या काठी बसून राहिलो... ६ वाजता स्वानंद गडावर पोहचला... आणि म्हणाला "आता अजून एक पाऊल सुध्दा मी उचलू शकत नाही... तोरण्याला मी नाही येऊ शकणार... पण तुम्ही जाऊ शकता... मी अडवणार नाही..."
खरंतर मी आणि प्रसाद खूप दमलो नव्हतो... तोरण्या पर्यंत अजून ४-५ तास चालू शकलो असतो, पण स्वानंदला मागे टाकून जावं वाटलं नाही... स्वानंद तयार असता तर रात्री ११ पर्यंत तोरण्यावर पोहचलो असतो...

मग तोरण्याचा बेत रद्द केला आणि सुर्यास्ताची वाट बघत बसलो... तोरण्याचा मागे सुर्य बुडू लागला आणि सारं आकाश गडद तांबूस झालं... आज फार सुंदर आणि अविस्मरणीय सुर्यास्त अनुभवला...

काळोख पडताच 'मुक्काम कुठे करायचा?' असा विचार सुरु झाला...
"मुक्काम कुठेही करुत पण सुर्योदय मात्र बालेकिल्ल्यावरुनच बघायचा" असं स्वानंद म्हणाला... मग मुक्कामच बालेकिल्ल्यावर करुया असं ठरलं... बालेकिल्ला चढताना अजून दोन भटक्यांशी ओळख झाली... मग आम्ही पाचजणांनी मिळून जे काही आणलं होतं ते खाऊन घेतलं... आणि उघड्यावरचं झोपायची तयारी केली... सोसाट्याचा वारा होता, मग झोप कसली लागणार?... नुसते ह्या कुशीवरुन त्या कुशीवर करत होतो... मग शेवटी पहाटे ४ वाजता झोपेचा नाद सोडला आणि नभांगण निरखत बसलो...

(हा पण आमच्या सोबतीला होता...)

बालेकिल्ल्यावरुन सुर्योदय अनुभवला आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात बालेकिल्ला भटकलो...

(बालेकिल्ल्यावरुन कोकणाकडचा नजारा...)

(बालेकिल्ल्यावरुन दिसणारा पाली-दरवाजा...)

रवीवारी घरी जरा काम असल्यामुळे तोरण्यावर न जाता परतीचा प्रवास सुरु केला... वाटेत सुंदर पांढर्‍या-शुभ्र फुलांचा हलका गंध हवेत तरंगत होता...


गुंजवण्याहून दुपारी ११ ची बस पकडून पुण्यात पोहचलो तेव्हा पुढच्या वेळी "सिंहगड-राजगड-तोरणा" हे एकाच दिवसात करायचे असा विचार डोक्यात चालूच होता...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

प्रवास

प्रतिक्रिया

चेतन's picture

14 May 2010 - 12:43 pm | चेतन

सुंदर फोटो आणि मस्त वर्णन

नेहमी तुझा हेवा वाटतोच...

चेतन

अमोल केळकर's picture

14 May 2010 - 12:45 pm | अमोल केळकर

जबरदस्त !
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद !!

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अमोल केळकर's picture

14 May 2010 - 1:27 pm | अमोल केळकर

तुम्ही दोघे पोहत असताना फोटो कुणी काढला ? :)

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

भारद्वाज's picture

14 May 2010 - 12:46 pm | भारद्वाज

मस्त मस्त मस्त मस्त.
जय महाराष्ट्र

मी_ओंकार's picture

14 May 2010 - 12:49 pm | मी_ओंकार

तुझ्या लेखांना काय प्रतिसाद द्यायचा हे आता सुचतच नाही. नेहमीप्रमाणेच उत्तम. लवकर पोचायची गडबड लेखातून जाणवतेय. :P.

- ओंकार.

विमुक्त's picture

14 May 2010 - 4:34 pm | विमुक्त

हो ना... जमलं असतं सहज एका दिवसात तीन्ही किल्ले... आता पुढच्या वेळी नक्की...

jaypal's picture

14 May 2010 - 12:50 pm | jaypal

सुंदर भटकंती आणि सही वर्णन. फोटो तर " मार डाला" =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

राघव's picture

14 May 2010 - 12:56 pm | राघव

विमुक्ता,
तू अन् तुझे सवंगडी, तुम्ही खूप नशीबवान अन् तेवढेच वेडू लोकं आहात! तुमच्या भटकण्याच्या हौसेला सलाम! :)
फोटू अप्रतीम! विशेषतः ते दुसर्‍या व तिसर्‍या फोटोज मधे दिसणारे फुलझाड.. मागच्या उघड्या बोडक्या डोंगररांगांच्या पार्श्वभूमीवर जास्त उठून दिसतंय!
अन् तो वरून सहावा आकाशाचा फोटू तर क्या कहने! खूप आवडेश!
बाय द वे, कॅमेरा कोणता वापरतोस रे?

राघव

विमुक्त's picture

14 May 2010 - 4:32 pm | विमुक्त

canon ixus 2... 3.2 mpixel... 2x optical zoom...

राघव's picture

14 May 2010 - 5:17 pm | राघव

देव करो तुला असे वाटू देत की आपण मोठा कॅमेरा न घेऊन स्वतःवर अन् पर्यायाने आमच्या सारख्या दर्शकांवर अन्याय करत आहोत.
तुझी फोटूच्या फ्रेमची निवड छान आहे, जे सगळ्यात महत्त्वाचे फोटू काढतांना. ते नसले तर कोणताही कॅमेरा असू देत फोटू तेवढे भिडत नाहीत. मला वाटतं तू एक DSLR विकत घेण्यात आता वेळ दडवू नयेस. खूप फिर अन् खूप फोटू काढ. अनेकानेक शुभेच्छा! :)

राघव

विमुक्त's picture

17 May 2010 - 2:11 pm | विमुक्त

DSLR लयंच महाग असतो... पण अजून चांगला कॅमेरा घ्यायला हवा हे खरंय...

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2010 - 2:33 pm | बिपिन कार्यकर्ते

मायला... काय माणसं आहेत का भुतं?

बिपिन कार्यकर्ते

विमुक्त's picture

14 May 2010 - 4:36 pm | विमुक्त

:)... मजा असते भरपुर दमण्यात... भर दुपारी माणसंच काय तर सारे पक्षी/प्राणी सुध्दा सावलीत आराम करतात... आणि आपण मस्त उन्हात शेकत चालत असतो... छान वाटतं...

संदीप चित्रे's picture

14 May 2010 - 7:21 pm | संदीप चित्रे

माझ्या मनातले विचार रे बिका :)
ही भुतं अशीच भटकती राहोत ह्या शुभेच्छा !

स्वाती२'s picture

14 May 2010 - 4:55 pm | स्वाती२

नेहमीप्रमाणेच सुरेख फोटो आणि वर्णन!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2010 - 5:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाव ... (यापुढे शब्द नाहीत!)

अदिती

मदनबाण's picture

14 May 2010 - 5:45 pm | मदनबाण

झकास्स्स्स्स... :)

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

सुमीत भातखंडे's picture

14 May 2010 - 6:07 pm | सुमीत भातखंडे

ऑसम. वर्णन आणि फोटो दोन्ही छान.

भडकमकर मास्तर's picture

15 May 2010 - 1:35 am | भडकमकर मास्तर

काय चालता रे दिवसात?
.. लै मजा आली तुमच्याबरोबर फिरून...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

अरुंधती's picture

15 May 2010 - 6:33 am | अरुंधती

सुंदर फोटोज व वर्णन! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रचेतस's picture

15 May 2010 - 9:25 am | प्रचेतस

भर उन्हात जबराट प्रवास...............
तु खरेच इतर कटकटींपासून पुर्णपणे विमुक्त आहेस. फक्त निसर्गातच आणि निसर्गासाठीच जगतोस. हेवा वाटतो तुझा.