२१ व्या शतकाच्याबाबतीत असे म्हटले जात आहे कि विज्ञान कल्पनेपेक्षाही जास्त प्रगती करणार आहे आणि संपूर्ण जगच आता एक छोटेसे खेडे वाटावे अशा रीतीने जुळले जाणार आहे किंबहुना ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरु झाली आहे असे म्हणण्यासही प्रत्यवाव नसावा. आंतरजालीय जादूने ही किमया तर केली आहेच, पण येथून पुढेही अविश्वसनीय अशा प्रगतीची दारे मानवासमोर उघडली जाणार आहे यात कोणत्याही सुशिक्षित मनाला संदेह न वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे.
अशा पार्श्वभूमीवर या निमित्ताने आपण असे का विचार करू नये कि आपल्या रुढी, परंपरा, विधी, धर्मात घट्ट रुजून बसलेल्या काही संतापजनक चालीरीती आता नव्या दृष्टीने तपासून मगच आचरणात आणल्या पाहिजेत? मी असे म्हणणार नाही कि "जुने सर्वच जाळूनी किंवा पुरुनी टाका".... पण निदान आपल्या वैज्ञानिक विचाराशी सुसंगत नसणा-या काही बाबींना पूर्णविराम देणे गरजेचे आहे असे मत मांडले तर त्याला कुणी 'धर्म बुडव्या' म्हणेल काय?
घरात मृत झालेल्या व्यक्तीची काही इच्छा अतृप्त राहिली आहे किंवा असेल या समजुतीतून निर्माण झालेली (नव्हे तर पक्की रुतून बसलेली) प्रथा म्हणजे "पिंडविधी " आणि त्यातील "कावळ्याची" अहम भूमिका ! या अनुषंगाने आलेले दोन अनुभव व यातील मला (वैयक्तिकरित्या) जाणीवलेले फोलपण आपणासमोर मांडीत आहे.
डिसेंबर मध्ये एक व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एक अशा दोन मृत्यू घटना माझ्या परिचयाच्या संदर्भात घडल्या. पहिला मृत्यू खुद्द माझ्या नात्यातील एका साधारणत: ४०-४२ वर्षाच्या पुरुष व्यक्तीचा ज्याची अति मद्यप्राशनामुळे दोन्ही फुफुसे बिलकुल निकामी झाली होती व त्याचे मरण अटळ होते. तर दुसरे फेब्रुवारी महिन्यातील.... माझ्या मित्राचे आजोबा, ज्यांचे वय ८० च्या पुढील व ज्यांनी आपले आयुष्य अत्यंत सुखी समाधानाने व्यतीत केले आहे असे होते. पहिली व्यक्ती - माझा नातलग - हा "मराठा" समाजातील, तर मित्राचे वडील कोकणस्थ ब्राह्मण ! पहिल्याने आयुष्याचा अगदी कचरा करून टाकला होता. "प्रापंचिक जबाबदारी" नावाची भाजी कुठल्या बाजारात मिळते याचा याला उभ्या आयुष्यात पत्ता लागला नाही, किंवा त्यानेही बेफिकीरपणे त्याचा विचारही केला नाही. आमच्या "मराठा" समाजात एक पलायनवादी (सु?) विचार आहे - तो असा - "जाऊ दे रे, अजून लहान आहे, जरा इकडे तिकडे होणारच की, एकदाचे लग्न करून टाका, मग बघा गडी कसा वळणावर येतोय ते !" आता हा लेकाचा कधी "सरळ" रस्त्याने चाललाच नाही, तर मग लग्नानंतर "वळणावर" कसा येईल यावर भाष्य करायला कुणी पुढे येत नाही. मराठा जातीत तर "मुलगी" म्हणजे कळसूत्री बाहुलीच असते (काही सुशिक्षित घराण्यात अपवाद असतीलही, परंतु ती उदाहरणे म्हणजे "अपवाद" ही संकल्पना सिद्ध करायापुरतीच). थोरली मंडळी ठरवतील त्या नगाबरोबर मांडवात उभे राहायचे, माळ घालायची, त्याच्या नावाने कुंकू लावायचे, आणि दुस-या दिवसापासून त्या एकत्र कुटुंबातील एक "आवाज न करणारे भांडे" होऊन पेचून जायचे. आता लग्न झाल्यावर हा नातेवाईक "सुधारेल" म्हणून कुणी गणपती पाण्यात टाकून बसत नाही, किंबहुना असा सल्ला देणारेही आता दुस-या गल्लीत तंबाखू चुना मळायला निघून गेलेली असतात. निसर्गनियमानुसार (तो थोडाच थांबतो?) या बर्ची बहाद्दराला एक नाही तीन मुले (त्यातही दोन मुली) झाल्या व आपले पुरुषत्व सिद्ध झाले म्हणून गडी हरखून टूम झाला. आधीच मर्कट तशात मद्य प्याला म्हणजे काय होईल हे सांगायला यल्लमा देवी व शंकरोबा यायची गरज नसते. शरीराचा नाश झाला (किंवा करून घेतला...) आणि एके दिवशी दिवटी विझून गेली.
दुसरे ते मित्राचे आजोबा. खास कोकणस्थी रूप, करारी चेहरा, चार चौघात फिरायचे त्यावेळीही त्यांचा आवाज आम्हा मित्रांना जाणवायचा, विशेषत: त्यांचे घारे व विलक्षण तेजस्वी डोळे. विनोद (माझा मित्र) व मी प्राथमिक शाळेपासून एकत्र असल्याने त्यांच्या घरी माझी अगदी स्वयंपाक घरापर्यंत ये-जा असायची. इंग्लिश भाषेवर उत्तम प्रभुत्व तर होतेच पण शास्त्रीय संगीतावर त्यांच्याकडून आठवणी ऐकणे हा एक आनंद होता, विशेषत: कुमार गंधर्व आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर ही तर त्यांची श्रद्धास्थाने. दोन मुले, दोन मुली. विनोदचे वडील सरकारी वर्ग-१ अधिकारी, तर चुलते नावाजलेले कारखानदार. एक मुलगी कॅनडा येथे लग्नानंतर कायमच्या वास्तव्यास, तर दुसरी बँक अधिकारी आणि पणजी येथे आपल्या संसारात रममाण ! सर्वांची मिळून ६ नातवंडे, तीही उच्चविद्याविभूषित होऊन आपआपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यास आतुर ! थोडक्यात काय तर, विनोदच्या आजोबांचे आयुष्य एक अत्यंत यशस्वी म्हणून ओळखले जात असे. जितका घरी मान, तितकाच गावातही. मला तर माहित आहे कि एकदाही कुणी चुकूनदेखील या माणसाविषयी वाईट बोलले नाही.
चला ~~ आता एकाच गावातील या दोन भिन्न व्यक्ती परलोकवासी झाल्या व मरणोत्तर परिस्थिनुसार धर्माविधीही चालले. मी दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून हजर असल्याने या विधीतील फोलपणा फार म्हणजे फार तीव्रतेने जाणीवला.
कोल्हापुरात "मुक्तिधाम" या ठिकाणी हिंदू धर्मीयांची दहनाची सोय आहे. त्यानुसार या दोन्ही देहांवर विधीनुसार अग्नी संस्कार करण्यात आले व येथे या बाबतीतील पहिला अध्याय संपला. आता रक्षा विसर्जन व पिंड दान....येथून जातीचे चटके बसू लागतात. मराठा समाज ज्या ठिकाणी चिता, त्याच ठिकाणी पिंडदानाचे सोपस्कार करतो, तर ब्राह्मण चिता जरी एका ठिकाणी असली तरी, रक्षा विसार्जानंतर त्या जागेची केवळ पूजा करतात व पिंडदान विधी पंचगंगा नदीजवळील एका विशिष्ठ जागेत साग्रसंगीत रित्या पार पाडतात. असे का? तर याला काही उत्तर नाही, पण जाणकारांच्या मते (हे मी जाणीवपूर्वक माहित करून घेतले....) "मराठा" समाज पिंड दिवशी जे अन्न आणतो ते पूर्णत: "मांसाहारी" असते. म्हणजे त्यात शाकाहारी पदार्थ नसतात असे नाही, असतातदेखील, पण मांसाहाराचे प्रमाण हे जवळ जवळ ८० टक्के असते. माझ्या घरातून देखील आईने मला "त्या" महान आत्म्यासाठी जो शिधा दिला होता त्यात प्रामुख्याने मटण आणि अंडी यांचा दाबून समावेश होता. ब्राह्मण समाजातील आधुनिक पिढी शाकाहार व मांसाहार दोन्ही मान्य करीत असली तरी पिंडदान विधीच्या वेळी "मांस" निषिद्धच मानले गेले आहे आणि धर्म रीतीनुसार त्यात काही वावगे मानायचे कारण नाही. मुदधा असा कि दोन धर्मीय वेगवेगळ्या ठिकाणी हा विधी पार पाडतात.
आता हे "कावळा" महाशय येण्याचे प्रयोजन काय व ते का येतात व त्यांच्या येण्याचा तसेच त्या आत्म्याचा काय संबध? हा विचार बुद्धिप्रामाण्यावादी विचारांच्या कसोटीवर अर्थपूर्ण ठरतो की नाही हा विचार त्या परिस्थितीत येणे शक्य नसते. तरीही (त्यानंतर...) मी जे काही संबधित वाचन केले ती मध्ये या विधीला (तसेच "कावळ्याला") का महत्व दिले याचा उगम लागला, तो थोडक्यात असा कि अतिप्राचीन काळी हिंदू लोक प्रवास करीत असताना पाण्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी "कावळ्याचा" उपयोग करीत असत. कावळा हा दिशा-दिग्दर्शक या भूमिकेत काम करतो असा समज इतका पक्का झाला की, मृत्युनंतर र्देखील हे जे कोणी "आत्मा" महाशय आहेत त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखविण्यासाठी "कावळा" मदत करतो, त्यासाठी चांगले अन्न देऊन त्याचे पोट भरणे हे क्रमप्राप्त असते. पण तत्पूर्वी जर का त्या "आत्म्याची" भूतलावरील एखादी इच्छा अपुरी राहिली असल्यास तो आत्मा कावळ्याला आपल्या नावे ठेवलेले अन्न स्पर्शू देत नाही. असे झाले तर मृतात्म्याचे कुटुंबीय प्रार्थना करतात व मृत व्यक्तीची जी काही शेवटची इच्छा अपुरी राहिली असेल ती लागलीच पूर्ण करण्याची शपथ देतात. या प्रक्रियेनंतर कावळा पिंडास शिवला तर ठीक, नाहीतर वाट पाहून पाहून (किंवा कंटाळून..) दर्भाचा कावळा करून पिंडास स्पर्शले जाते व विधी आटोपला असे मानण्याचा प्रघात आहे.
माझ्या नातालागाविषयी तर त्याच्या कित्येक इच्छा अपु-या राहणे क्रमप्राप्त होते. पाठीमागे तीस-पस्तीस वर्षाची गरीब गायीसारखी दिसणारी त्याची विधवा पत्नी, शाळेत शिकणा-या दोन मुली, एक मुलगा ज्याचे भविष्य आता पूर्णत: अंध:कारमय, गावात स्वत:चे घर नाही, बँक आकडा शून्य, दागदागिन्याचे तर नाव देखील काढायला नको....एकूणच भयावह परिस्थिती !! अशावेळी तर त्याच्या आत्म्याने कावळ्याला अन्नाच्या त्या ढीगास चोंच लावण्यापासून अटकाव करायला हवा होता. पण नाही, मटण, मासे, अंड्यांचा तो भला मोठा ढीग, (शिवाय... दारू तर अपरिहार्यच...कारण विचारू नये !!) यांची पिंड दान नावाखाली इतकी रेलचेल होती की कावळ्यांच्या कौरव सेनागत लोळ, लोक नमस्कार करून दूर होताच, विजेच्या वेगाने तुटून पडला. दहा मिनिटांच्या आतच त्या पिंडाचा/अन्नाचा सुफडासाफ झाला. लोक ही आनंदात.... कारण "व्वा व्वा... बिचा-याची कोणतीही इच्छा बाकी राहिली नव्हती. गेला सुखात !" साला, सुखातच जाईल ना, इतके चमचमीत खायला (व प्यायालादेखील) मिळाल्यानंतर !!
आता या ब्राह्मण आजोबांचा किस्सा. वर उल्लेख केल्याप्रमाणे जिवंतपणी इतके सुखासमाधानात आयुष्य व्यतीत केलेल्या त्या देवमाणसाची कोणतीही इच्छा बाकी राहिली असल्याचे प्रमाण नव्हते. मुलेबाळे तर सोडाच पण नातू नात देखील अत्यंत सुखी आणि जीवनात यशस्वीरीत्या कालक्रमना करीत असताना त्यांची कसलीही इच्छा राहणे संभवत नव्हते. पण अशा परिस्थितीतदेखील विनोदचे समस्त कुटुंब सकाळी १० ते दुपारचा १ वाजे पर्यंत "मिस्टर क्रो" यांची वाट पाहत घाटावर ताटकळत बसून होते. कावळे तर पलीकडील "मराठा" विभाग मध्ये गर्दी करून राहिले होते, त्यांना तर तेथे स्पेशल नॉन व्हेज डिशेस मिळत होत्या तर ते इथे "बुळबुळीत भेंडी दही भात" खायला कशाला येतील? मी त्या परिस्थितीतदेखील विनोदाला यातील फोलपणा समजावून सांगत होता, पण तो बिचारा पडला त्या कुटुंबातील अनेकापैकी एक, तर त्याला असा काही वेगळा सूर असणे शक्य नव्हते. एक नंतर (तिकडे मराठ्यांचा "दंगा" संपल्यानंतर...) कसाबसा एक कावळा मेहेरबानी केल्याच्या आविर्भावात आला, पण त्या महाराजांचे पोट मटण खा खाऊन तुडुंब भरले असल्याने साहजिकच त्याला "दही भातात" काही खास इंटरेस्ट असेल असे वाटत नव्हते आणि झालेही तसे ! इकडे तिकडे दोन चार चकरा त्याने मारल्या पण पिंडास चोंच नावाचा अवयव लावला नाही. भटजींनी "चला सर्वांनी पुढे या आणि म्हणा 'आजोबा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो'" आता त्या स्थितीतही मला विस्मय वाटला की, तेथे असलेल्या विनोदच्या सर्व कुटुंबियांना माहित होते कि आजोबांची कोणतीही इच्छा राहणे शक्य नव्हते. पण आता इलाज नव्हता व अशा परिस्थितीत भटजी बुवा जे कांही सांगतील ते विना तक्रार पुरे करणे एवढेच त्यांच्याजवळ शिल्लक होते, व त्या प्रमाणे त्यांनी नमस्कार चमत्कार करून केलेही. पण इल्ला !! दीड होत आला तरी कावळा काही त्या पिंडास शिवला नाही, फक्त पुढे मागे करीत राहिला व थोड्या वेळाने निघून गेला, त्याचे पिंडाजवळ जाणे हेच "तो पिंडाला शिवला" असे मानून झटकन भटजींनी बाकीचे विधी आटोपले व सर्व (म्हटले तर समाधानाने, म्हटले तर खिन्नपणे...) घरी परतले.
आता या दोन घटनातील विरोधाभास लक्षात घेतला तर, अशा प्रकारच्या विधीत काही तथ्य आहे का हा सवाल माझ्यासमोर त्या त्या वेळी उभा ठाकला होता व माझ्या परीने माझ्या अनेक शिक्षकांना तसेच शहरातील काही नामवंत समाजसुधार विचारांच्या व्यक्तींना भेटून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता. अशावेळी काहीतरी धर्माचे कारण सांगून बोळवण करण्यात येते, तशी माझी झालीही. पण आता येथील सदस्यत्व घेतल्यानंतर असे जाणवले की हे ठिकाण अशा विचारांचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत योग्य आहे. तेंव्हा हा अनुभव वाचल्यानंतर आपलेही या बाबतीतील बहुमोल असे विचार वाचण्यास मला खचीतच आनंद होईल.
प्रतिक्रिया
21 Apr 2010 - 12:13 am | शुचि
हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा. नाहीतर मग आहेच की काउन्सिलींग , डॉक्टर्स आणि आधुनिक औषधं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
21 Apr 2010 - 12:56 am | इन्द्र्राज पवार
शुचि जी.... मला थोडा वेळ द्या... कारण याला सविस्तर उत्तर देणे गरजेचे आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 Apr 2010 - 1:06 am | Nile
ते सोडा, पण अंधश्रद्धाळु बनवलं हे दिसतंचहे!
21 Apr 2010 - 1:59 am | निस्का
असेच म्हणते.
नि...
21 Apr 2010 - 12:40 pm | इन्द्र्राज पवार
थांबा Nile .... मी जवळ जवळ एक नवा लेख होईल इतपत उत्तर तयार करीत आहे. शुची जी आणि तुम्ही स्वत: ते वाचून अभिप्राय द्यावा .
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 Apr 2010 - 5:27 am | विकास
हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा. नाहीतर मग आहेच की काउन्सिलींग , डॉक्टर्स आणि आधुनिक औषधं.
आपल्या वरील संपूर्ण विधानाशी काही अंशी सहमत. यावरून मला मेल ब्रूक्सच्या "History of the World" मधील अत्यंविधीची आठवण झाली (तिसर्या मिनीटाला किस्सा आहे) ;)
धर्मापेक्षा प्रत्येक संस्कृतीत काहीना काही असे विधी असतात जेणे करून मागे उरलेल्या माणसांना तयार झालेल्या पोकळीतून मार्ग निघण्यासाठी आजूबाजूच्या समाजाकडून तसेच नातेवाईकांकडून मानसिक मदत होते/अपेक्षित असते.
कावळा शिवणे हा प्रकार पहील्यांदा पंडीत महादेवशास्त्री जोशींच्या कादंबरीवर आधारीत असलेल्या मानिनी चित्रपटात पाहीला. लहान होतो तेंव्हा पण काहीसे गूढ वाटले होते. अर्थात जास्त प्रश्न विचारल्यावर घरच्यांनी गप्प बसवले.
नंतर कावळा न शिवणे याचे इमोशनल ब्लॅकमेलींग पुर्वीच्या कुटूंबात कसे होयचे आणि भाऊबंदकीत "आपल्या नवर्यावर" नणंदेकडून, मोठ्या/धाकट्या जावेकडून, मेव्हण्याकडून कसले तरी दबाव आणत नको ती जबाबदारी आयुष्यभर पडायला नको, म्हणून पुर्वीच्या स्त्रीया अशा विधीच्या वेळेस कशा डोळ्यात तेल घालून नवर्यामागे उभ्या असायच्या हे देखील ऐकलेले आहे. थोडक्यात या विधींचा फोलपणा माहीत असतो (अर्थात अंधश्रद्धा नसते) तरी देखील काही जणांच्या बाबतीत एक "लोक काय म्हणतील" म्हणून जबाबदारी असायचे तर काही जणांच्या बाबतीत एक भावनीक परीपुर्ती करण्याचा प्रयत्न असायचे.
काळाच्या ओघात ही मते कमी होऊ लागली आहेत. माणसे विविध प्रकारे अशा प्रसंगाला तोंड देण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. तरी देखील ज्याला जसे करायचे आहे त्याला अशा प्रसंगी करून द्यावे. काही न करणे ही देखील एकप्रकारची रुढीच आहे असे वाटते.
असो.
ऐकीव माहीती: "अमेरिकेत अनेक राज्यात (किंवा सगळीकडेच) सुरवातीच्या काळात दफनविधीच मान्य होता. दहन करायला परवानगी नसायची. अर्थात याचे कारण देखील धार्मिक होते". पण आता मात्र ख्रिस्ती लोकं दहन करू लागलीत, अथवा एकावर एक (एकाच कुटूंबातील व्यक्तींना) पुरू लागले आहेत. जागा पुरून उरते म्हणून नाही ;) तर त्याचे अर्थकारण मधे आले म्हणून. तेच आता हिंदू धर्मियांमधे होऊ लागले आहे. शास्त्रविधींना मनापासून श्रद्धा नसताना देखील पैसे घालवणे गरजेचे नाही हे आता लक्षात आले आहे. थोडक्यात "रुढी बदलायची कारणे" ही अंधश्रद्धा निर्मूलन नसून (खर्या) क्लिंटनच्या भाषेत, "It's the economy, stupid!" हे आहे :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 Apr 2010 - 1:01 pm | इन्द्र्राज पवार
काही न करणे ही देखील एकप्रकारची रुढीच आहे असे वाटते.....
नाही विकास जी > मी असे कुठेही म्हटलेले नाही की काहीही करू नये ! अखेर आपण समाज प्रेमी लोक आहोत व समाजाशी फटकून राहू शहात नाही. मुद्दा हा आहे कि कोणत्या पातळीपर्यंत आपण या पद्धती पाळायच्या व वैज्ञानिक कसोटीवर त्या घासून घेतल्या पाहिजेत कि नको, हा विचारही तितकाच महत्वाचा आहे. कोल्हापुरातील अंबाबाईचे देऊळ किती प्रसिद्ध आहे हे तुम्हास माहित आहे (किंवा असेल). मी तेथूनच दररोज रंकाळ्याला पोहायला जातो. आता रोज अंबामातेच्या पुढे जाऊन नमस्कार करीत नाही, किंबहुना करणे शक्यही नाही, तरीही गाडीवरून जाताना श्रद्धेने एक नमस्कार आपोआप घडतोच. आता हा माझा नमस्कार "अंधश्रद्धा" गटातील नसून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो प्रभाव आहे. इथे मी नमस्कार केला म्हणून आस्तिक ठरत नाही, किंवा केला नाही म्हणून नास्तिक मानला जात नाही. हे एक प्रमाण आहे. त्याच अनुषंगाने "कावळा शिवणे" या प्रकाराकडे पाहिले पाहिजे. जी दोन उदाहरणे दिली त्याचे सार असे आहे कि, ज्याचा पिंडाला कावळा चटकन शिवला तो "पुण्यवान, कोणतीही इच्छा न उरलेला आत्मा " आणि ज्याचाकडे ढुंकूनही पहिले नाही तो "पापी, अजून त्याच्या इच्छा आहेत असा आत्मा"; ही समजूत त्या दोन व्यक्ती जे जीवन जगल्या त्यांच्याशी तपासून पाहिले तर सत्यतेत उतरतात का?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 Apr 2010 - 1:08 am | विकास
मी असे कुठेही म्हटलेले नाही की काहीही करू नये !
आपण म्हणालात असे मला म्हणायचे देखील नव्हते. तेंव्हा माझा गैरसमज नव्हता, आपणही (माझ्या विधानाबाबत) गैरसमज करून घेऊ नये असे वाटते.
प्रेम, सुख, दु:ख, विरह आदी भावनांचे कुठल्याच वैज्ञानिक दृष्टीकोनातून विश्लेषण होऊ शकेल असे वाटत नाही. विज्ञानाने एखादी गोष्ट सातत्याने सिद्ध होऊ शकते. मात्र तसे यातील कुठल्याच भावनांचे नसते. आई-वडीलांचे मुलांवरील प्रेम (अथवा उलट) हे प्रत्येक उदाहरणात समान असू शकत नाही. तेच प्रियकर-प्रेयसीचे, नवरा-बायकोचे आदी, अगदी पैशाचे आणि देशाचे प्रेमसुद्धा! तीच कथा इतर भावनिक पातळ्यांची आहे.
अशा कुठल्याही भावनीक पातळीवर जेंव्हा मनुष्य चांगले/वाईट, सुखद/दु:खद अनुभवतो, तेंव्हा त्याचे निराकरण हे विज्ञान अथवा बुद्धीवादी दृष्टीकोन करू शकत नाही तर कुठल्यानकुठल्या पद्धतीने भावना मोकळ्या होण्यानेच होते. टोकाचे अश्रद्ध बघितले आहेत ज्यांच्याकडे मृत्यूनंतर काही केले गेले नाही तरी बोलताना "आज दहावा" आहे हे येते. अर्थात एकीकडे असल्या पद्धतीवर विश्वास नाही, इतर कुठल्याच कर्मकांडांवर, पूजाअर्चांवर विश्वास नाही आणि नक्की कसे स्वतःला या विरहातून मुक्त करायचे हे देखील समजत नाही अशी अवस्था असते.. सर्व धर्मांमधे, संस्कृतीमधे म्हणूनच असे काहीना काही विधी असतातच. ते कालानूरूप बदलता येतील, बद्लावेत हे नक्कीच पण भर हा मागे उरलेल्या व्यक्ती/कुटूंबाला परत आयुष्य सुरळीत सुरू करता यावे, त्यांना मनःशांती मिळावी यावर असावा, विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर नाही, असे वाटते.
असो.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 Apr 2010 - 12:22 am | भारद्वाज
माझाही अनुभव मला इथे सांगावासा वाटतो-
दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला आमच्या गॅलरीत कावळा येउन बसतो(दरवर्षी तोच कावळा असतो का वेगळा ते मात्र माहीत नाही). नंतर वर्षभर मात्र तो फिरकतही नाही. हे असे घडण्यामागचं कारण काय असू शकेल? कावळ्यांनाही कालगणनेचं ज्ञान असतं का की जेणेकरून ते 'आज इथे जेवण मिळतं बरं', असं लक्षात ठेवत असतील ????
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(कावळ्यांविषयी विचारणारा) भारद्वाज
21 Apr 2010 - 1:11 pm | इन्द्र्राज पवार
आता याला तसे उत्तर काही नाही. मी इतकेच म्हणू शकेन कि तुम्ही सर्वपित्री अमावास्येलाच कुतूहलाने तो कावळा (तोच किंवा त्याचा जात भाई...) येतो कि नाही ते पाहत असणार. प्रत्यक्षात तो अन्य दिवशीदेखील येतो की नाही हे पाहणे तुमच्या दररोजच्या कार्यक्रमाचा भाग असणे शक्य नाही. तरीदेखील हा एक नॉर्मल श्रद्धेचा भाग आहे असे आपण समजू. ज्यावेळी एखाद्या सर्वपित्री अमावास्येला तो आला नाही तर तुम्हास वा तुमच्या कुटुंबीयास काहीतरी धोका आहे असे कुणी तरी सांगितले आणि जर का तुम्ही त्या आत्मारामांची शांती करायचा विचार सुरु केला की त्या श्रद्धेचे रूप आता अंधश्रद्धेत होऊ लागेल, आणि हीच खरी भीती असते या प्रकारात. धन्यवाद.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
27 Apr 2010 - 12:22 am | भारद्वाज
सहमत आहे.
एकदा ठरवले होते की इतर दिवशीही कावळा येतो का ते पाहवे,पण २ महिन्यात उपक्रम बंद पडला.
बाकी, माझ्या आधीच्या प्रतिसादावरून मी कावळ्यांचं महत्व अधोरेखीत करतोय असे कृपया समजू नये.
21 Apr 2010 - 12:59 am | इनोबा म्हणे
अरेच्चा! माझे इथले प्रतिसाद कुठे गेले?
21 Apr 2010 - 1:58 am | अनामिक
कावळ्याने खाल्ले असतील :D
-अनामिक
21 Apr 2010 - 1:15 pm | इन्द्र्राज पवार
व्वा !! म्हणजे २१ व्या शतकातील आधुनिक कावळ्यांना येथील डीशेसदेखील आवडू लागल्या आहेत तर....!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 Apr 2010 - 1:48 am | टारझन
इंद्रजीत राव .. एकदम पाईंट टू पाईंट लिहीलंय बा !! रोक्कड ठोक्कड एकदम आवडेश :)
आपलीच संस्कृती महान म्हणणार्यांचं इतकं हसु येतं की आवरता आवरत नाही :) संस्कृतीचं विच्छेदन करायला घेतलं असता त्यात आम्हाला मण भर बग्ज मिळाले :) ते आम्ही आमच्या आई-वडीलांनाही ऐकवले. त्यांना अजुन ते पचलेले नाहीत .... जुणी पिढी आहे ... चेंज ला घाबरतेच !
बाकी काहीकाही चांगल्या गोष्टीही आहेत .. पण त्यावर तुम्ही योग्य टिपण्णी केल्यामुळे तो मुद्दाच नाही :)
- टारेश धर्मबुडवी
21 Apr 2010 - 1:43 pm | इन्द्र्राज पवार
ते आम्ही आमच्या आई-वडीलांनाही ऐकवले. त्यांना अजुन ते पचलेले नाहीत .... जुणी पिढी आहे ... चेंज ला घाबरतेच !
टारझन जी, जुनीच का ... नवीन देखील याच जात कुळीतील आहे. अंगारकी संकष्टीला इथे कोल्हापुरातील विविध गणेश मंदिरासमोर तासंतास रांकेत उभे राहिलेले आजचे "आमीर खान, ह्रितिक रोशन, दीपिका पडूकोने, करिष्मा कपूर" पाहिले की त्या तुंदिलतनु गणेशालाही आश्चर्य वाटत असेल. आजकाल तर बालाजी मंदिराला भेट देऊन (साभार पूर्वक ....बिग बी कृपा) तेथे मुंडण करून आल्यानंतर ते होंडा वरून महाविद्यालयीन परिसरात दाखविणे ही इकडची लेटेस्ट फ्याशन झाली आहे. पुण्यातील दगडूशेठ काय किंवा लालबाग येथील राजा काय, दोन्हीकडील गणेश पूजन ही एक लौकिक, ऐहिक उत्सवाची बाब झाली आहे, नशाच म्हणा हवे तर. श्रद्धेचे अधिष्ठानच नष्ट झाले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. आठनऊ तास पाळीत उभे राहून देखील बाप्पांचे दर्शन झाले नाही तर मोठीच पंचाईत होईल म्हणून बारा तास उभे राहण्याची क्षमता मिळविणे ही एक प्रकारच्या भीतीचे लक्षण आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 Apr 2010 - 3:14 am | मीनल
माझे सासरे जाऊन दोन -तीन वर्ष झाली असतील .माझे यजमान आणि सासूबाई त्यावेळी बाहेरगावी गेले होते.
पित्रूपंधरवडा सूरू झाला होता. श्राध्द वगैरेचे माझ्या डोक्यात काही नव्हते. मी स्त्री आल्याने माझ्यावर त्याची जबाबदारी ही नव्ह्ती म्हणून असे कदाचित.
एके दिवशी मला रात्री स्वप्नात एक जैन जोडप ( तोंडाला पांढरी पट्टी, अंगावर पांढरे वस्त्र होते) दिसले. त्यांनी मला "अमूक दिवशी कावळ्याला दहीभात दे" असे सांगितले आणि ते मागे फिरून निघून गेले.
सकाळी मी विसरून गेले . कामावरून घरी आले आणि चहा घेताना बाजूच्या भिंतीवरचे कॅलेंडर पाहून मोलकरणीशी काहीतरी ठरवा ठरवी करत होते.
`तो `दिवस पाहिला आणि मी उडाले. जैन जोडप्याने स्वप्नात येउन सांगितलेला दिवस माझ्या सास-यांच्या मृत्यूची तिथी होती.
मी त्या तिथीला कावळ्याला दहीभात ठेवला .
त्यानंतर दरवर्षी ठेवते अथवा यजमानांना आठवण करून देते.
( गेल्या वर्षी इथे अमेरिकेत ही ठेवला. दोन दिवस तो जिथल्या तिथे जश्याच्या तसा होता.)
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
21 Apr 2010 - 2:01 pm | इन्द्र्राज पवार
मीनल जी > मी असे बिलकुल म्हणणार नाही की तुम्हाले जे स्वप्न पडले किंवा त्या अनुषंगाने नैवेद्य ठेवण्याचा जो प्रकार तुम्ही केला तो अंधश्रद्धेचा भाग होता, वगैरे, वगैरे ! ही एक प्रकारची मानसिक प्रक्रिया असते जिच्यात आपल्या भूत काळातील काही घटनांचे प्रतिबिंब पडलेले असते. लक्षात घ्या, मानसशास्त्र असे सांगते की, "स्वप्न पडणे हे एक निरोगी लक्षण आहे, आणि स्वप्नात पाहिलेल्या बाबींचा जो तो आपआपल्या परीने वा परिस्थितीने अर्थ लावत असतो." आता दर वर्षी तुम्हास हेच स्वप्न पडेल याची काहीच शाश्वती नसते. जे काही झाले तदनुसार तुम्ही प्रतिक्रिया (जी नैसर्गिक मानावी लागेल...) केली व तुमच्यापुरता तो विषय संपला. मात्र आता प्रत्येक स्वप्नानुसार तुम्ही जागेपणी वर्तन करू शकत नाही, आणि करण्याचा यत्नही करू नये.
मलाही असेच एकदा स्वप्न पडले की, Titanic मधली "Rose" समुद्रात बुडत चाललेल्या "Jack--Jack" ला हाक मारीत आहे, प्रत्यक्षात मला असे ऐकू आले कि ती "इंद्र, इंद्र" म्हणत आहे. मी इतका खूष झालो की कधी एकदा सकाळ होते व त्या Rose कडे जातोय ! आणि ज्यावेळी सकाळ खरोखरीच उजाडली त्यावेळी आईची हाक ऐकू आली, "अरे उठ आज दूधवाला येणार नाही, तुला जायला पाहिजे." कुठली रोझ आणि कुठला इंद्र !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 Apr 2010 - 6:19 am | प्रियाली
दोन्ही किस्से चांगले मांडले आहेत आणि त्यातील फोलपणा दाखवण्याचा प्रयत्नही चांगला आहे.
हे पहिल्यांदाच वाचले. पाण्याचे ठिकाण आणि स्वर्ग हे दोन्ही जरा सूतावरून स्वर्ग गाठल्यासारखे वाटले.
कावळा बिचारा जे काही मिळेल ते खायला टपलेला असतो म्हणून त्याच्या नावे स्वर्गप्राप्तीचे वगैरे बिल फाडले असावे.
ज्यांना या रूढी पटत नाहीत त्यांनी तरी इतरांच्या भरीस पडून त्या पाळत न राहता त्या सोडून द्यायला हवे.
21 Apr 2010 - 6:39 am | मुक्तसुनीत
दोन्ही किस्से रोचक.
श्रद्धा/अंधश्रद्धा हा - अगदी आंतरजालावरचासुद्धा - संवेदनशील विषय आहे. त्यामुळे काय "खरे" किंवा काय "योग्य" अशा प्रकारची विधाने करण्याची चूक न करता "माझे असे मत आहे" इतपत म्हणतो.
तर माझे मत असे : आपल्याला आहे ते शरीर नि मन. आपण विचार करू शकतो, आपल्याला भावना आहेत. मनाच्या नि शरीराच्या गरजा आहेत. हा सगळा केमिकल लोच्या आहे.
आत्मा वगैरे काहीही अस्तित्त्वात नाही. पुनर्जन्म, मोक्ष वगैरेसुद्धा काहीही अस्तित्त्वात नाही.
धर्माचा संबंध पारलौकिकाशी नाही कारण पारलौकिक नावाचा काही प्रकारच नाही. मात्र, समुदायात जगताना, आयुष्याचे नेमनियम ठरवून देणारी एक नियमावली म्हणून धर्म अस्तित्त्वात आलेला आहे आणि या संदर्भात धर्माचे अस्तित्व मला मान्य आहे. मी हिंदू आहे कारण या शब्दाने निगडीत अशा कोट्यावधी लोकांशी माझे बंधुत्त्वाचे असे नाते प्रस्थापित होते. या माझ्या बंधुभगिनींच्या हिताशी कणभर का होईना पण मी निगडित आहे.
कालानुरुप धर्माचे जातीपातींशी असलेले नाते तुटते आहे , रूढींशी असलेले नाते तुटते आहे. आशा आहे, माझ्या आयुष्यात मला माझ्या धर्माचे स्वरूप सकलजनांच्या हिताला जोडणारा दुवा इतकेच शिल्लक राहील. त्यातल्या अनिष्ट प्रथा, भेदभाव, जातीप्रजातींमधला द्वेषभाव लयाला जाईल.
बहुतांश धार्मिक परंपरा या एक प्रकारे उपचार होत. या उपचारांमधला शोषणाचा , अज्ञानाचा , अन्यायादि अनिष्ट गोष्टींचा त्याग करुन जो सामूहिक आनंदाचा , समुदायाशी जोडले जाण्याचा भाग जो उरतो तो माझ्या दृष्टीने इष्ट आणि अतिशय महत्त्वाचा आहे. या संदर्भात मी उत्सवप्रिय, धार्मिक आहे. या माझ्या आनंदात इतर जण माझा विश्वास नसलेल्या ईश्वरादि संकल्पनांमुळे सामील होत असेल तर मला त्याचे दु:ख नाही की त्याबद्दल अनादर नाही. जोवर इतर कुणावर पाय पडत नाही तोवर मला धार्मिक उत्सव हवेत.
वर वर्णिलेल्या माझ्या भूमिकेनुसार, पिंडदानादि गोष्टीवर माझा विश्वास नाही. विशेषकरून त्यातल्या मद्यादि पदार्थांचा समावेश फारच अॅबसर्ड वाटतो. पण... असे करण्यात जर का कुणाला आर्थिक ताण पडत नसेल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे मृताच्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकाना काही समाधान मिळत असेल तर ते करायला माझी हरकत नाही. अशा अनेक प्रसंगी मी मूकपणे सामील झालेलो आहे. लोकांना माझी भूमिका माहिती असते पण मी अशा ठिकाणी कर्तव्यपूर्तीकरता आहे हे त्यांना माहिती असते.
21 Apr 2010 - 6:45 am | अनामिक
...असे करण्यात जर का कुणाला आर्थिक ताण पडत नसेल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे मृताच्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकाना काही समाधान मिळत असेल तर ते करायला माझी हरकत नाही.
मला अगदी हेच म्हणायचे होते.
-अनामिक
22 Apr 2010 - 12:47 am | इन्द्र्राज पवार
"......हिताला जोडणारा दुवा इतकेच शिल्लक राहील. त्यातल्या अनिष्ट प्रथा, भेदभाव, जातीप्रजातींमधला द्वेषभाव लयाला जाईल....."
मुक्त सुनीत, तुम्ही नेमका हा मुद्दा, जो हजारो लोकांच्या मनात आहे, तो अतिशय प्रभावीपणे इथे व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि अंध श्रद्धा यातील तौलनिक अभ्यास जर कुणी केला तर त्याला किंवा तिला हे दिसून येईल की, आपल्या (मी ज्यावेळी "आपल्या" म्हणतो, त्यावेळी एका विशिष्ट जातीला नजरेसमोर ठेऊन लिहित नाही तर हिंदू धर्मात असलेल्या अनेकविध टोकांच्या प्रथेला...) धर्मात "भीती" चे वातावरण काही कारणास्तव निर्माण करून ठेवले आहे तो वास्तविकरीत्या कळीचा मुद्दा आहे. "सोबतचे पत्र २० लोकांना पाठवा, नाहीतर संतोषी माता तुमचे मोठे नुकसान करेल......" "अमुक अमुक गणपतीला १०१ बुंदी लाडवांचा नैवेद्य मुलाच्या परीक्षेपूर्वी द्या...." "बालाजीला जाऊन मुंडण करून घ्या..." या आणि अन्य प्रकारचा धमक्यांचा पगडा इतका जबरदस्त आहे कि, माझ्यासमवेत एम, ए. ला इंग्लिश विषय घेऊन विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेली मुलगी देखील "लवकर लग्न होईना" म्हणून संतोषी मातेची पत्रे खरडत बसल्याचे पाहिले त्यावेळी जो धक्का बसला तो केवळ अवर्णनीय आहे.
बुद्धीवादावर जगायचे आणि "ज्ञानेश्वराने भिंत चालवून दाखविली, व रेड्याने मंत्र म्हटले..." या बाबी मान्य करणे हे कोणत्या सूत्रात बसते? याचे स्पष्टीकरण माझा प्राध्यापक मित्र देऊ शकलेला नाही आणि मला वाटते या विज्ञान युगातील हीच खरी शोकांतिका आहे.
" असे करण्यात जर का कुणाला आर्थिक ताण पडत नसेल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे मृताच्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकाना काही समाधान मिळत असेल तर ते करायला माझी हरकत नाही. अशा अनेक प्रसंगी मी मूकपणे सामील झालेलो आहे."
आर्थिक ताण तर पडतोच (लेखात उल्लेख केलेल्या विधवा नातेवाईकाची उद्याची स्थिती काय होणार आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही, असे असूनही तेराव्याला त्या बाईने - किंवा अगदी निकटच्या नातेवाइकानि जवळ जवळ २५० लोकांचे भोजन घातले. कुठून आला पैसा? अर्थात खासगी सावकार ? व्याज कोण देणार? आहे ना, बायको आणि पोरे... फेडतील की.... बापासाठी करायला नको???...."). मी याला विरोध करू शकलो नाही, पण मी त्या भोजनाला गेलोसुधा नाही. मला वाटते प्राप्त परिस्थितीत आपल्या हाती एवढेच आहे.
विशेषकरून त्यातल्या मद्यादि पदार्थांचा समावेश फारच अॅबसर्ड वाटतो.
मद्य ? अहो मुक्त सुनीत .... बिड्या सिगरेटी तर सोडाच, पिंडदाना दिवशी मी एकाने "गांजा आणि अफू" देखील आणल्याचे पाहिले, व मोठ्या भक्तीभावाने त्या पट्ठ्याने सर्वाना दिसेल अशा रीतीने त्याचा बाजार त्या ताटा भोवताली केला होता, आणि पाहणारे लोकही गेंड्याच्या कातडीचे झाले होते, त्यांना यात कांही वावगे वाटायचे कारण नव्हते, व्हाय सो? कारण मेलेला एक नंबरचा गांजेकस होता.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 Apr 2010 - 10:17 am | Dipankar
काही बाबींना पूर्णविराम देणे गरजेचे आहे असे मत मांडले तर त्याला कुणी 'धर्म बुडव्या' म्हणेल काय?
अहो या गोष्टी जरूर बदलायला हव्यात यात कुठे धर्म बुडतो, अशा कालबाह्य प्रथा काहीच न करता ही आपोआप दूर होतील, आज पिंडदान हे समारंभ आधीच्या पिढीच्या समाधाना साठी करतो, यात श्रद्धे पेक्षा वरिष्ठांचा मान राखणे हि भावना असते. व केवळ त्यासाठी या गोष्टी करणे गैर नाही .
मला नाही वाटत यातील कित्येक गोष्टी पुढील पिढ्या करतील. कारण त्यानाही माहीत असेल आपण या गोष्टी केवळ मान राखण्य साठी केल्या होत्या
21 Apr 2010 - 1:37 pm | मी ऋचा
>काही बाबींना पूर्णविराम देणे गरजेचे आहे असे मत मांडले तर त्याला कुणी 'धर्म बुडव्या' म्हणेल काय?
धर्म ही सन्कल्पना खर म्हन्जे "धारयति माम इति धर्मः" अशी आहे. अर्थात सामाजिक जीवन जगताना सगळ्यान्च्या जीवनात सुसूत्रता यावी म्हणून सगळ्याना "धरुन ठेवणारा तो धर्म". या अर्थी समाजातील बदलानुरूप धर्मसूत्रातही बदल अपेक्शितच आहेत. तरच त्यात अर्थ आहे. ही बाब धर्मकर्त्यान्नाही अपेक्शित असावी.
मी ॠचा
------------------------------------------------------------
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
21 Apr 2010 - 2:16 pm | बद्दु
योगायोगाने न्यू सायण्टिस्ट वाचत असताना एका पुस्तकावर ( क्रो प्लॅनेट : इसेन्सियल वीजडम फ्राम द अर्बन वाईल्डरनेस) लिहिलेल्या टिप्पणी वर नजर गेली. त्यातील एक वाक्य इंग्रजीतच लिहितो.. "Crows can distinguish human faces, remembering those who seem dangerous". पण या डेंजरस फेसेस च्या पिंडाला तोंड लावायचा की नाही यावर मात्र तो एक कावळाच ठरवू शकतो...
अर्थात कावळ्याच्या स्मरणशक्तिचा अनुभव लहान असताना सर्व व्रात्य कार्टी घेत असतातच..मी सुद्धा कावळ्याला दगड मारुन घरात पळायचो..पण तो पठ्ठा मी बाहेर आलो रे आलो की बरोबर माझ्यावरच तुटून पडायचा... सोबत कोणीही असो...मग अगदी ड्रेस बदलला तरी तो पिच्छा सोडत नसे..पण ही त्याची Temperory Memory आहे हे मला लक्षात येत असे कारण एक दोन दिवसात तो हे विसरून जायचा ..असे मला वाटायचे..आणि मी पुन्हा एक दगड....
21 Apr 2010 - 10:50 pm | एक
ज्या माणसाने जिवंत असताना त्याच्या कुटूंबाची काही चिंता केली नाही, स्वःताचे कर्तुत्त्व २ मुलांना जन्म देवून सिद्ध केलं, आता त्याची मरणानंतर कुठली ईच्छा उरली असेल? तो मेला आणि सुटला. जिवंतपणी लोकलाजेखातर जी कर्तव्य करावी लागत असतील ती पण आता करायची गरज नाही. म्हणून कावळा लगेच शिवला.
याच्या उलट दुसर्या माणसाने कुटूंबासाठी आख्खी हयात घालवली. सगळ्यांना सुस्थितीत ठेवलं. मरणानंतर सुद्धा कुटूंबासाठी किंवा समाजासाठी अजून काहीतरी करायची ईच्छा शिल्लक राहिली असू शकते. म्हणून कावळा शिवला नाही..
असा विचार केला तर रुढी आणि श्रद्धा खर्या आहेत असा पण दावा करता येतो.. नाही?
(वरील प्रतिसादात कुठ्ल्याही श्रद्धेची/रुढीची मी वकिली करत नाही आहे. विचारांचा एक वेगळा अँगल दाखवायचा प्रयत्न केला आहे..
असं एक्स्प्लिसिटली सांगितलेलं बरं असतं नाहीतर अंधश्रद्धा आणि विज्ञानवाले वेळ-प्रसंग-चर्चा काही न बघता वसकन चावायला येतात :SS
)
22 Apr 2010 - 11:26 am | इन्द्र्राज पवार
".....अंधश्रद्धा आणि विज्ञानवाले वेळ-प्रसंग-चर्चा काही न बघता वसकन चावायला येतात"
नाही, असा गैरसमज बिलकुल करून घेऊ नका. एक तर मी या बाबी कुठल्यातरी एका विशिष्ट चळवळीशी संबधित असतील म्हणून मांडलेल्या नाहीत, किंबहुना अशा चर्चेसाठी कुठल्या पंथाचा वा गटाचा सदस्य असण्याची मुळात गरजच नसते. ज्यावेळी आपण स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेतो, त्यावेळी काही (मनाला न पटणा-या) बाबी आताच्या युगात तपासून घेऊन मगच त्या अमलात आणाव्यात असे वाटते. तसे पाहिले तर श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञानवादी... म्हटल्या तर सगळ्या सापेक्ष गोष्ठी आहेत. कोल्हापुरातील ऐका विज्ञानवादी नेत्याने बंगला बांधला त्यावेळी (वास्तुशांतीच्या अगोदर एक दिवस) बाजारात तो आम्हा मित्रांना भेटला होता. आमच्या ग्रुपला पाहून थोडा चपापलादेखील. जास्त खोलात गेल्यावर कळले की, या आधुनिक विचाराच्या नेत्याने बंगल्याबाहेर लावण्यासाठी "काळी बाहुली" ची खरेदी केली होतो. आता बिंग बाहेर पडल्यावर सारवासारव करू लागला की, "नाही रे, तुम्हाला माहित आहे माझा या गोष्टीवर विश्वास नाही, पण काय करू, आजीचा आग्रह पडला, म्हणून घेतली एक लहानशी !!!" काय बोलणार यावर? साल्याने बाहुली लहान वगैरे काही घेतली नव्हती, घेतलेली अगदी गुबगुबीत आणि तरतरीत होती. असा सगळा घोळ आहे विज्ञानवाल्यांचा. तेव्हा वसकन चावायला येतात वगैरे बाबीत काही तथ्य नाही. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 Apr 2010 - 6:56 am | अक्षय पुर्णपात्रे
एकाच प्रथेची दोन रुपे व्यवस्थित दाखवली आहेत. मरणानंतर इच्छा पूर्ण झाल्यास कावळा शिवणे वगैरे भाकडकथा आहेत. शक्य असल्यास अशा प्रथा पाळू नयेत. असेच काहीसे लग्न व इतर समारंभांबाबतही म्हणावेसे वाटते.
22 Apr 2010 - 9:32 am | विकास
असेच काहीसे लग्न व इतर समारंभांबाबतही म्हणावेसे वाटते.
म्हणजे लग्नाची प्रथा पाळू नये असे आपल्याला म्हणायचे आहे का? ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
22 Apr 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लग्नाचीही प्रथा न पाळायला काय हरकत आहे?
अर्थात पुढे मुलं होणार असतील, त्यांच्या भरण-पोषण, वारसा इ हक्कांसाठी कायदे नसतील, समाजात मुलांना त्रास होणार असेल तर लग्नं करणंच उत्तम! पण एकमेकांवर प्रेम असणार्या लोकांना एकत्र रहाण्यासाठी लग्नं या विधीची गरज काय?
अदिती
22 Apr 2010 - 8:13 pm | विकास
लग्नाचीही प्रथा न पाळायला काय हरकत आहे? अर्थात पुढे मुलं होणार असतील, त्यांच्या भरण-पोषण, वारसा इ हक्कांसाठी कायदे नसतील, समाजात मुलांना त्रास होणार असेल तर लग्नं करणंच उत्तम!
यात समाजाचा प्रश्न (लोक काय म्हणतील) वाटत नाही. समाजात मुलांना त्रास होतो तो आई-वडीलांनी शास्त्रशुद्ध लग्न केले अथवा नाही म्हणून होत नाही, तर आई-वडीलांचे प्रेम न मिळाल्याने होतो. ते न मिळण्याचे बर्याचदा कारण, कुटूंब हे व्यवस्था म्हणून नसल्याने होते. अर्थात लग्न केलेल्या व्यक्ती पण "एकत्र विभक्त" कुटूंबाप्रमाणे राहून घरात मुलांना वाढीस पोषक वातावरण निर्माण न करणार्या असू शकतात. फक्त त्यात किमान कायद्याने जबाबदारी राहते. थोडक्यात मुलांना जन्माला घालताना आपण त्यांच्यावर काही अन्याय करत नाहीना आणि पर्यायाने भविष्यात नवीन सामाजीक प्रश्न स्वतःच्या नकळत तयार करत नाही आहोत ना याचा विचार व्हावा. कारण जन्मणारे अर्भक, "कसेही करून मला या जगात आणा", असे होणार्या आई-वडलांना म्हणत नसते.
अवांतरः
या संदर्भात मधे एकदा अमेरिकेत लग्नाशिवाय न रहाण्याचे कारण वाचले होते - त्या प्रमाणे, लग्नामुळे कायद्यात अडकावे लागते, विशेष करून नंतर घटस्फोट घेताना त्रास होतो, त्यात एकंदरीतच जास्त खर्च असतो वगैरे होते.
त्याच बरोबर, गे-लेस्बियन्स ना लग्ने करता यावीत म्हणून मोठी चळवळ चालू आहे. अनेक राज्ये / राजकारणी त्यांना कायद्याने एकत्र रहाण्याची परवानगी देण्यास तयार आहेत, देत आहेत. म्हणजे त्यांना सर्व कायदेशीर हक्क (इन्श्युरन्स, वारसा आदी) मिळू शकतील. पण त्यांना "युनियन" पेक्षा "मॅरेज" साठीच कायद्याने परवानगी हवी आहे. त्यात काही राज्ये (आमचे मॅसॅच्यूसेट्सपण आले) यांनी लग्नाला देखील परवानगी दिली आहे...
थोडक्यात जे लग्ने करू शकतात ते कायद्यात अडकू नये म्हणून करत नाहीत आणि ज्यांना करता येत नाहीत ते कायदा नसल्यामुळे...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
22 Apr 2010 - 8:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विकास, तुमच्याशी सहमतच, पणः
लग्नाची प्रथा म्हणजे कुटुंबसंस्था नव्हे एवढंच मला म्हणायचं होतं. नवरा-बायको वेगळे होऊ शकतात, पण आई-वडिलांनी वेगळे होऊ नये.
नोंदणी पद्धतीने लग्न बिनखर्चिक नाही, कितीही कमी का असेना खर्च होतोच. माझ्या आठवणीत आम्हाला शंभरएक रूपये खर्च आला असेल. पण माझा मुद्दा आहे तो खर्चाबद्दल नाही!
अदिती
22 Apr 2010 - 9:00 pm | प्रभो
>>नोंदणी पद्धतीने लग्न बिनखर्चिक नाही, कितीही कमी का असेना खर्च होतोच.
मान्य. पण सर्वसाधारण लग्नात लाखावारी होणार्या खर्चापेक्षा हे प्रमाण खुपच कस्पटासमान आहे...
*बाकी मुद्द्यांशी सहमत.
22 Apr 2010 - 11:11 am | इन्द्र्राज पवार
श्री. विकास यांच्या वरील शंकेशी मी देखील सहमत आहे. श्री अक्षय हा मुद्दा थोडा विस्ताराने लिहितील का? विनंती अशासाठी की त्या निमित्ताने या गटातील प्रथाकडे पाहता येईल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 Apr 2010 - 7:07 pm | अक्षय पुर्णपात्रे
लग्न ही प्रथा नसून करार आहे. हा करार सुरू होतांना केले जाणारे सोपस्कार म्हणजे प्रथा आहेत. लग्नसमारंभात ऐपत नसलेल्यांनाही प्रथा असल्यामुळे भरमसाठ खर्च करावा लागतो. असे करण्यास काही सशक्त कारण आढळत नाही.
दोन प्रौढांना लग्नाशिवाय एकत्र रहावयाचे असल्यास त्यास आडकाठी नसावी.
22 Apr 2010 - 8:41 pm | प्रभो
>>लग्नसमारंभात ऐपत नसलेल्यांनाही प्रथा असल्यामुळे भरमसाठ खर्च करावा लागतो.
बिनखर्चाच्या लग्नासाठी कोर्ट मॅरेजचा पर्याय आहे की....
22 Apr 2010 - 8:48 pm | अक्षय पुर्णपात्रे
योग्यच आहे. मला करता आला नाही पण खूप हट्ट धरला होता.
22 Apr 2010 - 10:33 am | शशिकांत ओक
वरील चर्चा ही मानवाच्या दृष्टीकोनातून चाललेली आहे. ते स्वाभाविकही आहे. मी कावळ्यांच्या बाजूने विचार करू इच्छितो. कारण एका पिंडाला तो किंवा त्याचे जमलेले भाईबंद तात्काळ चोची मारुन व दुसऱ्याला अगदी काही फुटाच्या अंतरावरील शेजारच्या पिंडाला एकाही कावळा ढुंकून न पहायला असे काय कारण असावे?
सामान्यपणे 'शाका किंवा मांसा' असे भेद आपण केले त़री कागांच्या दृष्टीने ते दोन्ही खाद्य आहे. मग एका पिंडाला खाणे आणि दुसऱ्याला नाकारणे याचा भेद त्यांनी का करावा? असा भेदभावपूर्ण पसंतीचा त्यांचा स्वभाव धर्म असतो का ?
अन्य वेळा सामान्य भोजनातही त्यांना असे भेदभावाने खाणे पसंत असते का?
पिंडदानाच्या वेळेला ते तसा ते करतात. आपण जातीने लक्ष ठेवून असतो म्हणून हे अनेकदा अनुभवाला येते.
... त्यानंतर सामाजिक विचारवंतांनी कावळे का येत नाहीत - नसावेत यावर काही आडाखे मांडले असावेत. त्यानुसार आपण कावळ्यांचे शिवणे किंवा ना शिवणे मानवी वासनापुर्तीशी, पाप-पुण्याच्या जोडगोळीशी लावणे सोईचे ठरल्याने जोडले असावे.
पण तेच एक कारण असेल असे नाही.
मात्र भक्ष्य म्हणून जे पिंडदानाचे अन्न दिले जाते ते सोडता कावळ्यांची भक्ष्याबाबत मानसिकता काय असते. हा विषय घेऊन पक्षी तज्ञांनी याचा खुलासा अपेक्षित.
या शिवाय काही प्रश्न
१) फक्त कावळेच पिंडाचा स्वीकार करतात का? अन्य पशु-पक्ष्यांना ते खायला चालते. अनेक पशु-पक्षी जवळ आले तर त्यांना नो एंट्री करून फक्त कावळ्यांना ते खाऊ घातले जाते का ते आपणहून खायला जात नाहीत?
२) पक्षितीर्थ या ठिकाणी एक पक्षाचे जोडपे दुपारी बाराच्या सुमाराला विवक्षित भागात येते व ठेवलेले अन्न चाखून परतते. याचे प्रत्यक्ष पुरावे साईटवरून मिळतात.गेल्या काही वर्षांपासून ते तसे येणे बंद झाल्याचे ही वाचायला मिळते.
३)ते पक्षी कोणते? फक्त एकच जोडी का येते?
४) दरवेळा तीच जोडी येते की आलटून पालटून जोड्या येतात?
५) रोज विवक्षित वेळी अन्न मिळतेय असे दिसते तर त्याच प्रकारच्या वा अन्य पक्षांना तेथे जावेसे का वाटू नये किंवा जाता येऊ नये?
४) अनेक पक्षी तज्ञशोधकर्ते विविध जनावरांच्या जगतातील जीवनरहस्ये शोधून त्यातील माहिती रंजकपणे सादर करतात त्यांनी यावर आपले कार्य केले असेल तर यावर अधिक प्रकाश पडेल...
शशिकांत
22 Apr 2010 - 11:21 am | चित्रगुप्त
.....पक्षितीर्थ या ठिकाणी एक पक्षाचे जोडपे दुपारी बाराच्या सुमाराला विवक्षित भागात येते व ठेवलेले अन्न चाखून परतते.......
बरेच वर्षांपूर्वी आम्ही या ठिकाणी (जागेचे नाव विसरलो, दक्षिण भारतातले होते) हा प्रसंग प्रत्यक्ष बघितलेला आहे.
एका उंच डोंगरावरील एका मंदीराच्या गच्चीवर ठेवलेला भात अगदी ठरल्या वेळी अचानक एक पक्षी उडत येऊन चाखून गेला..... तो रामेश्वरम हून येतो, असे सांगितले गेले, परंतु निसर्गात मोकळेपणे वावरणारे पशु पक्षी जसे तजेलदार, टवटवीत दिसत्तात, तसा तो नसून झू मधील पिंजर्यात वर्षानुवर्षे ठेवलेल्याप्रमाणे निसत्व, शक्तिहीन असा वाटला....
कुठेतरी त्याला पिंजर्यात ठेऊन ठराविक वेळी सोडत असावेत, असे त्यावेळी वाटले होते.
आता तो न येण्याचे कारण म्हणजे तो मरण पावला असेल.
22 Apr 2010 - 7:06 pm | तिमा
माझ्या मागच्या जन्मी मी कावळा होतो. तेंव्हा माझा अनुभव ऐका.
पिंडाला शिवायला आम्हाला कोणी अडवत नाही. पण तेच तेच कितीवेळा खायचं, कंटाळा येतो. आम्हाला आवडणार्या डिशेसचा कधी विचार केलाय ? एक बेडका (चांगला खाकरुन काढलेला) किंवा एखादा मेलेला उंदीर टाकून पहा! लगेच तोंड लावू आम्ही! दहीभात हे काय खाणं झालं ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
22 Apr 2010 - 8:51 pm | अरुंधती
कावळ्यांविषयीच्या श्रध्दा, समजुती, प्रथा फक्त भारतीय समाजातच नाही तर अनेक देशांमध्ये बर्याच शतकांपासून पाहावयास मिळतात. संदर्भ : http://en.wikipedia.org/wiki/Crow
एखादी प्रथा अनिष्ट कशी, त्याचे काय तोटे आहेत, त्यातून कावळा, पर्यावरण, अन्य प्राणी, माणूस ह्यांना काही धोका/पीडा आहे का याविषयी विस्ताराने लिहिलेत तर तो लेख अधिक अर्थवाही होईल.
तशी श्राध्द, पिंडदान, ऊदकशांत वगैरे विधींमधून जी मानसिक व भावनिक सांत्वना मृत व्यक्तीच्या जवळच्या लोकांना मिळत असेल त्याने त्यांना त्या दु:खातून सावरायला मदत होत असावी असे मला वाटते. अर्थात त्यांचे अवडंबर नकोच वाटते!! केवळ समाजरुढी म्हणून किंवा समाजातली पत सांभाळायला म्हणून मनाविरुध्द जबरदस्तीने असे विधी करणे किंवा करवून घेणे हे तर थांबलेच पाहिजे.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
24 Apr 2010 - 10:06 am | इन्द्र्राज पवार
"......तर तो लेख अधिक अर्थवाही होईल."
ही खरेच एक चांगली सूचना आहे आणि त्याचा पाठ पुरवठा करावा अशी इच्छा होत आहे. पाहू या.
"....अर्थात त्यांचे अवडंबर नकोच वाटते!!'
बरोबर. हाच मुद्दा याअ संदर्भात आहे. आता पहा, त्या ब्राह्मण आजोबांच्या पिंड विधी चा दिवस होता "बुधवार"... म्हणजे सध्याच्या काळातील हरेक प्रकाकाराच्या कामकाजाचा दिवस. भागातील बरेचसे लोक हे नोकरीवर जायच्या तयारीत असतात/होते. कार्यक्रमाची वेळ सकाळी ९.३० असे कळविण्यात आले होते. त्यामुळे ब-याचदा असे ही होते की कार्यालयाला व उद्योगाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी "मी एक तासभर उशिरा येईन हं..." असे निरोप तेथील सहका-यांना गेलेले असतात. ही सबब तेथील लोकांच्याकडूनही मान्य होत असते. आता या ठिकाणी ते कावळे महाराज दुपारचा दीड झाला तरी अवतरले नाहीत. लोक अक्षरश: वैतागले....कंटाळले ! पण तेथून जाण्याची चोरी !! नोकरीला जाणा-याना मनातून काय वाटत असेल? अशा प्रथामधील हे उदाहरण "अवडंबर' या गटातील आहे असे माझे मत आहे. धन्यवाद अरुंधती जी !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 Apr 2010 - 9:01 pm | क्लिंटन
खूप छान लेख. वाचताना वाटले की माझेच मत मी वेगळ्या शब्दात वाचत आहे!
सुमारे ३ वर्षांपूर्वी उपक्रम या मराठी संकेतस्थळावर हिंदू धर्मातील श्राध्द संकल्पना ही चर्चा झाली होती. त्या चर्चेचा विषय साधारणपणे या चर्चेच्या विषयाशी मिळताजुळता असल्याने त्या चर्चेवर मी लिहिलेल्या प्रतिसादाचा काही भाग खाली चिकटवत आहे--
"शाळेत असताना संस्कृतमध्ये 'गतानुगतिको लोका:' म्हणून एक गोष्ट धडा म्हणून होती. थोडक्यात त्या गोष्टीचा सारांश असा: एकदा राणीच्या दासीचे लाडके गाढव मरते.त्यानंतर ती दासी मोठमोठ्याने रडू लागते.राणीला तिची दासी रडत आहे ही बातमी कळते. त्यानंतर राणी त्या दासीच्या घरी जाऊन रडू लागते.मग राजा,सेनापती, सरदार, दरबारातील इतर मानकरी आणि असे करत करत शहरातील सर्व लोक दासीच्या घरी जाऊन रडू लागतात.नक्की काय झाले आहे हे विचारायची कोणीही तसदी घेत नाही आणि केवळ दुसरा माणूस रडत आहे म्हणून मी पण रडणार या 'गतानुगतिक' मनोवृत्तीमुळे सर्व लोक तिथे जाऊन रडायला लागतात.बाजूने काही परदेशी पर्यटक चाललेले असतात.त्यांना कळत नाही की शहरातले सगळे लोक का रडत आहेत! ते त्या रडणार्या माणसांपैकी एकाला कारण विचारतात. तो माणूस म्हणतो,'मला माहित नाही.माझा शेजारी इथे येऊन रडायला लागला म्हणून मी पण आलो'.शेजारी तिसर्या माणसाकडे बोट दाखवतो. असे करत करत कोणालाही कारण माहित नसते आणि शेवटी सेनापती राजाकडे, राजा राणीकडे आणि राणी दासीकडे बोट दाखवते.शेवटी दासीचे गाढव मेले हे कारण होते हे कळताच सगळ्यांची चांगलीच फजिती होते.
आपल्या समाजातही कमी-अधिक प्रमाणात असाच गतानुगतिकपणा आढळत नाही का?केवळ शास्त्रात लिहिले आहे म्हणून आपण अनेक गोष्टी कारण न समजता करत असतो.त्या कारणामुळे अनेक रूढी परंपरा पिढ्यानपिढ्या आपण जोपासत आलो आहोत.मला वाटते श्राध्द-पक्ष-पंचक या गोष्टी त्याचाच एक भाग आहेत.
...आणि दुसरा प्रश्न म्हणजे भगवद्गीता आणि श्राध्द-पक्ष यासारखी कर्मकांडे एकाच हिंदू धर्माचा भाग कशा होऊ शकतात? की काही हजार वर्षांच्या काळात पुरोहित वर्गाने आपल्या स्वार्थासाठी (दक्षिणेची सोय व्हावी म्हणून) अशी कर्मकांडे बेमालूमपणे शास्त्रांमध्ये घुसडून दिली आहेत?आणि २००७ च्या जगातही आपण त्यामागचे कारण न विचारता गतानुगतिकासारखे त्या कर्मकांडांचे पालन करत आहोत? दशमीच्या दिवशी कोणी मरण पावले की लागले पंचक. उपाय काय? पंचक शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या! मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाला तर त्याची शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या! आपल्या हातून मांजर मेले तर पापाचे परिमार्जन म्हणून पुरोहिताला दक्षिणा द्या! अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे खरे कारण धर्माच्या नावावर कशाचातरी बागूलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे हे आहे असे मला वाटते.माझे तरी मत बनले आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तत्कालीन ब्राह्मणांनी (त्यात माझे पूर्वजही आले) अशा अनेक गोष्टी शास्त्रांमध्ये घुसडून दिल्या आहेत.काही हजार वर्षांच्या काळात त्या गोष्टी इतक्या बेमालूमपणे शास्त्रात मिसळून गेल्या की मूळ काय आणि घुसडलेले काय हे ओळखणे कठिण झाले.अन्यथा भगवद्गीतेसारखे उच्च तत्वज्ञान आणि इतरांना लुबाडणारी कर्मकांडे एकाच धर्माचा भाग कसे होऊ शकतात याचे कारण देणे कठिण आहे.
बायबलमध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे म्हटले आहे.त्याविरूध्द मत मांडले म्हणून कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांना धर्मगुरूंनी तुरूंगात डांबले होते.निदान इतिहासाच्या पुस्तकात तरी असेच लिहिले होते. २००७ च्या जगात काही कट्टर लोक सोडले तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे कोणीच म्हणणार नाही.जर एक समाज म्हणून ख्रिस्ती लोकांनी बायबलमध्ये म्हटलेली एखादी गोष्ट नाकारायचे धैर्य दाखवले असेल तर आपण आपल्या शास्त्रात न पटणार्या गोष्टी असतील तर त्या का नाकारू शकत नाही?पण दुर्दैवाने तशी नीरक्षीरविवेकबुध्दी आपण दाखवत नाही."
माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत अशी अनेक कर्मकांडे करावीत असा सामाजिक संकेत (किंवा परंपरा) आहे. आणि अशा प्रत्येक कर्मकांडाच्या ठिकाणी हे देवाचे स्वयंघोषित एजंट पुढे असतात. विवाहप्रसंगाचे उदाहरण घ्यायचे तर या एजंटांनी मंत्र म्हटले नाहीत, सप्तपदी केली नाही किंवा मंगलाष्टक म्हटली नाहीत तर वधूवरांचे नक्की काय बिघडेल? मुंज केली नाही तर नक्की बिघडेल? माझे स्वत:चे उदाहरण द्यायचे झाले तर माझी मुंज केल्यानंतर माझ्यावर संध्या करायची सक्ती होती. आणि क्रिकेट खेळणे, मित्रांबरोबर मजा करणे यासारख्या त्या वयानुरूप आकर्षण असणाऱ्या गोष्टी करायचे सोडून संध्या करायला लागणे ही माझ्यासाठी मोठी शिक्षा होती. बरं हे का करायचे या प्रश्नाला ’ब्राम्हण घराची परंपरा’ याव्यतिरिक्त मला कोणीही कसलेही उत्तर कधीही देऊ शकले नाही. वरील गोष्टीतील गतागतिक लोकांचे वागणे आणि केवळ परंपरा जपण्यासाठी उगीचच कुठचेतरी अगम्य मंत्र म्हणून आचमन करणे यात नक्की फरक काय? मुंज या प्रकाराविषयी माझ्या मनात भयंकर तिटकारा तेव्हापासून निर्माण झाला तो आजतागत तसाच आहे.
मला एका गोष्टीचे सर्वात जास्त नवल वाटते. हे भारतीय संस्कृतीचा अभिमान धरणारे मोठ्या तोंडाने ’आमची संस्कृती किती सहिष्णू आहे’ असे नेहमी म्हणत असतात. मग अशा लोकांपुढे हा विषय काढला की त्यांचा सहिष्णूपणा कुठच्याकुठे पळून जातो. मी लहान असताना असे प्रश्न विचारले की ’तू अजून लहान आहेस’ किंवा ’चार पैसे मिळवायची अक्कल नाही आणि आलाय मोठा शहाणपणा शिकवणारा. आम्ही सांगतो तसे मुकाट्याने कर’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. मी आंतरजालावरील अनेक वेगळ्या चर्चेच्या व्यासपीठांवर हे प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा प्रश्नांना उत्तर द्यायच्या ऐवजी ’तू ख्रिस्ती की मुसलमान’ असा उलटा प्रश्न विचारलेलाही मी बघितला आहे. म्हणजे मला जर एखादे मत मान्य नसेल आणि तसे मी म्हटले तर मी अहिंदू ठरतो का? आणि अशीच मंडळी सहिष्णूपणाचे गोडवे गाऊ लागली तर तो दांभिकपणा नाही का?
असो. एक चांगला चर्चाप्रस्ताव अत्यंत खुसखुशीत शैलीत लिहिल्याबद्दल धन्यवाद.
24 Apr 2010 - 10:14 am | इन्द्र्राज पवार
धन्यवाद !! तुम्ही सादर केलेले तुमच्या लेखातील विचारही खूपच चांगले आहे, किंबहुना माझ्या पाहण्यात ते अगोदर आले असते तर मी माझा लेख लिहिला नसताच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
27 Apr 2010 - 2:48 pm | sagarparadkar
>> मला एका गोष्टीचे सर्वात जास्त नवल वाटते. हे भारतीय संस्कृतीचा अभिमान धरणारे मोठ्या तोंडाने ’आमची संस्कृती किती सहिष्णू आहे’ असे नेहमी म्हणत असतात. मग अशा लोकांपुढे हा विषय काढला की त्यांचा सहिष्णूपणा कुठच्याकुठे पळून जातो. मी लहान असताना असे प्रश्न विचारले की ’तू अजून लहान आहेस’ किंवा ’चार पैसे मिळवायची अक्कल नाही आणि आलाय मोठा शहाणपणा शिकवणारा. आम्ही सांगतो तसे मुकाट्याने कर’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. मी आंतरजालावरील अनेक वेगळ्या चर्चेच्या व्यासपीठांवर हे प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा प्रश्नांना उत्तर द्यायच्या ऐवजी ’तू ख्रिस्ती की मुसलमान’ असा उलटा प्रश्न विचारलेलाही मी बघितला आहे. म्हणजे मला जर एखादे मत मान्य नसेल आणि तसे मी म्हटले तर मी अहिंदू ठरतो का? आणि अशीच मंडळी सहिष्णूपणाचे गोडवे गाऊ लागली तर तो दांभिकपणा नाही का? <<
मला देखील असेच अगदी हेच उद्गार ऐकावे लागले आहेत. त्यात परत आम्ही पेथेत्ले पुणेकर ... मग तर काय विचरुच नका ....
27 Apr 2010 - 2:53 pm | sagarparadkar
एकलव्यासारख्या शिश्याचा अन्गठा मागणारे गुरु द्रोणाचर्य याच महान सन्स्क्रुतीत्ले होत ना?
कोनी मला त्यामागचे कारण देइल का? मला तर स्वामीनिश्ठेशिवाय दुस्रे कोण्तेच कारण दिसत नाही ...
24 Apr 2010 - 1:37 pm | जयंत कुलकर्णी
माझ्या ब्लॉगवरुन -
परंपरा या माणसाने केलेल्या एखाद्या कृत्यापासून सुरु झालेल्या असतात. परंपरा तयार होतात कारण त्या काळात सलग काहीवेळ त्या कृत्यापासून माणसाला फायदा झालेला असतो. आत्ता तसा होईल हे परमेश्र्वरपण सांगू शकत नाही. मग का पाळल्या जातात ह्या परंपरा ? मला वाटते त्या माणसाच्या अहंकाराला वाट देतात, अनेक अर्थहीन गोष्टींची त्यामुळे उत्तरे द्यावी लागत नाहीत. परंपरेकडे बोट दाखवले की काम भागते. याने तुम्ही थोरामोठ्यांची तोंडे एका झटक्यात बंद करु शकता. परंपरा वाईट चालींचीसुद्धा असू शकते. उदा. सतीची चाल, बगाड्याची चाल, गोटेमारीची परंपरा. परंपरा हा एक जगन्नाथाचा गाडा आहे. तुम्ही त्याची यात्रा बघितली आहे का ? तो गाडा ओढताना शंभरएक माणसे मेली तरी काही फरक पडत नाही. त्यांना परंपरेने स्वर्गाचे व्दार खुलेच असते. त्यांच्या बायकापोरांकडे ह्या जगात कोणी बघत नाही हे वेगळे. अशा ह्या परंपरा.
खय्याम म्हणतो स्वर्ग स्वर्ग काय करतोस मी देतो तुला स्वर्ग ! त्यासाठी तुला गाडा ओढायची गरज नाही..
तो म्हणतो –
सोड त्या परंपरा, आणि आज्ञा !
तुझा घास नको रोखूस कोणापासून !
वेदना आणि ठेच नको देऊस कोणाच्या ह्रदयाला
मी तुला स्वर्गाची हमी देतो. जा ! मद्य आण !
मद्य = मद्य
मद्य = संसार.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
27 Apr 2010 - 5:48 am | अर्धवटराव
तुमचा मुद्दा कळतोय साहेब... श्रद्धा जपताना डोळसपणा अत्यावश्यकच आहे. पण तुम्ही जे दोन उदाहरणं दिलीत त्यात कावळा शिवायला/न शिवायला जी कारणं दिलीत त्यात गफलत वाटते... दोन्ही व्यक्तिंच्या मरताना काय इच्छा असाव्यात वा असु नये याचं अनुमान कसं काढलं तुम्ही ?? जो माणूस शेवट्पर्यंत आपल्या कुटुंबाबाबत बेफिकीर राहिला तो मरताना सुद्धा का चिंतीत होईल ? आणि जो समजुन उमजून जीवन जगला त्याचा जीवनाबद्दलचा उत्कट भाव मरताना देखिल शाबुत राहिल ना...
(श्रद्धाळू) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क
27 Apr 2010 - 8:31 am | राजाभाऊ
पवार साहेबांच्या या कथेत एक मोठा लोचा आहे असं वाट्तंय...
हिंदुधर्मात पिंडदान जे करतात (दहाव्या दिवशी) त्यात कावळ्याचा नैवेध्य फक्त तांदळाच्या पिंडांचा असतो. त्यामध्ये साग्रसंगीत जेवण नसतं. कोल्हापुरात वेगळी प्रथा आहे कां? :)
हिंदुधर्मातील क्रियाकर्मांचं नेमकं प्रयोजन काय आहे याचा खोलवर अभ्यास केल्याशिवाय त्यावर केलेली टीका पटली नाही बुवा.
27 Apr 2010 - 1:44 pm | इन्द्र्राज पवार
"....... कोल्हापुरात वेगळी प्रथा आहे कां? ....."
हिंदू धर्मातील पद्धती जरी एकच असल्या तरी त्या स्थानाप्रमाणे बदलत असाव्यात. कोल्हापुरातील हिंदू लोक (विशेषत: मराठा समाज) तिस-या दिवशी पंचगंगा नदीत "रक्षा विसर्जन" करतात (कोल्हापुरात याला "राख सावरणे" असे नाव आहे.) आणि त्याच दिवशी त्यानंतर साग्रसंगीत नैवेद्य दाखवितात. मराठा समाजामध्ये "मांसाहार" ची जी आवड आहे ती वरून "नैवेद्य" काय प्रकारचा असू शकेल याची कल्पना आपण सहज करू शकाल. ब्राह्मण जातीतील लोकही तीस-या दिवशीच रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करून चिता जागेची फक्त पूजा करून नमस्कार करून निघून जातात. आणि तुम्ही म्हणता तसे दहाव्या दिवशी (दशपिंड) बाकीचे संस्कार करतात. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जागा (मराठा आणि ब्राह्मण) थोड्या लांब अंतरावर असल्याने "मांसाहार" सोडून कावळे (चटकन) "तांदळाच्या" पिंडीकडे येत नाहीत. हा प्रत्यक्षदर्शी अनुभव आहे.
"....अभ्यास केल्याशिवाय त्यावर केलेली टीका पटली नाही बुवा.>
बरोबर आहे...."अभ्यास केल्याशिवाय काही बोलू नये..." मात्र बाब अशी की मी वर कुठेही असे "टीकात्मक" पद्धतीने काही म्हटलेले नाही, फक्त धर्म आणि जातीतील काही पद्धती बदलत्या काळानुसार बदलाने गरजेचे आहे का नाही. ते म्हणणे टीका नसून एक विचार या अर्थाने कृपया घ्यावा. धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"