जंगलाशी संवाद .....
ब र्ड वॉचिंग'च्या ग्रुपबरोबर गेल्या महिन्यात आम्ही "फणसाड' अभयारण्यात गेलो होतो. भारीतला कॅमेरा, ट्रायपॉड, दुर्बीण.. प्रत्येकाने जय्यत तयारी केली होती. प्राणी दिसण्याची अपेक्षा ठेवली, की ते कधीच दिसत नाहीत. अर्थात ते आपल्याला लपून पाहत असतात; पण दर्शन देत नाहीत. या वेळी आमचा उद्देश एकच होता, अतिशय दुर्मिळ झालेल्या पांढऱ्या गिधाडांना पाहायचे. तिथला मित्र वनअधिकारी हरिश्चंद्र नाईक आमची वाट पाहत होता. गिधाडांचे घरटे सहा किलोमीटरवर असल्याने गाडीतूनच जायचा निर्णय झाला. सावराटच्या माळरानावर पोचलो तेव्हा नाईक म्हणाला, ""दोन दिवसांपूर्वी इथेच एका बिबट्याने गाय मारली; पण त्या वेळी पर्यटक नसल्याने मला एकट्यालाच हे पाहायला मिळाले.''
आपण दोन दिवसांपूर्वी इथे आलो असतो तर किती बरे झाले असते, भरपूर "शूटिंग' केले असते, असे म्हणत असतानाच अचानक एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या रस्त्यावर निवांत बसलेला दिसला. ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबल्याने तो गोंधळला. अनपेक्षित प्रकारामुळे आम्हीही दचकलो. प्रत्येकाकडे उत्तम प्रकारातील कॅमेरे असतानाही त्याचा फोटो काढायचे कोणाच्याच लक्षात आले नाही. त्याने आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि निघून गेला. नंतर नाईक खाली उतरून त्याच्या मागे चालत गेला; पण "साधा रेकॉर्ड शॉट'देखील मिळाला नाही...
आलिशान वातानुकूलित खोल्या, भरपूर रोषणाई असलेला बगीचा असलेल्या हॉटेलपेक्षा घनदाट जंगलातील छोट्याशा साध्या तंबूत राहण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. तिथे कोणी तुम्हाला वेळेचे बंधन घालत नाही किंवा गोंधळ करीत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय शांत अशा ठिकाणी राहिल्यामुळे मानसिक शांतता तर मिळतेच; पण वन्य पशू- पक्ष्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनही पाहायला मिळते. पण जंगलात जायचे म्हटले, तर काही अटी असतात. त्यांतील एक म्हणजे, समोरचे प्राणी-पक्षी तुमच्यासाठी बदलत नाहीत; तुम्ही त्यांच्या सवयीनुसार स्वतःमध्ये बदल करायचे असतात. शांतता ही मुख्य अट. जंगलातील पशू-पक्ष्यांची नजर आणि कान इतके तीक्ष्ण असतात, की काही किलोमीटरपर्यंतच्या हालचाली ते सहज टिपतात. त्यामुळे आपण बोलायचे नाही, जंगलातील संवाद ऐकायचे असतात. मग आपल्याला पालापाचोळ्यात होणारी सळसळसुद्धा टिपता येते. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे "पेशन्स'. डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्रफिक चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या लघुपटांप्रमाणे प्रत्यक्षातील अभयारण्य दिसायलाही छान असले, तरी प्राण्याचे दर्शन म्हणजे "लक' असते. अभयारण्यात गेलात, की काही मिनिटांत हरणांचा कळप दिसेल, थोडे पुढे गेल्यावर पाणवठ्यावर वाघ दिसेल... असे कधी तरीच घडते. कारण आपण त्यांच्या अधिवासात गेलो आहोत, प्राण्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते आपल्याला दर्शन देतात. पण निराश होण्याचे कारण नाही. कारण तास न् तास फिरल्यानंतर जेव्हा देखणा अजस्र वाघ किंवा गोंडस हरणांचा कळप आपल्या समोरून चालत जातो, त्या वेळी आपला थकवा, निराशा क्षणार्धात निघून जाते. रोजची धावपळ, स्पर्धा या सगळ्याचा विसर पडून आपण निसर्गाने निर्माण केलेले हे विलक्षण जीव पाहून थक्क होतो.
वाघ, गवा, हरिण, सांबर यांच्या पलीकडेही जंगलात खूप काही बघण्यासारखे असते. आपली लांब शेपटी दिमाखात उडवत जाणारा स्वर्गीय नर्तक पक्षी किंवा जंगलातील गूढतेचे प्रतीक असलेले घुबड, विलक्षण करारी नजर असलेला सर्प गरुड किंवा मोठ्या चोचीचा धनेश पक्षी! एवढेच नाही, तर लहान-मोठे कीटक, सापांमध्येही असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. रोज खूप माणसे आणि वाहनांच्या गर्दीत राहिल्यानंतर जेव्हा आपण जंगलात जातो, त्या वेळी मिळणाऱ्या शांततेचे मूल्य कशातच होऊ शकत नाही. इथे कोणीही स्वार्थी नाही, किंवा कसली स्पर्धाही येथे नाही.
महाराष्ट्रातील लोक या बाबतीत अतिशय भाग्यवान आहेत, कारण त्यांना निसर्गाने जैववैविध्याचे वरदान दिले आहे. विदर्भ, मराठवाडा भागातील जंगल आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील अभयारण्ये या दोन्हींमध्ये खूप फरक असल्याने प्रत्येक जंगलात आपल्याला वेगवेगळे वातावरण आणि जीवसृष्टी अनुभवायला मिळते. उदाहरणच घ्यायचे झाले, तर रेहेकुरी हे काळविटाचे अभयारण्य आहे, दाजीपूर गव्यांचे, नान्नज हे माळढोक पक्ष्यांसाठी, तर मयूरेश्वर हे सलमान खानने फेमस केलेल्या चिंकारा या हरणांचे राखीव अभयारण्य आहे. मायणी, कर्नाळा, माळढोक, नांदूर, मधमेश्वर आणि जायकवाडी ही खास पक्ष्यांसाठी स्थापन केलेली अभयारण्ये आहेत. याखेरीज महाराष्ट्रात संजय गांधी, ताडोबा-अंधारी आणि नवेगाव ही राष्ट्रीय उद्याने आहेत. मालवण हे एकमेव सागरी उद्यान आहे. विशेष म्हणजे या सर्व अभयारण्यांमध्ये अथवा प्रवेशद्वाराजवळ वन विभागाची विश्रामगृहे आहेत. त्यामुळे जंगलात राहण्याचा अनुभव नक्कीच येथे मिळतो.
नागझिरा अभयारण्य
गोंदिया जिल्ह्यातले एक लहानसे वन्य जीव अभयारण्य म्हणजे नागझिरा. येथील तलाव हे नागझिऱ्याचे वैशिष्ट्य आहे. घनदाट झाडीच्या परिसरात निळ्याशार पाण्याने भरलेला हा तलाव कुणालाही अभयारण्याचे आकर्षण ठरतो. तलावाशेजारी लपणात शांत बसून राहिले, की काठावर चरणारे पक्षी, चितळ आणि वानरांची टोळीसुद्धा पाहायला मिळते. उन्हाळ्यात तर या तलावावर वन्य प्राण्यांची रेलचेल असते. कधी कधी वाघाचेही दर्शन मिळते. बिबट्या, अस्वल, सांबर, रानगवे, कोल्हा, उदमांजर, ताडमांजर, उडणारी खार, तरस असे अनेक वन्य प्राणी येथे वास्तव्यास आहेत. पक्ष्यांच्या अनेक प्रजातीही येथे सहज दिसतात.
ताडोबा
व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य सध्या गाजते आहे. वाघ बघायचा असेल, तर ताडोबाला अवश्य भेट दिली पाहिजे. येथे अभयारण्यात मुक्काम करण्यास परवानगी नाही; मात्र मोहर्ली येथे महाराष्ट्र पर्यटन मंडळाने राहण्याची सोय केली आहे. जंगलामध्ये चालत फिरण्यास बंदी आहे. चारचाकी गाड्यांनी फिरण्याची सोय आहे. गाडीतून फिरताना दुतर्फा असलेल्या झाडीत बसलेला वाघ अनेकांना दर्शन देतो. येथील कोळशा या भागात वन विभागाने विश्रामगृहाची सोय केली आहे. वाघांसह 41 प्रकारचे सस्तन प्राणी, सुमारे दीडशे प्रकारचे पक्षी, 70 प्रकारची फुलपाखरे आणि कीटक आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात.
कर्नाळा
ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू झालेले कर्नाळा येथे खास पक्ष्यांसाठी राखीव असे अभयारण्य अस्तित्वात आले. अभयारण्यात कोल्हा, भेकर, रानडुक्कर असे प्राणी वास्तव्यास असले, तरी ते खास पक्ष्यांसाठी राखीव आहे. स्थलांतरित पक्ष्यांसह काही दुर्मिळ जातीचे पक्षी येथे पाहायला मिळतात. स्वर्गीय नर्तक, भृंगराज, हळद्या, हरितांग, पाचूकवडा, श्याम हे निमसदाहरित किंवा पानझडीच्या जंगलात आढळणारे पक्षी इथे सहज दिसतात. करडा परीट, तांबुला, शैलकस्तूर, ग्रे-हेडेड कॅनरी फ्लायकॅचर, हे काही हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. उन्हाळ्यात हळद्या, बुरखा हळद्या, सुभग, कोतवाल, नाचरा, सोनपाठी सुतार, नीलिमा, नीलमणी, बंड्या धीवर या स्थानिक पक्ष्यांची वीण होते; पण येथेही पक्षी बघण्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे एकाग्रता.
फणसाड
रायगड जिल्ह्यातील काशीद, मुरूड, जंजिरा येथील समुद्र किनाऱ्यांना भेट देणारे अनेक पर्यटक आहेत; पण समुद्र किनाऱ्याला लागून असलेले "फणसाड' अभयारण्य किती लोकांना माहीत आहे? महाराष्ट्रातील समुद्राला लागून असलेले हे एकमेव अभयारण्य आहे. वृक्षप्रेमींसाठी येथे सातशेहून अधिक जातींचे वृक्ष; तर पक्षिप्रेमींसाठी हे नंदनवनच आहे. अभयारण्यात 30 पाणस्थळे आहेत. त्यांना स्थानिक भाषेत "गाण' म्हणतात. सकाळी आणि सायंकाळी येथे पक्षिसंमेलन भरते. बिबट्यांसह सांबर, भेकर, लालतोंडी माकड, पिसोरी, काळमांजर, कोल्हा, खवल्या मांजर, जवादा आदी 16 जातींचे सस्तन प्राण्यांचे येथे वास्तव्य आहे. तसेच 142 जातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात. सापांचेही येथे असंख्य प्रकार आहेत. वन विभागाने जंगलात विश्रामगृहे बांधलेली असल्याने रात्री येथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो.
दाजीपूर
जंगलात फेरफटका मारताना अचानक साधारणतः एक हजार किलो वजनाचा अवाढव्य गवा समोर आला तर काय होईल, याचा विचार करा! एक नव्हे तर अशा शेकडो गव्यांसाठी "दाजीपूर अभयारण्य' राखीव आहे. या अभयारण्याने नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. दाजीपूर हे अभयारण्य माळरान आणि सदाहरित झाडांनी व्यापलेले असल्याने, येथे विविध प्रकारचे पक्षी, वन्य प्राणी आणि सरपटणारेही अनेक प्राणी पाहायला मिळतात. बिबट्या, सांबर, भेकर, रानकुत्री, रानकोंबडी, साळिंदर, उदमांजर, शेकरूही येथे आहे. या जंगलामध्ये चालत फिरता येते आणि गाडी घेऊनही जाऊ शकतो. सांबर कोंड, वाघाचे पाणी, सावराचा सडा, पाट्याचा डांग, लक्षी तलाव ही ठिकाणे तर आवर्जून पाहिली पाहिजेत. वन विभाग, तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे जंगलामध्ये राण्याची सोय केलेली आहे. विश्रामगृहांबरोबरच येथे तंबूही आहेत. एमटीडीसीमध्ये जेवायची उत्तम सोय आहे.
रेहेकुरी
नगरमधील कर्जत तालुक्यात खास काळविटांसाठी "रेहू' हे अभयारण्य राखीव ठेवण्यात आले आहे. माळरानातून बसने अथवा गाडीतून फिरताना रस्त्याच्या दुतर्फा नजर टाकली, तर काटेरी झुडपात अथवा गवतातून चरणारे काळवीट पाहिल्यास प्रवासामुळे आलेला थकवा क्षणार्धात दूर होतो. हिरव्यागार गवतात चरणारे काळवीट आणि त्यांच्या शिंगांवर अथवा अंगावर उड्या मारणाऱ्या मैना हे दृश्य आल्हाददायी असते. रेहेकुरीमध्ये काळविटांसह चिंकारेही आढळतात. माळरानात राहणारे पक्षीही येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. वन विभागाने अभयारण्यात विश्रामगृह आणि लपणगृहांची सोय केली आहे. त्यामुळे येथे एका ठिकाणी शांत बसून राहिल्यास काळवीट नक्कीच दर्शन देतात.
महाराष्ट्राबाहेरील अभायरण्ये
महाराष्ट्राच्या बाहेर कान्हा नॅशनल पार्क, पेंच अभयारण्य, सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीर अभयारण्य, सुंदरबन, काझिरंगा, बांधवगड, नागरहोळे, दंडेली ही प्रसिद्ध अभयारण्येही जंगल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केली आहेत. राहणे आणि भोजन व्यवस्थेबरोबरच या अभयारण्यांमध्ये फिरण्यासाठी जीपची व्यवस्था केलेली असते. वन विभागाचा गाइड तुम्हाला जंगलाची सफर घडवून आणतो. पुण्यासह इतर अनेक शहरांत खास जंगल टुरिझमसाठी स्थापन झालेल्या अनेक व्यावसायिक पर्यटन संस्था, तसेच निसर्ग अभ्यासकांच्या स्वयंसेवी संस्था निसर्गप्रेमींना विविध कॅम्पच्या माध्यमातून जंगल भ्रमंतीला नेतात. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी त्यांच्याकडे आकर्षक प्लॅन असतात. नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटण्याबरोबरच कधीतरी शांत निसर्गाच्या सहवासात आवर्जून गेले पाहिजे; अर्थात निसर्गाला हानी पोचणार नाही, याची काळजी घेण्याचीदेखील गरज आहे.
------------------
चैत्राली चांदोरकर
प्रतिक्रिया
17 Apr 2010 - 11:38 am | योगेश२४
चैत्राली छानच माहिती.
थोडे फोटो टाकले असते तर अजुन छान वाटले असते :)
"फणसाड अभयारण्याची" अजुन माहिती द्या ना, उदा. बुकिंग कोठुन करायची. इ.
19 Apr 2010 - 1:19 pm | chaitralic
धन्यवाद.
माझ्याकडे भरपूर फोटो आहेत पण ते कसे अपलोड करायचे ते मला समजले नाही.
17 Apr 2010 - 12:42 pm | मदनबाण
छान माहिती... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
17 Apr 2010 - 1:06 pm | अरुंधती
उत्तम माहितीपूर्ण लेख.... फोटोज नी अजून मजा आली असती! आणि हा लेख कलादालन मधे का दिलाय? ''जनातलं मनातलं '' मधे दे ना!
फोटोजच्या प्रतीक्षेत :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
19 Apr 2010 - 1:20 pm | chaitralic
धन्यवाद.
माझ्याकडे भरपूर फोटो आहेत पण ते कसे अपलोड करायचे ते मला समजले नाही. मी खूप प्रयत्न केले. http://www.flickr.com/photos/chaitralichandorkar/4533577035/
19 Apr 2010 - 1:30 pm | डावखुरा
This photo is private.
Oops! You don't have permission to view this photo.
"राजे!"
17 Apr 2010 - 6:17 pm | विमुक्त
छान माहिती...
18 Apr 2010 - 7:51 am | स्वानन्द
अतिशय माहितीपूर्ण लेख. तुमच्याकडून जंगलात घडलेले अनुभव, किस्से ऐकायला (वाचायला ) आवडतील :)
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
19 Apr 2010 - 1:21 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान माहिती अन छान लेख
binarybandya™
19 Apr 2010 - 1:29 pm | इनोबा म्हणे
>>माझ्याकडे भरपूर फोटो आहेत पण ते कसे अपलोड करायचे ते मला समजले नाही.
तुमच्या प्लिकरच्या लिंकवरील फोटो पाहता आले नाहीत. फोटो प्रायव्हेट मोडमध्ये आहेत. ते पब्लिक मोडवर ठेवा.
तुम्ही जेव्हा लेख लिहीता तेव्हा टेक्स्ट फिल्डच्या वरील टूल्स बघा. त्यात Insert/edit image म्हणून जे एक बटन(१० व्या क्रमांकाचे) आहे त्यावर क्लिक केले की, एक बॉक्स उघडतो. त्यात Image URL मध्ये तुमच्या फोटोची लिंक डकवा.
19 Apr 2010 - 2:50 pm | अमोल केळकर
माहिती आवडली
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Apr 2010 - 2:56 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्तच... फोटोचे जमवा. मदत लागल्यास कळवा.
बिपिन कार्यकर्ते